जय श्रीराम!
#श्रीमहाराजांचेज्येष्ठशिष्य
गोंदवल्याचे भूतपूर्व पंच मंडळी!
श्री गोपाळराव कर्वे
श्री कर्वे १९५६ साली पंच झाले. हे कर्तृत्ववान आणि हुशार होते. शेतीची , बांधकामाची पूर्ण माहिती ते वाचन करून मिळवित आणि त्याचा उपयोग करून घेत. संस्थानाचे हिताविरुद्ध एखादी गोष्ट असल्यास ते तसे स्पष्ट सांगत.श्री रामकृष्ण दामले यांच्या अंत्यसमयी श्री गोपाळराव कर्वे हजर होते.
त्यांचेविषयी खालील दोन गोष्टी वाचनात आल्या.
सन १९६१ साली जुलै मध्ये पुण्याला पानशेतचा पूर आला. त्यामध्ये पुष्कळ कुटूंबे निराधार झाली. त्यात काही श्रीमहाराजांची अनुग्रहीत मंडळी होती. त्यांचा समाचार घेण्यासाठी श्रीमहाराज मुद्दाम पुण्यास आले होते. [वाणी अवतारात] त्यावेळी श्रीगोंदवले देवस्थानचे ट्रस्टी श्री कर्वे श्रीमहाराजांना भेटले. श्रीमहाराज त्यांना म्हणालेः
गोपाळराव, ही जी पुण्यावर आपत्ती आली आहे ती दैवी आपत्ती आहे. त्यात कोठल्याही मानवाचा दोष अगर अपराध नाही. अशा दैवी आपत्तीने जी कुटूंबे निराधार व निराश्रित झाली असतील त्यांना टाहो फोडून सांगा की त्या सर्वांनी गोंदवल्यास येऊन राहावे. त्या सर्वांची आश्रयाची वा अन्नवस्त्रांची सोय जरुर करण्यात येईल. श्रीगोंदवल्यास जाण्यास द्रव्य सहाय्यही देण्यात येईल. त्यांनी फक्त श्रीगोंदवल्यास काय जाडेभरडे अन्न मिळेल त्यावर उपजिवीका करुन घ्यावी. व गोंदवल्यास राहिलेल्या काळात त्यांनी होईल तितके नामस्मरण करावे. हे सर्व तूम्ही अगदी माझा निरोप म्हणून टाहो फोडून सांगा. अशा आपत्ती मध्ये आपल्या मंदिराचा जर उपयोग झाला नाही तर त्या मंदिराचे कामच काय?*
जेवढे लोक जातील ती माहिती मला कळवावी म्हणजे त्यांची व्यवस्था नीट लागते की नाही याची जिम्मेदारी माझ्यावर राहील.
*********
संदर्भः श्री बापूसाहेब मराठे यांचे हस्तलिखित
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन
१९६३ हें श्रीमहाराजांच्या पुण्यतिथीच्या सुवर्णमहोत्सवाचे वर्ष. त्यानिमित्तानें श्रीमहाराजांच्या समाधीमंदिरावरील शिखरावर सुवर्णकलशाची स्थापना करावी व त्याच्या पडझड झालेल्या भागांची दुरुस्ती करावी अशा विचारानें श्री. तात्यासाहेबांनीं व देवस्थानच्या पंचमंडळींनीं श्री. हुच्चराव व श्री. अंतरकर यांचेवर तें काम सोपविलें. त्यांनी तें श्री. अण्णासाहेब गाडगीळ यांचे सल्ल्यानें व मदतीनें कारागीर आणून प्रथम नादुरुस्त असलेलें शिखर दुरुस्त करून घेतलें.
ता. ४-११-१९६३ रोंजीं शिखरावर [मूळ तांब्याच्या कलशाला सोन्याचें पाणी दिलेल्या] सुवर्णकलशाची स्थापना केली. आदले रात्रीं तो प्रथम थोरले श्रीरामासमोर सभामंडपांत ठेवून मग तो समारंभपूर्वक समाधिमंदिरात आणला गेला. तेथें त्यावर दुधाचा रुद्राभिषेक केला गेला व दुसरे दिवशीं संस्थानाचे दुसरे ट्रस्टी श्री. रा. गोपाळराव कर्वे यांचे हस्तें [ते शेवटपर्यंत पहाडावर चढून गेले होते.] त्याची प्रत्यक्ष स्थापना झाली. आदले दिवसापासून स्थापनेचें वृत्त गांवांत पसरलें असल्यामुळें हा स्थापनेचा सोहळा पाहण्यास जवळ जवळ सबंध गाव लोटलें होतें. *श्री. रा. तात्यासाहेबांना कार्यक्रमाकरता मुद्दाम बोलाविले होतें. प्रथम ते नाही म्हणत होते. पण नंतर कबुल झाले व आले.*
मंदिराभोवती ब्रह्मवृंदांचा आणि भाविकांचा मेळा मोठ्या प्रमाणात होता. मंत्र घोष, वाद्ये, तुतारी वगैरेंच्या नादाने असमंत दुमदुमून गेले होते. त्याचवेळी श्रीमहाराजांचा सुखसंवाद [वाणीरुप अवतारात] सुरु होता. येथे असलेले स्त्री पुरुष तल्लीनतेने ती अमृतवाणी ऐकत होते. *बाहेरील आवाज वाढल्यामुळे महाराज थोडे थांबले. त्यांनी विचारले, 'बाहेर काय चालू आहे?' कोणीतरी सांगितले 'सुवर्ण कलश स्थापनेचा सोहळा सुरू आहे'. ते ऐकल्यावर महाराज शांतपणे म्हणाले, 'मंदिराला सोन्याच्या कळसापेक्षा उपासनेचा कळस असावा.'*
*******
संदर्भः १] *मालाडचे थोर सत्पुरुष श्री रामचंद्र चिंतामणि तथा तात्यासाहेब केतकर यांचे जीवनचरित्र* हे डा वा रा अंतरकर यांनी लिहिलेले पुस्तक. २] धन्य ही गोंदवले नगरी ! हे वासुदेव पुंडलीक कुळकर्णी यांचे पुस्तक.
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा