बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

  जय श्रीराम
आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे!या शृंखलेतील पुढची मंदिरे आहेत.

१०.  शिवराममंदिर, कुरुंदवाड १९२९
लक्ष्मीविष्णुमंदिराशेजारी, मु.पो. कुरुंदवाड, जि. कोल्हापूर - ४१६१०६, महाराष्ट्र

या मंदिराच्या उभारणीमागची कथा श्रीमहाराज चरित्रात 'नायट्यावर तोडगा' या शीर्षकाअंतर्गत आली आहे. ती अशी की,
  बागलकोटला सुखवस्तू कुटुंब होते. त्यात मुलगी एकच पण सुरेख व सुस्वभावी असल्याने सर्वांची लाडकी होती. तिला बारावे वर्ष लागल्यावर तिच्या सर्व अंगावर नायटे येऊ लागले. त्यांना भारी खाज असायची. पोर्णिमेला ते चिघळायचे. हा त्रास नाहीसा करण्यासाठी पुष्कळ डॉक्टर, वैद्य झाले. तसेच आईने व मुलीने व्रते करून देहाला पुष्कळ कष्टही दिले. पण कशाचाही उपयोग झाला नाही. आईबाप कंटाळून स्वस्थ बसले असता कोणीतरी श्रीमहाराजांचे नाव त्यांना सुचवले. बापाला रजा नसल्यामुळे मुलीला घेऊन आई गोंदवल्यास आली. नायट्यांचा इतिहास सांगून आई श्रीमहाराजांना म्हणाली, "महाराज, मुलीला पंधरावे वर्ष लागले आहे.  हिचे लग्न कसे होईल याची फार काळजी वाटते." यावर श्री महाराज म्हणाले, "माय,  काळजी करू नका. रामराय तुमचे संकट निवारील.  ही मुलगी जर एखाद्या गरिबाला दिली तर ताबडतोब बरी होईल. यजमानांना विचारून मला सांगा." बाईने नवऱ्याला पत्र लिहिले. चार-आठ दिवसात त्यांचे होकारार्थी उत्तर आले. तिने ते पत्र श्रीमहाराजांना दाखवले. श्रीमहाराजांनी  पुन्हा पुन्हा तिला विचारले. प्रत्येक वेळी तिने होकार दिला. तेव्हा तिच्या हातात पाणी देऊन "रामाला साक्ष ठेवून मी असे कबूल करते की माझी मुलगी मी गरिबाला देईल" हे शब्द तिला बोलायला लावून सर्वासमक्ष पाणी सोडवले. लगेच मुलगी कोणास द्यायची असे तिने विचारले.  
हा सर्व प्रकार चालू असता कुरुंदवाडचा तरुण भटजी निळकंठ जोशी येऊन श्री महाराजांच्या पाया पडला. ते म्हणाले, "बाई, याला तुमची मुलगी द्या."  नंतर एकमेकांनी एकमेकांची नावे, गावे व पत्ते विचारून घेतले. बाई मुलीला घेऊन बागलकोटला गेली.  निळकंठ कुरुंदवाडला गेला.  मुलीच्या अंगावर नायटे उठण्याचे बंद झाले व ती चांगली सुधारली. काही दिवस गेल्यावर आईबापांच्या मनात विकल्प आला. श्रीमहाराजांना दिलेल्या वचनाचा विसर पडला आणि ते दुसऱ्या मुलाचा शोध करू लागले. परंतु लगेच मुलीच्या अंगावर पुन्हा नायटे येण्यास आरंभ झाला. मग मात्र आईबाप घाबरले.  निलकंठास पत्र लिहून लग्न ठरवले आणि पंधरा दिवसात उरकून टाकले. पुढ निळकंठाची परिस्थिती सुधारली आणि त्यांचा संसार चांगला झाला.

बागलकोटचे ते सुखवस्तू कुटुंब म्हणजे श्री मोडक यांचे. त्यांच्या मुलीचे नाव कृष्णाबाई.
निळकंठ जोशी यांची गोष्ट अशी की गोवा प्रांताकडील मूळचे रहिवासी असेलेले नीलकंठ जोशी यांची श्रीमहाराजांशी प्रथम भेट कागवाड येथे झाली होती. पोर्तुगीज सरकारच्या काळात नीलकंठ यांची जमीन, मालमत्ता, त्या सरकारने काही कारणाने सरकारजमा केल्याने जोशीं यांना गोव्यातून परागंदा व्हावे लागले. ते गोंदवले येथे एकदा आले असतांना श्रीमहाराजांनी त्यांची विचारपूस केली त्यावर जोशी यांनी मी झोळी फिरवतो असे उत्तर दिले.
या विवाहाच्या संमतीची वेळ आली तेव्हा श्रीमहाराज हर्दा येथे होते. मोडक यांनी नीलकंठ व कृष्णाबाईचा विवाह करावा असे पत्राने त्यांना कळवले. श्रीमहाराजांनी संमती दिली आणि हा विवाह १९१२ साली झाला.
श्रीमहाराजांची आणि नीलकंठ यांची नंतर भेट झाली. तेव्हा त्यास त्यांनी राममंदिर बांधून श्रीरामनामाचा प्रचार करण्यास सांगितले. तसेच काशी ते रामेश्वर यात्रा करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे नीलकंठ मातोश्रीस घेऊन सपत्नीक काशीस गेला. तेथील मुक्कामात १९१४-१५च्या सुमारास जयपूर येथे जाऊन श्रीराम-सीता-लक्ष्मण यांच्या मूर्ती पाहिल्या .


Photo
विवाहानंतर हे दाम्पत्य कुरुंदवाड येथे राहत होते. तेथून त्याने मूर्ती खरेदीसाठी ६०० रुपये मागवले. आणि मूर्ती खरेदी करून कुरुंदवाडला घरी आणून ठेवल्या.
पुढे मंदिर बांधविले व याच मंदिरात १९२९ मध्ये श्रीरामाची स्थापना झाली.या मंदिरात पती-पत्नी दोन वेळा तेरा कोटी रामनाम जप पूर्ण केला. १९४८ साली पु. तात्यासाहेब केतकर या मंदिरात दर्शनासाठी आले होते.

या कृष्णाबाईचा गोंदवल्यातील एक अनुभव असा कि कृष्णाबाई आईसह श्रीमहाराजांच्या दर्शनासाठी गोंदवले येथे गेली होती. कृष्णाबाई स्वयंपाक घरात होती.
तेथे भांडी-कुंडी, इतर सामान पडले होते. श्रीमहाराज अचानक स्वयंपाक घरात आले. कृष्णाबाईस त्यांनी त्या भांड्यामधील एक वस्तू उचलण्यास सांगितले. या मुलीने छोटे उलथणे उचलले.
ते पाहून श्रीमहाराज म्हणाले," तुझ्या मनासारखे होईल. "
पुढे त्यांच्या हातून भरपूर अन्नदान झाले.
सध्या नीलकंठ जोशी यांचे धाकटे चिरंजीव मंदिरात पूजा अर्चा करतात.
**
जय श्रीराम!
संदर्भ: श्रीमहाराज चरित्र, आणि चैतन्य स्मरण विशेषांक
फोटो संदर्भ : गुगल


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...