जय श्रीराम!
' बहु मंदिरे स्थापिली...' या शृंखलेत पुढची मंदिरे आहेत:
२६. हनुमान मंदिर, कागवाड इ. स. १९०९
कागवाड श्रीराममंदिर, पो. कागवाड, ता. अथणी, जि. बेळगाव- ५९१२२३, कर्नाटक
एकदा त्यांच्या मंदिरातील श्री हनुमान मूर्ती भंग पावली .गणबुवांना वाईट वाटले.म्हणून ते गोंदवल्यास गेले आणि श्री महाराजांना म्हणाले महाराज "श्रीरामा पुढे मारुती राय नाही. हे मला बरे वाटत नाही .आपण स्वतः कागवाडला येऊन हनुमंताची स्थापना करावी."यावर श्रींनी उत्तर दिले सत्य मी तुमच्या घरी येईन बरे. तुम्ही स्वस्थ असा." आज निघू उद्या निघू असे करता दोन महिने उलटून गेले तरी श्रींचे निघण्याचे चिन्ह दिसेना. तेव्हा गणुबुवानी उपवास करण्यास आरंभ केला .त्यांचे बरेच उपवास झाल्यानंतर श्री बोलले "बुवा अशा प्रकारे हट्टाने देहाला पीडा देऊ नये. आपले मन तपासून पहावे .पण मी पुढच्या दशमीला तुमच्याकडे येतो. तुम्ही आता घरी जा." श्री माझ्या घरी येणार आहेत हा सूक्ष्म अहंकार बुवांच्या मनात उत्पन्न झाल्याने, श्रींचे जाणे लांबत होते. त्यांची आज्ञा झाल्यावर बुवा कागवाडला परत गेले. समारंभाच्या तयारीला लागले .त्यांनी सर्व साहित्य आणले .मंदिर शृंगारले. सुंदर पदे रचून एक वेळा तयार केला आणि श्रींची सारखी वाट पाहू लागले. ठरल्या दिवशी श्री कागवाड ला गेले नाहीत. त्यामुळे बुवा निराश झाले आणि त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले.
श्रीमहाराज कागवाडला न जाता मिरजेस गेले आणि तेथेच त्यांचा मुक्काम बरेच दिवस लांबला. इकडे कागवाडला गणबुवांचे उपोषण सुरूच होते .मिरजेला असताना एके दिवशी रात्री बारा वाजता श्रींनी अंताजी पंत यांना हाक मारली व त्यांना सांगितले "पंत वेंकट भट्टांना बरोबर घेऊन उद्या सकाळच्या गाडीने कागवाडला जा, गणू बुवाच्या घरी.
तेथे पोहोचल्यावर बाहेरूनच मोठ्याने ओरडा की "महाराज आले". इकडे उपोषण करून सात दिवस झाले तरी श्री अजून येत नाहीत म्हणून गणूबुवानी विष प्राशन करण्याचा निश्चय केला. दुपारी तीन वाजता बुवांनी एका तांब्याच्या फुलपात्रात सोमल तयार करून पुढे ठेवले. त्यांनी एक माळ जप केला .श्रींची "ओवाळू आरती सद्गुरु चैतन्य ब्रह्मा " ही आरती म्हणून त्यांना नमस्कार केला आणि डोळे पाण्याने भरून येऊन विष पिण्यासाठी बुवांनी भांडे उचलले. इतक्यात "बुवा महाराज आले"असे शब्द त्यांनी ऐकले.भांडे तसेच खाली ठेवून त्यांनी खिडकीतून पाहिले. तर अंताजी पंत आणि व्यंकट भट्ट हे दोघे त्यांना दिसले तसेच ते धावत खाली आले आणि पंतांना त्यांनी मिठी मारली. थोड्यावेळाने भावनेचा भर ओसरला आणि आपण केवढे भयंकर कृत्य करीत होतो. पण शेवटी श्रींनीच आपल्याला त्यातून चातुर्याने वाचविले याची जाणीव बुवांना झाली व ते मोठ्याने रडू लागले. वेंकटभट्टानी विष ओतून दिले आणि सांगितले "बुवा तुम्ही काळजी करू नका .आम्हाला मुद्दाम पुढे पाठविले आहे महाराज उद्या येणार आहेत." नंतर महाराज मिरजेहून थेट कागवाड येथे आले. आणि त्यांच्या हस्ते मारुतीरायाची स्थापना झाली.
कागवाड मुक्कामी यावेळी श्रींच्या अनेक लीला घडल्या.
त्या गणुबुवांच्याकडे जी महारीण साफसफाईचं काम करायची तिने गणुबुवांच्या तोंडून अनेकदा श्रीमहाराजांचं नाव ऐकलं होत.तिला आस लागली होती श्रींच्या दर्शनाची. तिच्याकडे साधन नव्हतं.तिच्याकडे प्रयत्न होते प्रतीक्षा करण्याचे.तिला फक्त तो सद्गुरु एकदा डोळ्यांनी बघायचा होता, ती वारंवार गणुबुवांना म्हणायची की *"आपले महाराज कधी येणार आहेत,कधी येणार आहेत. आता ती एक घरातली हलक्या दर्जाची नोकराणी,म्हणून गणूबुवा एक दिवस तिला म्हणाले *"अगं तू सारखं सारखं विचारतेस की महाराज कधी येणार आहेत,काय पाहिजे तुला ?" ती म्हणाली ,'मला ना मरण पाहिजे त्याच्याकडून.मरण आणि मोक्ष हवाय मला त्याच्याकडून. बघा भगवंताची आस लागलेली ती महारीण आणि महाराजांचे ते अगदी उत्तरार्धातले शेवटचे दिवस होते.जीवाच्या करारावरती ते कागवाडला गेले.कोणासाठी गेले असतिल हो ते?
गणुबुवांच्या घरी हनूमंताच्या मुर्तीची स्थापना करणं हे एक निमित्य होतं.पण जी खरी त्यांची प्रतिक्षा करीत होती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. *त्या संतू महारिणीचे डोळे महाराजांना तिकडे बोलवत होते. ती महारीण असल्यामुळे तिला मंदिरांत प्रवेश नव्हता.घरात प्रवेश नव्हता,त्यामुळे ती बाहेर उभी होती.श्रीमहाराज म्हणाले *"बाहेर कुणीतरी उभं आहे,वाट बघतयं,त्यांना आत बोलवा."महाराजांना सांगण्यात आलं की,ती आत येऊ शकत नाही.त्यावर श्रीमहाराज म्हणाले की,ती आंत येऊ शकत नाही मी बाहेर जातो,असं म्हणून ते बाहेर जाऊ लागले.तीच्या साठी महाराज बाहेर गेलेले आहेत. बाहेर येणाऱ्या महाराजांना पाहून संतू महारणीला श्रीमहाराज म्हणजे प्रत्यक्ष मारुतीरायच आपल्या दिशेने चालत येत आहेत.असं अवर्णनीय रुप दिसु लागलं.तीने श्रीचें चरण चरण घट्ट धरले आणि म्हणाली,मायबाप आता या जीवाचे भोग सहन होत नाहीत हो.सोडवा मला यातून मला आपलंस करा.असं म्हणून रडू लागली.त्यावर महाराज तीला म्हणाले *राम तुझं कल्याण करील*असं म्हणून तीर्थाचा घोट तिच्या मुखांत घातला. *तू आता घरी जा आणि शांतातपणे राम नाम घेत पडून रहा.राम तुझं कल्याण करेल राम तुझ्या शेजारीच आहे.
त्या संतू महारणीची तयारी देखील तेवढीच होती.श्रीमहाराज येण्याच्या अगोदरच तीने प्रपंचाचे चंबूगबाळे विकुन टाकले होते.लोकांना आपला पैसा अडका देवून टाकला होता. कांही लोकांकडे पैसे देऊन माझं उत्तर कार्य तुम्ही करा बरं का पैशातून.श्रींच्याकडून.तीर्थ घेऊन ती आपल्या चंद्रमौळी झोपडीत आली,अंधोळ केली आणि फाटकं धोंगडं अंगावरती घेऊन *श्रीराम,श्रीराम,श्रीराम म्हणत झोपली.सकाळी ती कांही उठलीच नाही सकाळी महारलोक धावत जाऊन श्रींना ही बातमी सांगितली श्रीमहाज फक्त म्हणाले
"परमार्थाचा अधिकार हा बाह्यांगावरुन कधी कोणाच्या लक्षात येत नाही.पूर्व कर्मामुळे ती बाई महारीण झाली खरी पण तिचा अधिकार मोठा होता.रामाने तिचे खऱ्या अर्थाने कल्याण केलं"
**
तेथील राममंदिरापाशी एक पाण्याची विहीर असून तिचे पाणी भयंकर खारे असल्यामुळे उत्सवाच्या वेळी पाण्याचा फार तुटवडा पडे.गणुबुवांनी ही गोष्ट श्रींच्या कानावर घातली. तेव्हा ते म्हणाले" बुवा उत्सवाच्या वेळी स्वयंपाकासाठी हे पाणी घ्या. राम पाण्याला गोडी आणल." हे बोलणे सकाळी झाले. त्याच दिवशी दुपारी एक गोसावी कावड घेऊन श्रींची चौकशी करीत आला. दर्शन घेऊन त्याने आपली कावड त्यांच्या पायी अर्पण केली आणि तो म्हणाला "महाराज मै हूं श्री शंकर का भक्त! काशी की गंगा मै रामेश्वर को ले जा रहा था! पर श्री शंकरने मुझे दृष्टांत दिया और आज्ञा की कागवाड मे श्री ब्रह्मचैतन्य को गंगा दे दो! मुझे वह मिल जायेगी! इस वास्ते मै यहाॅ आया हूं! यह गंगा आपके चरणो मे रखता हुॅ! इसे कृपा करके ग्रहण कीजिए! श्रींनी त्या बैराग्याचा मोठा आदर केला. कावडी मधील गंगा सर्वांच्या अंगावर शिंपडली व सांगितले" बुवा रामाने अनायासे गंगा पाठवून दिले आहे .आपण ती विहिरीमध्ये टाकू. रामाच्या कृपेने पाणी गोड होईल." एका भांड्यात गंगा घेऊन सर्वजण "राम राम" म्हणत असता श्रींनी ती त्या विहिरीत टाकली. त्या विहिरीचे पाणी गोडे झाले. गोसाव्याला त्यांनी काशीला परत पाठवले.
*
मारुती स्थापने नंतर कागवाड येथे अप्पासाहेब कागवाडकर आणि मामासाहेब इनामदार यांनीही श्रींना भोजनप्रसादास बोलावले. श्रींनी त्यांना खिरीचा प्रसाद बनवण्यास सांगितले होते. येथील एक सज्जन मोरारजी भाते गिरणीवाले यांनी श्रींना घरी प्रसादास बोलावले. श्रींनी त्यांना अठरा पगड जातीच्या लोकांना जेवावयास बोलावण्याची अट घातली. त्याप्रमाणे त्यांनी उत्तमोत्तम आचारी बोलावून गावजेवण दिले. जैन आणि लिंगायतांसाठी वेगळा प्रसाद बनवला गेला. श्रीमहाराज इतके अन्नदान बघून खुश झाले आणि मोरारजीपंतांना पुत्र होईल असा आशीर्वाद दिला.
कागवाड चे एक सज्जन आप्पासाहेब पाटील यांनी श्रींना आटिव दूध पिण्यास आमंत्रण केले. बरोबर 300 मंडळी घेऊन श्री त्यांच्याकडे गेले. अप्पासाहेबांनी एक कळशी भरून अटीव दूध तयार केले होते. इतकी मंडळी आलेली पाहून काय करावे या चिंतेत ते असता श्रींनी त्यांना बोलाविले आणि सांगितले "आपण काळजी करू नये. रामाला नैवेद्य दाखवून कळशी माझ्याकडे आणून द्या." त्याप्रमाणे पाटलांनी कळशी त्यांच्यापुढे ठेवली. श्रींनी स्वतः आपल्या हाताने प्रत्येकाला आग्रह करून आटीव दूध प्यायला दिले .सर्वांनी पोटभर दूध पिऊन दोन शेर दूध कळशीमध्ये शिल्लक उरले.
*
कागवाड येथे आप्पासाहेब पटवर्धन नांवाचे राजघराण्यातील श्रीमंत गृहस्थ होते. त्यांच्या घराण्यास एक संन्यासी पिशाचरुपाने पीडा देत असे. प्रत्येक पिढीमध्ये एकजण वेडा असायचा. आप्पासाहेबांना विसावे वर्ष लागल्यावर त्या पिशाचाचा अंमल त्यांच्यावर सुरु झाला. त्यावेळी त्यांची देहस्मृती नाहीशी झाली , झोप समूळ गेली , मनुष्याची ओळख पटेनाशी झाली आणि ते कोणत्या वेळी काय करतील याचा नेम राहिला नाही. अशा अवस्थेत त्यांच्या आईने त्यांना नरसोबाच्या वाडीला नेले. तेथे रात्रंदिवस सेवा केल्यानंतर त्यांना श्रीदत्तप्रभूंचा दृष्टांत झाला की त्यांनी सद्गुरुंना शरण जावे .सद्गुरु कोठे भेटतील असा विचार मनात सारखा घोळत असतां पुन्हा श्रीदत्तप्रभूंचा दृष्टांत झाला , त्यांत असे दिसले की , गोंदवल्यास मोठ्या राममंदिरामध्ये श्रीमहाराज सिंहासनावर बसलेले आहेत . इतक्यात मोठ्या दरवाजातून श्रीदत्तप्रभू स्वतः आप्पासाहेबांना हाताला धरुन घेऊन आले . श्रीमहाराजांनी उठून श्रीदत्तप्रभूंना प्रेमाने आलिंगन दिले व दोघेही सिंहासनावर बसले. तेंव्हा श्रीदत्तप्रभू म्हणाले , " याला मी घेऊन आलो आहे , हा तुमचा तुम्ही सांभाळा . " श्रीमहाराजांनी आप्पासाहेबांच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि , " या , या बरं बाळ ! " असे उद्गार काढले. इतके होऊन ते दृश्य नाहीसे झाले.
आप्पासाहेब तेथून घरी परत आले आणि गोंदवल्यास जाण्याचा विचार करु लागले . इतक्यात कागवाडांतील रामदासी यांच्याकडून त्यांना कळले की श्रीमहाराज सध्या अयोध्येला आहेत. म्हणून ते त्यांच्याबरोबर अयोध्येला गेले . ते ज्या दिवशी तेथे पोंचणार त्या दिवशी स्वयंपाक होवून नैवेद्य झाला तरी श्रीमहाराज कांही केल्या जेवायला उठेनात . शेवटी मंडळींनी फार आग्रह केल्यावर ते पानावर जाऊन बसले , पण आपल्या उजव्या हाताला दोन पानें रिकामी ठेवायला सांगून त्यांनी सर्वांना बोलण्यात गुंतवले . अशी पंधरावीस मिनीटे गेल्यावर रामदासी व आप्पासाहेब तेथे येऊन पोंचले .
श्रीमहाराज जेवायला बसण्याचे कां थांबले होते हे मंडळींच्या ध्यानात आतां आले . नंतर थोड्या वेळांत त्या दोघांची स्नाने उरकून सर्वजण जेवायला बसले . जेवतांना श्रीमहाराज आप्पासाहेबांना हळूंच बोलले , " श्रीदत्तगुरुंचा निरोप मला पोंचला. " आप्पासाहेबांना अनुग्रह देवून श्रीमहाराजांनी अभय दिले. त्या दिवसापासून त्यांची मनःस्थिती सुधारण्याच्या मार्गाला लागली.
**
२७. विठ्ठल मंदिर, उकसाण - इ. स. १९१०
पुणे-मुंबई रस्त्यापासून कामशेत जवळ, जि. पुणे, महाराष्ट्र
उकसाण गावात महाराजांच्या हस्ते विठ्ठलाची स्थापना झाली आहे. अतिशय रमणीय व निसर्गरम्य असे हे स्थान आहे . महाराजांच्या चरित्रात " महाराजांनी स्थापिलेली मंदिरे " मध्ये त्याचा उल्लेख आहे . उकसान गावी एका सद्गृहस्थांना महारोगाची लक्षणे दिसू लागली होती. म्हणून ते निराश होते. योगायोगाने त्याची श्रीमहाराजांशी गाठ पडली. श्रीमहाराजांनी त्याचेकडून साडेतीन कोटी जपाचे उदक सोडवले व रामाची सेवा करण्यास, गोंदवल्यास राहण्यास सांगितले.
त्यांनी इतका सपाटून जप केला कि सहा वर्षात जपसंख्या पूर्ण केली.जसजशी जपसंख्या पूर्ण होऊ लागली तसतशी त्यांची व्याधी झपाट्याने कमी होऊ लागली .आपण लवकरच रोगमुक्त होणार असे त्याला वाटू लागले.एके दिवशी ते श्री महाराजांना म्हणाले, 'महाराज ,आपल्या कृपेने मी आता पूर्ण बरा होणार असे मला वाटू लागले आहे.पण मी जो साडेतीन कोटी जप केला त्याची पूण्याई खर्ची घालून माझा रोग मला बरा व्हायला नको आहे.माझा देहभोग भोगून संपवायला मी तयार आहे.'
त्याचे हे बोलणे ऐकुन श्रीमहाराज प्रसन्न झाले व म्हणाले ,' नामस्मरणाने माणसाच्या वृत्तीमघ्ये अमुलाग्र बदल होतो व त्याला वैराग्य प्राप्त होते, त्याचे हे धडधडीत उदाहरण आहे. उत्तम चाकरी केली म्हणजे दिवाळीला पगारवाढ तर होतेच, शिवाय मालक दिवाळीचे काही बक्षिसही देतो. तुमच्या उपासनेवर खुष होऊन दिवाळीच्या बक्षिसाच्या पोटी तुम्हाला रोग मुक्त करीत आहे, त्याचा स्विकार आनंदाने करावा. नामस्मरणाने तुम्ही जी पुण्याई संपादन केली ती अबाधित राहिली आहे.
ते गृहस्थ रोगमुक्त झाले खरे पण आता मुलीचे लग्न कसे होणार हि चिंता त्यांना भेडसावू लागली. तेव्हा श्रीमहाराज श्री भाऊसाहेब केतकर यांना म्हणाले की, "भाऊसाहेब यांची ही काळजी आपण दूर करू शकतो काय? एवढे पुण्यशील कुटुंब आहे. त्यांची मुलगी आपल्या बापूला दिली तर काय हरकत आहे"? आणि भाऊसाहेबांची निष्ठा काय वर्णावी, ते लगेच म्हणाले," महाराज, मी आपल्या शब्दाबाहेर नाही."
लग्न ठरल्याची बातमी जेव्हा गावात कळली तेव्हा गावातील बायका भाऊसाहेबांच्या मंडळींना म्हणू लागल्या की, जाणून-बुजून विस्तवाला का जवळ करता? विषाची परीक्षा का पाहता? त्यावर सौ. बाई ठामपणे म्हणालया की, "त्याची काळजी श्रीमहाराजाना आहे. भाऊसाहेबांचे तृतीय चिरंजीव चि.बापूला देखील श्रीमहाराज आपले कल्याण करतील याची पूर्ण खात्री होती. पुढे काही वर्षांनी हे लग्न श्रीमहाराज हरदा येथे मुक्कामी असताना झाले.
त्या गृहस्थाच्या घराण्यात पूर्वापार एक विठ्ठल मंदिर होते. ते जीर्ण झाले होते. त्याचा जीर्णोद्धार करण्याची श्रींची आज्ञा झाली. त्यानुसार त्यांनी नवीन मंदिर बांधले. उकसान येथील व्यापाऱ्यांनी त्यांना झालेल्या नफ्यातून नवीन विठ्ठल मूर्तीही आणल्या.
याच सुमारास मुंबईहून सर भालचंद्र भाटवडेकर यांनी श्रींना आग्रहाचे पत्र पाठवून आमंत्रण केले होते. श्रीमहाराज मुंबईला जात असताना उकसान कामशेत येथे त्या व्यापाऱयांनी त्यांना थांबवून नवीन विठ्ठल रखुमाई मूर्ती स्थापनेचा आग्रह केला. त्यानुसार १९१० मध्ये श्रीमहाराजांनी स्वतः त्या मूर्तींची स्थापना केली.
जय श्रीराम!









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा