जय श्रीराम!
श्रींचे ज्येष्ठ शिष्य
बापूसाहेब साठ्ये
गोंदवल्यास राहायला आल्यापासून श्रींना भेटायला सतत कोणी ना कोणी येत असत. त्यावेळी बापूसाहेब साठये यांची मुनसफ म्हणून दहिवडीला बदली झाली. रोज संध्याकाळी ते लांब फिरायला. जात. त्यांना पोटदुखीचा जुनाट विकार होता. शनिवारी कोर्ट सुटल्यावर ते फिरायला निघाले, त्यावेळी दहिवडीचे दोन वकील श्रींच्या दर्शनासाठी गोंदवल्यास निघाले होते. रस्यामध्ये गाठ पडल्यावर त्यांनी बापूसाहेबांना गोंदवल्यास चलण्याची विनंती केली व वाटेत श्रींची सर्व माहिती सांगितली. गंमत म्हणजे त्यावेळी श्री जवळ्च्या एका गावी जाण्याच्या तयारीत होते. गाडया जुंपून दाराशी उभ्या होत्या.
श्रींनी एकाला सांगितले, "अरे, दहिवडीहून कोणी येत आहे का बघा." संध्याकाळी ५॥ वाजता बापूसाहेब व दोघे वकिल गोंदवल्यास येऊन पोहोचले. वकिलांनी बापूसाहेबांची श्रींशी ओळख करून दिली. श्रींनी बापूसाहेबांचा रावसाहेब, रावसाहेब म्हणून इतका आदर केला की, ते संकोचाने अर्धे झाले. श्रींनी त्यांना प्रसाद देण्यास सांगितले. एकाने त्यांना द्रोण भरून साबुदाण्याची खिचडी आणून दिली. श्रींचा प्रसाद म्हणून बापूसाहेबांनी एक घास खाल्ला. त्याबरोबर त्यांचे तोंड भाजून डोळ्यांना पाणी आले. हे पाहून श्री मोठयाने म्हणाले, "अरे, रावसाहेबांना थोडी साखर आणून द्या, काय करावे, शिंच्यांना मोठया माणसांशी कसे वागावे हे काही कळत नाही."
त्यानंतर सुमारे एक महिन्यानी दासनवमीला सर्वांना दहिवडीला जेवणाचे आमंत्रण होते. शेवटच्या पंक्तीला श्री जेवायला बसताना बापूसाहेबांची चौकशी केली, ते कोर्टाचे काम संपवून आपल्या खोलीत बसले होते. इतक्यात श्री त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले व प्रेमळपणाने म्हणाले, "रावसाहेब जेवायला चलायचे, शेवटची पंगत आहे." बापूसाहेब मनात म्हणाले, ’हा एवढ मोठा पुरुष, लोक यांना साधू मानतात, हे आपण होऊन आमंत्रण करायला आले, आता न जावे तर पंचाईत,’ म्हणून नाइलाजास्तव जेवायला गेले. त्यावेळी बापूसाहेब व्याधिच्या भितीने बेताने जेवण जेवले. त्रास झाला नाही.
पुढे बापूसाहेबांनी श्रींना आपल्या घरी जेवावयास बोलावले. झुणका-भाकर श्रींना आवडते म्हणून तोच बेत केला होता. रामाला नैवेद्य दाखविल्यावर नैवेद्याच्या ताटातली चतकोर भाकरी व पिठल्याचा गोळा श्रींनी बापूसाहेबांना खायला सांगितला. त्यांनी तो भीतभीत खाल्ला. तेव्हापासून बापूसाहेबांची पोटदुखी कायमची थांबली. बापूसाहेबांनी श्रींचे मनापासून आभार मानले व पुढे त्यांचे खरे भक्त बनले.
बापूसाहेब साठ्ये यांना श्री महाराज एकदां म्हणाले, ' बापूसाहेब, तुमच्या आयुष्यांतील प्रमूख घटना कोणत्या तें सांगा.' यावर बापूसाहेबांनी म्हातारपणापर्यंतच्या सा-या ठळक घटना श्री महाराजांना ऐकवल्या. त्यांचे सांगणें संपल्यावर श्री महाराज त्यांना म्हणाले, ' मी तुम्हाला भेटलों या घटनेला इतक्या सर्व लहान मोठ्या घटनांमध्ये कोठेंच स्थान नाहींच कां? तेव्हां कोठें स्वतःची चूक बापूसाहेबांच्या ध्यानांत आली. "
श्री.बापूसाहेब साठ्ये सोलापूरला जज्ज होते त्यावेळी त्यांना श्री महाराजानी पत्रे लिहिली आहेत. त्यांना ब्रह्मानंद महाराज व महाभागवत याना सांगितल्याप्रमाणे सत्याने वागण्याचा , व्यवहार दक्षतेचा , निर्भय , निष्काम,निरलोभ अक्रोध वृत्तीने राहण्याचा व वागण्याचा उपदेश वारंवार केला. सरकारी कामात नेहमी सत्याने व सचोटीने वागावे व त्याप्रमाणे न्याय द्यावा असे ते बापूसाहेबांना सांगत व बापूसाहेब तसेच वागत असल्याचा श्रीमहाराजांना फार अभिमान वाटत असे. कोर्टाच्या सुट्टीत जास्तीतजास्त काळ ते श्री महाराजांना बरोबर व्यतीत करीत. श्रीबापूसाहेब साठ्ये यांना श्रीमहाराज यांनी लिहिलेले पत्र.
श्रीराम समर्थ
श्री रामभक्त परायण राजमान्य राजश्री बापूसो साठ्ये मुक्काम सोलापूर यास आसिरवाद विशेष लिहिण्याचे कारण की अष्टमी (गोकुळाष्टमी ) दिवशी आपलेयास रजा होती. आपण यावे असे फार मनात होते. परंतु रविवारी , सोमवारी सुट्टी परंतु मंगळवारी कामावर जायलाच पाहिजे. तर सोमवारी श्रावणी उपास सोडून गाडी मिळत नाही. अथवा तसे उपासी जात येत नाही आणि उगीच त्रास होईल सबब तस्ती दिली नाही.अस्तू "स्मरण अंतरी ठेऊन प्रेमपूर्वक श्रीरामाजवळ विश्वास ठेऊन सरकारी काम खबरदारीने उलासयुक्त करावे कारण स्वआनंद आंतरभाय बिगडू नये. कोणास फार सलगी देऊ नये. माणूस ओळकून वागावे. भक्ती शिवाय कोणी कोणते शहाणपण मिरविल तर त्याच वेळेस आयकू येत नाही. मी आपलेयास लेहावे असे नाही. परंतु तुमचे योग्य वागणुकीला सूचना करीत आहे." कळावे हा असिरवाद. राजारामास आसिरवाद , अभ्यास चांगला करावा. संध्या दोन वेळा, राममंत्राचा जप काहीतरी सवडी सारखा करीत जावे. सौ.माईसो यास आसिरवाद सांगावे. अखंड नामस्मरणात वेळ जावा. गोदूबाईस आसिरवाद तुम्ही मनाने जप करीत जावे.
त्यांचे चिरंजीव, यशवंत ऊर्फ राजाभाऊ, हे (लहानपणापासून अशक्त प्रकृतीचे असल्यामुळे बापूसाहेबांचा त्यांच्यावर फारच जीव होता. पुढे इ.स. १९३४ साली श्रीमहाराज (श्री.तात्यासाहेब केतकर यांच्या स्वरूपात) व बरीच भक्तमंडळी काशीयात्रेस गेली. त्यात बापूसाहेब होते. त्यांचे नातेवाईक असे बरोबर कोणी नव्हते. श्री. बाबूराव गद्रे यांच्या आईवडिलांना 'तुमची काशीयात्रा झाली, आता परत जावें,' असे सांगून परत धाडलें, पण बाबूरावांना श्रींनी म्हटले, 'तुम्ही बापूसाहेबांसाठी थांबावे.' त्याप्रमाणे सर्व मंडळी हरदा येथे पोचली. हरदा येथील मुक्कामात बापूसाहेबांना कॉलऱ्याची बाधा झाली. कॉलच्याने गाठले जुलाब वांत्या सुरु झाल्या. बाबूरावांनीं त्यांची सर्व सेवा केली. रोग तीव्रच झाला व सर्व आशा सुटली.
श्रीमहाराज बापूसाहेबांजवळ बसले व त्यांना म्हणाले, “बापूसाहेब,एकंदरीत जरा कठीणच दिसतें. राजाभाऊला तार करून बोलावून घ्यावें का?” या अखेरच्या क्षणी बापूसाहेबांची देहबुद्धि व ममत्व पूर्णपणे नष्ट झाले होते. राजाभाऊवर जीव टांगून रहाणारे बापूसाहेब ताबडतोब म्हणाले, “को महाराज तो येथे नाही तेच बरे आहे.तो समोरच असला तर न जाणो माझा जीव त्याच्यात अडकेल." काही वेळाने त्यांचे शांतपणे प्राणोत्करमण झाले.
पुढे राजाभाऊ हे आपल्या मृदु स्वभावानुसार शांत जीवन जगले. अखेरीस त्यांना लिव्हरचा कॅन्सर झाला, व हळूहळू ते अंथरुणाला खिळले. दुखण्याचा त्रास होत होता, पण बोलण्यात तक्रारीचा सूर नसे. त्यांचे कन्सल्टंट, डॉ. सरदेसाई यांनीही आश्चर्य व्यक्त केलें. शेवटच्या दिवशी सकाळी राजाभाऊ म्हणाले, 'मी मानसपूजा करतों'. कुशीवर वळले, आणि जवळजवळ नकळतच प्राणज्योत मालवली. दहनानंतर तिसऱ्या दिवशी अस्थि गोळा करताना, दोन गोष्टी आढळून आल्या. एक, जानव्याला असलेली लोखंडी किल्ली गुठळी होऊन गेलेली होती; आणि दुसरी, ती. तात्यासाहेब केतकर यांनी राजाभाऊंच्या षष्ट्यब्दिपूर्तीचे प्रसंगी दिलेली सोन्याची अंगठी बोटावर तशीच राहून गेली होती, ती पूर्णपणे शाबूत स्थितीत सापडली. ती आज त्यांचे पूजेतील देवात ठेवलेली आहे.
राजाभाऊंचे ज्येष्ठ चिरंजीव राधाकृष्ण ऊर्फ किसनतात्या यांना ती. तात्यासाहेब केतकर यांची कनिष्ठ कन्या बाळूताई (पद्मावती) ही दिलेली होती. ही स्वभावाने अबोल असून खूप जप करी. तात्यासाहेबांच्या अखेरच्या दुखण्यात शेवटी ते बेशुद्ध झाल्याची वार्ता कळली तेव्हां बाळूताई, किसनतात्या, व अन्य एकदोन जण मुंबईस जाण्यास निघाले. चारपाच तासांच्या प्रवासात काही न बोलता बाळूताई केवळ जप करीत होती. मुंबईला पोचताच तात्यासाहेबांनी देहत्याग केल्याचे कळले.
पुढे तिला कॅन्सर झाला. संसार अर्धवटच झाला. ती शेवटी हॉस्पिटलमध्ये असताना, श्री. बापूसाहेब मराठे जे तिला अगदी लहानपणापासून ओळखत होते भेटावयास गेले असता, तिची ती अवस्था पाहून म्हणाले, "बाळूताई, तू इतका जप केला आहेस, इतके आज्ञापालन केले आहेस, तर महाराजांपाशी मागून घे ना, की मला यातून बरी करा म्हणून! तुझा शब्द खात्रीने वाया जाणार नाही.” त्यावर ती म्हणाली, "बापूसाहेब, बारीकसारीक गोष्टी तर सोडाच, पण माझ्या मुलाला त्यांनी जीवदान दिले आहे. आता आणखी काय आणि किती मागू? आता जे व्हायचे ते त्यांच्या इच्छेनुसार होऊ दे. ते मी आनंदाने पत्करीन." आणि ती आजारात गेलीच.
अशा रीतीने, नामस्मरणाने देहबुद्धि नष्ट होते याची प्रचीति पाठोपाठ तीन पिढ्यात आली. काय विलक्षण सामर्थ्य आहे श्रीमहाराजांचे! केवळ श्रींची कृपाच ही.
जय श्रीराम
संकलन- महाराज कन्या

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा