जय श्रीराम
आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे!या शृंखलेतील पुढची मंदिरे आहेत.
९. शेंदुरजणेघाट राममंदिर १९२३
मु.पो. शेंदुरजणेघाट, ता. वरूड, जि. अमरावती, महाराष्ट्र
जय श्रीराम!

विष्णुबुवा कुंभारे हे मूळचे राहणारे वऱ्हाडातले. यात्रेच्या निमित्ताने ते मोगलाईत गेले असता अंबड येथे त्यांची व आनंदसागर यांची गाठ पडली. आनंदसागर यांनी त्यांना श्रीमहाराजांच्याबद्दल गोष्टी सांगून गोंदवल्यास पाठवले. श्रीमहाराजांना पाहून विष्णुबुवांना आनंदाची उर्मी आली आणि त्यांच्या मनाला विलक्षण समाधान झाले. श्रीमहाराजांनी त्यांना ठेवून घेतले. चार-आठ दिवस राहिल्यावर नित्याच्या व्यवहारांमध्ये देखील सहज प्रकट होणारे श्रीमहाराजांचे ज्ञान व वैराग्य पाहून विष्णुबुवा चकित होऊन गेले आणि आपण त्यांचा अनुग्रह घ्यावा असे त्यांच्या मनाने घेतले. एकदा श्रीमहाराज एकटे आहेत अशी संधी साधून, आपल्याला अनुग्रह द्यावा म्हणून त्यांनी श्रीमहाराजांना विनंती केली. तेव्हा श्रीमहाराज हसले आणि त्यांना म्हणाले, "बुवा, तुम्हाला अनुग्रह झाला आहे ! ना वारे वा ! मागच्या गुरूंना जसे तुम्ही विसरला तसेच मला पण विसराल ! अहो, गुरू म्हणजे थट्टा का आहे ? एखाद्या पतिव्रतेसारखे गुरूशी वागावे लागते. आपला देह त्याला अर्पावा लागतो. एकदा एक गुरु केला म्हणजे दुसरा करू नये." श्रीमहाराजांचे शब्द ऐकून विष्णुबुवांना लहानपणची आठवण झाली. ते सहा-सात वर्षांची असताना एका सत्पुरूषाने त्यांना शिवमंत्र दिला होता. परंतु त्याचवेळी त्याने हे सांगून ठेवले की, "तुला माझे आणि ह्या मंत्राचे लवकरच विस्मरण होईल, नंतर पुष्कळ वर्षांनी श्रीब्रह्मचैतन्य नावाच्या थोर महात्म्याचे दर्शन तुला घडेल. तू त्यांचेपाशी अनुग्रह मागशील तेव्हा तेच तुला माझे स्मरण करून देतील, पण तू त्यांनाच गुरु मान आणि त्यांच्या चरणी चित्त अर्पून त्यांची आज्ञा वेदवाक्य समज. त्याने खात्रीने तुझे कल्याण होईल." विष्णूबुवांनी ही सर्व कथा श्रीमहाराजांना सांगितल्यावर त्यांनी अनुग्रह देण्याचे कबूल केले. श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रह दिला तेव्हा त्यांना शिवमंत्रच दिला. राम आणि शिव या दोघांमध्ये भेद मानू नये असे सांगून रोज स्नान झाल्यावर आसनावर बसून शिवमंत्र जपावा आणि इतर वेळी रामनामाचा जप करावा अशी श्रीमहाराजांची त्यांना आज्ञा झाली. हा अनुग्रह झाल्यावर विष्णुबुवांनी मोठ्या चिकाटीने जप केला. तसेच ते द्वादश ज्योतिर्लिंगे आणि इतर मोठी क्षेत्रे पाहून आले.
त्यांचे नामाचे प्रेम पाहून श्रीमहाराजांनी त्यांना दीक्षाधिकार दिला होता. नंतर वऱ्हाड प्रांतात शेंदूरजन घाट येथे मठ बांधून ते राहिले.

श्री विष्णुबुवांनी स्वतःचा सांगली विभागातील सर्वसंग परित्याग करून रामनामाचा वर्हाडांत प्रसार करण्यासाठी शेंदूरजनघाट येथे आले व १९१० मध्ये मठ स्थापन केला आणि रामनामाची उपासना वाढविली. पुढे गावकऱयांच्या मदतीने १९२३ मध्ये राम मंदिर स्थापन केले.
पुढे विष्णुबुवांनी रामभाऊ नावाचे बहिणीचे पुत्रास दत्तक घेतले व त्या नंतर श्री तरार यांचेकडे ते कार्य आले. श्री तरार यांचे नंतर त्यांची सून गं भा. शोभाताई तरार अध्यक्षा म्हणून कार्य पाहत आहे. मुख्य ट्रस्टी श्री उल्हास आष्टीकर मो. न. ९०९६८३४८७० हे आणि श्री अरुण मोघे मंदिराचे बांधकाम, रंगरंगोटी देखभाल इद्यादी पहातात. रामजन्म आणि श्रीकृष्ण जन्म हे उत्सव या मंदिरात होतात.
श्रीमहाराजांच्या त्या काळातील पादुका येथे आपल्याला नतमस्तक होण्यासाठी ठेवलेल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा