गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

 श्रीमहाराजांचे काही ज्येष्ठ शिष्य

श्री गणपतराव दामले

         

श्रीमहाराजांनी देह ठेवल्यानंतर चाळीस - बेचाळीस वर्षे गोंदवल्याची व्यवस्था या एकट्या महापुरुषाने सांभाळली. यांचा जन्म सन १८७४ मध्ये झाला. १९०२ साली यांना श्रीमहाराजांचे प्रथम दर्शन झाले. तेव्हा त्यांचे वय २८ होते. गणपतराव दामले हे श्रीमहाराज हयात असताना त्यांचे सहवासात बराच काळ राहिले होते. श्री.दामले आरंभी पंच असले तरी श्री ब्रम्हानंद बुवांचे सरचिटणीस म्हणून काम बघत होते. भडगावकर विशेषतः गणपतराव दामले यांनी समाधीमंदिर  इ.स. १९१४, शके १८३६ मधील मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्णपक्षात प्रतिपदेच्या दिवशी वेदोक्तपद्धतीने श्रीमहाराजांच्या पादुकांची स्थापना झाली.
             पहिल्या उत्सवामधे दिडदोनशे मंडळी जेवायला बसली होती. श्री. दामले मुख्य पंच होते. ब्रह्मानंद महाराज आले आणि म्हणाले, 'काय रे बरोबर चालले आहे की नाही ? त्या सर्वांना पोटभर, पोट फुटेस्तोवर खायला घाला' असं म्हणाले आणि पुढे काय म्हणाले, "त्यांना खाऊ दे म्हणाले, पण मी तुला अमृत खायला देतो. म्हणून गावातून स्वतः भिक्षा मागून आणलेल अन्न त्यांना त्यांनी खायला दिलं. हे अमृत आहे म्हणाले." - इति पु. बाबा बेलसरे (चैतन्यसुधा)

श्रीमहाराज समाधिस्त झाल्यावर पहिली दोन वर्षे श्रीब्रह्मानंदबुवांनी स्वतः येवून उत्सवाची पद्धत घालून दिली. १९१५ सालापासून  त्यांनी हे काम गणपतरावांच्यावर सोपविले , आणि अप्पासाहेब भडगांवकरांना त्यांच्या मदतीला दिले.
ही जबाबदारी स्वीकारताना, हे काम आपल्या हातून पार पडणे कठीण आहे ह्या भावनेने श्रीब्रह्मानंदांना तसे म्हटल्यावर त्यांनी सांगितले की, “ तूच काय, मी काडी उभी करीन आणि सर्व काही काडीकडून करवून घेईन. मी गोंदवल्यास कायम आहेच. जर कोणी हात उगारला तर वरचेवर धरून ठेवीन. तू पुढे होऊन कर, श्रीमहाराज कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाहीत. श्रींचे दर्शनास येतील त्यांना सारभाताला कमी करू नको. नामस्मरण, गोरक्षण आणि आलेल्यास प्रसाद (भोजन) हे श्रींचे आवडते कार्य गोंदवले येथे अखंड चालू राहिले पाहिजे.” असा त्यांनी आदेश दिला.  

श्रीमहाराजांनी वेंकटापूरबद्दल असे सांगितले आहे की एकवेळ काशीला जायचे राहिले तरी चालेल पण एकदा तरी वेंकटापूरला जाऊन यावे. १९१० साली देहात असताना श्रीमहाराज वेंकटापूरला गेले होते तेव्हां म्हणाले होते की मी आता येथेच राहतो. पुढे पू. तात्यासाहेब वेंकटापूरला गेले असतांना पेटीवर श्रीमहाराज पुन्हा मी आता येथेच राहतो म्हणाले. तिसरा प्रसंग रामेश्वरला असाच घडला. त्यावेळी श्री. गणपतराव दामले म्हणाले की आम्ही काय केले असता तुम्ही आमच्याबरोबर राहाल ? त्यावर श्रीमहाराज म्हणाले, पाणी आणा. पाणी आणल्यावर म्हणाले, संकल्प सोडा की मी माझा प्रपंच तुम्हाला दिला. त्याप्रमाणे केल्यावर ते परत आले.

श्री महाराज कागवाडला असताना उगार येथून दोन तरूण मुले त्यांना घेऊन जाण्यास आली. आपल्या बरोबरची सर्व मंडळी श्रीमहाराजांनी पुढे पाठवून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी गणपतराव दामले यांना बरोबर घेऊन धमणीमध्ये बसून श्रीमहाराज उगारला जाण्यास निघाले. कागवाड सोडून दोन मैल गेल्यावर मागून एक टांगा धावत आला. बेळगावचे मोरोपंत मराठे वकील आपल्या मित्राला घेऊन श्रीमहाराजांना भेटण्यास आले होते. श्रीमहाराज गोंदवल्यास भेटतील या अपेक्षेने मराठे प्रथम तिकडे गेले होते. तेथे कळले की श्रीमहाराज मिरजेत गेले आहेत; म्हणून ते मिरजेला गेले. तिथे कळले की श्रीमहाराज कागवडला गेले आहेत; म्हणून ते कागवाडला गेले. तेथे त्यांना कळले श्रीमहाराज उगारला गेले आहेत; म्हणून ते उगारला जाण्यास निघाले होते. मागून येत असलेला टांगा पाहून श्रीमहाराजांनी धमणी थांबवली व आपण बाहेर उतरले. मराठे व त्यांचा मित्र टांग्यातून खाली उतरले, श्रीमहाराजांच्या पाया पडले, आणि तिघेजण बाजूला जाऊन आपल्या कामाविषयी बोलले. 'तुम्ही बेळगावहून केव्हा निघालात ?' असा प्रश्न श्रीमहाराजांनी त्यांना विचारला तेव्हा मराठे बोलले,  'महाराज, आपल्या शोधात आम्ही दोन दिवस फिरत आहोत. आम्ही दोन दिवस उपाशी आहोत.' हे ऐकून श्रीमहाराज गणपतराव कडे बघून बोलले, 'यांना काही खायला द्यावे.' गणपतराव गप्प बसले तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, 'कशी रे तुम्ही माणसे ? प्रवासात नेहमी काहीतरी खायचे बरोबर ठेवावे एवढे देखील तुम्हाला कळत नाही ! हे दोघे जण दोन दिवस उपाशी, त्यांना खायला नको द्यायला ?' हे बोलणे चालू होते त्याचवेळी एक मनुष्य डोक्यावर हारा घेऊन तिकडेच येतांना आढळला. जवळ आल्यावर त्याने हारा खाली ठेवला आणि म्हणाला, 'महाराज, दिवाळीचे फराळाचे जिन्नस आपल्याला खायला घालावेत अशी माझी फार इच्छा होती. पण आपण उगारला गेलात असे कळले; म्हणून मी हे घेऊन इकडे आलो आहे.' श्रीमहाराज म्हणाले, 'वा, फार बरे झाले ! रामानेच तुला पाठवले यात शंका नाही. गणपतराव, झाडाची पाने तोडा आणि त्यावर या दोघांना खायला द्या. पण जंगलात पाणी कुठून आणायचे ? खाल्ल्यावर पाणी पाहिजे ना !'  श्रीमहाराज हे शब्द बोलून इकडेतिकडे पाहू लागले; आणि तेवढ्यात एक मनुष्य डोक्यावर घागर घेऊन येताना दिसला. जवळ आल्यावर त्याने घागर खाली ठेवली आणि तो म्हणाला, 'महाराज, ही गंगा आपल्या चरणांवर घालावी म्हणून मी आणली आहे तिचा स्वीकार आपण करावा.'  श्रीमहाराज म्हणाले,  'वा रे वा ! काय रामाची कृपा आहे ! आपण पाणी मागितले तर रामाने गंगा पाठविली !' त्यांचे बोलणे ऐकून गणपतरावांना हसू आले. खाणेपिणे झाल्यानंतर मराठे व त्यांचा मित्र निघून गेले. श्रीमहाराज धमणीत चढता चढता एक पाय पायट्यावर ठेवून गणपतरावांना म्हणाले, 'का रे, मघा का हसलास ?' गणपतराव गप्प बसले आणि श्रीमहाराज पुढे बोलले, 'अरे यात काय आहे ? ही विद्या अगदी सोपी आहे ! काल काय झाले याची आठवण करू नये, उद्या काय होईल याची काळजी करू नये, पण आज आपल्याजवळ जे असेल ते गरजवंताला देऊन टाकावे, म्हणजे राम अशा रीतीने आपल्याला पुरवितो.
               एकदा श्रीमहाराजांनी त्यांना सहकुटुंब काशीयात्रा करण्यास.सांगितले ,  तेंव्हा ते म्हणाले , '' पत्नीला मूळव्याधीची व्यथा आहे ;  ते जमणार नाही. तुमची भेट हीच माझी काशीयात्रा. '' परंतु श्रीमहाराजांच्या आग्रहावरून ते काशीयात्रेस निघाले. निघतांना एक महत्वाचा प्रसंग आहे. श्रीमहाराजांनी त्यांना फक्त ५० रु. उसने दिले होते. ते निघाले त्यावेळी श्रीमहाराज छकड्यापर्यंत निरोप द्यावयास आले होते. गणपतरावांच्या मनात विचार सुरु झाले . पन्नास रुपयांत कसे काय होणार ! तेथे दहा ब्राह्मण जेवायचे ! दक्षिणा ! हातातले सोन्याचे सल्लेच उपयोगी पडतील . हा विचार त्यांच्या मनात येताच श्रीमहाराज म्हणाले,''  गणपतराव , प्रवासात भामट्यांचा फार त्रास होतो . ते सल्ले भाऊसाहेबांजवळ काढून ठेवा. '' गणपतरावांचे विचार सुरु झाले , ' निदान हिची नथ तरी आहे ! ' तोंच श्रीमहाराज म्हणाले , '' आणि बायकांच्याही अंगावर काही असू नये ;  ती नथही काढून ठेवा. आणि ते मी दिलेले पत्र बघू  '' , असे म्हणून श्रीमहाराजांनी पत्र घेतले आणि त्यावर ताजा कलम घातला , '' यांना उसने पैसे देवू नयेत. ''  हे झाल्यावर मात्र गणपतरावांना खरा प्रकार कळला आणि साष्टांग दंडवत घालून ते म्हणाले , ''  महाराज !   अपराधी आहे. क्षमा करा.''  एका गोष्टीचा असा निकाल लागल्यावर श्रीमहाराजांनी एक पाला गणपतरावांच्या पत्नीला दिला आणि म्हणाले , '' नुसता हा पदराच्या टोकाला बांधून ठेवा. ' ' बाईंना सबंध प्रवास होईपर्यंत मूळव्याधीचा त्रास झाला नाही ;  परंतु काशीयात्रेहून  गोंदवल्यास परत आल्यावर पुन्हा मूळव्याध सुरु झाली. श्रीमहाराज म्हणाले , ''  भोग हा भोगलाच पाहिजे  ; फार तर तो लांबणीवर टाकता येतो इतकेच ! "  श्रीमहाराजांनी जी पत्रें दिली होती त्यामुळे गणपतरावांची काशीयात्रा चांगली पार पडली.

  १९१२ साली श्रीमहाराज पुण्यास आले होते ;  त्यांना निरोप देतांना  गणपतराव गाडीवर गेले होते. गाडीने शिट्टी दिली तरी गणपतराव हलेनात . श्रीमहाराजांनी त्यांचे मन जाणून म्हटले , ''  बाळ , मी तुझ्या घरी एकदा मीठभाकरी खायला येईन बरे ! '' पुढे श्रीमहाराजांनी देह ठेवला  ,त्यामुळे ते तसेच राहिले. परंतु आश्चर्य असे की , चार वर्षांनी एक दिवस श्रीब्रह्मानंदबुवा गणपतरावांकडे आले आणि म्हणाले , ''  अरे, तुझ्या घरची मीठभाकर खायची राहीली आहे ना ! '' असे म्हणून त्यांनी खरोखर चतकोरच भाकरी मिठाशी खाल्ली. श्रीमहाराजांनी ते कबूल केले त्यावेळी बुवांना काही माहीत नव्हते. ही गुरु - शिष्यांची एकात्मता आणि अनन्यता !

              लो. टिळकांचीही गणपतरावांवर मर्जी होती. गणपतराव पुढे म्युनिसिपल कौन्सिलर झाले. त्यांची गांवातील प्रतिष्ठा वाढली. पण दुष्काळ पडला असतां गोंदवले संस्थानच्या गाईंसाठी गळ्यांत पिशवी अडकवून भिक्षा मागण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यांची पाचही मुलें श्रीमहाराजांच्या कृपेने अगदी परमार्थपरायण आहेत.
**
एकदां गोंदवले येथे श्रीब्रह्मानंद महाराज, श्री. भाऊसाहेब केतकर व श्री. गणपतराव दामले बसले असतां श्रीमहाराज लंगोटी लावून व कुबडी कमंडलु घेऊन स्नानाहून येतांना दिसले. तेव्हां श्रीब्रह्मानंद म्हणाले, 'ते कोण आहेत पाहिलेत का ? प्रत्यक्ष श्रीराम आहेत,' तेव्हां श्री. भाऊसाहेब म्हणाले, 'तुम्हांला ते राम असतील. आम्हांला ते साधे मनुष्यच दिसतात.'
         'मी खरा कोण आहें हें कोणीहि ओळखलेलें नाहीं. जर कोणी रतिभरच ओळखलें असेल तर एक फक्त ब्रह्मानन्दानें असें श्रीमहाराज म्हणत.'
               ---------कै. श्री. गणपतराव दामले
**
श्रीब्रह्मानंद महाराजांनी गणपतराव दामले यांना तिसऱ्या पुण्यतिथीचे वेळी एक 'अक्षय पिशवी' त्यात रुपया घालून दीली, व 'उत्सवाचे अगोदर कोठीपूजनाचे वेळी ह्या पिशवीची पूजा कर म्हणजे काही कमी पडणार नाही' असे संगितले. तेंव्हापासून दरवर्षी ह्या पिशवीची  कोठीपूजनाचे वेळी पूजा होते.
रीब्रहानंदांनीं सांगितल्याप्रमाणें जोंवर उपासना चालू आहे तोंवर काहीं कमी पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीं. ते त्यांच्या पत्रात रा. तात्यासाहेंब दामले यांस लिहीतात की,
  'अनुग्रहीत मंडळींच्याकडून येणाऱ्या गुरुदक्षिणेंतून सर्व खर्च करावा. जास्त मिळाल्यास लाडूपोळ्या कराव्या. कर्ज करू नये.'    

श्रीब्रह्मानंदांनी गणपतराव दामले यांना सांगितले की गुरुदक्षिणेतून उत्सव करीत जा, व गोंदवल्यास दरमहा जेवढी रक्कम लागेल तेवढी अनुग्रहीतांकडून जमा करुन गोंदवल्यास पाठवित जा.
*
गोंदवले संस्थानचे (श्रीमहाराजांच्या समाधीमंदिराचे) भूतपूर्व पंच (ट्रस्टी) कै. गणपतराव दामले यांची एक गोष्ट इथे फेसबुकवरच वाचनात  आली,  ती ही की ते त्यांच्या घराच्या (नारायण पेठ, पुणे) तळमजल्यावरील समोरच्या ओटीवर बसले असता पाठीमागचे बाजूस असलेल्या जिन्यावरून काहीतरी जमिनीवर जोराने पडल्याचा धपकन् असा आवाज आला. आवाज कसला म्हणून मागे पाहिले तेव्हा एक १२-१४ वर्षांचा मुलगा पुढे आला. त्यांनी त्याला आवाज कसला म्हणून विचारले, तेव्हा 'जिन्यावरून सदरा खाली पडला' असे तो म्हणाला, पण नुसत्या सदऱ्याचा आवाज एवढा मोठा कसा असे विचारल्यावर तो म्हणाला, 'सदऱ्यांत मी होतो'. याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यातील सर्व कर्मे आवाज करीत नाहीत म्हणजे (सुख किंवा) दुःख देत नाहीत; परंतु त्यांत असलेला माणसाचा 'मी' म्हणजे मीपणा (म्हणजेच कर्तेपणा) दुःख देतो. सर्व दुःखाचा आवाज त्या मीपणामुळे - कर्तेपणा आपल्याकडे घेतल्यामुळे आहे.

**
श्रीमहाराज देहात असताना ७५ चे वर गाई गोशाळेत होत्या. ते वारंवार गोशाळेत जाऊन गाईंची व्यवस्था नीट होते आहे ना याची खात्री करून घेत. अभ्यंकर, भवानराव, ह्यांना तीच सेवा दिली होती. त्यानंतर गाईंची सेवा विश्वनाथबुवा, बसाप्पा ही मंडळी करत. पाठकमास्तर, गणपतराव जोशी, इत्यादी मंडळीही गाईंचेकडे लक्ष देत.
         श्रींचे निर्याणानंतर एकदा मोठा दुष्काळ पडला व गोशाळेतील गाईंना कडबा नाही अशी अवस्था झाली. वाहतुकीची साधने नसल्यामुळे दुसरीकडून कडबा आणणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यावेळी हे गायींचे मोठे खिल्लार पुण्यास आणले. तळेगावजवळ तळवडे येथे गणपतराव दांमले यांची जमिन होती. त्यातुन कडबा-गवत पुण्यास आणत. शिवाय इतरत्र हिंडून कडबा गोळा करीत. शनीच्या पाराचे मागील बाजूस एक बखळ होती. तेथे या गायी ठेवल्या होत्या. त्यावेळी वासुदेवराव फडके व गणपतराव दामले यांनीही इतरांचे बरोबर गळ्यात पेटी अडकवून गोरक्षण मदत जमा करुन गाईंचे रक्षण केले.

  ही साधारण १९३० सालातील गोष्ट आहे. श्रीमहाराज  [वाणीरुप  अवतारात] काही मंडळीच्या बरोबर कर्नाटकात गेले होते.त्यात रा.गणपतराव दामले पण होते.  
         श्रीगोंदवल्याचा वार्षिक (पुण्यतिथी) उत्सव जवळ आला होता. तेंव्हा गणपतराव दामले श्रींस म्हणाले कीं, "उत्सव अगदी जवळ आला आहे, उत्सवाची सर्व तयारी करावयाची असते, धान्य वगैरे सर्व घेऊन ठेवावें लागते." वगैरे सांगून जाण्याची परवानगी मागत होते. त्यावर श्रीमहाराज [ पेटीवर] म्हणाले कीं  'आतांपर्यंत तुम्हींच उत्सव केला असें तुम्हांस वाटतें काय? आपण निमित्ताला कारण आहोंत. श्रीरामकृपेनें सर्व काहीं होईल. तुम्हीं काळजी करुं नये व यापुढें श्रीराम कर्ता हें जाणून तेथें सेवा करावी'. थोडे  दिवसांनी सगळी मंडळी पुण्यास परत आली.

श्री. गणपतराव दामले चाळीस वर्षे इथे गोंदवल्याला पंच होते. पुढे त्यांचे गुडघे दुखायला लागले. गोंदवल्यास येता येत नसे. तेव्हां म्हणायचे, "मेल्यानंतर मी पहिल्यांदा गोंदवल्याला जाणार. आपलेही तसेच होणार हे निश्चित ! तिकडे आपला बारावा, तेरावा दिवस चालू असला तरी आपण गोंदवल्यात असणार ! "
काय तयारी होती या साधकांची. श्री महाराजांनी कसे लोक तयार केले हे यातून जाणवते.

जय श्रीराम,

संकलन - श्रीमहाराज कन्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...