सोमवार, २९ जुलै, २०२४

 जय श्रीराम!

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

"हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर! आपण मारलेली हाक महाराजांपर्यंत पोहचली होती.
आता तिला एकेक आठवू लागले.
***
 ती एक ५५ वर्षीय स्त्री. तिला एक लग्नाला आलेली एक मुलगी आणि कॉलेजात जाणारा एक मुलगा. छान चौकोनी कुटुंब होते. करोना काळात नवरा गेला आणि हे तिघेच राहू लागले. तेव्हा तिची आईही तिला सोबत म्हणून येऊन राहू लागली होती. तसा तिचा गोंदवल्याचा अनुग्रह ४५ व्या वर्षी झाला होता. नवऱ्यानेही नंतर घेतला. राहता राहिले मुलगा मुलगी.. ते ही जरा मोठे झाल्यावर त्यांनाही महाराजांनी आपले म्हटले होते. घरात रोज संध्याकाळी दिवाबत्ती झाली की रामरक्षा, रामपाठ, रामहृदय, विष्णुसहस्त्रनाम, म्हणून नंतर कान्होबाला, रामरायाला , महाराजांना दूध देऊन आरती केली जायची. मुलांनाही ही सवय लागली होती. रोज एक तास सगळे आपापल्या वेळेनुसार जपाला बसायचे आणि रात्री एकत्रित नामसंकीर्तन करायचे. हा रोजचाच परिपाठ होता. पण नवरा गेल्यावर तिचे नाम जरा जास्तच उत्कटतेने होऊ लागले होते.

गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत झाल्याने तिला कालच ज्युपिटर हॉस्पिटलला ICU मध्ये  ऍडमिट करण्यात आले होते. नाका-तोंडात नळ्या घालण्यात आल्या होत्या. डॉक्टर मिनिटामिनिटाला पल्स चेक करत होते. एकीकडे मॉनिटर, इकेजी मशीन ची टिक टिक ऐकू येत होती. एकूणच भयावह वातावरण झाले होते.

"आई आई ग! डोक्यातली कळ सहन होत नाहीये". ती दोन्ही हातांनी डोके दाबून धरत कण्हत होती. सलाईनमधून पेन किलर देऊनही कळा थांबत नव्हत्या. आई तिला शांत करत होती. "बाळ, नाम घ्यायला सांगितले आहे ना महाराजांनी. मनातल्या मनात नाम चालू ठेव बरं ! काही होणार नाही तुला. महाराज आहेत पाठीशी, हे बघ तुला महाराजांचा अंगारा लावते. आणि तोंड उघड बघू जरा.. हे समाधीचे तीर्थ आणले आहे , ते देते. !

डायबेटीस असल्याने मेंदूतला रक्तस्त्राव थांबत नव्हता.अन त्यामुळे मेंदूला सूज आलेली होती.  दोन डॉक्टर, १ नर्स ची टीम तिच्याभोवती थांबली होती. त्यांनी तिच्या आईला बाहेर थांबायला सांगितले होते. तिची मुलगी, मुलगा ही बाहेर उभे होते.
"काय बरे आई म्हणत होती? "श्रीराम जयराम जय जय राम" , महाराज " .... आणि डोक्यात एकच जीवघेणी कळ उठली. भोवळ डोळ्यापुढे अंधार दाटला. मशीनवरची टिकटिक एकसलग येऊ लागली. आणि झालं.. डॉक्टरांची पळापळ सुरु झाली. "Sister, ward boy .. keep OT ready! Check BP First ! आपल्या रक्तपेढीतून बी पॉजिटीव्ह रक्ताच्या ६ बॉटल्स लगेच मागवून घ्या. स्ट्रेचर आणा ताबडतोब!  "त्यांनी लगोलग ऑपरेशनचा निर्णय घेतला. चार तास ऑपरेशन चालले.

ऑपरेशन थिएटर बाहेर तिची आई, मुलगा मुलगी तिघेही महाराजांचा धावा करत जप करत बसले होते. थोड्याच वेळात मुख्य डॉक्टर बाहेर आले.  ' हे बघा..आम्ही आमच्या लेव्हलला प्रयत्न केलेत पण  प्रमाणाबाहेर रक्तस्राव होऊन ब्लड क्लॉटिंग झाल्याने आणि ब्लड शुगर लेव्हल लो झाल्याने  she is now in deep unconsciousness state . थोडक्यात तिचा मेंदू झोपी गेला आहे. हा पिरियड म्हटले तर दोन दिवसाचा ही असू शकतो आणि म्हटले तर ३ महिनेही ... अन म्हटले तर अनेक वर्ष ही जाऊ शकतात.
दोघा मुलांवर जसे आभाळ कोसळले.. तिची आई मटकन खाली बसली. मुलगी आज्जीच्या कुशीत येऊन हुंदके देत रडू लागली. मुलगा सुन्न होऊन शून्यात नजर लावून बसला.   
*
डोळ्यापुढे अंधारी आल्याबरोबर तिला वेदनांची जाणीव नष्ट झाली. या स्थितीत खूप वेळ गेल्यावर तिला आपला देह पिसासारखा हलका झाल्याची जाणीव होऊ लागली. संवेदना नव्हत्याच.. हा पिसासारखा देह आता तरंगत अंतराळात विहरु लागला होता. इथून जाता जाता तिला तिची हतबल होऊन बसलेली आई दिसली, रडणारी गोजिरवाणी लेकरे दिसू लागली ... काडी काडी जमवून केलेला संसार, कित्येक वर्ष घराचे कर्ज घेऊन नुकतेच आता कर्ज फिटून पूर्णपणे तिच्या नावावर झालेला तिचा आटोपशीर फ्लॅट, हे सगळं सगळं दिसू लागले. इथून निघताना हे सगळे इथेच सोडून जायचे असते. बरोबर काहीही न्यायची मुभा नाही. हो ! नाही म्हणायला एक गाठोडे तिच्या पाठीला बांधून दिल्यासारखे वाटले. चाचपून पाहिले तर त्यात आजवर केलेले नाम आढळले. "  .... इथून फक्त नामच न्यायची परवानगी आहे तर,"ती मनाशी उद्गरली.
दोन आडदांड काळेकभिन्न दूत आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण अंधाऱ्या, खोल, अश्या अंत नसलेल्या भुयारातून जात आहोत.. या स्थितीत किती काळ गेला कुणास ठाऊक. अचानक गुहेच्या तोंडाशी डोळे दिपतील असा लख्ख प्रकाश दिसू लागलाय. खूप वेळ अंधारातून चालल्याने अचानक आलेला हा प्रकाश डोळ्यांना असह्य होतोय.. त्याची सवय व्हायला वेळ लागेल असे उगाचच तिला वाटून गेले. त्यामुळे बाजूचे दोन्ही अस्तित्वाच्या चेहर्यावर प्रखर प्रकाश आल्याने तेही दिसत नाहीयेत.
अचानक एक झटका लागावे तसे एका सिंहासनाच्या समोर आपल्याला उभे केलय. सिंहासनावर बसलेली व्यक्ती या दोघांपेक्षा क्रूर दिसत आहे. बाजूला मोठेच्या मोठे अवाढव्य बाड घेऊन बसलेली व्यक्ती, त्या बाडमध्ये डोके खुपसून बसली आहे. तेवढ्यात ती सिंहासनाधिष्टीत व्यक्ती अगम्य भाषेत बाडधारी व्यक्तीला काहीतरी विचारते. बाड धारी व्यक्ती सगळा हिशेब मांडते. आपल्याला कळेल अश्या भाषेत सगळा पाप- पुण्याचा हिशेब सांगितला जातोय. "महाराज, सुमारे १३५० वेळा दुसऱ्याचे मन दुखावणे, १७७५ वेळा परनिंदा,  २१० वेळा खोटेनाटे बोलून, लाच देऊन, दुसऱ्याचा गैरफायदा घेऊन  काही मिळवणे, ५७ वेळा प्राण्यांना इजा करणे, ८५ वेळा फुकटचे घेणे अश्या गोष्टी सदरहू महिलेच्या नावावर आहे.
आता तिच्या डोळ्यासमोर संपूर्ण आयुष्याचा भूतकाळ झळकू लागला. गतायुष्यातली कर्मे लख्खपणे समोर आली.
पुन्हा तो बाडधारी त्या क्रूर दिसणार्या व्यक्तीच्या कानाला लागला. आता पुण्यकर्म किती केली आहेत त्याची यादी. १५ वेळा भुकलेल्याला अन्नदान केले, २२ वेळा वृद्धास सहकार्य केले, दरवर्षी मन्दिरात दानधर्म, आणि नामजप केलेला आहे. वयाच्या ४५व्या वर्षी सद्गुरूंचा अनुग्रह ... रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार .  १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला.  नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे.
तेवढ्यात एक दूत सिंहासनाधिष्टित व्यक्तीशी बोलताना ऐकू येते," महाराज, वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे. सिंहासनाधिष्ठित व्यक्ती ताडकन उठून तिथेच नमस्कार करते. आणि विचारते, काय निरोप आहे?
आणि ते दोघे त्यांच्या कानाला लागतात. पुन्हा अगम्य भाषेत खूप वेळ बातचीत झाल्यावर, सगळ्या गोष्टीचा उहापोह झाल्यावर मग ते निर्णयावर येतात आणि तिला जवळ बोलावून म्हणतात, " हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर! आपण मारलेली हाक महाराजांपर्यंत पोहचली होती.

"जी महाराज ' एवढेच अस्पष्टसे तिच्या तोंडून उद्गार निघाले.
तरीही आम्ही तुला तुझ्या नामस्मरणाच्या पुण्यबळावर एक संधी देत आहोत. पृथ्वीवर जाण्यापूर्वी तुझी काही इच्छा आहे काय? त्यानुसार जन्म मिळेल. नसेल तर तुझ्या उर्वरित कर्तव्यपूर्तीची संधी म्हणून आहे त्याच देहात परत जावे लागेल. एका लोकांतून दुसऱ्या लोकात जाताना आत्म्याकडे इच्छा विचारतात आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.
" मला माझ्या सद्गुरूंना परमपूज्य ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांना भेटण्याची इच्छा आहे. " ती एवढेच बोलू शकली.
यावर पुन्हा त्यांची अगम्य भाषेत चर्चा झाली. तिला सिंहासनासमोर आणण्यात आले. 'हे बघ, तुझे सद्गुरू येथून अंतराळात खूप दूरवर आहेत. त्यांना भेटण्याइतकी पुण्याई तुझी नाही.  फक्त एक करू शकतो... त्यांनी पोह्चवलेले १३ जीव .. जे ज्येष्ठ शिष्योत्तम होते अश्या साधकांशी आम्ही तुझी भेट घडवू शकतो. फक्त ६० विपळे.
"विपळे म्हणजे?' तिने उत्सुकतेने विचारले.
"इथे काळाची परिमाणे वेगळी आहेत. तरीही सांगतो. भारतीय कालमापनानुसार एक पळ म्हणजे ६० विपळे. थोडक्यात एक पळ म्हणजे तुमचे २४ सेकंद. फक्त २४ सेकंद तुला त्यांना भेटायची परवानगी आहे, मंजूर आहे?." समोरून उत्तर आले. तिने होकारार्थी मान हलवली.
"ए, कोण आहे रे तिकडे? या बाईंना इथून ३३ अब्ज प्रकाशवर्ष दूर असलेल्या 'अँड्रोमीडा सुदर्शन 'आकाशगंगेवरील 'सिग्नेट बी ' ताऱ्यावर घेऊन जा.
आपले डोळे बांधण्यात आल्याची जाणीव तिला आज पहिल्यांदाच झाली. बरोबर पुन्हा तेच दोन काळेकभिन्न व्यक्तित्व. अंधारात किती काळ अवकाशात तरंगत होते कुणास ठाऊक. काही वेळातच ते एका मोठ्या दालनात उभे होते. दोन्हीही दूत दालनाच्या दारात हात मागे घेऊन जरा अदबीने झुकून उभ्या राहिले . तिच्या डोळ्यावरचा कपडा दूर झाला. सुरवातीला धुक्यासारखे काहीतरी दिसले.. ते धुके दूर झाल्यावर तिला एकेक सूक्ष्मदेह दिसू लागले.
सगळ्यांच्या हातात जपमाळ होत्या. सगळे गोलाकार बसलेले होते. आता पूर्वी कधीतरी फोटोत पाहिलेले एकेक चेहरे दिसू लागले.
अरे बापरे, हे तर पूज्य भाऊसाहेब, त्यांच्या बाजूला पूज्य तात्यासाहेब, ... पु. रामानंद महाराज, पलीकडे पूज्य आनंद सागर महाराज, आणि चक्क पु प्रल्हाद महाराज, पु. जिजामाय, आणि इतरही श्रीमहाराजांनी अनुग्रहाचा अधिकार दिलेले असे १३ सूक्ष्मदेह तिथे होते. विशेष म्हणजे सर्व जण ध्यानमग्न होते.
तिने भीत भीतच सर्वांना " जय श्रीराम " म्हणून साष्टांग नमस्कार घातला.
"बाळ... " धुक्यातुनच एक हाक कानावर आली. पु. तात्यासाहेब बोलत होते. ती नखशिखांत हादरली.
"बाळ, आज तुझे जन्मजन्मांतरीचे नामाची पुण्याई फळाला आली म्हणून इथे येण्याची संधी तुला मिळाली. पृथ्वीवरील गुरुपौर्णिमेचा आज दिवस आणि आज श्रीमहाराज इथे आता भेट देणार आहेत. तुला जी २४ सेकंद भेटण्याची संधी मिळाली ती त्यांच्यामुळेच."
"महाराज, महाराज...तिने आर्ततेने हाक मारली.
भानावर आल्यावर "इथे पू. बुवा दिसत नाहीत"!! तिने चाचरत विचारले.
"बाळ, महाराजांच्या जवळच्या ताऱ्यावर त्यांचे वास्तव्य आहे.
श्रीमहाराजांचे वास्तव्य इथून सुदूर लोकात आहे. इथून ४२८ लक्ष महापद्म अंतरावर असलेल्या "केनिस बटू- जी या चक्राकार आकाशगंगेतील केप्लर या सूर्यमालेतील 'एपसिलोन  विराट' या जीवसृष्टी असलेल्या ताऱ्यावर त्यांचे सध्या वास्तव्य आहे. आणि तिथे त्यांचा नामाचा प्रसार सुरु आहे. पृथ्वीवर जसे त्यांचे १११ वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतरचे तुमचे पृथ्वीवरचे आताचे २०२४ साल म्हणजे १११ वर्ष वास्तव्य विराट ताऱ्यावर झाले. लवकरच त्यांची तेथील अवतारासमाप्तीची तिथी आलेली आहे. त्यानंतरचे त्यांचे वास्तव्य कुठे असणार हे ते स्वतः ठरवणार आहेत. तत्पूर्वी इथे आज ते भेट देणार आहेत. तुला त्यांचे दर्शन होईलच.
 
आणि एकाएकी एक अत्यंत प्रखर, डोळे दिपून जातील असा  आगीचा लोळ तिथे येऊन कोसळतो. त्यातून सहस्ररश्मीला लाजवेल असे तेज:पुंज , तेजस्वी,सुवर्णकांती, प्रसन्न चेहऱ्याचे असे श्रीमहाराज  दिसू लागतात. कपाळावर त्रिपुंड, पीतवर्ण, उंचेपुरे, गळ्यात रुद्राक्ष माळ, पुष्पमाला, अंगात पांढरी शुभ्र कफनी , डोक्यावर गणेश टोपी असे  श्रीमहाराज दमदार पावले टाकीत पुढे होतात. . सर्वजण साश्रू नयनांनी साष्टांग दंडवत घालतात.

श्रीमहाराज प्रत्येकाची जातीने चौकशी करतात, ख्याली खुशाली विचारतात. अन सर्वात शेवटी तिच्याकडे वळून म्हणतात, "माय, श्रीरामरायाने तुझ्यावर कृपा करून तुझे आयुष्य आणखी १५ वर्षांनी वाढवले आहे बरं. तू आता जोमाने नामाला लाग. तुमच्या मनात काय चालले आहे ते तुम्हाला कळत नाही, तितके मला कळते. त्यामुळे दुश्चित्त होऊ नका. तुम्ही दुश्चित्त झालात की मी इकडे अस्वस्थ होतो. भगवंताच्या इच्छेने आपला प्रपंच चालला आहे असे समजा. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा, कशाचीही काळजी करू नका,मी तुमचा भार घेतला आहे, असे समजा. मनापासून मला हाक मारा, तळमळीने नाम घ्या की मी तुमच्या जवळच आहे याचा प्रत्यय तुम्हाला येईल. तुम्ही नाम घ्या की मी तुमच्या जवळच घुटमळत असतो. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला मीच प्रेरणा देत असतो, तुमच्या कानाने मीच ऐकतो असे समजा, बरे का बाळ! "
" जी " डोळ्यांतुन ओघळणारे अश्रू ती आता थोपवत ही नाहीये.
"महाराज....  एक विनंती! ती कसेबसे उच्चारते.
महाराज, आपल्या मुखातून 'श्रीराम जयराम, जय जय राम' हे ऐकण्याची इच्छा आहे.  एक माळ जप आपल्यासोबत.... !  
" हो हो "सगळे जण एकमुखाने मान्यता देतात.  "आम्ही तुमच्या मागून म्हणतो".
धीरगंभीर आवाजात श्रीमहाराज सुरु करतात, "श्रीराम जय राम, जय जय राम " ... श्रीराम जयराम जय जय राम.... श्रीराSSSSSम जयराSSSSSम  जय जय राSSSम!
सगळे जण श्रींचे हे रूप डोळ्यात साठवून ठेवत त्यांच्यामागोमाग म्हणत आहेत. आणि श्रीमहाराज स्वतःच्या हृदयावर हात ठेवून उपस्थित प्रत्येकाकडे दोन क्षण प्रेमाने कृपादृष्टी टाकत म्हणत आहेत,  "श्रीराSSSSSम जयराSSSSSम  जय जय राSSSम!" जणू काही म्हणत आहेत, माझ्या हृदयातले प्रेम मी तुम्हाला देतो आहे.
***
तब्बल तीन महिने १३ दिवस महिने उलटून गेलेत तिच्या कोमात जाण्याला. हॉस्पिटलमध्ये रोज येऊन तिच्याजवळ बसून त्रिकाळ जप करण्याचा परिपाठ आजही तिच्या आईने, मुलाने, मुलीने सुरु ठेवला आहे. सकाळ संध्याकाळ रात्र असे तिघांनी वाटून घेतलेत. आजही तिची आई तिच्या शेजारी बसून तिचा हात हातात घेऊन नाडीवर बोट ठेवून जप करतेय. आणि एकाएकी तिची बोटे हलू लागल्याचे तिच्या आईच्या ध्यानात येते.
"सिस्टर.....? डॉक्टर...? इकडे या! हे बघा... " अश्या हाका मारत लगबगीने आई बाहेर धाव घेते. . पुन्हा आत लेकीजवळ येते. तिची बोटे आता हातात माळ फिरवावी तशी हलू लागली आहेत. आणि तिच्या मुखातून अस्पष्टसे उद्गार बाहेर येऊ लागलेत. आई, तिच्या तोंडाजवळ आपला कान नेते तर "श्रीराम..." असा खोल खोल गेलेल्या आवाजात अस्पष्टसा उच्चार ऐकू येतो. जाणिवेच्या प्रांतात ती परत येत होती..! आई तर आनंदाने वेडीच होते.  डॉक्टर येऊन तपासतात, आणि तिथेच किंचाळतात, " Oho, Oho ...  Its a miracle ... तिच्या आईला खांद्याला धरून गदागदा हलवत म्हणत आहेत, "आई, तुमचा पेशंट आज कोमातून बाहेर येतोय! त्यांच्या मुलीला, मुलाला कळवा.. ! डॉक्टर स्वतः  आनंदाच्या  घाईघाईने हॉस्पिटलमध्ये सर्वांना कळवायला निघतात.
ती परत आली ... पण आता भरपूर नाम घ्यायचे आणि हे उर्वरित आयुष्य नामाला वाहून घ्यायचे हा निश्चय करूनच. श्रींनी दिलेले १५ वर्षाचे बोनस आयुष्य ती आता प्रपंचाच्या इतर भानगडी मध्ये वाया घालवणार नव्हती, कारण त्यातले  काहीही बरोबर येणार नव्हते, फक्त नामच बरोबर येते याची तिला खात्री पटली होती. !

एव्हाना ज्युपिटर हॉस्पिटलच्या आयसीयु मधील चार नंबर बेडवरचा कोमातला पेशंट साडेतीन महिन्यांनी शुद्धीवर येतोय ही बातमी अख्ख्या हॉस्पिटलभर वाऱ्यासारखी पसरली होती.

**

जय श्रीराम!
~महाराज कन्या नयना

मंगळवार, १६ जुलै, २०२४

जय श्रीराम!

मानस-  वारी महाराजांसोबत (भाग २)

आषाढी एकादशीच्या भल्या पहाटेच  २ वाजता श्रीमहाराज चंद्रभागेवर स्नान करून आईसाहेबांसहित विठ्ठल मंदिरात दाखल झालेले आहेत. श्रीमहाराज महाद्वारावर संत नामदेवांच्या पायरीवर डोके टेकतात.

 नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे । वरी संत हिरे पाय देती ।।

नंतर महाराज बाजूलाच असलेल्या चोखोबांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाराज मंदिरात प्रवेशतात. बरोबर श्रींचे कौन्सिल ही आहे. विठू माऊलीचे मंदिर आज आषाढी निमित्त तुलसीदलांनी विशेष सजवण्यात आले आहे. बडव्यांनी सगळ्या पूजेची आधीच मांडामांड करून ठेवली आहे. जरीचा फेटा आणि गर्द भगव्या रंगाची कफनी वर जरीचे उपरणे परिधान केलेले श्रीमहाराज आता सपत्नीक विठुरायाच्या महापूजेला उभे राहिले आहेत. जणू काही विठूमाऊली प्रत्यक्ष समोर उभी आहे या भावनेने महाराज विठूरायाची पूजा करतात. महाराजांना विठुरायाकडे पाहून प्रेमाचे भरते आले आहे. विठुरायाही डोळ्यातून अखंड प्रेमाची बरसात करत आहेत. सुरवातीला सप्तनद्यांच्या जलाने  वेदांच्या मंत्रोच्चारात अभिषेक झाला.मग अत्यंत भक्तियुक्त अंत:करणाने वेदांच्या मंत्रोच्चारात नाना सुगंधी तेलाने विठ्ठलाचे मर्दन करण्यात येते. संपूर्ण गाभारा त्यामुळे सुगंधित झालेला आहे. यानंतर अत्यंत औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या सुगंधी उटण्याचे लेपन विठ्ठलाला करण्यात आले. या सुगंधी तेल आणि उटण्यामुळे पहाटेच्या या मंगलमय व वातावरणाला सुगंधाचा स्पर्श झाला आहे. त्यानंतर श्रीमहाराजांनी विठू माउलीला सप्तनद्यांच्या ऊन ऊन पाण्याने स्नान घातले आहे. यानंतर चांदीच्या दिव्य शंखातून देवाला दुग्धस्नान घालण्यात आले. दुधामुळे आता विठूरायाची मूर्ती निळीसावळी दिसू लागली आहे. यानंतर देवाला गंध पुष्प अर्पण करून देवाला दधि स्नान घालण्यात आले. 

पहाटेच्या प्रहरी 

हरी करतो न्याहारी 

खातो हा लोण्याचा गोळा 

हरी तुझा रंग दिसे सावळा

असे म्हणत विठुरायाला मुखाशी लोण्याचा गोळा लावण्यात येतो. आणि लोण्याची आरती करण्यात आली . त्यानंतर पंचामृतातील उर्वरित पदार्थ साजूक तुपाने स्नान, मधुपर्क म्हणजे मधाने स्नान घालण्यात आले. नंतर उसापासून तयार झालेली दिव्य शर्करा परमात्म्याच्या देहाला चोळण्यात येत आहे. हेच शर्करा स्नान. नंतर वैदिक मंत्राने पुरुष सूक्त, श्रीसूक्ताने या परब्रम्हाला अमृताभिषेक महाराजांनी केला आहे.

मूळचे हे सावळे रूप मनोहर आता वेगळीच झळाळी प्राप्त होऊन तेजाने तळपू लागले आहे. अनेक संतांना भुरळ घालणारे हे रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे आहे. श्रीमहाराज अत्यंत भक्तिभावाने विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवतात. पूजा सुरु होते. महाराज देवाला नवीन वस्त्र अर्पण करतात.  नंतर रुक्मिणी मातेची महापूजा होते. उभयता रुक्मिणी मातेला साडी चोळी, खणानारळाने ओटी भरतात. 

आता विठुरायाला पोषाख चढवण्यात येतो आहे. देवाला मरून रंगाची मखमली अंगी आणि पोपटी मखमली धोतर अशा पोशाखात नटलेल्या देवाच्या मस्तकी सोन्याचा हिरेजडित मुकुट, शिरपेच ,मोत्याचा तुरा, कानात मत्स्यजोड घालण्यात आले आहेत. आणि गळ्यात काय काय घातले आहे बरं, विठूमाऊलीने? कंठी कौस्तुभ मणी, मग मोत्याची कंठी,सोन्याची तुळशीची माळ,मोठी बोरमाळ,

कंबरेला मारवाडी सोन्याचा करदोडा, पायात रत्नजडीत तोडे जोड आणि सोन्याचे पैंजण... आणि सर्वात महत्वाचे कपाळी चंदनाचे केशरमिश्रीत गंध लावण्यात आलेले आहे.  अशा अनमोल अलंकारांनी विठुरायाचे साजरे रूप अतिशय खुलून दिसत आहे.सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी चां प्रत्यय सर्वांनाच येत आहे. 

रुक्मिणी मातेला भरजरी अंजिरी रंगाची नऊवारी साडी , त्यावर रूळ, पैंजण, चिंचपेटी, मोहरांची माळ, कंबरपट्टा, मोत्यांचे मंगळसूत्र, मोत्यांचा कंठ, सरी, बाजीराव गरसोळीचा त्याशिवाय, ठुशी, तन्मणी, तारामंडळ, मण्या मोत्यांच्या पाटल्या, सोन्या मोत्याची तारवड, मोत्यांची नथ, बाळ्या , सोन्याचे बाजूबंद असे 22 प्रकारचे हिरेजडित दागिने परिधान करण्यात आलेले आहेत. या सर्वांवर कळस म्हणजे कपाळी ठसठशीत लालजर्द कुंकू लावून माता अत्यंत देखणी दिसत आहे. 

आता पहाटेचे साडेचार झाले आहेत. आणि ब्रम्हानंद बुवा काकड आरतीचे ताट तयार करून घेऊन येतात. श्रीमहाराज अत्यंत भक्तिभावाने विठ्ठलाची आरती करतात. आईसाहेब त्यांच्या हाताला हात लावतात.आईसाहेब आपल्या मन:चक्षूनी विठुरायाचे गोजिरे रूप न्याहाळत आहेत. आरती होते आणि लोणी खडीसाखर प्रसाद दिला जातो. अश्या रीतीने हा नेत्रदीपक सोहळा पार पडतो. . 

पंढरपूर नगरी आज आषाढी एकादशी निमित्ताने विशेष सजली आहे. जागोजागी पताका, स्वागत कक्ष आहेत. 

आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥ जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपुर ॥ याचा प्रत्यय हे सर्व पाहून येतोय. संतांच्या पालख्या इंद्रायणी काठी विसावल्या आहेत. टाळ, मृदूंग, भजन कीर्तनाने अवघी विठूनगरी दुमदुमली आहे. विठूच्या दर्शनासाठी लांबच लांब  रांगा लागलेल्या आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यात विठुरायाच्या दर्शनाची आस स्पष्ट दिसत आहे. मंदिर संस्थानातर्फे रांगेतील भाविकांना साबुदाणा खिचडी आणि राजगिरा लाडूच्या प्रसादाचे वाटप होत आहे. 

आता महाराज आपल्या मंडळींसहित नगर प्रदक्षिणेस निघाले आहेत. जागोजागी लोक त्यांना ओळखून त्यांच्या पायावर डोके ठेवत आहेत. महाराज प्रत्येकाची जातीने चौकशी करत आहेत. नगरप्रदक्षिणा मार्गावर महाद्वार चौकामध्ये महाद्वारासमोर अभंग आणि आरती होते. नंतर महाराजांची दिंडी चंद्रभागेच्या वाळवंटात येते. तिथे चंद्रभागेचे आरती करण्यात आली. त्यानंतर चंद्रभागेजवळ असणारे पुंडलिक मंदिरात श्रीमहाराज पुंडलिकाची आरती करतात.  मग प्रदक्षिणा मार्गावर संत नामदेव महाराज मंदिर लागते. तिथे उभे राहून महाराज आणि बरोबरची मंडळी नामदेवांचा अभंग गातात. यानंतर येते ते ज्ञानेश्वर माउली मंदिर. इथे ज्ञानोबांचा अभंग गातात. या नंतर तुकोबांचे मंदिर लागते. त्यांच्या पालखीसमोर महाराज तुकोबांचा अभंग गातात. अशा रीतीने श्रीमहाराज आणि मंडळी नगरप्रदक्षिणा आटोपून श्रींच्या आज्ञेवरून अप्पासाहेब भडगावकरांनी बांधलेल्या राममंदिरात येतात. एव्हाना दुपारचे अडीच वाजले आहेत. 

तिथे  सर्वांसाठी एकादशीच्या फराळाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रम्हानंद बुवांनी आपल्याबरोबर पोतेभर रताळे आणलेच होते. ती चुलीमध्ये भाजली जातात. पत्रावळ्या मांडल्या जातात. आणि फराळ होऊन मंडळी जप करत बसतात. काही थकली भागली वयस्क मंडळी इथे विसावा घेतात. 

थोडा विसावा घेऊन महाराज संध्याकाळी पुन्हा विठ्ठल मंदिराकडे निघतात. दर्शनाची अजूनही रांग आहेच. विठ्ठल मंदिरामध्ये संध्याकाळची आरती होते. दूध फलाहार असे घेऊन श्रीमहाराज कीर्तनाला उभे राहतात.आज श्रींच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज चढले आहे. आवाजात मार्दव आहे. लोक जीवाचे कान करून महाराजांना ऐकत आहेत. विठूमाऊलीच्या चेहर्यावरही  विशेष प्रसन्नता दिसते आहे. उत्तरोत्तर कीर्तन रंगत जाते. जय जय राम कृष्ण हरीचा गजर टिपेला पोहोचतो आहे. 

ब्रम्हानंदबुवा सारखं विठोबाच्या उजव्या कोपऱ्यात बघत साश्रू नयनांनी हात जोडत आहेत. भूमीला वारंवार वंदन करत आहेत. हे भाऊसाहेबांच्या लक्षात येते. ते म्हणतात, "बुवा? काय झाले?"अहो , काय सांगू भाऊसाहेब! बघा.. आज कीर्तनाला किती रंग चढला आहे. प्रत्यक्ष हे सावळे परब्रम्ह विटेवरून खाली उतरून महाराजांना आलिंगन देत आहे. त्यांच्यासोबत वारकरी फुगडी खेळत आहे. आणि महाराज? डोळे मिटलेल्या अवस्थेत त्यांच्या तोंडून फक्त माउली माउली... असा घोष सुरु आहे. महाराजांच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या आहेत. आनंदाचा पूर त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो आहे. अहो, श्रींच्या कीर्तनाला आज प्रत्यक्ष ब्रह्मदेव आले आहेत. ते पहा त्या कोपऱ्यात! ब्रह्मदेव आनंदाने डोलत आहेत. 

एवढेच नाही,, तर प्रत्यक्ष तुकोबा, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, चोखोबा, जनाबाई, बहिणाबाई,... समस्त संतांची मांदियाळी इथे हजर दिसते आहे. 

अहो अहो... एवढेच काय! ते बघा... दिंडी दरवाजात प्रत्यक्ष महादेवाची स्वारी आलेली दिसत आहेत. 

आणि त्यांच्या स्वागताला हे सावळे परब्रम्ह धावत निघाले आहे, आणि महाराज त्यांना.. "अरे मुकुंदा, अरे घननीळा.. अरे ईठूराया .. कुठे निघालास. कुंची सुटली ना! सांभाळून.. उपरणे पायात येईल.. " असे म्हणत आहेत. एक सृष्टीचा पालनकर्ता, एक संहारक अशी ही भूवैकुंठावरील जगावेगळी हरी-हर भेट आज समस्त जन अनुभवत आहेत. 

इकडे  महादेवाला ही आनंदाचे भरते आले आहे. ते म्हणतात, "अहो विठुराया.. हा तुमचा सोहळा पाहून आम्हाला राहवले गेले नाही हो तिकडे कैलासावर. अद्वैती तो नसे समाधान.. अशी आमची अवस्था झाली. म्हणून धावत इकडे आलो". 

 विठुराया म्हणत आहेत,''अहो महादेवा.. कळवायचे तरी. आम्ही जातीने आपल्याला रथ पाठवला असता. द्वापारयुगात आम्ही लहान असताना तुम्ही आम्हाला भेटण्यास अधीर झाला होतात म्हणून साधूच्या वेशात गोकुळात भेटायला आला होतात. आणि आम्ही तुमच्या मिशा ओढल्या होत्या. आठवते आम्हाला. दोघेही खळाळून हसतात. कडकडून मिठी मारतात. हा हृद्य सोहळा आज उपस्थित जन अनुभवत आहेत. इकडे " जय जय राम कृष्ण हरी" चां गजर टिपेला पोहचतो आहे. लोक बेभान होऊन नाचत आहेत. प्रत्येकाच्या बरोबर  श्रीहरी फुगडी खेळत आहे. बाहेर वैष्णवांचा मेळा भरला आहे. "अवघी दुमदुमली पंढरी..."  आकाशातून समस्त देवी देवता पुष्पवर्षाव करत आहेत. आपणही या आनंदाच्या सागरात डुंबत राहूया आणि इथेच थांबूया!

समाप्त!

जय श्रीराम! 


इति मानस- वारी संपुर्णम!

~श्रीमहाराज कन्या नयना

 मानस - वारी श्रीमहाराजांसोबत ( भाग -१) 

जय श्रीराम! 🙏🏼

आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की श्रीमहाराजांचे आजोबा लिंगोपंत दर एकादशीला पंढरपूरची वारी करायचे. महाराजांचे वडील रावजीबाबासुद्धा वारीला जात असत. तोच परिपाठ महाराजांनी सुरू ठेवला होता. 

आज आपण महाराजांच्या सोबत मानस- वारी करणार आहोत. 

महाराजांच्या आयुष्यातले अखेरचे वर्ष. पंढरपूरच्या बडव्यांचे वाद महाराजांनी सोडवले होते. तेव्हापासून त्यांच्यापैकी एक जण कधीपासून महाराजांना पंढरपुरास चलण्यास आग्रह करत होते. त्याप्रमाणे महाराज जून १९१३ मधे निघाले. 

हाच धागा पकडून आता पुढे...

****

मानस - वारी ( भाग १)

स्थळ- गोंदवले थोरले राम मंदिर आवार 

दिनांक - आषाढ शु.षष्ठी , १९१३

तसे पाहता आम्ही श्रीमहाराजांचे जिथे वास्तव्य होते त्या वाड्याच्या आजूबाजूच्या वाड्यातील मुली.. ७-८ वर्षाच्या. 

महाराजांची कन्या शांता आमच्याच बरोबरीची होती. आम्ही रोज तिच्याबरोबर खेळायला महाराजांच्या वाड्याच्या मागच्या भागात जमत असू. रोज आमचा काचा काचा, टिपरी/ठीकरी, सागर गोट्या , लपंडाव असे खेळ रंगे. शांता पुढे ४ वर्षाची होऊन अल्पशा आजाराने गेली. तरीही काही दिवसांनंतर आमचे खेळ सुरू झाले. आमचा सतत तिथे किलबिलाट असायचा.महाराज ही आमच्यात येऊन कधी कधी सागरगोट्या खेळायचे. कधी कधी मुलांमधे जाऊन विटीदांडू, सुर पारंब्या खेळायचे. विटीदांडू तर इतका सुरेख खेळायचे. 

तर एकदा ज्येष्ठ शु.शष्ठीचा दिवस असेल. पंढरपूरचे बडव्यापैकी एक जण थोरले राम मंदिरात महाराजांना भेटायला आले होते.. बरीच मोठी चर्चा चालली. ते महाराजांना आग्रह करत होते," .. ते काही नाही यावर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा तुमच्या हस्तेच करायची. महाराजांनी परोपरीने सांगून पाहिले की, "अहो, उलट आमच्या इथेच विठ्ठल रखुमाई प्रकट झाल्याने आमच्या आजोबांच्या काळापासून आम्ही इथेच करतो हा उत्सव. शिवाय पंढरपूर मार्गावर गोंदवले असल्याने ठिकठिकाणच्या दिंड्या इथे येतात. वारकऱ्यांना भोजन द्यायचे असते. अन् मी असेही दर एकादशीला वारी करतोच विठोबाची. हे महापुजेच लचांड कशाला!  पण बडवे ऐकेनात. तसे त्यांनी सर्वांच्या सहीचे पत्र देखील बरोबर आणले होते. अखेर महाराजांनी रुकार दिला अन् स्वत:शीच पुटपुटले,"चला रामाची इच्छा हीच दिसते आहे. विठ्ठला ही शेवटची सेवा बरे का!!" आणि निकट बसलेल्या सर्वांनाच गलबलून आले. महाराज अलीकडे असे सूचक बोलायला लागले होते. 

महाराजांनी नंतर सर्वांना आपल्या पंक्तीला भोजनास बसवले. प्रसाद , पान सूपारी  झाल्यावर ते निघाले म्हणून त्यांना निरोप देऊन महाराज राम मंदिराच्या दारात येऊन उभे राहिले आणि अचानक काही आठवल्यासारख त्यांना झालं, म्हणून महाराजांनी ब्रम्हानंद बुवांना हाक मारली. ' बुवा?" आणि प्रवेशद्वार शाकाऱण्यासाठी त्यावर चढलेल्या बुवांनी कानावर हाक पडतक्षणीच ... क्षणाचाही विलंब न लावता महाराजांच्या पुढ्यात उडी घेतली.' जी महाराज" ! 

"अरे अरे, बुवा.. सांभाळून हो! इतकी घाई नव्हती". अस म्हणत महाराजांनी त्यांना जवळ घेतलं. 

मग त्यांना हाताला धरून बसवत महाराज त्यांना म्हणाले,"बुवा, आजच्या बरोबर महिन्याला आषाढ शु.षष्ठी ला आपण पंढरपुरास प्रस्थान करणार आहोत बरं. विठुरायाचे बोलवणे आले आहे! कोण कोण आपल्याबरोबर येणार आहेत, बरोबर सामान काय घ्यायचं, गाड्या किती लागतील याच्या याद्या करायला लागा! "

 बुवा त्यांच्यासमोर खाली मान घालून उभे होते. त्यांनी मानेनेच होकार दिला. अन् म्हणाले, "जी महाराज, लगेच करायला घेतो!" "एकदा बुवांवर काम टाकले ना की काम पूर्ण होणार याची शाश्वती!" अस मनाशी पुटपुटत महाराज, "श्रीराम श्रीराम" म्हणत स्वस्थपणे कोचावर बसले. मी दारातून डोकावत होते. तर मला म्हणतात कसे," ए चिमणे, विठ्ठलाच्या वारीला यायचं ना पुढच्या महिन्यात. बाबांना सांग तुझ्या!" महाराजांनी सर्वांना येण्याच्या निमंत्रणाची पत्रे धाडली.

म्हणता म्हणता आषाढ शु.षष्ठी चा दिवस उजाडला. आणि जरा कुठे पावसाला उघडीप मिळाली आहे. थोरले राम मंदिराच्या आवारात अगदी गडबड उडून गेली आहे. आदल्या रात्रीपासून विसाव्याला आलेल्या बैलगाड्या, दमण्या जुंपणे आता सुरु झाले आहे. काही गाडीवान बैलांना जवळच्या ओढ्यावरून पाणी पाजून आणत आहेत. 

ब्रम्हानंदबुवांची तर अगदी पहाटेपासून लगबग सुरु आहे. आणि का नाही होणार? आज महाराज स्वतः जातीने पंढरपूर वारीसाठी निघणार आहेत. बरोबर नाही म्हणता म्हणता २-३०० लोक येतील असा कयास आहे. मग त्यांच्यासाठी  ५-६ दिवसासाठी कोरडा शिधा, अन्न, डाळी साळी , ज्वारी/ बाजरीचे पीठ, चुलीसाठी सुकी लाकडे, काटक्या , पत्रावळ्या दोन महिन्यापासून बुवांनी पावसाळा सुरु होणार म्हणून आधीच विश्वनाथकडून लाकडे फोडून सुरक्षित जागी ठेवून दिली आहेत.  

घरातल्या बायका गेल्या काही दिवसापासून पहाटेपासून उठून जात्यावर धान्य दळत आहेत. पिशव्या गाठोडी भरली जातात. रस्त्यात पाणी आणण्यासाठी म्हणून हंडा कळशा, तांबे पेले घेतले आहेत.अश्या रीतीने, गाड्या, छकडे, दमण्या जंपल्या गेल्या. मुहूर्ताचा नारळ फोडला. महाराजांनी रामाची काकडआरती केली..आणि रामरायाचे दर्शन तीर्थप्राशन करून "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात महाराज निघाले. दिंड्या पताकांनी गोंदवले नगरी सजली होती.जिकडे पाहावे तिकडे भगव्या रंगाची उधळण. बायाबापड्या डोक्यावर पितळी तुळशी वृंदावन घेऊन निघाल्या. महाराजांबरोबर चालत उत्साही मंडळी निघाली. बाजूनेच शिधा, भांडीकुंडी घेतलेल्या बैलगाड्या,चालत असायच्या. आम्ही मुली.. थोडेफार चाललो की थकून बैलगाडीत बसायचो. कधी कधी तिथेच डुलकी लागायची.

 वारीचा पहिला टप्पा मोठा होता..१६ मैलावर असलेले म्हसवड गाव! महाराजांसोबत महाराजांची अन्नपूर्णा - श्री ब्रम्हानंद बुवा श्री भाऊसाहेब केतकर, तात्यासाहेब केतकर, पंडित महाभागवत कुर्तकोटी, रामानंद महाराज,प्रल्हाद महाराज,बापूसाहेब साठ्ये, अप्पासाहेब भडगावकर, गणपतराव दामले, बळवंतराव घाणेकर, चपळगावकर, अण्णासाहेब मनोहर, बाबासाहेब दांडेकर, वामनराव आपटे, दामोदरबुवा कुरवलीकर, वैद्य कासेगावकर, भीमराव मोडक ,... ई मंडळी झाडून हजर आहेत तर तर स्त्रीयांपैकी मुक्ताबाई, गंगू ताई आठवले, काशीबाई, पटाईत मावशी, गोदूताई, अख्खी महिला पलटण भोजनाच्या सेवेसाठी तत्पर आहे. 

स्वतः श्रीमहाराज आज पांढरे शुभ्र धोतर, वरती बाराबंदी आणि डोक्यावर फेटा, गौरवर्ण प्रसन्न चेहरा, गळ्यात तुळशी माळा, कपाळावर उभे गंध, डोळ्यांच्या बाजूला चंदनाच्या मुद्रिका , लावलेले महाराज अगदी साजिरे दिसत आहेत. वातावरणात उल्हास भरून राहिला आहे. गोंदवले इथून निघतांना, बेसन भाताचा प्रसाद सर्व भगवदभक्तांना दिला जातो.सुमारे अर्धा किमीवरच स्थानिक गावकरी वारकऱ्यांना शुद्ध जलाचे आणि जिलेबीचे वाटप करत आहेत.

जागोजागी महाराजांचे भव्य स्वागत होते आहे. महाराजांवर फुलांची उधळण होत आहे. सुवासिनी महाराजांना भक्तिभावाने कुंकुम तिलक लावून औक्षण करत आहेत. कोणी पायावर पाणी टाकून पदप्रक्षालन करत आहेत. महाराजांतर्फे ही गावकऱ्यांना चुरमुरे, खडीसाखरचां प्रसाद दिला जातोय. दिंडीत सतत "ज्ञानोबा तुकाराम "चां गजर सुरू आहे.रस्त्याने चालत असताना आजूबाजूच्या गावातील बऱ्याचशा दिंड्या सोबत येऊ लागल्या आहेत आणि हळू हळू रस्त्यावर वैष्णवांच्या ध्वजा, तुळशीमाळा घातलेले वारकरी दिसू लागले आहेत.

साधारण तीन किमी अंतरावर गोंदवले खुर्द येथे ग्रामस्थ सर्वांना गोड दुधाचा प्रसाद देत आहेत.आता रस्त्यावर पुरुष आणि स्त्री वारकऱ्यांनी फुगड्या खेळण्यास सुरुवात केली आहे. वारकरी फुगडीची एक वेगळीच नजाकत असते. एकीकडे विठुरायाचे नामघोष सुरू आहे. 

मजल दरमजल करीत वारी 'वाण्याची झाडी ' येथे येते.आरती करून वारकऱ्यांना आमटी भाताचा भोजनप्रसाद होतो.  मजल दरमजल करीत दिंडी म्हसवड मुक्कामी येऊन पोहचते. महाराज जरा विश्रांती घ्यावी म्हणून एका दगडावर बसलेत. ब्रम्हानंद बुवांनी एक बैलगाडी आधीच पुढे नेऊन, चुली मांडून स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. बाकी मंडळी, नित्यपाठची स्तोत्रे, विष्णूसहस्त्रनाम, राम रक्षा, राम हृदय, भीमरूपी म्हणत आहेत. पुन्हा एकदा रामाची आरती होते आणि सगळे भोजन प्रसाद घेतात. रात्री महाराजांचे बहारदार कीर्तन होते. साधारण दहाच्या सुमारास, थकलीभागली मंडळी आडवी झाली. काही लोक त्यांच्या पायाला, पोटऱ्यांना, गुडघ्याला औषधी तेल लावून देत आहेत. महाराज प्रत्येकाची विचारपूस करत फिरत आहेत. कोणाचे काही दुखलेखुपले तर औषध सुचवत आहेत.

रात्रीची विश्रांती घेऊन ताजीतवानी झालेली मंडळी सकाळी प्रार्तविधी आटोपून लगेच पिलीव गावासाठी मार्गस्थ होतात.दुसऱ्या दिवशी पहाटेच रामाची  काकड आरती करून , गुळाचा चहा घेऊन मंडळी म्हसवड सोडतात. रस्त्यात ग्रामस्थ उपम्याची न्याहरी सर्व वारकऱ्यांना देतात. आज जरा हवेत गारवा आहे. महाराजांना दम्याचा अंमळ त्रास होत आहे. ब्रम्हानंद बुवा त्यांची सर्वतोपरी काळजी घेत आहेत. त्यांना सुंठेची कढी, दालचिनी गूळ घालून केलेला चहा देत आहेत. 

आम्ही मुलीही थोडेफार चालून बैलगाडीत येऊन बसतो. तेवढ्याशा श्रमानेही आम्हाला झोप लागते.तेवढ्यात महाराजांना ही चालण्याचा त्रास होतोय म्हणून ते गाडीत येऊन जरा लवंडतात. पण लगेच १०-१५ मिनिटात इथून बसतात. त्यांना उसंत कसली!आणि जाग आल्यावर आम्हाला जाणवते की कोणीतरी आमचे डोके त्यांच्या उबदार मांडीत घेतले आहे आणि हळूवारपणें आमच्या डोक्यावरून हात फिरवत आहेत. डोळे उघडुन पाहतो तर महाराजच ते! नकळत आमचे डोळे भरून येतात. बापापेक्षाही जीव लावणारे ते महाराजच.

आम्हाला जाग आलेली पाहून, महाराज आमचे डोके हळुवारपणे खाली ठेवतात. आणि लगेच वारीमध्ये सामील होतात. मंडळींच्या उत्साहाला उधाण आले आहे. पदे म्हणत म्हणत, गात मंडळी निघाली आहेत. दुसरा टप्पा पिलिव गावाचा. साधारण दुपारी बारा वाजता दिंडी सुळे वस्ती येथे येते.  इथे पाण्याची व्यवस्था पाहून ब्रम्हानंद बुवा आणि महिला पलटण स्वयंपाकाला लागतात. दुपारच्या भोजन प्रसादाला ज्वारी/ बाजरीची भाकरी, आमटी असा बेत आहे. पत्रावळ्या मांडल्या जातात, आणि "जय जय श्रीराम, जय जय श्रीराम" च्या जयघोषात प्रसाद वाढायला सुरुवात होते. वारकरी मंडळी तृप्त तृप्त होत आहेत. थोडी विश्रांती घेऊन दिंडी माऊली माऊलीच्या जयघोषात पीलिव गाव मुक्कामासाठी मार्गस्थ होते. महाराजांचे इथेही जंगी स्वागत होते. सुवासिनींनी रस्त्यावर रांगोळ्या काढल्या आहेत, महाराजांना ओवाळत आहेत. गावाबाहेरच्या शिवारात मुक्काम होतो. आरती करून प्रसाद होतो. ग्रामस्थ पिठले भाकरीचा प्रसाद आणून देतात. पाण्याचा टँकर एक बरोबर असतोच. 

रात्री विश्रांती घेऊन दुसरे दिवशी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेऊन सुमारे ८ वाजेच्या सुमारास भाळवणीसाठी महाराज प्रस्थान करतात. जसजसे पंढरपूर जवळ येतेय तसतसे मंडळींच्या उत्साहाला उधाण येते आहे.इथे राहणारे एक महाराजांचे शिष्य आदराने महाराजांना घरी बोलवतात अन् त्यांचा सत्कार करतात. महाराज ही त्यांची भक्ती बघून प्रसन्नचित्त होतात. आता साळमुख ते तांदुळवाडी रोडवर रिंगण सोहळा होणार आहे. यासाठी महाराजांच्या बत्ताशाला सजवून आणले गेलेय. 

महाराजांची दिंडी मधे ठेवून आधी ध्वजधारी आणि पताका धारी वारकरी ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात भोवती गोल प्रदक्षिणा करतात. त्यानंतर डोक्यावर तुळशी घेतलेल्या स्त्रिया, विणाधारी बुवा माऊली माऊली म्हणत प्रदक्षिणा घालतात. सर्वात शेवटी बत्ताशाने रिंगण पूर्ण केले. हे रिंगण पाहण्यासाठी गर्दीचा महापूर लोटलेला असतो. फार हृद्य .. डोळ्यात साठवून ठेवावा असा सोहळा असतो तो.नंतर महाराजांचे प्रवचन होऊन साडे बारा वाजता भोजन प्रसाद होऊन वारकरी भाळवणीच्या उरलेल्या टप्प्यासाठी मार्गस्थ झाले. भालवणीतच असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि नंतर शाकंभरी देवीचे दर्शन घेऊन मजल दरमजल करत दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी येते.

आज आषाढ दशमी . सकाळी भाळवणी ते इसबावी हा शेवटचा अन् तुलनेने मोठा टप्पा सुरू होणार आहे.  मंडळी आता विठुरायाच्या दर्शनाला अधीर झाली आहेत. इसबावी पंढरपुरपासून अलीकडे ५ किमी वर. इथेच अप्पासाहेब भडगावकरांनी महाराजांच्या सांगण्यावरून त्यांच्या वाड्यात राम मंदिर बांधले आहे. महाराजांचा दर वेळी मुक्काम तिथेच असायचा. 

दशमीला सकाळी लवकर उठून मंडळी इस्बावी साठी मार्गस्थ होतात. विठुरायाच्या दर्शनाला आतुरलेले डोळे, झपझप पडणारी पाऊले, मुखात माऊलीचा जयघोष, कंठ दाटून आलेला.. अशी सगळ्यांचीच अवस्था आहे.भाळवणी ते वाखरीला जाताना रस्त्यात नावडे वस्ती, उपरी येथे आवर्जून दुपारच्या भजन आणि भोजन प्रसादासाठी दिंडी थांबते. तेथील रहिवासी श्री महाराजांच्या न्याहारीसाठी खास मक्याच्या भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि दही असा बेत करतात. नंतर दुपारची  आरती आणि प्रसाद करून दिंडी पुढे वाखरीसाठी प्रस्थान करते.

वाखरी येथे तुकोबा आणि ज्ञानोबाची पालखी एकत्र येतात. तिथेही माऊलींच्या अश्र्वाचे रिंगण होते. महाराज आता इस्बावि मुक्कामी पोहचले आहेत. अप्पासाहेब भडगावकर दोन मुक्काम आधीच लवकर निघून पुढची इसबावी येथील महाराजांच्या मुक्कामाची व्यवस्था लावावी म्हणून गेलेले होते. आज स्वतः अप्पासाहेब रस्त्यावर महाराजांच्या स्वागतासाठी येऊन थांबलेले आहेत. आणि दुरून भगवे झेंडे, महाराजांची दिंडी येताना दिसताक्षणी सर्वांच्या आनंदाला उधाण आलेले आहे. महाराजांवर पुष्पवर्षाव होतो. 

महाराज आणि मंडळी व आप्पासाहेबांची गळाभेट होते. सुवासिनी महाराजांना ओवाळतात. आप्पासाहेब महाराजांना आदराने मंदिरात घेऊन जातात. थोडीफार उद्याच्या आषाढी एकादशीच्या मुख्य दिवसाची चर्चा होते. राम मंदिरात महाराज रामाची आरती करतात अन् रामाला नैवेद्य दाखवून सर्वांचा भोजन प्रसाद होतो.

उद्या पहाटे लवकर म्हणजे २ वाजता उठून चंद्रभागेत स्नान करून मंदिरात पोहचायचे आहे ही मनाशी खूणगाठ बांधून मंडळी झोपी जातात. 


जय श्रीराम!  

क्रमशः 

मानस-वारी उर्वरीत पुढच्या भागात! 

~ श्रीमहाराज कन्या नयना

मंगळवार, २ जुलै, २०२४

मानस - प्रभातफेरी श्रीमहाराजांची

 जय श्रीराम!

मानस - प्रभातफेरी श्रीमहाराजांची
स्थळ: गोंदवले
वेळ- रात्रीच्या तिसऱ्या प्रहाराची सुरुवात!

आदल्या रात्री गोंदवले इथे मुक्कामी आपण गेलो आहोत.. शेजारती होऊन सगळे आपापल्या रूमवर परतले असावे. आता एकेक जण निद्राधीन होण्याच्या मार्गावर आहेत.
रात्रीचे साडे बारा वाजून गेले आहेत. आपली अजून चुळबुळ सुरु आहे. काही केल्या झोप येत नाहीये. 

मनातल्या मनात जप सुरु आहे. रात्रीचा तिसरा प्रहर सुरु झाला आहे. आपण हळूच उठून खिडकीत येऊन उभे राहतो. संपूर्ण गोंदवले गाव, झाडे झुडपे, पशु पक्षी गाढ निद्रेत आहेत . नाही म्हणायला दूरवर कुठेतरी एखादी भुंकणारे कुत्रे आणि एखाद दुसरा टिवटिवत जाणारा एखादा चुकार पक्षी.. याशिवाय कुणाचाही आवाज नाही. एकदम निरव शांतता. आकाशात चंद्र आणि चांदण्या तेवढ्या जाग्या आहेत... आणि जागे आहे ते समाधी मंदिरातील परब्रम्ह. श्रीमहाराज ही योगनिद्रेत आहेत.

आपण हळूच दरवाजा उघडून बाल्कनीत येऊन उभे राहतो. चिंतामणी बिल्डिंग, चौथा मजला.. आल्याबरोबर पहाटेच्या प्रसन्न गारव्यामुळे अंगावर शिरशिरी येतेय. वर बघावं तर निरभ्र आकाश, चमचमणाऱ्या चांदण्या.. नुकताच रात्री पाऊस पडून गेल्याने स्वच्छ स्वच्छ झालेला परिसर.. सुस्नात झाडे, वेली. समोरचे झाड चांदणे पांघरून बसले आहे. समाधी मंदिराच्या शिखरावर चमचमणारी चांदणी. चंद्र ऐन भरात आलाय आता.. आणि अगदी समाधी मंदिराच्या शिखरावर. चंद्राभोवती खळे पडले आहे.

 एवढे सुंदर, प्रसन्न दृश्य पाहून आपल्याला राहवत नाही.

आपण अलगद रूमचा दरवाजा ओढून घेतो. अंगावर बारीक स्टोल घेऊन पायाचा आवाज न करता तसेच अनवाणी जिना उतरून खाली जातो. मंदिरासमोरच्या कट्टयावर बसतो. सगळे जग साखरझोपेत आहे. रस्त्यावर चिटपाखरू नाही.  नाही म्हणायला एखादी मांजर तेवढ्यात दबकत जाताना दिसते. महाराजांच्या मंदिराचे दरवाजे बंद आहेत. पण आत समाधीपाशी एक मिणमिणता दिवा आहे. 

आता तुळशी वृंदावन, आईसाहेब मंदिरापर्यंत एक फेरी मारून यावी म्हणून आपण  उठतो. आणि एवढ्यात आपल्याला एक ओझरती आकृती गोशाळेकडे निघालेली दिसते  ... पाठमोरी ! अंगात कफनी , डोक्याला फेटा.. ! चक्क इतक्या भल्या पहाटे फिरणारे हे गृहस्थ कोण हे पाहण्यासाठी आपण झपझप जातो. आता जवळ गेल्यावर दिसते.. हातात चक्क माळ ही आहे.  बाजूने त्यांच्यासोबत चालणारे कुत्रेही दिसते. अरेच्चा... आता तर इथे आवारात सगळं निर्मनुष्य होते. लगेच कुत्रे कुठून आले? असा विचार आपण मनाशी करतोय तोच घोड्याच्या खिंकाळण्याचा ही आवाज येतोय. अरेच्चा.. एवढ्या रात्री घोडा कुठून आला? थोडं कानोसा घेऊन मागे वळून पाहिले तर बत्ताशा स्मारकाकडून आवाज येतोय. समोरील  व्यक्ती, त्याकडे पाहून  म्हणतेय, " हो रे, येतो रे बाबा.. तुला रपेट मारून आणल्याशिवाय तू शांत होणार नाहीस, माहित आहे मला!
मी चमकले, हा आवाज कुणाचा?
"बाबा, आपण कोण? एवढ्या पहाटे कुठे निघाले? तुम्हालाही झोप येत नाहीये वाटते.. " आपले वाक्य पूर्ण होण्याच्या आत ते गृहस्थ झर्रकन मागे वळून बघतात. आणि काय सांगू!
प्रत्यक्ष महाराज उभे समोर. आपण तोंडाचा वासलेला आ लवकर बंद होत नाहीये. भानावर येऊन आपण चटकन लोटांगण घालतो.
"महाsssराज, तुम्ही? "
"जानकी जीवन स्मरण जय जय राम!, आशीर्वाद!  होय बाळ
न राहवून आपण विचारतो, " महाराज , कुठे निघालात?"
"बाळ, तुला माहित आहेच.  एकदा एक जीव हाताशी धरला कि त्याला मोक्षप्राप्ती होईपर्यंत मला त्याला सांभाळावे लागते.
रात्रीच्या वेळी मला तुम्हा सर्वांचे सूक्ष्म देह तपासावे लागतात.  तुमच्या सूक्ष्म देहातील वासना कुठे अडकल्या आहेत याचे ज्ञान मला होते. . रोज रात्री इथे मुक्कामी आलेल्या समस्त जीवांसाठी मला या सगळ्या इमारती फिरून तपासणी करावी लागते. अगदी किडा मुंगी, पक्षी का असेना.. पण त्यांच्या पोटात दोन घास गेलेत की नाही, हे बघावं लागतं. इति महाराज!
"बाळ मी आता गोशाळेकडे निघालो आहे. त्या गोमाता केव्हापासून माझी वाट बघत आहेत. तू तोवर ब्रम्हानंद मंडपात जप करत बस. नाहीतर चल माझ्यासोबत! दमदार पावले टाकीत महाराज पुढे निघतात. आपण ही संधी सोडतोय होय. आपणही श्रींच्या मागे मागे झपाझप निघालोय. त्यांच्या बरोबरीने पावले टाकण्याच्या नादात मागे पडतोय. आपण त्यांच्या मागे धावू लागतो.

जसजसे गोशाळेच्या जवळ जातोय.. तसतसे गोशाळेत सुरु झालेली चलबिचल आपल्या कानावर येतेय. गायिंनी गोशाळेच्या दरवाजाकडे पाहून हंबरायला सुरुवात केली आहे. आपण पोहोचतो ना पोहोचतो तोच.. समोरच आपल्याला दिसते कि, सगळ्या गायी, खोंड महाराजांजवळ जाण्यास.. त्यांची एक कृपादृष्टी आपल्यावर पडावी म्हणून धडपडत आहेत. दावणीला बांधलेल्या गायीची हिसकाहिसकी सुरु आहे. महाराज प्रत्येकीजवळ जाऊन तिच्या अंगावरून हात फिरवतात. प्रत्येकीशी बोलतात. तिच्या गळ्याला खाजवतात. प्रत्येकीला वाटतेय.. आपल्या अंगावरून श्रींचा हात फिरावा.
कशी आहेस नंदिनी? बाळ झालं ना तुला? मला दाखवणार नाहीस? हसत हसत श्रीमहाराज एका गायीला विचारतात.
ती डोळ्यात प्राण आणून तिच्याशी महाराजांनी बोलावं म्हणून वाट बघत असते तिला असे विचारताच.. अपार आनंदाने आणि आत्यंतिक प्रेमाने गळ्यातील घंटा वाजवत ती मानेने उजवीकडे दाखवते. महाराज तिच्या अंगावर थाप टाकतात.. तोच तिचे शरीर थरथरते. महाराज तिला नमन करून तिचे कौतुक करतात. 'गोंडस आहे हो तुझी पाडी! नाव काय ठेवायचे तुझ्या या छान छान लेकीचे? तिच्या कपाळावर हा गोल चांदवा आहे ना.. आपण तिचे नाव चांदणी ठेवूया का? नंदिनी होकारार्थी मान हलवते.

पलीकडे गंगी मान फिरवून उभी होती.,.. जणू काही श्रीमहाराजांवर रुसली आहे.  "चारा खाल्ला की नाही गंगे आज?" काल मी नाही आलो म्हणून काय असं उपाशी राहायच का? " गंगीने एकदम त्यांच्याकडे बघून हंबरायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यात पाणी पाहून महाराजांची गहिवरून येतेय. "बाळ,असा फार काळ रुसवा धरू नये. असं म्हणत महाराजांनी तिला कुरवाळले" तिने डोके खाली घालून नकारार्थी मान हलवते आणि महाराजांच्या कुशीत डोके घालते.

असं एकूणएक गायीची चौकशी करून आता महाराज परत निघायला वळतात. पण गायी पुन्हा हंबरायला सुरुवात करतात. " अगं हो हो बायांनो. मी रोज येतोच इथे तुमची खबरबात घ्यायला. एखादे दिवशी परगावी जावे लागले तर उशीर होतो इतकेच! " महाराज त्यांना आश्वस्त करतात.

आता महाराज आपल्याला म्हणतात, चल बाळ, निघूया! आपण त्यांच्यासोबत निघतो पण थोडे अंतर ठेवून. जाता जाता महाराज, कोठीघरामध्ये डोकावतात. सगळे काही धान्य, वाणसामान व्यवस्थित आहे हे बघून  'माझा बुवा इथे असल्यावर चिंता करण्याची गरज नाही." असे पुटपुटत समाधानाने मान हलवतात.

आता समाधी मंदिरासमोरच्या झाडाकडे महाराज येतात. झाडावर झोपलेल्या पक्षांच्या अंगावरून हळुवार हात फिरवतात.  झोपेत जे पक्षी फांदीवरून कलंडायच्या बेतात आहेत त्यांना हळुवार हातांनी परत वर ठेवतात. पक्षांची जी पिल्ले घरट्यातून बाहेर पडण्याच्या बेतात आहेत त्यांनाही परत घरट्यात ठेवत म्हणतात, सांभाळा रे बाळांनो , आपल्या पिल्लांना! "

 आता महाराज हुश्श म्हणत कट्ट्यावर बसले आहेत. आपण महाराजांच्या पायाशी बसून त्यांच्या पायावर डोके ठेवत म्हणतो, "महाराज, आम्हाला काही उपदेश द्या. नामाबद्दल काहीतरी सांगा."

श्रींना गहिवरून येते. आवंढा गिळत ते आपल्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात, "बाळ, मी आजवर नामाशिवाय काही बोललो नाही.माझी सेवा तुम्ही जी करता, ती आपल्या देहबुद्धीची करता. तुम्हाला जे पसंत पडेल, तसे तुम्ही करता. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे,सर्वांभूती भगवद्भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे,परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे. नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे." खरं सांगतो, एका नामाशिवाय तुमच्याकडून माझी काहीच अपेक्षा नाही, बरं बाळ! आनंदात राहावे .. मनापासून नाम घेत जावे व अंत:करण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा ; त्यानेच जगाचे कल्याण होईल ही माझी खात्री आहे! आता म्हण बरं माझ्यासोबत, " श्रीराम जयराम जय जय राम" , श्रीराम जय राम जय जय राम " आपण त्यांच्यामागोमाग डोळे मिटून महाराजांचा आपल्या मस्तकाला झालेला स्पर्श आठवत म्हणतोय, " श्रीराम जयराम जय जय राम " डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. किती वेळ झाला कुणास ठाऊक!
कानावर आवाज येतो. "... आता प्रक्षाळ पूजेसाठी गुरुजी येतीलच.. वर्दळ सुरु होईल. मला जायला हवं, बाळ ! एवढं बोलून महाराज प्रक्षाळ पूजेसाठी समाधी मंदिराकडे निघतात. "जी महाराज ,जी महाराज ! " नकळत आपण चरणस्पर्श करतो.
आपण भारावल्यासारखे तिथेच बसून आहोत. समोरून गुरुजी हातात ताम्हण घेऊन लगबगीने समाधी मंदिराकडे जातांना दिसतात.
आपण वेड्यासारखे " महाराज... महाराज" म्हणत ते गेले त्या दिशेला धावतोय. महाराज संथपणे समाधीमध्ये विलीन होतांना दिसत आहेत. पाठोपाठ धीरगंभीर आवाज " श्रीराम जयराम, जय जय राम, श्रीराम जयराम जय जय राम !' आवाज टिपेला...  संपूर्ण समाधी मंदिर भरून.. मंदिराच्या कळसातून प्रक्षेपित होतोय. अन आता संपूर्ण आसमंत.. सगळे सजीव निर्जीव म्हणत आहेत, श्रीराम जयराम जय जय राम !
 
जय श्रीराम!

` महाराज कन्या नयना

सोमवार, १ जुलै, २०२४

मानस -रामनवमी उत्सव सन १९०५

 ।श्रीराम समर्थ ।।
जय श्रीराम!
मानस -रामनवमी उत्सव सन १९०५

स्थळ: थोरले राम मंदिर, गोंदवले
वेळ- सकाळी ६ची

"बाळांनो, आज समोर राममंदिराकडे नका जाऊ बरं! आज तिथे उत्सव आहे, फार गर्दी होईल! इकडून आता नदीपात्रात बैलगाड्या सोडायला जातील लोक, उगा कुठल्या बैलगाडीच्या चाकाखाली यायला नको."  इकडे तिकडे हुंदडू नका.. ": थोरले रामाच्या समोरच असलेल्या पिंपळाच्या  झाडाची ढोली म्हणजे आमचे घर! आई, बाबा, आणि आम्ही चार बहिणी असे आमचे छोटेखानी खारुताईंचे कुटुंब तिथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतोय.
आई नेहमी म्हणायची की आपले कुळाचे दैवत हे रामप्रभू. आणि म्हणायची, आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण इथे, या भूमीत जन्माला आलोय. इथे समोर राहतात ना ते मोठे सत्पुरुष आहेत. आपण संतांच्या भूमीत जन्माला आलोय. आपले कल्याणच होणार आहे.
एक दिवस विचारले आईला कि नाव काय ग यांचे". आई म्हणाली, काय की बाई! घरचे लोक त्यांना गणूबुवा म्हणतात. पण इतर लोक त्यांना पु. गोंदवलेकर महाराज म्हणतात. फार कनवाळू आहेत बरं का!  इथे खूप अन्नदान चालते. इथे आलेल्या कोणाही व्यक्तीला ते जेवू घातल्याशिवाय जाऊ देत नाही. मग ते दरोडेखोर असोत की त्यांचे शत्रू. माहितेय का, त्यांना विष घालायला आलेल्या पुरुषांना ही त्यांनी आग्रहाने जेवायला बसवले होते."

मग आम्ही दिवसभर जाता येता रामाला हात जोडायचो. दिवसभर राममंदिरात हुंदडायचो.  हे सत्पुरुष रोज आम्हाला शेंगा, पेरू, फळे, साखरफुटाणे, खडीसाखर असे काहीबाही द्यायचे. रामाचा प्रसाद सगळ्या जीवमात्रांना मिळाला तर ते उद्धरून जातील अशी त्यांची धारणा आहे. त्या साखरफुटाण्यासाठी तर आम्ही जीव टाकायचो.
कधी मंदिरात कोणी नाही ते पाहून गुपचूप शिरायचो आणि रामाच्या पाठीमागून जाऊन तिथे रामाला वाहिलेले साखरफुटाणे, शेंगदाणे  खायचो. कधी तो रामाच्या डावीकडे कोच ठेवला आहे ना, तिथे महाराज बसायचे ... त्या कोचाच्या मागून तर इकडे शेजघरापर्यंत ... तिथून मारुतीरायांपर्यंत पळापळी खेळायचो . कधी कधी रामाच्या मागे तुळशीवृंदावन आहे ना, तिकडे मोठाल्या चुली मांडलेल्या असायच्या.. बाजूलाच माजघर होते, कोठीचे घर होते तिकडेही जायचो.

पण ते महाराजांचे ते लाडके निष्ठावंत शिष्य नाही का, महाराज लाडूबुवा म्हणायचे त्यांना ते! बाई ग!  फार कडक काम होतं ते.. मला चांगलाच अनुभव आलाय त्यांचा. कोणाशी जास्त बोलायचे नाही ते. फक्त मुखाने नाम. आणि महाराजांनी सांगितलेल्या कामात इतके तत्पर की, एकदा तर महाराजांनी "बुवा कुठे गेले म्हणून हाक मारली", तर हे छतावर  दिंडीदरवाजा शाकारत होते.. तिथून त्यांनी सरळ महाराजांच्या पुढ्यात उडी घेतली.. हे आम्ही समोरच्या झाडावरून स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.
तर असो,  एकदा असेच मी कोचावर पाठीशी ठेवलेल्या तक्क्यावरून पळत होते, आणि अचानक ते कडाडले, " हा हा, या कोचाला कोणी स्पर्श कराल तर खबरदार! भाऊसाहेब, आग आहे ती आग!
हे शब्द कानावर पडताच मी जे जीव खाऊन धूम ठोकली आणि मारुतीरायच्या मागे जाऊन लपले की ज्याचे नाव ते ! नंतर कळले की तिथे असणारे एक गृहस्थ वामनराव ज्ञानेश्वरी त्यांचे नाव, ते सहज कोणाशी तरी बोलता बोलता त्या कोचाला टेकले होते.
असो तर आई म्हणत होती त्या उत्सवाचे नाव कळाले, चैत्र रामनवमी उत्सव, आमच्या आराध्याचा जन्म!
एवढं ऐकल्यावर मला आता आत काय चालू आहे, याची फार उत्सुकता लागली. मी कोणी बघेल ना बघेल असे करत गुपचूप आत शिरले आणि रामाच्या मागे जाऊन तुळशीची सजावट केली होती त्यात जाऊन लपले. अश्या ठिकाणी लपले होते की मला, तिथून तो कोच ही दिसत होता आणि समोर असलेला जनसमुदाय पण दिसत होता.

अय्या आणि हे काय" थोरले राममंदिर आज किती विलक्षण सजले आहे!  मातीच्या भिंती पांढर्या रंगाने पोतारलेल्या आहेत. जमीन स्वच्छ शेणाने सारवलेली आहे. त्यावर मायबाईने रांगोळी काढलेली आहे. मंदिराच्या मधोमध, थोरल्या रामाच्या अगदी समोरच उंच  पाळणा बांधलेला आहे. त्याला झेंडूच्या माळा लावून सुशोभित केले आहे. पाळण्याच्या मधोमध कापडी चिमण्या, घोडे असलेले खेळणे बांधले आहे.
नुकताच पहाटेचा रामाचा काकडा करून श्रीमहाराज "श्रीराम श्रीराम" म्हणत कोचावर विसावलेले  दिसत आहेत. महाराजांच्या मुखात सदा सर्वकाळ रामनाम असते. एकदा काय गंमत झाली! मला ऐकायचे होते, ते तिन्ही त्रिकाळ काय पुटपुटत असतील बाई ? मग मी किनई एक दिवस जाणून बुजून त्यांच्या कोचाच्या मागे लपले.  ते असेच दुपारचे भोजनप्रसाद घेऊन सुपारी चघळत असेच येऊन बसले कोचावर. मी मागे त्यांच्या डोक्याच्या जवळच पण भिंतीशी टेकून होते. आणि मला अचानक, धीर गंभीर आवाजात 'श्रीराम जय राम जय जय राम' असे ऐकू आले. मग मीही त्यांच्यासारखेच पुटपुटायचा प्रयत्न केला. पण  छे! काही केल्या जमले नाही.  

तर आज उन्हाळ्यामुळे श्रींनी आज पांढरे शुभ्र करवतकाठी धोतर, आणि त्यावर उपरणे, डोक्याला फेटा, गळ्यात तुळशीमाळा, भाळी त्रिपुंड, डोळ्याच्या कडेला थोडे अंतर सोडून चंदनाचे ठिपके, दंडावर भस्म, अश्या वेशात श्रींची मूर्ती दिसत आहे. श्रींना गेल्या काही दिवसापासून दम्याने उचल खाल्ल्याने थोडा त्रास होतोय. अगंबाई, पायावरती जरा सूज पण दिसते आहे! आज सकाळपासून महाराज रामाच्याच चिंतनात गढून गेल्याने त्यांना राहून राहून भरून येतंय, वारंवार ते खांद्यावरील उपरण्याने डोळे पुसत आहेत.
महाराजांची सगळी शिष्यमंडळी उपस्थित आहेत. यात कोण कोण आहेत बरं ? भाऊसाहेब केतकर तर त्यांच्या मंडळीसहीत मागच्या वर्षीपासूनच इथे येऊन राहिलेत. धाकटे राममंदिराजवळ त्यांची खोली आहे. नुकताच तात्यासाहेबांचा विवाह झाल्याने त्यांचीही मंडळी सोबत आहेत. रामानंद महाराज, आनंदसागर  महाराज, साखरखेरड्याहून प्रल्हाद महाराज जिजीमाय सहीत आले आहेत.  डॉ. कुर्तकोटी, अप्पासाहेब भडगावकर दिसत आहेत, इंदोरहून आलेले भय्यासाहेब मोडक दिसत आहेत, अण्णासाहेब मनोहर, गणपतराव दामले, ब्रम्हानंद बुवांचे पुतणे, भीमराव गाडगुळी.. महाराजांची नेहमी इथे दिसणारी सगळी शिष्य मंडळी!

इकडे इतर सेवेकरी रामनवमी उत्सवाची जोरदार तयारी करत आहेत. राममंदिरापुढे मांडव तर गेल्या १० दिवसांपासूनच पडला आहे. १० दिवस भवानरावांच्या हाताला उसंत नाही, सारखे लाकडे फोडताना दिसत आहेत. माजघरातील स्त्रिया परसदारी तुळशीवृंदावनाच्या मागे बसून धान्य निवडत आहेत, सुप्यात घेऊन पाखडत आहेत. , रामानंदबुवांची मंडळी दुर्गाबाई आणि  पांडुरंगबुवांची मंडळी कृष्णाबाई भल्या पहाटे उठून जात्यावर दळायला बसतात. मुक्ताबाई खिरीसाठी भिजवलेले खपली गहू उखळात घालून कांडत आहे, बनुताई घागरीमध्ये रवी घेऊन ताक घुसळत आहेत, जीजीमाय रामाला विडा करत आहेत. गोदुताईने सुंठवडा करण्याची जबाबदारी आहे.  बनुताई खिरीसाठी विलायची कुटून ठेवत आहे. पटाईत मावशी रामासाठी नैवेद्य करून आणत आहेत.  पुरुष मंडळी कोणी पाण्याची व्यवस्था करतय , कोणी फुले माळा बांधतंय, कोणी निरनिराळ्या सुगंधी फुलाहारांनी पालखी सजवत आहेत. किशोरवयीन मुली अंगण भरून रांगोळ्या काढत आहेत.

श्रीमहाराज १५ दिवस आधीच मद्रासी अम्माला सूचना देत होते तेव्हा मी ऐकले होते.  'अम्मा, यावर्षी रामाला जरीचे , नाजूक कलाकुसर केलेले छान भगवे वस्त्र शिवायला घ्या हो '' त्याप्रमाणे मद्रासी अम्मांनी रामरायाला सुंदर वस्त्रे शिवलेली आहेत. गुढीपाडवा ते रामनवमी रोज रामाला नवीन वस्त्र अलंकार चढवले जात आहेत.

"अगंबाई, गर्दी वाढायला लागली बरे का! आता,पळावेच इथून.. उगा कोणच्या नजरेस पडायला नको. काय करावं? पण समोर तर मोठा सागरच उसळला दिसतो आहे! मुंगी आत शिरायला जागा नाही तर!  जाऊ दे, इथं गप्प बसून बघूया गंमत! "

जिकडे पाहावे तिकडे लोक. मुलाबाळांना घेऊन गर्दीचे लोंढेच्या लोंढे महाराजांच्या लाडक्या रामाच्या दर्शनाला येत आहेत. पण सगळे आधी महाराजांकडे येतात अन मग त्यांचे दर्शन घेऊन रामाकडे जातात. हे पाहून श्रीमहाराज गहिवरून म्हणत आहेत, "अरे माझ्या  रामाला आधी डोळे भरून पहा रे,  तो राम म्हणजे केवळ मूर्ती नसून, प्रत्यक्ष परमात्मा आपल्या गोंदवल्यात उभा आहे. तो इतका दयाळू आहे कि तुमचे अवगुण तुम्हाला समजतील, आपल्या दोषांची जाणीव झाली तरच आपण त्यातून सुटण्याचा प्रयत्न करू ना. आणि असे करून माझ्या रामाची प्रार्थना करून जो त्याला शरण जाईल ना, तर अश्या शरणागताला माझा राम सोडवेनच. शरणागतावर कृपा करणे हे रामरायाचे ब्रीदच आहे. म्हणून  तुम्ही प्रत्येकाने एकवार तरी माझ्या रामाकडे पाहावे असे मला वाटते. "

काय ग बाई, मला पुष्कळसे शब्दांचा अर्थच लागला नाही! दोष म्हणजे काय, अवगुण म्हणजे काय हे एकदा आईला विचारायला हवं!

इतक्यात श्रींना काहीतरी आठवते आणि ते चटकन रामानंद महाराजांना म्हणतात, " रामानंदा, तुम्ही रचलेले ते संक्षिप्त रामायण म्हणा पाहू.
रामानंद महाराज डोळे मिटून गायला सुरुवात करतात.

सुरवराच्या काजासाठी अजन्मा तू जन्म घेसी
चैत्र शुद्ध नवमीसी । जन्मीयले sssss
श्रीराम जय राम जय जय राम

बुवांनी मनापासून गायला सुरुवात केली. आता श्रीमहाराज अगदी डोळे मिटून तन्मयतेने ऐकत आहेत. मधेच त्या  'श्रीराम जय राम जय जय राम ' तालावर ठेका धरत आहेत. श्रीमहाराज हळूहळू त्यावर ताल धरतात आणि चक्क नाचायला सुरुवात करत आहेत  त्यांना नाचताना पाहून सर्वांच्या अंगात उत्साह संचारलाय.  अगदी भक्तिमय झाले आहे वातावरण. श्रीमहाराजांचे पोट मोठे होते. अगदी त्या पलीकडल्या मंदिरातल्या गणपती बाप्पासारखे. त्यामुळे महाराज नाचताना त्यांचे पोट मजेशीर हालायचे आणि फार गमतीदार दिसायचे ते. पण मला प्रश्न पडायचा कि महाराजांचे जेवण ते एवढेसे.. त्यातही आपल्या पानातले ते सर्व लहानथोरांना घास घास द्यायचे.  तरी श्रींचे पोट एवढे मोठे कसे? आणि बरं का, रोज चार पाचशे मंडळी तरी पानाला सोबत असायचीच. असा एकही दिवस गेला नाही, कि महाराज एकटेच भोजनाला बसलेत.

आता महाराज थकून कोचावर बसत आहेत.  बाजूला भाऊसाहेब महाराज आणि कुर्तकोटी हात जोडून उभे आहेत. महाराज आपल्या पोटाकडे तर्जनी करून बाजूला उभ्या असलेल्या भाऊसाहेबांना म्हणतात, " शिंचे, हे पोट फार मोठे झाले आहे नाही?
भाऊसाहेब नम्रतेने विचारतात, "महाराज, आपले भोजन तर इतके कमी आहे, तरी पोट इतके का मोठे दिसते?"
महाराज आपल्याकडे बघून म्हणत आहेत,' काय करणार भाऊसाहेब, लोकांचे दोष पोटात घेतो ना मी, त्यामुळे हे शिंचं एवढं मोठं झालं आहे.  मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही, पण दुसर्याचा मात्र चांगला करता येतो. पण माझ्यावर कोणी सोपवतच नाही. "
श्रीमहाराजांनी माझ्या मनातले कसे ओळखले कुणास ठाऊक! बरोब्बर मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पण मला फार वाईट वाट्ले बाई, किती करावं लोकांसाठी महाराजांनी! लोकांचे प्रश्न सोडवतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात, त्यांचा प्रपंच ठीकठाक करून त्यांना नामाला लावतात आणि वर त्यांचे दोष ही पोटात घालतात. काय म्हणावं, या, करुणेला!

थोड्याच वेळात आता महाराजांचे कीर्तन सुरु होणार आहे, म्हणे . कीर्तनाची तयारी होते. पेटी तबलावाले येऊन बसलेत समोर. बघूया तरी काय होणार आहे!  
एवढ्यात पूज्य आईसाहेबांना कोणीतरी हात धरून खुर्चीमध्ये आणून बसवतात. दिसत नसले तरी आईसाहेबांचे डोळे हा संपूर्ण सोहळा मन:चक्षूंनी अनुभवत आहेत  असे स्पष्ट जाणवते आहे.  आईसाहेबांच्या बाजूला क्रमाने यमुनाबाई, दुर्गाबाई, कृष्णाबाई, जिजीमाय, त्यांच्या बाजूला श्रींच्या स्वयंपाकघरातील पलटण सौ. तुळजाकाकू, बनुताई, गोदूताई, सुंदराबाई, मथुताई, पटाईत मावशी... सगळ्या सगळ्या झाडून हजर आहेत.
आता श्रीमहाराज कीर्तनाला उभे राहिले आहेत. अंगात भरजरी कफनी, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर त्रिपुंड, तेजस्वी चेहरा.. आज श्रींचे रूप सर्वांनी डोळ्यात साठवून ठेवावे असे आहे. श्रींनी निरूपणाला नाथांचा रामजन्माचा अभंग घेतला आहे. आज श्रींच्या वाणीला विलक्षण बहर आलेला आहे, जणू सरस्वती त्यांच्या जिभेवर नाचते आहे.
उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसन्ताचा दिवस ।
शुक्लपक्षी ही नवमी । उभे सुरवर ते व्योमीं ॥
असे शब्द माझ्या कानावर पडत आहेत. सूर्य माध्यान्ही आलेला आहे आणि बरोबर साडे बारा वाजता एकच शंखनाद आणि तुताऱ्यांचा घोष सुरु झालाय. श्रीरामाचा जन्म झालेला आहे.
सगळीकडे आनंदी आनंद... जमलेली समस्त मंडळी रामावर फुले उधळत आहेत . श्रींच्या डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत. उपस्थित सर्वच जण भावविवश झाले आहेत. थोरल्या श्रीरामाच्या मुखावर सुमधुर हास्य विलसते आहे.
"जानकी जीवन स्मरण जय जय राम", "जय जय रघुवीर समर्थ "असे म्हणून महाराज कीर्तन संपवतात आणि हात जोडतात तो त्यांच्या मुखातून सद्गदित स्वरात शब्द बाहेर पडतात,  "श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा
ध्यातो तुझी राजस योग मुद्रा |"
हे म्हणत असतांनाच गाभारातल्या रामाच्या गळ्यातील दोन गुलाबाची फुले श्रीमहाराजांच्या हाताच्या ओंजळीत येऊन पडतात. आणि महाराज रामापुढे साष्टांग नमस्कार घालतात.
इकडे बाळरामाला कुंची, काजळ, चंदनाचा टिळा , गळ्यात सोन्याचा हार, दृष्ट लागून नये म्हणून तीट लावून पाळण्यात झोपवण्यात आले. इतकं गोड ध्यान दिसतंय ते म्हणून सांगू! मग कृष्णाबाई आणि मुक्ताबाईं पाळण्याच्या दोन्हीं बाजुंनी बसल्या.
आता बाळ रामाला घेऊन," कुणी रामचंद्र घ्या, कुणी राजीवलोचन घ्या, कुणी कौसल्यानंदन घ्या, कुणी पुरुषोत्तम घ्या... "असे म्हणत एकदा पाळण्याच्या खालून तर एकदा वरून असे एकमेकींच्या हातात देत आहेत.
मज्जाच वाटली मला बाई, या माणसांची! एकीकडे हे रामकर्ता आहे असं मानतात अगदी आपला जन्मसुद्धा रामप्रभूचे देणे आहे असे समजतात आणि इकडे त्याचाच जन्मोत्सव करतात.
 
नंतर हळुवारपणे बाळ रामाला पाळण्यात झोपण्यात येते. आणि एक सुवासिनी येऊन त्याच्या कानात ' श्रीराम' असे बोलून कुर्र्रर्र्रर्र्र करतेय.
श्रीमहाराज कोचावर बसून कौतुकाने हा सोहळा न्याहाळत आहेत.
इतका वेळ स्वयंपाक घरात काय हवे नको बघणारे ब्रम्हानंद बुवांनी  तत्परतेने  सुंठवडा भरलेले ताट आणले आहे. सर्वांना प्रसाद दिला जातोय.
इकडे एका सवाष्णीने बसून आपले पाय लांब करून बाळरामाला पायावर झोपवलेलं आहे. आणि ती आता त्याला कोमट पाण्याने स्नान घालत आहे.
स्त्रिया पद म्हणत आहेत, "न्हाणे घालती प्रभूशी शुद्ध जळी हो, तया निर्मळा न्हाणीती शुभ वेळी हो .... "  
गम्मत म्हणजे स्नान संपताच, आपल्याच पायाच्या अंगठ्याची माती त्या सवाष्णीने बाळाला दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या कपाळी लावली.  आणि आता एका शुभ्र धूत उबदार वस्त्रात गुंडाळले जात आहे. आणि काजळ लावून त्याला पुन्हा पाळण्यात झोपवुन त्याचा झोपाळा हळूच दोरीने ओढते. आणि आता एकेक करून सगळ्या स्त्रियांची रघुराईला झोका देण्यासाठी झुंबड उडाली आहे.
अश्या रीतीने अतिशय भावपूर्ण वातावरणात श्रींच्या लाडक्या रामाचा जन्मोत्सव  पार पडलेला आहे.

आज श्रींचा उपास आहे. लहान मुले सोडली तर सर्वांनी उपास केलेला आहे.
प्रत्येकाला उपासाचा फराळ मिळणार आहे. आज सकाळी उठल्या उठल्याच मी झाडाच्या शेंड्यावरून डोळे चोळत चोळत बघितले होते, एका शेतकर्याने गाडाभर उकडलेली रताळी आणून महाराजांच्या चरणी अर्पण केली होती. किती मज्जा ना!
वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, ताक त्याचबरोबर फलाहार ही आहे.
महाराज रामाला नैवेद्य देत आहेत.  अगदी प्रेमाने रामरायाजवळ बसून त्याला घास भरवत आहेत. हे इतके सुंदर दृश्य पाहून नकळत आपलेही  डोळे ओलावतात.  
रामाच्या ताटातला थोडा प्रसाद चुलीवरच्या प्रसादात कालवला जातोय .त्यानंतर 'जय जय श्रीराम , 'जय जय श्रीराम' च्या गजरात फराळ वाढायला सुरु होते. पंक्तीवर पंक्ती उठत आहेत. आज गोंदवल्यात भक्तीचा महापूर लोटला. आहे.
गेले ८ दिवस, गुढीपाडव्यापासून सुरु असलेले रामाचे नवरात्र, उद्या दशमीला त्याचे पारणे करून सांगता होणार आहे.
 मी बघितले, श्रीमहाराज स्वतः वाढायला उभे राहिले आहेत.  कफनी कंबरेला बांधली आहे. आणि आता ते वरईचा भात वाढत आहेत. एकेकाजवळ जाऊन महाराज आपुलकीने चौकशी करून त्याला अगदी आग्रहाने वाढत आहेत.
आई सांगायची, आपल्याकडे आलेली प्रत्येक व्यक्ती नव्हे नव्हे प्रत्येक प्राणिमात्र ही रामाने पाठवली आहे आणि ती रामाचा पाहुणाच आहे, हि श्रींची धारणा आहे  आणि आयुष्यभर हीच खूणगाठ बांधून ते गोंदवल्यात येणाऱ्या प्रत्येकाला ते वागवतात.  त्यामुळे इथे येणाऱ्या  स्त्रियांनाच काय पुरुषांनाही हे माहेरच वाटावे इतका गोडवा भरला आहे या स्थानी.
कमाल म्हणजे, बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराज अगदी बोलावणे पाठवून भोजनाला आमंत्रण देत आहेत... नव्हे नव्हे, स्वतः हात धरून घेऊन येऊन बसवत आहेत. अश्या कैक पंक्ती  उठतात. आता गावात एकही व्यक्ती जेवायचा राहिला नाही ही खात्री करून मग ही करुणासिंधु माउली आपल्या निकटवर्तीयांसोबत फराळाला बसते. रामाचे ताट श्रींना देण्यात येते. तर ते उठून प्रत्येकाच्या पानात त्यातला घासभर प्रसाद देत आहेत.
अश्या रीतीने सर्वांचा फराळ झाल्यावर उशीराने माजघरातील स्त्रिया भोजनाला बसतात.
तेव्हा महाराज परत उठून कंबरेला कफनी बांधतात, " गेल्या १० दिवसांपासून  माझ्या मुलींना खूप काम पुरलेय... पहाटेपासून चुलीपुढे आहेत बिचार्या " असे म्हणत, गंगुबाई, मुक्ताबाई, बनुबाई पटाईत मावशी यांना स्वतः वाढत आहेत. त्या मुलीही कृतज्ञतेने आलेले अश्रू पुसत श्रींकडे बघत आहेत.
सगळी आवरासावर झाल्यावर श्रीमहाराज परत कोचाकडे जरा आडवे व्हावे म्हणून येतात.. पण तेवढ्यात पंढरपूरला परत जाणारी मंडळी श्रींच्या दर्शनाला येतात, महाराज पुन्हा उठून बसतात. त्यांनी प्रसाद घेतलाय याची खात्री झाल्यावर गप्पा सुरु होतात. लोक नमस्काराला येत आहेत, महाराज एकीकडे या लोकांशी बोलत या लोकांच्या अडचणी समजून घेत आहेत. कोणाच्या मुलीचे लग्न होत नाही, तर कोणाची शेती सावकारात अडकली आहे, तर कोणाचा मुलगा उनाडक्या करतोय, कोणाकडे अत्यंत गरीबी.  महाराज सर्वांना रामनामाचे महत्व वारंवार पटवून सांगत आहेत!
दिवेलागणी व्हायला आलीय . मंदिरातली गर्दी संपत नाहीये. आता थोड्याच वेळात म्हणजे रात्री ८ वाजता म्हणे पालखी निघणार आहे, रामरायाची!  रामाच्या पुढे मोठ्या समया तेवत आहेत. कोचाच्या मागे असलेल्या भिंतीवर असलेल्या कंदिलाने भिंत उजळून गेली आहे. मंदिरातल्या कोनाड्यात मातीचे तेलाचे दिवे, पणत्या लावण्यात आल्या आहेत.
मी जरा सावरून बसले. बाहेर फुलांच्या माळांनी पालखी सजवणे सुरु आहे. मशाली पेटवल्या गेल्या आहेत, श्रीमहाराज 'जानकी जीवन स्मरण जय जय राम' असे म्हणत कोचावरून उठतात. आणि "जय श्रीराम, जय श्रीराम"  या जयघोषात श्रीरामाच्या छोट्या मूर्तीना पालखीत स्थानापन्न केले जाते. आणि अश्याच जयघोषात पालखी नगरप्रदक्षिणेला प्रस्थान करते. आपल्या लाडक्या रामाचे दर्शन सर्व गावाला व्हावे अशी श्रींची इच्छा असते. आज महाराज स्वतः चवऱ्या ढाळायला उभे आहेत. .. मधेच अत्यंत प्रेमाने रामरायाच्या मुखाकडे बघत आहेत. गाणी, भजने गात पालखी रवाना होते.
आणि इकडे मी सुटकेचा निश्वास टाकला. भयंकर भूक लागली होती. चांगलाच उपास घडला होता. समोर पहिले तर रामरायाच्यासमोर फराळाच्या प्रसादातील काही शिते पडली होती. मंदिरात तुरळक गर्दी होती.. आता मी ते निर्धास्तपणे खाऊ शकणार होते.
अश्या रीतीने रामाचा प्रसाद मलाही मिळाला ! प्रसाद ग्रहण करतांना वारंवार रामाच्या, सीतामाईच्या, लक्ष्मणाच्या मुलायम चरणांना स्पर्श होत होता. खूपच छान वाटत होते. वर बघितले तर रामराया इतका गोड हसत होता. सीतामाई, लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर ही सुमधुर हास्य होते. . अन मी बघितले की रामाच्या डाव्या हातात धनुष्य असल्याने उजव्या हातात फक्त एक गुलाबाचे फुल होते. मी थोडा धीर एकवटून रामाच्या हातावर जाऊन बसले! आता अगदी जवळून दिसत होता रामराया. मानेवर रुळणारे कुरळे केस, रत्नजडित मुकुट, काळेभोर डोळे, त्याची नाजूक जीवणी, उंच कपाळ, कपाळी गंध, गळ्यात मोत्याच्या माळा, सोन्याचा चपलाहार, हातात सोन्याची कडी, बोटात अंगठ्या, बाजूबंद, असा देखणा, राजबिंडा दिसत होता रामराया.. हे रूप बघत बघत माझा तिथेच डोळा लागला.

पालखी जाऊन बराच वेळ झाला होता. एवढ्यात दूरवरून टाळ- चिपळ्यांचा आवाज, त्यापाठोपाठ भजने ऐकू यायला लागली. अगंबाई, नगर प्रदक्षिणा घालून पालखी परत आली वाटते! म्हणत मी गडबडीने रामाच्या करतलावरून उडी मारली ते सरळ समोर उभ्या मारुतीरायाच्या मागेच अन् लपून बघू लागले.

।। छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा, नांदतसे माझा मायबाप ।।
 श्रीमहाराज उत्कटतेने भजन म्हणत होते.  दिंडी दरवाजात असतानांच पालखींवरून लिंबलोण उतरवून टाकण्यात आले. आणि टाळ - मृदंगाच्या आवाजात रामरायाची आरती करण्यात येतेय.
बराच अंधार झालेला आहे. मशालींच्या उजेडात पालखी आत येते. श्रीमहाराज रामरायाला सन्मानाने उचलून गाभाऱ्यात बसवतात. त्याबरोबर एकच जयजयकार होतो. रामावर फुले उधळली जातात. आणि पुन्हा रामाची आरती होतेय. समयांच्या प्रकाशाने गाभारा उजळून निघाला आहे.
फराळासाठी आता दूध, केळी देणार आहेत. रात्री ११ वाजता मंडळी प्रसादाला बसतात. तेव्हा श्रीमहाराज त्यांना उद्देशून म्हणत आहेत, कि नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्याचे ध्येय नाही. जनावरेदेखील आपापला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आणि उपासनेला नामासारखा उपाय नाही. म्हणून इतका खटाटोप मी करून दाखवतो. प्रत्येकाने नाम घ्यावे ही माझी इच्छा आहे. रामरायाने माझी इच्छा पूर्ण केली."

प्रसाद आटोपल्यावर सर्वत्र निजानीज होते. बरीचशी मंडळी दशमीचे पारणे करूनच जाऊ म्हणून मुक्कामी थांबली आहेत. काही गावामारुतीच्या मंदिरात झोपायला गेली तर काही मंदिरातच रामासमोर इकडे तिकडे झोपली आहेत.  
रात्री महाराज कंदील घेऊन सर्वांची झोपण्याची व्यवस्था झाली आहे, हे पाहून शेजघराकडे रवाना होतात. जाता जाता बाजूलाच असलेल्या
आईसाहेबांच्या शेजघरात डोकावतात. कंदील वर करून बघतात तो आईसाहेब पाटावर बसून स्वस्थतेत माळ ओढत रामनाम घेत बसल्या आहेत.
समाधानाने मान डोलवत महाराज आपल्या शेजघरात येतात. पलंगाच्या बाजूला पाटावर कंदील ठेवून त्याची वात बारीक करून थोडा वेळ तेही नाम घेत बसतात. बऱ्याच उशिराने हातातली माळ कंदिलाजवळ पाटावर ठेवून झोपी जातात.  
आणि आपल्याला इकडे माजघरात भुईमुगाच्या २-४ शेंगा सापडल्या आहेत. आपण त्या घेऊन कुठे बरं या फोडून खाव्यात या विचारात मागचा पुढचा विचार न करता महाराजांच्या शेजघरात प्रवेश करतो. महाराज शांत चित्ताने डाव्या कुशीवर वळून निजलेले आहेत. आपण पलंगाखाली सुरक्षित जागा बघून शेंगा फोडायला सुरुवात करतो.
आणि त्या आवाजाने महाराजांची झोपमोड होते. महाराज कुशीवरून हात टेकून उठतात, आणि कंदिलाची वात जरा मोठी करून ,' कोण ते?' असे म्हणतात.
आपण एकदम दचकतो. त्या क्षणी हे ही आठवते की आई म्हणाली होती, महाराज दयासिंधु आहेत. ते कोणाचेही मन दुखवत नाही.
मग धीर करून आपण पुढच्या दोन पायात शेंगदाणा पकडून श्रींना सामोरे येतो. महाराज हसत हसत म्हणतात,  ' तू आहेस होय" ! तू जेवायची राहिली होतीस वाटते.' असू दे असू दे ! चालू दे तुझं! " असं म्हणत आपल्याला जवळ घेतात, आणि पाठीवरून त्यांचा कोमल हात फिरतो. भर उन्हाळ्यात इतके गारेगार वाटते म्हणून सांगू.. जणू चांदण्यांची शीतलताच अनुभवतोय! समाधीच लागली आपली! त्रेतायुगात रामरायाने खारुताईच्या पाठीवरून हात फिरवला होता ना, तेव्हा अगदी असेच झाले असेल तिला. आणि त्या क्षणी जाणवले की या खोलीत एकसारखा रामनामाचा ध्वनी ऐकू येतोय. कुठून येतोय बरं? तर  श्रींच्या  अंगप्रत्यांगातून येतोय.
त्या क्षणी असे वाटून गेले की आपल्यालाही मनुष्यासारखी वैखरी वाणी असती तर!

आणि आपल्या अंगावर दोन चार टपोरे थेंब पडतात. पाठोपाठ शब्द कानावर येतात.,

शङ्खमध्ये स्थितं तोयं भ्रमितं केशवोपरि।
अङ्गलग्नं मनुष्यानाम् ब्रह्महत्यायुद्धं दहेत्॥
तथास्तु! तथास्तु... !! तथास्तु ..!!!  !

.... रामाssss आपण इतका वेळ  समाधी मंदिरात होतो तर!

जय श्रीराम!
~ महाराजकन्या - नयना

मानस गोशाळा

 मानस गोशाळा
।।श्रीराम समर्थ ।।

। जय श्रीराम ।

स्थळ: गोंदवले
वेळ- पहाटे पावणे पाचची
 
"गंगे, यमुने, गोदावरी, तुंगे, कपिले , कृष्णे...  या ग या! या दीनदासाजवळ या". असं महाराजांनी दोन्ही हात पुढे करून आवाहन केलं आणि आम्ही सगळ्या जणी जे काही चौखुर उधळलो की थेट श्रीमहाराजांजवळ जाऊन उभे राहिलो. अवघ्या दोनशे पावलावर उभे होते ते सत्पुरुष!
नंदिनी सांगत होती.
 हो नंदिनीच! आज तिच्या मुखातून श्रींनी सोडवून आणलेल्या गायींपैकी कपिला गाय बोलत होती.
***
झालं असं की, यावेळी ऐन एप्रिलमध्ये आमचे गोंदवले दर्शनाला जायचे ठरले. मध्यंतरी तिथे जोरदार पाऊस होऊन गेलेला. एप्रिलचा कडक उन्हाळा... आदल्या दिवशी नुकताच पाऊस पडल्याने जरा वातावरण  कुंद झालेले होते. दिवसभर उन्हाच्या झळा असायच्या .नाही म्हणायला, पहाटे थोडासा गारवा असायचा.
पावणे पाचची बेल झाली आणि आम्ही लगबगीने समाधी मंदिरात काकड्याला पोहचलो.
 जरा मोकळी शुद्ध हवा घ्यावी म्हणून यावेळी बाहेर आईसाहेब मंदिराजवळ असलेल्या ब्रम्हानंद मंडपाच्या पायरीवर बसून काकडा अनुभवू असे ठरवले होते.
जवळच गोमातेच्या काकडआरतीसाठी म्हणून गोठ्यातून कपाळावर चांदवा असलेली पांढरी शुभ्र, उंचीपुरी बांधेसूद अशी नंदिनी गायीला  आणले गेले होते.
 
मी आधी तिला प्रदक्षिणा घातली, तिच्या दोन खुरांना स्पर्श करून नमस्कार केला आणि तिची शेपटी आपल्या अंगावरून फिरवली. तेवढ्यात तिने मान हलवली..
नंदिनी स्वस्थपणे  माझ्याकडे पहात, कान हलवत उभी होती. पण तिच्या डोळ्यात मला काहीतरी सांगायचे आहे असे भाव होते. मी इकडे येऊन बसताच... तिने परत मान हलवली आणि बोलावू लागली. म्हणून मी कट्ट्यावर जाऊन बसले. 'बोल माई, काय म्हणतेस?'
मी विचारल्यावर तेवढाच धीरगंभीर आवाज आला, "तूला काही सांगायचं आहे! "

मी अवाक.
"अग पण तुला बोलता कसे येतेय?

नंदिनी हसत हसत म्हणाली, " अग स्वतः श्रीमहाराज ही पू तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून बोलत होते ना? त्यांना काय अवघड आहे, ते फोटोतून ही प्रकट होतात.  आता असे बघ, महाराजांनी कसायाच्या हातुन गायी सोडवल्या हे तुला माहित आहेच. त्यातलीच मी एक गाय, कपिला. आता या नंदिनीच्या मुखातून बोलतेय. आम्हालाही त्यांनी मुक्ती देऊन गोलोकात पोचवले.

"काय सांगतेस काय? " मी चक्क उडालेच!
"हो तर.. आता मी सरसावून बसले. नंदिनी सांगू लागली. 'तुला माहित आहेच, श्रीमहाराजांना आम्हा गायिंबद्दल विशेष प्रेम होते.
ते नेहमी म्हणत, की जनावरांपैकी गायीला विशेष महत्व आहे. ती दूध देते, शेतीला बैल देते, खत देते हे सर्व ठीकच आहे. परंतु गायींमध्ये थोडी मानवी भावना आहे. इतर जनावरांमध्ये ती क्वचित आढळते. गायीवर आपण प्रेम करतो हे तिला कळते. भगवंताला देखील ती प्रिय आहे. "

त्या बघ त्या...तिकडे दूर उभ्या आहेत ना .. त्या गोदावरी, गंगा, तुंगा, सरस्वती, कृष्णा, यमुना यांच्या ४ थ्या पिढीतल्या गायी !

"अरेच्चा, असे कसे झाले? मी डोक्याला ताण देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नंदिनी हसत हंबरत  म्हणाली," नको ताण देऊ डोक्याला.
"तुला ती गोष्ट आठवत नाही का", महाराजांच्या चरित्रात आलेली आहे ती.
मग मीच म्हणाले," तूच सांग बाई आता"
नंदिनीच्या मुखातून कपिला गाय बोलू लागली. .
"काय सांगू... १८७६चा काळ असेल. आम्ही सगळ्या जणी (वर उल्लेखलेल्या) पूर्वी गोंदवलेपासून अवघ्या काही कोसावर असलेल्या किरकसाळ गावाच्या एका शेतकऱ्याकडे गोठ्यात राहत होतो. होतो. खूप छान चालू होते. पण त्या काळी भारतात फार दुष्काळ पडला. माणसांना अन्न आणि जनावरांना चारा मिळेनासे झाले. आमच्यातल्या काहींनी तर चारा पाणी अभावी तिथेच जीव सोडला.
अन एक दिवस ती बातमी कानावर पडली. रात्री तो शेतकरी बायकोला म्हणत होता.  " कारभारीण, लई दिस झाले, मनात एक इचार घोळतोय. जनावरांना दाणापाणी मिळत न्हाई, आपल्या लेकरांच्या पोटात घालाया रोटी परवडत न्हाई,  परवा म्हसवडचा बाजार हाय. नवीन जनावरं कोणी खरेदी करत न्हाई आता ... पोसायला जड म्हूनशान ! माझा इचार हाय की  उद्या आपल्याकडं असलेल्या या गायी कसायाकड़े देवून येऊ. चार पैका तरी मिळल~  ". हे ऐकले मात्र. आमच्या पोटात धस्स झाले. आता आपल्या गळ्यावर सुरी फिरणार या कल्पनेनेच सुन्न झालो आम्ही. आम्ही मनोमन त्याला विनवत होतो, "नको रे दादा इतका निर्दयी होऊ अन आम्हाला कसायाच्या हाती देऊ. आमची लेकरं काय म्हणतील... ! इतकी वर्ष आम्ही दूधदुभते , शेणखत, आमची मुले तुला शेतीला कामाला दिली. असा करुण अंत नको देऊ आम्हाला! "
रानात चरायला जातांना आम्ही इतर गोमातांकडून ऐकले होते की इथून जवळच गोंदवले इथे एक सत्पुरुष राहतात...त्यांना गायींविषयी अगदी निर्व्याज प्रेम आहे. भाकड, आटलेल्या, नकोश्या झालेल्या गायी ते सांभाळतात. अनेक शेतकरी परिस्थिती वाईट झाली की त्यांच्याकडे जनावरे सोडतात आणि परिस्थिती चांगली झाल्यावर घेऊन जातात. आणि हे सत्पुरुष गोप्रदाने पण करतात.  आम्हाला मनोमन खूप वाटायचे.. या सत्पुरुषाचे एकदा तरी दर्शन व्हावे, त्यांची एक नजर तरी आपल्यावर पडावी. त्यांच्या दर्शनानेच माणूस उद्धरून जातो म्हणतात. आम्ही मनोमन आमच्या मालकाला विनवत होतो. दादा, आम्हाला त्यांच्याकडे पोहचवा. . ते  आमचा प्रेमाने सांभाळ करतील. " पण आमची मूक हाक त्याच्यापर्यंत पोहोचलीच नाही.
त्या शेतकऱ्याने नाईलाजाने आम्हाला कसायाला विकले.
पण आमची आर्तता  त्या सत्पुरुषांपर्यंत पोहचली होती. .आणि कर्मधर्मसंयोगाने रस्ता चुकून नेमके ते कसाई आम्हाला इथे गोंदवल्यास घेऊन आले. धर्मशाळेत मुक्कामी राहिले. गोंदवले हद्दीमध्ये पाय ठेवताक्षणीच आम्हाला शुभसंकेत दिसू लागले होते. इथे, या मातीत नक्कीच काहीतरी वेगळेपण आहे, याची जाणीव होत होती. इथे प्रत्येक व्यक्तीच्या हातात माळ दिसत होती. कोणाच्याही चेहऱ्यावर दुःख, क्लेश, क्रोध दिसत नव्हता. कोणी राममंदिरात जप करत बसल्याचे दिसले.. तर कोणी पूजा करताना. जेवणाच्या पंक्ती दिसत होत्या. भाकरी आमटीचा सुवास दरवळत होता. लोक मुखाने नाम , हाताने काम करत होते. इतरत्र सर्वत्र दुष्काळाने हाहाकार माजलेला असतांना, इथे मात्र शेतात काम करणारे लोक दिसत होते. अगदीच काही नाही तर शेतातील माती इकडची उचलून तिकडे टाका.. अशी कष्टाची जाणीव करून देणारे लोक दिसले , त्यांना रोजगार देणारे, त्यांना शेतातच झाडाखाली बसवून भात आमटी वाढणारे लोक दिसले.  सर्वांमध्ये अलोट, निस्वार्थी, निर्व्याज प्रेम दिसत होते. आपले दुःख विसरून दुसऱ्याला जीवाला जीव लावणारे लोक दिसत होते.

आणि माहिती आहे का, दुसरे दिवशी आम्हाला घेऊन ते कसाई निघणार.. तेवढ्यात त्या सत्पुरुषापर्यंत ही बातमी आधीच पोहचली होती. कसाई आम्हाला सोटे मारत हुर्रर्र करत हाकलत..... घेऊन जात होते. आम्ही ४ दिवसाचे उपाशी पाय ओढत, केविलवाण्या नजरेने चाललो होतो.. सोट्याचे फटके पाठीवर पडतांना वेदना होत होत्या..  
तेवढ्यात, एक अत्यंत तेजस्वी, गौरवर्ण, कपाळाला उभे गंध, प्रसन्नचित्त, असे पांढरे शुभ्र धोतर आणि वर उपरणे असा वेष परिधान केलेले गृहस्थ समोरच्या राममंदिराच्या दारात प्रकटले. आणि जोरात ओरडले, "हा हा , मारू नका गायींना. या मुक्या जनावरांना किती कष्ट होत असतील याची तुम्हाला कल्पना नाही.  मी या गायींची किंमत तुम्हाला देतो आणि या विकत घेतो पण इतःपर तुम्ही हा धंदा सोडून द्या. हे पाप आहे."
हे शब्द कानावर पडताच आमच्या आशा पल्लवीत झाल्या. इतक्या दिवसांची आस पूर्ण झाली. त्यांनी ती एक दयाळु नजर आम्हावर फिरवली आणि इतके गार वाटले म्हणून सांगू! आम्ही दिग्मूढ झालो. त्या सत्पुरुषाचे नाव श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहे असे तिथेच कळले.

त्यानंतर ते निर्दयी कसाई म्हणाले कि "महाराज, या गायींना इतके कुठे समजते?" खरं तर आम्हाला सगळं कळत होतं. फक्त वाचा नसल्याने आम्ही बोलू शकत नव्हतो.

 तेव्हा महाराज म्हणाले, "तुम्ही त्यांना मोकळे करा, मी लांब उभा राहून हाक मारतो.  त्या धावून माझ्याकडे आल्या तर तुम्ही त्यांना सोडा.'
कसाई म्हणाले, "हे कबुल आहे, पण त्या जर तुमच्याकडे नाही आल्या तर मात्र आम्ही त्यांना मारायला घेऊन जाऊ. "

महाराज दोनशे पावलावर जाऊन उभे राहिले आणि चक्क मोठ्याने आमची नावं घेऊन म्हणाले, "गंगे, यमुने, गोदावरी, तुंगे, कपिले , कृष्णे...  या ग या! या दीनदासाजवळ या". आणि काय सांगू, आम्हाला माउली भेटल्याचा भास झाला. जणू आपली कान्हा माऊलीच आम्हाला बोलावत होती.
श्रीमहाराजांनी असे बोलावण्याचा अवकाश, कि आम्ही सगळ्या गायी, आनंदाने शेपट्या वर करून हंबरत... जे कानात वारं भरल्यासारखे उधळलो ते थेट त्यांच्या पायाशी!  त्यांचे पाय चाटू लागलो. . त्यांचे अंग हुंगू लागलो .. त्यांच्या अंगाला अंग घासू लागलो. त्यांच्या तोंडाकडे पाहत हंबरू लागलो .

आणि काय सांगू,,, महाराजांच्या शरीरातून, 'श्रीराम जय राम जय जय राम' असा ध्वनी येत होता. त्यांच्या अंगाला तुळशीचा सुगंध हि येत होता.. जणूकाही नुकतेच रामाची मानसपूजा करून स्वारी बाहेर आली असावी.

इतःपर बघे येऊन उभे राहीले होते. आजूबाजूला गोमाता आणि मध्ये उभे श्रीमहाराज. गोकुळातल्या कृष्णाचीच आठवण उपस्थित लोकांना होत होती असे त्यांच्या बोलण्यावरून कळले.  कसायांचे पैसे चुकते करताच त्यांनी काढता पाय घेतला.
इकडे  महाराज आम्हाला प्रेमाने  कुरवाळत, गोंजारत बराच वेळ उभे होते. आमच्या पाठीवर सोट्ये  मारल्याने जखमा झाल्या होत्या त्यावर हळदीचा लेप लावला... आम्हाला स्वतःच्या हाताने त्यांनी चारा खाऊ घातला.. पाणी दिले. आम्हाला तर आनंदाने जणू गगन ठेंगणे झाले होते. . आम्ही आनंदविभोर झालो होतो.आनंदाने उचंबळून  येत होते. नंतर अभ्यंकर दादांना बोलावून आमची गोठ्यात व्यवस्था लावायला सांगून हा सत्पुरुष शेतीच्या कामाकडे बघायला निघून गेला.
   
हे सांगता सांगता नंदिनीचे उर्फ कपिलेचे डोळे भरून आले. गळ्यातली घंटा हलवत , खुराने जमीन उकरत ती मूकपणे रडत होती. मलाही राहवले गेले नाही. तिच्या पाठीवर थाप मारत मी तिच्या गळ्याला गोंजारले. पाठीवर थाप टाकताच तिचे अंग थरथरले.

ती पुढे सांगू लागली, "महाराज खूप सेवा करायचे ग आमची. गोमयाने गोठा सारवणे, गोठा साफ करणे, ही साधी कामे ही महाराज करत असत. गुरुत्व धारण केल्यावरही ते अतिशय साधे राहणीमान होते त्यांचे, साधे खाणे होते... बोलणेही साधेच.इथे आलेल्या मंडळींना स्नान घालण्यापासून तर त्यांना जेवायला वाढणे, पत्रावळ्या बनवणे, शेतात नांगर धरणे, खणणे, वेळप्रसंगी चिखल तुडवणे अशीही हलकी कामे ते करत.

आमचे तर इतके लाड करत. आम्ही दिवस दिवस त्यांची वाट पाहत असू. ते अभ्यंकर दादा, आम्हाला सांगून सांगून थकत असत, की अग बायांनो... महाराज आज कोरेगावला गेलेत, साताऱ्याला गेले, बैलगाडीचा प्रवास त्यांना यायला उशीर होईल. आम्ही दिवस दिवसभर उपाशी राहत असू, पण चाऱ्याला तोंड लावत नसू. काय करणार, त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय आम्हाला चैन पडत नसे. अन्नपाणी गोड लागत नसे.
एकदा तर महाराज कर्नाटकात गेल्याचे कळले आणि इथे त्या गंगीने अन्नपाणी सोडले होते. महाराज रेल्वेने ४ दिवसांनी परत आले. त्यांना हे समजताच त्यांनि आधी इथे धाव घेतली. आणि गंगीला जवळ घेतले, कुरवाळले, गोंजारले.. आणि प्रेमाने चारा भरवला तेव्हा कुठे ती शांत झाली.

नंदिनी सांगत होती... मी समरसून ऐकत होते.
"अग एकदा तर , म्हसवडच्या बाजारात दुसऱ्या दिवशी  गायी विकायला येणार आहेत असे कळल्यावर हा महात्मा अपरात्री दीड वाजता पोहचून रात्रभर डासांमध्ये राहिला होता. कोण करेल इतके गायिंसाठी या कलियुगात सांग बरं !
"काय म्हणतेस? मला नव्हती ही गोष्ट माहित!  मी म्हणाले.
नंदिनी उत्साहाने सांगू लागली.
"हो तर, महाराज नागप्पाला घेऊन कंदील, तपेली, घड्याळ, कफनी, लंगोटी, चष्मा, रुमाल दंतमंजन, सतरंजी अश्या वस्तू घेऊन म्हसवडमध्ये पोहचले . त्यांनी आधीच  नागप्पाजवळ साडे चारशे रुपये ठेवायला दिले होते. म्हसवड गावाची धर्मशाळा इतकी जुनी होती.. तिथे कित्येक वर्षात झाडलोड झालेली नव्हती.. तर स्वतः महाराजांनी कंदील पेटवला. नागप्पाने स्वतःच्या उपरण्याने थोडी जागा स्वच्छ केली. घोड्यावरची घोंगडी त्याने अंथरली, त्यावर कफनी पसरवली.. ..आणि सतरंजीची घडी करून उशाशी ठेवली. महाराज थोडे पाणी प्यायले .. अन नागप्पाला म्हणाले की, तू जागु नकोस. ते पैसे कनवटीला लाव आणि खुशाल झोपी जा. मी ही जरा स्वस्थ पडतो. असं म्हणून महाराज दोन मिनिटात झोपी गेले. इकडे नागप्पा त्यांच्या डोक्याच्या बाजूला भिंतीला टेकून बसला पण त्याला काही झोप आली नाही.. इतके डास होते तिथे. मग फक्त दोन तास झोप घेऊन महाराज चारच्या सुमारास उठले, गार पाणी प्यायले आणि अंथरुणावर बसूनच त्यांनी भजन करायला सुरुवात केली. थोड्या वेळाने उजाडल्यावर बाजारात गेले.
आणि अग काय सांगू..  त्या दिवशी महाराजांनी ६०-७० गायी विकत घेतल्या. कसायांना एकही गाय मिळू दिली नाही.
बाजार झाल्यावर एकाकडे जेवायला गेले होते महाराज, तर शेवटचा ताकभात खातांनाच त्यांना इतकी जोराची उचकी लागली की घास काही केल्या गिळेना.. पाणी प्यायले तरी तसेच. तसेच उठून हात धुतला महाराजांनी आणि लगबगीने मागच्या दाराने बाहेर गेले तर थोड्या अंतरावरच एक कसाई निर्दयपणे एका गायीच्या पाठीवर सटासट सोटे मारत होता. ती गाय खाली बसली होती. तिच्या तोंडातून रक्त येत होते. हंबरून हंबरून ती आता अगदी केविलवाण्या स्वरात विव्हळत होती.
महाराज त्या जागेवरूनच त्याला ओरडले, "खबरदार, तिला मारू नकोस.मग त्याच्या जवळ जाऊन म्हणाले, हि गाय मला विकत दे.
महाराज जास्त किंमत द्यायला तयार होते पण काही केल्या कसाई मानत नव्हता. शेवटी जमलेल्या गर्दीत एक फौजदार होता.. त्याने त्याला दम भरला. थोडे वर पैसे देऊन तो एकदाचा मानला. महाराजांनी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, "बाई, आज तुझ्यावर मोठा प्रसंग आला होता. यमाच्या दाढेतून तू वाचलीस, चल उठ आता!" म्हणजे श्रीमहाराज या परिसरातल्या मुक्या प्राण्याशी ही कसे जोडले गेले होते बघ. तिने आर्ततेने महाराजांचा धावा केला म्हणून महाराजांना चक्क उचक्या लागाव्या आणि महाराज लगोलग तिथे पोहचावे.
मग लगेच ती उठून उभी राहिली. या महात्म्याने स्वतः तिचे तोंड धुवून स्वच्छ केले. मग तिथल्याच एका सद्गृहस्थाने मागितली म्हणून श्रीं त्याला ती गाय देताना म्हणाले, की "तुम्ही घेऊन जा, पण जर तुम्हाला नकोशी होईल तर मलाच परत करा." त्या गृहस्थाने तेव्हा कबुल केले खरे पण दुसऱ्याला देऊन टाकली.
नंतर काही दिवसांनी पुन्हा महाराज त्या गायीच्या समाचाराला गेले तेव्हा त्याच वाड्यात दुसऱ्या गृहस्थाकडे असेलल्या तिने श्रींना पाहताक्षणीच मोठमोठ्याने हंबरण्यास सुरुवात केली. महाराज घोड्यावरून पुढे जाऊ लागताच दावणीला हिसकाहिसकी करून तिने दावे तोडले आणि त्यांच्यामागे चौखूर धावत गेली. तेव्हा महाराजांनी घोडा थांबवला.. ते समजून चुकले. मग प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवत ते म्हणाले, की, माय, तू जाशील तिकडे मी येतो, चल ! आणि गम्मत म्हणजे ते जिथे उतरले होते तिथेच ती गाय त्यांना घेऊन गेली. मग दोन दिवसांनी एका सज्जनाला महाराजांनी ती गाय देऊन टाकली. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा महाराज तिला आश्वस्त करत म्हणाले, *बाई, दिल्या घरी सुखाने नांदावे! "मग ती निमूटपणे गेली.

"या सत्पुरुषाचे इतके उपकार आहेत ना सगळया जगावर.. आणि आमच्यावर तर त्यांचे अलोट प्रेम होते. त्यांच्या लंगड्या गंगी गायीची गोष्ट माहीतच असेल तुला! "
"हो हो माहित आहे, गोंदवल्यापासून १० कोसावर असलेल्या गावातील एक सधन कुटुंब पण नंतर  परिस्थिती खालावते म्हणून एकेक जनावर ते काढायला लागतात. त्याच्यात ही लंगडी गंगी गाय असते. मग त्याला प्रश्न पडतो कि हि द्यावी कोणाला. कोणीतरी महाराजांचे नाव सुचवल्यावरून तो महाराजांकडे आणून सोडतो. महाराज ही ठेवून घेतात. एक दोन वर्षांनी परिस्थिती सुधारल्यावर तो परत गंगीला घ्यायला येतो. महाराज, तिच्याकडे जाऊन तिला म्हणतात, की गंगे, बघ..तुला नेण्यासाठी कोण आलेले आहे. त्यांच्यासोबत आनंदाने जा. पण गंगी डोळ्यात पाणी आणून हंबरडा फोडते. शेवटी महाराजच तिच्या मालकाला म्हणतात, की तिची घरी परत जाण्याची इच्छा दिसत नाही. तुमची संमती असेल तर मी तिला इथेच ठेवून घेतो. माझ्या मुलीप्रमाणे मी तिचा सांभाळ करील. "

"काय विलक्षण शब्द होते ग ते! कानात साठवून ठेवावे असे. खरोखर मुलीप्रमाणे ते सांभाळ करतात आमचा. अगदी माहेरवाशिणीसारखे लाड करायचे.
या गंगीवर आणि गंगीचे महाराजांवर इतके प्रेम होते की ते दिसताच ती दाव्याला हिसकाहिसकी सुरु करत असे. आणि मोकळी सोडल्यावर त्यांच्या मागे मागे जाऊ लागे. महाराजांनी तिला कुरवाळून तिच्याशी थोडे संभाषण केले.. अन  समजावून सांगितले कि तरच ती गोठ्यात परत जात असे.

एका रामनवमीला माहितेय काय गंमत झाली!
रामनवमीला संध्याकाळी महाराज राममंदिरात होते. ते बापूसाहेब माने होते त्यांच्यासोबत. आम्ही सगळ्या जणी नदीवरून पाणी पिऊन यायला आणि महाराज राममंदिराच्या दारात यायला एकच गाठ पडली.
आणि आम्हाला पाहताच महाराजांचे प्रेम उचंबळून आले. लगेच धावत ते बाहेर आले.. आणि आमच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. कुरवाळले. जवळ असलेल्या मंडळींना सांगून त्यांनी त्यांच्या मळ्यातून ऊस कापून आणायला सांगितला. ऊस कापून होईस्तोवर ते आमच्याजवळ बसले. आणि आम्हाला प्रत्येकीला प्रेमाने ऊस भरवला. काय बोलणार या प्रेमापुढे!! त्यांच्या प्रत्येक कृतीत प्रेम होते.

किती किती गोष्टी सांगू त्यांच्या? अगदी अलीकडेच अभ्यंकर दादांनंतर गणूकाका साने हे आमची व्यवस्था बघत होते. ही यमुना गाभण होती तेव्हा.. अन ती  विण्याच्या बेतात आहे असा निरोप जाताच महाराज लगोलग बरोबर काही मंडळींना घेऊन इकडे निघाले. अर्धे वासरू बाहेर आले होते.  महाराजांनी गायीला तीन प्रदक्षिणा घातल्या. आणि म्हणाले, "अरे ही केवढी सोन्यासारखी संधी. अश्या स्थितीत गोमातेला प्रदक्षिणा घालणाऱ्याला पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य लाभते." पाठोपाठ मग बरोबरीच्या मंडळींनी हि प्रदक्षिणा घातल्या.

अगो, असा हा कनवाळू महात्मा देह ठेवायच्या पाच दिवस आधी म्हणजे बघ, बुधवारी, १७ डिसेंबरला म्हसवडला नागोबाची यात्रा भरते ना तिथे बऱ्याच गायी विकायला येणार असे कळल्यावर महाराज बरेचसे पैसे घेऊन गेले होते. जाता जाता बोलले की 'आता ही अखेरची सेवा आहे.' आमच्या पोटात तेव्हाच धस्स झाले. आता पुढे काय वाढून ठेवले आहे आपल्यापुढे असे वाटून सुन्न झालो होतो आम्ही. तिथेही त्यांनी बऱ्याच गायी सोडवल्या. आयुष्याच्या अंतसमयी त्यांच्याकडे जवळजवळ पाऊणशे जनावरे होती.

"काय सांगू, मला भरून येतंय बाई!" बोलता बोलता नंदिनीने आवंढा गिळला. भरलेल्या आवाजाने ती पुढे सांगू लागली..
 "इथे हे जे समाधी मंदिर दिसते आहे ना.. तिथे आधी आमची गोशाळा होती. देह ठेवण्याआधी हा सत्पुरुष इथे येऊन बसला होता. .
२१ डिसेम्बर १९१३ चा प्रसंग अजूनही जसाच्या तसा डोळ्यासमोर येतोय. तशी महाराज निर्वाणीचे बोलू लागले आहेत याची कुणकुण आम्हाला लागलीच होती. गोशाळेत आम्ही सुन्न झालो होतो. कुणी कुणाशी बोलत नव्हते. मनातल्या मनात टाहो फोडून रडत होतो. त्यांना विनवत होतो, महाराज, नका हो जाऊ आम्हाला सोडून. "
त्या दिवशी साधारण संध्याकाळी ५ वाजता महाराज इथे येऊन बसले. बापूसाहेब खरे यांची सून आजारी होती.. तिला इथेच ठेवले होते. तिला धीर देऊन  महाराज थेट गोठ्यात आले. गोठ्यात आम्ही गायी, बैल, वासरे असे सगळे मिळून साधारण पाऊणशे जण होतो. सगळ्यांवर श्रींची प्रेमळ नजर फिरली. त्यांना दम्याचा त्रास होतोय... हे तेव्हाच जाणवले.  आम्ही व्याकुळ नजरेने पाहत होतो.
श्रींनी या  भूमीला दंडवत घातला आणि म्हणाले, "बायांनो ही शेवटची सेवा बरं का!" आम्ही समजून चुकलो.. कि महाराज आता निजधामाला निघणार. सकाळीच त्यांनी आउताईंना सांगितलेला निरोप आमच्याही कानावर आला होता. ते म्हणाले, होते, "सर्वांना सांगा, आता भात गावाला चालला. जी भाजीभाकरी मिळेल ते खाऊन आनंदाने नाम घ्यावे,आणि काळ कंठावा!"
 ते आपल्याला सोडून जाणार ही कल्पनाच आम्हाला सहन होत नव्हती. आम्ही धाय मोकलून रडत होतो. आणि एकेकीच्या जवळ जाऊन ते तिच्या पाठीवर थाप मारत होते. तिला कवेत घेत होते.  आम्ही त्यांचे पाय चाटत होतो. त्यांना नमन करत होतो...!  सगळ्यांच्या ... खुद्द महाराजांच्या डोळ्यातूनही अश्रुधारा सुरु होत्या.
आम्हा सर्वांना नीट पाहून, सर्वांचा निरोप घेऊन ते अभ्यंकर दादांच्या झोपडीसमोर गेले. तिथे गवत पडले होते. ते साफ करायला सांगितले. भवानरावाने चटकन पुढे होऊन जागा साफ केली, सारवली,... रांगोळी काढली. खुर्ची ठेवली. महाराज त्यावर बसले.  आणि म्हणाले, "ही जागा किती छान आहे. असे वाटते इथे कायमचे येऊन राहावे".
आणि २२ डिसेम्बर १९१३ या दिवशी सकाळी ५:५५ वाजता सूर्योदयाच्या वेळी हा गोंदवल्याचा अध्यात्मसूर्य अस्ताचलास गेला. महाराज निजधामास गेल्याची बातमी आली..आणि आमचा बांध फुटला. आमच्या पायातले त्राणच गेले. मटकन खाली बसलो. कित्येक गायींनी तर तिथेच अंग सोडले.. दुःखावेग इतका अनावर झाला की त्यांनी अन्नपाणी सोडले.

" दोन दिवस ब्रम्हानंद बुवांची वाट बघून शेवटी त्यांचे पार्थिव इथे या जागेवरच हलवण्यात आले. याच जागी चिता रचली होती ग त्यांची" असं म्हणत नंदिनीने भाव विभोर् होऊन खाली बसत त्या जागेला प्रणाम केला.  

"असा हा प्रेमळ महात्मा तुम्हाला गुरु म्हणून लाभला आहे, सोने करा ग जीवनाचे. आम्हाला आमच्या भावना बोलता येत नाही म्हणून. नाहीतर आम्ही त्यांच्या सांगण्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला असता आणि  ते म्हणतात तसे अखंड मुखी नाम घेतले असते." - नंदिनीने मोलाचा सल्ला दिला.

तेवढ्यात.." चला, चला.. रांगेत उभे राहा. इथे गर्दी करू नका.. असा गुरुजींचा आवाज आला. पाठोपाठ ते आरतीचे ताट घेऊन आले, आणि नंदिनीची पूजा करून..  
।। धेनु माय जगज्जननी तापत्रयत्रितापशमनी .... ।। चा आवाज कानी पडू लागला.

आणि नंदिनी ? ती साश्रू नयनांनी समाधी मंदिराकडे निमूटपणे बघत उभी होती!

*
जय श्रीराम!
महाराज कन्या, नयना!

थेंबुटला

 || जय श्रीराम || 🙏🏻


थेंबुटला

"ए, शुक, शुक! 

सरक की जरा.. मला दिसत नाहीयेत श्रीमहाराज! "

मी दचकून मागे वळून पाहिलं! समाधी मंदिराच्या शांततेत, एवढा आवाज कोणी केला म्हणून जराशी दचकलेच! 

तशी अगदी तुरळक लोक होती दुपारच्या वेळी. 

मागच्या ८-१० दिवसांपूर्वी गोंदवले इथे पाऊस झाला ना... चांगला तासभर तरी भरपूर कोसळला! त्या दिवशीची  गोष्ट.

वातावरणातला उकाडा चांगलाच वाढला होता. जीवाची तगमग सुरु होती. दुपारी चार साडेचारची वेळ. समाधी मंदिरात विष्णुसहस्रनामाची वेळ होत आली होती.. लोक येत होते. बाहेर  आभाळ भरून आलं. वारं सुटलं,आकाशात ढगांची दाटी झाली. हळूहळू मोठाले थेम्ब येऊ लागले. 

अचानक वातावरण गारेगार झाले. आणि समाधी मंदिराच्या शिखरावरून खाली ओघळणारे पाणी पागोळ्यामधून वाहू लागले. आत बसलेल्यांना बाहेर किती पाऊस कोसळतोय याचा अंदाज येतच होता. 

पावसाचे काही थेंब पागोळ्यांना लटकलेले दिसत होते. छान वाऱ्याच्या हेलकाव्याबरोबर  झुलत होते. एकसारखी जणू मोत्याची माळच. फार सुंदर दृश्य होते ते. 

सहज त्यांना प्रश्न केला, " काय बघताय रे?"

सगळे एका सुरात उत्तरले, "महाराजांचे दर्शन घेतोय"

मजाच वाटली मला तर. तिथे लटकलेले थेंब खाली मातीत मिसळत होते... त्यांची जागा दुसरे थेंब घेत होते.. जणू एक दुसऱ्याला ' खो ' च देत होते.  एकापाठोपाठ एकेक माळ तयार होत होती. 

त्यातलेच काही चुकार थेंब, वाऱ्याच्या झोताने.. मी बसले होते त्या खिडकीच्या गजावर येऊन आदळले. तोंड वेडेवाकडे करत , जरा सावरून एका हाताने गज घट्ट धरून ठेवत एक थेंबुटला मला वरचे वाक्य विचारत होता. 

गंमतच वाटली मला. "तुला रे काय करायचंय महाराजांचे दर्शन घेऊन! " हसत हसत त्याला विचारले. 

कसाबसा लटकत तो म्हणाला, अग तुला काय माहित किती लाखो मैलांचा प्रवास करून आम्ही फक्त एक क्षण श्रींच्या दर्शनाला येतो ते. इथे येण्यासाठी युगानुयुगे प्रतीक्षा करतो आम्ही. 

"काय सांगतोस?' माझी उत्सुकता चाळवली गेली. 

"तर काय! ज्ञानोबा म्हणतात ना.. " देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी..." अगदी क्षणभर आयुष्य असते बघ आमचे.  शिंपल्यात पडलो तर मोती होऊ. पण ते काय खरे नाही, शेवटी निर्जीवच ना. मातीत पडलो तर मातिमोलच आमचे आयुष्य, पण त्या आधी इथे समाधी मंदिरावर उतरलो  तर महाराजांच्या नुसत्या दर्शनाने उद्धरून तरी जाऊ. या 'एका क्षणाच्या' दर्शनासाठी आम्ही किती आटापिटा करतो माहीत आहे का?

"आणि एवढा आटापिटा कशासाठी तो? " मी विचारले

"अग , आमचा इवल्याश्या जीवाचा उद्धार होण्यासाठी ! ~ इति थेंबुटला

"तुमचा उद्धार? तो कसा काय बुवा होतो?" माझी उत्सुकता ताणली गेली.

"अग मनुष्य देह मिळावा त्यासाठी काय काय करावं लागत!" 

"म्हणजे असं बघ.. या महापुरुषाने अगणित जणांना नामाला लावले. आता इथे गोंदवल्यात इतके नाम भरले आहे. इथल्या कणाकणात नाम आहे. तुम्ही जे नाम घेता, ते वाया जात नाही, असेच म्हणालेत ना महाराज. त्याने तुमचे तर कल्याण होतेच, पण तुमच्या आजूबाजूला जे जीव आहेत, त्यांच्याही कानावर पडून त्यांचे सुद्धा ते नाम कल्याणच करतच असते, याची कल्पना आहे का तुला? या मंदिराच्या समोरच्या झाडावरच्या चिमण्या दिसतात तुला? यांना पुढचा जन्म मानवाचा आहे.

"अरेच्चा, ते कसे काय बुवा? " माझी उत्सुकता शिगेला पोहचली.

"आज कश्या पावसाने आडोश्याला खोपट्यात बसल्या आहेत ना! यांचे आयुष्य ते किती, उण्यापुऱ्या ७-८ वर्षांचे.  पण रोज संध्याकाळी थव्याने मंदिराच्या शिखराला प्रदक्षिणा घालतात. आणि दिवसरात्र इथले नाम त्यांच्या कानावर पडते ते. यांना नक्कीच पुढचा जन्म मानवाचा आहे, हे मी खात्रीने सांगतो."

एवढासा थेंबुटला, गजाला चिकटून हळूच गिरकी घेत मला समजावत होता.

"अगदी हेच नाम कानावर पडावे म्हणून आम्ही आसुसलेले असतो ग!  

इथल्या आसमंतात भरलेल्या या नामाला चिकटून ... नामाची छत्री घेऊनच आम्हीसुद्धा या पवित्र धरतीवर उतरतो. आणि असे समाधीमंदिरावरून ओघळताना जाता जाता महाराजांचे दर्शन झाले तर आम्ही कृतकृत्य होतो. आमचा इथून पुढचा प्रवास अगदी उत्तमरीतीने होतो. त्या प्रत्येक क्षणात, प्रत्येक जन्मात मग महाराज सोबत करतात.

"तुमचा पुढचा प्रवास म्हणजे? तुम्हीत तर इथून पुढे, ओहोळ, पाट, नदी, असे करत समुद्रालाच मिळणार ना?" मी विचारले.

"इतके सोपे नाहीये ग ते!" थेंबुटला कळवळून उत्तरला. 

"असं बघ, आता इथून पुढे आम्ही खाली जे पाण्याचे पाट वाहात आहेत तिथून वाहत जाऊन ध्यानमंदिराजवळील सांडव्याला जाऊन मिळतो. तिथून पुढे माणगंगेला. 

माणगंगा पुढे पंढरपूरच्या पुढे भीमा नदीला मिळते. भीमा नदी दक्षिणेत वाहत जाऊन पुढे कृष्णेला मिळते. आणि नंतर कृष्णा नदी पुढे कुठेतरी बंगालच्या उपसागराला मिळते. इथे मिळालेल्या या नामाला चिकटूनच आम्ही पुढे वाहत जातो. पुढे बंगालचा उपसागर अरेबियन समुद्राला मिळतो. तिथून जर पुढे आम्ही महासागरात गेलो तर भरकटत राहतो. दगडावर पडलो तर ते सुप्त चैतन्य, झाडाने शोषून घेतले तर त्यातले अर्ध विकसित चैतन्य आणि मनुष्यरूपातील पूर्ण विकसित चैतन्य अश्या सगळ्या रूपांमध्ये महाराज आपल्याला सोबत करतात. 

तिथेही आम्ही फक्त या नामामुळे... नामाला चिकटून राहिल्याने तग धरून राहतो. समुद्रातल्या एखादी जिवाच्या शरीरात प्रवेश मिळाला तर ठीक नाहीतर समुद्राच्या तळाशी जाऊन बसावे लागते. तिथेही महाराज आमच्या बरोबर असतातच. कारण "जिथे नाम तिथे मी " असे महाराजच सांगून गेलेत. 

बरं, जूनमध्ये तुमचे नैऋत्य मोसमी वारे सुरु झाले की , समुद्राच्या पाण्याची वाफ, मग ढग आम्हाला वाहवत नेत केरळकडून आम्हाला भारतात प्रवेश मिळतो, खरे. पण खूपच कमी जणांना या गोंदवल्याच्या भूमीपर्यंत पोहचता येते.  म्हणूनच आमचा आटापिटा असतो की इथे येऊन एकदा तरी महाराजांची दृष्टी आपल्यावर पडावी! पण तसा गोंदवल्यात पाऊस कमी पडतो ना.. इथे येण्यासाठी पूर्वसुकृतच असावे लागते !

हां, आता एखाद्या तृषार्त जीवाने प्राशन  केलं अन् त्याच्या शरीरात प्रवेश झाला कि तिथून आम्हाला देह मिळतो मग अगदी एकपेशीय असो की बहुपेशीय..  चतुष्पाद, द्विपाद करत  किडा मुंगी पासून, सरपटणारे प्राणी, मोठे प्राणी या सर्वांमध्ये फिरत फिरत ८४ लक्ष योनी पार केल्या की मनुष्य जन्म मिळतो.. ते ही काही पूर्व सुकृत असेल तर!!

या सर्व रूपांमध्ये, जन्मांमध्ये महाराज आपल्याला सोबत करतात....नव्हे नव्हे एकेक जन्म उद्धाराकडे नेत असतात आपला! अगदी बखोटीला धरून ओढतच आणतात म्हण ना! 

 एकेक जन्म टाकत जेव्हा शेवटी मनुष्य जन्म मिळतो तेव्हा ज्याप्रमाणे पाणी ज्या भांड्यात ठेवावे त्याचा आकार धारण करते त्याप्रमाणे त्या व्यक्तीची सगळी कर्मबंधने आपल्याला लागू होतात. इथसुद्धा आपण गप्प बसत नसतो. पुन्हा पुढच्या जन्माची तयारी करत असतो.

 आता नाम घेऊन सद्गती प्राप्त करायची की पुन्हा दुर्गतीकडे जायचं, हे मात्र आपल्या हातात असतं. हा एकच जन्म असा आहे की यात वाणी दिलीय आपल्याला. मुखाने नाम घेऊ शकतो.  चांगले वाईटाची जाण असते.

मी चांगलीच  हादरले. आता माझ्या डोळ्यासमोर मागच्या पन्नास वर्षांचा भूतकाळ नाचू लागला. सगळे हिशोबाचे आकडे दिसू लागले. किती विकारांच्या मागे लागलो, मायेत कितीदा गुरफटलो, कितीदा  भरकटलो.. याची गणतीच नाही. 

डोकं सुन्न झाले.  डोळ्यात पाणी आले. कळवळून महाराजांना विनंती केली," नाही महाराज नाही, आता तुम्ही दिलेले नाम फक्त.. इतर विषय नकोत. पुन्हा ते लाखो जन्म नको. आणि इतक्या जन्मांची प्रतीक्षा ही नको. फक्त आपल्या पायाशी विसावा द्या आता." 

समाधी मंदिरात आता विष्णुसहस्त्रनाम समाप्त होण्याच्या मार्गावर होते..  श्लोक सुरु होता, " आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छति।।  श्री गोपालकृष्ण भगवान कि जय! 🙏🏼

... समाधीवर असलेल्या मंदिराच्या काचेच्या दरवाजाआडचा 'केशव' मिश्कीलपणे हसत होता.

जय श्रीराम!🙏🏻

~ इती लेखनसीमा🙏🏻

~ महाराजकन्या नयना 🙏🙏

मानस - धुळवड गोंदवल्याची

 मानस - धुळवड गोंदवल्याची 

स्थळ: गोंदवले
दिवस : फाल्गुनाचे. होळीपौर्णीमेचा दुसरा दिवस!
वेळ : साधारण पहाटे पावणे पाचची
श्रीमहाराज तसे नेहमीप्रमाणे ब्राम्ह मुहूर्तावरच उठले होते. आन्हिक आटोपून थोडा वैखरीने नामजप करून पुन्हा थोडे आडवे झालेत...आदल्या दिवशीच्या दगदगमुळे! अर्थात आत हृदयात अखंड नाम सुरू आहेच! आदल्या दिवशी पौर्णिमा, अन् होलिकादहन! इतके लोक गोंदवल्यात येणार! सगळ्यांची व्यवस्था लावणे. त्यात सध्या पाणी टंचाई! स्वयंपाकघर बांधकामासाठी काढलेले. बराच मोठा व्याप. सगळीकडे देखरेख करावी लागते.
पावणे पाचची घंटा होते आणि समाधी मंदिरात भूपाळ्या सुरू होतात.
" उठी उठी बा महाराजा.."सुरू होते आणि महाराज मनोमन त्यांच्या लाडक्या रघुराईला नमस्कार करत , "जानकी जीवन स्मरण जय जय राम!!! हो हो उठलो रे बाबा!" अस म्हणत उठून बसतात!
"शिंचा.. हा डावा गुडघा जरा जास्तच कुरकुर करू लागलाय" असे स्वतःशीच पुटपुटत गुढग्यावर हात ठेवत उठून बसतात. जरा दम खात नाहीत तोवर,"उठी उठी सद्गुरूमाय..." अशी आळवणी सुरू होते.
"हो हो, येतो रे बाहेर! रामाच्या काकड्याला जायचं आहे ना!! " अस म्हणत राममंदिराकडे निघतात. रामाचा काकडा करून आल्यावर, इकडे समाधीवरच्या गोपाळकृष्णाला लोणीसाखरेचा प्रसाद दिला गेला आहे. काकडा करून उपस्थित मंडळी लोणी साखर प्रसादासाठी बाहेर रांग लावत आहेत. काही मंडळी समाधी मंदिराच्या सभागृहातच बसून पंचपदी सुरू होण्याची वाट बघत आहेत. दिवस थोडा वर येतो, वातावरणात उष्मा वाढू लागला आहे. "दीन हाका मारी.. पासून सुरु झालेली पंचपदी समाप्त होत आली आहे आणि मंदिरात आता 'धनी दयाळा.. गोविंदा' सुरु झाले. पुरुष मंडळी तल्लीन होऊन 'वारकरी फुगडी' घालत आहेत. श्रीमहाराज योगसमाधीमध्ये प्रसन्न मुद्रेने बसले आहेत, मधेच धनी दयाळा..ये धावत परमानंदा' ऐकून डोलत आहेत.
इतक्यात... समाधीच्या वर असलेल्या गोपाळकृष्णाच्या मंदिरात काहीतरी हालचाल.. काहीतरी चुळबुळ सुरु झाली आहे... कोणाच्याच नजरेत आली नाहीये अजून! पाहता पाहता हालचाल वाढली, इतका वेळ मान तिरकी करून पाहत असलेल्या कृष्णाने एकावर एक असलेला पाय सरळ केला अन् अलगद आपली मान सरळ करून खांद्यावर असलेला शेला कंबरेला बांधला आहे. आणि त्यात आपली बासरी खोचून मस्तपैकी हात वर करून , "खूप वेळेपासून एका पायावर उभे राहून अवघडलो बुवा "असे म्हणत आळस दिला आहे.
डोक्यावर मयुरपूच्छ खोचलेला जरीचा फेटा , कपाळावर चंदनाचे उभे गंध, अंगात निळाशार अंगरखा त्यावर वक्षावर रुळणारे रत्नजडीत माळा अन् त्यात कौस्तुभ मणी, कंबरेला पितांबर .. त्यावर रत्नजडीत मेखला.. पायात चांदीचे तोडे.. असे हे सावळे रूप बघता बघता चौथर्यावरून उतरून .. दार उघडुन बाहेरही आले. ...अन् आता पायऱ्यांवरून उड्या मारत तो ही यांच्यात सामील झाला.
कल्पना करा... ते साक्षात परब्रम्ह असे पायऱ्यांवरून पीतांबराच्या निऱ्या सांभाळत उड्या मारत खाली येतंय.. काय दृश्य असेल ते! आणि उपस्थित सर्वांच्या आनंदाला, उत्साहाला उधाण आले. काय गडबड झाली म्हणून श्रीमहाराजांनी योगसमाधीतून डोळे उघडले आणि आता मात्र महाराजांना राहवले गेले नाही. प्रसन्न मुद्रेने आपल्या योगसमाधीतून बाहेर आले आहेत.
कृष्णाने त्यांच्या हाताला धरून फुगडी खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला एका हाताची, नंतर दोन हातांची केव्हा झाली समजले ही नाही. आसमंतात सगळीकडे उल्हास भरून राहिला आहे. आणि एक क्षण असा आला हा कान्हा प्रत्येकाबरोबर फुगडी खेळतांना दिसू लागला आहे. प्रत्येकाला वाटते आहे.. माझ्यासोबत हे लडिवाळ रूपच आहे.
बरं, याने अशी काय जादू केली की इथे दुसरा पुरुष कोणी नाहीच. सगळ्याच गोपी. आणि खाली पाहावे तर पावले मात्र एकाचीच दिसत आहेत.
महाराज तर आज महाराज राहिलेच नाही. त्यांना आनंदाचे भरते आलेय. डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत आहेत. सर्वत्र प्रेमाचा पूर वाहतोय. गिरकी घेता घेता जरा जोरात फुगडी झाली की महाराज, सद्गदित स्वरात म्हणत आहेत," अरे कान्हा, अरे घननीळा, अरे शामसुंदरा... हळू रे जरा.. केवढी जोरात गिरकी घेतोय! आता काय म्हणावे, या नटखट कान्हाला! बघ, तुझा शेला सुटला रे... मुकुट सांभाळ हो, तिरपा होतोय. आणि समोरून? समोरून फक्त निरागस बालकाच्या खळखळून हसण्याचा आवाज!
आता 'गोविंद राधे गोविंद" टिपेला सुर पोहचला आहे. सगळे जण त्या श्रीहरीच्या भोवती नाचू लागले. हसत खेळत कंबरेवर हात ठेऊन उंच उंच उड्या मारत आहेत.
शेवटी खूप खूप मनसोक्त खेळून दमलेला कान्हा हळूच आपल्या शेल्याने चेहऱ्यावर आलेले घर्मबिंदू पुसत खाली बसतो. सगळे अवतीभवती कोंडाळे करून बसतात.
महाराज गुडघ्यावर हात ठेवून उठतात आणि म्हणतात, "कान्होबा, आता सर्वांनी नाश्ता करा बरं.. माझ्या बुवाला सांगतो तुम्हाला चुरमा लाडू आणि दूध काला द्यायला.
त्याच्या हातचे चूरमा लाडू खाऊन तर बघा... उगाच नाही ही त्यांना लाडू बुवा म्हणत!"
बुवा लगोलग प्रसाद बनवायला घेतात. अवघ्या काही वेळातच प्रसादाची पाने येतात. आज सर्वांनी समाधी मंदिरातच बसून प्रसाद घ्या बरं!
सगळे गोलाकार बसतात.. केळीच्या पानावर द्रोणामध्ये दूध काला, केळी, लाडू वाढायला महाराज स्वतः जातीने उभे आहेत. ब्रम्हानंद बुवांनी आणलेल्या कढईतून प्रसाद वाटत आहेत.
आणि कान्होबा? तो तर विचारूच नका..
दामा, सुदामा, श्रीदामा, वसुदामा, किंकिणी, सुबल, या सगळ्या बालपणीच्या सवंगड्यांमधे इतका रंगलाय कि समोर काय वाढलेय तिकडे लक्ष नाहीये. महाराज हळूच त्याच्या पानाजवळ येतात," आता थोरले राम मंदिरात जायचंय बरं आपल्याला..तिथे रंग खेळायचेत ना? थोरले रामराया केव्हापासून तुमची वाट बघत आहेत. लवकर लवकर आटपा.." म्हणत महाराज स्वतः कान्हाला घास भरवत आहेत. कान्होबा आता शहाण्यासारखं मान डोलवत खातोय. मनापासून आवडलाय त्याला दूध काला आणि चुरमा लाडू.आणखी मागून मागून घेतोय. आता समाधानाने पोटावर हात फिरवत हात धुवायला उठतो. श्रीमहाराज, स्वतः त्याच्या हातावर पाणी टाकायला उभे राहतात.
कान्हा त्याचा सुंदर, नाजूक फुगीर गुलाबी तळहात पुढे करतो.. महाराज हळुवारपणे त्याचे हात धुवून देतात आणि त्यांच्याच धोतराच्या सोग्याने त्याचे हात, नाजूक जिवणी पुसून देतात.
सगळे जण समाधी मंदिराच्या बाहेर निघत नाहीत तोवर राधामाई तिच्या ललिता, विशाखा, चंपकलता, इंदूलेखा आदी सख्यांसह पहिल्या प्रवेशद्वारावर पोहचली आहे, अशी वर्दी येते. मग काय कान्हा अपार आनंदाने नाचू लागतो. महाराज स्वतः ब्रम्हानंद बुवा, रामानंद ,आनंदसागर , भाऊसाहेब महाराज, प्रल्हाद महाराज आपापल्या मंडळींना घेऊन स्वागतासाठी निघालेले आहेत. आलेल्या समस्त स्त्रीवर्गाला, आईसाहेब, जिजीमाय आणि गोंदवल्यातील स्त्रियांकडून ओवाळण्यात येते. हारतुरे घालून वाजत गाजत राधाराणी आत येतात. त्यांना स्थानापन्न करून ब्रम्हानंद बुवा सर्वांना गोड केशर गुलाबअर्क मिश्रीत थंडगार दूध देतात. . अरेच्चा पण या सर्वांचा केंद्रबिंदू कान्हा कुठे आहे? तो तर केव्हाच या मंडळीतून सटकलेला असतो. त्याला आता राधाराणीची गंमत करण्याची लहर आलेली असते. . हळूच आपल्या सवंगड्यांना विविध रंगाच्या बादल्या भरायला सांगून स्वतः मात्र तिला चकवण्यासाठी कान्हा गोशाळेत गाईंना भेटायला गेलेला असतो. जाता जाता, तुळशी वृंदावनातून दोन तीन मंजिरी खुडून केसात लावायला विसरत नाही. राधाराणी आल्या आल्या सर्वांना त्याचा ठावठिकाणा विचारते. कुठे लपला बरं हा?म्हणून सखयांसहित शोधायला सुरुवात करते. स्वागतकक्ष कार्यालय, पुस्तक विक्री केंद्र, कोठीघर, अन्नपूर्णा स्वयंपाकघर, ब्रम्हानंद मंडप, चिंतामणी, प्रल्हाद, आनंदसागर सगळ्या सगळ्या इमारती बघून झाल्या. सगळीकडे एकच शोध सुरु होतो. अगदी तिकडे सांडव्यावरचे ग्रंथालय, आनंदसागर, रामानंदांचे समाधीस्थळ ही पाहून झाले. शेवटी थकून राधामाई आपल्या गोऱ्या गुलाबी कपाळावरचा घाम पुसत आईसाहेब मंडपात येऊन बसलेली आहे.
आणि तेवढ्यात...हो तेवढ्यात, बासरीचे मंजुळ सूर गोशाळेकडून येऊ लागतात.
श्रीमहाराज तिला हसत हसत गोशाळेकडे बघून नजरेनेच खुणावतात. कान्हा या गोधनाशिवाय राहू शकेल काय?
सगळे त्याच्या ओढीने तिकडे धाव घेतात. तर कान्हा आपला गाईंच्या घोळक्यात तल्लीन होऊन एक पाय दुसऱ्यावर टाकून बासरी वाजवत उभा आहे. सगळ्या गायी त्याच्याकडून लाड करवून घेत आहेत. आता बासरी पुन्हा कंबरेच्या शेल्यात खोचून तो गायिंवरून मायेने हात फिरवतोय .
आता राधामाईला हि त्याची गंमत करण्याची लहर येते. गुपचूप मागून जाऊन ती त्याचे डोळे झाकते. तिचे हात काढत, हसत हसत हा नटवर हसत हसत तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणतो," ए वेडाबाई,तुला काय आज ओळखतो मी? युगानुयुगे आपण सोबत आहोत. तू चौकात असतांना तुझ्या नुपूरांच्या आवाजानेच मी ओळखले होते की माझी राधा येतेय. माझ्याशिवाय कशी राहू शकशील तू?' दोघेही खळखळून हसतात.
अरे, बाहेर मंडळी आपली वाट बघत आहेत. असे म्हणत राधा त्याला हाताला धरून ओढतच बाहेर आणते.
आणि अचानक सर्व बाजूंनी पिचकाऱ्यानी रंगाच्या पाण्याची बरसात आणि रंगांची उधळण त्यांच्यावर सुरु होते. कान्हाचे सवंगडी सर्वांवर पाण्याचा मारा करत आहेत. आता सगळी सूत्र कान्हा हातात घेतो. आणि एक पिचकारी घेऊन राधेच्या मागे पळू लागतो. राधा पूर्ण परिसरात पळतेय ..तिच्यामागे पिचकारी घेऊन कान्हा. .. अगदी विहंगम दृश्य. शेवटी कान्हा राधेला भिजवतोच. राधा डोळ्यात गेलेले पाणी पुसत लटक्या रागाने बघते. तेव्हा तिच्या नकळत कान्हा पुन्हा सप्तरंगांची उधळण करतो.
आणि संपूर्ण आसमंत या सप्तरंगाने भरभरून जातोय. आता प्रत्येक बादलीजवळ कान्हा आणि सवंगडी उभे राहून पिचकारी घेऊन तयार आहेत.
श्रीमहाराज आणि मंडळी सर्वांना विचारण्यात येत, कोणाला कुठला रंग हवा. कोणी हिरवा, कोणी पिवळा तर कोणी निळा,,,, आपापला आवडता रंग सांगतेय. आणि त्या त्या रंगाच्या पिचकार्यानी चहूबाजूंनी त्यांच्यावर मारा करण्यात येतोय.
श्रीमहाजांची पाळी येते. महाराज म्हणतात," हे काय विचारणे झाले कान्होबा? तुझ्याच रंगात रंगू दे म्हणजे झालं. आणि असा रंग लागू दे कि या जन्मात काय सृष्टीच्या अखेरस्तोवर निघणार नाही." कान्हा हातातली पिचकारी टाकून श्रींना घट्ट मिठी मारतो, हेच उत्तर कान्हाला अपेक्षित होते ना?
सगळे रंग खेळून दमलेले आहेत. श्रीमहाराज सर्वांना नवीन वस्त्र, दागदागिने घालण्यास देतात.सालंकृत तयार होऊन थोरले रामाच्या आमंत्रणाला मान देऊन तिथे भोजन प्रसादाला जायचं आहे ना!
ब्रम्हानंद बुवांच्या या मार्गदर्शनाखाली थोरल्या राम मंदिरात भोजन प्रसादाची चोख व्यवथा लागलेली आहे.
सगळे सजून धजून निघतात आणि मोगऱ्याच्या हारांनी सजलेली पालखी येते. त्यात राधा- कृष्णाला अत्यंत आदराने बसवून, स्वतः महाराज त्या पालखीचे भोई होतात.
सूर्य चांगलाच डोक्यावर आला आहे. पायाला चटके बसत आहेत. महाराज त्याची पर्वा न करता "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात पालखी उचलतात. पण बुवांना महाराजांचा हा स्वभाव माहित आहे. त्यांनी आधीच व्यवस्था केलेली आहे. पालखी समोर पटापट पाट मांडले जातात,... मागचे उचलून पुढे ठेवले जातात.
श्रीराम जयराम जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी' च्या गजरात पालखी पुढे जातेय.
थोरले राममंदिराच्या आवारात पालखी येते.
संपूर्ण मंदिराच्या रस्त्यावर घरोघर स्त्रियांनी सुवासिक जल शिपंडून रांगोळ्या,फुलांच्या रांगोळ्या घालून परिसर सजवला आहे. आज रामरायाकडून रंग लावून घ्यायचा आहे भई!
सर्व स्त्रीपुरुष नटूनथटून मंदिरात रामाच्या दर्शनाला येत आहेत. परिसर फुलून गेलेला आहे.
आणि जरीकाठ असलेले पांढरीशुभ्र वस्त्र परिधान केलेले रामराया, सीतामाई , सिंहासनावर विराजमान आहेत.आणि आज रामाने चक्क कृष्णाचा वेश परिधान केला आहे.. डोक्यावरच्या फेट्यामधे मयूरपंख खोचलेले, चेहऱ्यावर कृष्णसारखे नटखट भाव, कंबरेला शेला,अश्या वेषात तर लक्ष्मण नेहमीप्रमाणे रामाच्या बाजूला पण थोडं मागे , अन् नेहमी समोर उभा असलेला मारुतीराया आजही तसाच नम्रपणे झुकून रामाच्या बाजूला उभा आहे.
समोर विविध रंगाची ताटे, फुलांची ताटे, मोगऱ्याच्या फुलांच्या वेण्या ठेवलेल्या आहेत.
दर्शनास येणाऱ्या प्रत्येक पुरुषास रामराया हळूच समोरच्या ताटातील रंग उचलून गालाला लावतात. काय करणार ते पडले मर्यादा पुरुषोत्तम ना!
समोर स्त्री असेल तर सीतामाई तिच्यावर फुले उधळतात आणि मोगर्याचा गजरा प्रत्येकीस भेट देत आहेत.
लक्ष्मण हातातील अत्तरदाणीने प्रत्येकावर गुलाबजल शिंपडत आहेत. सम्पुर्ण मंदिरात मोगरा, गुलाब, निशिगंध, बकुळ अश्या सुवासाचा दरवळ आहे.
श्रीमहाराज राधाकृष्णाला घेऊन येत असल्याची वर्दी आधीच रामरायाला मिळाली आहे. आज प्रथमच विष्णूचे सातवा आणि आठवा अवतार यांची कलियुगातली भेट आहे. रामाला आनंदाचे भरते आले आहे.
स्वतः रामराया सीतामाई उठून उभे राहिले आहेत.
रस्त्यापासून मंदिरापर्यंत फुलांच्या पायघड्या अंथरल्या आहेत. राधा-कृष्ण हातात हात घालून हळुवारपणे पावले टाकत त्यावरून येतात. मंदिरात प्रवेशकर्ते झाल्याबरोबर तुतार्यांच्या आवाजाने त्यांचे स्वागत केले जाते .. आणि हसत हसत सीतामाई, रामराया सामोरे येतात. चौघांची गळामिठी होते. हे अभूतपूर्व दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावतात.
कान्हाचा गालगुच्चे घेऊन रामराया मोठ्या भावाप्रमाणे ( हो मोठ्या भावाप्रमाणेच - सातवा अवतार ना!) , इतकी युगे गेल्यावर कलियुगात , गोंदवल्यात भेटायची तुझी ईच्छा होती, होय ना रे कान्हा? कान्हा हसत हसत त्यांचे बोट धरून चालू लागतो. कान्हाला हाताला धरून सिंहासनावर ते आपल्याजवळ बसवतात. सीतामाईही राधेला आपल्या शेजारी बसवतात.
रामराया कान्हाच्या गालाला हळुवारपणे गुलाबी रंगाने बोटे उमटवतात. तर सीतामाई राधेच्या केसात गजरा माळते.. हे दृश्य पाहून सगळेच सद्गदित होतात. श्रीमहाराजांनी तर यांना कुठे ठेवू न कुठे नको असे झालेय!
पाद्यपुजनाची तयारी होते. रत्नजडीत चौरंग मांडले जातात.. त्यात सुवर्णपात्र ठेवून महाराज आईसाहेबांसोबत सपत्नीक एकेकाचे चरण अलगद पात्रात ठेवून हळुवारपणे आधी शुद्ध जलाने, धुत आहेत. हळुवारपणे आपल्याच कफनीला पुसून परत पाय ठेवण्याच्या , रेशमी कपडा असलेल्या मंचावर ठेवत आहेत. नंतर दूध ,पंचामृत व इतर सुगंधी द्रव्याने सिद्ध केलेल्या जलाने
श्रीमहाराज आणि मंडळी या चौघांचे चरण प्रक्षालन करत आहेत.
फार हृद्य सोहळा आहे हा! हे पाहताना आपण आपल्याही नकळत डोळ्याच्या कडेला जमा झालेले पाणी पुसून घेतोय.
समोर बसलेले चौघेही अत्यंत प्रेमाने श्रींची ही लगबग बघत आहेत तर प्रेमातिशयाने श्रींच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत.
आता श्रींनी चौघांच्या चरणायुगुलावर सुवासिक चंदनाने स्वस्तिक काढले आहे,त्यावर हळदीकुंकु वाहिले आहे. सोनचाफाची फुले वाहिली आहेत. आणि आता श्री महाराज सर्वांपुढे लोटांगण घालत आहेत.
सभोवताली असलेली सगळी मंडळीही नमस्कार करत आहेत.

आतून महाराजांचे लाडके ब्रम्हानंद बुवांनी स्वयंपाकघरातून भोजन प्रसाद तयार असल्याची वर्दी दिली आहे.. पाठोपाठ सुग्रास अन्नपदार्थांचे सुवास दरवळू लागला आहे. पाने, पाट पाणी मांडले जाऊ लागले आहे.. समया, अगरबत्ती, पानाभोवती रांगोळ्यांनी सगळे भोजनगृह सजले आहे.
काय काय आहे आज भोजनाला?
सुवासिक आंबेमोहर तांदुळाचां भात, वरती पिवळे धम्मक वरण, वरून साजूक तुपाची धार, काजू घालून केलेला मसाले भात,दहीभात, पिस्ता, बदाम, घालून केलेली गव्हाची खीर , पुरणाचे कडबु, बिरड्याची उसळ,कोशिंबीर, मिरचीचे पंचामृत,दहीवडे , बेसन लाडू , गुलाबजाम, जिलेबी, घेवर, मैसुरपाक, मालपुवा, अमसूलाचे सार... अन् अजून काय काय!आज बुवांच्या पाककौशल्याला विलक्षण बहर आलेला आहे.
श्रीमहाराज सर्वांना आग्रहाने एकेकाला हाताला धरून आणून बसवत आहेत.
"जय जय श्रीराम, जय जय श्रीराम " च्या जयघोषात वाढपी वाढत आहेत. अन् वदनी कवळ घेता.. सुरू होते!श्लोक संपल्यावर सगळे भोजनास सुरुवात करतात. स्वतः महाराज बेसनलाडू घेऊन तर बुवा कडबू घेऊन एकेकाला आग्रहाने वाढत आहेत.बुवा मागोमाग कडबुवर साजूक तुपाची धार सोडत आहेत.
रामराया सीतामाई, राधा कृष्ण सगळे हास्यविनोद करत भोजनाचा आस्वाद घेत आहेत. सर्व कसे तृप्त तृप्त दिसत आहेत! पंक्तीवर पंक्ती उठल्या!
भोजन आटोपले, रामराया कान्हा विडा चघळत शतपावली करत आहेत, तर सीतामाई, राधामाई तक्क्यालोडला टेकून एकमेकींचे क्षेमकुशल पुसण्यात व्यग्र!
आता राहिलेली मंडळी भोजनाला बसली.
श्रीमहाराज आणि बुवा अजून जेवले नाहीत बरं! अगदी शेवटची व्यक्ती जेवेपर्यंत महाराज कसे जेवतिल?
तरीही बुवांनी महाराजांना या पंक्तीला जेवायला बळजबरी बसवलेच!
श्रींचे जेवण ते किती! थोडफार खाऊन महाराज उठतात. या चौघांच्या वामकूक्षीची व्यवस्था लावायला हवी ना?
श्रींच्या शयनकक्षात रामराया अन् कान्हाची व्यवस्था होते. तर आईसाहेबांच्या शयनकक्षात सीतामाई, राधामैय्याची!
महाराज स्वतः जातीने लक्ष घालत आहेत.
रघुराई, कान्हा दोघे डाव्या कुशीवर पहुडतात.. अन् महाराज हळूच कक्षात प्रवेश करतात. हळुवारपणे रामाच्या अन् कृष्णाच्या पायाला तेल लावून चोळत आहेत.
"देवा, किती खेळलात आज.. पाय दुखले ना! " असे मनोमन पुटपुटत दोघांना झोप लागेस्तोवर महाराज तिथे बसून आहेत. मग अलगद त्यांचे पाय खाली ठेवून, दरवाजा बंद करून बाहेर येतात.
महाराज बाहेर येऊन मंदिरात ठेवलेल्या त्यांच्या कोचावर बसतात. आज त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान विलसते आहे.
या सर्वात आपण कुठे आहोत? आपण त्यांच्या पायाशी बसून हे सगळ 'याची देही याची डोळा' बघायला मिळाल्याच्या आनंदात... महाराजांचे आभार मानत... त्यांच्या पायावर डोके ठेवतो. अन् आपल्या डोक्याला श्रींच्या हाताचा स्पर्श जाणवतो. सद्गदित होत महाराज म्हणतात, "सतत रामनाम घे हो बाळ! नामाला घट्ट धरून ठेव. नामच तुम्हाला तारून नेणारे आहे, तुम्ही नाम घ्या... मी तुमचा हात रामाच्या हातात नेऊन देईन! "

... आणि तेवढ्यात दुरून समाधी मंदिरातून कानावर शब्द येतात, "ओम विश्वं विष्णूर्वशटकारो भूत भव्यभवतप्रभू... "

अरेच्चा, समाधी मंदिरात संध्याकाळी साडेचार वाजेचे विष्णूसहस्त्रनाम सुरू झाले वाटतं!
...किती वेळपासून आपण इथ समाधी मंदिरात बसलो आहोत कुणास ठाऊक!!

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...