श्रीराम समर्थ
श्रीमहाराजांच्या आई गीतामाईंनी श्री गोपाळराव व श्री दादाजी मोकाशी यांना गोंदवलेस बोलावून घेतले व श्रींना गोंदवलेस परत आणणेसाठी त्यांना इंदूरला पाठवले. त्याप्रमाणे ते श्रींना घेऊन गोंदवलेस आले.
श्री दादाजी यांनी श्रींना पत्र लिहून दिनक्रम कसा असावा असे विचारले होते. त्यास श्रींनी उत्तर दिलेः
[१] दोन गायी सांभाळाव्यात,
[2] जी शेती आहे ती नीट करावी,
[३] रोज भगवद्-गीतेचा एक
अध्याय वाचावा, व
[४] रोज रात्री श्रीराममंदिरात
आरतीस जावे.
यात चूक झाल्यास त्या दिवशी चार आणे श्री गोपाळराव पुजारी यांजकडे दंड म्हणून द्यावेत.
श्री गोपाळ लक्ष्मण मोकाशी हे मूळ कलेढोणचे! पुढे पुण्यात राहून ते मॕट्रिक झाल्यावर मामलेदार म्हणून नोकरीस लागले. .* नंतर श्रींनी गोपाळराव यांस नोकरी सोडण्यास सांगितले व आपले मिळकतीचे रा गोपाळराव यास कुलमुखत्यार नेमले. परिणामी श्रींचे जमिनीबाबत सर्व व्यवहार गोपाळराव पाहू लागले. त्यामुळे समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळाली. १८९० साली श्रीराममंदिर बांधण्याचे श्रींंनी ठरविले व सर्व जबाबदारी गोपाळराव यांचेवर पडली. गोपाळराव हे थोरले रामाचे पुजारी होते. ते उत्तम पोषाख करित व यथासांग पूजा करत. ती पूजा श्रींना फार आवडे. रामरायाचे डोळ्यातून ३वेळा अश्रू आले त्यावेळी गोपाळराव हजर होते.
गोपाळरावांकडे श्रींचा एक पडलेला दात होता. तो त्यांनी नंतर रामरायाचे पायाचे अंगठ्याजवळ खोदून बसविला व त्यावर चुना सिमेंट लावले. त्यामुळे श्रींचे वास्तव्य आजही दाताचे रूपाने थोरले राममंदिरात आहे.
*****
संदर्भः चैतन्य स्मरण २००५ मधील ना बा अत्रे यांचा लेख, पान ९१/९२
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन
श्री गोपाळराव मोकाशी यांच्याबद्दल अजून एक गोष्ट श्रींच्या चरित्रात आली आहे, ती अशी की
"जो श्रीमहाराजांचे मुकाट्याने ऐकत असे त्याचे कल्याण श्रीमहाराज करीत यात नवल नाही, पण जो हट्टाने त्यांचे ऐकत नसे, त्याच्या बाबतीत सुद्धा पुष्कळ प्रसंगी ऐन वेळेला आपल्याला पाहिजे तसे घडवून आणीत. गोपाळराव मोकाशी यांचे लग्न करण्याचे चालले होते. त्याला पसंतीसाठी दोन मुली समोर होत्या. एक गोरी व दुसरी काळी होती. तो म्हणे, 'मला गोरी मुलगी पाहिजे.' श्रीमहाराज त्याला काळी मुलगी पत्करण्यास सांगत होते. होय, नाही करून एकदाची दोन्ही मुलींची लग्ने ठरली. दोन्ही नवरे व नवऱ्या बोहल्यावर आले. मंगलाष्टके सुरु झाली. आता अक्षता पडणार इतक्यात श्रीमहाराज लगबगीने आले आणि त्यांनी झटकन मुलींची अदलाबदल केली ! काय झाले हे लोकांच्या लक्षात येण्याच्या आधीच अक्षता पडून माळा घातल्या गेल्या. गोपाळरावांना फार वाईट वाटले. पण बाकीच्यांना आपल्या मनासारखे झाले असे वाटले. चार महिन्यांनी त्या गोऱ्या मुलीचा नवरा एकाएकी वारला. तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, 'गोपाळराव, पुढे काय प्रसंग होता कळले ना ! मी सांगतो ते ऐकत जावे. उगीच भरीला पडू नये.'
।। श्रीराम।।
जय श्रीराम

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा