जय श्रीराम!
आजपासून आपण अभ्यासुया
#श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे
१. विठ्ठलमंदिर, नरगुंद १९०९
दंडापूर मेन रोड, नरगुंद, जि. गदग - ५८२२०७, कर्नाटक
जय श्रीराम!
श्रीब्रम्हानंद बुवांनी अद्भूत प्रमाणावर एकंदर तीन नामजपयज्ञ केले.त्यांतील नरगुंदचा जपयज्ञ पहिला.
श्रीब्रम्हानंद बुवां नेहमी खेडोपाडीं देखील संचार करीत असतं.असेच हिंडत हिंडत ते एकदां नरगुंद गावी गेले.या गावी श्रीब्रम्हानंद बुवांचा भक्तपरिवार मोठा होता.त्यामुळे नरगुंद गांवी त्यांची फेरी वरचेवर होत असे.नरगुंद हे तालुक्यांतील पेट्याचे गांव.संस्थानी अमदानींत हे राजधानीचे गांव होते.तेथील राजे ब्राम्हण होते.त्यांची धर्मावर श्रध्दा होती.जेथील राजा ब्राह्मणा तेथिल राजधानीचे गांवी बहुसंख्य ब्राह्मणवस्ति असावयाचीच.त्या नियमाने येथेही ब्राह्मणवस्ति भरपूर होती.आणि या सर्वाची श्रीब्रम्हानंद बुवांवर फार भक्ति होती.आपले गांवी श्रीब्रम्हानंद बुवां आल्याची बातमी पसरतांच तेथील सर्व भाविक भक्त त्यांच्या दर्शनास जमले.एके दिवशी दुपारचे जेवण चालले असतां श्रीब्रम्हानंद बुवांनी सहज बोलता बोलता, "तेरा कोटी जप सुरु करावा म्हणतो.त्यासाठी तुम्ही सर्वजण बेलधडीला येणार ना ?"असे म्हटले. तें ऐकून सर्वांनी एकजुटीने " घरदार सोडून ४/६ महिने बेलधडीस येण्यास आम्हाला कसे शक्य आहे,यासाठी जप येथेच केल्यास ठीक होईल. आम्ही सर्वजण आपल्या आज्ञेप्रमाणे त्यांत भाग घेण्यास व इतर कामे करण्यास तयार आहो." असे विनयपूर्वक सुचविले.
ते ऐकून,श्रीब्रम्हानंद बुवां हसले व "पाहू या.श्रीसद्गुरु नाथांना विचारु या.त्यांची परवानगी मिळाल्यास तुमच्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे येथेंच करु या " असे म्हटले.त्यावेळी तात्काळ श्रींच्या अनुज्ञैसाठी येथून पत्र लिहावे असा आग्रह धरला. श्रीरामाविषयींच्या त्या ग्रामस्थांच्या मनांतील आस्तिकभाव पाहून पु. बुवा संतुष्ट झाले व त्याच दिवशी तेरा कोटी जपयज्ञास श्रीमहाराजांची अनुज्ञा मिळविण्याविषयी आपल्या नेहमीच्या शिरस्त्यास अनुसरुन श्रीब्रम्हानंद बुवांनी पंढरपुरचे श्रींचे परमभक्त अप्पासाहेब भडगांवकर यांस पत्र लिहिले.
श्रीमहाराजांकडून ब्रह्मानंद बुवांना आलेले आज्ञापत्र अत्यंत मार्मिक,हृदयंगम व बोधप्रद आहे.ते पु. बुवांच्या कानडी चरित्रकारांना उपलब्ध झाले असल्यानें व त्यांनी ते छापले असल्याने त्यांच्या अनुज्ञेने ते जसेंच्या तसेंच वाचकवृंदांस सादर करीत आहे.
"श्रीरामचंद्रपरायण ब्रह्मानंद योगी यांस.
ब्रह्मचैतन्यबुवा मु.!! इंदूर यांचा अनेक आशीर्वाद.पत्र लिहिणेचे कारण आपला तेरा कोटी जपाबद्दलचा मजकूर अप्पासाहेब यांचे मार्फत कळला.तरी लिहिल्याप्रमाणे हरीपूर येथे करण्यास सुरवात करावी.जरुर जरुर मी काशीहून परत हर्दे मुक्कामी येऊन येथे रामनवमीला श्रीरामाची स्थापना केली व आतां नैमीष्यारण्यांत जाण्याचा विचार आहे. आपल्यास कळवावे.आणि ज्या ठिकाणी तेरा कोटीची सोय असेल त्या ठिकाणी करावां. कृष्णातीर बरे आहे.परंतु आतांचे दिवस घोर कलीचे असल्यामुळे चांगले सत्कर्म कोणतेही शेवटास जाऊं न देण्याबद्दल कलीचा दुराग्रह आहे.तरी त्याचा प्रयत्न न चालण्याचा उपाय तपोबल पाहिजे. शब्दज्ञान,व जगाचे महत्व व निंदा ही दोन्ही उपयोगाची नाहीत.तर तशाचा सहवास करु नये.नास्तिक कुतर्काशीं वाद न करता अहंभाव रहित व्यवहाराचा संबंध न ठेवता,अक्रोध,निर्लोभ,चित्तांत वृत्ति लीन करुन, उपासनारुप जग पहावे.अखंड नाम स्वतः घ्यावे हे आपले कर्तव्य आहे.मी आपणास सांगावे असे नाही.पण सुचनार्थ लिहिले आहे.दुसरे असे.मन चित्तवृत्ति बाह्य नामस्मरण झाल्यावाचून साधनात आळस करुं नये तसेच स्त्रियांचे मुखावलोकन,त्यांचे शब्द,स्पर्श, भाषण,ममत्व,अगत्य,इ.कधी सत्य मानू नये व त्याचे वारे कधी लागूं देऊ नये.असे १३ कोटी होईतोपर्यंत करावे.माझी विनंति आहे.कारण काळ फार भयंकर आहे.तर माझ्या चालीने चालू नका.माझे वेळ काळ कारण वेगळे आहे.तथापि मी अन्य अवस्थीच राहणार अथवा देह सोडणार.कारण आता पुढे धर्म,दया,शांति,भक्ति,नीति कोठे आढळत नाही.सबब सांगून वागा.राम राम अखंड जागा.हा आशिर्वाद."
या प्रमाणे आलेले सद्गुरुनाथाचे आज्ञापत्र पाहून ब्रह्मानंद गुरुंचा आनंद ओसडू लागला.सद्गुरुनाथांच्या आज्ञापत्राप्रमाणे नदी तटाकीं जपयज्ञ करावयाचे श्रीगुरुंच्या मनांत येऊ लागले.नरगुंदला नदी तटाक नसल्याने दुसरे कार्यस्थळ पाहण्याची त्यांस पाळी आली.परंतु नरगुंद येथील भक्त जनांचा नामयज्ञाबाबतचा परम भाव उत्साह पाहून व श्रीमहाराजांच्या "ज्या ठिकाणी १३ कोटीची सोय असेल त्या ठिकाणी करावा " या आदेशाचा आधार घेऊन श्रीगुरुंनी नरगुंदांतच जपयज्ञ करणेचा निश्चय केला.नरगुंदगावी एक भव्य असे श्री विठ्ठल मंदिर आहे. या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार ब्रम्हानंद बुवांनी केला. तेथेच सगळ्या भाविकांच्या मनांतून जपयज्ञ व्हावा असे असल्याने श्रीशालिवाहन शके १९२३ प्लवनाम संवत्सराच्या आषाढ शुध्द अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत श्रीरामनाम सप्ताहाचा आरंभ करण्यांत आला.आसपासच्या चहूंकडील भाविकांना आमंत्रणे गेली. भाविकांच्या मेळ्यांत सप्ताह थाटाने चालूं राहिला.श्रीगुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रींच्या पादुकांना पंचामृताभिषेक करुन पूजा थाटाने करुन आरती करण्यांत आली.त्या नंतर तेरा कोटी जपाचा संकल्प करण्यांत येऊन सद्गुरु नाथांपुढे श्रीफल ठेवण्यांत आले व त्याच शुभमुहूर्तावर श्रींच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मानंद गुरुंनी स्वतः प्रथम जपास प्रारंभ केला.
जपास बसणाऱ्या अनुग्रहित लोकांना जपाचा नियम समजावून सांगण्यासाठी व परगांवहून जपासाठी येऊन राहणाऱ्या लोकांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणून सुरवातीस एकदोन महिने श्रीगुरुंनी आपला मुक्काम तेथेंच ठेवला. त्यामुळे श्रीक्षेत्र बेलधडी येथील राममंदिरात दररोज काकड आरती,माध्यान्ह नैवेद्य, आरती,सायंभजन आरति अष्टावधान वगैरे प्रकारांनी भगवंताची उपासना ज्या क्रमाने चालते त्याच प्रमाणे चांगल्या रीतीने सुरवात झाली.या विठ्ठलमंदिरांत रोज शेकड्याने स्त्री,पुरुष,मुले जपाला बसत असत.त्या सगळ्या ंच्या जेवणाची व्यवस्था श्रीगुरुच करीत होते.उत्तरोत्तर जपासाठी येणाऱ्यां लोकांची संख्या वाढू लागली.त्यामुळे अवघ्या ६/७ महिन्यांतच तेरा कोटीची जपसंख्या पुरी होत आली. जपसंख्या आटोक्यांत येताच ब्रह्मानंद गुरुंनीजपयज्ञाच्या सांगता महोत्सवासाठी श्रींना विनंतीपूर्वक बोलावून आणण्यासाठी नरगुंदच्या दोघा भाविकांची रवानगी केली व आपण महोत्सवाच्या तयारीस प्रारंभ केला.
जपयज्ञाच्या सांगतामहोत्सवास श्रीं येणार असल्याची वार्ता यावेळपावेंतों कर्नाटका च्या कानाकोपऱ्यात पसरली होती.त्यामुळे महिनाभर आधीपासून सुमारे हजार एक लोक जमून राहिले होते.श्री आल्यावर तर जनसमूह ८/१० हजारपर्यंत फुगला असावा.
श्रीमहाराज गोंदवल्याहून निघाले ते पंढरपूर, सोलापूर,विजापूर यामार्गे मल्लापूर स्टेशनवर उतरले. तेथे आगाऊ तयार ठेवण्यात बैलगाडींतुन यावगलला गेले
नंतर बैलगाडीतूनच प्रवास करीत नरगुंदला जाऊन पोचलें.भाविक भक्तांनी उत्साहपूर्वक सर्व गांव तोरणांनी आधींच सजविले होते.रस्त्यावरील धुरळा उडूं नये म्हणून गावांतील रस्त्यावर पाणी शिंपडून ठेवले होते.व त्यावर रांगोळी घालून रस्ते सुशोभित केले होते, श्रींना समारंभांने वाजत गाजत आणण्यासाठी भाविक भक्त भजनीमेळ्यासह गांवाबाहेर एक मैलावर सामोर जाऊन मार्गप्रतिक्षा करत थांबले होते.व इतर लोक गांवापासून तेथपर्यंत दुतर्फा पसरले होते.
श्रींचे लांबून दर्शन होतांच सर्वांनी एककंठाने जयघोष करण्यास सुरवात केली व त्यांस मिरवीत गावांत उभारलेल्या भाव्य मंडपात आणले.मंडपात मध्यभागी उंच सिंहासन तयार करण्यांत आले होते.त्यावर श्री विराजमान झाले. दर्शनोत्सुक जनसमुहाने अहमहमिकेने श्रींचे दर्शन घेतले.त्या दिवसापिसून श्रीरामरायाच्या घोषाला ना अंत ना पार अशी स्थिती झाली.भोजनाच्या पंक्तीवर पंक्ती उठूं लागल्या.सर्व ज्ञातीच्या लोकांना देखील मुक्तद्वार अन्नसंतर्पण चालू होते.श्रींच्या कडून अनुग्रह घेण्यासाठी तसेच प्रापंचिक दुःखे सांगून त्यावर इलाज विचारण्याची नुसती रीघ लागून राहिली.
अशा प्रकारे त्या महोत्सवानंदात दोन दिवस गेले नाही तोच गावातील पाण्याच्या तलावांतील पिण्याच्या पाण्याचा सांठा कोठेच नव्हता.अशा स्थितीत ८/१० हजार लोकांना पाणी पुरवठा कसा करावयाचा. अखेर श्रीगुरुंपुढे त्यांनी आपली चिंता व्यक्त करताच ," मूर्तिमंत श्री हजर असतांना व श्रीरामनाम अहर्निश चालू असतांना, खुळ्यांनो कसली चिंता करता.पाण्याची कमतरता कशी भासेल". या शब्दांत त्यांचे समाधान श्रीगुरुंनी केले.आकाशाकडे कृपाकटाक्षाने पाहिले.व रोजच्या प्रमाणे अतिउत्साहाने श्रींची पूजा आरती करुन भोजनाची पंगत बसवली.संपूर्ण जेवणावळ आटोपली.आणि चमत्कार असा झाला की,आकाशांत इतके काळे ढग जमले की आकाशच दिसेना.अकस्मात भयंकर पावसास सुरवात झाली.क्षणार्घात पहावे तिकडे पाणीच पाणी दिसू लागले.तळे विहरी भरुन वाहू लागल्या.
वास्तविक तो माघ महिना होता.पावसाचा यत्किंचित् संभव नव्हता आणि पावसाचे चिन्ह दिसत नसतांना श्रीगुरुंच्या महिम्याने पाण्याची समृद्धि झाली.हे केवळ श्रींचे ठायी असलेल्या ब्रह्मानंद गुरुंच्या दृढ विश्वासाचे फळ.या अद्भूत घटनेने तेथील लोकांचा उत्साह शतगुणित झाला असल्यास नवल ते काय ?
श्रींचा तेथे ८ दिवस मुक्काम होता.सर्वांची जेवणाची व्यवस्था होती.तेथे न जेवणाऱ्यांसाठी तांदूळ,डाळ वगैरे सामान देणाऱ्याचीही व्यवस्था असल्याने सर्वजण संतृप्त झाले होते.समारंभाच्या समाप्तीचे दिवशी ब्रह्मानंद गुरुंनी श्रींचे हस्ते जमलेल्या शेकडो विद्वानांना एकेक महावस्त्र व एकेक मोहोर दक्षिणा देववून त्यांची संभावना केली.व हजारो गोरगरीबांना अन्न,वस्त्र व द्रव्य देववून त्यांना आनंदित केले.अनेक लोकांना बीजमंत्राचा उपदेश श्रींचेकडून देवविला.
जय श्रीराम!
फोटो स्रोत: गुगल




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा