जय श्रीराम!
मथुताई मोडक :
यांच्याबद्दलची ती कथा आपण ऐकलेली आहेच.
एक दिवस श्री तात्यासाहेब पेटी घेऊन मंडलेश्वरला गेले होते तिथे त्या शारदाबाई आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय साधारण २५ ते २६ होते . श्रींचे प्रवचन संपले व त्यांनी हाक मारली "मथुताई इकडे या" .त्या बाईंना आश्चर्याचा धक्का बसला. इतक्या वर्षानंतर आपल्याला माहेरच्या नावाने कोण हाक मारत आहे ? तिने पाहिले तर श्रीमहाराज (वाणीरूप ) तिला बोलावीत होते.
ती जवळ आली . तेव्हा श्री म्हणाले " बाळ तुला नाम द्यायचे राहिले होते ना ? ते मी तुला आता देतो . " मथुताई उर्फ शारदाबाई आनंदाने गहिवरून गेल्या. हे सर्व खरोखरीच विलक्षण होते !
***
याची गोष्ट अशी कि या मथुताई म्हणजे महाराजांचे इंदोर येथील परम शिष्य श्री भैय्यासाहेब मोडक यांच्या धाकट्या वहिनी कै. सीताबाई मोडक सेवा करण्यासाठी इंदूरहून गोंदवले इथे येऊन राहात असत. त्यांची कन्या मथुताई म्हणजे विवाहोत्तर श्रीमती शारदाबाई भागवत.
श्रीमहाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली जी काही थोडीफार मंडळी होती त्यांच्यातील त्या एक.
डॉ मुकुंद गोडबोले यांना आणि त्यांच्या पत्नीला १७/०८/ २००२ रोजी लिहिलेल्या एका पत्रात मथुताई (त्यांचे वय त्यावेळी ९७ होते) म्हणतात, कि ," आपण सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करतो. तेव्हा देवाला प्रार्थना करावी कि,-" देवा मी आता या देहाचे विकार आपल्याला अर्पण करतो त्याचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हा देह मी नाही, मी चैतन्य ब्रह्मपरमात्मा आहे. स्वयंप्रकाश आहे. सर्व शरीराचा साक्षी आहे."
पुढे आपल्या शरीरात जे सर्व गुण आहेत ते मी आपल्याला अर्पण करतो. जशी श्रीसृष्टीत पंचमहाभूते आहेत तशीच या शरीराच्या आत पण आहेत, जे भयंकर असतात , ते या मनाला अडकवतात. हे सर्व गुण देवाला देऊन अर्पण करावे. मी सतचित आनंदरूप आहे. आता हे ब्रम्हाचे गुण आहेत. आता देहाचे गुण तन, मन, धन, काया ,वाचा, मन बुद्धी, अहंकार, काम, क्रोध, मद , मत्सर, द्वेष, बुद्धी, सुख, दुःख तर हे सर्व गुण आपल्याला पुढे सरकू देत नाहीत. म्हणून हे सर्व गुण रोज देवाला अर्पण करावे.
संदर्भ: चैतन्य स्मरण विशेषांक २००२
***
श्री राम बाई, खेडीघाट
महान रामभक्त रामबाई यांची समाधी नर्मदाकाठी खेडीघाट येथे आहे. समाधीपासून थोड्या अंतरावर एक पुरातन मंदिर आहे. तिथे राम, लक्ष्मण, सीताजी यांच्या मूर्ती आहेत.
राम बाई यांच्या जीवनाबद्दल फारशी माहिती नसली तरी त्यांच्या चरित्र पुस्तिकेत दिले आहे त्याप्रमाणे, त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात इ.स. १८३१ मध्ये यजुर्वेदी ब्राम्हणाच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव रेवाबाई. ८ व्या वर्षी विवाह झाल्यावर २ महिन्यातच पतीचे निधन होऊन त्या विधवा झाल्या. त्यांचा संपूर्ण परिवार दुःखात होता त्याच वेळी एक सत्पुरुष फिरत फिरत त्यांच्या गावी आले. त्यांचे नाव कामळे बुवा असे लिहिले आहे. रेवाबाईच्या आईवडिलांनी या सत्पुरुषाला घरी आमंत्रित केले आणि रेवाबाईची करुण कहाणी त्यांना विदित केली. त्या सत्पुरुषाने रेवाबाईंना अनुग्रहित केले. त्यांची नजर रेवाबाईंवर पडल्याबरोबर त्यांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली. त्या अवस्थेत त्या कधी रडायच्या तर कधी हसत बसायच्या.
काही वर्षांनी रेवाबाई बऱ्हाणपूर येथील एका राम मंदिरात राहून रामनामाची साधना करू लागल्या. त्या मंदिरातच त्यांना प्रत्यक्ष रामाने दृष्टांत देऊन सांगितले की मी तुझ्या जिभेवर सतत वास करेन. त्या फक्त 'राम' एवढाच उच्चार करून जप करायच्या. निष्काम भावाने त्यांनी अखंड रामनाम साधना केली.
नंतर त्या नर्मदाकाठी मोरटक्का येथे गेल्या. मोरटक्क्याला एका छोट्या शिवमंदिरात राम बाई पूजा करायच्या. काही वर्षांनी नर्मदेचे पाण्याचा स्तर वाढू लागलातसे रामबाईंनी जवळच असेलल्या शाम साई सदन इथे एका घरात राम मंदिराची स्थापना केली. श्री राम बाईंची एक शिष्या होती. तिलाही राम बाई असेच म्हणायचे. मोरटक्क्याला आल्यावर राम बाईंनी रामनामाचे अखंड अनुष्ठान केले. आणि ९५ वर्षाच्या असताना देह ठेवला. त्यांचे निर्वाण १६ नोव्हेंबर १९२९ मध्ये कार्तिक पौर्णिमेला झाले. एका अनामिक शिष्याने त्यांची तेथे समाधी बांधली.
तेव्हापासून आजवर कित्येक वेळा , नर्मदेला पूर येऊन समाधी जलमय झाली असेल पण अजूनही समाधी शाबूत आहे.
संदर्भ: इतरत्र फेसबुकवरून
**
पू बाबा बेलसरे आपल्या एका प्रवचनात निरूपणासाठी घेतलेल्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाबद्दल सांगताना म्हणतात,
"बघा कसे. महाराज जस म्हणाले माझ्या हाताला कान लावा, नाम ऐकू येत. तसे ते आहे. आणि महाराज एक सांगत. त्या रामबाई म्हणून इंदोरकडे होऊन गेल्या. त्या बाईला काही लिहिता वाचता येत नव्हतं. तर त्या मंदिरात बसायच्या. नामात इतक्या राहिलेल्या. एक गोष्ट विसरलो बघा. कि त्या महाराजांच्या अनुग्रहित होत्या कि काय हे महाराजांना विचारायचं राहिले. बहुतेक महाराजांच्या अनुग्रहित असाव्यात. रामाच्या उपासक . तर त्यांना मनीऑर्डरी यायच्या त्या मंदिराकरता. तर त्या अंगठा करायच्या. सही करता येत नव्हती. अंगठा करायच्या. तर ' श्रीराम ' हा शब्द यायचा त्या अंगठ्याच्या छापामध्ये. काय शरीर भरले असेल बघा. बाई, विधवा बाई. पण काय अभ्यास असला पाहिजे नामाचा. शरीर भरून गेलं त्याने.
म्हणून म्हणाले, ।।विठ्ठल हे काया, विठठल हे छाया माझी मज।। . हि कल्पना फार रम्य आहे बघा. माणूस म्हटलं कि छाया असणारच. तर छाया याचा अर्थ मूळ आहे तशी छाया. तर म्हणाले माझी छाया विठ्ठल. म्हणजे मी अन विठ्ठल भेदच नाही. काय अनुभव आहे तुकाराम महाराजांचा. काय चित्तामध्ये भगवंताला साठवलं असेल, कमाल आहे बुवा. गंमत म्हणजे जिथे देह जाईल तेथे छाया जाणारच. छाया नाही असे शक्यच नाही. तसे मी आणि विठ्ठल वेगळे राहूच शकत नाही.
बैसला विठ्ठल जिव्हेचीया माथा. हे मर्म आहे त्याच. जिव्हेचीया म्हणजे जिभेच्या शेंड्यावर विठ्ठल बसला आहे. म्हणजे विठ्ठलशीवाय मी बोलत नाही काही. दुसरे बोलणेच नाही काही.".
****
जय श्रीराम!
संकलन - महाराजकन्या





.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा