मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

जय श्रीराम

मानस- साधनामंदिर परिसर 


यावेळी पुण्यतिथी उत्सवाच्या २ दिवसानंतर गोंदवले इथे गेलो होतो. १ तारखेला नवीन वर्षाचे श्रीमहाराजांचे दर्शन घेऊनच परत आलो. या चार दिवसात २-३ दिवस अखंड साधनामंदिरातच घालवले. तेव्हा आलेले अनुभव गोष्टीरूपात मांडले आहेत. संध्याकाळ झाली, उन्हे उतरणीला आली कि बाजूच्या बंधाऱ्याला लागून असलेल्या असंख्य चिमण्यांचा चिवचिवाट सुरु होतो ते थेट अंधार पडेपर्यंत. त्यावर सुचलेले हे काही:
**


"  चिव चिव चिव चिव... " ए, शुक शुक .. तिकडे पाहिलंस का? ते लोक बघितले का आतमध्ये? असे का शांत बसले असतील ग? " एक चिमणी नामसाधना मंदिराच्या खिडकीत बसून मान तिरकी करून आत पाहात उद्गारली.
"काय कि बाई, रोजच बसतात हे लोक आणि विशेष म्हणजे तास न तास बसतात. नाहीतर मनुष्यप्राणी असा स्वस्थ बसलेला पाहिलंय का कधी? " दुसरी चोचीतली बारीक काडी खिडकीच्या काठावर ठेवून म्हणाली.
"आणि बघितलेस का? त्यांच्या हातात माळा असतात... आणि सारखे काहीतरी पुटपुटत असतात. मला तर नवलच वाटते बाई हे" - इति पहिली चिमणी.
"हो ग! पण या मोठ्याच मोठ्या खोलीच्या मध्यभागी असलेला तो मोठा फोटो... त्यातील ते सत्पुरुष पाहिलेस का? काय समाधान लाभते त्यांच्याकडे पाहिले कि! " - दुसरी चिमणी .
" खरंच कि ! आणि कुठल्याही खिडकीतून बघ... आपल्याकडेच लक्ष आहे त्यांचे असे वाटते. असं वाटत त्यांच्याकडे बघतच बसावं. किती प्रेमळ भाव आहेत चेहऱ्यावर , काय करुणा आहे ग त्यांच्या नेत्रांमध्ये." - पहिली चिमणी.

हा संवाद चालू होता, साधनामंदिराच्या खिडक्यांच्या बाहेर कट्ट्यावर बसलेल्या दोन चिमण्यांमध्ये.
***

नामसाधना मंदिराच्या परिसरात असणारा बंधारा.. बंधाऱ्याच्या पाण्यात पाय टाकून उभी असलेली औदुंबर, करंज, बोर, आपटा, बांबू... बाजूला कडुलिंब, गुलमोहर, बुच अशी उंचच उंच झाडे आणि या तरुवेलींवर असलेली अनेकविध पक्ष्यांची वस्ती. पाण्यात सूर मारणारा खंड्या, हळद्या, कावळे, कोकीळ, चिमण्या, पोपट, मैना, बुलबुल, कबुतरे, कलकलाट करणाऱ्या साळुंक्या,  पाण्यात पोहणारी  काळी पांढरी बदके, असा जैववैविध्याने नटलेला हा रमणीय परिसर.. आणि या सर्वात कहर म्हणजे इथे पौर्णिमेव्यतिरिक्त मनुष्याचा कमी असलेला वावर.. तिथली विलक्षण शांतता! उगाच कुठे एखाद्या खंड्याने पाण्यात सूर मारला तर होणारा चुबुक डुबुक आवाज.. अन पाण्यावर उठणारे सूक्ष्म तरंग एवढ्यानेच इथल्या शांततेवर उठणारा किंचितसा ओरखडा उठावा अशी शांतता.  
हि पाण्याच्या आसपासची झाडे म्हणजे त्या पक्षांच्या पिल्लांचे आवडते ठिकाण. पुरेसे पंखात बळ नसलेली अश्या  चिमण्या पिल्लांचा आवडता खेळ म्हणजे त्या पाण्यावर अगदी स्पर्श होईल इतपत वाकलेल्या बांबूच्या झाडावर उड्या मारणे.  पाण्यातल्या त्या आपल्याच मस्तीत पोहणाऱ्या बदकांचे लक्ष नसेल ना तर ती चिमणी पिल्ले पार त्या बांबूच्या टोकापर्यंत येत. मग ती बदके क्वॅक क्वॅक करून त्यांचे लक्ष वेधून घेत आणि रागावून त्यांना मागे जायला सांगत. त्या चिमण्या सकाळी घर सोडतेवेळी पाण्यात पोहणाऱ्या ४-५ काळ्या पांढऱ्या बदकांना पिल्लांवर लक्ष ठेवायला सांगून जात. आपापले पालक आले कि पिल्ले घरट्यात येत  दुपारी जरा चिवचिवाट कमी होई.
उन्हाची काहिली वाढली तर बाजूला असलेल्या मऊसर मातीमध्ये लोळून मृत्तिका स्नान करायचं म्हणजे पिसांवर चढलेले बारीक किडे वैगेरे मातीत पडतात. अन नंतर त्या तळ्यातल्या पाण्यात अंघोळ करायचं प्रशिक्षण आया चिमण्यांनी पिल्लांना आधीच दिले होते. त्यामुळे दुपारचा प्रश्न नव्हता. प्रश्न होता संध्याकाळचा. उन्ह उतरणीला लागली कि पक्षी घरट्याकडे परतू लागत आणि त्या झाडांवरचा किलबिलाट पण वाढायचा.  त्याच वेळी हि पक्षांची सभा भरली होती.


"चिव चिव चिव... मला काय वाटतं माहितीये का?' एक प्रौढ चिमणा पंख उभारून , अंग फुलवून .. पुन्हा पंख मिटून ... घसा खाकरून गंभिरतेने म्हणाला.  तो प्रौढ चिमणा अध्यक्ष होता. त्याने विशेष काही सांगण्यासाठी सभा बोलवली होती.  

"तर आता आपल्या बहुतेकांची पिल्लं १४-१५ दिवसांची होण्यात आली आहेत. डोळे पण उघडले आहेत सगळ्यांनी . तर आपण त्यांना आतापासूनच काही सवयी लावायला पाहिजेत. जसे आमच्या आज्याने लावल्या होत्या या वयात आम्हाला.

" कसल्या सवयी म्हणता ? "एक चिमणी पिल्लाच्या चोचीत दाण्याचा बारीकसा तुकडा भरवता भरवता म्हणाली. " हि पिल्ले दिवसभर घरट्यात उच्छाद मांडतात.. सतत आपलं भूक भूक... ! आम्ही दोघे सूर्योदयास जे घरटे सोडतो ते पन्नास चकरा मारून यांना दाणे भरवायला येतो.  यातच आम्ही थकतो. त्यात घरट्यात परत आल्यावर दिवसभर या पिल्लांची गळून पडलेली पिसे, त्यांनी केलेली घाण, अन्नाचे कण साफ करायचे हि कामे असतातच.  आणि आता काय शिकवायचे राहिले यांना. 

"पहिली गोष्ट म्हणजे नाम घेण्याचे शिकवायचे आहे आपल्या मुलांना. आपल्या सर्वांना माहित आहेच. आपले कान हे आपले विशेष अवयव आहे. त्यामुळे आपल्याला आवाजाच्या सूक्ष्म लहरी , अति सूक्ष्म स्पंदने हि ऐकू येतात. तुम्हाला इथे जाणवले असेलच. या गावाच्या कणाकणात 'श्रीराम जय राम जय जय राम ' हे नाम भरले आहे. बारकाईने ऐकल्यास तुम्हालाही ऐकू येईल. हि बाजूला इमारत दिसते ना तिथे तुम्हाला ती स्पंदने जास्त जाणवतील. तर आपण पक्षांनीही आतापासून " जय श्रीराम, जय श्रीराम" असेच म्हणायचे आहे.

"दुसरे प्रशिक्षण द्यायचे आहे ते प्रदक्षिणेचे . सगळ्या पिल्लांचे पंख आता बऱ्यापैकी मोठे झाले आहेत.. थोडे थोडं उडायला, भिंतीवरून पाण्यात सूर मारायला तुम्ही शिकवले आहेच. त्यांच्या पंखात बळ येण्यासाठी आता त्यापुढचा टप्पा म्हणजे उंचावरून म्हणजे या इमारतींच्याही वरून उडायचे. आज ना उद्या हि पिल्ले आपली सर्वांची घरटी सोडतील आणि स्वतंत्र होतील. त्या आधी हे व्हायला हवं.   तर मी काय म्हणतो.. ते मंदिर दिसते ना... समाधी मंदिर म्हणतात हे लोक त्याला. त्याच्या कळसाला प्रदक्षिणा घालायचे प्रशिक्षण आपण आतापासून पिल्लांना देऊया. .... " इति प्रौढ चिमणा

एक चिमणी तेवढ्यात बांबूच्या टोकाशी गेलेल्या एका पिल्लाला दटावून परत आणत म्हणाली," नाही मी काय म्हणते, खरच आपल्या पिल्लांना काहीतरी शिस्त लावायला पाहिजे आता. ते समाधी मंदिराच्या समोरच्या झाडावरचे कस्तुर पक्षी बघा , कसे नियमाने प्रदक्षिणा घालतात. "

दुसरी चिमणी तिच्या पिल्लाची पिसे साफ करता करता म्हणते, " तुमचे बरोबर आहे. पण त्यामुळे काय होणार हे सांगा आधी. उगाच थकवायचे का पिल्लांना. किती उंचावरून उडावे लागेल माहिती आहे का? इथे आजूबाजूला उंचच उंच असलेलया इमारती, झाडे, मंदिराचा कळस... त्या वायरी, मोबाईल टॉवर या सगळ्यातून वाचवून पिल्लांना उडायला न्यायचे म्हणजे अवघड काम.

प्रौढ चिमणा: याने काय होणार म्हणता? अहो यानेच तर थोडेफार पुण्य आपल्या पदरात पडेल. असं बघा.. आपले आयुष्य इन मिन ४-५ वर्षांचे. त्यात इथे आपण किती सुरक्षित आहोत माहित आहे का? नाहीतर इतर ठिकाणी गेलेल्या चिमण्यांचे किस्से ऐका. मांजरी, बोके, कुत्री, ससाणे, घारी हि मंडळी टपूनच बसलेली असतात आपल्या पिल्लांना खायला.आणि अजून सांगू का? रात्री झोपेत तुमची पिल्ले फांदीवरून , घरट्यातून पडतात का कधी? त्यांची काळजी कोण घेतं? त्यांना खाली पडण्यापासून कोण वाचवते माहित आहे? इथे ज्या सत्पुरुषाची सत्ता आहे ना, ते वाचवतात. हे गाव म्हणजे एका सत्पुरुषाचे गाव आहे. त्यासाठी  कृतज्ञता म्हणून त्यांच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालायची. आणि प्रदक्षिणा झाली कि त्या समोरच्या फांदीवर बसून सगळ्यांनी महाराजांची संध्याकाळची आरती श्रवण करायची आहे.  ती संपली कि मगच आपापल्या घरट्यात परतायचे आहे.

तेवढ्यात एक प्रौढ चिमणी मधेच म्हणते," अगदी बरोबर आहे अध्यक्षांचे. त्या उंच  कळस असलेल्या मंदिराकडे गेला आहात का कधी ?  तिथे आरती झाली कि "श्री अनंतकोटीब्रह्मांडनायक... असा मोठ्याने उद्घोष करतात. त्या गोशाळेतल्या गायी म्हणत होत्या, कि इथे हे जे पूर्वी सत्पुरुष होऊन गेले ना, ते आपल्या या आणि अश्या अनंत ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांचीच अखंड सत्ता इथे आहे. आपल्याला या त्यांच्या पवित्र भूमीत जन्म मिळाला तो सुद्धा त्यांच्या कृपेमुळेच. आपल्याला हे जे इथे अन्न, दाणा पाणी मिळते ते त्यांच्या कृपेने. कारण ते सर्व प्राणिमात्रांची काळजी वहातात. रोज प्रत्येकाच्या मुखात अन्नाचा कण गेला आहे कि नाही हे ते आतासुद्धा पाहतात. म्हणूनच तर इथे कोणी उपाशी झोपत नाही. इथे जे गेल्या शतकापासून अन्नदान सुरु आहे ना ते त्यांच्यामुळेच. या सत्पुरुषाच्या कृपेनेच आपणही त्यांच्या घरचे अन्न खातोय. त्याबद्दल थोडीतरी कृतज्ञता म्हणून या प्रदक्षिणा.

" मंडळी... आता असं बघा ! तो चिमणा पुढे बोलू लागला. " आपल्याला पुढचा जन्म उत्तम जीवयोनीमध्ये हवा असेल तर आपणही या सत्पुरुषाने ज्या रामनामाचा आयुष्यभर प्रसार केला ते घ्यायला पाहिजे. आता आपण चिव चिव शिवाय दुसरे काही बोलू शकत नाही पण मनुष्ययोनी ही सर्वात उत्तम योनी कारण वाणीची देणगी या योनीतच दिली असते. आणि मी त्या मंदिरात चाललेल्या प्रवचनात ऐकले आहे कि त्या वाणीने नाम घेऊनच आपण या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटू शकतो.  तो जन्म मिळण्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करायला हवी. म्ह्णून म्हणतो..

तुम्ही समाधी मंदिराच्या समोरच्या झाडावर राहत असलेल्या कस्तुर, साळुंक्या पक्ष्यांना बघितले असेल. ते नित्यनियमाने सायंकाळी कळसाला प्रदक्षिणा घालतात. मंदिराच्या खिडक्यांमध्ये बसून त्या महापुरुषाची आरती ऐकतात,  प्रवचन ऐकतात. एकूण काय तर श्रवण भक्ती सुरु आहे त्यांची. त्यांना पुढचा जन्म निश्चितच मानवाचा आहे. आपण निदान प्रदक्षिणा घालायचे तरी आपल्या मुलाबाळांना शिकवूया. सुरवात थोड्या अंतरापासून , कमी उंचीपासून करू. बोला करायचा असा नियम?

आणि झाडांवरचा किलबिलाट एकदम वाढला. " हो हो, मान्य आहे, जय श्रीराम!.....  जय जय श्रीराम! . " - सगळे पक्षी एका सुरात ओरडले. 


चला तर मग... शुभस्य शीघ्रम! आनंदाने म्होरक्याने एक जोरात शीळ घातली. "आता उन्हे बरोबर या इमारतीच्या तळमजल्याच्या  खिडकीवर आली आहेत. ती लवकरच वरच्या मजल्याच्या खिडकीपर्यंत येतील.  इथून जी समोर दिसते त्या मध्यवर्ती भांडार इमारतीवर एकत्रित जायच. . तिथूनच आपल्याला प्रदक्षिणा सुरु करायची आहे. आणि हो पिल्लांना सांगून ठेवा.. जास्त कलकलाट करायचा नाही.
आणखी ऐका , ३०-३० चिमण्यांच्या थव्यानेच जायचे आहे. पिल्लांच्या क्षमतेप्रमाणे १,३,५,७,९,११ प्रदक्षिणा असतील. सुरवातीला टप्प्याटप्प्याने करणार आहोत. मध्यवर्ती भांडार इमारतीवरून कुर्तकोटी निवास. कुर्तकोटी इमारतीवरून चिंतामणी निवास , मग रामानंद निवास इमारतीवरून प्रल्हाद निवास, प्रल्हाद निवास वरून दोन नंबरचे प्रवेशद्वार. इथवर येईपर्यंत थकल्यास मंदिराला वळसा घालून ब्रम्हानंद मंडपावर येऊन बसायच. नाही तर प्रवेशद्वारावरून पुढे, चैतन्य रुग्णालय असे करून परत तिसऱ्या प्रवेशद्वारावरून तुकामाई निवास या इमारतीवर, तिथून इकडे पाण्याच्या टाक्यांवर असा मार्ग राहील.   
थव्याने जातांना आजूबाजूने ज्येष्ठ, अनुभवी चिमण्या असतील. मध्ये पिल्लांना ठेवायचे आहे. जेणेकरून हवेचा दाब सौम्य होईल.
दमल्यास, थकवा वाटल्यास दक्षिणेला आनंदसागर इमारतीवर नाहीतर पश्चिमेला प्रसादालयच्या बाजूला ज्या दोन उंच पाण्याच्या टाक्या आहेत त्यावर विश्रांती घ्यायची आहे.
समाधी मंदिरात आरतीची घंटा झाली कि समाधी मंदिराच्या समोर असलेल्या झाडावरील एक पक्षी शीळ घालेल आणि आपल्याला आवाज देईल. त्यावेळी सगळ्यांनी ज्या दिशेला असाल तिथून इकडे यायचे आहे. आणि प्रल्हाद इमारतीवर चिडीचूप बसायचे आहे.

 

बरोब्बर उन्हे उतरली सगळे पक्षी पिल्लांना घेऊन कुर्तकोटी इमारतीवर जमतात. आणि " जय श्रीराम " एकच घोष होतो. सगळे एकसाथ मंदिराच्या कळसाला प्रदक्षिणेला सुरुवात करतात.
**


खाली ब्रम्हानंद मंडपात कीर्तनकार बुवांनी निरूपणासाठी नाथांच्या अभंगातल्या ओळी घेतलेल्या असतात.

सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही ।।
आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।।


जय श्रीराम!
महाराज कन्या

 
 

 

 

टीप: वरील कथा संपूर्णपणे काल्पनिक असून.. मनात आलेले विचार कागदावर उतरवले आहेत. कथेचा कोणत्याही जीवित वा मृत व्यक्तीशी संबंध नसून श्रीमहाराजांच्या चरित्रातील प्रसंग/ व्यक्तिविशेष/ ठिकाणे ही प्रसंगानुसार संदर्भासाठी घेतली आहेत.
काही चुकीचे वाटल्यास क्षमस्व!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...