जय श्रीराम!
पाऊलखुणा - ५
पु. ब्रम्हानंद बुवांच्या कार्याचा झपाट्याविषयी पाहिले तर अचंभित व्हायला होईल. अर्थात श्रीमहाराजांची पूर्ण कृपादृष्टी आपल्या या लाडक्या शिष्यावर होतीच.
श्रीक्षेत्र बिद्रहळ्ळी येथील नामजप यज्ञ!
पु. बुवांच्या चरित्रात या विषयी उल्लेख आलेला आहेच. त्यातले खाली काही संदर्भ देते.
*
श्रींची नाम जप यज्ञ करणे विषयी आज्ञा होतांच श्रीब्रह्मानंदगुरुंना अत्यानंद झाला.व त्यासाठी योग्यस्थळ ठरविण्याकरता त्यांनी संचार सुरु केला.मागील जपयज्ञाच्या वेळी श्रींनी केलेली नदीतटाकाची केलेली सूचना त्यांचे डोळ्यापुढे होतीच.त्यामुळे तुंगभद्रेच्या कांठी वसलेले पुराणप्रसिध्द बिद्रहळ्ळी गांव त्यांनी पसंत केले.जरी हे गांव लहान असले तरी ते सर्व तर्हेने अनुकूल आहे असे बुवांना वाटले.कारण त्याच्याजवळच विठ्ठलपूर,रंगापूर,आदि क्षेत्रे आहेत.तेथे पूर्वी बिष्टाय्या नावाचे महापुरुष होऊन गेले.त्यांना कैलासपतीचा अवतारच मानीत असत व त्यांनी तेथे अनुष्ठानही केले होते.
![]() |
| मुरलीधर/ वेणुगोपाल मंदिर! याचा जीर्णोद्धार पु. ब्रम्हानंद बुवांनी केला होता. आणि जपानुष्ठानासाठी इथेच लोक बसले होते. |
🔸 भविष्योत्तर पुराणात बिद्रहळ्ळी हे काशी क्षेत्रासमान असल्याचे वर्णन केलेले आहे.या गावी बिदरहळ्ययव्वा नावाच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे.यावरुनच गावास बिदरहल्ली नांव पडले असावेसे दिसते.या गावाबाहेर नदीकांठी श्रीमुरलीधराचे देऊळ आहे.या देवळांतील मूर्ति काळ्या दगडाची असली तरी नयनमनोहर आहे.मात्र त्या गावात त्यास मुरलीधराचे देऊळ न म्हणतां श्रीवेणूगीपालमंदिर म्हणण्याचा प्रघात आहे. ते देवालय त्यावेळी जीर्ण झाले असल्याने श्रीब्रह्मानंदांनी त्याचा प्रथम जीर्णोध्दार केला. जीर्णोध्दार करतांना तेथे पुढील होणाऱ्या नामजपयज्ञाचेवेळी स्वयंपाक करणेस व अन्न संतर्पणास सुकर होईल ही दृष्टी ठेवून बांधकाम करवून घेतले.
🔸 लहान गावाच्या मानाने तेथे अवघी १५/२० ब्राह्मणांची घरे त्यावेळी होती. जीर्णोध्दाराचे वेळी या गांवचे लोकांचा व ब्रम्हानंद बुवांचा परिचय चांगला झाला असल्याने बुवांवर त्यांचा दृढ विश्वासही बसला होता.म्हणून त्यांनी या गावीच नामजपयज्ञ करण्याचा आपला मानस जेव्हा त्या लोकांस कळविला,तेव्हा त्या गांवच्या सर्व लोकांनी मोठ्या उत्साहाने त्या कार्यास आपली संमती दर्शविली व श्री ब्रम्हानंदांच्या आज्ञेप्रमाणे वागूं असे आश्वासनही दिले.
🔸 श्रीब्रम्हानंदगुरुनी जपानुष्ठानास लागणाऱ्या सर्व साहित्याची सिध्दता केली.या खेपेस जपानुष्ठानाचा प्रारंभ श्रींचे हस्ते करवावा या इच्छेने त्यांस विज्ञापना करुन बोलावून आणण्यासाठी श्रीब्रम्हानंदगुरुनी गोंदवल्यास शिष्यांची रवानगी केली.श्रींना इतर कार्यामुळे तिकडे जातां येणे शक्य नव्हते.म्हणून त्यांनी जपानुष्ठानास प्रारंभ करण्याचें आज्ञापत्र आपले विश्वासू शिष्य अप्पासाहेब भडगांवकर,भाऊसाहेब केतकर आप्पासाहेब घाणेकर यांच्या हाती देऊन त्यांस तिकडे रवाना केले.ते पत्र पुढील प्रमाणे.
!! श्रीरामसमर्थ !!
"सर्व उपमायोग्य रा.रा.रामभक्त परायण ब्रह्मानंदबुवा यांस आशीर्वाद"
वि.लिहिणेचे कारण तेरा कोटी श्रीराममंत्राचा जप करणारे भक्तराज व ब्रह्मानंद महाराज तुम्ही; महाभागवत,जप करणारे मंडळी यांनी या कलियुगांत थोर केले अनुष्ठान त्याने प्रसन्न माझे अंतकरण. "मी सदा सर्वदा तुमचे आधीन ! तुम्ही सर्वत्रांनी एक करावे काम ! लौकिकी वासनेचा करुनि त्याग ! माझे सांगणे मानावे प्रमाण ! संतोषानें सुप्रसन्न चित्त करुन,तुम्ही ब्राम्हण भोजन,उत्सव,पुरश्चरण,जे कांही तुम्हास दिसेल,जे योग्य असेल ते सत्कर्म करावे.इकडून अप्पासाहेब,घाणेकर, भाऊ साहेब पाठविले आहेत.तर अप्पासाहेब भडगांवकर यांस मी समजून करावे.मीच समजून करावे आरंभ ! त्यांचे म्हणण्याप्रमाणे करावे वर्तन ! मी तुम्हांस सर्वांस येऊन दर्शन देईन यांत शंका नाही.आता हे ऐकावे वचन ! प्रारंभास विलंब न करावा क्षणभर ! जप करणारे मंडळीस, भागवतास,ब्रह्मानंदास हेच मागणे आहे एक. मीआल्यापूर्वी अप्पासाहेब,घाणेकर पोंचल्याबरोबर करावा प्रारंभ.सामान वाया जाऊं देऊं नये.यांत फार अर्थ आहे.समक्ष समजल्यानंतर वाटेल खरे ! लौकिकी भावार्थ सोडूनि द्यावा ! आरामाचा राम जोडावा ! सत्कर्मास हजारो विध्ने असतात.परंतु सर्व एका बाजूला ठेऊन शेवटाला नेण्याचा यत्न करावा.प्रारंभ करण्यात उशिर न लावावा.हा आशिर्वाद. बाकी मजकूर भाऊसाहेब,घाणेकर,सांगताना कळेल.आशीर्वाद .
ता.क. तुम्हास सांगितल्याप्रमाणे मी येऊन घटकाभर तुम्हास भेटेन यांत संशय नाही.पत्राप्रमाणे सर्वत्र मंडळींनी वागावे यांत फार खरे आहे.उगीच हाट करु नका.माझे आज्ञामोडू नका.हा आशीर्वाद .
~ ब्रह्मचैतन्य गोंदावले.
वर उद्घृत केलेले श्रींचे आज्ञापत्र घेऊन आलेल्या भाऊसाहेब व अप्पासाहेब द्वय यांच्या तोंडून सर्व सूचनावजा हकीगत ऐकून घेऊन ती शिरोधार्य मानून शके १८२९ प्लवनाम संवत्सरांतील दासनवमी दिवशी समाप्ति होईल अशा बेताने माघ वद्य द्वितीयेस गुरवारी सुर्योदयाच्या आंत श्रींच्या पादूकांना व मुरलीधराला पंचामृताचा अभिषेक करुन,आरति करुन तेरा कोटी श्रीरामनामजपाचा संकल्प करुन श्रीफल ठेवून नामजपाला प्रारंभ केला.
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आसपासच्या चोहोबाजूच्या लोकांना कळविण्याची आगाऊच व्यवस्था करण्यांत आल्यानें व त्यांतच श्रीमहाराजही येणार आहेत, अशी दाट वदंता पसरल्याने हजारोंच्या संख्येने लोक सप्ताहासाठी जमले होते. श्रीमहाभागवतांचा मुक्कामही तेथेंच होता. सप्ताहाचा थाट काय वर्णावा ! श्रीदासनवमीच्या दिवशीं दुपारी स्वतः श्रीब्रह्मानंदगुरूंनी श्रीसमर्थांच्या निर्वाणाचे अनेक अभंग म्हणून, कीर्तिरूप दासकथन करून, मोठ्या थाटाने नवमी उत्सवाचा समारोप केला. श्रीमुरलीधराची, श्रीसमर्थांची, श्रीमन्महाराजांची आरती करून, नैवेद्य दाखवून, ब्राह्मण, सुवासिनींना भोजन घातलें. सर्व गांवास आमंत्रण होतें.
जपानुष्ठानाची व्यवस्था श्रीमुरलीधराचे देवळांत केल्यानें, लोक दररोज तेथेंच जपास बसत असत. श्रीबेलधडी भजनीपद्धतीप्रमाणे कांकड आरती, माध्यान्ह नैवेद्यआरती, सायं भजनी आरती वगैरें नित्यनेम व उपासनाक्रम येथें श्रीगुरूंनी आरंभ केला व न चुकता तो चालावा म्हणून, श्रीगुरू फार करून तेथेंच राहूं लागले.
सुरुवातीस जपास बसलेल्या लोकांची संख्या साठ ते सत्तर इतकीच होती. पण श्रीब्रम्हानंद बुवांनी पुष्कळ गांवचे लोकांस पत्रें पाठवून बोलावून घेतल्यानें ती संख्या उत्तरोत्तर वाढत वाढत २५० पर्यंत गेली. अर्थांत या सर्व लोकांची उतरण्याची, फलाहाराची, भोजनाची उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती. श्रीब्रह्मानंद गुरू मधून मधून जातीनें त्यांच्या योगक्षेमाची चौकशी करीत असल्यानें, ते सर्व श्रीरामनाम जपात आनंदाने मग्न होत असत. जपयज्ञासाठीं लोकांनीं तेथें गर्दी करण्याचें दुसरें कारण म्हणजे पवित्र पुण्यक्षेत्री वास, पावन करणाऱ्या तुंगेच्या स्नानाचा लाभ व श्रीगुरूंचा प्रेमळ सहवास हें होय. अशा त्रिवेणी संगमाचा सुयोग सुखासुखी कोण बरें दवडील ! अशा धूमधडाक्यात पूर्वी नरगुंदांत झाल्याप्रमाणें येथेंही तेरा कोटी जपसंख्या अवघ्या ७, ८ महिन्यांत पूर्ण झाली.
हातासरशी सांगतामहोत्सवही लवकर करावा म्हणून, श्रीब्रह्मानंद गुरूंनी श्रीमन्महाराजांस आमंत्रण करण्यास व बोलावून आणण्यास एका विश्वासू शिष्याची योजनाबद्ध नियुक्ति करून त्यास गोंदवलेस रवाना केले व सामुग्रीच्या जय्यत तयारीस त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली सुरुवात केली.
श्रीबुवांनी पाठविलेला भाविक गोंदवलेस पोंचताच, त्यानें श्रीमहाराजांचे दर्शन घेऊन नम्रपणें त्यांस श्रीगुरूंच्या विनंतीचे व तेथील हकीगतीचे कथन केले. सर्व वृत्तांत ऐकून हर्षभरित अंतःकरणाने बिदरहळळीस जाणेस निघण्यास आपली संमती दर्शविली. पण दरखेपेसच कारणाकारणानें प्रत्यक्ष निघण्यास श्रीमहाराजांस दिनावधि होत असे. तसेंच या खेपेसहि झालें. आज उद्या करीत करीत, त्यांनी चार महिने घालविले. शेवटीं श्रींनी एकदाचे प्रयाण केले. या खेपेस त्यांचेबरोबर सुमारें ३०० लोक होते. याखेपेस श्रींची प्रकृति असावी तशी चांगली नव्हती. ते दम्याच्या विकाराने फार अशक्त झाले होते. त्यावेळीं त्यांनी बापूसाहेब साठे नांवाच्या आपल्या एका शिष्यास लिहिलेल्या पत्रांतील उल्लेखावरून वरील विधानाची सत्यता पटतें. पत्रांतील संबंधित मजकूर खालीं लिहिल्याप्रमाणें : ----
"विशेष लिहिण्याचे कारण कीं, मी ब्रह्मानंदबुवांकडे प्राणाच्या कराराबरोबर आलों आहें. दररोज ताप चार डिग्री येतो. श्वास फार झाला आहे. अन्न खाववत नाहीं. जिना चढून जाण्याची शक्ति उरली नाही, असें झाले आहे. परंतु भागवतांनी व ब्रह्मानंदबुवानी तेरा कोटी जप केला आहे. या शिवाय दोन ठिकाणीं श्रीरामाच्या स्थापना होणार आहेत. एवढ्याकरिता देह गेला तरी हरकत नाही, असें समजून मी आलों आहें. माझ्याबरोबर सुमारें तीनशे लोक आहेत."
जपाच्या सांगतेच्या वेळी श्रींना बोलावून आणण्यासाठी बुवांनी श्री दत्तोपंत तबीब यांची निवड केल्याने श्रीमहाराज प्रथम हुबळी येथे आले. तिथे ३ दिवस मुक्काम करून श्री सिद्धारूढ स्वामींची भेट घेऊन श्रीमहाराज गदग येथे गेले. गदग येथून श्री महाभागवत यांच्या आमंत्रणावरून महाराज कूर्तकोटीस गेले. नंतर महाराज मुळगुंद येथे आले. तेथून निघून शिरहट्टी येथे आले.
शिरहट्टीहून बिदरहल्ली हें खेडेगाव सुमारें २५ मैल अंतरावर आहें. वाटही त्यावेळीं बेताचीच होती. प्रवास बैलगाडीचा, तेंव्हा त्रास हा होणारच हें गृहीत धरून शक्यतोवर कोणालाही कोणत्याहि प्रकारचा त्रास होऊ नये, विशेषतः श्रीमहाराजांना तो होऊं नये म्हणून ब्रम्हानंद बुवांनी विशेष खबरदारी घेतली होती. एका गाडीत लाडू, पोहे, करंज्या, चकल्या असें फराळाचे सामान ठेवलें होतें. तसेंच दुसऱ्या एका गाडीत पिण्याच्या पाण्याचे दोन मोठे हांडे उत्तम पाण्याने भरून ठेवले होते. या दोन गाड्या व श्रीमहाराजांची गाडी बत्तीस गाड्यांच्यामध्ये ठेवण्यांत आली होती. शिवाय गाड्यांच्याबरोबर पायीं प्रवास करणारांची संख्या अगणित होती. दर दोन तासांनी एखादी झाडांची गर्द छाया आल्यावर, गाड्या थांबवून, थोडी विश्रांती घेण्याची सूचनाही देऊन ठेवलेली असल्यानें त्याप्रमाणें गाड्या थांबत असत. विश्रांतीचेवेळी फलाहाराची व्यवस्था चोख ठेवण्यांत येत असें. शिरहट्टीहून प्रवास सुरूं करतांना "रघुपति राघव राजाराम । पतीत पावन सिताराम" असा जो नामघोष सुरूं झाला, तो प्रवास संपेपर्यंत अव्याहतपणे, मुक्तकंठाने चालला होता.
बेळहट्टी हें गांव शिरहट्टीपासून १२ मैलांवर बिदरहळळीच्या वाटेवर आहें. तेथें गाड्या पोंचण्यास सायंकाळ झाली. त्या गांवच्या भाविक लोकांनीं श्रीमहाराजांस आपलें गांवी त्यारात्रीं वस्ती करून गांव पावन करावा अशी विनंति केल्यानें, श्रीमन्महाराजांनीं ती मान्य केली व त्या रात्रीं तेथेंच वास केला. दुसरें दिवशीं म्हणजे शके १८३० फाल्गुन वद्य १४ या दिवशीं सुर्योदयापूर्वीच तेथून प्रयाण केले व दुपारी सुमारें १ वाजणेचे सुमारास हा सर्व लवाजमा बिदरहळ्ळीस येऊन पोंचला.
श्रीमन्महाराजांच्या दर्शनासाठी त्यावेळेपर्यंत पंधरा ते वीस हजारपर्यंत जनसमूह जमला होता. दर्शनासाठी अधीर झालेले लोक दोन कोसापर्यंत पसरले होते. रस्त्यावर तर इतकी गर्दी झाली होती कीं, वाटच दिसत नव्हती. लोकांना श्रीमन्महाराजांचें दर्शन सुलभपणे व्हावे, कोणाचीही निराशा होऊं नये म्हणून, श्रीब्रह्मानंदगुरूंनी मखमलीच्या गादीने मढविलेली एक खुर्ची गाडीवर बांधून श्रीमन्महाराजांच्यासाठी सिंहासन तयार केले होते. श्रीमहाराजांस ऊन लागूं नये म्हणून, श्रीरामसंस्थान बेलधडीहून जरतारी मोठी छत्री आणविली होती. लोकांच्या उत्साहाला इतकी भरती आली होती कीं, श्रीमन्महाराज सिंहासनावर विराजमान होतांच लोकांनीच ती गाडी ओढून बिदरहळ्ळीला नेली.
![]() | ||
| तुंगभद्रा नदीकिनारी दगडी मंडपात जेथे स्वयंपाकाच्या चुली मांडल्या होत्या तिथे एका दगडी खांबावर ब्रम्हानंद महाराजांनी स्वहस्ते कोरलेली ही श्रीमहाराजांची मूर्ती |
![]() |
| आचाऱ्यांनी वापरलेल्या चुली |
श्री ब्रम्हानंद महाराज शतसांवत्सरिक पुण्यतिथी विशेषांक 'चैतन्यहृदय ' यातील एका लेखात आलेला हा फोटो. बिदरहल्ली जपयज्ञा साठी पुरातन दगडी मंडपातील पुरुषभर उंचीची भोजन करण्याची हि कढई.
*
जय श्रीराम!
आम्ही या ठिकाणी २०१८ मधे पू बुवांच्या पुण्यतिथी शताब्दी निमित्त दौऱ्यावर गेलो होतो तेव्हाचे हे फोटो. रात्री पोहचल्याने फोटो रात्री काढले आहेत. अस्पष्ट आहेत.
जय श्रीराम!
*
महाराज कन्या




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा