सोमवार, १ जुलै, २०२४

मानस गोशाळा

 मानस गोशाळा
।।श्रीराम समर्थ ।।

। जय श्रीराम ।

स्थळ: गोंदवले
वेळ- पहाटे पावणे पाचची
 
"गंगे, यमुने, गोदावरी, तुंगे, कपिले , कृष्णे...  या ग या! या दीनदासाजवळ या". असं महाराजांनी दोन्ही हात पुढे करून आवाहन केलं आणि आम्ही सगळ्या जणी जे काही चौखुर उधळलो की थेट श्रीमहाराजांजवळ जाऊन उभे राहिलो. अवघ्या दोनशे पावलावर उभे होते ते सत्पुरुष!
नंदिनी सांगत होती.
 हो नंदिनीच! आज तिच्या मुखातून श्रींनी सोडवून आणलेल्या गायींपैकी कपिला गाय बोलत होती.
***
झालं असं की, यावेळी ऐन एप्रिलमध्ये आमचे गोंदवले दर्शनाला जायचे ठरले. मध्यंतरी तिथे जोरदार पाऊस होऊन गेलेला. एप्रिलचा कडक उन्हाळा... आदल्या दिवशी नुकताच पाऊस पडल्याने जरा वातावरण  कुंद झालेले होते. दिवसभर उन्हाच्या झळा असायच्या .नाही म्हणायला, पहाटे थोडासा गारवा असायचा.
पावणे पाचची बेल झाली आणि आम्ही लगबगीने समाधी मंदिरात काकड्याला पोहचलो.
 जरा मोकळी शुद्ध हवा घ्यावी म्हणून यावेळी बाहेर आईसाहेब मंदिराजवळ असलेल्या ब्रम्हानंद मंडपाच्या पायरीवर बसून काकडा अनुभवू असे ठरवले होते.
जवळच गोमातेच्या काकडआरतीसाठी म्हणून गोठ्यातून कपाळावर चांदवा असलेली पांढरी शुभ्र, उंचीपुरी बांधेसूद अशी नंदिनी गायीला  आणले गेले होते.
 
मी आधी तिला प्रदक्षिणा घातली, तिच्या दोन खुरांना स्पर्श करून नमस्कार केला आणि तिची शेपटी आपल्या अंगावरून फिरवली. तेवढ्यात तिने मान हलवली..
नंदिनी स्वस्थपणे  माझ्याकडे पहात, कान हलवत उभी होती. पण तिच्या डोळ्यात मला काहीतरी सांगायचे आहे असे भाव होते. मी इकडे येऊन बसताच... तिने परत मान हलवली आणि बोलावू लागली. म्हणून मी कट्ट्यावर जाऊन बसले. 'बोल माई, काय म्हणतेस?'
मी विचारल्यावर तेवढाच धीरगंभीर आवाज आला, "तूला काही सांगायचं आहे! "

मी अवाक.
"अग पण तुला बोलता कसे येतेय?

नंदिनी हसत हसत म्हणाली, " अग स्वतः श्रीमहाराज ही पू तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून बोलत होते ना? त्यांना काय अवघड आहे, ते फोटोतून ही प्रकट होतात.  आता असे बघ, महाराजांनी कसायाच्या हातुन गायी सोडवल्या हे तुला माहित आहेच. त्यातलीच मी एक गाय, कपिला. आता या नंदिनीच्या मुखातून बोलतेय. आम्हालाही त्यांनी मुक्ती देऊन गोलोकात पोचवले.

"काय सांगतेस काय? " मी चक्क उडालेच!
"हो तर.. आता मी सरसावून बसले. नंदिनी सांगू लागली. 'तुला माहित आहेच, श्रीमहाराजांना आम्हा गायिंबद्दल विशेष प्रेम होते.
ते नेहमी म्हणत, की जनावरांपैकी गायीला विशेष महत्व आहे. ती दूध देते, शेतीला बैल देते, खत देते हे सर्व ठीकच आहे. परंतु गायींमध्ये थोडी मानवी भावना आहे. इतर जनावरांमध्ये ती क्वचित आढळते. गायीवर आपण प्रेम करतो हे तिला कळते. भगवंताला देखील ती प्रिय आहे. "

त्या बघ त्या...तिकडे दूर उभ्या आहेत ना .. त्या गोदावरी, गंगा, तुंगा, सरस्वती, कृष्णा, यमुना यांच्या ४ थ्या पिढीतल्या गायी !

"अरेच्चा, असे कसे झाले? मी डोक्याला ताण देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नंदिनी हसत हंबरत  म्हणाली," नको ताण देऊ डोक्याला.
"तुला ती गोष्ट आठवत नाही का", महाराजांच्या चरित्रात आलेली आहे ती.
मग मीच म्हणाले," तूच सांग बाई आता"
नंदिनीच्या मुखातून कपिला गाय बोलू लागली. .
"काय सांगू... १८७६चा काळ असेल. आम्ही सगळ्या जणी (वर उल्लेखलेल्या) पूर्वी गोंदवलेपासून अवघ्या काही कोसावर असलेल्या किरकसाळ गावाच्या एका शेतकऱ्याकडे गोठ्यात राहत होतो. होतो. खूप छान चालू होते. पण त्या काळी भारतात फार दुष्काळ पडला. माणसांना अन्न आणि जनावरांना चारा मिळेनासे झाले. आमच्यातल्या काहींनी तर चारा पाणी अभावी तिथेच जीव सोडला.
अन एक दिवस ती बातमी कानावर पडली. रात्री तो शेतकरी बायकोला म्हणत होता.  " कारभारीण, लई दिस झाले, मनात एक इचार घोळतोय. जनावरांना दाणापाणी मिळत न्हाई, आपल्या लेकरांच्या पोटात घालाया रोटी परवडत न्हाई,  परवा म्हसवडचा बाजार हाय. नवीन जनावरं कोणी खरेदी करत न्हाई आता ... पोसायला जड म्हूनशान ! माझा इचार हाय की  उद्या आपल्याकडं असलेल्या या गायी कसायाकड़े देवून येऊ. चार पैका तरी मिळल~  ". हे ऐकले मात्र. आमच्या पोटात धस्स झाले. आता आपल्या गळ्यावर सुरी फिरणार या कल्पनेनेच सुन्न झालो आम्ही. आम्ही मनोमन त्याला विनवत होतो, "नको रे दादा इतका निर्दयी होऊ अन आम्हाला कसायाच्या हाती देऊ. आमची लेकरं काय म्हणतील... ! इतकी वर्ष आम्ही दूधदुभते , शेणखत, आमची मुले तुला शेतीला कामाला दिली. असा करुण अंत नको देऊ आम्हाला! "
रानात चरायला जातांना आम्ही इतर गोमातांकडून ऐकले होते की इथून जवळच गोंदवले इथे एक सत्पुरुष राहतात...त्यांना गायींविषयी अगदी निर्व्याज प्रेम आहे. भाकड, आटलेल्या, नकोश्या झालेल्या गायी ते सांभाळतात. अनेक शेतकरी परिस्थिती वाईट झाली की त्यांच्याकडे जनावरे सोडतात आणि परिस्थिती चांगली झाल्यावर घेऊन जातात. आणि हे सत्पुरुष गोप्रदाने पण करतात.  आम्हाला मनोमन खूप वाटायचे.. या सत्पुरुषाचे एकदा तरी दर्शन व्हावे, त्यांची एक नजर तरी आपल्यावर पडावी. त्यांच्या दर्शनानेच माणूस उद्धरून जातो म्हणतात. आम्ही मनोमन आमच्या मालकाला विनवत होतो. दादा, आम्हाला त्यांच्याकडे पोहचवा. . ते  आमचा प्रेमाने सांभाळ करतील. " पण आमची मूक हाक त्याच्यापर्यंत पोहोचलीच नाही.
त्या शेतकऱ्याने नाईलाजाने आम्हाला कसायाला विकले.
पण आमची आर्तता  त्या सत्पुरुषांपर्यंत पोहचली होती. .आणि कर्मधर्मसंयोगाने रस्ता चुकून नेमके ते कसाई आम्हाला इथे गोंदवल्यास घेऊन आले. धर्मशाळेत मुक्कामी राहिले. गोंदवले हद्दीमध्ये पाय ठेवताक्षणीच आम्हाला शुभसंकेत दिसू लागले होते. इथे, या मातीत नक्कीच काहीतरी वेगळेपण आहे, याची जाणीव होत होती. इथे प्रत्येक व्यक्तीच्या हातात माळ दिसत होती. कोणाच्याही चेहऱ्यावर दुःख, क्लेश, क्रोध दिसत नव्हता. कोणी राममंदिरात जप करत बसल्याचे दिसले.. तर कोणी पूजा करताना. जेवणाच्या पंक्ती दिसत होत्या. भाकरी आमटीचा सुवास दरवळत होता. लोक मुखाने नाम , हाताने काम करत होते. इतरत्र सर्वत्र दुष्काळाने हाहाकार माजलेला असतांना, इथे मात्र शेतात काम करणारे लोक दिसत होते. अगदीच काही नाही तर शेतातील माती इकडची उचलून तिकडे टाका.. अशी कष्टाची जाणीव करून देणारे लोक दिसले , त्यांना रोजगार देणारे, त्यांना शेतातच झाडाखाली बसवून भात आमटी वाढणारे लोक दिसले.  सर्वांमध्ये अलोट, निस्वार्थी, निर्व्याज प्रेम दिसत होते. आपले दुःख विसरून दुसऱ्याला जीवाला जीव लावणारे लोक दिसत होते.

आणि माहिती आहे का, दुसरे दिवशी आम्हाला घेऊन ते कसाई निघणार.. तेवढ्यात त्या सत्पुरुषापर्यंत ही बातमी आधीच पोहचली होती. कसाई आम्हाला सोटे मारत हुर्रर्र करत हाकलत..... घेऊन जात होते. आम्ही ४ दिवसाचे उपाशी पाय ओढत, केविलवाण्या नजरेने चाललो होतो.. सोट्याचे फटके पाठीवर पडतांना वेदना होत होत्या..  
तेवढ्यात, एक अत्यंत तेजस्वी, गौरवर्ण, कपाळाला उभे गंध, प्रसन्नचित्त, असे पांढरे शुभ्र धोतर आणि वर उपरणे असा वेष परिधान केलेले गृहस्थ समोरच्या राममंदिराच्या दारात प्रकटले. आणि जोरात ओरडले, "हा हा , मारू नका गायींना. या मुक्या जनावरांना किती कष्ट होत असतील याची तुम्हाला कल्पना नाही.  मी या गायींची किंमत तुम्हाला देतो आणि या विकत घेतो पण इतःपर तुम्ही हा धंदा सोडून द्या. हे पाप आहे."
हे शब्द कानावर पडताच आमच्या आशा पल्लवीत झाल्या. इतक्या दिवसांची आस पूर्ण झाली. त्यांनी ती एक दयाळु नजर आम्हावर फिरवली आणि इतके गार वाटले म्हणून सांगू! आम्ही दिग्मूढ झालो. त्या सत्पुरुषाचे नाव श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहे असे तिथेच कळले.

त्यानंतर ते निर्दयी कसाई म्हणाले कि "महाराज, या गायींना इतके कुठे समजते?" खरं तर आम्हाला सगळं कळत होतं. फक्त वाचा नसल्याने आम्ही बोलू शकत नव्हतो.

 तेव्हा महाराज म्हणाले, "तुम्ही त्यांना मोकळे करा, मी लांब उभा राहून हाक मारतो.  त्या धावून माझ्याकडे आल्या तर तुम्ही त्यांना सोडा.'
कसाई म्हणाले, "हे कबुल आहे, पण त्या जर तुमच्याकडे नाही आल्या तर मात्र आम्ही त्यांना मारायला घेऊन जाऊ. "

महाराज दोनशे पावलावर जाऊन उभे राहिले आणि चक्क मोठ्याने आमची नावं घेऊन म्हणाले, "गंगे, यमुने, गोदावरी, तुंगे, कपिले , कृष्णे...  या ग या! या दीनदासाजवळ या". आणि काय सांगू, आम्हाला माउली भेटल्याचा भास झाला. जणू आपली कान्हा माऊलीच आम्हाला बोलावत होती.
श्रीमहाराजांनी असे बोलावण्याचा अवकाश, कि आम्ही सगळ्या गायी, आनंदाने शेपट्या वर करून हंबरत... जे कानात वारं भरल्यासारखे उधळलो ते थेट त्यांच्या पायाशी!  त्यांचे पाय चाटू लागलो. . त्यांचे अंग हुंगू लागलो .. त्यांच्या अंगाला अंग घासू लागलो. त्यांच्या तोंडाकडे पाहत हंबरू लागलो .

आणि काय सांगू,,, महाराजांच्या शरीरातून, 'श्रीराम जय राम जय जय राम' असा ध्वनी येत होता. त्यांच्या अंगाला तुळशीचा सुगंध हि येत होता.. जणूकाही नुकतेच रामाची मानसपूजा करून स्वारी बाहेर आली असावी.

इतःपर बघे येऊन उभे राहीले होते. आजूबाजूला गोमाता आणि मध्ये उभे श्रीमहाराज. गोकुळातल्या कृष्णाचीच आठवण उपस्थित लोकांना होत होती असे त्यांच्या बोलण्यावरून कळले.  कसायांचे पैसे चुकते करताच त्यांनी काढता पाय घेतला.
इकडे  महाराज आम्हाला प्रेमाने  कुरवाळत, गोंजारत बराच वेळ उभे होते. आमच्या पाठीवर सोट्ये  मारल्याने जखमा झाल्या होत्या त्यावर हळदीचा लेप लावला... आम्हाला स्वतःच्या हाताने त्यांनी चारा खाऊ घातला.. पाणी दिले. आम्हाला तर आनंदाने जणू गगन ठेंगणे झाले होते. . आम्ही आनंदविभोर झालो होतो.आनंदाने उचंबळून  येत होते. नंतर अभ्यंकर दादांना बोलावून आमची गोठ्यात व्यवस्था लावायला सांगून हा सत्पुरुष शेतीच्या कामाकडे बघायला निघून गेला.
   
हे सांगता सांगता नंदिनीचे उर्फ कपिलेचे डोळे भरून आले. गळ्यातली घंटा हलवत , खुराने जमीन उकरत ती मूकपणे रडत होती. मलाही राहवले गेले नाही. तिच्या पाठीवर थाप मारत मी तिच्या गळ्याला गोंजारले. पाठीवर थाप टाकताच तिचे अंग थरथरले.

ती पुढे सांगू लागली, "महाराज खूप सेवा करायचे ग आमची. गोमयाने गोठा सारवणे, गोठा साफ करणे, ही साधी कामे ही महाराज करत असत. गुरुत्व धारण केल्यावरही ते अतिशय साधे राहणीमान होते त्यांचे, साधे खाणे होते... बोलणेही साधेच.इथे आलेल्या मंडळींना स्नान घालण्यापासून तर त्यांना जेवायला वाढणे, पत्रावळ्या बनवणे, शेतात नांगर धरणे, खणणे, वेळप्रसंगी चिखल तुडवणे अशीही हलकी कामे ते करत.

आमचे तर इतके लाड करत. आम्ही दिवस दिवस त्यांची वाट पाहत असू. ते अभ्यंकर दादा, आम्हाला सांगून सांगून थकत असत, की अग बायांनो... महाराज आज कोरेगावला गेलेत, साताऱ्याला गेले, बैलगाडीचा प्रवास त्यांना यायला उशीर होईल. आम्ही दिवस दिवसभर उपाशी राहत असू, पण चाऱ्याला तोंड लावत नसू. काय करणार, त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय आम्हाला चैन पडत नसे. अन्नपाणी गोड लागत नसे.
एकदा तर महाराज कर्नाटकात गेल्याचे कळले आणि इथे त्या गंगीने अन्नपाणी सोडले होते. महाराज रेल्वेने ४ दिवसांनी परत आले. त्यांना हे समजताच त्यांनि आधी इथे धाव घेतली. आणि गंगीला जवळ घेतले, कुरवाळले, गोंजारले.. आणि प्रेमाने चारा भरवला तेव्हा कुठे ती शांत झाली.

नंदिनी सांगत होती... मी समरसून ऐकत होते.
"अग एकदा तर , म्हसवडच्या बाजारात दुसऱ्या दिवशी  गायी विकायला येणार आहेत असे कळल्यावर हा महात्मा अपरात्री दीड वाजता पोहचून रात्रभर डासांमध्ये राहिला होता. कोण करेल इतके गायिंसाठी या कलियुगात सांग बरं !
"काय म्हणतेस? मला नव्हती ही गोष्ट माहित!  मी म्हणाले.
नंदिनी उत्साहाने सांगू लागली.
"हो तर, महाराज नागप्पाला घेऊन कंदील, तपेली, घड्याळ, कफनी, लंगोटी, चष्मा, रुमाल दंतमंजन, सतरंजी अश्या वस्तू घेऊन म्हसवडमध्ये पोहचले . त्यांनी आधीच  नागप्पाजवळ साडे चारशे रुपये ठेवायला दिले होते. म्हसवड गावाची धर्मशाळा इतकी जुनी होती.. तिथे कित्येक वर्षात झाडलोड झालेली नव्हती.. तर स्वतः महाराजांनी कंदील पेटवला. नागप्पाने स्वतःच्या उपरण्याने थोडी जागा स्वच्छ केली. घोड्यावरची घोंगडी त्याने अंथरली, त्यावर कफनी पसरवली.. ..आणि सतरंजीची घडी करून उशाशी ठेवली. महाराज थोडे पाणी प्यायले .. अन नागप्पाला म्हणाले की, तू जागु नकोस. ते पैसे कनवटीला लाव आणि खुशाल झोपी जा. मी ही जरा स्वस्थ पडतो. असं म्हणून महाराज दोन मिनिटात झोपी गेले. इकडे नागप्पा त्यांच्या डोक्याच्या बाजूला भिंतीला टेकून बसला पण त्याला काही झोप आली नाही.. इतके डास होते तिथे. मग फक्त दोन तास झोप घेऊन महाराज चारच्या सुमारास उठले, गार पाणी प्यायले आणि अंथरुणावर बसूनच त्यांनी भजन करायला सुरुवात केली. थोड्या वेळाने उजाडल्यावर बाजारात गेले.
आणि अग काय सांगू..  त्या दिवशी महाराजांनी ६०-७० गायी विकत घेतल्या. कसायांना एकही गाय मिळू दिली नाही.
बाजार झाल्यावर एकाकडे जेवायला गेले होते महाराज, तर शेवटचा ताकभात खातांनाच त्यांना इतकी जोराची उचकी लागली की घास काही केल्या गिळेना.. पाणी प्यायले तरी तसेच. तसेच उठून हात धुतला महाराजांनी आणि लगबगीने मागच्या दाराने बाहेर गेले तर थोड्या अंतरावरच एक कसाई निर्दयपणे एका गायीच्या पाठीवर सटासट सोटे मारत होता. ती गाय खाली बसली होती. तिच्या तोंडातून रक्त येत होते. हंबरून हंबरून ती आता अगदी केविलवाण्या स्वरात विव्हळत होती.
महाराज त्या जागेवरूनच त्याला ओरडले, "खबरदार, तिला मारू नकोस.मग त्याच्या जवळ जाऊन म्हणाले, हि गाय मला विकत दे.
महाराज जास्त किंमत द्यायला तयार होते पण काही केल्या कसाई मानत नव्हता. शेवटी जमलेल्या गर्दीत एक फौजदार होता.. त्याने त्याला दम भरला. थोडे वर पैसे देऊन तो एकदाचा मानला. महाराजांनी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, "बाई, आज तुझ्यावर मोठा प्रसंग आला होता. यमाच्या दाढेतून तू वाचलीस, चल उठ आता!" म्हणजे श्रीमहाराज या परिसरातल्या मुक्या प्राण्याशी ही कसे जोडले गेले होते बघ. तिने आर्ततेने महाराजांचा धावा केला म्हणून महाराजांना चक्क उचक्या लागाव्या आणि महाराज लगोलग तिथे पोहचावे.
मग लगेच ती उठून उभी राहिली. या महात्म्याने स्वतः तिचे तोंड धुवून स्वच्छ केले. मग तिथल्याच एका सद्गृहस्थाने मागितली म्हणून श्रीं त्याला ती गाय देताना म्हणाले, की "तुम्ही घेऊन जा, पण जर तुम्हाला नकोशी होईल तर मलाच परत करा." त्या गृहस्थाने तेव्हा कबुल केले खरे पण दुसऱ्याला देऊन टाकली.
नंतर काही दिवसांनी पुन्हा महाराज त्या गायीच्या समाचाराला गेले तेव्हा त्याच वाड्यात दुसऱ्या गृहस्थाकडे असेलल्या तिने श्रींना पाहताक्षणीच मोठमोठ्याने हंबरण्यास सुरुवात केली. महाराज घोड्यावरून पुढे जाऊ लागताच दावणीला हिसकाहिसकी करून तिने दावे तोडले आणि त्यांच्यामागे चौखूर धावत गेली. तेव्हा महाराजांनी घोडा थांबवला.. ते समजून चुकले. मग प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवत ते म्हणाले, की, माय, तू जाशील तिकडे मी येतो, चल ! आणि गम्मत म्हणजे ते जिथे उतरले होते तिथेच ती गाय त्यांना घेऊन गेली. मग दोन दिवसांनी एका सज्जनाला महाराजांनी ती गाय देऊन टाकली. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा महाराज तिला आश्वस्त करत म्हणाले, *बाई, दिल्या घरी सुखाने नांदावे! "मग ती निमूटपणे गेली.

"या सत्पुरुषाचे इतके उपकार आहेत ना सगळया जगावर.. आणि आमच्यावर तर त्यांचे अलोट प्रेम होते. त्यांच्या लंगड्या गंगी गायीची गोष्ट माहीतच असेल तुला! "
"हो हो माहित आहे, गोंदवल्यापासून १० कोसावर असलेल्या गावातील एक सधन कुटुंब पण नंतर  परिस्थिती खालावते म्हणून एकेक जनावर ते काढायला लागतात. त्याच्यात ही लंगडी गंगी गाय असते. मग त्याला प्रश्न पडतो कि हि द्यावी कोणाला. कोणीतरी महाराजांचे नाव सुचवल्यावरून तो महाराजांकडे आणून सोडतो. महाराज ही ठेवून घेतात. एक दोन वर्षांनी परिस्थिती सुधारल्यावर तो परत गंगीला घ्यायला येतो. महाराज, तिच्याकडे जाऊन तिला म्हणतात, की गंगे, बघ..तुला नेण्यासाठी कोण आलेले आहे. त्यांच्यासोबत आनंदाने जा. पण गंगी डोळ्यात पाणी आणून हंबरडा फोडते. शेवटी महाराजच तिच्या मालकाला म्हणतात, की तिची घरी परत जाण्याची इच्छा दिसत नाही. तुमची संमती असेल तर मी तिला इथेच ठेवून घेतो. माझ्या मुलीप्रमाणे मी तिचा सांभाळ करील. "

"काय विलक्षण शब्द होते ग ते! कानात साठवून ठेवावे असे. खरोखर मुलीप्रमाणे ते सांभाळ करतात आमचा. अगदी माहेरवाशिणीसारखे लाड करायचे.
या गंगीवर आणि गंगीचे महाराजांवर इतके प्रेम होते की ते दिसताच ती दाव्याला हिसकाहिसकी सुरु करत असे. आणि मोकळी सोडल्यावर त्यांच्या मागे मागे जाऊ लागे. महाराजांनी तिला कुरवाळून तिच्याशी थोडे संभाषण केले.. अन  समजावून सांगितले कि तरच ती गोठ्यात परत जात असे.

एका रामनवमीला माहितेय काय गंमत झाली!
रामनवमीला संध्याकाळी महाराज राममंदिरात होते. ते बापूसाहेब माने होते त्यांच्यासोबत. आम्ही सगळ्या जणी नदीवरून पाणी पिऊन यायला आणि महाराज राममंदिराच्या दारात यायला एकच गाठ पडली.
आणि आम्हाला पाहताच महाराजांचे प्रेम उचंबळून आले. लगेच धावत ते बाहेर आले.. आणि आमच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. कुरवाळले. जवळ असलेल्या मंडळींना सांगून त्यांनी त्यांच्या मळ्यातून ऊस कापून आणायला सांगितला. ऊस कापून होईस्तोवर ते आमच्याजवळ बसले. आणि आम्हाला प्रत्येकीला प्रेमाने ऊस भरवला. काय बोलणार या प्रेमापुढे!! त्यांच्या प्रत्येक कृतीत प्रेम होते.

किती किती गोष्टी सांगू त्यांच्या? अगदी अलीकडेच अभ्यंकर दादांनंतर गणूकाका साने हे आमची व्यवस्था बघत होते. ही यमुना गाभण होती तेव्हा.. अन ती  विण्याच्या बेतात आहे असा निरोप जाताच महाराज लगोलग बरोबर काही मंडळींना घेऊन इकडे निघाले. अर्धे वासरू बाहेर आले होते.  महाराजांनी गायीला तीन प्रदक्षिणा घातल्या. आणि म्हणाले, "अरे ही केवढी सोन्यासारखी संधी. अश्या स्थितीत गोमातेला प्रदक्षिणा घालणाऱ्याला पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य लाभते." पाठोपाठ मग बरोबरीच्या मंडळींनी हि प्रदक्षिणा घातल्या.

अगो, असा हा कनवाळू महात्मा देह ठेवायच्या पाच दिवस आधी म्हणजे बघ, बुधवारी, १७ डिसेंबरला म्हसवडला नागोबाची यात्रा भरते ना तिथे बऱ्याच गायी विकायला येणार असे कळल्यावर महाराज बरेचसे पैसे घेऊन गेले होते. जाता जाता बोलले की 'आता ही अखेरची सेवा आहे.' आमच्या पोटात तेव्हाच धस्स झाले. आता पुढे काय वाढून ठेवले आहे आपल्यापुढे असे वाटून सुन्न झालो होतो आम्ही. तिथेही त्यांनी बऱ्याच गायी सोडवल्या. आयुष्याच्या अंतसमयी त्यांच्याकडे जवळजवळ पाऊणशे जनावरे होती.

"काय सांगू, मला भरून येतंय बाई!" बोलता बोलता नंदिनीने आवंढा गिळला. भरलेल्या आवाजाने ती पुढे सांगू लागली..
 "इथे हे जे समाधी मंदिर दिसते आहे ना.. तिथे आधी आमची गोशाळा होती. देह ठेवण्याआधी हा सत्पुरुष इथे येऊन बसला होता. .
२१ डिसेम्बर १९१३ चा प्रसंग अजूनही जसाच्या तसा डोळ्यासमोर येतोय. तशी महाराज निर्वाणीचे बोलू लागले आहेत याची कुणकुण आम्हाला लागलीच होती. गोशाळेत आम्ही सुन्न झालो होतो. कुणी कुणाशी बोलत नव्हते. मनातल्या मनात टाहो फोडून रडत होतो. त्यांना विनवत होतो, महाराज, नका हो जाऊ आम्हाला सोडून. "
त्या दिवशी साधारण संध्याकाळी ५ वाजता महाराज इथे येऊन बसले. बापूसाहेब खरे यांची सून आजारी होती.. तिला इथेच ठेवले होते. तिला धीर देऊन  महाराज थेट गोठ्यात आले. गोठ्यात आम्ही गायी, बैल, वासरे असे सगळे मिळून साधारण पाऊणशे जण होतो. सगळ्यांवर श्रींची प्रेमळ नजर फिरली. त्यांना दम्याचा त्रास होतोय... हे तेव्हाच जाणवले.  आम्ही व्याकुळ नजरेने पाहत होतो.
श्रींनी या  भूमीला दंडवत घातला आणि म्हणाले, "बायांनो ही शेवटची सेवा बरं का!" आम्ही समजून चुकलो.. कि महाराज आता निजधामाला निघणार. सकाळीच त्यांनी आउताईंना सांगितलेला निरोप आमच्याही कानावर आला होता. ते म्हणाले, होते, "सर्वांना सांगा, आता भात गावाला चालला. जी भाजीभाकरी मिळेल ते खाऊन आनंदाने नाम घ्यावे,आणि काळ कंठावा!"
 ते आपल्याला सोडून जाणार ही कल्पनाच आम्हाला सहन होत नव्हती. आम्ही धाय मोकलून रडत होतो. आणि एकेकीच्या जवळ जाऊन ते तिच्या पाठीवर थाप मारत होते. तिला कवेत घेत होते.  आम्ही त्यांचे पाय चाटत होतो. त्यांना नमन करत होतो...!  सगळ्यांच्या ... खुद्द महाराजांच्या डोळ्यातूनही अश्रुधारा सुरु होत्या.
आम्हा सर्वांना नीट पाहून, सर्वांचा निरोप घेऊन ते अभ्यंकर दादांच्या झोपडीसमोर गेले. तिथे गवत पडले होते. ते साफ करायला सांगितले. भवानरावाने चटकन पुढे होऊन जागा साफ केली, सारवली,... रांगोळी काढली. खुर्ची ठेवली. महाराज त्यावर बसले.  आणि म्हणाले, "ही जागा किती छान आहे. असे वाटते इथे कायमचे येऊन राहावे".
आणि २२ डिसेम्बर १९१३ या दिवशी सकाळी ५:५५ वाजता सूर्योदयाच्या वेळी हा गोंदवल्याचा अध्यात्मसूर्य अस्ताचलास गेला. महाराज निजधामास गेल्याची बातमी आली..आणि आमचा बांध फुटला. आमच्या पायातले त्राणच गेले. मटकन खाली बसलो. कित्येक गायींनी तर तिथेच अंग सोडले.. दुःखावेग इतका अनावर झाला की त्यांनी अन्नपाणी सोडले.

" दोन दिवस ब्रम्हानंद बुवांची वाट बघून शेवटी त्यांचे पार्थिव इथे या जागेवरच हलवण्यात आले. याच जागी चिता रचली होती ग त्यांची" असं म्हणत नंदिनीने भाव विभोर् होऊन खाली बसत त्या जागेला प्रणाम केला.  

"असा हा प्रेमळ महात्मा तुम्हाला गुरु म्हणून लाभला आहे, सोने करा ग जीवनाचे. आम्हाला आमच्या भावना बोलता येत नाही म्हणून. नाहीतर आम्ही त्यांच्या सांगण्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला असता आणि  ते म्हणतात तसे अखंड मुखी नाम घेतले असते." - नंदिनीने मोलाचा सल्ला दिला.

तेवढ्यात.." चला, चला.. रांगेत उभे राहा. इथे गर्दी करू नका.. असा गुरुजींचा आवाज आला. पाठोपाठ ते आरतीचे ताट घेऊन आले, आणि नंदिनीची पूजा करून..  
।। धेनु माय जगज्जननी तापत्रयत्रितापशमनी .... ।। चा आवाज कानी पडू लागला.

आणि नंदिनी ? ती साश्रू नयनांनी समाधी मंदिराकडे निमूटपणे बघत उभी होती!

*
जय श्रीराम!
महाराज कन्या, नयना!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...