गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६

 जय श्रीराम!

आपण पाहत आहोत,
#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे
४. अश्वत्थपूर राममंदिर १९१५
पो. अश्वत्थपूर, जि. मंगळूर, ५७४२६६, कर्नाटक

दक्षिण कन्नड प्रांतात कारकळ नांवाच जिल्हा आहे.त्यांत मंगळूर नावाचा तालूका आहे.तेथील देशस्थ ब्राम्हण पहिल्या पासूनच अत्यंत गरीब स्थितीत होते.साहजिकच त्यांस अत्यंत कष्टाळू जीवन जगावें लागत असे.त्यांचा तेथे चरितार्थ चालत नसल्याने गदग,हुबळी,धारवाढसारख्या शहरांत पोटासाठी स्वयंपाक पाण्यासारखे जीवनाचे साधन पत्करुन ते रहात असत.कर्नाटक प्रांतात श्रीब्रह्मानंदगुरुंचे नाव सर्वतोमुखी झाले असल्याने स्वयंपाकी,पाणके,या नात्याने त्यांना श्रीब्रह्मानंदांच्या दर्शनाचा लाभ झाला.श्री ब्रह्मानंदगुरुंचे अगाध ज्ञान,उच्च प्रतिचे वैराग्य,दया,शांति,वगैरे पाहून ते त्यांचेकडे आकर्षिले गेले व ते श्रीगुरुंच्या सेवेत निरत झाले.श्रीगुरुंना उत्सवप्रसंगी, यज्ञप्रसंगी, सप्ताह प्रसंगी,हरघडी भोजनाचे कामी या लोकांचे अपरंपार साह्य होत असल्याने श्रीगुरुंच्या ते विशेषतं नजरेंत भरले.पर्यायाने श्रीगुरु त्यांचेवर फार प्रेम करुं लागले.

बिदरहळ्ळी येथील तेरा कोटि नामजप यज्ञाचे प्रसंगी श्रीब्रह्मचैतन्य महाराज तेथे आल्यावेळी स्वयंपाक-पाण्यासाठी दोड्डारामय्या,सण्णरामय्या वगैरे प्रमुख मंडळी आपआपल्या शे-दोनशे हस्तकांसह तेथे उपस्थित झाली होती. त्यापैकी गुत्ती रामय्याने आपल्या समाजाचे उध्दारार्थ आपण श्रींच्या पुढे हट्ट धरला पाहिजे. श्रीब्रह्मानंद मनावर घेत नाहीत श्रींकडे बोट दाखवितात. ही संधि गमावतां कामा नये असा विचार सर्वांपुढे मांडला व तो सर्वांस पटला.
एके दिवशी श्रींना सुगंधी तेलाने अभ्यंगस्नान घालून श्रीब्रह्मानंद परत येत असता तुंगभद्रेच्या वाळवंटात ही मंडळी ब्रम्हानंद महाराजांच्या पायावर लोळूं लागली. *काय पाहिजे,काय झाले ?" असे विचारता आमचा उध्दार करा. आम्ही गरीब, मागासलेले, उध्दाराचा मार्ग आम्हास मुळीच माहित नाही. आमच्या गावी आपल्या हस्ते श्रीरामाची स्थापना करा.*अशी विनंती केली " बरे आहे करु या " असे श्रीबुवांकडून आश्वासन मिळवले.

सांगतामहोत्सव संपताच अश्वत्थपूरची मंडळी जरी आपआपल्या गांवी गेली तरी गुत्तीरामय्या श्रीब्रम्हानंद बुवांच्या सेवेस तेथेच राहिला, श्रीबुवांच्या आज्ञेप्रमाणे एक दोन वेळा गुत्ती रामय्याने गांवी गेल्यावेळी आपण प्रत्यक्षांत अनुभविलेल्या श्रीमहाराजांच्या व ब्रम्हानंद बुवांच्या अगाध महिम्याचे इतके रसाळ वर्णन केले की त्या मुळे त्या सर्व लोकांच्या मनांत भक्ति व प्रेम निर्माण होऊन ते श्रीरामनाम घेऊ लागले.
 त्यावेळी अश्वत्थपूर एक डोंगराळ वस्तीचा जवळजवळ निर्जन प्रदेश होता.त्यांत नुई महादेवभट्टाचे एकमेव दुकान होते. शेकडो गगनचुंबी अश्वत्थ वृक्ष पसरले होते,एक मोठा पिंपळकट्टाही होता.या गांवास पूर्वीचे नांव पिंपळ होते. वृक्षांनी गजबजलेले हे स्थानच देऊळ बांधण्यास योग्य असे ठरवून पी. नारायण अप्पांच्या आईचे वडील सुब्बरायभट्ट यांच्या अंगणातील कट्यावर गुत्तीरामय्यांनी श्रींचा फोटो व बिदरहळ्ळीस त्यांचे हस्ते मिळालेले आशीर्वाद फळ ठेवून व मंत्राक्षता ठेवून नामसप्ताह सुरु केला व त्याचे पाठोपाठ आपल्या स्वतःच्या खर्चांने हल्लीच्या देवळाचा गाभारा त्याने बांधला. त्यास सुमारे २०० रुपये खर्च आला. 

मग मात्र गावचे पुढारी लोकांस या कृत्याने चालना मिळून त्यांने देऊळ बांधण्याचा निर्धार केला. कार्यास प्रारंभही केला. देवस्थानाचे बांधकाम १९१० मध्ये संपले. गावच्या इतर विध्नसंतोषी लोकांनी नाना प्रकारे विध्ने उपस्थित करुन विरोध केला.ते रात्री लाकडे चोरण्यास गेल्यावेळी दोन वाघांनी त्यांस पळवून लावले. त्यांनी दिवसा प्रयत्न केले,ज्या लाकडाखाली हात घालावा तेथे नाग निघू लागला. अखेर त्यांना तो नाद सोडावा लागला. श्रीमहाराजच्या व बुवांच्या पाठबळानेच विध्नांचे  परस्पर निराकरण होत असे, पुढे १-२ वर्षांत गाभाऱ्यावरील व भोवतालच्या पवळीचे बांधकाम संपले. काळ्या शिलेच्या श्रीराम,लक्ष्मण,सीता व मारुति यांच्या प्रतिमा तयार करण्याबद्दल सुचनाही गेली. शिलेचे काम उत्तम सिंहासन तयार झाले. देवालयाच्या इमारतीसाठी कायमची जागाही दान म्हणून मिळविली.

या प्रमाणे सिध्दता करुन गुत्तीरामय्याने प्रतिष्ठापनेबाबत ब्रम्हानंद बुवांजवळ आग्रह धरिला, त्यांनी गडबड करु नकोस श्रींनाच बोलावू या असे त्यांस सांगून गप्प बसविले. शके १८३५ च्या वैशाख महिन्यांत श्रीमहाराज पंढरपूरास आल्यावर त्यांचा मुक्काम तेथे ३-४ महिने होणार होता.म्हणून त्यांनी ब्रम्हानंद बुवांस तिकडे बोलावून घेतले होते.

ब्रम्हानंद बुवांनी जातांना आपल्या बरोबर १०० लोक नेले होते. त्यात गुत्ती रामय्या वगैरे अश्वत्थपूरची मंडळीही होती. बुवांनी तेथे गेल्यावर गुत्तीरामय्यास श्रींना विनंती कर व मागून घे म्हणून भर दिला, "सगळ्या लोकांना घेऊन आलेच पाहिजे असा हट्ट धरुन पाय धर. तुझे काम होईल असे सांगितले. त्याप्रमाणे वेळ साधून गुत्ती रामय्याने श्रींनी ब्रह्मानंदबुवांस बोलावून घेऊन गुत्तीरामय्यास उद्देशून "मी तेथपर्यंत येण्याचा काही योग दिसत नाही. म्हणून हा ब्रह्मानंदबुवा तुमच्या येथे येऊन तुमचे कार्यकरुन देईल. तुम्ही काळजी करु नका.बुवा आला म्हणजे मीच आलो असे समजा." असे सांगितले.  पण हे कधी घडणार हे त्यांनी सांगितले नाही. या नंतर थोड्याच महिन्यानी श्रीमहाराज समाधीस्थ झाले. ब्रम्हानंद बुवांकडे बघुन त्यांच्या आधारावर वरील मंडळींनी आपले दुःख दडपले. श्रींच्या निर्वाणा नंतर एक वर्षाने आराधना व पादुका स्थापन करुन पु. बुवा वेंकटापूरला येवून राहीले. गुत्ती रामय्या त्यांच्या बरोबर कांही दिवस तेथेच होता.

गुत्ती रामय्या अजून आपल्या गांवी श्रीरामप्रतिष्ठा झाली नाही या दुःखाने मनांत झुरत होता,कारण मंदिर तयार होऊन दोन वर्षे होऊन गेली होती. मुर्तिही तयार होवून पडल्या होत्या. पु. बुवा तर " तेथील लोक दुष्ट आहेत.त्यांना भक्ती मार्ग नको, मलाही ती प्रतिष्ठा नको!  तूंच गावी न जाता येथेच राहून टाक,,"  असे सांगत.  त्यामुळे गुत्ती रामय्या मनांतून ब्रम्हानंद  बुवांवर थोडा रुष्ठ झाला होता. म्हणून की काय एकदा पु बुवा वेंकटापुराहून पायी बेलधडीस चालले असता त्यांनी गुत्ती रामय्यास आपल्या बरोबर चलण्यास आज्ञापिले असता देखील त्याने साफ येत नाही म्हणून सांगितले व तो तेथेच राहिला, श्रीगुरु आपली प्रार्थना मनावर घेत नाही. आतां गावांतील लोकांस तोंड तरी कसे दाखवू असा त्यास खेद होऊन डोंगरांतील गुहेंत उडी मारुन प्राणत्याग करण्याचा त्याने निश्चय केला. सर्वान्तर्यामी वास करणाऱ्या श्रीगुरुंना हा संकल्प ज्ञात झाला. लागलीच एक रोजगारी गड्याबरोबर त्यांनी रामय्यास उद्या सकाळपासून तीन दिवस नामस्मरणाला आरंभ करणार आहे. स्वयंपाक करावा लागेल. तरी आलेल्या गड्या बरोबर असशील तसा निघून ये."असा निरोप पाठवला.

निरुपायाने,रामय्या गड्याबरोबर बेलधडीस गेला. त्यांने श्रीगुरुंस नमस्कार करताच "वेड्या तुझ्यासाठी तीन दिवस नामस्मरण करावे लागत आहे". असे म्हटले. त्यांचे उद्गार ऐकून रामय्यास समाधान वाटले. तीन दिवसाचा नामस्मरणाचा कार्यक्रम थाटाने पार पडला, शेवटच्या दिवशी मंगलारतीनंतर रामय्याला घेऊन ते श्रीराम मंदिराकडे गेले. तेथे श्रीरामाच्या पायावर मंत्राक्षतांसह नारळ ठेवुन,तो पुन्हा हाती घेऊन प्रसाद घे असे म्हणून मंत्राक्षता,नारळ व ५ मोहरा श्रीगुरुंना त्याच्या पदरांत बांधल्या, रामय्याने आनंदाश्रू पूर्ण नयनांनी त्याचा स्विकार करुन श्रीगुरुंच्या पायावर मस्तक ठेवले. ही आनंदाची वार्ता त्याने आपल्या गांवी कळविल्याने तेथील भक्तांनी अपूर्व उत्साह वाटला.

 तेथून श्रीगुरुंनी वेंकटापूरी रामय्यासह प्रयाण केले व एके दिवशी "तुम्ही तयार केलेल्या मूर्तीना अलंकार पोषाख कांहीच घालता येत नाही तरी त्या रद्द करुन मुंबईहून दुसऱ्या आणवू या " असे श्रीगुरुंनी त्यांस सांगितले. मुंबईस दुसऱ्या मूर्ति तयार करुन घेऊन पाठविण्यास सांगितले. थोड्याच दिवसांत सीता,राम,लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती पिंपळास आल्याचे समजताच रामय्याने श्रीगुरुंशी प्रतिष्ठापनेविषयी बोलणे काढले, तेव्हा श्रीगुरुंनी "वैशाख शुध्द पंचमी अभिजित् मुहूर्त फार चांगला आहे. किंवा वैशाख शुध्द दशमी चांगला आहे. या दोन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर प्रतिष्ठा करु यां , गाजावाजा फार नको." असे त्यांस सांगितले.

रामय्याने तात्कालही वार्ता गांवी कळवली सगळ्या भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने सिध्दता सुरु केली. अभक्तांनी आपल्या कारवाया सुरुं केल्या.त्यांनी प्रथम वाजंत्री व दिवटी धरण्याऱ्या लोकांस नविन स्थापना होणाऱ्या देवालयांत वाजंत्री वाजविल्यास व दिवटी पाजळल्यास तुम्हास गांवातून हाकलून देऊ अशी तंबी दिली. ते सर्वजण भ्याले.
 
अश्वत्थपुरास (पिंपळास) वैशाख शुध्द तृतीयेस पोचण्याचे संकल्प करुन श्रीगुरु मुळगुंद व शिरहट्टी येथील वैदिकांस,गुत्ती रामय्या वगैरे अश्वत्थपुरचे लोकांस बरोबर घेऊन अधिक वैशाख वद्य त्रयोदशीचे दिवशी वेंकटापुराहून निघाले. शिरहट्टीस मुक्काम करुन दुसरे दिवशी लक्ष्मेश्वरावरुन निघाले. गुडगेरीस पोंचले व रेल्वे गाडीत चढले. दावणगिरीचे अलीकडे कनकराव अण्णेगिरी या भक्तांच्या आग्रहावरुन त्यांच्या घरी गेलें. व दुसऱ्या गाडीने निघून बिदरभद्रावतीला आले.तेथील स्टेशन मास्तर अत्यंत भाविक असल्याने त्याचे घरी श्रीगुरुंनी पूजा आरती,नैवेद्य संपवून भोजन केले.


 बिदरभद्रावतीहून निघुन श्रीगुरुं कारकळ पर्यंत बैलगाडीने गेले.दुसरे दिवशी सकाळी ते तीर्थहळ्ळी जवळील मंडगद्देला आले.पूजा नैवेद्य आटोपून भोजनोत्तर थोडी विश्रांती घेऊन तेथील नदी ओलांडून पलिकडच्या तीराला गेले.वेलीतून व काटेरी झुडपांमधून ३-४ फर्लांग अंतरापर्यत वाट काढीत गेले.तेथील सपाट प्रदेशांत एका वृक्षाखाली एक मोठी फरशी होती.त्यांस श्रीगुरुंनी नमस्कार केला व सर्वांकडून करविला,हा मांडव्यऋषींचा आश्रम. अति पवित्र स्थान आहे.अशी त्यांनी माहिती दिली. त्या फरशीची पूजा करून,नारळ फोडून, नैवेद्य दाखवून,घटकाभर "जयराम सिताराम " असे भजन करुन ते परत मुक्कामास आले.

रात्री मुळबागला जाऊन ते द्वारकापीठाच्या श्रीशंकरमठात उतरले.दुसऱ्या दिवशी रात्री वैशाख शुध्द द्वितीयेचे रात्री नालूरला आले.तेथून सोमेश्वरला येऊन पोंचले.रात्री फार पाऊस पडला. श्रीगुरु रामय्याला "विपरीत पाऊस पडत आहे.पंचमी साधते की नाही.दशमी केली तरी चालेल." म्हणाले व पाऊस थांबताच गाडीत चढले. तृतीयेस कारकळला आले. मिजारचे पाटलांनी तेथे गाडी पाठविली होती.  त्यांतुन दुपारी नाकूटला आले. तेथे शानबाग यांच्याकडे मध्यान्हस्नान,पूजा,नैवेद्य, आरती व भोजन झाले. सायंकाळी निधून संपिगे गांवाला त्यांनी मुक्काम केला.

 पिंपळहुन रामण्णामास्तर,शानभाग वगैरे शेकडो लोक वाजंत्र्यांच्या ताफ्यासह श्रीगुरुंना सामोरे जाण्यास निघाले होते.चार मैल गेल्यावर संपिगेहून येणाऱ्या एका व्यक्तीकडून "श्रीगुरुं निघाले आहेत.अद्याप तीन चार फर्लांग मागे आहेत." अशी बातमी त्यांना कळली. हर्षोत्फुल्ल अंतःकरणाने तेथेच सर्वानी श्रीगुरुंचा व श्रीरामाचा जयघोष केला. थोड्याच वेळांत श्रीगुरुंची मूर्ति दिसू लागतांच सर्वांनी त्यांस साष्टांग वंदन केले. व रघुपति राघव भजन करीत वाद्यघोषांत त्यांस पिंपळास आणले. श्रीगुरुंची राहण्याची व्यवस्था महादेवभट्टाचे दुकानांत करण्यांत आली होती.

 दुसरे दिवशी म्हणजे वैशाख शुध्द चतुर्थीस प्रतिष्ठाकार्याच्या होमहवनास प्रारंभ झाला.सकाळी सर्वांनी श्रीगुरुंच्या दर्शनाचा लाभ घेतला.शृंगेरी संस्थानाहून वे.सिताराम शास्त्री यांस बोलावून घेण्यांत आले. वे.सितारामशास्त्र्यांनी येऊन श्रीगुरुंचे दर्शन घेतले. नमस्कार करीत असता श्रीगुरुंनी त्यांना "जगद्गुरु क्षेम आहेत ना ?" असे विचारले. मी चौकशी केली म्हणून त्यांस  सांगा. प्रतिष्ठापनेचे सर्व कार्य जगद्गुरु संस्थानाच्या गौरवासाठी वे.सितारामशास्त्र्यांस पुढारीपण देऊन करा ," असे बरोबरीच्या वैदिक ब्राह्मणास श्रीगुरुंनी बजावले व सर्वांनी आज्ञेप्रमाणे विधिपूर्वक सर्व कार्यक्रम पार पाडला.

 मुंबईहून आणविलेल्या मूर्ति बाहेर काढण्यांत आल्या धान्याधिवास, जलाधिवास, शय्याधिवास तसेच होमहवनादि सर्व कार्यक्रम विधिपूर्वक पण थाटाने उरकल्या नंतर राक्षसनाम संवत्सर निज वैशाख शुध्द पंचमी या दिवशी दुपारी बरोबर १२ वाजता,अभिजित् मुहूर्तावर अतिशय थाटाने श्रीगुरुंच्या अमृतहस्तांनी मूर्तिंचे चिरप्रतिष्ठापनेचें कार्य पार पडले. पिंपळच्या आसपास त्यावेळी सगळीकडे आनंदच आनंद भरला होता व सर्व आबालवृध्द,परमानंदभरित होऊन सारखा जयघोष करीत होते. दुपारचे कडक ऊन असून देखील हजारो लोक समारंभास उपस्थित झाले होते. ऊन्हाच्या तिरपेने सर्वांचाच घसा तहानेने कोरडा पडला होता. त्यांची असमर्थता पाहून श्रीगुरुंनी सर्वांस गूळ व पाणी देण्याची आज्ञा केली.लगेच आज्ञेची अमंलबजावणी झाली.त्याप्रसंगी तीन ढेपा गुळ लागला म्हणतात...

श्रीगुरुंनी अश्वत्थपूर व तेथील लोकांसंबधी ५० वर्षापूर्वी काढलेले उद्गार तंतोतःत फलद्रुप झाले असल्याचे पटत आहे.तेथीलसमाज उन्नतीच्या शिखरावरपोंचला आहे.देवालयाचा विस्तार झाला असुन ते बंदिस्त आहे.श्रीशृंगेरीजगद् गुरु,अनेक यति-मुनी, केडगांवचे श्रीनारायण महाराजां सारखे अनेकभगवद् भक्त थोर पंडितांनी अश्वत्थपुरास भेटी दिल्या आहेत.


जय श्रीराम




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...