गुरुवार, २ जानेवारी, २०२५

 जय श्रीराम!
गेले ३-४ दिवसांपासून श्रीमहाराज निर्वतल्यानंतरच्या ७-८ वर्षातल्या काळातला पुण्यतिथी उत्सव कसा असेल यावर चिंतन सुरू होते.. सुरवातीच्या दोन उत्सवांना पू ब्रम्हानंद बुवा होते. त्यानंतर फ्ल्यू आजाराची साथ भारतभर होती.. १९१८ ते १९२० पर्यंत!  सुरवातीच्या पुण्यतिथी उत्सवाच्या काही नोंदी वाचनात आल्या.चैतन्य स्मरणचे  जुने विशेषांक ही चाळले.
त्यांचा संदर्भ घेऊन काही प्रसंग मनात आकारास येऊ लागले. मग हे कुठेतरी लिहून ठेवावं असं वाटलं.. त्यावरून हा लेख आकारास आला अर्थात प्रेरणा श्रींचीच. 🙏🏻
तो इथे देते. लेख अर्थातच काल्पनिक आहे
. 🙏🏼🙏🏼
*************
मानस - पुण्यतिथी उत्सव १९२४
स्थळ: गोंदवले , समाधी मंदिर परिसर
काळ: साधारण १९२४च्या दिवाळीनंतरचा !

नुकतीच दिवाळी होऊन मंडळी आपापल्या गावी परत गेली आहेत. काही मोजके लोक आता गोंदवल्यामध्ये राहिले आहेत. कार्तिक महिना संपत आलाय. सर्वांना वेध लागलेत ते आता मार्गशीर्ष मध्ये  येणाऱ्या श्रीमहाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाचे. सर्वजण वाटच पाहत आहेत, पंच मंडळी कधी बैठक घेतात ते.
एका संध्याकाळी सर्व मंडळींना त्या वेळचे पंच श्री गणपतराव दामले , श्री हरिपंत हरिदास, श्री पागा फडणीस, ई मंडळी समाधी मंदिराच्या आवारात सगळ्यांना जमण्यासाठी बोलावणे पाठवतात. समस्त सेवेकरी, काही वरिष्ठ ग्रामस्थ, पंच मंडळी आवारात जमतात. श्री दामले प्रत्येकाच्या कामाची जातीने चौकशी करत आहेत.
तसेही कामाची वाटणी करण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक जण उत्साहाने सर्वच कामे करायला तत्पर आहेत.. उलट अहमहमिकेने कामे अंगावर घेत आहेत.  श्रींचा पुण्यतिथी उत्सव म्हणजे प्रत्यक्ष श्रींची सेवा ! सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलेले आहे.
 

 पंच मंडळी पंचांग घेऊन येतात आणि बोलायला सुरुवात करतात. "मंडळी, दिवाळी झाली ना, यावेळी  मार्गशीर्ष कृ. दशमी २० डिसेंबर १९२४ रोजी आपल्या श्रींची पुण्यतिथी येतेय.आपल्याला उत्सवासाठी तयारीला बरोबर एक महिना मिळतोय. सर्वात आधी गावोगावी निमंत्रणे जायला हवीत. .यावेळी बरीच माणसे येतील.  १०,००० तरी लोक येण्याचा अंदाज आहे. या दिवाळीत तुम्ही बघितले असेलच.
"श्रीयुत बळवंतराव (फाटक), आपण निमंत्रण पत्रिकेचा मसुदा बनवायला घ्यावा'!  दरवर्षीप्रमाणे, श्री.नागप्पा तुम्ही कर्नाटकात , श्री बसप्पा--श्री हिर्लेकर कोल्हापूरकडे, श्री वामनराव जोशी, आणि श्री डी.आर.जोशी मुंबईत, श्रीयुत बाबुराव गद्रे पुण्यात , श्री नानासाहेब देशपांडे वाईमध्ये ,  श्री जोशी व श्री उपाध्ये कडावकडे,  श्रीमहाराजांच्या अनुग्रहित व्यक्तींना  तसेच इतरांना घरोघर निमंत्रण पत्रिका देतील.
श्रींच्या निर्वाणानंतर, त्यांच्या आज्ञेने १२ वर्ष गोंदवल्यासारख्या ठिकाणी.. सगळी अडचण सोसून राहणारे ७७ वर्षांचे श्री भाऊसाहेब केतकर स्वतःहून म्हणतात की गोंदवले आणि आसपासची गावे गोंदवले खुर्द, बुद्रुक , पिंगळी, दहिवडी, आटपाडी मधे पत्रिका आम्ही वाटू. पंच त्यांना जशी आपली इच्छा म्हणत रुकार देतात.

 पंच पुढे समस्त सेवेकरी लोकांना म्हणतात, २० नोव्हेंबरला मार्गशीर्ष शु. प्रतिपदा आहे , तेव्हा आपण मुहूर्तमेढ करणार आहोत.  ५ डिसेंबरला वद्य प्रतिपदा. यादिवशी आपण कोठीपूजन करणार आहोत. ब्रम्हानंद बुवांनी घालून दिलेल्या शिस्तीप्रमाणे करायचे आहे.  नाहीतर त्यांचा तडाखा माहित आहे ना?

कोठीघर सांभाळणाऱ्या श्री येरळवाडीकर मास्तरांना पंच विचारतात, "मास्तर, कोठीघरात धान्य किती लागणार आहे? भांडी किती लागणार आहेत? पुरेशी आहेत ना? कर्नाटकातून ब्रम्हानंद बुवांनी पाठवलेली जाड जाड पितळेची मोठी भांडीकुंडी आहेत आपल्याकडे.  अजून काय काय भांडी लागतील. किराणा सामान वैगेरे सगळ्या याद्या करायला घ्या. तुम्ही अगदी काटकसरीने , निगुतीने सगळं सांभाळता म्हणून विश्वास आहे तुमच्यावर!
 आणि हो, मास्तर उत्सवात तुम्हाला कोठीबरोबरच नामसप्ताह आणि भजनी पहाऱ्याची पण व्यवस्था लावून द्यावी लागेल बरे का! नंतर एकदा तिकडे व्यवस्था लागली की श्री काशीनाथय्या हर्देकर, श्री हरिपंत हरीदास, श्री बाबा दांडेकर, श्री गंगाधरपंत आठवले, ही मंडळी पहाऱ्याकडे बघतील.
कीर्तनसेवेसाठी आपल्याकडे हरिपंत हरिदास आहेतच. श्री दामोदरबुवा रिसबुड, श्री दामोदरबुवा कुरवलीकर, श्री सखारामबुवा हैदराबादकर, श्री कराडकर,  श्री पिलोबा वडूजकर, श्री शंकरराव वडगावकर, श्री मणेराजुरीकर यांनाही निमंत्रणे पाठवून बोलवावे लागेल..

नंतर मद्रासी अम्माकडे वळून पंच म्हणतात,"अम्मा , तुम्ही आताच रामरायाची वस्त्रे आणि समाधीवरील वस्त्रे विणायला घ्यावी.
मुळगुंदच्या ठसकेबाज गंगुताई आठवले स्वयंपाकघर बघणाऱ्या! त्या पंचांनी काही सांगण्याच्या आधीच म्हणतात, "स्वयंपाकघराचे आम्ही बघतो. लक्ष्मीबाई, काशीबाई, आपण उद्यापासूनच  चटण्या, लोणची, पापड करायला घेऊ. सामानाची यादी उद्याच हरिपंतांकडे देतो. "

पंच समाधानाने मान डोलवत पुढे म्हणतात, 'इतके लोक येणार म्हणजे, सरपण खूप लागेल. त्यासाठी आताच सरकारकडे अर्ज करावे लागेल. वठलेल्या सरकारी झाडांचे सरपण पी. डब्लू डी खात्याकडून स्वस्त दरात मिळेल. भाऊसाहेब आपण सरकारी नोकरीत होता ना, हे सरकारी अर्जाचे काम मनावर घ्यावे!"

झालं, दुसऱ्याच दिवसापासून सगळी मंडळी उत्साहाने तयारीला लागतात.
चारच दिवसात, निमंत्रण पत्रिकेचा मसुदा तयार झालाय. तो पंचांनी मान्य करून छापण्यासाठी दिला गेलाय. अम्मांनी वस्त्रे विणायला घेतलीत. यावेळी अम्मा जरीकाठाची वस्त्रे आणि त्यावर मोत्याची नक्षी विणत आहेत. भाऊसाहेबांनी सरपणासाठी सरकारकडे अर्ज केला आहे. श्री बळवंतराव, श्री येरळवाडीकर मास्तर यांनी म्हसवडला बाजाराच्या दिवशी, जाऊन स्वयंपाकासाठी काही मोठी भांडी आणि सुमारे २५-३०००० पत्रावळ्या, द्रोण खरेदी केले आहेत. हे सगळे बैलगाडीने आणून समाधी मंदिराच्या आवारात एकूणएक मोजून दिले जात आहेत. पंच मंडळी सगळं व्यवहार काटेकोरपणे करत आहेत.
आता जसजसे दिवस जाऊ लागले सेवेकर्याच्या उत्साहाला उधाण आले आहे.
निवासी खोल्यांची डागडुजी , साफसफाई, स्वयंपाकघर भिंती, जमीन शेणाने सारवणे वैगेरे सगळी कामे रोजच्या रोज होत आहेत. गुळ दाणे तोंडात टाकत, मोठ्या नामगजरात काम सुरु आहे.  सगळीकडे नुसती धांदल उडालेली आहे. गंगुताईंनी चटण्या, लोणची पापडाचे डबे भरून ठेवलेत. अम्माचे काम पण आता होण्यात आले आहे.
आईसाहेब मंदिरासमोर मांडव घालायचे काम सुरु झाले आहे. प्रथम सारख्या अंतरावर चुन्याने आखून घेतले आणि खड्डे खोदून वासे पुरायचे काम सुरु झाले आहे. संस्थानकडे तेव्हा पगारी नोकर नसल्यामुळे सेवेकरीच हे काम मोठ्या नामगजरात करत आहेत. राजाभाऊ गोडबोले त्यांच्यावर लक्ष ठेवायला आहेतच. वासे पुरल्यावर त्यावर बांबू आडवे टाकून झाले. तेव्हा वर टाकायला कापड वैगेरे नव्हतेच. म्हणून राजाभाऊंनी आधीच विश्वनाथ कडून झाडाच्या मोठ्या फांद्या, डहाळे कापून ठेवल्या आहेत. ते वर टाकण्याचे काम सुरु होते. त्यामुळे मंडपात बसलेल्या लोकांना ऊन लागणार नाही. मधून मधून सेवेकर्यांनी गूळ, दाणे यांचे वाटप होत आहे. ते तोंडात टाकून सेवेकरी आनंदाने काम करत आहेत.अगदी हसत खेळत हि कामे सुरु आहेत. रात्रीच्या वेळी शेकोटीत शेंगा भाजून गप्पा मारत खाण्यात सेवेकर्यांना मजा येतेय.. स्वतः पंच मंडळी पण त्यांच्यात सामील होत आहेत. सेवेकरी परत दुप्पट उत्साहाने मांडव घालण्याच्या कामाला लागत आहेत.  रोज सकाळची न्याहरी नाही पण लहान मुले, त्यांच्या आया, वृद्ध मंडळींसाठी पिठले भात टाकला जात आहे. सेवेकरी आणि इतर मंडळींसाठी द्रोणामध्ये उसळ दिली जात आहे. श्री गोविंदराव गाडगीळ, श्री गोविंदराव कडवेकर, बनूताई आपटे, वगैरे मंडळी हे काम हौसेने करीत आहेत.
विशेष म्हणजे, ही सगळी कामे ' जय जय श्रीराम, जय जय श्रीराम'  च्या गजरात होत आहेत. मग ती मोठाली भांडी चुलीवरून उतरवायची असोत की वर चढून झाडाच्या फांद्या टाकायची कामे... 'जय श्रीराम' म्हटले कि मंडळींना अजून जोर चढे. सगळीकडे नुसता नामाचा गजर होत आहे.  वातावरणात नुसता उल्हास भरून राहिला आहे.
पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी पाणी विहिरीतून काढावे लागे, त्यासाठी नुकतेच रहाटगाडगे बसवून घेतले आहे. श्री मनोहर दुसे पाण्याची व्यवस्था बघत आहेत.
निमंत्रण पत्रिका घरोघर गेल्या आहेत.
श्री मनोहरपंत आंबेगावकरांनी आधीच सगळे दिवे, कंदील रोजच्या रोज घासून पुसून स्वच्छ केले आहेत. रोजच्या रोज त्यातल्या तेल, वाती तपासायचे काम निगुतीने करत आहेत.
भजनी पहाऱ्यासाठी गावोगावची नावे आली तशी यादी बनवून त्याची व्यवस्था श्री येरळवाडीकर मास्तरांनी आधीच लावून ठेवली आहे.
श्री विश्वनाथ बुवा तर सतत गोशाळा साफसफाई , गायींच्या सेवेमध्ये मग्न असतात, भूक लागली तर तिथेच बसून बाजरीचे पीठ पाण्यात कालवून खातात.
यशवंतबुवा रोज पहाटे उठून खराटा घेऊन आवार साफ करत आहेत.आवारात घाण दिसली तर स्वतः स्वच्छ करत आहेत.
 
२० नोव्हेंबर मार्गशीर्ष शु. प्रतिपदा: मोठ्या उत्साहात मुहूर्तमेढ होते. सकाळी काकड्यानंतर मंडळी आईसाहेबांच्या समाधी चौथर्याजवळ जमतात. ती जागा आधीच केळीचे खांब लावून ,रांगोळ्या काढून सुशोभित केली आहे.समोर श्रींचा मोठा फोटो ठेवला आहे त्यास सुंदर फुलांचा  हार!  पंच सपत्नीक पूजेस बसतात. पुण्याह वाचन, गणेशपूजा होऊन साग्रसंगीत मंत्रोच्चारासहित आंब्याची पाने बांधून पूजा होते आणि मुहूर्तमेढ रोवली जाते, श्रींची आरती होऊन प्रसाद वाटप होते.  मंडळी गोशाळेत येतात. तिथे गायींची पूजा होते, गायींना गोग्रास दिला जातो. अश्या रीतीने अत्यंत पवित्र वातावरणात मुहूर्तमेढ पार पडते. यानंतर मात्र जोमाने मंडळी कामाला लागतात.

१५ दिवसांनी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेला कोठीपुजन आहे.
कोठीपुजनच्या २ दिवस आधीच जालनेकर मंडळी श्री पांडुरंगबुवा जालनेकर, श्री नानाचार्य, श्री बाबा मेरेकर, पु. प्रल्हादबुवा, ही मंडळी ४० लोकांना घेऊन रेल्वेने कोरेगाव रेल्वेस्टेशनवर येऊन पोहचलेले  आहेत. त्यांना सन्मानपूर्वक घेऊन येण्यासाठी व्यवस्थापक श्री हरीपंतांनी बैलगाड्या पाठवल्या आहेत.

पडेल ती कामे सेवेकरी करत आहेत. कोल्हापूरचे श्री हिर्लेकर कोठीच्या सारवलेल्या भिंतीवर रोज सुवाच्य अक्षरात श्लोक लिहीत आहेत.
प्रसादासाठी भोजन मंडप आईसाहेब मंदिराच्या समोर घातले गेले आहेत. भाजी निवडण्यापासून ते पाणी भरताना, वाढतांना, भांडी घासताना , आवाराची साफसफाई करतांना... खोल्यांची पुताई करतांना सर्व वेळ ' जय जय श्रीराम, जय जय श्रीराम " नामघोष ऐकू येतोय. इतका की रात्री झोपेस्तोवर तोच आवाज कानात घुमतोय. सर्व मंडळींच्या चेहऱ्यावर अखंड हास्य विलसते आहे..... तेही कष्टाची , मेहनतीची, अडचणींची अजिबात जाणीव न होता !हाताने सेवा व मुखाने नामगजर अश्या वातावरणात जागेपणी पडणाऱ्या एखाद्या स्वप्नासारखे दिवस जात आहेत.

.. आणि आता जालनेकर मंडळी गोंदवल्याच्या वेशीपर्यंत आल्याची वर्दी येते.
सुवासिनी लगेच औक्षणाची ताटे  तयार करतात.. आल्यावर त्यांच्या स्नानाची तयारी म्हणून चुलाणे पेटवली जाऊन त्यावर जाड बुडाची मोठाली तांब्याची तपेली ठेवली जातात.
बैलगाड्या प्रवेशद्वारावर आल्यावर लगबगीने पंच मंडळी त्यांच्या स्वागतासाठी तिकडे ४ सेवेकरी बरोबर घेऊन जातात. दोन्हीकडची मंडळी एकमेकांना बघताच आनंदाने एकच जयघोष करतात..! एकेक करून  पू. पांडुरंग बुवा, पू प्रल्हाद बुवा सपत्नीक आणि इतर बरोबरची मंडळी पायउतार होतात. पंच मंडळी आणि जालनेकर एकमेकांना साश्रू नयनांनी क्षेमकुशल विचारत आलिंगन देतात!  आणि का नाही? हे वर्षातले १० दिवसच तर असतात गावोगावी विखुरलेल्या भक्त मंडळींनी  एकत्र येण्याचे, सामुहिक जप, एकत्र कीर्तन, प्रवचन, महाराजांच्या आठवणींची देवाण घेवाण करण्याचे!
पंच मंडळींच्या स्त्रिया आणि इतर सुवासिनी सर्वांचे औक्षण करतात, आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू देतात. भेटीगाठी होऊन, सर्वांना त्यांच्या खोल्यांकडे नेले जाते.. सामान नेले जाते. स्नानासाठी गरम  पाणी तयार असतेच. सर्व सुस्नात होऊन मंदिराच्या आवारात जमतात. स्नानोत्तर भोजनाची आधीच व्यवस्था झालेली असते.
परंतु आता सर्वांना श्रींच्या भेटीची आस असते. करवत काठी पांढरे शुभ्र सोवळ्याचे धोतर नेसलेले अन्  वर उपरणे घेतलेले ३८ वर्षांचे पू पांडुरंग बुवा , आणि पिवळ्या जर्द रंगाची जरीकाठाची नऊवारी साडी, कपाळी  ठसठशीत कुंकू, नाकात नथ, गळ्यात ठुशी,  अन् सौभाग्याचां दागिना, हातात हिरव्या बांगड्या घातलेल्या सौ कृष्णाबाई समाधीचे दर्शन घेतात. त्यांच्या मागेच साधारण पिवळसर नेहरू शर्ट अन् पांढरे शुभ्र धोतर, डोक्याला गुलाबी फेटा घातलेले ३२ वर्षांचे पू प्रल्हाद बुवा आणि त्यांच्या मागे त्यांच्या  हिरवीगार बारीक जरीकाठाची साडी, कपाळी लाल जर्द कुंकू ल्यालेल्या सौ मैनाबाई उर्फ जीजीमाय श्रींच्या समाधीची पूजा आरती करतात. सर्वांना श्रींच्या आठवणीने गदगदून येते. मनोभावे नमस्कार करून डोळेभरून दर्शन घेतात. आपण श्रींच्या सहवासात घालवलेले क्षण आठवून, त्यांच्या हृद्य आठवणींनी सर्वांचे मन भरून आलेले असते..
समाधीमधून बघत असलेल्या श्रींच्या डोळ्यातही पाणी तरळते... एवढा आपला भक्तपरीवार, आपण जोडलेली माणसे बघून त्यांच्याही डोळ्याच्या कडा ओलावतात.
आता श्रीमहाराजांना नैवेद्य दाखवला जातोय.
समाधी मंदिरातून पाय निघत नसतांना देखील, पंचांच्या भोजनाच्या आग्रहामुळे जड पावलांनी जालनेकर मंडळी प्रसाद मंडपाकडे वळतात. स्वच्छ सारवलेल्या जागेवर, सतरंज्या टाकण्यात आल्या आहेत. प्रत्येक पत्रावळीभोवती रांगोळी , उदबत्या लावण्यात आल्या आहेत... पत्रावळी मधे भात, बाजरीची भाकरी, लापशी द्रोणात आमटी, असा प्रसाद वाढण्यात आला आहे. वातावरणात पदार्थांचा घमघमाट पसरला आहे.
" सदा सर्वदा योग तुझा घडावा... "या श्लोकाने भोजनपूर्वीच्या श्लोकांना सुरुवात होते, मग " श्रीअनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज.."चां गजर होतो.  आणि वदनी कवळ घेता... होऊन पानाभोवती पाणी फिरवून भोजनप्रसादाला सुरुवात होते. वाढपी सेवेकरी पटापट येत आहेत... आग्रहाने जेवण वाढत आहेत.
हसत खेळत सगळ काही चालले आहे. इतक्या दिवसांनी महाराजांची भक्तमंडळी भेटल्यामुळे जालनेकर मंडळींच्या चेहऱ्यावर प्रवासाच्या थकव्याचा लवलेश ही दिसत नाहीये. सर्व जण भोजनाच्या शेवटी ' उपासनेला दृढ चालवावे   ' हा श्लोक म्हणतात आणि उठतात. मंडपाच्या बाहेर आल्यावर त्यांच्या हातांवर सेवेकरी पाणी घालतात. नंतर मंडळी विश्रांतीसाठी आपापल्या खोल्यात जातात. काही जण उत्सवाच्या सेवेकर्यांमध्ये जाऊन मिसळतात.. तर काही जपाला बसतात.
म्हणता म्हणता... कोठीपुजनचां दिवस उद्यावर आलाय!

क्रमशः

~ महाराज कन्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...