गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

 श्रीमहाराजांचे काही ज्येष्ठ साधक

श्री अण्णासाहेब मनोहर

इ.स. १९२० मध्ये श्रीमहाराजांचे इंदोर येथील महान अधिकारी शिष्य श्री भैय्यासाहेब मोडक पुण्यात श्री वासुदेवराव फडके यांच्याकडे काही दिवस राहत होते. तिथे ते दररोज रात्री तुलसीदास रामायण सांगत असत. त्याचबरोबर श्रीमहाराज पूर्वी इंदोर येथे असतांना त्या गोष्टी हि अत्यंत प्रेमाने सांगत असत. हे ऐकण्यास पुण्यातील एक मॅकेनिकल इंजिनियर श्री अण्णासाहेब मनोहर जात असत. भैय्यासाहेबांच्या सांगण्याचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला कि श्रींना भेटावे असे त्यांना वाटू लागले. श्रींनी देह ठेवल्यास तोवर त्यांना माहित नव्हते. एक दिवस त्यांनी भैयासाहेबांना विचारले. आणि जेव्हा ते देहात नाहीत असे कळले तेव्हा त्यांना फार दुःख झाले आणि आता श्रीमहाराजांचे दर्शन मला कसे होईल याचा त्यांना रात्रंदिवस ध्यास लागला. तसे ते वरचेवर भैय्यासाहेबांना विचारत असत. एक दिवस भैय्यासाहेबांनी त्यांस जवळ घेऊन सांगितले की, श्रीमहाराजांस काय आवडत होते व ते कशात आहेत ते तुम्ही केले तर श्रीमहाराज तुम्हास भेटतील असा माझा भरवसा आहे. पुढे म्हणाले, कि श्रीमहाराजांस श्रीरामनामाचे अत्यंत प्रेम आहे. तरी तुम्ही त्याचा होईल तितका जप करीत जा. श्रीमहाराज तुम्हाला दर्शन देतील.असे सांगितल्यावर श्री अण्णासाहेबांनी निश्चय करून श्रींच्या भेटीची अपेक्षा ठेवून दररोज पहाटे ४ वाजता उठून अंघोळ वैगेरे आटोपून सकाळी सात वाजेपर्यंत जप करून ते कामावर जात असत.असा क्रम सुमारे पाच वर्षे चालला होता. ते अत्यंत भाविक, श्रद्धाळू, आणि चिकाटीने वागणारे होते.
पु. तात्यासाहेब केतकर म्हणतात, त्यांची खरी तळमळ श्रींचे आगमनास कारण झाली यात शंकाच नाही.

एकदा रा.अण्णासाहेब मनोहर यांस शंभर रुपयांची गरज पडली. त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांचेकडे शंभर रुपये नक्की होते, पण त्यांनी जेथे ते पैसे ठेवीत त्या पेट्या कपाटे सर्व शोधूनही कोठे सापडले नाहीत. ते फार अस्वस्थ झाले. दुसरे दिवशी सकाळला ते पाहिजे होते. सकाळी काही कामाकरिता ते कपाट उघडतात तो समोरच शंभर रुपयांची एक नोट पडलेली दिसली. ती दिसताच त्यांना श्रींची आठवण झाली. मन अस्वस्थ झाले हे बरे नाही असे त्यांना वाटले. श्रीमहाराज तेथे गेल्यावर त्यांनी ती नोट श्रींपुढे ठेवून सर्व हकीकत सांगितली. श्रींनी ती नोट त्यांना परत देऊन म्हटले,'असल्या हलक्यासलक्या कारणासाठी मन अस्वस्थ होणे बरे नाही. श्रीराम इच्छेने सर्व घडते ही भावना ठेवून वागावे'.

अण्णासाहेबांची मुलगी सुंद्राताई अकोल्यास रहात असे. ती फारच आजारी असल्याची तार आल्यामुळे श्री.अण्णासाहेब मंडळीसह अकोल्यास जाण्यासाठी निघून वाटेत श्री.गोंदवलेकर महाराजांकडे (वाणी अवतार) दर्शनासाठी आले. श्रींनी त्यांना अंगारा दिला व तिला आशीर्वाद सांगण्यास सांगून त्यांस निरोप दिला. ते तिथे पोहोचले तेव्हा सुंद्राताई श्वास लागलेल्या स्थितीत होती. त्यांनी तिला अंगारा लावून श्रींचे आशीर्वाद सांगितले. ती थोडावेळ शुद्धीत आली. आईवडिलांना पाहून तीला आनंद वाटला. ती म्हणली " यांतून मी वांचेन असे दिसत नाही." त्यावर अण्णासाहेब म्हणाले श्रीनी "बरे वाटेल" असे सांगितले आहे. थोड्याच वेळात ती बेशुद्ध झाली. अशा अवस्थेत ती सुमारे एक तास होती. सर्वांची आशा सुटलीच होती.   पण नंतर तिने डोळे उघडले व ती रडू लागली. तेव्हा श्री.अण्णासाहेब म्हणाले "असे काय करतेस ? रडू नये" ती म्हणाली "काय सांगू तुम्हाला मी " कितीतरी आनंदात होते.पण खाली येऊन दुःखात पडले" व पुढे सांगू लागली " माझी शुद्ध नाहीशी झाली तशी मी वर वर जाऊ लागले. सात डोंगर चढल्याचे वाटले. तेथे एक मोठा हॉल होता.त्यामध्ये मोठी तेजपुंज मंडळी बसली होती. मला कोणीतरी मध्ये उभे केले. त्या मंडळीतच श्रीमहाराज बसले होते, ते म्हणाले "हिला कोणी आणले ? हिची वेळ अजून झाली नाही. तिला खाली नेऊन पोहोचवा.मी नमस्कार केला. त्या लोकांनी मला खाली आणले आणि मी सावध झाले.मी फार आनंदी वातावरणात होते." थोडे दिवसांनी तिची प्रकृती सुधारली. श्री.अण्णासाहेबांनी ही हकीगत पुण्यात आल्यावर श्री.महाराजांना सांगितली.

शेवटी शेवटी अण्णासाहेब वाताच्या झटक्याने आजारी पडले. अंथरूणाला खिळून होते. औषधपाणी चालू होते.त्यांची व्रुत्ती अगदी शांत होती. त्याच वेऴी श्रीक्षेत्र काशीस जाण्यासंदर्भात बोलाचाली चालू होत्या.श्रीमहाराज प्रत्यक्ष या संदर्भांत त्यांच्याशी बोलले नाहीत. पण श्रींचे बोलणे त्यांस ऐकू येत होते. त्यावर्षी गोंदवल्याचा उत्सव दि.१२/१२/१९३३ रोजी होता. श्रींनी गोंदवल्यास जावे असा श्री अण्णासाहेबांचा आग्रह होता.ते श्रींना म्हणाले "आपण नाही गेलात तर पुष्कळांना बरे वाटणार नाही.लांबची मंडळी येतात.तरी आपण जावे." त्या प्रमाणे जाण्याचे ठरले. श्रींनी त्यांना भेटून सांगितले की " अण्णासाहेब धीर सोडू नका.प्रारब्धाने आलेला भोग श्रीरामक्रुपेने दुर होईल." काही काळ दोघांसही बोलवेना. श्री म्हणाले "तुमची प्रक्रुती बरी झाल्याशिवाय मी काशीयात्रेला जाणार नाही.तुम्ही आलात तर मी जाईन." गोंदवल्यास उत्सवास जाण्याचे ठरले. श्री.अण्णासाहेबांच्या मंडळींना गोंदवल्यास येता येईना त्यांचे वाईट वाटले.श्री.त्यांना म्हणाले आपण वाईट वाटू देऊं नका; तुम्ही त्या वेळी तेथे जाल (गोंदवले येथे). याचा अर्थ त्यांना काहीच कळेना. उत्सव आनंदात चालला होता. पण श्री अण्णासाहेबांच्या अनुपस्थतींतीचा सर्वांवर परिणाम झालेला दिसला. अगदी गुलाल उधळण्याचे वेळी पुण्यांत श्री.अण्णासाहेबांचे मंडळीस डोळा लागला होता. त्याच वेळी घंटेचा आवाज त्यांनी ऐकला.जांगे होऊन डोळे उघडून पाहतात तो त्यांस श्रींच्या समाधींचे दर्शन झाले.त्यांस आनंद झाला. लगेच श्रीऩीं सांगितलेल्याची आठवण झाली.

शेवटी यांना अर्धांग झाला असतां एकाने विचारलें, महाराजांनी हें असें कसें केलें असें तुमच्या मनांत येत असेल, नाहीं? त्यांच्या डोळ्यांत खळकन पाणी आलें.ते म्हणाले, छे, छे, ! हा विचार माझ्या मनाला  शिवलासुध्दां नाहीं माझ्या प्रारब्धानें हा आजार आला, पण त्यामध्येसुध्दां माझें नाम पूर्वव्रत चालू आहे, ही महाराजांची खरी कृपा होय.

जय श्रीराम !
संकलन - श्रीमहाराज कन्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...