जय श्रीराम!
पाऊलखुणा - ४
१)श्री कृष्णशास्त्री उप्पिनबेटगिरी

कृष्णानंद स्वामी उर्फ कृष्णशास्त्री हे सुप्रसिद्ध संस्कृत पंडित होते. ते उप्पीनबेटगिरीचे होते. काशीमधील संस्कृत विद्वान सभेचे अध्यक्षपदसुद्धा त्यांना प्राप्त झाले होते.. त्यांच्या विद्वत्तेवर पंडित मदनमोहन मालवीय हे प्रभावित झाले होते. त्यांच्यावर ब्रह्मचैतन्य महाराजांचा प्रभाव होता. त्यांचे स्मरण करीत त्यांनी संन्यास घेतल्यावर कृष्णानंद स्वामी झाले. १९२२ मध्ये ते समाधिस्त झाले. त्यांची धारवाड येथे संस्कृत पाठशाळेत समाधी आहे.
श्रीब्रह्मानंदांच्या परिचयाने यांना श्रीमहाराजांचा अनुग्रह झाला. यांनाही श्रींनी दोन रुपये प्रसाद म्हणून दिलेले त्यांच्या देवांमध्ये असत. एकदा त्यांनी दारावर नेहमी येणाऱ्या एका बाईकडून दोन रुपयांचे धान्य घेतले, व त्यावेळी जवळ पैसे नसल्याने दुसऱ्या दिवाशीचा वायदा केला. दुसऱ्या दिवशी ती बाई येईपर्यंत रकमेची व्यवस्था होऊ शकली नाही. वायदा पुरा न केला तर आपली अब्रू जाणार अशी वेळ येऊन ठेपली. तेव्हा निरुपाय होऊन पूजेतले रुपये देण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून शास्त्रीबुवांनी ते उचलले. एवाढ्यात पोस्टमन येऊन त्याने पुण्याच्या वेदाशास्त्रोत्तेजक सभेतर्फे परीक्षक म्हणून केलेल्या कामाचे मानधनाची पावती दिली ती नेमकी दोन रुपयांची! श्रीगुरुमाउलीची ही कृपा पाहून शास्त्रीबुवांच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले! आजही ते दोन रुपये त्यांचे चिरंजीव भालचंद्रशास्त्री यांच्या पुजेत आहेत.
कृष्णशास्त्रींच्या हस्ते धारवाडात दोन राममंदिरांची स्थापना झाली. एक लाईनबझारमध्ये, त्यांच्या नात्यातल्या गंगाबाई यांनी बांधलेले; आणि दुसरे माळमड्डीवर, जोगळेकर न्यायाधीश यांनी बांधलेले. या मंदिरात वनवासी रामाच्या मूर्ती आहेत.
संदर्भ: चैतन्य स्मरण १९८८ ही स्मरणिका, पान १९०
संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन
***
२)विष्णुबुवा कुंभारे
विष्णुबुवा कुंभारे हे मूळचे राहणारे वऱ्हाडातले. यात्रेच्या निमित्ताने ते मोगलाईत गेले असता अंबड येथे त्यांची व आनंदसागर यांची गाठ पडली. आनंदसागर यांनी त्यांना श्रीमहाराजांच्याबद्दल गोष्टी सांगून गोंदवल्यास पाठवले. श्रीमहाराजांना पाहून विष्णुबुवांना आनंदाची उर्मी आली आणि त्यांच्या मनाला विलक्षण समाधान झाले. श्रीमहाराजांनी त्यांना ठेवून घेतले. चार-आठ दिवस राहिल्यावर नित्याच्या व्यवहारांमध्ये देखील सहज प्रकट होणारे श्रीमहाराजांचे ज्ञान व वैराग्य पाहून विष्णुबुवा चकित होऊन गेले आणि आपण त्यांचा अनुग्रह घ्यावा असे त्यांच्या मनाने घेतले. एकदा श्रीमहाराज एकटे आहेत अशी संधी साधून, आपल्याला अनुग्रह द्यावा म्हणून त्यांनी श्रीमहाराजांना विनंती केली. तेव्हा श्रीमहाराज हसले आणि त्यांना म्हणाले, "बुवा, तुम्हाला अनुग्रह झाला आहे ! ना वारे वा ! मागच्या गुरूंना जसे तुम्ही विसरला तसेच मला पण विसराल ! अहो, गुरू म्हणजे थट्टा का आहे ? एखाद्या पतिव्रतेसारखे गुरूशी वागावे लागते. आपला देह त्याला अर्पावा लागतो. एकदा एक गुरु केला म्हणजे दुसरा करू नये." श्रीमहाराजांचे शब्द ऐकून विष्णुबुवांना लहानपणची आठवण झाली. ते सहा-सात वर्षांची असताना एका सत्पुरूषाने त्यांना शिवमंत्र दिला होता. परंतु त्याचवेळी त्याने हे सांगून ठेवले की, "तुला माझे आणि ह्या मंत्राचे लवकरच विस्मरण होईल, नंतर पुष्कळ वर्षांनी श्रीब्रह्मचैतन्य नावाच्या थोर महात्म्याचे दर्शन तुला घडेल. तू त्यांचेपाशी अनुग्रह मागशील तेव्हा तेच तुला माझे स्मरण करून देतील, पण तू त्यांनाच गुरु मान आणि त्यांच्या चरणी चित्त अर्पून त्यांची आज्ञा वेदवाक्य समज. त्याने खात्रीने तुझे कल्याण होईल." विष्णूबुवांनी ही सर्व कथा श्रीमहाराजांना सांगितल्यावर त्यांनी अनुग्रह देण्याचे कबूल केले. श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रह दिला तेव्हा त्यांना शिवमंत्रच दिला. राम आणि शिव या दोघांमध्ये भेद मानू नये असे सांगून रोज स्नान झाल्यावर आसनावर बसून शिवमंत्र जपावा आणि इतर वेळी रामनामाचा जप करावा अशी श्रीमहाराजांची त्यांना आज्ञा झाली. हा अनुग्रह झाल्यावर विष्णुबुवांनी मोठ्या चिकाटीने जप केला. तसेच ते द्वादश ज्योतिर्लिंगे आणि इतर मोठी क्षेत्रे पाहून आले.
त्यांचे नामाचे प्रेम पाहून श्रीमहाराजांनी त्यांना दीक्षाधिकार दिला होता. नंतर वऱ्हाड प्रांतात शेंदूरजन घाट येथे मठ बांधून ते राहिले.
पुढे श्रीमहाराजांनी बांधलेली मंदिरे या पोस्टमध्ये त्यांचा उल्लेख येईलच.
**
३)श्री नारायण अप्पा कुलकर्णी, कुंदगोळ :

मूळचे रहाणारे कुंदगोळचे , पण पुढे ते श्रीमहाराजांच्याजवळ रहात असत. एकदा श्रीमहाराज त्यांना म्हणाले , ' अरे नारायण , तू गोंदवल्याला पुष्कळ नामस्मरण कर. राम तुझ्या हाताने नामाचा खूप प्रसार करणार आहे .' दक्षिण कर्नाटकामध्ये यांनी नामाचा फार प्रसार केला. हे अत्यंत निरभिमानी वृत्तीने वागत.
यांना सर्वजण कुंदगोळ नारायणप्पा म्हणत. त्यांचा जन्म १८८४ मध्ये झाला होता. ते महाराजांचे आणि ब्रम्हानंद बुवांचे परमभक्त होते. त्यांचे एस एन कुलकर्णी, एल एन कुलकर्णी, पी एन कुलकर्णी असे तीन पुत्र होते. त्यांच्या घरात प्रवेश करताच महाराजांच्या पादुका आणि भावचित्र समोर आहे. पु तात्यासाहेब केतकर त्यांच्या घरी येत असत. १९४९ मध्ये चिंतामणी येथे राम मंदिरात राम, सीता , लक्ष्मणाच्या मूर्ती त्यांच्या बरोबर महाराजांची अमृत शिला मूर्ती त्यांनी स्थापित केली. १९५२मध्ये त्यांनी देह ठेवला.
जय श्रीराम
~ श्रीमहाराज कन्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा