जय श्रीराम!
मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक
"हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर! आपण मारलेली हाक महाराजांपर्यंत पोहचली होती.
आता तिला एकेक आठवू लागले.
***
ती एक ५५ वर्षीय स्त्री. तिला एक लग्नाला आलेली एक मुलगी आणि कॉलेजात जाणारा एक मुलगा. छान चौकोनी कुटुंब होते. करोना काळात नवरा गेला आणि हे तिघेच राहू लागले. तेव्हा तिची आईही तिला सोबत म्हणून येऊन राहू लागली होती. तसा तिचा गोंदवल्याचा अनुग्रह ४५ व्या वर्षी झाला होता. नवऱ्यानेही नंतर घेतला. राहता राहिले मुलगा मुलगी.. ते ही जरा मोठे झाल्यावर त्यांनाही महाराजांनी आपले म्हटले होते. घरात रोज संध्याकाळी दिवाबत्ती झाली की रामरक्षा, रामपाठ, रामहृदय, विष्णुसहस्त्रनाम, म्हणून नंतर कान्होबाला, रामरायाला , महाराजांना दूध देऊन आरती केली जायची. मुलांनाही ही सवय लागली होती. रोज एक तास सगळे आपापल्या वेळेनुसार जपाला बसायचे आणि रात्री एकत्रित नामसंकीर्तन करायचे. हा रोजचाच परिपाठ होता. पण नवरा गेल्यावर तिचे नाम जरा जास्तच उत्कटतेने होऊ लागले होते.
गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत झाल्याने तिला कालच ज्युपिटर हॉस्पिटलला ICU मध्ये ऍडमिट करण्यात आले होते. नाका-तोंडात नळ्या घालण्यात आल्या होत्या. डॉक्टर मिनिटामिनिटाला पल्स चेक करत होते. एकीकडे मॉनिटर, इकेजी मशीन ची टिक टिक ऐकू येत होती. एकूणच भयावह वातावरण झाले होते.
"आई आई ग! डोक्यातली कळ सहन होत नाहीये". ती दोन्ही हातांनी डोके दाबून धरत कण्हत होती. सलाईनमधून पेन किलर देऊनही कळा थांबत नव्हत्या. आई तिला शांत करत होती. "बाळ, नाम घ्यायला सांगितले आहे ना महाराजांनी. मनातल्या मनात नाम चालू ठेव बरं ! काही होणार नाही तुला. महाराज आहेत पाठीशी, हे बघ तुला महाराजांचा अंगारा लावते. आणि तोंड उघड बघू जरा.. हे समाधीचे तीर्थ आणले आहे , ते देते. !
डायबेटीस असल्याने मेंदूतला रक्तस्त्राव थांबत नव्हता.अन त्यामुळे मेंदूला सूज आलेली होती. दोन डॉक्टर, १ नर्स ची टीम तिच्याभोवती थांबली होती. त्यांनी तिच्या आईला बाहेर थांबायला सांगितले होते. तिची मुलगी, मुलगा ही बाहेर उभे होते.
"काय बरे आई म्हणत होती? "श्रीराम जयराम जय जय राम" , महाराज " .... आणि डोक्यात एकच जीवघेणी कळ उठली. भोवळ डोळ्यापुढे अंधार दाटला. मशीनवरची टिकटिक एकसलग येऊ लागली. आणि झालं.. डॉक्टरांची पळापळ सुरु झाली. "Sister, ward boy .. keep OT ready! Check BP First ! आपल्या रक्तपेढीतून बी पॉजिटीव्ह रक्ताच्या ६ बॉटल्स लगेच मागवून घ्या. स्ट्रेचर आणा ताबडतोब! "त्यांनी लगोलग ऑपरेशनचा निर्णय घेतला. चार तास ऑपरेशन चालले.
ऑपरेशन थिएटर बाहेर तिची आई, मुलगा मुलगी तिघेही महाराजांचा धावा करत जप करत बसले होते. थोड्याच वेळात मुख्य डॉक्टर बाहेर आले. ' हे बघा..आम्ही आमच्या लेव्हलला प्रयत्न केलेत पण प्रमाणाबाहेर रक्तस्राव होऊन ब्लड क्लॉटिंग झाल्याने आणि ब्लड शुगर लेव्हल लो झाल्याने she is now in deep unconsciousness state . थोडक्यात तिचा मेंदू झोपी गेला आहे. हा पिरियड म्हटले तर दोन दिवसाचा ही असू शकतो आणि म्हटले तर ३ महिनेही ... अन म्हटले तर अनेक वर्ष ही जाऊ शकतात.
दोघा मुलांवर जसे आभाळ कोसळले.. तिची आई मटकन खाली बसली. मुलगी आज्जीच्या कुशीत येऊन हुंदके देत रडू लागली. मुलगा सुन्न होऊन शून्यात नजर लावून बसला.
*
डोळ्यापुढे अंधारी आल्याबरोबर तिला वेदनांची जाणीव नष्ट झाली. या स्थितीत खूप वेळ गेल्यावर तिला आपला देह पिसासारखा हलका झाल्याची जाणीव होऊ लागली. संवेदना नव्हत्याच.. हा पिसासारखा देह आता तरंगत अंतराळात विहरु लागला होता. इथून जाता जाता तिला तिची हतबल होऊन बसलेली आई दिसली, रडणारी गोजिरवाणी लेकरे दिसू लागली ... काडी काडी जमवून केलेला संसार, कित्येक वर्ष घराचे कर्ज घेऊन नुकतेच आता कर्ज फिटून पूर्णपणे तिच्या नावावर झालेला तिचा आटोपशीर फ्लॅट, हे सगळं सगळं दिसू लागले. इथून निघताना हे सगळे इथेच सोडून जायचे असते. बरोबर काहीही न्यायची मुभा नाही. हो ! नाही म्हणायला एक गाठोडे तिच्या पाठीला बांधून दिल्यासारखे वाटले. चाचपून पाहिले तर त्यात आजवर केलेले नाम आढळले. " .... इथून फक्त नामच न्यायची परवानगी आहे तर,"ती मनाशी उद्गरली.
दोन आडदांड काळेकभिन्न दूत आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण अंधाऱ्या, खोल, अश्या अंत नसलेल्या भुयारातून जात आहोत.. या स्थितीत किती काळ गेला कुणास ठाऊक. अचानक गुहेच्या तोंडाशी डोळे दिपतील असा लख्ख प्रकाश दिसू लागलाय. खूप वेळ अंधारातून चालल्याने अचानक आलेला हा प्रकाश डोळ्यांना असह्य होतोय.. त्याची सवय व्हायला वेळ लागेल असे उगाचच तिला वाटून गेले. त्यामुळे बाजूचे दोन्ही अस्तित्वाच्या चेहर्यावर प्रखर प्रकाश आल्याने तेही दिसत नाहीयेत.
अचानक एक झटका लागावे तसे एका सिंहासनाच्या समोर आपल्याला उभे केलय. सिंहासनावर बसलेली व्यक्ती या दोघांपेक्षा क्रूर दिसत आहे. बाजूला मोठेच्या मोठे अवाढव्य बाड घेऊन बसलेली व्यक्ती, त्या बाडमध्ये डोके खुपसून बसली आहे. तेवढ्यात ती सिंहासनाधिष्टीत व्यक्ती अगम्य भाषेत बाडधारी व्यक्तीला काहीतरी विचारते. बाड धारी व्यक्ती सगळा हिशेब मांडते. आपल्याला कळेल अश्या भाषेत सगळा पाप- पुण्याचा हिशेब सांगितला जातोय. "महाराज, सुमारे १३५० वेळा दुसऱ्याचे मन दुखावणे, १७७५ वेळा परनिंदा, २१० वेळा खोटेनाटे बोलून, लाच देऊन, दुसऱ्याचा गैरफायदा घेऊन काही मिळवणे, ५७ वेळा प्राण्यांना इजा करणे, ८५ वेळा फुकटचे घेणे अश्या गोष्टी सदरहू महिलेच्या नावावर आहे.
आता तिच्या डोळ्यासमोर संपूर्ण आयुष्याचा भूतकाळ झळकू लागला. गतायुष्यातली कर्मे लख्खपणे समोर आली.
पुन्हा तो बाडधारी त्या क्रूर दिसणार्या व्यक्तीच्या कानाला लागला. आता पुण्यकर्म किती केली आहेत त्याची यादी. १५ वेळा भुकलेल्याला अन्नदान केले, २२ वेळा वृद्धास सहकार्य केले, दरवर्षी मन्दिरात दानधर्म, आणि नामजप केलेला आहे. वयाच्या ४५व्या वर्षी सद्गुरूंचा अनुग्रह ... रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे.
तेवढ्यात एक दूत सिंहासनाधिष्टित व्यक्तीशी बोलताना ऐकू येते," महाराज, वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे. सिंहासनाधिष्ठित व्यक्ती ताडकन उठून तिथेच नमस्कार करते. आणि विचारते, काय निरोप आहे?
आणि ते दोघे त्यांच्या कानाला लागतात. पुन्हा अगम्य भाषेत खूप वेळ बातचीत झाल्यावर, सगळ्या गोष्टीचा उहापोह झाल्यावर मग ते निर्णयावर येतात आणि तिला जवळ बोलावून म्हणतात, " हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर! आपण मारलेली हाक महाराजांपर्यंत पोहचली होती.
"जी महाराज ' एवढेच अस्पष्टसे तिच्या तोंडून उद्गार निघाले.
तरीही आम्ही तुला तुझ्या नामस्मरणाच्या पुण्यबळावर एक संधी देत आहोत. पृथ्वीवर जाण्यापूर्वी तुझी काही इच्छा आहे काय? त्यानुसार जन्म मिळेल. नसेल तर तुझ्या उर्वरित कर्तव्यपूर्तीची संधी म्हणून आहे त्याच देहात परत जावे लागेल. एका लोकांतून दुसऱ्या लोकात जाताना आत्म्याकडे इच्छा विचारतात आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.
" मला माझ्या सद्गुरूंना परमपूज्य ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांना भेटण्याची इच्छा आहे. " ती एवढेच बोलू शकली.
यावर पुन्हा त्यांची अगम्य भाषेत चर्चा झाली. तिला सिंहासनासमोर आणण्यात आले. 'हे बघ, तुझे सद्गुरू येथून अंतराळात खूप दूरवर आहेत. त्यांना भेटण्याइतकी पुण्याई तुझी नाही. फक्त एक करू शकतो... त्यांनी पोह्चवलेले १३ जीव .. जे ज्येष्ठ शिष्योत्तम होते अश्या साधकांशी आम्ही तुझी भेट घडवू शकतो. फक्त ६० विपळे.
"विपळे म्हणजे?' तिने उत्सुकतेने विचारले.
"इथे काळाची परिमाणे वेगळी आहेत. तरीही सांगतो. भारतीय कालमापनानुसार एक पळ म्हणजे ६० विपळे. थोडक्यात एक पळ म्हणजे तुमचे २४ सेकंद. फक्त २४ सेकंद तुला त्यांना भेटायची परवानगी आहे, मंजूर आहे?." समोरून उत्तर आले. तिने होकारार्थी मान हलवली.
"ए, कोण आहे रे तिकडे? या बाईंना इथून ३३ अब्ज प्रकाशवर्ष दूर असलेल्या 'अँड्रोमीडा सुदर्शन 'आकाशगंगेवरील 'सिग्नेट बी ' ताऱ्यावर घेऊन जा.
आपले डोळे बांधण्यात आल्याची जाणीव तिला आज पहिल्यांदाच झाली. बरोबर पुन्हा तेच दोन काळेकभिन्न व्यक्तित्व. अंधारात किती काळ अवकाशात तरंगत होते कुणास ठाऊक. काही वेळातच ते एका मोठ्या दालनात उभे होते. दोन्हीही दूत दालनाच्या दारात हात मागे घेऊन जरा अदबीने झुकून उभ्या राहिले . तिच्या डोळ्यावरचा कपडा दूर झाला. सुरवातीला धुक्यासारखे काहीतरी दिसले.. ते धुके दूर झाल्यावर तिला एकेक सूक्ष्मदेह दिसू लागले.
सगळ्यांच्या हातात जपमाळ होत्या. सगळे गोलाकार बसलेले होते. आता पूर्वी कधीतरी फोटोत पाहिलेले एकेक चेहरे दिसू लागले.
अरे बापरे, हे तर पूज्य भाऊसाहेब, त्यांच्या बाजूला पूज्य तात्यासाहेब, ... पु. रामानंद महाराज, पलीकडे पूज्य आनंद सागर महाराज, आणि चक्क पु प्रल्हाद महाराज, पु. जिजामाय, आणि इतरही श्रीमहाराजांनी अनुग्रहाचा अधिकार दिलेले असे १३ सूक्ष्मदेह तिथे होते. विशेष म्हणजे सर्व जण ध्यानमग्न होते.
तिने भीत भीतच सर्वांना " जय श्रीराम " म्हणून साष्टांग नमस्कार घातला.
"बाळ... " धुक्यातुनच एक हाक कानावर आली. पु. तात्यासाहेब बोलत होते. ती नखशिखांत हादरली.
"बाळ, आज तुझे जन्मजन्मांतरीचे नामाची पुण्याई फळाला आली म्हणून इथे येण्याची संधी तुला मिळाली. पृथ्वीवरील गुरुपौर्णिमेचा आज दिवस आणि आज श्रीमहाराज इथे आता भेट देणार आहेत. तुला जी २४ सेकंद भेटण्याची संधी मिळाली ती त्यांच्यामुळेच."
"महाराज, महाराज...तिने आर्ततेने हाक मारली.
भानावर आल्यावर "इथे पू. बुवा दिसत नाहीत"!! तिने चाचरत विचारले.
"बाळ, महाराजांच्या जवळच्या ताऱ्यावर त्यांचे वास्तव्य आहे.
श्रीमहाराजांचे वास्तव्य इथून सुदूर लोकात आहे. इथून ४२८ लक्ष महापद्म अंतरावर असलेल्या "केनिस बटू- जी या चक्राकार आकाशगंगेतील केप्लर या सूर्यमालेतील 'एपसिलोन विराट' या जीवसृष्टी असलेल्या ताऱ्यावर त्यांचे सध्या वास्तव्य आहे. आणि तिथे त्यांचा नामाचा प्रसार सुरु आहे. पृथ्वीवर जसे त्यांचे १११ वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतरचे तुमचे पृथ्वीवरचे आताचे २०२४ साल म्हणजे १११ वर्ष वास्तव्य विराट ताऱ्यावर झाले. लवकरच त्यांची तेथील अवतारासमाप्तीची तिथी आलेली आहे. त्यानंतरचे त्यांचे वास्तव्य कुठे असणार हे ते स्वतः ठरवणार आहेत. तत्पूर्वी इथे आज ते भेट देणार आहेत. तुला त्यांचे दर्शन होईलच.
आणि एकाएकी एक अत्यंत प्रखर, डोळे दिपून जातील असा आगीचा लोळ तिथे येऊन कोसळतो. त्यातून सहस्ररश्मीला लाजवेल असे तेज:पुंज , तेजस्वी,सुवर्णकांती, प्रसन्न चेहऱ्याचे असे श्रीमहाराज दिसू लागतात. कपाळावर त्रिपुंड, पीतवर्ण, उंचेपुरे, गळ्यात रुद्राक्ष माळ, पुष्पमाला, अंगात पांढरी शुभ्र कफनी , डोक्यावर गणेश टोपी असे श्रीमहाराज दमदार पावले टाकीत पुढे होतात. . सर्वजण साश्रू नयनांनी साष्टांग दंडवत घालतात.
श्रीमहाराज प्रत्येकाची जातीने चौकशी करतात, ख्याली खुशाली विचारतात. अन सर्वात शेवटी तिच्याकडे वळून म्हणतात, "माय, श्रीरामरायाने तुझ्यावर कृपा करून तुझे आयुष्य आणखी १५ वर्षांनी वाढवले आहे बरं. तू आता जोमाने नामाला लाग. तुमच्या मनात काय चालले आहे ते तुम्हाला कळत नाही, तितके मला कळते. त्यामुळे दुश्चित्त होऊ नका. तुम्ही दुश्चित्त झालात की मी इकडे अस्वस्थ होतो. भगवंताच्या इच्छेने आपला प्रपंच चालला आहे असे समजा. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा, कशाचीही काळजी करू नका,मी तुमचा भार घेतला आहे, असे समजा. मनापासून मला हाक मारा, तळमळीने नाम घ्या की मी तुमच्या जवळच आहे याचा प्रत्यय तुम्हाला येईल. तुम्ही नाम घ्या की मी तुमच्या जवळच घुटमळत असतो. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला मीच प्रेरणा देत असतो, तुमच्या कानाने मीच ऐकतो असे समजा, बरे का बाळ! "
" जी " डोळ्यांतुन ओघळणारे अश्रू ती आता थोपवत ही नाहीये.
"महाराज.... एक विनंती! ती कसेबसे उच्चारते.
महाराज, आपल्या मुखातून 'श्रीराम जयराम, जय जय राम' हे ऐकण्याची इच्छा आहे. एक माळ जप आपल्यासोबत.... !
" हो हो "सगळे जण एकमुखाने मान्यता देतात. "आम्ही तुमच्या मागून म्हणतो".
धीरगंभीर आवाजात श्रीमहाराज सुरु करतात, "श्रीराम जय राम, जय जय राम " ... श्रीराम जयराम जय जय राम.... श्रीराSSSSSम जयराSSSSSम जय जय राSSSम!
सगळे जण श्रींचे हे रूप डोळ्यात साठवून ठेवत त्यांच्यामागोमाग म्हणत आहेत. आणि श्रीमहाराज स्वतःच्या हृदयावर हात ठेवून उपस्थित प्रत्येकाकडे दोन क्षण प्रेमाने कृपादृष्टी टाकत म्हणत आहेत, "श्रीराSSSSSम जयराSSSSSम जय जय राSSSम!" जणू काही म्हणत आहेत, माझ्या हृदयातले प्रेम मी तुम्हाला देतो आहे.
***
तब्बल तीन महिने १३ दिवस महिने उलटून गेलेत तिच्या कोमात जाण्याला. हॉस्पिटलमध्ये रोज येऊन तिच्याजवळ बसून त्रिकाळ जप करण्याचा परिपाठ आजही तिच्या आईने, मुलाने, मुलीने सुरु ठेवला आहे. सकाळ संध्याकाळ रात्र असे तिघांनी वाटून घेतलेत. आजही तिची आई तिच्या शेजारी बसून तिचा हात हातात घेऊन नाडीवर बोट ठेवून जप करतेय. आणि एकाएकी तिची बोटे हलू लागल्याचे तिच्या आईच्या ध्यानात येते.
"सिस्टर.....? डॉक्टर...? इकडे या! हे बघा... " अश्या हाका मारत लगबगीने आई बाहेर धाव घेते. . पुन्हा आत लेकीजवळ येते. तिची बोटे आता हातात माळ फिरवावी तशी हलू लागली आहेत. आणि तिच्या मुखातून अस्पष्टसे उद्गार बाहेर येऊ लागलेत. आई, तिच्या तोंडाजवळ आपला कान नेते तर "श्रीराम..." असा खोल खोल गेलेल्या आवाजात अस्पष्टसा उच्चार ऐकू येतो. जाणिवेच्या प्रांतात ती परत येत होती..! आई तर आनंदाने वेडीच होते. डॉक्टर येऊन तपासतात, आणि तिथेच किंचाळतात, " Oho, Oho ... Its a miracle ... तिच्या आईला खांद्याला धरून गदागदा हलवत म्हणत आहेत, "आई, तुमचा पेशंट आज कोमातून बाहेर येतोय! त्यांच्या मुलीला, मुलाला कळवा.. ! डॉक्टर स्वतः आनंदाच्या घाईघाईने हॉस्पिटलमध्ये सर्वांना कळवायला निघतात.
ती परत आली ... पण आता भरपूर नाम घ्यायचे आणि हे उर्वरित आयुष्य नामाला वाहून घ्यायचे हा निश्चय करूनच. श्रींनी दिलेले १५ वर्षाचे बोनस आयुष्य ती आता प्रपंचाच्या इतर भानगडी मध्ये वाया घालवणार नव्हती, कारण त्यातले काहीही बरोबर येणार नव्हते, फक्त नामच बरोबर येते याची तिला खात्री पटली होती. !
एव्हाना ज्युपिटर हॉस्पिटलच्या आयसीयु मधील चार नंबर बेडवरचा कोमातला पेशंट साडेतीन महिन्यांनी शुद्धीवर येतोय ही बातमी अख्ख्या हॉस्पिटलभर वाऱ्यासारखी पसरली होती.
**
जय श्रीराम!
~महाराज कन्या नयना
जय श्रीराम! असं म्हणतात की "तना- मनावर 'नाम ' गोंदवले की देहाचे 'गोंदवले ' होते. " श्रीमहाराजांच्या कृपेने आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेनेच मनात आलेल्या काही कहाण्यांचे संकलन म्हणजे हा ब्लॉग! जय श्रीराम!
सोमवार, २९ जुलै, २०२४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...
-
जय श्रीराम! मानस - प्रभातफेरी श्रीमहाराजांची स्थळ: गोंदवले वेळ- रात्रीच्या तिसऱ्या प्रहाराची सुरुवात! आदल्या रात्री गोंदवले इथे मुक्कामी आप...
-
जय श्रीराम ! मानस - एकादशी (भाग २) राजस पुरुषोत्तम रेगे आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जमीनीवर आपटला नाही. पडता पडता अलगद तो पायांवर उभा होता....
-
जय श्रीराम! मानस - योगायोग कि पूर्वनियोजित वेगात असलेल्या तिच्या I-10 कारने एक झोकदार वळण घेतले आणि त्या गावात शिरली. आणि अचानक समोर आलेल्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा