बुधवार, २९ जानेवारी, २०२५

 जय श्रीराम!

बहू मंदिरें स्थापिलीं धन्य कीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥

"बहुमंदिरे स्थापियेली" या शृंखले अंतर्गत आपण पाहात आहोत, श्रीमहाराजांनी जागोजागी स्वतः स्थापित केलेली मंदिरे, त्यांचे फोटो, माहिती , व्यक्ती आणि त्या त्या गावी घडलेले, श्रीमहाराजांच्या चरित्रात आलेले प्रसंग.

१४.    गोमेवाडी राममंदिर १९०३
गोमेवाडी, ता. माण, जि. - सातारा, महाराष्ट्र
हे राममंदिर सावळाराम देशापांडे यांनी बांधून दिले.


गोमेवाडीच्या पाटलाची श्री महाराजांवर फार निष्ठा होती.सन १८७२ च्या सुमारास त्याला श्री महाराजांकडून नाम मिळाले होते,त्याने श्री महाराजां शिवाय दुसरा देव मानला नाही, नामाशिवाय दुसरे साधन केले नाही, पादुकांची पूजा केल्याशिवाय कधी अन्न ग्रहण केले नाही.आणि रोज शिऱ्याचा नैवेद्य दाखवल्या शिवाय कधी राहिला नाही, सन १८९७ च्या रामनवमीला श्री महाराजांनी पाटलांना मुद्दाम गोंदवल्यास बोलावले,उत्सव संपुन आठ दिवस झाल्यावर पाटील बाबा परत जाण्यास निघाले, तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले,"पाटील बाबा इतके दिवस गोड खाऊन मला कंटाळा आला आहे, उद्यापासून कांदा भाकरीचा नैवेद्य दाखवीत जा,"पाटलांनी संमत्ती दिली,तेवढयात श्री
महाराजांनी एक नारळ रामरायच्या पायाला लावून त्यांच्या पदरात टाकला व म्हणाले  हा नारळ देवाच्या शेजारी ठेऊन द्यावा, मी तुमच्याकडे आलो  म्हणजे फोडीन,"काही दिवस गेल्यावर पाटील बाबांची परिस्थिती खालावली, इतकी की कांदा भाकर खाऊन राहायची पाळी आली, मनुष्य मोठा समाधानी व उपासक असल्यामुळे त्या स्थितीत ही तो आनंदाने राहिला, काही वर्षाने परिस्थिती सुधारली.त्याने प्रपंच मुलांन कडे सोपवला व स्वतः स्वस्थपणे नामस्मरण करीत काळ कंठू लागला ,पुढे पाटील बाबांना ताप येऊ लागला,चार सहा दिवस त्याला ताप येत होता,पण घरात हिंडत फिरत असल्यामुळे घरातील कोणाला काही  विशेष वाटलं नाही,सातव्या दिवशी एकदम त्यांची वाचा बसली,आणि मग सर्वजण धावपळ करू लागले, वैद्या ने मात्रा दिली,तेव्हा शुद्धीवर येऊन पाटील बाबा म्हणाले,"अरे बाळांनो,राम मला बोलावतो आहे,महाराज आता येतील ते आले की मला सांगा". 

इकडे गोंदवल्यास त्या दिवशी रात्री नऊ वाजता श्री महाराजांनी नीलकंठ बाबाला घोडा तयार करून आणणेस सांगितले,आणि त्याला घेऊन रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाटलांच्या घरी ते पोचले, त्यांनी पाटील बाबांचे डोके आपल्या मांडीवर घेतले,आणि म्हणाले,"पाटील बाबा मी आलो आहे,आता कशाचीही काळजी करू नये. नामामध्ये रहावे, पाटीलबाबानी डोळे उघडले, श्री महाराजांना नमस्कार केला आणि हृदयाकडे हात लावून म्हणाले, इथे नाम चालू आहे, पण मला एक द्रोणभर दही पाहीजे. वर गेल्यावर स्वर्गात दही मिळेल की नाही कोणास ठाऊक!  त्यावेळी श्री महाराजांनी  पूर्वी दिलेला नारळ फोडला त्यातील पाणी दह्या मध्ये घातले, आणि वाटीभर दही पाटील बाबांना पाजले, त्यानंतर अत्यंत शांतपणे नाम घेत पाटील बाबांनी देह ठेवला, श्री महाराजांनी पूर्ण आशीर्वाद पाटीलबाबा ना दिला,आणि त्यांचा अंतकाळ साधला.

संदर्भ: के वि बेलसरे लिखित श्रीमहाराज चरित्र
***
 

 

१५.    म्हासुर्णे राममंदिर १९०३
मु.पो. म्हासुर्णे, ता. खटाव, जि. सातारा - ४१५५३८, महाराष्ट्र

म्हासुर्णे येथील श्री नारायण कुलकर्णी हे महाराजांचे भक्त असल्याने नियमित गोंदवल्याला जात असत. लग्न करून प्रपंच करण्याआधी रामाचे मंदिर बांधावे असा सल्ला महाराजांनी त्यांना दिला. त्याप्रमाणे जयपूरहून मूर्ती करवून आणल्या.
श्री विष्णुपंत दाजी कुलकर्णी व श्री नारायण कुलकर्णी यांच्या विनंतीवरून श्रीमहाराजांनी मंदिराची पायाभरणी व स्थापना केली. यानंतर श्री शंकरशास्त्री कुलकर्णी ( म्हासुर्णेकर ) यांना मंदिरात उपासना पूजा अर्चा करण्यासाठी महाराजांनी सांगितले.
त्यांचेच वंशज श्री वसंत लक्ष्मण कुलकर्णी (म्हासुर्णेकर) हे आता पूजा अर्चा करतात. मंदिरात महाराजांच्या मत्स्याच्या आकाराच्या देखण्या लाकडी पादुका आहेत. या मंदिराशेजारीच शंकराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचा कळस व शिखर नागफण्यांनी सुशोभित केले आहेत. म्हासुर्णे गाव गोंदवल्यापासून  २०-२२ किमी वर आहे.
*
 

 

महाराजांचा एक बालमित्र होता. म्हासूर्णेकर शास्त्री.  गुरुच्या शोधात जेंव्हा लहानपणी महाराज बाहेर पडले, तेंव्हा कोल्हापूरपर्यंत शास्त्री बरोबर होते. तेथून ते परत आले. एकदा शास्त्री अंथरूणावर बसून तंबाखू खात होते. इतक्यात महाराज खोलीतुन बाहेर आले व शास्त्रींच्याजवळ बसत म्हणाले, 'काढ तंबाखू!' आणि कोल्हापूरहून पुढे कुठे कुठे गेले व काय काय केल ते सांगितले. असे त्यांचे प्रेम होते -एक मित्र म्हणून व दुसरे शिष्य म्हणून. पुढे महाराजांनी त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता. ते रोज सकाळी महाराजांची मानसपूजा करावयाचे. मधे दोन दिवस त्यांची मानसपूजा झाली नाही. महाराज असे सिंहासनावर बसले होते, काही माणसे बसली होती आणि शास्त्रीबुवा खोलीकडून येऊन मारुतीकडे गेले. त्यांना पाहून महाराज लोकांना काय म्हणाले? 'काय करावे शास्त्रीबुवांची दोन दिवस गाठ-भेट नाही!' शास्त्रीबुवानी ऐकले बरं कां! पण लक्षात नाही आले. नंतर मारूतीकडून खोलीकडे जातांना महाराज पुन्हां तसेच म्हणाले 'दोन दिवस झाले शास्त्रुबुवांची गाठभेट नाही! आणि मग शास्त्रीबुवांच्या लक्षात आले.  ते गेले, पुन्हा स्नान केले व मानसपुजा केली. त्यानंतर महाराज मग बोलले नाहीत. हे प्रेमाचे लक्षण आहे. प्रेमामधे अखंड स्मरण आणि तेही इतके सहज असते कीं, बाई गर्भाचे ओझे सहज वागवते तसे परमात्मा हृदयात सहज वागवणे हे प्रेमाचे लक्षण आहे. मग प्रतेक कृती, उठणे-बसणे, खाणे-पिणे त्यांच्या स्मरणात होते.
 संदर्भः ती बाबा बेलसरे यांचे २७-९-१९८२ चे प्रवचने

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

*

प्रासादिक श्लोक
 
शंकरशास्त्री म्हासुरणेकर यांची श्रीमहाराजांच्या ठिकाणी फार निष्ठा होती. म्हासुरणे गावी रामाचे मंदिराजवळ त्यांचा मठ आहे. काव्यनाटकादी पढलेले शास्त्रीबुवा मोठे भाविक व सात्विक वृत्तीचे होते. पुराण सांगण्याची त्यांची शैली अति रसाळ असून ते चांगल्यापैकी साधक होते. श्रीमहाराजांचे त्यांच्यावर फार प्रेम होते, इतकेच नव्हे तर श्रीमहाराजांनी अनुग्रह देण्याचाही अधिकार त्यांना दिला होता. परंतु ते खऱ्या शिष्यपणाने वागत. फार थोड्या लोकांना त्यांनी स्वतः अनुग्रह दिला.  त्यांच्याकडे त्यासाठी कोणी आल्यास त्याला ते श्रीमहाराजांकडे पाठवून देत. 

एकदा शास्त्रीबुवा स्वस्थचित्ताने नामस्मरण करीत बसले होते. मनामध्ये सहज श्रीमहाराजांचा विचार आला. विचारावरून विचार वाढत गेला आणि आपल्याला भगवंताच्या मार्गांवर घालण्यामध्ये श्रीमहाराजांनी केलेले डोंगराएवढे उपकार शास्त्रीबुवांना आठवले.  त्यांच्या डोळ्यांना अश्रू धारा लागल्या आणि आपण श्रीमहाराजांची काही स्तुती करावी असे त्यांना मनापासून वाटले.  परंतु त्यांना कविता करण्याची शक्ती नव्हती. या गोष्टीचे त्यांना इतके वाईट वाटले की दिवसभर ते अगदी उदास व निराश राहिले. रात्री नित्याप्रमाणे भजन व आरती आटोपून ते झोपले. झोपायच्या अगोदर त्यांनी श्रीमहाराजांचे ध्यान केले आणि काही सेवा घडावी अशी अत्यंत काकुळतीने प्रार्थना केली. पहाटेच्या सुमारास शास्त्रीबुवांना स्वप्न पडले ते असे;  

श्रीमहाराज सिंहासनावर बसले होते. पितांबर नेसून शास्त्रीबुवा सर्व पूजासाहित्य घेऊन आले. त्यांनी श्री महाराजांची यथासांग पूजा केली. नंतर हात जोडून स्तुती करण्यासाठी म्हणून ते समोर उभे राहिले व लगेच एकामागे एक असे सहा श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडले. इतके होते तो त्यांना जाग आली. श्लोक कदाचित विसरून जातील म्हणून शास्त्रीबुवांनी आधी ते लिहून काढले व मग नित्याच्या व्यवसायास आरंभ केला. पुढे त्यांच्या मनात आले की या सहा लोकांमध्ये आणखी दोन श्लोकांची भर घालून अष्टक बनवले तर उत्तम होईल. म्हणून डोके खाजवून खाजवून त्यांनी दोन नवीन श्लोक तयार केले व ते अष्टक पूर्ण केले.  काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली व शास्त्रीबुवा श्रीमहाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्यास गेले. झालेली हकीकत सांगून श्लोकांचा कागद त्यांनी श्रीमहाराजांच्या पुढे केला. श्रीमहाराजांनी पेन्सिल मागितली आणि शेवटच्या दोन लोकांवर काट मारीत म्हणाले, "राम देतो तेवढ्या मध्ये समाधान मानायला शिकावे. रामाचे देणेच तेवढे हिताचे असते,  आपले देहबुद्धीचे लोढणे त्याच्याखाली जोडू नये." या शब्दाचे मर्म फक्त शास्त्रीबुवांच्याच लक्षात आले.
***

१६.    विटा राममंदिर १९०३
घर नं. ५९०, नाथ गल्ली, नाथमंदिराशेजारी, विटा, जि. सांगली, ४१५३११, महाराष्ट्र

या मंदिराबद्दल तेथील गुरुजी श्री महेश देशपांडे यांच्याकडून नुकतीच समजलेली गोष्ट अशी की त्यांचे आजोबा श्री संभाजी देशपांडे कीर्तनकार होते आणि नेहमी या मंदिरात कीर्तनाला जायचे. सुरवातीला इथे फक्त एक हॉल होता. त्यांना हे इथल्या एक आज्जी श्रीमती कृष्णाबाई पाठक या ८२ वर्षापर्यंत महाराजांकडे जात होत्या, त्यांनी हे मंदिर चालवायला दिले. त्या आज्जी अजाणूबाहू  होत्या. त्यांची फार इच्छा होती कि इथे राम मंदिर व्हावे.. रामाच्या मूर्ती जयपूरहून मागवल्या होत्या. त्यातील सीतामाईची मूर्ती क्षितीग्रस्त झाली म्हणून दुसरी मूर्ती नाशिकहून मागवली गेली. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्या मूर्ती स्थापनेसाठी 

 

श्रीमहाराज येणार हे त्या आज्जींनी कोणाला कळू दिले नव्हते. पण तिथे एक आंधळे आजोबा श्री पुरुषोत्तम देशपांडे यांना अंतर्ज्ञानाने समजले होते कि श्रीमहाराज येत आहेत. त्यांनी मदतनीस लोकांना लगेच श्रींच्या बैठकीची व्यवस्था करायला सांगितली.  १९०३ मध्ये श्रीमहाराजांच्या हस्ते रामाची स्थापना झाली. श्रीराम लक्ष्मण, सीतामाईच्या मूर्ती अतिशय देखण्या आहेत. स्थापनेच्या वेळी महाराजांनी आणखी एक अत्यंत रेखीव अशी राम-सीतेची लाकडी मूर्ती दिली होती, ज्यात सीतामाई रामाच्या डाव्या मांडीवर बसली आहे. या मूर्तीची उत्सवाच्या वेळी पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. तसेच स्थापनेच्या वेळी श्रीमहाराजांनी एक शंख आणि शाळुंका म्हणजे एक शिवलिंग दिले आहे.  
श्री महेश देशपांडे यांनी इथे आता मोफत निवासी, अनिवासी वृद्धाश्रम आणि गोशाळा सुरु केलेली आहे. ध्यान मंदिराचे बांधकाम सुरु आहे. तिथे श्रींची पितळी मोठी मूर्ती बसवण्यात आली आहे.

संदर्भ: मंदिराचे गुरुजी श्री. महेश देशपांडे

 

 













**

जय श्रीराम
संकलन: महाराज कन्या


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...