गुरुवार, २ जानेवारी, २०२५

 मानस- कोठीपूजन गोंदवले - ई. स.१९२४

जय श्रीराम!  

उद्या कोठीपूजन ! आदल्या दिवशी अनेक जण मुक्कामी आलेले आहेत. मंदिराचे आवार गर्दीने फुलून गेलेले आहे. निरनिराळ्या गावांहून भजनी दिंड्या आधीच येऊन पोहचल्या आहेत. आधीच पत्रव्यवहार करून त्यांनी दिवस ठरवून घेतले आहे. विशेष म्हणजे काहीही मोबदला न घेता निव्वळ श्रींची सेवा या भावनेने हे लोक आलेले आहेत. 

कोठीघरात स्त्रियांनी हरिपाठ म्हणत भाज्या निवडणे, धान्य निवडणे, दळणे वैगेरे आधीच करून ठेवलेले आहे. (सांगायची गोष्ट म्हणजे, एका वर्षी उत्सवासाठी २० किलो विलायची दळली गेली होती. यावरून श्रींचा आवाका लक्षात येईल.)
रात्री कंदील, चिमण्या, पिवळे बल्ब लावून कोठिघरात सेवेकरी स्त्रियांनी भांड्याच्या आरास रचल्या आहेत.. फुलांच्या, धान्याच्याही रांगोळ्या काढल्या आहेत. बाहेर मांडवात, समाधी स्थळ, गोशाळा, वैगेरे सगळ्या ठिकाणी रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत. यात पुढाकार भाऊसाहेब केतकर, अण्णासाहेब मनोहर, सदाशिवराव धामणकर या मंडळींचा आहे. 

 

कोठीपुजनसाठी कोठीतील असेल नसेल त्या धान्याची पोती बांधली गेली आहेत. त्यांच्याभोवती रांगोळ्या काढून कोठी सजली आहे. ब्रम्हानंद बुवांच्या फोटोसमोर सुंदर फुलांची रांगोळी काढली गेली आहे. भोवती सगळ्या आरास रचल्या आहेत. भाज्या , फळे यांची आकर्षक सजावट केली गेली आहे. गोशाळेतही स्वच्छ सारवून प्रत्येक गायीपुढे रांगोळ्या काढत आहेत. गायींना पाठीवर रंगीबेरंगी झुल पांघरली गेली आहे.
श्री विश्वनाथ बुवा आणि श्री बसप्पा यांचा याबाबतीत पुढाकार आहे... गोमातांची कसून सेवा ते करत आहेत.
श्री मनोहर आंबेगावकरांनी श्रींच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुले आणण्याची जबाबदारी घेतली आहे. केळीच्या खांबानी समाधी मंदिर, गोशाळा, आईसाहेब मंदिर, कोठिघर, स्वयंपाकघर यांच्या प्रवेशद्वार सजवले गेले आहेत. आंब्याच्या पानांची तोरणे बांधली गेली आहेत.

प्रत्यक्ष कोठीपुजनचां दिवस उजाडला.
पहाटे साडेतीनला उठून सेवेकरी संपूर्ण उत्सव मंडप,  भोजनमंडप , मंदिराचे आवारात सडासंमार्जन , रांगोळ्या काढतात.
पहाटे ४ वाजता पहिली घंटा होते.  अतिशय मंगलमय वातावरणात सनईचे सुर कानी पडतात.  गरम पाण्याची व्यवस्था नुकतीच सुरु झाली आहे. श्री भवानरावांनी लाकडे फोडून पुरेसा साठा जमवलेला आहेच. बाहेर चुली मांडून मोठाली पितळेची पातेली , मोठी चिंचोळ्या तोंडाची तांब्याची  भांडी ठेऊन पाणी तापवणे सुरु आहे. गरम पाणी काढून घेण्यासाठी मोठी गडवी आहेत. आपापली लोखंडी/प्लास्टिक बादली गार पाणी भरून तिथे घेऊन जायची. जवळच असलेल्या हौदातून गार पाण्याची बादली आणून ठेवायची. तिथले सेवेकरी आपल्याला गरमागरम पाणी आपल्या बादलीत ओतून देतात. ते झाले की बादलीभर गार पाणी आपण पातेल्यात ओतुन त्यात भर घालायची, असा नियम. बळवंतराव आटपाडीकर, नानासाहेब देशपांडे [वाई], शंकरराव जोशी [सोलापूर], बापूराव गिरजे, ही मंडळी ही व्यवस्था पहात आहेत. . ते पहाटे तीन वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत सतत हे काम करीत असतात . बळवंतराव यांचा इतका धाक होता कीं, स्वतः पंचसुद्धां गरम पाणी घेतल्यावर स्वतः भर घालीत. पंच म्हणून अधिकार दाखविण्याची पद्धतच नसे. त्यांतच जें प्रेम होतें तें अवर्णनीय आहे.

जालनेकर, कुरवलीकर, आटपाडीकर, गिरवीकर, मांडवेकर , सांगलीकर सगळी भक्तमंडळी लगबगीने स्नान करून ठेवणीतले कपडे घालून उत्सव मंडपात काकड आरतीसाठी जमा होतात. मंदिरात श्रींच्या समाधीला अम्मांनी विणलेले अतिशय सुंदर वस्त्र घातले गेले आहे. ते बघून समाधी मंदिरात कोपऱ्यात उभ्या असलेल्या टी रंगमा बालसुब्रह्मण्यम शेट्टी उर्फ अम्मा हळूच डोळे टिपतात. समाधीवर आणि समाधीमागच्या श्रींच्या फोटोला सुंदर तुळशीचे हार घातले गेले आहेत.  मंदिरात श्रींचे स्तवनरूप गायनसेवा सुरु झालेली आहे. कार्यक्रमाचे अगोदर, पाच मिनिटे "रघुपति राघव राजाराम ... " असा जयघोष होतो. बरोबर पावणेपाच ला दुसरी घंटा होते. संथ आवाजात भूपाळ्या सुरु होतात. संपूर्ण वातावरण एकदम भारावल्यासारखे होते. मंडळी एकाग्रचित्ताने समरसून भूपाळ्या, काकड आरती म्हणत आहेत. भावपूर्ण स्वरात काकड आरती, पंचपदी पार पडते. लोणी साखर प्रसाद दिला जातो.  श्रीमहाराजांचे पंच म्हणून श्री बापूसाहेब साठ्ये यांच्याकडे सर्व धार्मिक कार्यक्रमांची जबाबदारी असायची, मग ती पूजा असो, कि पुण्याहवाचन असो कि, पंगतीत उदक सोडणे असो की लघुरुद्राभिषेक.यजमान म्हणून श्री बापूसाहेब ती जबाबदारी पार पाडायचे. पण पुण्यतिथी उत्सवात समाधीच्या पूजा श्री भीमराव मोडक [इंदुर] व श्री गोविंदराव गाडगीळ यांचेकडे आहे. नित्याची पूजा , पंचपदी पार पडल्यावर श्रींच्या समाधीपुढे संकल्पाचे श्रीफळ ठेवून अखंड माळ व भजनी पहाऱ्यास सुरुवात होते. हा पहारा अखंड दहा दिवस सुरु राहून दशमीच्या दिवशी दुपारी महानैवेद्य झाल्यावर पूर्ण होत असतो. भजनी पहाऱ्यासाठी श्रीकृष्णाच्या दोन्ही बाजूला दोन दोन पाट ठेवून दोन दोन भक्तमंडळी उभे रहातात. आणि टाळ वाजवत, एका बाजूकडच्या मंडळींनी 'रघुपती राघव... म्हणायचे. व दुसऱ्या वेळी दुसऱ्या बाजूकडच्या मंडळींनी हेच भजन म्हणायचे अशी पद्धत आहे. मंदिराचे संपूर्ण आवार या भजनांनी दुमदुमून जाते. भजनाचे प्रमुख म्हणून दामोदरबुवा कुरवलीकर, श्रीपांडुरंगबुवा जालनेकर, नानाचार्य, बाबा मेरेकर, प्रल्हादबुवा, हे आहेत. मंडपातील कीर्तनाची व्यवस्था अंताजीपंत दाढे, वासुदेवराव फडके व पुणेकर मंडळीकडे आहे.  

काकडआरती कार्यक्रम उत्सव मंडपात सुरु झाला की मंदिरातील सभामंडपात निरनिराळ्या ठिकाणाहून आमंत्रित अश्या वैदिक मंडळींकडून श्रींच्या पादुकांवर लघुरुद्राभिषेक सुरु होतो. तो झाला कि आरती होते.

इकडे पंचपदी झाल्यावर मंडळी कोठीघरात पु. ब्रम्हानंद महाराजांच्या फोटोसमोर जमतात. उत्सवात कोठीवर महादेवभटजी हरदेकर, गणूकाका साने हे प्रामुख्याने आहेत.  प्रथम सनईवादन अन नंतर मंत्रघोषात कोठीपूजनास सुरुवात होते. व्यवस्थापक श्री गणपतराव दामले सपत्नीक पूजेला बसलेले आहेत. पु. ब्रम्हानंद बुवा यांनी सांगितल्यानुसार त्यांनी दिलेल्या अक्षय पिशवीची व त्यातील तीन चांदीच्या प्रथम नाण्यांची पूजा होतेय . ब्रम्हानंद महाराज प्रत्यक्ष हजर असून, कितीही लोक आले तरी कोठीतील साहित्य कमी पडू देणार नाही अशी सर्वांची श्रद्धा आहे, नव्हे नव्हे... तसे आश्वासनच दिले आहे पु. बुवांनी! अक्षय पिशवीबरोबरच श्रीमहाराजांच्या पालखीतील चांदीच्या पादुकांची, पु. बुवांच्या फोटोची पण यथासांग पूजा होतेय.  नंतर कोठीघराची धान्य, स्वयंपाकघरातील भांडी, चुली यांची हळद कुंकू फुले वाहून पूजा होतेय. मंडळी आता अग्निपुजेसाठी तयार होतात. त्या काळातल्या मोठ्या चुलीची पूजा करून त्यात मंत्रोच्चारासहित अग्नी घालण्यात येतो. उत्सवास सुरुवात झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. आणि हे आता उत्सव संपेपर्यंत टिकणार आहे. कितीही कष्ट पडले तरी कोणी दमणार नाही, भूक तहान याचीही कोणाला जाणीव होणार नाहीये. नंतर मंडळी गोशाळेत जाऊन गायींची पूजा करतात. गायींना गोग्रास दिला जातोय. झाली! आता उत्सवाच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली.

इकडे एकीकडे श्रींच्या दर्शनासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या मंडळींची रांग लागली आहे. सकाळी साडेनऊ वाजता श्रींच्या पादुकांवर अभिषेक होतोय. त्याचबरोबर  नेण्याच्या पादुकांची ही पूजा होतेय. ही महापूजा यथासांग झाल्यावर श्रींच्या पादुका आणि फोटो मोठ्या सन्मानाने पाना-फुलांनी, तोरणांनी सजवलेल्या पालखीत ठेवली आहे. " श्रीराम जय राम , जय जय राम " म्हणत पालखी उचलली जाते आणि त्या गजरात नगरप्रदक्षिणेसाठी निघते. .,
रोज १० दिवस श्रीमहाराज असे सकाळ संध्याकाळ नगरप्रदक्षिणेसाठी निघतात. श्रीमहाराज देहात असतांना पु. ब्रम्हानंद बुवांनी कर्नाटकात श्रींची अशी भव्य मिरवणूक काढली होती. भर वैशाखात दिवसाढवळ्या मशाली लावल्या होत्या. याची आठवण होते. हेतू हा कि दिवसाढवळ्या मशाली का लावल्या आहेत हे पाहायला लोक बाहेर येतील आणि आपल्या सद्गुरूंची ... श्रीमहाराजांची एक नजर त्यांच्यावर पडावी ...कृपादृष्टी पडावी. आणि श्रींची एकदा एखाद्यावर नजर पडली कि ... घरातल्या एकाला महाराजांनी धरले कि अख्ख्या घराला धरतात हे माहित आहे ना?  अगदी याच हेतूने १० दिवस अशी मिरवणूक निघते. गावातल्या प्रत्येक मंदिरात दर्शन घेऊन आरती होते.  त्या काळचे गावाचे रस्ते कच्चे... धूळ फुफाटयाचे. परंतु सेवेकर्यांनी पालखी मार्ग आधीच दगडे, काटे उचलून साफसूफ करून ठेवला आहे. त्यावर सडे घातल्याने त्यासाठी  मार्ग अधिकाधिक सुकर करण्यात आला आहे. गावातीले तरुण मंडळी, पालखीचे सेवेकरी एकापाठोपाठ एकेक पाट ठेवत आहेत, त्यावरून पालखी खांद्यावर घेतलेले लोक संथपणे जयघोषात चालत आहेत. फार सुंदर दृश्य आहे हे!
 
पालखीच्या पुढे मागे चालणारे लोक भजने गात आहेत... कोणी वारकरी फुगडी खेळत आहेत. फार भारावलेले वातावरण. सगळीकडे एकच टाळ चिपळ्यांचा गजर, रघुपति राघव राजाराम, कधी जय जय श्रीराम चा गजर होतोय.   पालखीच्या अगदी पुढे  भालदार, चोपदार, श्रींना काही लोक पंख्याची हवा घालत आहेत... काही स्त्रिया पदराने श्रींना हवा घालत आहेत.  घरोघरी  स्त्रियांनी अंगणात सडे टाकून रांगोळ्या काढलेल्या आहेत.  सगळा साज शृंगार करून स्त्रिया औक्षणाचे ताट घेऊन, मुलाबाळांसहित अंगणात येऊन तयार आहेत. श्रींच्या पालखीच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच  आहे. प्रत्येकाच्या घरी श्रींचे औक्षण होते. दाणे गुळाचा प्रसाद सर्वाना मिळतो आहे. थोरले राम मंदिरात येऊन पालखी थोडी विसावते. 

 

 थोरले राम, लक्ष्मण, आणि सीतामाईना आज सुंदर पोशाख चढवला गेला आहे. नाजूक जिवणी, केशरी रंगाची जरतारी सोनेरी तारेने कलाकुसर केलेली नऊवारी पैठणी, नाकात मोत्याची नथ, सवाष्णीचा सगळा साज ल्यालेली अशी सीतामाई, आणि त्याच रंगाची वस्त्र नेसलेले, मोत्याचे दागिने घातलेले मंद मंद हास्य परिधान केलेले श्रीराम लक्ष्मण शोभून दिसत आहेत. आज श्रीरामाच्या चेहर्यावर वेगळेच तेज चढले आहे. भजने होऊन श्रींची आरती तिथे होते. पुन्हा पालखीचे मिरवणुकीने प्रस्थान होऊन सरते शेवटी पालखी पुनश्च समाधी मंदिरात येते. समाधी मंदिराला बाहेरून १३ प्रदक्षिणा घातल्या जात आहेत. प्रत्येक प्रदक्षिणेला वेगळी आरती होतेय. पालखी प्रदक्षिणा बरोबरच अनेक लोक, सेवेकरी पालखीच्या मागे प्रदक्षिणा म्हणत आरती म्हणत आहेत. फार सुंदर दृश्य आहे हे. हि पद्धत सज्जनगडावर जशी होते तशीच इथे होते आहे.
 नंतर पालखी समाधी मंदिरात येऊन पादुका समाधी मंदिरात आत समाधीजवळ नेण्यात येतात. एव्हाना १२ वाजलेले असतात. नैवेद्य तयार असतो. स्वयंपाकघरात सर्व देवांचे नैवेद्य तयार आहेत. श्रीसमाधी, श्रीगोपालकृष्ण, श्रीआईसाहेब, श्रीब्रम्हानंद (कोठी), थोरले राम, धाकटे राम, दत्तमंदिर, विठ्ठलमंदिर, गोमाता इत्यादी नैवेद्य वाढले जातात. गावातील देवांना नैवेद्य दाखवण्यास ते ते पुजारी घेऊन जातात. . " जेवी जेवी बा गुरुराया... " श्रींची नैवेद्यारती होते.
श्रींचे भोजन झाल्यावर तो प्रसाद मुख्य स्वयंपाकात कालवण्यासाठी पाठवला जातो.. एकीकडे प्रसादासाठी लोकांनी भोजनमंडपात रांगा लावलेल्या आहेत. 'जय जय श्रीराम, जय जय श्रीराम'च्या जयघोषात सोवळे नेसलेले वाढपी सेवेकरी उत्साहाने वाढत आहेत.
 

 

 

 आज काय काय आहे बरे प्रसादाला? साधा भात, मसालेभात, चटणी, कोशिंबीर, आमटी, गोड लापशी, जिलेबी. लोक तृप्त तृप्त होऊन बाहेर निघत आहेत. लोक सतत येत आहेत. पार महाराजांच्या मागच्या शेतापर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यादिवशी सायंकाळपर्यंत कित्येक पाने उठतात. हजारो लोक जेवून जातात. श्री नारायणराव कुंदापूर हे महाराजांचे निस्सीम भक्त स्वयंपाकावर लक्ष ठेवून आहेत. कितीही पान झाले तरी त्यांची स्वयंपाकाची तयारी आहे.  श्री मनोहर दुसे हे ही स्वयंपाकात मदत करत आहेत. पिण्याचे, स्वयंपाकाचे पाणी आणून देत आहेत. यशवंतबुवा हे एक निस्सीम साधक स्वयंपाकघरात स्वच्छतेचे काम करत आहेत. भल्या पहाटे उठून कंबरेला लुंगी आणि वरती उघडेच असे हे साधक खराटा घेऊन आवार साफ करत असतात. 

 

श्री विश्वनाथबुवा हे एक उच्च कोटीचे साधक तर उत्सवात १० दिवस झोपतच नाहीत दहा दिवस उपवास करीत. बुक लागली तर द्रोणात कच्चे ज्वारीचे पीठ खात किंवा बाजरीच्या पिठात पाणी कालवून  घेऊन उशिरा ४ वाजता जेवत. चोवीस तास त्यांचा आवारात जागता पहारा आहे.
इकडे उत्सवमंडपात तोवर दुपारचे कीर्तन सुरु होते. समाधी मंडपात सुंदराकांड पुराण वाचन श्री शंकरशास्त्री म्हासुर्णेकर, जोशीबुवा, हे करत आहेत. सायंकाळी चार वाजता श्री सखारामबुवा हैद्राबादकर यांचे आज कीर्तन आहे. रोजच्या कीर्तनकारांची यादी बनवण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्व कार्यक्रम होत आहेत. संध्याकाळी श्रींची पालखी मंदिराभोवती ३ प्रदक्षिणा घालून परत मंदिरात येते. सायंआरती होऊन प्रसाद सुरु होतो. उत्सवाचे १० दिवस शेजारती होत नाही.
अखंड माळ सुरू आहे. श्रीमहाराजांचे तत्व अखंड नामस्मरण आणि अन्नदान हे तंतोतंत पाळले जाणे यावर पंचांचा भर आहे. रोज हजारो लोक जेवून जात आहेत. ८ दिवस झपाटल्यासारखे निघून जातात. सेवेकरी अथक परिश्रम करत आहेत. हि सर्व मंडळी आत्मोद्धारासाठी अत्यंत सेवाभावाने हे कार्य पार पाडत आहेत. नवमीला असंख्य लोक येत आहेत .. पानावर पाने उठत आहेत. रात्री ११-११ वाजेपर्यंत प्रसाद सुरु आहे. वाढपी, स्वयंपाकी, पत्रावळ्या उचलणारे सेवेकरी, भांडी घासणारे सेवेकरी, नंतरची आवराआवर करणारे, परिसर स्वच्छ करणारे ...  अथकपणे सेवा करत आहेत.

...आणि आता तो दिवस उजाडतो. गुलालाचा दिवस. उत्सवाचा परमोच्च दिन. याजसाठी केला होता अट्टाहास!
क्रमशः
फोटो सौजन्य: चैतन्यस्मरण विशेषांक🙏
(टीप: लेख संपूर्णत: काल्पनिक आहे. फक्त जिथे हवे होते तिथे श्रीमहाराज चरित्रातून आणि चैतन्यस्मरण विशेषांकातून संदर्भासाठी नोंदी घेऊन त्यांची सांगड प्रसंगानुरूप घालण्यात आली आहे . काही चुकीचे वाटल्यास क्षमस्व! )
~ श्रीमहाराज कन्या


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...