गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

 जय श्रीराम!

"मानस- माणगंगा "


 
गेल्या वर्षी पावसाळा संपायला आला तेव्हा गोंदवले इथे श्रीमहाराजांना भेटायला गेले होते. नुकताच काकडा, सकाळची आरती, देवदर्शन झाले होते. थोरले रामरायाचे दर्शन घेऊन मागच्या बाजूने चालत निघालो. वातावरणात गारवा होताच. श्रीमहाराजांचे बालपण माणगंगेच्या तिच्या काठी गेल्याने तिला बघण्याची उत्सुकता होती.

सकाळची प्रसन्न वेळ. नुकताच पावसाळा होऊन गेला अन नदीतील कचरा , गाळ वाहून गेल्याने, छान नितळ पाणी होतेच. पावसाळ्यात बराच मोठा धुमाकूळ घालून हि गंगामैय्या आता शांतपणे वाहत होती. नदीकाठी कदंब, वड , पिंपळ, कडुलिंब, उंबर  वृक्ष  दाटीवाटीने उभे होते.
कदंब कसा नाजूक हळुवार हसतो. पिंपळ सळसळून हसतो. वड आपला गंभीरतेची शाल ओढून बसलेला.. हे सगळे वृक्ष सकाळी पक्ष्याच्या अस्तित्वाने गजबजून जातात. दुपारभर पक्षांचा वावर असतो. संध्याकाळ झाली की पुन्हा किलबिलाट वाढतो. प्रत्येक जण आपापल्या घरट्यात जातो आणि मग ही झाडे मौनराग गातात. धीरगंभीर होतात.या शांततेतच मग कधी कधी पलीकडच्या मंदिरातून घंटेचा आवाज येऊ लागतो आणि हा सगळाच निसर्ग जणू कानात प्राण आणून मंदिरातील आरती ऐकू लागतो. आरतीचे स्वर वाऱ्यावर विहरत इथवर येतात. आणि माणगंगा ध्यानस्थ होते. जणू हे आरतीचे स्वर कानी पडावे... रंध्रा रंध्रात शोषून घ्यावे म्हणूनच हे सगळे असे शांत होतात.

असो तर आम्ही गेलो माणगंगेत उतरलो  ...आधी मैय्याचे पाणी प्रोक्षण करून मग हळूच पायाचे तळवे पाण्यात सरकवले. थंडगार पाण्याने शिरशिरी आली. लगेच छोटे छोटे चंदेरी मासे पायाला बिलगून लुचू लागले. मग तिथेच एका सपाट खडकावर बघून बसलो.  मधूनच साळुंक्यांचा कलकलाट, चिमण्यांची बडबड, बुलबुलची शीळ ऐकू येत होती. मंद गार वारा, आणि मैयाच्या पाण्याचा खडकांना वळसा घालून जाताना येणारा खळखळ आवाज... चटकन मन एकाग्र  झाले. निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याशी बोलत असते. प्रत्येक झाड, प्रत्येक पक्षी, प्रत्येक नदी ...  आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. तिथे शब्दांची गरज नसते. "या हृदयीचे त्या हृदयी.. " असे असते ते. शांततेलाही आवाज असतो म्हणतात ना!  ऐकण्यासाठी कान हवेत मात्र.
 नकळत डोळ्यांच्या पापण्या मिटल्या गेल्या. मुखाने नाम सुरूच होते. " श्रीराम जय राम जय जय राम ... श्रीराम जय राम जय जय राम !"  श्रींच्या चरित्रातील प्रसंग आठवू लागले. त्यांचे बालपण, केलेल्या खोड्या.. मास्तरांची केलेली फजिती.. सगळं सगळं आठवू लागलं. खूप वेळ असाच गेला असेल. हळूहळू ते जलतत्त्व मनात उतरू लागले, डोळ्यातून पाझरू लागले. .  "हे असे रामनाम ऐकले कि मला राहवत नाही बघ. अगदी उचंबळून येतं. "  खोल खोल असा आतून आवाज आला. मी चमकले. कोण बोलतंय हे? " अग मीच, जिच्या काठावर तू बसली आहेस ती, माणगंगा!
मला माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता कि जलतत्त्व बोलते पण. "काय ग? काय झालं? मी आश्चर्याने विचारले.  
"काय सांगू तुला.. .." ती पुढे बोलू लागली. या पवित्र ठिकाणी मागच्या शतकात हे सत्पुरुष जन्माला आले आणि रामनामाचा महिमा यांनी वाढवला. कित्येकांना नामाला लावले, लोकांचे अश्रू पुसले. अन्नदान सुरु केले, कित्येक गाई सोडवल्या... गोरक्षण केले, हि भूमी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली बघ!
 गोंदवलेच नव्हे तर आसपासची खेडोपाडी सगळीकडे लोकांच्या हातात जपाच्या माळा दिसू लागल्या. लाखो लोक नामाला लागले. इथल्या कणाकणात नाम आहे बघ. काय वैभव होते गोंदवल्याचे महाराज असतांना! त्यांची नुसती कृपादृष्टी आपल्यावर पडावी म्हणून , त्यांच्या पद्स्पर्शासाठी प्राणीमात्र धडपडत असायचे.

"मैय्या सांग ना, महाराजांच्या गोष्टी! अनादी काळापासून तू वाहत आहेस. तुला तर तुझ्या काठावरच्या लोकांची खडा ना खडा माहिती असेल. महाराजांच्या जन्मापासून ते देह ठेवीपर्यंत तूच एक साक्षीदार आहेस बघ, त्यांच्या जीवनकालाची ! " मी आर्जवाने म्हणाले.  

"आता असे बघ, माझा जन्म कुळकजाई, ता. माण येथील सीतामाईच्या डोंगरावरचा. तिथे मी पूर्ववाहिनी होऊन पंढरपूर जवळ सरकोली येथे भीमा नदीला मिळते. भीमा पुढे इंद्रायणी रूप धारण करून आम्ही सगळ्या भगिनी म्हणजे सगळ्या नद्या.. भेटतो तेव्हा हि अशी चर्चा होते. कोणत्या नदीकाठी कोणते संत जन्माला आले, कोणती मंदिरे आहे, कुठले देव वस्तीला आहेत, ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ काय. उदा, इंद्रायणी माझी मोठी बहीण तिच्या काठी ज्ञानोबा वस्ती करून राहिले. , भीमा हि देखील माझी सख्खी मोठी बहीण, मी पुढे पंढरपूरजवळ सरकोळी येथे तिला जाऊन भेटते. पुढे भीमा चंद्रभागेचे रूप धारण करतो. तर ते साक्षात सावळे परब्रह्म युगे २८ तिच्या काठी उभे आहे.  कृष्णानदी हि सर्वात मोठी ताई, तिच्याकाठी दत्तमहाराज वस्तीला आहेत. गोदावरीमाईकाठी तर चक्क श्रीराम सीतामाई येऊन राहिले, शिर्डीचे साईबाबा सारखे संत पण गोदावरी काठी.  


मी बापडी सर्वात लहान., अन आपल्याही काठी संतांनी वास करावा असे मला सतत वाटे. काय होतं , कि स्नानाला, पापक्षालनासाठी येणाऱ्या माणसांमुळे आम्ही नद्याही अपवित्र झालेल्या असतो. साधुसंतांनी किंवा सत्पुरुषांनी स्नान केले कि आम्ही पवित्र होतो. तू ऐकले असेलच कि स्वतः गंगामैया नर्मदा नदीमध्ये वर्षातून एकदा स्नानाला येते. मला ती नर्मदा मैय्याची गोष्ट आठवली की वर्षातून एकदा  काळ्या गायीच्या रूपात गंगामाई नर्मदामाई मध्ये प्रवेश करते आणि सफेद होऊन बाहेर पडते. असो, तर माणगंगा माई पुढे सांगू लागली. "सीतामाईच्या डोंगरावर जन्म झाल्याने मी रामरायालाच कळवळून साकडे घातले, कि रामराया माझ्याही काठावर कोणी सत्पुरुष जन्माला येऊ दे.. " आणि वाट पाहू लागले.

अनंत काळ प्रतीक्षा केल्यानंतर रामाने माझी विनंती ऐकली असावी. अन तो दिवस उजाडला. सकाळी सकाळी माझ्या इथे धुणे धुवायला येणाऱ्या बायाबापड्या बोलत होत्या.. ते माझ्या कानावर पडले. "ऐकलं का, वत्सलाबाई? उत्तरेतून गंगेची कावड घेऊन रामेश्वरला जाणारा कोणी गोसावी आला होता म्हणे इनामदारांच्या वाड्यात भिक्षेसाठी. आणि आपल्या दिवस भरत आलेल्या गीताबाई भिक्षा वाढायला गेल्या तेव्हा आश्चर्याने ' मेरे लाला , तुम यहा है, तेरे दर्शनसे मै धन्य हुआ हु! मैं अब वापस जाता हुं! आणि म्हणे रामेश्वरला निघालेला तू परत माघारी गेला. ! काय बाई आक्रीतच !"  तशी धुणे धूत असलेल्या वत्सलाबाई आश्चर्याने डोळे मोठे करून पाहू लागल्या. अन मग भानावर येऊन इनामदारांच्या वाड्याकडे पाहून हात जोडत म्हणाल्या. " म्हणजे याचा अर्थ कळला का, मंगला बाई? कोणीतरी सत्पुरूष येणार बघा गीतामाईच्या पोटी! "
तसेही इथले सत्वशील इनामदार रावजीपंत कुलकर्णी यांच्या पत्नी गीतामाई या गर्भारशी असल्याची कुणकुण मला याच बायकांमुळे लागली होती.
मी लगेच कान टवकारले.
"अगंबाई खरच की! आपले भाग्य उजळणार म्हणा की". गोंदवले आणि परिसरातील गावकऱयांचा नव्हे तर प्राणिमात्रांचा देखील उद्धार होणार या भावनेने त्या दोघींनी हात जोडले.  
" चला, आपले गाऱ्हाणे रामरायाने ऐकले तर! मी मनोमन सुखावले. आपली अनेक वर्षांची प्रतीक्षा संपून आपल्या या छोट्याश्या गावात आता एक महात्मा जन्म घेणार या भावनेनेच मी सुखावले. आता प्रतीक्षा होती, या सत्पुरुषाच्या आगमनाची.

इ.स. १९४५, माघ महिना, वद्य एकादशीचा दिवस. रावजीपंतांच्या वाड्यातून रात्रभर भजनाचा आवाज माझ्यापर्यंत येत होता. पहाटेपर्यंत भजन सुरु होते.
भजन संपत नाही तोच.. वाड्यावर सुईणीची लगबग दिसू लागली. अन सूर्योदयाच्या वेळी, त्या घरातून टॅंहा टॅंहा ऐकू येऊ लागला. लिंगोपंत आजोबा, रावजी पंत सगळेच आनंदले होते. आज रावजीपंतांचा सुपुत्र जन्माला आला होता. अख्खे गोंदवले गाव आनंदून गेले होते. अवघ्या काही दिवसातच बाळाचा नामकरण विधी करण्यात आला. आणि बाळाचे नाव '' गणपती '  ठेवले गेले. पण सगळे लाडाने त्यास 'गणूबाळ' म्हणत. दिसामासांनी बाळ मोठा होत होता..सर्व घरावर बाळराजांची सत्ता होती. तश्या त्याच्या लीला वाढत चालल्या होत्या. अख्ख्या गोंदवले गावाचा लाडका होता. क्रमाक्रमाने पालथे पडणे, पुढे सरकणे , रांगणे सुरु झाले होते.
आज काय गणूबाळाने हे केलं, उद्या काय ते केलं अश्या सगळ्या बातम्या माझ्या कानावर येत होत्या.
अन ते ऐकूनच मला त्याला बघण्याची उत्सुकता लागली होती. बघता बघता बाळ ५ वर्षाचा होऊन गेला. गणुबाळाच्या खोड्या वाढत होत्या.

३-४ वर्ष गेली. माझ्या गणुची मुंज झाली. मुंज झाल्यावर गणूची वृत्ती अधिकाधिक अंतर्मुख होऊ लागली.
आणि एक दिवस मी, पहाटेच्या अंधारात एक बाल आकृती माझ्या इकडे येतांना पाहिली... लपत छपत नाही. तर दमदार पावले टाकत, अगदी निश्चयी पावले! इथे काठावर असलेल्या स्मशानाच्या बाजूला कपारींमध्ये जाऊन स्वारी आसनमांडी घालून समाधी लावून बसली. एवढ्याश्या लेकराला पाहून माझा जीव कळवळला." अरे अरे बाळा, इकडे क्रूर श्वापदे, भूत खेतांची फेरी असते रे , असं नको करुस.. अपरात्री"  असे मी त्याला मनोमन विनवत होते. पण त्याची ती संयमी, शांत मूर्ती पाहून धीर आला. कुठून आले असेल हे धाडस! थोड्याच वेळात मशाली हातात घेऊन लोकांचा गलबला ऐकू आला, पाठोपाठ  दूरवरून गणू बाळ , गणू बाळ .. अश्या हाकाही ! मी उमगले, कि आपण ज्याच्या दर्शनासाठी आसुसलेलो होतो तोच  हा गणूबाळ ! बाबांची हाक ऐकून समोरच्या कपारीतून उतरत होता. काळेकुरळे भाळी रुळणारे केस, टपोरे डोळे, तेजोमय अंगकांती, गुटगुटीत बांधा, सरळ नाक... असे ते परब्रम्ह माझ्यासमोर उभे होते. नकळत मी मनोमन हात जोडत त्याच्या चरणांना नमस्कार केला. आणि गणूबाळाने त्याच क्षणी खाली वाकून पायाजवळ आले पाणी ओंजळीत घेऊन आपल्या माथ्यावर प्रोक्षण केले. मी मनोमन सुखावले. काय संतांची कृपा असते हो. जे पायापाशी येतात त्यांना ते क्षणार्धात डोक्यावर धरतात.
रावजीपंतांनी त्याला जवळ घेतलं. आणि घरी घेऊन गेले. नंतर ही एक दोनदा, गणूबाळ पहाटप्रहरी येथे येऊन बसला होता. पण आता घरच्या लोकांना माहित झाले होते.
सात वर्षाचा झाल्यावर गणुबाळाला शाळेत टाकण्यात आले. तिथेही त्याचे उपद्व्याप सुटले नव्हते. घरी तक्रारी येत.. मग शाळेतून काढून गाई राखायला पाठवण्यात आले.
तिथेही अनेक गमती जमती घडल्या.. जणू कृष्णाच्या खोड्याच. आता गणू ९ वर्षाचा झाला होता. रोज पहाटे माझ्या इथे स्नानाला आला की २-२ तास ध्यानस्थ बसे. एकादशीच्या दिवशी तर पूजा करून डोळे झाकून बसला म्हणजे तासनतास निघून जात.

आणि एक दिवस पहाटे तीन - साडे तीनच्या सुमारास  मला माझ्या इथे बाजूच्या झुडुपात कुजबुज ऐकू  आली. मी कान टवकारले...नीट निरखून पाहिले तर, हा गणुबाल आणि अरेच्चा हा तर गणूबाळाचा चुलतभाऊ दामोदर... हा दुसरा तर गणुचा मित्र म्हासूर्णेकर शास्त्रींचा वामन! त्यांची खुस्फुस सुरू होती. "सदुरुंना शोधण्यासाठी आपल्याला बाहेर पडलेच पाहिजे".. असं काहीसं कानावर पडलं.. आणि बघता बघता हे तिघे गोंदवले गावापासून दूर जाऊ लागले. मी अचंभित. म्हणजे आता गणू बाळाने गुरूशोधार्थ जायचे ठरवले आहे तर!!

माझा बाळ माझ्यापासून दूर जात होता. गुरूच्या शोधार्थ मधला काही काळ शांततेत गेला.. मी रोज बाळाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहायचे. त्याच्या जन्मदात्या आईची काय अवस्था होत असेल याची मला कल्पना येत होती. . आणि मग अनेक वर्षांनी , गणूबाळ इथे अवतीर्ण झाला. इथे ही त्याच्याकडून खूप लीला घडल्या. गोपालन, गोरक्षण  काय, अखंड अन्नदान काय, ठिकठिकाणी राममंदिर बांधणे काय,.. ब्राह्मणसभा काय, कित्येकांना त्याने मार्गाला लावले, कित्येकांचा अंतकाळ साधला, कित्येकांच्या अंगातील पिशाच्चांना मुक्ती दिली. कसायाहातून गाई सोडवल्या, दरोडेखोरांना मार्गाला लावले, व्यसनी लोकांना व्यसनातून सोडवले, काय सांगू त्याचा कामाचा झपाटा!  भटकंती सतत सुरूच होती. माझा बाळ तीनदा भारत भ्रमण करून आला. इंदोर काय, उज्जैन काय, नैमिषारण्य, कलकत्ता, संपूर्ण भारतभ्रमण करत लोकांना नामाला लावत होता. शिष्यपरिवार वाढत चालला होता.
त्याच्या अनेक लीलांनी, इथं येणाऱ्या लोकांकडून समजणाऱ्या कौतुकाने मी  मनोमन सुखावत होते. समृद्ध होत होते. मला वाटते इ.स. १८९० साल होते. तेव्हापासून गणूचे वास्तव्य गोंदवले इथेच राहिले. सदाचार, नामस्मरण, सगुणोपासना, अन्नदान आणि सर्वांबद्दल प्रेमभाव, यांवर त्यांचा विशेष भर होता. राहत्या वाड्यातच श्रीराम, सीता व लक्ष्मण, तसेच मारुती, यांची स्थापना केली. पुढे, भक्तमंडळींची संख्या आणखी वाढत गेल्यावर त्याने गावातच आणखी एक राममंदिर, एक दत्तमंदिर व एक धर्मशाळा' बांधून निवासाची सोय वाढवली. पुढे एक शनिमंदिरही बांधले. शिवाय, जागोजागी उपासना वाढावी या हेतूने भक्तांना प्रेरित करून अन्य कित्येक गावी राममंदिरांची स्थापना केली. मध्यंतरी भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा गणूबाळाने शेतीची कामे काढून हजारो लोकांना अन्न पुरवले. ब्रिटिशांची सत्ता होती ग तेव्हा. राजाला हे पहावले गेले नाही. आणि काय सांगू, माझ्या गणूबाळाला विष घातले ग त्यांनी!  ते हि पचवून परत तो उभा राहिला.  लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले. गणू माझा थकला होता. "मी इथे केशर कस्तुरी घेऊन बसलो आहे पण सगळे हिंग जिऱ्याचे गिर्हाईक!"  अशी खंतही त्याने व्यक्त केली होती. नामाची थोरवी गाता गाता त्याचा प्रत्येक क्षण गेला.

१९१३ साल उजाडले. त्या वर्षीची रामनवमी झाली. आलेल्या सगळ्या वस्तू गणूने लोकात वाटून टाकल्या. गणू तसा गंमतीमध्ये आडून आडून सूचना करत होताच. पण लोक हसण्यावारी नेत होते. आषाढी एकादशीला पंढरपूरला गेलेला गणू चार महिन्यांनी परत आला. दिवसामागून दिवस जात होते. गणूचा दमा वाढत चालला होता. दिवसेंदिवस शक्ती क्षीण होत होती. पायावर सूज येत होती. इथे माझ्यापर्यंत बातम्या येत होत्या. मी सुन्न झाले होते.

होता होता मार्गशीर्ष महिना, दत्तजयंती आली. गणूला जोराचा दमा लागला होता, उभे राहता येत नव्हते. . २१ डिसेंबर उजाडला.. रविवार होता तेव्हा. माझ्या गणूने त्या रात्री शेवटचे भजन केले. श्रीरामा निरोप द्यावा, देई अखंडित सेवा।।,  आजवरी तुम्हा सांगितली मात, नामाविण हित समजू नका ।। भजनांचा आवाज इथवर येत होता.
सरली आयुष्याची गणना, आता येणे नाही पुन्हा ।। हे माझा गणू आळवून आळवून म्हणू लागला आणि माझ्या काळजात चर्रर्र झाले.  लोकांना रडता येईना, दुःख मनात मावेना.. ! भजन होता होता.. रात्री दीड वाजता आरती झाली. सोमवार २२ डिसेंबर, गणू पहाटे सिद्धासनात बसून डोळे झाकून घेतले.. सव्वा पाचला त्याची समाधी उतरली, शौच मुखमार्जन करून हातपाय धुवून आला. आणि रामरायाला साष्टांग नमस्कार घालून काय म्हणाला असेल?
"माझ्या माणसांना सांभाळ म्हणाला ग तो! " किती कळकळ... अंतसमयी पण इतरांसाठी मागणे मागितले. "
आणि ।। जेथे नाम तेथे माझे प्राण । ही सांभाळावी खूण ।। एवढे शेवटचे उच्चारून हा महापुरुष अनंतात विलीन झाला. बातमी वार्यासारखी पसरली. अख्खे गोंदवले गाव दुःखात बुडून गेले. सर्वांचा मायबाप हरपला होता. गावोगावचे लोकांनी इकडे धाव घेतली. लोकांचे लोंढेच्या लोंढे इकडे येऊ लागले.

मी तर स्तब्धच झाले होते. मीच काय माझ्या काठावरचे सगळे वृक्षवल्ली, प्राणिमात्र स्तब्ध होते. सूर्योदयाच्या वेळेस गोंदवल्याचा अध्यात्मसूर्य मावळला होता. आणि काय सांगू, माझी जीभ उचलत नाहीये बोलायला... अडखळत माणगंगा म्हणाली, "तिसऱ्या दिवशी गोठ्याजवळ गगनाला भिडलेल्या ज्वाळा माझ्या तीरावरून दिसत होत्या. "

आम्ही दोघी निशब्द झालो होतो. फक्त डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या.
दुरून समाधी मंदिरातून आरतीचे शब्द वाऱ्यावर लहरत येत होते, " स्वामी माझा पाहिला या माणगंगातीरी....

जय श्रीराम!
महाराज कन्या

टीप: वरील कथा संपूर्णपणे काल्पनिक असून.. मनात आलेले विचार कागदावर उतरवले आहेत. कथेचा कोणत्याही जीवित वा मृत व्यक्तीशी संबंध नसून श्रीमहाराजांच्या चरित्रातील प्रसंग/ व्यक्तिविशेष/ ठिकाणे ही प्रसंगानुसार संदर्भासाठी घेतली आहेत. माणगंगेच्या दृष्टिने पाहायला गेलं तर तिला महाराज कसे भावले असतील हा विचार केला गेला होता.
काही चुकीचे वाटल्यास क्षमस्व! 


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...