गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

 जय श्रीराम!

बहू मंदिरे स्थापिली या शृंखलेअंतर्गत आपण श्रीमहाराज स्थापित मंदिरे बघत आहोत. तसेच त्या त्या गावी घडलेल्या घटना अभ्यासत आहोत.
या भागातली मंदिरे आहेत.

२३. आटपाडी राममंदिर १९०९
ब्राह्मणगल्ली, आटपाडी - ४१५३०१, जि. सांगली, महाराष्ट्र
यज्ञेश्वर विठ्ठल वांगीकर- पाठक बुवांनी बांधले.

श्रीमहाराजांच्या चरित्रात आलेली गोष्ट:
आटपाडी हे श्रीमहाराजांचे दुसऱ्या सासुरवाडीचे गाव.
या दुसऱ्या विवाहाची कथा चरित्रात आली आहे.
" महाराजांच्या प्रथम पत्नी सरस्वती यांचा १८७९च्या आसपास मृत्यू झाला. पुढे वडील रावजी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आई गीताबाई यांनी महाराजांना दुसरा विवाह करण्याचा आग्रह केला. महाराज तेव्हा तिशी पार केलेले होते. ते म्हणाले, ‘‘लग्नाबाबत मी तुझं ऐकेन पण एका अटीवर. मुलगी मी पसंत करीन!’’ आईनंही आनंदानं कबुली दिली. नंतर महाराज गोंदवल्यापासून बऱ्याच कोसांवर असलेल्या आटपाडी गावी, बापूसाहेबांच्या घरी आले. बापूसाहेबांचं घर तसं सुखवस्तू होतं, पण त्यांना पाच-सहा मुलीच होत्या. महाराज त्यांच्याकडे गेले व लग्नाच्या मुली दाखवा, असं म्हणाले.

 
महाराजांच्या घरी शेतीभाती भरपूर होती, कुळकर्णी म्हणूनही ते काम करीत होते. गोंदवले परिसरात अनेक जण त्यांचा सल्ला घेत. त्यामुळे महाराजांच्या परिचयाचं कुणीतरी लग्नाचं असावं, असं वाटून देशपांडे यांनी आनंदानं आपल्या मुलींना बाहेर बोलावलं. महाराज म्हणाले, ‘‘बापूसाहेब, तुमची अजून एक मुलगी आहे..’’ देशपांडे आश्चर्यानं म्हणाले, ‘‘हो पण ती जन्मापासून आंधळी आहे. तिच्याशी कोण लग्न करणार❓’’ महाराज म्हणाले, ‘‘मी करणार आहे! फक्त मी पडलो गोसावी. तुम्ही विचार करून निर्णय घ्या.’’ देशपांडे यांनी आनंदानं होकार दिला. महाराजही घरी परतले आणि आईला लग्न ठरल्याचं सांगितलं.

पुढे मुहूर्ताच्या दिवशी एकटेच आटपाडीला जाऊन यमुनाबाईंशी विवाह करून घरी आले. आई मोठय़ा उत्साहानं समोर आली तेव्हा महाराज म्हणाले, ‘‘आई, अशा मुलीशी मी लग्न केलं आहे की ही तुझी सून कधी डोळा वर करून तुझ्याकडे पाहणार नाही!’’ या यमुनाबाईंना आईसाहेब म्हणून ओळखतात. अखंड नामानं अध्यात्मातही त्यांनी फार मोठी प्रगती केली होती. त्यांच्या सात्त्विक मुखावर आगळं तेज असे.

दुसरी गोष्ट वाचनात आली ती अशी कि,
आटपाडीचें एक जोडपें श्री महाराजांच्याकडे येत असे. बाईपाशीं पंचधातूचा एक अतिशय सुंदर बाळकृष्ण होता. त्या त्याची पूजा करीत, पण आल्यागेल्यास कौतुकाने तो दाखवीत. तसें न करण्याबद्दल श्री महाराजांनीं तिला परोपरीने सांगितलें, पण बाईने तिकडे दुर्लक्ष केलें. परिणाम व्हायचा तो झाला. एका बाईने ती मूर्ती मोठ्या खुबीनें लांबवली. तिने एका जुन्या फडक्यांत ती गुंडाळली, आणि तिस-याच खोलीच्या आढ्यांत लपवून ठेवली. गोंदवल्याहून परत जातांना ती बरोबर घेऊन जावी असा तिचा हेतू होता. मूर्ती नाहींशी झाल्यावर आटपाडीच्या बाई अक्षरश: रडूं लागल्या. पुष्कळ शोध करून सुद्धां मूर्तीचा पत्ता लागेना. तेव्हां त्यांनी श्री महाराजांच्या कानावर घातलें. श्री महाराज म्हणाले,  ' याबाबत मी आगाऊ सूचना दिली होती. असो.  झाल्या गोष्टींचे वाईट वाटून घेऊं नये. श्री रामांतच बाळकृष्ण पाहावा व आपली उपासना चालू ठेवावी."

यावर बाई बोलल्या,  ' महाराज, आपण अंतरज्ञानी आहांत. माझा बाळकृष्ण कोणी नेला हें आपण जाणतां. तेव्हा तो माझा मला परत आणून द्या. ' आपल्याला अंतरज्ञान नाहीं असें श्री महाराज म्हणाले. तरी बाईचे समाधान न होऊन त्यांनी अन्न वर्ज्य केलेलं. श्री महाराजांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण बाईंनी आपला हट्ट सोडला नाही. एक दोन दिवसांनी, मूर्ती चोरणा-या बाईला गांवी मुलगा आजारी असल्याचें पत्र आले. तें ऐकून श्री महाराज तिला म्हणाले, ' बाई, उद्या सकाळी बैलगाडी करून देतों. गांवी जाणे जरूर आहे. ' पहाटे श्री महाराजांनी वामनराव ज्ञानेश्वरींस बोलावून सांगितले कीं, ' दुपारीं दहिवडीचे मामलेदार येणार आहेत. बैठकीच्या खोलींत ते उतरतील. खोली स्वछ करून कुलूप लावून ठेवावें. ' बाईंची जाण्याची वेळ झाली तेव्हा तिनें त्या खोलीकडे दोन-तीन खेपा टाकल्या. कुलूप पाहून तिचा हिरमोड झाला. श्री महाराज बैलगाडीपर्यंत तिला पोंचवायला गेले व ती एकटी पाहून  म्हणाले,  ' बाई,  देवाची मूर्ती झाली तरी चोरी ती चोरीच. आतां झाले तें झालें. मी ही गोष्ट कोणांस सांगणार नाहीं. पण पुन्हां पुन्हां हातून असे घडूं नये अशी खबरदारी घ्यावी.'
बाईनें श्री महाराजांची मनापासून क्षमा मागितली, व ती रवाना झाली. श्री महाराज परत आले व वामनरावांना घेऊन खोलीवर गेले. ' खोली कशी साफ केली आहे पाहूं ' म्हणून उघडली व आढ्याकडे पाहून श्री महाराज म्हणाले, ' हें बोचकें कसलें आहे हो?' तें काढलें तर त्यांत बाळकृष्ण  निघाला ! आटपाडीच्या बाईंना  बोलावून श्री महाराजांनी तो परत दिला व ताबडतोब उपोषण सोडण्यासाठी सांगितलें. तो देतांना श्री महाराज एवढेच म्हणाले,  ' डाव्या उजव्या हातानें कोणी तरी ठेवला. अपहार करण्याचा कांही त्याचा उद्देश नसावा. '

२४. खातवळ विठ्ठलमंदिर, १९०९
खातवळ, पोस्ट एनकुळ, खटाव, जि. सातारा, महाराष्ट्र
खातवळ हे श्रीमहाराजांच्या पहिल्या सासुरवाडीचे गाव.
श्रींच्या या विवाहाची गोष्ट चरित्रात आली ती अशी की
गोंदवल्याहून आठदहा कोसांवर खातवळ म्हणून एक गांव आहे. तेथें संभाजी मल्हार गोडसे या नांवाचे एक चांगले सज्जन, श्रीमंत व लोकप्रिय गृहस्थ कुलकर्णी म्हणून असत. त्यांच्या कुटुंबाचे नाव भागीरथी त्यांना एक सुंदर, सुशील व अति समजूतदार मुलगी होती. बरेच दिवसांपासून संभाजीपंतांचे लक्ष श्रीमहाराजांकडे होते. आपल्या आठनऊ वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन ते गोंदवल्यास पंतांच्याकडे आले.

ते दोघे बोलत बसले असता श्रीमहाराज सहज तेथे आले. ती सुंदर जोडी पाहून पंतांना आनंद झाला आणि त्यांनी संभाजीपंतांना होकार दिला. दोन्ही बाजूंनी तयारी होऊन एका चांगल्या मुहूर्तावर श्रीमहाराजांचें लग्न झाले. या लग्नाचें वैशिष्ट्य असें की पंतांच्या हातचे शेवटचें आणि संभाजीपंतांकडले हे पहिले कार्य असल्यामुळे आणि दोन्हीकडची मंडळी सज्जन, श्रीमंत व हौशी असल्यामुळे गोंदवल्यामध्ये आठ दिवस जणूं कांहीं मोठा उत्सव चालला होता. रोज सात-आठशे पान जेवून उठत असे. लग्नसमारंभ आटोपल्यावर पंत स्वतः नवीन जोडप्याला घेऊन पंढरीला गेले. त्यांची ही शेवटचीच वारी होती, व याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी मनापासून श्रीपांडुरंगाची प्रार्थना केली आणि श्रीमहाराजांना कुटुंबासह त्यांच्या पायावर व पदरांत घातलें.

खातवळ येथील आणखी एक गोष्ट
येथील पाटीलबाबांची त्यांच्यावर फार निष्ठा होती. पाटीलबाबांनी दोन लग्ने केली परंतु दोन्ही बायका कालवश झाल्या आणि त्यांना मुलबाळ झाले नाही. म्हणून त्यांनी तिसरे लग्न केले. हे लग्न झाल्यावर देखील बरीच वर्षे गेली तरी त्यांना संतति झाली नाही. त्यांचे वय साठ पासष्ठ वर्षांचे झाले. यापुढे आपल्याला मुलबाळ होणे शक्य नाही असे वाटून भावाच्या मुलास दत्तक घ्यावे असे त्यांनी ठरवले. श्रीमहाराजांच्या संमतीशिवाय काहीही करायचे नाही असा पाटीलबाबांचा कडक नियम होता. म्हणून एके दिवशी आपली बायको व भावाचा आठ वर्षांचा लहान मुलगा यांना घेऊन ते श्रीमहाराजांची संमति घेण्यास गोंदवल्यास आले. दर्शन घेत असतांना श्रीमहाराजांनी विचारले, "पाटीलबाबा, हा मुलगा कुणाचा ?" ते म्हणाले, "महाराज,  हा माझा पुतण्या आहे. याला दत्तक घ्यावे असे माझ्या मनात आहे. म्हणून आपल्याला विचारायला आलो आहे." श्रीमहाराज बोलले, "का बरे ? दत्तक का घेता ?" ते म्हणाले, "महाराज, माझे वय झाले. तोंडात दात देखील राहिला नाही. आता मला संतति होईल की नाही याची शंका वाटते." त्यावर श्रीमहाराज म्हणाले, "छे, छे, पाटीलबाबा, तुम्ही निराश होण्याचे कारण नाही. राम करील तर काय न होईल ?" असे बोलून त्यांनी एक नारळ आणण्यास सांगितले. नारळ आणल्यावर ते म्हणाले, "याला हळदकुंकू लावा आणि रामाच्या पायांना लावून आणा." तसा तो आणल्यावर श्रीमहाराजांनी नारळ आपल्या हाताने पाटीलबाबांच्या बायकोच्या ओटीत टाकला आणि बोलले, "तुम्हाला एक मुलगा होईल. काळजी करू नका. नामसमरण रोज करीत जा."

        
एक वर्षाने पाटीलबाबांना मुलगा झाला. त्याप्रीत्यर्थ त्यांनी सत्यनारायण करण्याचे ठरवून त्याप्रमाणे श्रीमहाराजांना आमंत्रण केले. पाटीलबाबांनी पंचवीस माणसांचा स्वयंपाक केला, पण दुपारी बारा वाजता श्रीमहाराज जवळ जवळ शंभर माणसे घेऊन खातवळला उतरले. इतकी मंडळी एकदम आलेली पाहून पाटीलबाबांची धांदल उडाली. इतर सर्व पदार्थ आणखी करणे अशक्य आहे असे पाहून, भात तेवढा सर्वांना पुरेल इतका करावा असे त्यांनी ठरविले. इतक्यात श्रीमहाराजांनी त्यांना बोलावले आणि विचारले, "पाटीलबाबा, काय धांदल आहे ?"  ते म्हणाले, "महाराज, स्वयंपाक कमी पडतो आहे, म्हणून आणखी भात शिजवायला सांगतो." तेव्हा श्रीमहाराज त्यांना बोलले, "असे कसे होईल ? अन्नावर रामाचे तीर्थ शिंपडा आणि आहे तोच स्वयंपाक सर्वांना वाढा. राम सर्वांना पूरवील."  दिडच्या सुमारास सर्व मंडळी जेवायला बसली.  सर्वजण पोटभर जेवली तरी पुन्हा पंचवीस पानांचे अन्न शिल्लक उरले. पाटीलबाबांनी मुलाला श्रीमहाराजांच्या पायावर घातला. त्यावेळी त्याच्या गालाला प्रेमाने हात लावून ते म्हणाले, "रामाने फार चांगला बाळ दिला आहे. हा देवभक्त होईल आणि आपल्या कुळाचे नाव राखील !"


संदर्भ: श्रीमहाराज चरित्र

 

 

२५. विखळे विठ्ठलमंदिर, १९०९
मु. विखळे, पो. कलेढोण, ता. खटाव, जि. सातारा, महाराष्ट्




 

 

 

 

 

 

 

 

 

 

या मंदिराबद्दल फारशी कोणाला माहिती नाही.
संदर्भ: श्रीमहाराज चरित्र
सर्व फोटो गुगलवरून

जय श्रीराम!

संकलन: श्रीमहाराज कन्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...