सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५

 जय श्रीराम!

बहू मंदिरें स्थापिलीं धन्य कीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥

"बहुमंदिरे स्थापियेली" या शृंखले अंतर्गत आपण पाहात आहोत, श्रीमहाराजांनी जागोजागी स्वतः स्थापित केलेली मंदिरे, त्यांचे फोटो, माहिती , व्यक्ती आणि त्या त्या गावी घडलेले, श्रीमहाराजांच्या चरित्रात आलेले प्रसंग. 

 १७. मांजर्डे राममंदिर १९०५-०६
मु.पो. मांजर्डे, ता. तासगाव, जि. सांगली - ४१६३१७, महाराष्ट्र
या मंदिराबद्दल फारशी माहिती कळू शकली नाही.

मांजर्डे राममंदिर

मांजर्डे राममंदिर
 
मांजर्डे राम



 

 

 

 

*****
 

१८. भडगांवकर राममंदिर, पंढरपूर १९०८-०९
कासार घाट, पंढरपूर, जि. सोलापूर, ४१३३०४, महाराष्ट्र

पंढरपूर - श्रीराममंदिर हसन [१९०८-९]  [भडगावकर राम मंदिर]
        

भडगावकर राम मंदिर
भडगावकर श्रीराममंदिर या नावाने पंढरपुर येथील श्रीमहाराजांनी स्थापन केलेले राममंदिर ओळखले जाते. श्री अप्पासाहेब भडगावकर हे मोठे सधन गृहस्थ श्रीमहाराजांचे भक्त होते. श्रीमहाराजांचे त्यांच्या वाड्यावर येणे-जाणे असायचे. पंढरपुरात तीन मोठ्या इमारती आणि शेगाव, कोरटी येथे भडगावकरांच्या मोठ्या जमीनी होत्या. त्यांना एक मुलगा आणि चार मुली अशी संतती होती. काहीतरी आजाराचे निमित्त होऊन आप्पासाहेबांचा एकुलता एक मुलगा निधन पावला. श्रीमहाराज त्यावेळी पंढरपुरातच होते. आप्पासाहेबांना अतीव दुःख झाले. स्मशानातच श्रीमहाराजांची त्यांची भेट झाली. श्रीमहाराजांना ते म्हणाले, 'एवढी प्रॉपर्टी पण आता मुलगा नाही. मी हे सर्व सोडून निघून जातो.'
   श्रीमहाराजांनी त्यांचे सांत्वन केले व पुढे काही दिवस गोंदवल्याला नेले. दुःखाचा भर ओसरल्यावर श्रीमहाराज त्यांना म्हणाले, प्रॉपर्टी केली आहे ती तशीच टाकून जाण्यापेक्षा तुम्ही श्रीराममंदिराची स्थापना करावी म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल व काही माणसे उपासनेस लागतील. मी मूर्ती देतो आणि तुम्ही सर्व प्रॉपर्टी श्रीरामार्पण करावी.
 

 पुढे १९०७-०८ च्या सुमारास श्रीमहाराजांनी स्वतः येऊन  भडगावकरांच्या वाड्यात श्रीराममूर्तींची स्थापना केली.
             

संदर्भः चैतन्य स्मरण २००० पान ९६
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन
श्रीमहाराजांनी देह ठेवला त्या वर्षी महाराज ४ महिने भडगावकर राम मंदिरात येऊन राहिले होते. त्याची गोष्ट ब्रम्हानंद बुवांच्या चरित्रात आली आहे ती अशी.
भडगावकर राम मंदिर

प्रकरण २१ - " ब्रह्मानंदबुवांचा पंढरपुरीं वास "

     शके १८३५ च्या वैशाख मासाच्या अखेरीस पंढरपूर क्षेत्रस्थ श्रीमहाराजांच्या सद्भक्तांच्या, विशेषतः अप्पासाहेब भडगावकरांच्या आग्रहावरून, श्रीमहाराज पंढरपुरास गेले व भडगावकरांच्या राममंदिरात वास करूं लागले. नेहमीप्रमाणें त्यांच्याबरोबर शिष्यांस पत्र घालून त्यांनी बोलावून घेतले होते. तसेंच ब्रह्मानंद बुवांनाही त्यांनी बोलाविले होते. त्यांच्या आज्ञापत्राने ब्रह्मानंदबुवाना संतोष झाला व ते पंढरपुरीं वास करण्यास गेल्याचे, मागील प्रकरणाचे शेवटीं आलेच आहें. मात्र जातांना ब्रह्मानंदबुवानी बेलधडी, बेटगिरी, गदग, होंबळ, चिक्कहंदीगोळ, हुबळी वगैरें गांवचे भाविक भक्तांना आपल्याबरोबर नेलें होतें. श्रीमहाराजांचा पंढरपुरात साधारणपणे ३।। ते ४ महिने मुक्काम होता. श्रीमहाराजांच्या पंक्तीस दररोज हजारों लोक असत. भोजनाची व्यवस्था ब्रम्हानंद बुवांकडेच होती. ब्राह्मण भोजन घालणें हा ब्रह्मानंदबुवाचा आवडीचा विषय. मोठ्या दक्षतेने उजाडेपर्यंत लोकांना भजनांत गुंतवून, उजाडणेचे सुमारास भोजनाची जय्यत तयारी ठेवण्याचा त्यांचा परिपाठ असें. ब्राह्मणांना वेगवेगळी पक्वान्ने खाऊं घालण्यात त्यांना अत्यानंद होत असलेने, दररोज ते वेगवेगळी पक्वान्ने करवीत व आकंठ तृप्ति होईपर्यंत स्वतः सर्वांस वाढीत असत. हा सोहळा पाहण्याचे भाग्य लेखकास लाभले आहे. सतत चार महिने लेखक आपल्या वडिलांबरोबर दर शनिवारी मंगळवेढयाहून सायंकाळी तेथें येत असें व रविवारी दुपारी प्रसाद ग्रहण करून परत मंगळवेढ्यास जात असे.
  
भडगावकरांच्या राममंदिरात श्रीमहाराज
एकेदिवशी श्रीमहाराजांच्या मनांत, पंढरपुरातील सर्व ब्राह्मणांना व भिक्षुकाना भोजन घालावे, असें आलें. यासाठी श्रीमहाराजांनी क्षेत्रस्थ मक्ता घेणाऱ्या सर्व बडव्यांस बोलावून घेतले व या प्रस्थास खर्च किती येईल अशी पृच्छा केली. त्या बडव्यानीं ब्राह्मण व भिक्षुक यांची संख्या किती होईल, याबाबत विचारविनिमय करून १४०० रुपये खर्च येईल, असा आपला अंदाज सांगितला. तेंव्हा श्रीमहाराजांनीं उद्याचे हें सेवाकार्य कोण पत्करणार असा प्रश्न जमलेल्या सर्व भक्तमंडळीस केला. भक्तगण नुसते एकमेकांकडे पहात स्वस्थ बसून राहिले. मी करतो, असें पुढें होऊन कोणीच म्हणेना. तें पाहून श्रीमहाराजांनीं ब्रह्मानंदबुवांस हांक मारली. "ब्रह्मानंदबुवा" अशीं हांक ऐकताक्षणीच पूज्य बुवा 'जी' असें म्हणून हात जोडून त्यांचे उजवेबाजूस नम्रपणें खालीं मान घालून येऊन उभें राहिले. ते नेहमीं सद्गुरूनाथांच्या हाकेच्या टप्प्यात, बैठकीच्या दालनाचे बाहेर सदैव हात जोडून उभें असत. भडगावकर राममंदिरात सभामंडपात श्रीमहाराजांचे आसन असें. त्याच्या पाठीमागे एक गवाक्ष आहें. त्या गवाक्षाजवळ सहसा व विशेषतः निरूपणाचेवेळी ब्रह्मानंदबुवा हात जोडून उभें असत. पूज्य बुवा विश्रांतिस्थानीं आडवे झाल्याप्रसंगीं श्रीमहाराजांच्या आसनस्थानाकडे पाय लांब न करण्याचे कटाक्षाने पाळीत असत. असो. श्रीमहाराजांनीं ब्रम्हानंदबुवांना, "उद्याची व्यवस्था कर" असें सांगितले व आपण झोपण्यासाठी खोलीत निघून गेले.
संदर्भ: ब्रम्हानंद बुवांचे चरित्र
**
१९. जानकीजीवन राममंदिर, मोरगिरी १९०८
मु.पो. मोरगिरी, ता. पाटण, जि. सातारा - ४१५२१०, महाराष्ट्र

मोरगिरी राममंदिर
मोरगिरीला श्री महाराजांचे एक राममंदिर आहे,तेथे वामनराव पेंढारकर या नावाचे एक चांगले उपासक होते,लग्न झाल्यावर बावीस वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला,इतक्या वर्षानंतर झालेल्या त्या मुलावर आईबापांचा साहजिकच अतिशय जीव होता,जरा मोठा झाल्यावर तो सारखा आजारी पडू लागला,पुष्कळ औषध पाणी झाले,पण मुलाला काही बर वाटेना,उलट त्याचा रोग वाढतच चालला,तेव्हा वामनराव सहकुटुंब गोंदवल्यास आले,मुलाला त्यांनी श्री महाराजांच्या पायावर घातले,त्यावेळी श्री महाराज म्हणाले,"वामनराव,हा मुलगा रामाने आपल्याला दिला,ती त्याची ठेव आहे,तिचे काय करायचे हे आपण रामावरच सोपवू"मुलाची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली,या अवधीत श्री महाराज वामनरावांना आणि त्यांच्या पत्नीला जवळ बसवून जगाच्या तात्पुर्तेपणा बद्दल तसेच भगवंताच्या भक्तीबद्दल,अनेक रीतीने वारंवार सांगत,ज्या दिवशी त्या मुलाचा अंतकाळ आला त्या दिवशी श्री महाराजांनी रामासमोर त्याला आपल्या मांडीवर घेतला,स्वतः त्याच्या तोंडात रामाचे तीर्थ व गंगा घातली,कानात तुळशीपत्र ठेवले आणि "बाळ,आनंदात जा बरे,"असा त्याला निरोप दिला,त्या मुलाने देखील होकारार्थी मान हालवून त्यांचे म्हणणे आपल्याला समजले असे दाखविले,त्याच वेळी श्री महाराजांनी वामनराव ना स्वतः संकल्प सांगून गाईचे दान देवविले.मुलाचा प्राण गेल्यावर त्याला रामासमोर ठेवले,सर्वांना भजन करायला लावले,आणि त्याच्या नावाने बापाकडून दशदाने देवविली, हे सगळे झाल्यावर श्री ब्रम्हानंदांनी कापूर, तुळशी, व चंदन घालून आपल्या हाताने त्याच्या देहाला अग्नी दिला,या सगळ्या दिव्यातून जात असता त्या मुलाचे आईबाप एखाद्या सत्पुरुषासारखे अत्यन्त शांत राहिले,रडणे ओरडणे वगैरे काही न करता शांतपणे श्री महाराज सांगतील तसे करीत होते,हे पाहून नंतर श्री महाराज म्हणाले,"इथे माझा संबंध आहे म्हणून मला बोलायला फार संकोच होतो,परंतु सत्संगतीने मनुष्याच्या वृत्तीत कसा पालट होतो हे या नवरा बायको च्या वागण्यावरून चांगले कळेल,सत्संगती आणि भगवंतांचे नाम,यानेच होतो जीवास आराम!

मोरगिरी राम
मोरगिरीच्या राम मंदिराची आणखी एक गोष्ट म्हणजे
मोरगिरी च्या जवळ कोकिसरे नावाचे एक खेडे आहे. तेथे एक दलित समाजातील महिला बाळंतपणामध्ये अडली. त्या बाईची नीट सुटका व्हावी म्हणून गावातील लोकांनी पुष्कळ खटपट केली, परंतु त्यांना यश येईना आणि तिचा जीव कासावीस होऊ लागला. त्या गावचा पाटील हरी हा श्री महाराजांचा शिष्य होता. पाटलाने श्रीमहाराजांचे स्मरण करून तिला अंगारा लावला आणि आपण बाहेर नामस्मरण करीत बसला. अंगारा लावल्या नंतर तिला तंद्री लागली व श्री महाराज दिसले, त्यांनी तिच्या पोटावरून हात फिरविला आणि 'श्रीराम', 'श्रीराम' असा जप करीत जा असे तिच्या कानात सांगीतले व आपण निघून गेले. तंद्रीतून ती जागी झाली तेव्हा तिची सुटका झालेली होती. काही दिवस गेल्यावर ती नवऱ्यासह मोरगिरीला गेली तेथे राममंदिरा मध्ये आपला नवस तिने फेडला आणि गोंदवल्यास श्रीमहाराजांच्या नावे पाच रुपये पाठविले. ते पैसे आले तेव्हा श्रीमहाराज बोलले शुद्ध भावनेचे हे फळ आहे. पुष्कळ वेळा गरीब अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावे नामाने भावना शुद्ध होत जाते आणि नंतर शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. नामाने प्रपंचातली प्रसंग निवळतात यांत विलक्षण असे काही नाही.

मोरगिरी राम

मोरगिरीचे गोविंदराव केळकर यांची बायको सरस्वती हिला एक ब्रह्मचारी पिशाच्च लागले होते. ते पिशाच्च वेदमंत्र स्वच्छ आणि बरोबर म्हणून दाखवत असे. श्रीमहाराज त्याला पुष्कळ प्रसंगी निरनिराळी वेदसूक्ते म्हणावयास सांगत आणि ते पिशाच्च देखील स्वरांसहित मोठ्या ठसक्याने ती म्हणत असे. त्यात गंमतीची गोष्ट अशी कि त्याला गायत्रीमंत्र म्हणायला सांगितलं तर तो अर्धाच म्हणून गप्प बसे. असे करण्याचे कारण विचारले तर ते म्हणे,"सर्वच गायत्री मंत्र जर मी म्हटला तर मी भस्म होऊन जाईल ना! म्हणून मी अर्धाच म्हणतो. " हे ऐकून श्रीमहाराज लोकांना म्हणाले,"बघा, गायत्रीच्या मंत्राचे केवढे सामर्थ्य आहे. द्विजाने गायत्रीची उपासना केली तर त्याला इतर काही करण्याची आवश्यकता नाही. परंतु सध्याची परिस्थिती त्याला अनुकूल नाही. त्यासाठी लागणारे पावित्र्य आणि आचरण सध्या कोणाला ठेवता येत नाही. म्हणून संतांनी दयाळू होऊन भगवंताचे नाम सिद्ध करून दिले. गायत्रीने जे साधते तेच नामाने साधते यात मात्र बिलकुल शंका नाही. शिवाय नामाला देहाचे बंधन नाही हा त्याचा विशेष होय. म्हणून सध्याच्या काळात प्रत्येकाने नाम घ्यावे.
 

मोरगिरी येथील राम मंदिरातील मारुती
संदर्भ: श्रीमहाराजांचे चरित्र

जय श्रीराम!
संकलन: श्रीमहाराज कन्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...