जय श्रीराम !
मानस - एकादशी (भाग २)
राजस पुरुषोत्तम रेगे
आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जमीनीवर आपटला नाही. पडता पडता अलगद तो पायांवर उभा होता. जाणीवा शुद्धीवर येऊ लागल्या तसे त्याला जाणीव होत गेली.. कि त्याची उंची आता कमी झाली आहे. शरीर उभ्यापेक्षा आडवे होते आहे. तोंडाचा आकार पुढे निमुळता होत आहे.आणि आता त्याला प्रथमच जाणीव झाली की त्याला चार पाय आहेत. अरे बापरे.. त्याचे रूपांतर श्वानात झाले होते. आता हळूहळू आजूबाजूच्या परिस्थितीचे तो अवलोकन करू लागला.
पक्क्या सिमेंटच्या इमारतींचे कच्च्या मातीच्या कौलारू घरांमध्ये रूपांतर झाले होते. आजूबाजूला असंख्य गायी उभ्या होत्या.. म्हणजे तो गोशाळेत होता तर!
खूप मोठा परिसर.. एका बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये चारा साठवलेला होता. दुसरीकडे काही स्त्रिया गवऱ्या थापत होत्या. पुरुष गोठ्यातील शेण फावड्याने ओढून एका ठिकाणी ढीग लावत होते.
एक सुगंधाचा जोरदार झोत त्याच्या अंगावरून गेला. "गंगी परत दावे सोडून पळाली होती, होय रे नागप्पा? " कानावर आवाज पडला. त्याबरोबर दचकून त्याने धपापत्या उराने आवाजाच्या दिशेने पाहिले. एक मध्यमवयीन, गौरवर्ण कांती, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर, दंडावर आणि पोटावर भस्माचे पट्टे,खांद्यावर उपरणे, कंबरेला पांढरे शुभ्र धोतर, पाणीदार डोळ्यात करुणा, असे एक प्रसन्नचित्त व्यक्तिमत्व गायींच्या गराड्यात उभे होते... जणू कोणी सत्पुरुषच. त्यांच्याकडूनच तो सुगंधाचा झोत त्याच्या अंगावर येत होता. "श्रीराम श्रीराम" असे म्हणत ते गंगीच्या पाठीवरून हात फिरवत उभे होते. आणि इतर गायी जणू या महात्म्याने आपल्याही पाठीवरून हात फिरवावा म्हणून पुढे येण्यास झटत होत्या. हम्माँ हम्मा करून त्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.
"माय, असे आपल्या लेकरांना टाकून , दावे तोडून पळू नये.., मी येणारच होतो ना ईथे. ' असं तो संतमहात्मा त्या गायीला प्रेमाने म्हणत होता. ती गाय ही जणू तिला त्यांचे बोलणे समजते आहे अशा रीतीने मान डोलवत होती. मधेच झुकून त्यांच्या पायावर नाक घासत होती. तिच्या गळ्यापाशी खाजवत ते सत्पुरुष तिचे लाड करत होते.
सगळ्या गायीच्या पाठीवरून हात फिरवून ते सत्पुरुष निघाले तसा तो ही त्यांच्या मागोमाग निघाला. आता ते सत्पुरुष गावातून फिरत होते. समस्त गावकरी त्यांना 'महाराज, महाराज' म्हणत मान तुकवत होते . कोणी पांथस्थ त्या धूळमातीच्या रस्त्यावरच लोटांगण घालत होता. तर कोणी चरणस्पर्श करत होते. आता ते सत्पुरुष गावाबाहेरील एका शेतात आले. तिथे काही तरुण मंडळी विहीर खोदत होती. पण पाणी लागले नव्हते. महाराज दिसताच सगळे त्यांच्याभोवती जमा झाले आणि म्हणाले, " म्हाराज आपण एकडाव श्रीराम जय राम जय जय राम म्हना, आमी कुदळ मारतो. पानी लागेल बगा ". हो नाही करता करता. महाराजांनी स्वतःच कुदळ हातात घेतली आणि 'श्रीराम जय राम जय जय राम ' म्हणत एक दणका मारला .. कि पाण्याचा फवारा आकाशात दूरपर्यंत उडाला. सगळी मंडळी आनंदली.
महाराजांनी त्यांच्यासाठी आणलेले आमटी, भाकर, चुरमुऱ्याचा चिवडा त्यांना स्वहस्ते खाऊ घातला. एक तुकडा या श्वान झालेल्या राजसच्याही वाट्याला आला.
आता तो महाराजांच्या मागे मागे जाऊ लागला.
नंतर महाराज राम मंदिरामागच्या ओढ्यावर गेले. तिथे दोन स्त्रियांचे भांडण सुरु होते. दोघी स्त्रिया चांगल्याच पेटल्या होत्या.. एकमकींना अद्वातद्वा बोलत होत्या.
तिथे पोचल्यावर महाराजांनीही त्याच भाषेत दोघींना बोलायला सुरुवात केली. त्याबरोबर तिथे उभे असलेले एक गृहस्थ ... भाऊसाहेब त्यांचे नाव असावे, काहीतरी उदाहरण दाखवले, त्याबरोबर एकदम शांत होत महाराज त्यांच्याकडे वळून गळ्याकडे तर्जनी करत म्हणाले, 'भाऊसाहेब हा राग गळ्याच्या वर आहे हो. "
याला काही एक कळत नव्हतं. संतापाने लालबुंद झालेला माणूस अचानक शांत कसा काय होऊ शकतो, हे त्याच्या कल्पनेपलीकडे होते.
नंतर महाराज राममंदिरात त्यांच्या निवासस्थानी परतले. हा हि त्यांच्यामागोमाग परतला. राममंदिराच्या पायरीवर डोके टेकवून तो बसून राहिला.
महाराज रोज त्याला भाकर तुकडा टाकत. ते खाऊन तो निवांत रहात असे.
राममंदिरात श्रीमहाराजांचा सत्संग चाले, कीर्तन होई. भेटायला येणाऱ्या लोकांसोबत चर्चा होई. हे सगळं कानावर पडत असे, पण त्याच्या बुद्धीला आकलन होत नसे.
हा , महाराज ! सारखे 'श्रीराम जय राम जय जय राम' असे लोकांकडून म्हणवून घेतात, सतत 'जानकी जीवन स्मरण जय जय राम ' म्हणतात हे त्याला नित्य कानी पडून समजायला लागले होते. अगदी आता ते कोचावरून उठतांना केव्हा जानकी जीवन स्मरण म्हणतात आणि कोणत्या क्षणी श्रीराम जय राम... म्हणतील हे हि त्याला अंदाजावरून कळायला लागले होते. दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या एकादशीला श्रीमहाराजांचा उपास असतो आणि रामाला भगर- आमटीचा प्रसाद असतो हे ही त्याला कळू लागले होते. महाराजांना आवडते म्हणून तो ही त्या दिवशी इतरत्र काही खात नसे. फक्त रामाचा प्रसाद ग्रहण करी. आणि अश्या वेळी महाराज जास्त आनंदित होतात आपल्या अंगावरून हात फिरवतात हे त्याने अनुभवले होते. त्यांच्या प्रेमास पात्र व्हावे म्हणून तो आता शक्य ते त्यांच्या आवडीचे करत होता.
हळूहळू सगळ्या गावकऱ्यात हे पसरू लागले. लोकही कौतुकाने सकाळी त्याला खायला घालायचे. पुढे पुढे असे होऊ लागले कि तो ज्या दिवशी जेवला नाही तेव्हा लोक एकादशी असावी असे समजू लागले होते. त्यांचा सहवास त्याला हवाहवासा वाटू लागला होता.
आणि स्वतः श्रीमहाराजांनीही याविषयी सर्व लोकात त्याचे कौतुक केले होते. अशी अनेक वर्ष निघून गेली.
आणि ते १९१३ साल उजाडले. श्रीमहाराज आता थकलेले दिसू लागले होते. दम्याचा जोर येई, तेव्हा शेजघरातून येणारा त्यांचा खोकल्याचा आवाज त्याच्या कानावर पडत असे. आणि तो काळाकुट्ट दिवस उजाडला.
२२ डिसेंबर, १९१३
गोंदवल्याचा सूर्योदय होत असताना श्रीमहाराज निजधामास निघाले होते. सगळीकडे सुन्न वातावरण होते. लोकांनी आकांत मांडला होता. गोंदवले गाव दुःखात बुडून गेले होते. गावोगावी निरोप गेले होते. अंगणात उभे राहून त्याला परिस्थितीचा अंदाज आला होता. काहीतरी अघटित घडले आणि आपला त्राता, आपले लाडके महाराज आपल्याला सोडून गेले हे त्याला समजले, अन त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरु झाल्या. आतून खूप मोठ्याने ओरडून रडावे असे त्याला वाटू लागले होते पण लोक हाकलून देतील कि काय या भीतीने त्याने महत्प्रयासाने आपले रडू आवरून धरले होते. .
थोड्याच वेळात, श्रीमहाराजांचा निष्प्राण देह शेजघरातून आणून रामासमोर ठेवण्यात आला. याला काय वाटले कुणास ठाऊक! आजवर कधीही राममंदिरात त्याने पाऊल टाकले नव्हते. पण आज राहवले गेले नाही.. आत शिरून त्याने महाराजांच्या देहाभोवती एक प्रदक्षिणा घातली. आणि विषण्ण मानाने तो बाहेर आला. आता आपल्याला वाली कोणी उरला नाही हे त्याने ओळखले आणि वाट फुटेल तिकडे चालत राहिला.
पुढे काही दिवसांनी कित्येक मैलाचा प्रवास करून तो पंढरपुरात पोहचला. रस्त्यात मिळेल ते खात होता. कोणी खाऊ घालत होते, कोणी हाकलून लावत होते.
इंद्रायणी काठी आल्यावर त्याला अगदी उचंबळून आले. तहानलेला, भुकेला तो, अगदी चालण्याइतके हि त्राण नव्हते. पाणी पिण्यासाठी नदीवर खाली वाकला आणि अचानक धडपडून पाण्याच्या धारेला लागला. तिथेच एका खोल खोल डोहात गिरक्या घेता घेता त्याला जलसमाधी मिळणार तेवढ्यात हातापायांच्या धडपडीने गळ्यातील कालपांथस्थ यंत्राची कुठलीशी कळ अचानक दाबली गेली.. आणि..
आज एका अनोळखी भक्ताने, नाव गुप्त ठेवण्याच्या बोलीवर २० तांदुळाची पोती पाठवली होती. त्याचा टेम्पो प्रल्हाद इमारतीच्या खाली उभा होता.
राजस नेमका आपटला तो त्या पोत्यांवर. थोडेफार खरच्टण्यापलीकडे त्याला काही दुखापत झाली नव्हती.
अन् विशेष म्हणजे तो तिथे पडून अवघी वीस मिनिटे झाली होती. पण काळाच्या पलीकडे गेला होता तेव्हा त्यात कित्येक वर्ष उलटून गेली होती. कालगतीच न्यारी आहे. एव्हाना तो तिथे पडला हे सुदैवाने कोणाच्याही लक्षात आले नव्हते. वर पत्नी व मुलगा झोपेत होते. त्यांना पत्ताही नव्हता.. एवढ्या वेळात काय घडून गेले ते!
भानावर आल्यावर तो सगळं आठवू लागला. अरेच्चा... पूर्वजन्मात घडलेल्या या कारणांनी आपल्याला एकादशीला उपास घडतोय तर!! तसेच अंग झटकून तो पटापट पायऱ्या चढून रूम मध्ये आला. समोर भिंतीवरच्या महाराजांच्या फोटोकडे लक्ष गेलं. अन तो भयानक दचकला.. मागच्या जन्मात गेल्यावर बघितलेले सत्पुरुष हेच याची खात्री पटल्यावर आता मात्र त्याचा हुंदका फुटला. डोळे भरून वाहायला लागले. याच सत्पुरुषांच्या सहवासाने आणि कृपेने त्याला या जन्मात मानव देह मिळाला होता हे त्याला कळून चुकले होते. रेवतीला ना उठवता.. आता तो समाधी मंदिराच्या दिशेने धावत सुटला.
आज कोणालाही तो आवरता येणार नव्हता.
समाधी मंदिरात जाऊन त्याने अंग झोकून दिले. रडत लोटांगण घालू लागला.. " महाराज महाराज " असा टाहो फोडत मंदिराच्या उंबऱ्यावर वारंवार नमस्कार घालू लागला. आजवर जो काय अभिमान, मुजोरी अंगी होता तो सगळा अश्रुधारातून वाहून चालला होता.
समाधी मंदिरात श्रीमहाराज मंद मंद स्मित करत होते. त्यांचा उद्देश सफल झाला होता. बाजूच्या ब्रम्हानंद मंडपात कीर्तनकारांनी निरूपणासाठी घेतलेल्या अभंगाच्या ओळी ऐकू येत होत्या,
" जरी नाही मशी घडली काही सेवा । जरी नाठविले तव नावा|
जरी संतांची केली नाही पर्वा । आचरीला मार्ग न बरवा ।।
.. ...
पांडुरंग सद्गुरुमाये, कळवळुनी झडकरी यावे, लेकरा उसंगी घ्यावे ।...
***
अश्विन शु पौर्णिमा.. अर्थात कोजागिरी पौर्णिमा!
स्थळ: आइन्स्टाइन हॉल, इस्रो
राजसने ब्लेझरच्या वरच्या खिशात ठेवलेल्या श्रीमहाराजांच्या फोटोचे डबडबल्या डोळ्यांनी दर्शन घेत, छातीला हात लावीत, त्या भव्य हॉलमध्ये स्टेजवर प्रवेश केला. अन... .... Welcome to our brilliant scientist Mr Rajas Rege for successfully launching of Time Machine- Ipoch Voyager! Heartiest Congratulations to Rajas Rege and Team ISRO ". हि वाक्य समोरच्या पडद्यावर झळकली आणि पाठोपाठ माइकवरून इस्रो चेअरमन एस. सोमनाथ यांचा जोशपूर्ण आवाज आला. पुढची वाक्ये Soon Mr Rege will be receiving the Most prestigious "Hall of fame " award, " संपूर्ण हॉलमधल्या टाळ्यांच्या कडकडाटात बुडून गेली.
(उत्तरार्ध )
जय श्रीराम
श्रीमहाराज कन्या नयना



