गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

 जय श्रीराम!

गेल्या १०० वर्षांत गोंदवले संस्थानचे प्रथम पासून खालील पंच आजपावेतो होऊन गेले.
श्रीब्रह्मानंद महाराज, श्री आप्पासाहेब भडगावकर, श्री बापूसाहेब साठ्ये, श्री तात्यासाहेब चपळगावकर, श्री पागा फडणीस, श्री गणपतराव दामले, श्री. मनोहर, श्री. दत्तोपंत तबीब, श्री. दत्तोपंत खाडीलकर, सरदार गिरवीकर, श्री. टेंबे, श्री. जगन्नाथपंत आठवले, श्री. गोपाळराव कर्वे, श्री. गोपाळस्वामी, डॉ. रघुनाथराव घाणेकर, श्री. अण्णासाहेब गाडगीळ, श्री. बापूसाहेब दामले, श्री. बाळासाहेब पाठक, श्री. सुरेशराव बोन्द्रे, श्री. वसंतराव मिजार.

(संदर्भ: श्रीगोंदवलेकर महाराज ऑफिशियल वेबसाईट.)

हे श्रीमहाराजांचे शिष्योत्तम. यांच्याबद्दल जी माहिती श्रीमहाराज चरित्रातून किंवा चैतन्य स्मरण विशेषांकातून ती बघूया.
पूज्य ब्रम्हानंद बुवांबद्दल सर्वांना माहित आहेच. तरीही पुढच्या भागात अजून काही माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

१) अप्पासाहेब भडगावकर

श्रीमहाजांच्या चरित्रात अनेकदा श्री अप्पासाहेब भडगावकरांचा उल्लेख येतो.
 श्रीमहाराजांनी १९१२ साली आपल्या मिळकतीचे एक व्यवस्थापत्र करून श्रीब्रह्मानंद, आप्पासाहेब भडगावकर, बापूसाहेब साठ्ये व तात्यासाहेब चपळगावकर यांना ट्रस्टी नेमले व सर्व मिळकतीचा श्रीरामदेव संस्थान हा ट्रस्ट केला. त्यांचेनंतर वरील ट्रस्टींनी सर्व इस्टेट ताब्यात घेतली. समाधीचे बांधकाम चालू असताना आप्पासाहेब भडगावकर यांनी स्वतः गोंदवल्यास राहून आपल्या देखरेखीखाली काम करून घेतले.
 
          लिंगोपंतांपासून श्रीमहाराजांच्या कुटुंबीयांचे पंढरपूरला वळण होते. तेथे भडगावकर नावाचे वैद्य असत. त्यांच्याकडे खुद्द श्रीमहाराजांचे जाणे-येणे विशेष असे. त्यांच्यापैकी एक जण अगदी समवयस्क असल्याने तो श्रीमहाराजांची भारी थट्टा करी. तो नेहमी त्यांना म्हणे,"तू लंगोटी लावून मोठा बैरागी झालास यामध्ये काय साधलेस ? आम्ही प्रपंचामध्ये असलो तरी आम्हालाही काही कमी सुख नाही." यावर श्रीमहाराज उत्तर देत, "दारूच्या धुंदीत असलेला भिकारी स्वतःलाच राजा समजतो, पण प्रत्यक्ष मात्र गटारात लोळत असतो; तशी तुझी अवस्था आहे."
       श्रीमहाराजांनी आईला मरायची विद्या दाखवल्यानंतर थोड्या दिवसांनी कार्तिकी एकादशी आली. त्यासाठी पंढरपूरला जावे म्हणून एकादशीला दहा-बारा दिवस अवकाश असतानाच श्रीमहाराज गोंदवल्याहुन निघाले. ते भडगावकर यांच्या घरी आले तो त्यांचा एकुलता एक मुलगा विषमाने आजारी असल्याचे त्यांनी पाहिले. श्रीमहाराज अहोरात्र त्या मुलाजवळ बसून असत व त्याच्या आईबापांना धीर देऊन औषध-पाणी उत्तम रीतीने करायला लावीत. त्या मुलाचे श्रीमहाराजांवरती प्रेम होते आणि इतक्यात तापामध्ये देखील तो नामस्मरण करीत असे. तापाच्या विसाव्या दिवशी रात्री त्याचा जीव घाबरला तेव्हा श्रीमहाराजांनी त्याला स्वतःच्या मांडीवर घेतला आणि अत्यंत शांतपणे त्याचे प्राणोत्क्रमण होऊ दिले. श्रीमहाराजांनी बैरागी होऊन काय साधले याची खरी कल्पना त्या रात्री मुलाच्या आईबापांना आली. त्या दुखी आईबापांचे खरे सांत्वन करण्याचे काम श्रीमहाराजच करू जाणे. परंतु तेव्हापासून भडगावकर मंडळी त्यांना फार मानू लागली आणि त्यांच्यापैकी आप्पासाहेब यांनी तर श्रीमहाराजांना सर्वस्व अर्पण केले.

श्रीमहाराज व पंढरपूरच्या भडगांवकर कुटुंबाचा जुना ऋणानुबंध असून श्रीमहाराज पंढरपूरी अप्पासाहेबांच्या घरीच उतरत असत. अप्पासाहेब स्वभावाने कडक असले तरी कोठेही गोंधळातून व्यवस्था निर्माण करण्याचे चातुर्य आणि वाह्यात माणसांना वळणावर आणण्याचे सामर्थ्य , हे गुण त्यांच्यापाशी होते. श्रीमहाराज त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवीत आणि महत्वाची कामें त्यांच्या अंगावर निर्धास्तपणे टाकीत. श्रीमहाराजांनी देह ठेवल्यावर अप्पासाहेब लगेच पंढरपूरहून गोंदवल्यास आले आणि पुढील सर्व गोष्टी स्वतःच्या नजरेखाली त्यांनी करवून घेतल्या.
श्रीमहाराजांच्या वेळेला अशी माणसे होती की बाहेरून कडक दिसली तरी आतमधे प्रेम होते. श्री. आप्पासाहेब भडगावकर बोलतांना शिव्या देत पण आतून किती प्रेम होते ! आपण जाणार असे ज्यांना श्रीमहाराजांनी सांगितले होते त्यामधे ते एक होते. श्रीमहाराज गेले त्याच संध्याकाळी आप्पासाहेब पंढरपुराहून आले आणि त्यांनी सगळीकडे कुलुपे लावली; नाहीतर गोंदवल्याची वाताहत झाली असती.
           दासबोधाचे मर्म ते मोठ्या खुबीने स्पष्ट करुन सांगत. त्यांचे भजन देखील फार गोड व रसाळ असे. एका एकादशीला थोरल्या रामासमोर अप्पासाहेबांचे भजन फारच रंगले . त्यावेळी श्रीमहाराज इतके प्रसन्न झाले की स्वतःच्या अंगावरचा फरगोल काढून त्यांनी अप्पासाहेबांच्या अंगावर घातला. असा बहुगुणी साधकवृत्तीचा माणूस परमार्थात काहीसा मागे पडला. आपल्यानंतर श्रीमहाराजांपाशी येऊनही श्रीब्रह्मानंदबुवा पुढे गेले याबद्दल अप्पासाहेबांच्या मनात थोडे वैषम्य होते. त्यांनी एकदा श्रीमहाराजांना स्पष्टच विचारले , ' महाराज, मला आपण तीन अवस्थांच्या पलीकडे कां नेत नाही ? ' त्यावर झट्दिशी श्रीमहाराज म्हणाले , ' तुमचा पैशाचा, वस्तूंचा , लोभ अजून सुटत नाही म्हणून ! '
              श्रीमहाराज हुबळीला गेले त्यावेळी बरोबर अप्पासाहेब होते. रोज रेशमी कफन्या , शालजोड्या , फरगोल, माळा , मिठाई , वगैरे पुष्कळ वस्तु श्रीमहाराजांच्या पुढे येत. गरीबांना बोलावून श्रीमहाराज त्या सगळ्या वाटून टाकीत. हे काम अप्पासाहेब करीत. पण एक फारच सुंदर जरीची रेशमी कफनी कोणीतरी श्रीमहाराजांना अर्पण केली , ती त्यांनी घालावी म्हणून अप्पासाहेबांनी ती घडी एका उशीत दडवून ठेवली. हुबळीहून निघतांना श्रीमहाराज म्हणाले, ' अप्पासाहेब, इथे आलेले सगळे वाटून टाकले ना ? ' त्यावर ते नुसते ' होय ' म्हणाले. पंढरपूरला येईपर्यंत आणखी अशाच वस्तु जमल्या. श्रीमहाराजांनी त्यादेखील गरीबांना वाटून टाकल्या. शेवटी अग्निहोत्री नांवाचा माणूस आला , त्याला देण्यास काही उरले नाही . तेंव्हा अप्पासाहेब म्हणाले , ' शेजारच्या दुकानातून शालजोडी घेऊन येतो. ' त्यावर श्रीमहाराज स्मित करुन म्हणाले , ' आणण्याची जरुर नाही .उशीत काही आहे का ? ते द्यावे . ' अप्पासाहेबांनी मुकाट्याने ती सुंदर कफनी काढून आणली व श्रीमहाराजांच्या पायावर डोके टेकवून त्यांच्या हातात दिली. अग्निहोत्र्यांच्या अंगावर ती घालून श्रीमहाराज म्हणाले , ' ही कफनी यांना कशी शोभून दिसते नाही ! '
श्रीब्रह्मानंदबुवा व अप्पासाहेब या दोघांनी गोंदवल्याच्या पुढील व्यवस्थेला प्रत्यक्ष रुप दिले.

श्रीब्रह्मानंदबुवा आणि श्री अप्पासाहेबांचा अपार स्नेह होता. त्यामुळे त्यांच्यात प्रेमाने शिव्या देणे वगैरे होत असे. या संदर्भात वाचनात आलेली गोष्ट अशी कि श्रीब्रह्मचैतन्य महाराजांच्या पहिल्या पुण्यतिथी वेळेस श्री ब्रह्मानंदबुवा गोंदवल्यास आले होते. राम मंदिरात उत्सवाची तयारी सुरु होती. थोरल्या रामाच्या बाजूला श्रीमहाराजांचा कोच ठेवला आहे.[जो अजुनही तसाच ठेवला आहे.] तेथे अप्पासाहेब भडगावकर कुणाशी तरी बोलत उभे होते. बोलता बोलता ते त्या कोच्यावर किंचितसे बसले व टेकणार तेवढ्यात ब्रह्मानंदबुवांचे तिकडे लक्ष गेले. त्यांनी एक शिवी देऊन 'उठ तेथून उठ' म्हटले.अप्पासाहेब गडबडून उभे झाले.  पण आता ब्रह्मानंदांनी चांगलेच खडसावल्याने ते गडबडून गेले. ब्रह्मानंदबुवा अप्पासाहेबांच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले 'अरे कुठे बसतो आहेस? जळून गेला असता त्यांच्या तेजाने.' सत्पुरुषाचे स्थान त्याच्या अस्तित्वाने एवढे भारलेले असते की तेथे सामान्य व्यक्ती अनवधनाने जरी बसला तरी त्यास ते तेज सहन होणार नाही.
श्री ब्रम्हानंद बुवांनी श्रींच्या आज्ञेने बिदरहळ्ळी येथे तेरा कोटी जपानुष्ठानास प्रारंभ करण्यास श्रीमहाराजांना आमंत्रण केले होते. श्रींना इतर कार्यामुळे तिकडे जातां येणे शक्य नव्हते.म्हणून त्यांनी जपानुष्ठानास प्रारंभ करण्याचें आज्ञापत्र आपले विश्वासू शिष्य अप्पासाहेब भडगांवकर,भाऊसाहेब केतकर  आप्पासाहेब घाणेकर यांच्या हाती देऊन त्यांस तिकडे रवाना केले.ते पत्र पुढील प्रमाणे.
!! श्रीरामसमर्थ !!
"सर्व उपमायोग्य रा.रा.रामभक्त परायण ब्रह्मानंदबुवा यांस आशीर्वाद"
वि.लिहिणेचे कारण तेरा कोटी श्रीराममंत्राचा जप करणारे भक्तराज व ब्रह्मानंद महाराज तुम्ही; महाभागवत,जप करणारे मंडळी यांनी या कलियुगांत थोर केले अनुष्ठान त्याने प्रसन्न माझे अंतकरण. "मी सदा सर्वदा तुमचे आधीन ! तुम्ही सर्वत्रांनी एक करावे काम ! लौकिकी वासनेचा करुनि त्याग ! माझे सांगणे मानावे प्रमाण ! संतोषानें सुप्रसन्न चित्त करुन,तुम्ही ब्राम्हण भोजन,उत्सव,पुरश्चरण,जे कांही तुम्हास दिसेल,जे योग्य असेल ते सत्कर्म करावे.इकडून अप्पासाहेब,घाणेकर, भाऊ साहेब पाठविले आहेत.तर अप्पासाहेब भडगांवकर यांस मी समजून करावे.मीच समजून करावे आरंभ ! त्यांचे म्हणण्याप्रमाणे करावे वर्तन ! मी तुम्हांस सर्वांस येऊन दर्शन देईन यांत शंका नाही.आता हे ऐकावे वचन ! प्रारंभास विलंब न करावा क्षणभर ! जप करणारे मंडळीस, भागवतास,ब्रह्मानंदास हेच मागणे आहे एक. मी आल्यापूर्वी अप्पासाहेब,घाणेकर पोंचल्याबरोबर करावा प्रारंभ. सामान वाया जाऊं देऊं नये.यांत फार अर्थ आहे.समक्ष समजल्यानंतर वाटेल खरे ! लौकिकी भावार्थ सोडूनि द्यावा ! आरामाचा राम जोडावा ! सत्कर्मास हजारो विध्ने असतात.परंतु सर्व एका बाजूला ठेऊन शेवटाला नेण्याचा यत्न करावा.प्रारंभ करण्यात उशिर न लावावा.हा आशिर्वाद. बाकी मजकूर भाऊसाहेब,घाणेकर,सांगताना कळेल.आशीर्वाद .
ता.क. तुम्हास सांगितल्याप्रमाणे मी येऊन घटकाभर तुम्हास भेटेन यांत संशय नाही.पत्राप्रमाणे सर्वत्र मंडळींनी वागावे यांत फार खरे आहे.उगीच हाट करु नका.माझे आज्ञामोडू नका.हा आशीर्वाद .
             ब्रह्मचैतन्य गोंदावले.
या श्रींच्या पत्रावरून श्री अप्पासाहेब भडगावकर यांचा अधिकार लक्षात येईल.

श्रीमहाराज गेले तेव्हां श्री. गणपतराव दामले त्यांच्या एका मित्राबरोबर पुण्याहून सायकलवरून गोंदवल्याला गेले. ते तेथे पोहोचले तेव्हां श्रीमहाराजांचा देह चितेवर ठेवला होता. ते आले आहेत असे कळताच अग्निसंस्काराच्या ठिकाणी ते पोहोचण्यापूर्वीच श्री. आप्पासाहेब भडगावकरांनी त्या दोघांना श्रीमहाराजांचे दर्शन घेऊ न देता परत पाठवले! पुढे एकदा यासंबंधी बोलतांना श्री. आप्पासाहेब म्हणाले, गुरूंना जळतांना पाहू नये; ते आता नाहीत अशी भावना होते.
        --------- प्रा.के.वि. (पू.बाबा) बेलसरे              *
संबंध: अध्यात्म संवाद, (भाग-२) पान११०
संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन

जय श्रीराम!
संकलन - श्रीमहाराज कन्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...