मंगळवार, १४ जानेवारी, २०२५

जय श्रीराम! 

 पाऊलखुणा - ९

 बहू मंदिरें स्थापिलीं धन्य कीर्ती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ 

 "बहुमंदिरे स्थापियेली" या शृंखलेअंतर्गत पुढची मंदिरे खालीलप्रमाणे :

 ४. बेलधडी राममंदिर - ई. स.१८९६ श्रीराममंदिर पो. बेलधडी, जि. गदग - ५८२१०१, कर्नाटक
बेलधडी हे स्थळ म्हणजे श्रीमहाराजांचे श्रेष्ठतम शिष्य पु. ब्रम्हानंद बुवा यांची तपोभूमी. याच स्थळी त्यांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली होती. सर्पेश्वरी जपानुष्ठान झाल्यानंतर, श्रीमहाराजांनी त्यांना आज्ञा केली होती की कर्नाटकात रामनाम प्रसार करावा.
त्यानुसार ते सुरवातीला जालिहाळ या गावी आले. तिथून बेलधडी येथे आल्यावर त्यांनी त्यांची उपासना सुरु केली.. नियमित पूजा अर्चा, माधुकरी सेवन, दुपारी पुराण, कीर्तन, व रात्री भजन असा उपक्रम सुरु झाला. लोक आता त्यांना अनंत शास्त्री ऐवजी ब्रम्हानंद गुरु असे संबोधू लागले. याच सुमारास त्यांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली. तेव्हा त्यांनी काही भाविकांना सूचना देऊन ठेवल्या होत्या की आपण कुठेही असलो तरी आपल्याला शोधून न चुकता खाऊ घालावे. कारण ही अवस्था भान रहित असते. योग्यास शरीराचे भान नसते. या अवस्थेत बेलधडीकरांनी ब्रम्हानंदांची चांगली सेवा केली. विशेषतः तेथील भाविक रंगराव इनामदारांच्या पत्नी द्वारकाबाईंनी त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली . या अवस्थेत ही बुवांकडून अनेक चमत्कार घडले. नंतर ते हळूहळू भानावर आले. आता मात्र जोमाने कार्याला सुरूवात केली. बेलधडीत राममंदिर व्हावे अशी इच्छा त्यांनी इनामदारांजवळ व्यक्त करताच त्यांनी आनंदाने होकार दिला.
एवढंच नव्हे तर जमीन आणि अर्थसहाय्य देखील देऊ केले. पु बुवांनी मंदिर उभारणीचे काम सुरु केले. त्यांनी पायसुद्धा स्वतः खणला. पायामधे लागणारे दगड स्वतः डोक्यावरून वाहून आणले. तरी म्हणावी तशी प्रगती दिसेना. अर्थसहाय्य कमी होते. म्हणून त्यांनी श्रीमहाराजांना साकडे घालायचे ठरवले. आणि त्यासाठी गावाजवळच्या देवळात अनुष्ठानाला बसले. १० व्या दिवशी चमत्कार घडला. १०० अनुयायांसह श्रीमहाराज स्वतः बेलधडी गावी पोहचले. आणि हनुमान मंदिरात मुक्काम केला. श्रींची गौरकाय तेजस्वी मूर्ती पाहून लोक धन्य झाले. महाराजांचा मुक्काम तिथे १० दिवस होता. रोज निरुपणे होत. महाराजांच्या रसाळ वाणीचा प्रभाव बेलधडीकरांवर पडला. सीताशोधनाचे वेळी प्रत्यक्ष रामप्रभूंचे पाय या गावी लागले होते म्हणून मी ब्रम्हानंदास इथे पाठवले असे त्यांनी सांगितले. आता तेथील ग्रामस्थ ब्रम्हानंदांना मंदिर बांधणीस मनापासून मदत करू लागले. थोड्याच दिवसात ब्रम्हानंद बुवांनी नामसप्ताह करण्यास आरंभ केला. अन्नसंतर्पण सुरु केले. मंदिर बांधणीसाठी भरपूर द्रव्य मिळू लागले आणि १ वर्षाच्या आत मंदिर उभारले गेले. बुवांनी अत्यंत मनमोहक अश्या राम, लक्ष्मण, सीता मारुतीच्या मूर्ती करवून घेतल्या आणि स्थापनेसाठी श्रीमहाराजांना बोलवले. कर्नाटकातील विद्वान पंडित होतेच, आणि बडोदा, काशीवरून शास्त्री पंडितांना बोलवण्यात आले.
महाराजांचा मुक्काम तेव्हा म्हसवडला होता. तिथून शेकडो शिष्यांना बरोबर घेऊन महाराज निघाले. इंदोर, हरदा, गोंदवले येथील मंडळीही होती. चैत्र शु. चतुर्दशीला बेलधडी गावी पोहचले.इ.स. १८९५, श्रीशके १८१७ मन्मथनाम संवत्सर चैत्र वद्य द्वितीया या शुभमुहूर्तावर हजारो लोकांच्या उपस्थितीत गुरुवारी श्रींच्या हस्ते श्रीराम, सीता, लक्ष्मण, मारुती यांच्या मूर्तीची बेलधडी मध्ये स्थापना झाली. आणि बेलधडी गाव रामनामाच्या गजरात बुडून गेले. बेलधडी येथील श्रीमहाराजांच्या पादुकांची माहिती अशी:
गोंदवल्यात एकदा भर उन्हाळ्याच्या दिवसात अचानक दुपारी श्रीमहाराजांनी घोडागाडीतून शेजारच्या गावात जायचे ठरवले. त्यांनी ब्रम्हानंदबुवांना पण त्यांच्याबरोबर लगेच येण्यास सांगितले. गुरूची आज्ञा शिरसावंद्य मानून ब्रम्हानंदबुवा क्षणाचाही वेळ न घालवता तसेच निघाले. पायात चप्पल घालण्यास लागणारा वेळही वाचावा म्हणून ते तसेच अनवाणी श्रीमहाराजांच्या घोडागाडी मागून थावू लागले. जमीन खूप तापली होती. वर सूर्यदेवता आग ओकित होती. श्रीमहाराजांनी ब्रम्हानंदबुवांना घोडागाडीत शेजारी येऊन बसण्यास सांगितले, पण आपल्या गुरूंच्या मांडीला मांडी लावून बसणे ब्रम्हानंदबुवांना प्रशस्त वाटेना. श्रीमहाराजांनी आपल्या पायातील लाकडी पादुका ब्रम्हानंदबुवांकडे टाकल्या. पण त्या पायात न घालता आपल्या डोक्यावर ठेवून ब्रम्हानंदबुवा त्या घोडागाडीच्या मागे धावू लागले. पुढे आदरणीय भाऊसाहेब केतकरांना सांगताना ते म्हणाले," काय सांगू तुम्हाला ? श्रींच्या पादुका डोक्यावर ठेवून धावत असताना ऊन असूनही अगदी पोर्णिमेतल्या चांदण्यात नाहून निघाल्यासारखे वाटत होते मला." पुढे त्या लाकडी पादुकांना रेशमी धागा बांधून ब्रम्हानंदबुवा मंगळसूत्राप्रमाणे त्या आपल्या गळ्याभोवती ठेवत असत. 

***** 
 ५. आनंदराममंदिर, जालना (आनंदवाडी) ई.स.१८९६ आनंदवाडी, जालना - ४३१२०३, महाराष्ट्र
आनंदवाडी राम मंदिर हे खरे तर श्रीमहाराजांचे शिष्योत्तम पु. आनंद सागर महाराज यांची तपस्थली आहे. इ.स. १८९३-९४ साली समर्थ सदगुरु श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रथम व अंतरंग शिष्य श्री आनंदसागर महाराज (पारनेर ता. अंबड) यांना एकांती नामजपाकरिता उत्तरेकडे जा...अशी गुरुआज्ञा झाली त्यानुसार पारनेरवरून पायी चालत जालना वरून जात असता अंबड वेशीजवळील येथील सद्यःस्थितीतील मंदिराचे शिखर दिसले. खरे तर ते ३५० वर्षांपूर्वीचे भैरवनाथाचे मंदिर होते.
आजूबाजूस दाट जंगल होते. एकांत होताच. श्रींची इच्छा समजून येथील मुळ भैरवनाथ मंदीरात निवास सुरू झाला. माधुकरीपुरते दुपारी गावात भिक्षेस जावून शक्यतो सर्व वेळ केवळ रामनाम व उपासनाच चालत असे. सोबत होती सदगुरूंनी दिलेली रामपंचायतनाची मुर्ती पंचधातुची नित्य अव्याहत जपउपासना त्यामुळे मुर्ती जागृत झाल्या म्हणजेच श्रीरामपंचायतन भैरवनाथांच्या जागी व श्री भैरवनाथ बाहेर येवून बसत.
अनेक दिवस असेच होत राहिल्यावर श्री सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कानावर घातले. अति प्रसन्न मुद्रेने श्री महाराजांनी अंतर ज्ञानाने जाणून घेवुन सांगितले भैरवनाथाने जागा देऊ केली व श्रीराम तेथे बसु इच्छितात आपण तयारीला लागा, श्रीराम कृपेने सर्व घडून येईल. तसेच घडले व १८९५ च्या चैत्र शुध्दात श्रीराम-लक्ष्मण जानकी अशा संगमरवरी मुर्ती आणविल्या गेल्या. त्यांची स्थापना श्री ब्रह्मचैतन्य महाराज हस्ते शास्त्रोक्त पध्दतीने अनेक वैदिक, शास्त्री पंडित, विद्वान असे प्रांतातल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडली. तेव्हा पासुन आजपावेतो श्री महाराजांनी घालून दिलेल्या समर्थ सांप्रदायिक पध्दतीने त्रिकाल अर्चनात्मक सगुणोपासना नामस्मरण, अन्नदान, उत्सव-महोत्सव दासबोध पारायण, भागवत, रामायण, नामवंतांचे गायन, प्रवचन, किर्तन आजतागायत सुरू आहे.
श्री रामानंद महाराज, ब्रह्मचैतन्य महाराजांचे पट्टशिष्य यांनी केवळ राम भिक्षेवर ८ वर्ष अन्नत्याग करून इ.स. १९१७ ते १९२४ या काळात सतत फिरून नामप्रचार करून उपासना प्रचारातून त्या काळाच्या रूपये ६०,०००/- किंमतीचा हा भव्य सभामंडप बांधला. त्याकाळी स. श्री प्रल्हाद महाराजांसारखे अलौकिक शिष्य सेवेत होतेच. वैशिष्टय असे की पूर्ण बांधकाम रामनामात झाले. विटा लावणे, पाणी घालणे, चुन्याच्या घाण्या टाकणे या कामी सर्व रामोपासक मंडळी सतत रामनाम घेत घेत झटत होती. श्री.प.पू. आनंद सागर महाराज यांनी श्रीराम स्थापनेनंतर काही दिवसातच आपले ममत्व राहू नये म्हणुन श्री गुरुचरणी म्हणजे श्री स.स. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी समर्पित केले. तेव्हापासून संस्थान गोंदवले येथील विश्वस्तांचे मार्गदर्शना प्रमाणे चालत आहे. श्री आनंदसागर महाराज, श्री रामानंद महाराज, श्री प्रल्हाद महाराज (साखरखेर्डा) यांनी १३ कोटी रामनाम जपाची अनुष्ठाने केलेली अशी ही पवित्र भुमी आहे.
श्री(भाऊसाहेब)
श्रीनिवास जवळगेकर हे डोंबर जवळगे (ता. दक्षिण सोलापूर) गावचे वतनदार (पाटील ) होते. त्यांना अपत्य न झाल्याने महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते गोंदवले इथे गेल्यानंतर श्रीमहाराजांनी त्यांना श्रीरामाची सेवा करण्यास सांगितले. कालांतराने त्यांना अपत्य झाले. श्रीरामाचा प्रसाद म्हणून त्या मुलाचे नाव राघवेंद्र ठेवण्यात आले. नंतर श्रींनी त्यांना १३ कोटी रामनामाचा जप करण्यात सांगितले आणि श्रीरामाचे मंदिर बांधण्यास सांगितले. स्वतः महाराज कर्नाटकातून येतांना सोलापूर येथे स्थापनेसाठी आले होते.
श्रीमहाराजांनी रामाची स्थापना जवळगेकरांच्या जुन्या वाड्यात केली त्यानंतर (१९१७)मध्ये राहत्या वाड्यातच जवळगेकरांनी मोठे मंदिर बांधले. इथे श्रींनी घडवलेली फोटोग्राफर आणि श्रींच्या फोटोबद्दलची लीला सर्वश्रुत आहेच. 

 जय श्रीराम! 

 संकलन - श्रीमहाराजकन्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...