जय श्रीराम! .
आपण पाहत आहोत,
या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे.
१३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२
हनुमान गढ, नर्मदा घाट, मंडलेश्वर, जि. खरगोन - ४५१२२१, मध्य प्रदेश
श्री मोडक यांची एक इच्छा होती की नर्मदाकीनारी राम मंदिर बांधून पुढील आयुष्य कारणी लावावे. यासाठी ते वारंवार श्रींना विनवित असत. पण काळाप्रमाणे तेव्हा योग नव्हता. पुढे वाणीरूप अवतारात ही ते श्रींची वरचेवर भेट घेत. परंतु श्रींनी त्यांना परिस्थितीची जाणीव करून देऊन मंदिर बांधण्यापासून परावृत्त होण्यास सुचविले. परंतु श्री मोडक यांनी पूर्वीप्रमाणे आग्रह धरल्याने मग होकार दिला पण हे सुचविले की " मंदिर लहान असावे व उपासना त्याहीपेक्षा मोठी असावी. याप्रमाणे आशीर्वाद घेऊन अन् श्रींच्या हस्ते रुपया व नारळ घेऊन श्री मोडक मंदिर उभारणीच्या कार्यास लागले.
इंदूरहून ते सहपरिवार म्हणजे मातोश्री रमाबाई आणि पत्नी जानकीबाई यासह खेडीघाटला आले. त्यावेळी इंग्रजी राज्य होते. हा भाग होळकर स्टेट यांच्याकडे होता. खेडीघाटला एका ठिकाणी लहान जागा घेऊन तेथे राहू लागले. तेथे बरोबर असलेली श्रींची तस्वीर ( जी एका लाकडी पेटीत बसवली होती) ठेवून नित्यनैमित्तिक उपासना, जप, आरती, भजन करण्यास सुरुवात केली. निर्वाह ते गावातून भिक्षा मागून करत असत. त्यावेळी श्री मोडक यांचे वय ३८/३९ होते.
याच दरम्यान त्यांची भेट एका पारशी गृहस्थ श्री फिरोज भरुचा यांच्याशी झाली. तो एक नाविन्यपूर्ण किस्सा आहे.
खेडीघाटला योग्य ती जागा पसंत न पडल्याने श्री मोडक बडवाह वरून मंडलेश्वरी आले. हल्ली जिथे राममंदिर आहे ती जागा त्यांना योग्य वाटली. तेथे एक झोपडी व कुंपण घातले. जवळ वड, पिंपळ असे वृक्ष, पुढे मारुतीचे छोटे पत्रे घातलेले एक देऊळ होते. इतर सर्व जागा सरकारी होती. त्या जागेचा वापर गावकरी उकिरडा म्हणून करत. त्या झोपडीच्या जागेचे मालक श्री गोखले होते. ते संन्यास घेऊन उज्जैनीस राहिले होते. मोडक यांनी तिथे जाऊन ती जागा मंदिर बांधण्यासाठी हवी म्हणून मागणी केली. शुभकार्य म्हणून श्री गोखले यांनी ती जागा स्वखुषीने विनामूल्य दिली. शेजारची सरकारी जागा ही होळकर स्टेट सरकारने ९९ वर्षासाठी अल्प १ रु सालिना लिजवर दिली. पुढे भरूचा यांनी निर्माण कार्य सेवाभाव ठेऊन १९२५ साली सुरू केले आणि १९३२ साली पूर्ण केले.
१९३२ साली श्री राम नवमीच्या दिवशी श्रीराम स्थापना वाणीरूप महाराज श्री तात्यासाहेब केतकर यांच्या हस्ते झाली. अमाप गर्दी झाली होती. १० दिवस भजन पूजन, अन्नसत्र, वैदिकवृंदांच्या निर्देशानुसार झाले होते.
श्री भीमराव मोडक यांच्या नंतर त्यांच्या पत्नी श्रीमती जानकीबाई यांनी मंदिरसेवा नेटाने पार पाडली. त्यानंतर त्यांची मुले मोडक बंधू या नावाखाली व्यवस्था बघतात.
भीमराव मोडक यांनी 'आनंदीआनंद रामदासी ' हे नाव घेतले होते.
***
श्री फिरोज भरुचा यांचे चिरंजीव डॉ. एच. पी. भरूचा यांनी त्या संबंधित आपल्या वडिलांची हकीकत या लेखात दिली आहे.
माझे वडील आणि आई हे दोघेही श्री गोंदवलेकर महाराजांचे निस्सीम भक्त होते हे मी लहानपणापासून पाहत होतो. वडील रोज पहाटे चार वाजता उठायचे स्नान उरकून सोवळेवजा धोतर नेसून महाराजांच्या तसबिरीपुढे माळेवर नियमाने जप करत. हा जप पूजा वगैरे साडे आठ पर्यन्त चाले. नंतर ते उद्योगासाठी बाहेर पडत. आजारी असले तरी त्यात कधी खंड पडला नाही. रात्री आम्हाला घेऊन तसबिरीपुढे रामाचे भजन चाले.
वास्तविक आमचे घराणे पारशी असे असूनही माझे वडील व आई महाराजांचे भक्त कसे झाले हे मी त्यांच्या तोंडून खूप वेळ ऐकले आहे, ती हकीकत अशी.....
वडील इंदूरजवळ महू येथे राहत. ते कंत्राटदार म्हणून व्यवसाय करत. एकदा खांडवा जवळ रस्ताचे काम करत असताना त्यांचा एक तंत्रिकाशी परिचय झाला, त्याचे नाव आता मला स्मरत नाही. ते त्याला वारंवार भेटत.असे एक दिवशी भेटयास गेले असता त्याने सांगितले
"आज संध्याकाळी तू महूला परत न जाता आजची रात्र इथेच रहा, कारण आज रात्री मी हा देह सोडणार आहे." त्यावर वडील म्हणाले,
"आपण ब्राम्हण मी पडलो पारशी, तर आपल्याला देहत्यागाच्या वेळी मी जवळ असलेला चालेल का?" तंत्रिकाने उत्तर दिले,
"त्याला काही हरकत नाही, आता तू जमिनीवर मांडी घालून बस आणि माझे डोके मांडीवर घे" वडिलांनी तसे केले व त्यास मधून मधून घोट घोट पाणी देत राहिले. तिकडे त्याच्या आश्रमाबाहेर
काही ब्राम्हण मृत्युंजयाचा जप करीत बसले होते. मध्यरात्री नंतर वडिलांनी म्हणले,"मी आतापर्यंत आपल्यापाशी काही मागितले नाही" त्यावर तांत्रिक म्हणाला,"ते असू दे! मी एवढेच सांगतो,की आजपासून चाळीस दिवसात तुला एक फार मोठा लाभ होणार आहे ! या नंतर माझा देह गतप्राण झाल्यावर तू तो नर्मदामैय्या ला अर्पण कर." असे त्यानी सांगितले, काही वेळाने त्याचे प्राण गेल्यावर त्याच्या सांगण्यानुसार देह नर्मदेत सोडण्यात आला व वडील घरी आले.
नित्यक्रम म्हणून वडील पारशी रिवाजाप्रमाणे रोज सकाळी प्रार्थना व उपासना करीत, ती चालू होती. तंत्रिकाने सांगितल्या नुसार आपल्याला काय महान लाभ होणार आहे याची काही अटकळ बांधता येईना. अखेर चाळिसाव्या दिवशी ते नित्योपासना करत असताना,
"तू ओंकारेशवर स्टेशनला जा" असे शब्द कानी पडले, हा प्रकार त्यांनी माझ्या आईला सांगितला. काय करावे अश्या बुचकळ्यात पडलेले ते पाहून आई म्हणाली,
"कुणास ठाऊक कदाचित तिथे द्रव्य किंवा सुवर्ण मिळण्याचा योग् असेल! तेव्हा जावे बरे."
अखेर ते ओंकारेशवर स्टेशनात गेले, पुढे कुठे जावयाचे काय करायचे असा विचार करीत आहेत, तेवढयात एक माणूस त्यांच्याकडे येऊन त्यांच्या नावाची चौकशी करून त्यांना "मज बरोबर चलावे" असे म्हणाला आणि त्यांना घेऊन एका घरात शिरला. शेजारचया खोलीमध्ये एक गृहस्थ एका तसबिरी समोर बसून जप वगैरे करत होते. थोडया वेळाने ते गृहस्थ बाहेर आले, ( त्यांचे नाव भीमराव मोडक, व ती तसबीर श्री. गोंदवलेकर महाराजांची होती ) त्यांनी महाराजांबद्दल माहिती सांगितली, तेव्हा तंत्रिकाने सांगितल्या प्रमाणे त्यांना चाळिसाव्या दिवशी गुरुप्राप्तीचा लाभ झाला, आणि तेव्हापासून अखेर पर्यन्त त्यांनी श्री महाराजांचीच उपासना केली.
महूस आम्ही रहात होतो त्या घरात भुताटकी होती असे आई सांगे. आम्ही तेथे राहण्यास जाण्याच्या पूर्वी केव्हातरी तेथे खून झाला होता आणि तेव्हा पासून त्रास असे. आई सांगे, रात्री आमचे बेड गदागदा हलत, झोपताना खाली ठेवलेल्या सपाता नाहीश्या होत किंवा दुसऱ्या खोलीत सापडत. भीमराव यांनी माझ्या वडिलांना सुचवले, की महाराजांवर अढळ श्रद्धा ठेवावी आणि ब्राम्हणा करवी विशिष्ट होमहवन करून घ्यावे. तसे केल्यावर तो त्रास कायमचा बंद झाला.
पुढे वडिलांना प्रेरणा झाली, की एक राम मंदिर उभारावे. ते नर्मदातीरी मंडलेशवर येथे बांधण्याचे ठरवले. जवळ पैसे नाही पण मंदिर बांधण्याच्या प्रेरणेचा जोर एवढा होता की कामाला प्रारंभ तर केला. आई सांगे की अनेकदा असे होई की, सिमेंट वगैरे काही मोठे देणे असले आणि जवळ पैसे नसले तर पोस्टमनने पत्र म्हणून दिलेल्या एखाद्या साध्या पाकिटात हजार रुपये निघावेत. पाकिटात एक चिठ्ठी असे व त्यावर रामजी कडून एवढेच लिहलेले असायचे. साध्या पाकिटातून असले तरी हे पैसे पोस्टमन किंवा अन्य कुणाच्या लक्षात कसे येत नसत हे एक आश्चर्य होते. हा प्रकार अनेकवेळा घडला एवढे खरे. वडिलांचे खाते स्टेट बँक (त्या वेळची इम्पीरियल) बँकेच्या इंदूर शाखेत होते. एकदा मंदिराच्या खर्चसाठी पैसे उभे करणे जरूर झाले तेव्हा बँकेकडून कर्ज मिळाले तर पाहावे, म्हणून ते मॅनेजरला भेटायला गेले. यांच्या खात्यावर किती शिल्लक आहे ते बघून सांगा असे मॅनेजरने म्हणल्यावर कारकूनाने खाते वही दाखवली व म्हणले,
"कालच रामजी नावाच्या इसमाने एक हजार रुपये या खात्यात भरले आहेत"
कर्जाची गरज आता टळली, पुढे मंदिर पुरे झाले त्यावेळी काही रकमेची गरज उदभवली आमच्या आईने कशासाठी तरी कपाट उघडले तो त्यातून टपकन एक पाकीट पडले, त्यात पाहता जेवढी रक्कम हवी होती, तेवढीच नेमकी निघाली,आणि आत एक चिठ्ठी निघाली, की हे पैसे शेटजींना ( माझ्या वडिलांना सगळे शेटजी म्हणून ओळखत ) द्यावी. अश्या रीतीने मंदिराचे काम पूर्ण झाले. प्राणप्रतिष्ठा समारंभ ठरला. मंदिरालगत एका खोलीत धान्य तूप वगैरे साठी एक कोठी बांधली. सात दिवस मुक्तरित्या अन्नदान करायचे ठरले. वडील स्वतः कोठीचे कुलूप काढून शिधा काढून देत, पण नवलाची गोष्ट अशी की दुसऱ्या दिवशी सकाळी दार उघडून पाहावे तर कोठी पूर्ववत भरलेली. असे हे तीन दिवस पाहिल्यावर वडिलांनी आईला हे आश्चर्यकारक प्रकार सांगितला व कोणास बोलू नको हे पण बजावले. पण तिला न राहवून तिने महाराजांचा चमत्कार कुणाला तरी सांगितला आणि चवथ्या दिवस पासून चमत्कार बंद झाला व कोठी थोडी थोडी रिकामी होऊ लागली,अखेरच्या दिवशी भांडार पूर्ण रिकामे झाले.
वडिलांना गालावर एक गळू झाले होते, त्याच्या दुखणे खुपणे असा काही त्रास नव्हता पण ते काढायचा प्रयत्न करू नये अशी अंतप्रेरणा महाराजांनी दिली होती. तरी ती वडिलांनी पाळली नाही व ऑपरेशन केले. पण त्यानंतर परत ते सर्व उदभवले तो कर्क रोग होता. महाराजांची आज्ञा पाळली नाही, म्हणून वडिलांना फार पश्चाताप झाला, व आजार वाढून त्यांचे डिसेंम्बर १९५३ रोजी निधन झाले. गुरुआज्ञा भंग केली नसती तर ही वेळ आली नसती हे ते वारंवार बोलून दाखवत.
****
जय श्रीराम!
संकलित













कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा