गुरुवार, २ जानेवारी, २०२५

 मानस - पुण्यतिथी गुलालाचा दिवस ई.स.१९२४

श्रीराम समर्थ

तत्पूर्वी पुण्यतिथी उत्सवात सेवा  देणाऱ्या आणखी काही सेवेकऱ्यांची आठवण काढूया!
जालना मठाचे सेवेकरी श्रींच्या चांदीच्या पादुका आणि फोटो उचलण्याची सेवा करतात.
आटपाडी आणि पंढरपूर मठातील मंडळी भालदार, चोपदार ललकरण्याची सेवा घेतात. अब्दागिर्या धरण्याचे कामही त्यांचेच. मोरगिरी आणि सोलापूर मठातील मंडळींकडे श्रींच्या पालखीवर छत्र धरण्याची सेवा आहे. चामरे ढाळण्याचे काम विटेकर भंडारे करत आहेत. बेलधडीकर आणि  गिरवीकर मंडळी चवऱ्या म्हणजे हातपंखाने वारा घालण्याची सेवा आहे. तसेच म्हासूर्णे आणि कुरवलिकर मंडळी ही हे काम करतात. छत्र धरण्याची सेवा कऱ्हाड मठाचे मठपती करतात. हर्दा आणि शेंदूरजण आणि मांडवेकर मंडळी दिवट्या पाजळण्याची सेवा करतात. समाधी सजवण्याची सेवा भीमराव मोडक करत असतात. म्हासूर्णेकर शास्त्री पुराण वाचन आणि कीर्तन सेवा करतात तर हरिदास सांगलीकर लळीत वाचन करतात. फडणवीस सांगलीकर आरती धरतात , तर शाळिग्राम गुरुजी तबक, व्यंजन सेवा... श्रींच्या पालखीपुढे घोडा धरण्याची सेवा आटपाडीकर देशपांडे करतात. दहीवडीचे माळी हे भक्त पालखी खांद्यावर घेण्याची सेवा करतात. हुबळीचे मठपती गरुडाचे चित्र काढलेला ध्वज हाती धरतात.
प्रसाद झाल्यावर उष्टे काढून गोमयाने सारवण्याची सेवा गोंदवल्याचे बारसवडे करत असत. दत्तोपंत इंदोरकर ही गोशाळेकडे असत.
कीर्तनसमयी बुक्का लावण्याची आणि खिरापत वाटण्याची सेवा अंताजीपंत दाढे यांच्याकडे होती.
पुणेकर यांच्याकडे अत्तरगुलाब, तांबुलोपचार आणि पुष्पहारांची सेवा होती.
***


आज मार्गशीर्ष कृ दशमी! उत्सवाचा शेवटचा दिवस!
भल्या पहाटे समाधी परिसरात सर्वत्र सडा संमार्जन करून स्त्रियांनी रांगोळ्या काढल्या आहेत.
हळूहळू मंडळी उत्सव मंडपात जमा होऊ लागतात. प्रथम सनई वादनाने सुरुवात होते.
काकड आरतीचा कार्यक्रम नेहमीपेक्षा लवकर उरकला जातो. आज सर्वांची मने हळवी झालेली आहेत. एक अनामिक हुरहूर सर्वांच्याच मनात दाटून आली आहे.
नंतर साडेपाच वाजेपर्यंत सुरेल स्वरात संथपणे ' रघुपती राघव राजाराम | पतीत पावन सीताराम ' हे भजन एक चित्ताने सामुदायिकरित्या म्हंटले  जाते! त्या आवाजाला ही एक करुण ... आतून तुटल्याची धार आहे.
श्रींच्या पुण्यस्मरणाचा क्षण जवळ येतोय. सर्व मंडळी अधिकाधिक एकाग्रचित्त होत आहेत.
गुरुगृही अहोरात्र पडेल ती सेवा करून, नामाचे अनुसंधान टिकवल्याने प्रत्येकाचे मन श्रींच्या सानिध्यात स्थिर झालेले आहे.
गुलालापूर्वी , २०-२५ मिनिटे तेव्हाचे पंच श्री हरिपंत हरिदास यांचे श्रींच्या कार्याविषयी तळमळीने मार्गदर्शन होते आहे.
श्रीमहाराजांना जे म्हणायचे होते ते त्यांच्या मुखातून सांगतात अशी सर्वांची भावना असल्याने सर्व मंडळी जीवाचे कान करून ते ऐकत आहेत.
हरिपंत सांगू लागतात, ' माणगंगातीरावरील निर्झरांनी वेढलेले गोंदवले हे छोटेसे गाव. इथे मूर्तिमंत दारिद्र्याने उद्विग्न झालेल्या , प्रापंचिक काळजीने काळवंडलेल्या , व्याकूळ झालेल्या असंख्य भाबड्या जीवांना मायेच्या ममतेने धीर देणारा हा महात्मा अठराव्या शतकात जन्माला आला. जणू ब्रम्ह हेच चैतन्यमय होऊन भूतलावर अवतरले. अखंड नामस्मरण , आणि जोडीला सदाचार, नामस्मरण, सगुणोपासना, सर्वांबद्दल प्रेमभाव हे लोकांच्या मनात बिंबवले आणि स्वतः तसे वागूनही दाखवले. कित्येकांना सन्मार्गाला लावले, असंख्य जीवांचा उद्धार त्यांनी केला आणि अजूनही करत आहेत.
 अन्नदान ही गोंदवलेची संस्कृती आहे आणि रामनाम हा गोंदवल्याचा धर्म आहे.
खरे सुख आणि आनंद शाश्वतापाशीच आहे, भगवदप्राप्ती हेच जीवनाचे साध्य समजावे आणि त्याच्या अखंड स्मरणाने तद्रुप व्हावे हेच श्रीमहाराजांचे कळकळीने सांगणे. अखंड नामस्मरणात राहून समाधानाचा, त्या सत- चित- आनंदाचा म्हणजे ईश्वराचा लाभ करून घ्यावा ही गोष्ट पटवून देण्यासाठी त्यांनी आपला देह झिजवला, आपले सारे जीवन खर्च केले... प्रसंगी निंदा,अवहेलना, उपेक्षा, अपमान, छळ ही सोसला.
हे सांगताना हरिपंतांचां गळा भरून आला होता.
उपस्थित जनांना ही महाराजांनी सोसलेला त्रास आठवून गलबलून आले होते.
हरिपंत पुढे म्हणतात, "प्रत्येकाला भगवदनिष्ठेचे म्हणजे नामाचे महत्व कळले पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता. मग तो कट्टर सनातनी असो, की सुधारक! अट्टल गुन्हेगार असो की पापभिरू.. सर्वांशी महाराज प्रेमाने वागले. व्यसनी, अत्यंत पापी व्यक्तींचांही त्यांनी अव्हेर केला नाही. गोंदवल्यास कितीतरी गरीब कुटुंबे त्यांच्यावर अवलंबून होती.. तरी मी त्यांचा पोशिंदा आहे ही भावना त्यांना कधी शिवली नाही.
अखेरच्या काळात श्री महाराजांनी पू. भाऊसाहेबांपाशी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली, " भाऊसाहेब, माझ्याकडे येणाऱ्या सर्वांनाच देव हवाय पण प्रपंचासाठी देव हवाय हो, देवासाठी देव मागणारा कस्तुरीचा चाहता विरळाच. सर्व हिंग जिऱ्याचेच गिऱ्हाईक..." काय वेदना होत असतील महाराजांना हे शल्य बोलून दाखवताना!
शेवटी गदगदलेल्या स्वरात हरिपंत म्हणतात, श्रींनी शेवटच्या रामनवमीच्या उत्सवाला प्रत्येकाने गोंदवल्याला यावे यासाठी खलिते, पत्र, निरोप पाठवले होते. सर्वांना एकच वाक्य कळवले होते, की "  मी आता खूप काळासाठी नैमिष्यारण्यात जाणार आहे, तुम्हा सगळ्यांना जाण्याआधी मी एकदा डोळे भरून पाहू इच्छितो "
नीट बघा, आजही त्या समाधीमधून त्यांचे डोळे तुम्हा आम्हा प्रत्येकाला अगदी डोळे भरून पाहत आहेत. ज्याप्रमाणे एखादा बाप सासुरवाडीहून प्रथमच माहेरी आलेल्या आपल्या लेकीच्या डोळ्यात समाधान बघतो, तसे श्रीमहाराज नामाने आपल्या हृदयात फुललेले समाधान बघत आहेत.
"आपल्यामध्ये दडलेल्या श्री ब्रम्हानंद बुवांचा ते शोध घेत आहेत.. हा माझा बुवा होऊ शकेल का? तो होऊ शकेल का असे शोधत आहेत. "
हे सांगताना हरिपंतांचा आवाज कातर झाला.. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात.
श्रीमहाराज मागे म्हणाले ना, तुम्ही इतके कष्ट घेऊन इथे येता, ( तेव्हा गोंदवलेस दळणवळणाची साधने जास्त नव्हती) .. इथे मनापासून सेवा करता, इथून काहीतरी घेऊन जावं ही माझी इच्छा आहे."
" त्याप्रमाणे आजपासून आपण सर्वांनी निश्चय करावा की त्यांच्या " सदाचरण, पवित्र अंत:करण आणि नामस्मरण" या तत्त्वाचे मी मनापासून अनुसरण करीन.
श्रींच्या वचनाप्रमाणे नामाचे प्रेम आपण इथून सर्वांनी घेऊन जायचे आहे. "
उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांना धारा लागल्या आहेत.
"पाच वाजून बावन्न मिनिटे झालेली आहेत.
आता आपण तीन मिनिटे सद्गुरुंचे स्मरण करूया!"  असे बोलून हरिपंत खाली बसतात.  

संपूर्ण भक्तपरिवार अंतर्मुख होउन मौनात अन् गंभीर शांततेत श्रींचे स्मरण करतो. टाचणी पडली तरी आवाज जाईल इतकी शांतता पसरलेली असते. त्या तीन मिनिटात श्रींच्या समाधीजवळ गाभाऱ्यात पू पांडुरंग बुवा , पू प्रल्हाद बुवा ही मंडळी एका सुरात, "श्रीराम, श्रीराम श्रीराम!" असे संथपणे एका लयीत म्हणत असतात. तो आवाज बाहेरही ऐकू येत असतो.. आणि बाहेरील शांत वातावरणात समाधीच्या दिशेकडून वाऱ्यावरून लहरी याव्यात तसे श्रीराम श्रीराम.. ऐकू येत असते, त्यामुळे सर्वांना आपण समाधीजवळच आहोत असा प्रत्यय येतो आहे. समस्त देविदेवता आणि कालवश झालेले पुण्यात्मे आज हजर आहेत. हो हो , ब्रम्हानंदबुवा सुद्धा श्रींच्या समाधीच्या मागे असलेल्या फोटोजवळ उभे राहून  डबडबलेल्या डोळ्यांनी हा अनुपम सोहळा पाहत आहेत.
ते पवित्र क्षण येतात, आणि बरोबर ५ वाजून ५५ मिनिटांनी सर्व भक्तमंडळी एकत्रित  भावोत्कटतेने "श्रीराम... श्रीराम "म्हणत समाधीच्या दिशेने गुलाल म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या उधळतात.
|| जेथे नाम तेथे माझे प्राण | ही सांभाळावी खुण || असा धीरगंभीर आवाज समाधीमधून उर्ध्व दिशेला कळसाकडे आसमंतात विरत जातो.

आणि...  इकडे समाधीच्या मागे कोपऱ्यात उभे असलेले पू ब्रम्हानंद बुवा हळूच डोळे टिपतात!

**
||जानकी जीवन स्मरण जय जय राम ||
 इत्यलम🙏

~ महाराज कन्या
टीप: सदर लेखातील प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत.. फक्त संदर्भासाठी म्हणून चैतन्य स्मरण विशेषांक, सद्गुरूलीलामृत ग्रंथ आणि पू. बाबा बेलसरे लिखित श्रीमहाराज चरित्र यांचा आधार घेण्यात आला आहे.
काही वावगे/ चुकीचे वाटल्यास मनापासून माफी मागते! 🙏🙏
कर्ता करविता श्रीमहाराजच! प्रेरणा स्रोत तेच, लिहून घेणारे तेच आणि संदर्भ ग्रंथ समोर आणणारे तेच! 🙏

आजवर झालेली लेखनसेवा श्रीमहाराज चरणी अर्पण!🙏
श्रीमहाराजचरणाअर्पणमस्तू 🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...