जय श्रीराम!
पाऊलखुणा - १
श्रीमहाराजांच्या १११ व्या पुण्यतिथीनिमित्त आपण श्रींच्या चरित्रातील काही प्रसंग, त्या संबंधित व्यक्ती आणि ठिकाणे यांचा मागोवा या लेखात घेऊया.
या म्हणून श्रीमहाराजांचे पु. बाबा बेलसरे लिखित चरित्र, तसेच श्री गोपाळराव फडके लिखित सद्गुरुलीलामृत ग्रंथ, चैतन्यस्मरण विशेषांक, काही पुस्तके, वेबसाईट आणि गुगल सर्च चा वापर करण्यात आला आहे.
१) श्रीमहाराजांचे आई वडील श्री रावजी व गीतामाई श्रींच्या जन्मापूर्वी गोंदवल्याच्या जवळ असलेल्या ज्या सत्पुरुषाच्या दर्शनाला जात असत त्यांचा उल्लेख पु बाबा बेलसरे लिखित महाराजांच्या चरित्रात तसेच पु ब्रम्हानंद महाराजांच्या अनुज्ञेने कै गोपाळराव फडके लिखित सद्गुरुलीलामृत ग्रंथात आला आहे.
(लेखन काल १९१८ ते १९२१- अध्याय २, ओव्या २ ओव्या ४३ ते ४७)
संभाजी साधु दर्यांत । तेथें उभयतां दर्शना जात ।
चरणीं मस्तक ठेवित । करद्वय जोडोनि ॥ ४३ ॥
त्या साधूंची ऐशी स्थिति । कोणासी स्पर्श करूं न देती ।
लोकीं केली विनंती । यांसीच स्पर्श किंनिमित्त ॥ ४४ ॥
साधु बोलती तयांसी । धन्य असे यांची कुशी ।
उदरीं अवतार देवासी । येणें असे । ४५ ॥
यांचे भाग्य असे थोर । पूर्वसंचित अपरंपार ।
उदरीं होईल अवतार । सगुण ब्रह्म ॥ ४६ ॥
यात हा प्रसंग वर्णन केला आहे की श्री रावजी आणि गीतामाई यांना संभाजीमहाराज विशेष अगत्याने आणि आदराने वागवत असत. या संभाजी रावांविषयी काही माहिती उपलब्ध झाली ती चैतन्यस्मरण च्या २००७च्या विशेषांकात डॉ. ना. कृ भिडे यांनी संकलित केलेली आहे.
त्यानुसार संभाजी महाराज शहाण्णव कुळीतले जाधव आडनावाचे, मूळ गाव उते किंवा उतवे (उतवेश्वर महादेवाचे गाव) घराण्यात पाटीलकीचे अधिकार त्यामुळे उतेकर, उतवेकर , पाटील असाही उल्लेख आहे. त्यांच्या अनेक पिढ्यात थोर अध्यात्मिक योग्यतेचे पुरुष होऊन गेले त्यांच्या पूर्वजांचा समर्थ रामदास स्वामी यांच्याशी घनिष्ट संबंध होता. त्यांच्या घराण्यात शिवभक्तीची परंपरा. वाडवडील साताराजवळ माहुली रोडवर पीरवाडी येथे स्थायिक झाले. जालीमसिंग नावाच्या राजपूत योग्याकडून त्यांना नाथपंथाची दीक्षा मिळाली होती. संभाजी महाराज दीर्घायुषी होते. इ स १८७३ मध्ये त्यांनी देहत्याग केला तेव्हा त्यांचे वय १०० पेक्षा जास्त असावे असे म्हणतात. रावजी आणि गीतामाई त्यांना साधारण १८४२च्या सुमारास दर्शनास गेले तेव्हा संभाजी नाथ महाराजांचे वय ७० होते.
२) श्रीस्वामी शांताश्रम

श्रीशांताश्रमस्वामी हे सांगलीजवळच्या कवठे या गावच्या जोशी कुटुंबातले. त्यांनी अगदी लहानपणीच घर सोडले, आणि काशीस जाऊन संन्यास घेतला. पुढे ते तेथील तारकमठाचे अधिपति होते. तेथे असतानाच श्रीगोंदवलेकर महाराजांचा व त्यांचा परिचय झाला. त्या काळातच श्रींनी त्यांना सांगून ठेवले होते की, 'मी पुढे कराड येथे श्रीराममंदिर स्थापन करणार आहे. मी देहत्याग केल्यानंतर आपण तेथे वास्तव्य करावे.'
इकडे कराड येथे इ.स. १९११, रंगपंचमी या दिवशी श्रीमहाराजांनी श्रीराममंदिराची स्थापना केली, व त्यातील व्यवस्थापकाचे काम बापूराव चिवटे, श्री. रामचंद्र धोंडो देव, व काशीनाथबुवा राजमाने यांच्याकडे सोपविले. तसेंच या मंडळींना सांगून ठेवले होते की पुढे काशीतील तारकमठाचे अधिपति वास्तव्यास येथे येतील, त्यांची व्यवस्था नीट होईल असे तुम्ही पहावे.
श्रीमहाराजांनी इ.स. १९१३ मधें समाधी घेतल्यावर श्रीस्वामी शांताश्रम हे या मंदिरात बारा वर्षे, स्वतःच्या देहविसर्जनापर्यंत, वास्तव्य करून राहिले होते. त्यानंतर त्यांनीच सांगून ठेवल्यानूसार त्यांचा देह कृष्णामाईत विसर्जित केला. स्वामींना श्रीमद़्भागवत ग्रंथ मुखोद़्गत होता. भगवान् गोपालकृष्ण हे त्यांचे आराध्यदैवत होते.
संदर्भः चैतन्यराम १९९२ ही स्मरणिका पान १२२
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन
या शांताश्रम स्वामीबद्दल अजून एक गोष्ट श्रीमहाराजांच्या चरित्रात आली आहे ती अशी कि श्रीमहाराज आपल्या मातोश्रींना घेऊन काशीयात्रेस गेले होते तेव्हाचा प्रसंग:
एकदा काशीमधील मोठे तपस्वी शांताश्रमस्वामी यांचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याशी पुढील संभाषण झाले.
स्वामी : महाराज, इतके लोक काशीत गंगास्नान करूनही पावन का होत नाहीत ?
गोंदवलेकर महाराज : कारण त्यांच्यामध्ये खरा भाव नाही !
स्वामी (उत्तर न पटल्याने) : त्यांच्यात खरा भाव असल्याविना ते कसे येतील ?
गोंदवलेकर महाराज : ते लवकरच दाखवीन. नंतर चार दिवसांनी गोंदवलेकर महाराजांनी शांताश्रमस्वामींच्या हातापायांना चिंध्या गुंडाळून त्यांना महारोग्याचे रूप दिले आणि जेथे पुष्कळ लोक गंगास्नानासाठी उतरत, तेथे त्यांना नेऊन बसवले. महाराज स्वतः बैराग्याचा वेश धारण करून त्यांच्या शेजारी उभे राहिले. काही वेळाने बरीच मंडळी जमली. बैरागी उपस्थितांना म्हणाला, लोकहो, ऐका ! हा महारोगी माझा भाऊ आहे. गेल्या वर्षी आम्ही दोघांनी विश्वेश्वराची अत्यंत मनापासून सेवा केली. तेव्हा त्याने प्रसन्न होऊन भावाला वर दिला, या गंगेमध्ये स्नान केल्यावर आपले पाप नाहीसे होऊन आपण शुद्ध झालो, असा भाव असलेल्या यात्रेकरूने तुला एकदा आलिंगन दिले, तर तुझा रोग नाहीसा होईल. येथे आपण इतके जण आहात, कोणीतरी माझ्या भावावर एवढा उपकार करावा ! बैराग्याचे बोलणे ऐकून गर्दीतील ८-१० लोक पुढे सरसावले. त्या क्षणी बैरागी त्या लोकांना थांबवून म्हणाला, क्षणभर थांबा ! विश्वेश्वराने पुढे असेही सांगितले आहे, जो यात्रेकरू याला आलिंगन देईल, त्याला तो रोग लागेल; पण त्याने पुन्हा गंगेत स्नान केल्यावर त्याचा भाव शुद्ध असल्यामुळे तो रोगमुक्त होईल. असे सांगितल्यावर सर्व जण निघून गेले; मात्र तेथील एका तरुण शेतकर्याने अधिक विचार न करता मोठ्या निष्ठेने शांताश्रमस्वामींना आलिंगन दिले. त्यानंतर लगेच गोंदवलेकर महाराजांनी स्वतःहून शेतकर्याला आलिंगन दिले आणि ते उद्गारले, बाळ, तुझी काशीयात्रा खरी फळाला आली. तुझ्या जन्माचे कल्याण झाले, असे निश्चित समज ! शांताश्रमस्वामींना या सगळ्या प्रसंगाचा अर्थ आपोआपच कळला !
संदर्भ : पू. बेलसरेलिखित श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाड्मय
३) श्री स्वामी समर्थ - आपले महाराज गुरुशोधार्थ ८व्या वर्षी गृहत्याग करून बाहेर पडले. तेव्हा अण्णाबुवा मिरज, सटाणा येथील देव मामलेदार, नंतर अक्कलकोटी स्वामी समर्थांकडे आले. स्वामींनी त्यांना प्रेमाने मांडीवर बसवले आणि पुढ्यातील ताटात ठेवलेले डाळिंबाचे दाणे प्रसाद म्हणून देऊन, तुझे काम माझ्याकडे नाही असे सांगीतले. हे आपण चरित्रात वाचले आहेच. पण या गोष्टीचा ओझरता उल्लेख एका वेबसाईटवर सापडला तो असा. त्यावरून आपल्या महाराजांची आणि स्वामींची भेट १८५८- ५९ मध्ये झाली असावी.
मोरेश्वर रघुनाथ जोशी तथा
श्री मयुरानंद सरस्वती
सुमारे दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट. अक्कलकोट येथे साक्षात् परब्रह्म श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी, गणपती आणि मोरेश्वर या नावाचे दोन जिद्दीचे जिज्ञासू तरुण एकाच वेळी परंतु दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होते. पैकी गणपती होता. सातारा जिल्ह्यातील गोंदवल्याचा आणि मोरेश्वर होता ठाणे जिल्ह्यातील नालासोपारा उमराळ्याचा. श्री स्वामी समर्थांनी दोघांवरही कृपामृताचा वर्षाव केला. पुढे गणपती झाला. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज झाला तर मोरेश्वर ब्रह्मस्वरुप श्री मयुरानंद सरस्वती ! त्यांचीच ही चरित्रगाथा...
मोरेश्वर जोशी आणि गणपती घुगरदरे
श्री स्वामी समर्थ म्हणाले, `तुला घरी दर्शन दिल्यावर, इतका त्रास घेऊन पुन्हा इथे कशाला आलास ? ताबडतोब निघ, तुझी पत्नी देवाजवळ अन्नपाणी वर्ज्य करुन बसली आहे. तू गेल्याशिवाय ती काही खाणार नाही... तू लवकर निघ...'
हे ऐकल्यावर मोरेश्वरांची स्थिती शिल्प कोसळल्यासारखी झाली. ज्या परब्रह्माचे दर्शन झाले, त्याची सेवा करण्याचे भाग्य आपल्या नशीबी नाही. इतका खडतर प्रवास करुन आल्यावर स्वामींच्या सहवासात काही काळ घालवावा अशी त्यांची इच्छा होती. परंतू स्वामींच्या वक्तव्याने ते व्यथित झाले. मोरेश्वरांच्या मनीची अवस्था स्वामींनी ओळखली आणि एक स्वानंदेश मयुरेशाची एक मूर्ती मोरेश्वरांच्या हातात प्रसाद म्हणून ठेवून, `याची सेवा कर' असे त्यांना सांगितले. लगेच एक पितळी पादुकाही त्यांना दिल्या आणि मोठया दगडावर कोरलेल्या पादुका देऊन सांगितले. `तू मेल्यावर, या तुझ्या डोक्यावर ठेवण्यास सांग. राम मंदिराची स्थापना कर. तुझ्या वंशांत सात पिढ्या कीर्तन परंपरा चालेल. आमची ध्वजा उभी कर. जा सोपार्याला पुन्हा. माझे दर्शन तुला निर्मळच्या यात्रेत होईल.'
तेवढ्यात समोर आलेल्या एका १२-१३ वर्षाच्या मुलास श्री स्वामी मांडीवर घेऊन बसले. त्या मुलाचे नांव `गणपती.' ही गोष्ट १८५८-५९ सालची असावी. हाच मुलगा पुढे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणून प्रसिध्द झाला. म्हणजे गोंदवलेकर महाराज आणि मोरे-श्वर तथा मयुरानंद सरस्वती यांची भेट एकाच दिवशी अक्कलकोट येथे झाली होती, हे यावरुन सिध्द होते.
याच मयुरेश्वर स्वामींच्या ओवीबद्ध चरित्रात ही असा उल्लेख आढळतो.
याच वेळी स्वामींचे मांडीवर । होता एक युवक । जाणे येहेळ गांवास । गुरु तुझे तुकामाई ॥५०॥
गणपती नामक युवक । तेच पुढे जाहले ख्यात । श्रीरामकृपेने युक्त । श्री महाराज गोंदवलेकर ॥५१॥।
मोरेश्वर झाले मयुरानंद । स्वामी प्रसाद मयुरेश । गणपती, मोरेश्वर मयुरेश । कृपेश स्वामी समर्थ ॥५२॥
इसवीसन अठराशे अठ्ठावनांत । हे घडले प्रत्यक्ष । तेव्हा गोंदवलेकर महाराज । होते बारा तेरा वर्षांचे ॥५३॥
संदर्भ : वेबसाईटजय श्रीराम!
~ श्रीमहाराजकन्या

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा