जय श्रीराम!
#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे - या शृंखलेत आज आपण बघणार आहोत.
८. कांची समुद्रम् राममंदिर १९२३
पो. कांची समुद्रम, ता. हिंदूपूर, जि. अनंतपूर - ५१५३३१, आंध्र प्रदेश
कांचिसमुद्रम
येथे श्री सीताराम राव या नावाचे गृहस्थ होते. त्यांचे मामा हणमंतराव
बल्लारी तेथे सन १९०८ साली शाळामास्तराचे काम करत होते. एकदां गदगला आले
असतां श्रीमहाराजांचें त्यांना दर्शन झालें. त्या दर्शनाने ते इतके
प्रभावित झाले की कांचीसमुद्रमला परतल्यावर त्यांनी आपल्या सर्व
नातेवाईकांना श्रींच्या दर्शनासाठी गोंदवलेस जा असा आग्रह केला.
त्याप्रमाणे कांचीसमुद्रम् येथील दासा लक्ष्मय्या शेट्टी, श्री कृष्णराव,
आप्पाजी शास्त्री, चीनप्पा रेड्डी यांनी गोंदवल्याला जाऊन सहकुटुंब
श्रीमहाराजांचा अनुग्रह घेतला.
त्यातील दासा लछमय्या - हे श्रीमहाराजांचे निस्सीम भक्त झाले.
महाराजांशी
ते इतके एकरूप झाले की महाराजांनीही त्यांना ' आपला ' म्हणाले असाव. कारण
१९१३ मधे श्रीमहाराजांनी गोंदवले येथे जेव्हा देह ठेवला नेमक्या त्या वेळी
इकडे कांचीसमुद्रमला लछमय्या अर्ध्य देत असता त्यांना श्रीमहाराजांचे
साक्षात दर्शन झाले.
लछमय्या यांना संतती नव्हती. श्रींचे दर्शन
झाल्यापासून ते उपासनेत मग्न असायचे. दर गुरुवारी मंडळी कुठेतरी भजन उपासना
करीत असत. उपासकांना एक ठिकाण असावे म्हणून लछमय्या यांनी स्वतःची जमीन
श्रीरामाचे मंदिर बांधण्यासाठी १९२३ साली दान केली. श्रींनी त्यांना पादुका दिलेल्या होत्या. त्या पादुका त्यांनी प्रारंभी छोटसे मंदिर बांधून तेथे पूजेसाठी ठेवल्या, राम मंदिरही बांधले.
त्याला 'ब्रह्मचैतन्य मंदिर' असें नांव दिलें.या मंदिराच्या व्यवस्थेसाठी ट्रस्ट निर्माण करण्यात आला. जी. होनप्पा यांनी ट्रस्टिपद स्वीकारल्यावर मंदिरालगतची आणखी काही जागा खरेदी करून ट्रस्ट ला दिली आहे.
हणमंतराव फार नामनिष्ठ होते. श्रीमहाराजांनी देह ठेवल्यानंतरहि त्यांचें सदेह सगुण दर्शन लछमय्यांना आणि हणमंतरावांना होत असे. पेन्शन घेतल्यावर हणमंतरावांनीं आपला सर्व काळ नामस्मरणांत घालविला.
श्रीमहाराजांच्या चरित्रात आलेली त्यांची एक गोष्ट अशी की , हणमंत मास्तर दरवर्षी गोंदवल्यास येत. एकेवर्षी त्यांचा शेजारी लछमय्या त्यांच्याबरोबर गोंदवल्यास आला.,तो श्री महाराजांना म्हणाला,'मला मारुतीचे दर्शन घडवा.मारुतीराया आपल्या हातामध्ये आहे.'श्री महाराज म्हणाले,'असे वेड्यासारखे काय मागतोस?मारुती म्हणजे कोणी साधा मनुष्य आहे का?त्यांचे दर्शन तुला सहन होणार नाही".काही केल्या लछमय्या ऐकेना.पाच सहा दिवस रोज तो सारखे हेच मागे,एके दिवशी सकाळी तो स्नान करून आला आणि श्री महाराजांच्या पायावर डोके ठेऊन म्हणाला,'हनुमंताचे दर्शन झाल्याशिवाय मी डोके उचलणार नाही.हे ऐकून श्रीमहाराजांनी त्याला आपल्यासमोर डोळे झाकून बसण्यास सांगितले,आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला.एका क्षणात एक प्रचंड तेजाचा लोळ त्याने पाहिला व त्याची शुद्ध गेली.जवळ जवळ एक तासाने तो शुद्धीवर आला तेव्हा 'काय पाहिले'?असे त्याला श्री महाराजांनी विचारले. तेव्हा तो म्हणाला'महाराज काय सांगावे!आपला हात डोक्यावर टेकल्याबरोबर मी एक मोठे तेज पाहिले.त्याच्यात मी बुडून गेलो,आणि पुढे काय झाले मला ठाऊक नाही .श्री महाराज म्हणाले,'भगवंताचे खरे स्वरूप आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे,आपल्या देहबुद्धीला ते सहन होत नाही.आपल्याला इंद्रियांनी ज्ञान घेण्याची सवय असते.म्हणून नाद किंवा प्रकाश रूपाने भगवंताचे दर्शन होते.'परंतु त्या दिवसापासून लछमय्या च्या वृत्तीमध्ये मोठा फरक झाला.त्याचे लक्ष धंद्यावरून उडून नामाकडे गुंतले आणि श्री महाराज हेच देव आहेत या भावनेने तो वागू लागला.
जय श्रीराम
फोटो स्रोत - गुगल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा