बुधवार, २९ जानेवारी, २०२५

 जय श्रीराम!

बहू मंदिरें स्थापिलीं धन्य कीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥

"बहुमंदिरे स्थापियेली" या शृंखले अंतर्गत आपण पाहात आहोत, श्रीमहाराजांनी जागोजागी स्वतः स्थापित केलेली मंदिरे, त्यांचे फोटो, माहिती , व्यक्ती आणि त्या त्या गावी घडलेले, श्रीमहाराजांच्या चरित्रात आलेले प्रसंग.

१४.    गोमेवाडी राममंदिर १९०३
गोमेवाडी, ता. माण, जि. - सातारा, महाराष्ट्र
हे राममंदिर सावळाराम देशापांडे यांनी बांधून दिले.


गोमेवाडीच्या पाटलाची श्री महाराजांवर फार निष्ठा होती.सन १८७२ च्या सुमारास त्याला श्री महाराजांकडून नाम मिळाले होते,त्याने श्री महाराजां शिवाय दुसरा देव मानला नाही, नामाशिवाय दुसरे साधन केले नाही, पादुकांची पूजा केल्याशिवाय कधी अन्न ग्रहण केले नाही.आणि रोज शिऱ्याचा नैवेद्य दाखवल्या शिवाय कधी राहिला नाही, सन १८९७ च्या रामनवमीला श्री महाराजांनी पाटलांना मुद्दाम गोंदवल्यास बोलावले,उत्सव संपुन आठ दिवस झाल्यावर पाटील बाबा परत जाण्यास निघाले, तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले,"पाटील बाबा इतके दिवस गोड खाऊन मला कंटाळा आला आहे, उद्यापासून कांदा भाकरीचा नैवेद्य दाखवीत जा,"पाटलांनी संमत्ती दिली,तेवढयात श्री
महाराजांनी एक नारळ रामरायच्या पायाला लावून त्यांच्या पदरात टाकला व म्हणाले  हा नारळ देवाच्या शेजारी ठेऊन द्यावा, मी तुमच्याकडे आलो  म्हणजे फोडीन,"काही दिवस गेल्यावर पाटील बाबांची परिस्थिती खालावली, इतकी की कांदा भाकर खाऊन राहायची पाळी आली, मनुष्य मोठा समाधानी व उपासक असल्यामुळे त्या स्थितीत ही तो आनंदाने राहिला, काही वर्षाने परिस्थिती सुधारली.त्याने प्रपंच मुलांन कडे सोपवला व स्वतः स्वस्थपणे नामस्मरण करीत काळ कंठू लागला ,पुढे पाटील बाबांना ताप येऊ लागला,चार सहा दिवस त्याला ताप येत होता,पण घरात हिंडत फिरत असल्यामुळे घरातील कोणाला काही  विशेष वाटलं नाही,सातव्या दिवशी एकदम त्यांची वाचा बसली,आणि मग सर्वजण धावपळ करू लागले, वैद्या ने मात्रा दिली,तेव्हा शुद्धीवर येऊन पाटील बाबा म्हणाले,"अरे बाळांनो,राम मला बोलावतो आहे,महाराज आता येतील ते आले की मला सांगा". 

इकडे गोंदवल्यास त्या दिवशी रात्री नऊ वाजता श्री महाराजांनी नीलकंठ बाबाला घोडा तयार करून आणणेस सांगितले,आणि त्याला घेऊन रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाटलांच्या घरी ते पोचले, त्यांनी पाटील बाबांचे डोके आपल्या मांडीवर घेतले,आणि म्हणाले,"पाटील बाबा मी आलो आहे,आता कशाचीही काळजी करू नये. नामामध्ये रहावे, पाटीलबाबानी डोळे उघडले, श्री महाराजांना नमस्कार केला आणि हृदयाकडे हात लावून म्हणाले, इथे नाम चालू आहे, पण मला एक द्रोणभर दही पाहीजे. वर गेल्यावर स्वर्गात दही मिळेल की नाही कोणास ठाऊक!  त्यावेळी श्री महाराजांनी  पूर्वी दिलेला नारळ फोडला त्यातील पाणी दह्या मध्ये घातले, आणि वाटीभर दही पाटील बाबांना पाजले, त्यानंतर अत्यंत शांतपणे नाम घेत पाटील बाबांनी देह ठेवला, श्री महाराजांनी पूर्ण आशीर्वाद पाटीलबाबा ना दिला,आणि त्यांचा अंतकाळ साधला.

संदर्भ: के वि बेलसरे लिखित श्रीमहाराज चरित्र
***
 

 

१५.    म्हासुर्णे राममंदिर १९०३
मु.पो. म्हासुर्णे, ता. खटाव, जि. सातारा - ४१५५३८, महाराष्ट्र

म्हासुर्णे येथील श्री नारायण कुलकर्णी हे महाराजांचे भक्त असल्याने नियमित गोंदवल्याला जात असत. लग्न करून प्रपंच करण्याआधी रामाचे मंदिर बांधावे असा सल्ला महाराजांनी त्यांना दिला. त्याप्रमाणे जयपूरहून मूर्ती करवून आणल्या.
श्री विष्णुपंत दाजी कुलकर्णी व श्री नारायण कुलकर्णी यांच्या विनंतीवरून श्रीमहाराजांनी मंदिराची पायाभरणी व स्थापना केली. यानंतर श्री शंकरशास्त्री कुलकर्णी ( म्हासुर्णेकर ) यांना मंदिरात उपासना पूजा अर्चा करण्यासाठी महाराजांनी सांगितले.
त्यांचेच वंशज श्री वसंत लक्ष्मण कुलकर्णी (म्हासुर्णेकर) हे आता पूजा अर्चा करतात. मंदिरात महाराजांच्या मत्स्याच्या आकाराच्या देखण्या लाकडी पादुका आहेत. या मंदिराशेजारीच शंकराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचा कळस व शिखर नागफण्यांनी सुशोभित केले आहेत. म्हासुर्णे गाव गोंदवल्यापासून  २०-२२ किमी वर आहे.
*
 

 

महाराजांचा एक बालमित्र होता. म्हासूर्णेकर शास्त्री.  गुरुच्या शोधात जेंव्हा लहानपणी महाराज बाहेर पडले, तेंव्हा कोल्हापूरपर्यंत शास्त्री बरोबर होते. तेथून ते परत आले. एकदा शास्त्री अंथरूणावर बसून तंबाखू खात होते. इतक्यात महाराज खोलीतुन बाहेर आले व शास्त्रींच्याजवळ बसत म्हणाले, 'काढ तंबाखू!' आणि कोल्हापूरहून पुढे कुठे कुठे गेले व काय काय केल ते सांगितले. असे त्यांचे प्रेम होते -एक मित्र म्हणून व दुसरे शिष्य म्हणून. पुढे महाराजांनी त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता. ते रोज सकाळी महाराजांची मानसपूजा करावयाचे. मधे दोन दिवस त्यांची मानसपूजा झाली नाही. महाराज असे सिंहासनावर बसले होते, काही माणसे बसली होती आणि शास्त्रीबुवा खोलीकडून येऊन मारुतीकडे गेले. त्यांना पाहून महाराज लोकांना काय म्हणाले? 'काय करावे शास्त्रीबुवांची दोन दिवस गाठ-भेट नाही!' शास्त्रीबुवानी ऐकले बरं कां! पण लक्षात नाही आले. नंतर मारूतीकडून खोलीकडे जातांना महाराज पुन्हां तसेच म्हणाले 'दोन दिवस झाले शास्त्रुबुवांची गाठभेट नाही! आणि मग शास्त्रीबुवांच्या लक्षात आले.  ते गेले, पुन्हा स्नान केले व मानसपुजा केली. त्यानंतर महाराज मग बोलले नाहीत. हे प्रेमाचे लक्षण आहे. प्रेमामधे अखंड स्मरण आणि तेही इतके सहज असते कीं, बाई गर्भाचे ओझे सहज वागवते तसे परमात्मा हृदयात सहज वागवणे हे प्रेमाचे लक्षण आहे. मग प्रतेक कृती, उठणे-बसणे, खाणे-पिणे त्यांच्या स्मरणात होते.
 संदर्भः ती बाबा बेलसरे यांचे २७-९-१९८२ चे प्रवचने

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

*

प्रासादिक श्लोक
 
शंकरशास्त्री म्हासुरणेकर यांची श्रीमहाराजांच्या ठिकाणी फार निष्ठा होती. म्हासुरणे गावी रामाचे मंदिराजवळ त्यांचा मठ आहे. काव्यनाटकादी पढलेले शास्त्रीबुवा मोठे भाविक व सात्विक वृत्तीचे होते. पुराण सांगण्याची त्यांची शैली अति रसाळ असून ते चांगल्यापैकी साधक होते. श्रीमहाराजांचे त्यांच्यावर फार प्रेम होते, इतकेच नव्हे तर श्रीमहाराजांनी अनुग्रह देण्याचाही अधिकार त्यांना दिला होता. परंतु ते खऱ्या शिष्यपणाने वागत. फार थोड्या लोकांना त्यांनी स्वतः अनुग्रह दिला.  त्यांच्याकडे त्यासाठी कोणी आल्यास त्याला ते श्रीमहाराजांकडे पाठवून देत. 

एकदा शास्त्रीबुवा स्वस्थचित्ताने नामस्मरण करीत बसले होते. मनामध्ये सहज श्रीमहाराजांचा विचार आला. विचारावरून विचार वाढत गेला आणि आपल्याला भगवंताच्या मार्गांवर घालण्यामध्ये श्रीमहाराजांनी केलेले डोंगराएवढे उपकार शास्त्रीबुवांना आठवले.  त्यांच्या डोळ्यांना अश्रू धारा लागल्या आणि आपण श्रीमहाराजांची काही स्तुती करावी असे त्यांना मनापासून वाटले.  परंतु त्यांना कविता करण्याची शक्ती नव्हती. या गोष्टीचे त्यांना इतके वाईट वाटले की दिवसभर ते अगदी उदास व निराश राहिले. रात्री नित्याप्रमाणे भजन व आरती आटोपून ते झोपले. झोपायच्या अगोदर त्यांनी श्रीमहाराजांचे ध्यान केले आणि काही सेवा घडावी अशी अत्यंत काकुळतीने प्रार्थना केली. पहाटेच्या सुमारास शास्त्रीबुवांना स्वप्न पडले ते असे;  

श्रीमहाराज सिंहासनावर बसले होते. पितांबर नेसून शास्त्रीबुवा सर्व पूजासाहित्य घेऊन आले. त्यांनी श्री महाराजांची यथासांग पूजा केली. नंतर हात जोडून स्तुती करण्यासाठी म्हणून ते समोर उभे राहिले व लगेच एकामागे एक असे सहा श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडले. इतके होते तो त्यांना जाग आली. श्लोक कदाचित विसरून जातील म्हणून शास्त्रीबुवांनी आधी ते लिहून काढले व मग नित्याच्या व्यवसायास आरंभ केला. पुढे त्यांच्या मनात आले की या सहा लोकांमध्ये आणखी दोन श्लोकांची भर घालून अष्टक बनवले तर उत्तम होईल. म्हणून डोके खाजवून खाजवून त्यांनी दोन नवीन श्लोक तयार केले व ते अष्टक पूर्ण केले.  काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली व शास्त्रीबुवा श्रीमहाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्यास गेले. झालेली हकीकत सांगून श्लोकांचा कागद त्यांनी श्रीमहाराजांच्या पुढे केला. श्रीमहाराजांनी पेन्सिल मागितली आणि शेवटच्या दोन लोकांवर काट मारीत म्हणाले, "राम देतो तेवढ्या मध्ये समाधान मानायला शिकावे. रामाचे देणेच तेवढे हिताचे असते,  आपले देहबुद्धीचे लोढणे त्याच्याखाली जोडू नये." या शब्दाचे मर्म फक्त शास्त्रीबुवांच्याच लक्षात आले.
***

१६.    विटा राममंदिर १९०३
घर नं. ५९०, नाथ गल्ली, नाथमंदिराशेजारी, विटा, जि. सांगली, ४१५३११, महाराष्ट्र

या मंदिराबद्दल तेथील गुरुजी श्री महेश देशपांडे यांच्याकडून नुकतीच समजलेली गोष्ट अशी की त्यांचे आजोबा श्री संभाजी देशपांडे कीर्तनकार होते आणि नेहमी या मंदिरात कीर्तनाला जायचे. सुरवातीला इथे फक्त एक हॉल होता. त्यांना हे इथल्या एक आज्जी श्रीमती कृष्णाबाई पाठक या ८२ वर्षापर्यंत महाराजांकडे जात होत्या, त्यांनी हे मंदिर चालवायला दिले. त्या आज्जी अजाणूबाहू  होत्या. त्यांची फार इच्छा होती कि इथे राम मंदिर व्हावे.. रामाच्या मूर्ती जयपूरहून मागवल्या होत्या. त्यातील सीतामाईची मूर्ती क्षितीग्रस्त झाली म्हणून दुसरी मूर्ती नाशिकहून मागवली गेली. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्या मूर्ती स्थापनेसाठी 

 

श्रीमहाराज येणार हे त्या आज्जींनी कोणाला कळू दिले नव्हते. पण तिथे एक आंधळे आजोबा श्री पुरुषोत्तम देशपांडे यांना अंतर्ज्ञानाने समजले होते कि श्रीमहाराज येत आहेत. त्यांनी मदतनीस लोकांना लगेच श्रींच्या बैठकीची व्यवस्था करायला सांगितली.  १९०३ मध्ये श्रीमहाराजांच्या हस्ते रामाची स्थापना झाली. श्रीराम लक्ष्मण, सीतामाईच्या मूर्ती अतिशय देखण्या आहेत. स्थापनेच्या वेळी महाराजांनी आणखी एक अत्यंत रेखीव अशी राम-सीतेची लाकडी मूर्ती दिली होती, ज्यात सीतामाई रामाच्या डाव्या मांडीवर बसली आहे. या मूर्तीची उत्सवाच्या वेळी पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. तसेच स्थापनेच्या वेळी श्रीमहाराजांनी एक शंख आणि शाळुंका म्हणजे एक शिवलिंग दिले आहे.  
श्री महेश देशपांडे यांनी इथे आता मोफत निवासी, अनिवासी वृद्धाश्रम आणि गोशाळा सुरु केलेली आहे. ध्यान मंदिराचे बांधकाम सुरु आहे. तिथे श्रींची पितळी मोठी मूर्ती बसवण्यात आली आहे.

संदर्भ: मंदिराचे गुरुजी श्री. महेश देशपांडे

 

 













**

जय श्रीराम
संकलन: महाराज कन्या


 जय श्रीराम!

बहू मंदिरें स्थापिलीं धन्य कीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥

"बहुमंदिरे स्थापियेली" या शृंखले अंतर्गत पुढची मंदिरे खालीलप्रमाणे

मांडव कर आणि गिरवीकरांबद्दल श्रीमहाराजांना विशेष प्रेम होते. 

९. मांडवे राममंदिर, मांडवे ( १९०१ )
श्रीराममंदिर, मौजे - मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर - ४१३१०९, महाराष्ट्र

मांडवे येथील राममंदिर - विष्णुकाकांनी बांधले व स्वत: चालविले.

 

 

मांडवे येथे श्रीमहाराज

मांडवे येथे रामराया

राम मंदिर, मांडवे

मांडवे येथील दत्तमूर्ती

गिरवी राम मंदिर

१०. गिरवी राममंदिर, गिरवी (१९०१ ) -
मु.पो. गिरवी, ता. माळशिरस, जि. सोलापूर - ४१३१११, महाराष्ट्र
हे राममंदिर येसूकाकांनी बांधून दिले.
गिरवी येथील श्रींच्या काही आठवणी पाहुया.

श्री. यशवंत नरहर कुलकर्णी उर्फ येसुकाका यांनी आपल्या बारा वर्षाच्या नातवाला पंढरपूरला शिक्षणासाठी ठेवले होते. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीचा परिणाम मुलाच्या मनावर झाला आणि तो परागंदा झाला. येसूकाका श्रीमहाराजांचेकडे गेले व त्यांनी सर्व हकिकत त्यांना सांगितली. श्रीमहाराज म्हणाले, 'काळजी करण्याचे काही कारण नाही, तुमचा नातू लवकरच सापडेल.' नातू माहुली येथे सापडला. येसुकाकांनी नातवाला लगेच श्रीमहाराजांकडे आणले. मुलाला पाहताच श्रीमहाराज म्हणाले, 'माझा नातू आला; पुरण पोळी करा.'

 

 


गिरवी येथील श्रींच्या पादुका

श्रीमहाराजांना नमस्कार करताच त्यांनी त्याला आपल्या जवळ बसवून त्याला उपदेशपर चार गोष्टी सांगितल्या व अनुग्रह दिला, आणि येसुकाकांकडे वळून ते म्हणाले, 'त्याचेकडे तुमचे घरातील कारभाराची किल्ली द्या; आता तो कोठे जाणार नाही.'
हा पळून जाणारा नातू म्हणजे कै. काशीनाथ नरहर कुलकर्णी उर्फ सरदार गिरवीकर. हे पुढे गोंदवले संस्थानचे पंच होते.
🌿 ~ चैतन्य - स्मरण १९८८ मधील  पंढरीनाथ काशिनाथ कुलकर्णी यांच्या लेखातून
**
श्रीमहाराजांच्या चरित्रातील एक गोष्ट

श्रीमहाराराज गिरवीस असतां सरदार पोतनीस आपले नवे जांवई अण्णासाहेब आंबेगांवकर यांना घेऊन दर्शनास आले. अण्णासाहेब पंचवीस वर्षाचे तरूण व पुष्कळ इंग्रजी शिकलेले असल्यानें,  देवावर जरी त्यांची श्रद्धा होती तरी साधुसंतांच्यावर नव्हती. म्हणून आरंभापासूनच ते श्रीमहाराजांच्याकडे साशंक द्दष्टीनें पहात होते. दर्शन व स्नान झाल्यानंतर जेवणासाठीं पानें वगैरे मांडण्याची तयारी सुरू झाली. तेव्हां श्रीमहाराजांनीं स्वतः पानें मांडण्यास आरंभ केला. त्यांची प्रत्येक हालचाल अण्णासाहेब अगदीं बारीक नजरेनें बघत होते.

गिरवी येथील राम मूर्ती 

 

श्रीमहाराज पानें मांडून लागल्यावर ते मनांत म्हणाले, 'अरे, हें काय? हे एवढें मोठे साधु आहेत, आणि असलीं हळकुंडे कामें करतात!  हा कसला साधुपणा बुवा! ' जेवणें आटोपल्यावर सर्व मंडळींनीं विश्रांति घेतली. दुपारीं चार वाजून गेल्यावर पोतनीसांनीं श्रीमहाराजांना आपल्याकडे चहा-फराळासाठीं बोलवून आणलें . सर्व मंडळी बसली असतां "नवे जावई" म्हणून त्यांच्या सासऱ्यानें अण्णासाहेबांना आणून मुद्दाम श्रीमहाराजांच्या शेजारीं बसविलें. आपल्याकडे कोणाचें विशेष लक्ष नाहीं,  असें पाहून श्रीमहाराज हलक्या आवाजानें अण्णासाहेबांच्या कानांत बोलले, 'जेवणाची पानें मांडणें,  झाडून काढणें,  ही हलकीं कामें  मी करीत असतों'. 

गिरवी येथे श्रीमहाराज

ज्या शब्दांत त्याच्या मनांत तो विचार आला होता तेच शब्द श्रीमहाराज त्यांच्या कानांत बोलले, तेव्हां अण्णासाहेब फार चकित झाले, आणि श्रीमहाराजांच्याकडे पहाण्याची त्यांची द्दष्टीच एकदम बदलली.
संदर्भ: श्रीमहाराज चरित्र
*

गिरवी मारुती

 ***

 ११. यावंगल राममंदिर, ( १९०१ )
पो. यावंगल, ता. रोण, जि. गदग, ५२८१०१, कर्नाटक
दत्तमंदिर - यावंगल १९०१
पो. यावंगल, ता. रोण, जि. गदग, ५२८१०१, कर्नाटक

यावंगल श्रीराम मंदिर    
या मंदिराबद्दल पु. ब्रम्हानंद बुवांच्या चरित्रात कथा आली आहे ती अशी.
  श्रीमहाराज गोंदवलेहून निघाले ते पंढरपूर, सोलापूर, विजापूर यामार्गे मल्लापूर स्टेशनवर उतरले. तेथें आगाऊ तयार ठेवण्यांत आलेल्या बैलगाडीतून यावलगलला गेले. यावगल गांवी शिवदीक्षित या नावाचे एक सुखवस्तु, घरंदाज, श्रीमंत गृहस्थ रहात होते. यांच्या घरांत, पूर्वीपासून पिशाच्चबाधा होती. त्याच्या निवारणार्थ त्यांनी बरेंच उपाय करून पाहिले, परंतु त्रास कांहीं कमी होत नव्हता. त्याची व श्रीब्रह्मानंदबुवांची गांठ पडल्यापासून त्यांच्यावर त्याची विशेष भक्ति जडली होती. पु बुवा  वरचेवर त्यांच्याकडे जात असत. एका खेपेस शिवदीक्षितांनी श्रीब्रम्हानंदांस  पिशाच्च बाधेचे निवारण करण्याची विनंति केली. श्रीब्रम्हानंदांनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे श्रीमहाराजांस शरण जाण्यास सुचविले व एका खेपेस स्वतः गोंदवल्यास जातेवेळी शिवदीक्षितांस बरोबर नेऊन श्रीमहाराजांच्या पायांवर घातलें.
    

यावंगल शिवमंदिर

 

श्रीमहाराजांनीं शांतपणे त्यांची सर्व हकीगत ऐकून घेतली व त्यांना श्रीदत्तगुरूंची व श्रीरामरायाची प्रतिष्ठापना करून भक्तिभावाने त्यांची सेवा करा, म्हणजे सर्व बाधांचे निवारण होईल, असें सांगितले. लागलीच त्या भाविकाने, "आपणच तेथपर्यंत येऊन आपल्या हातानें प्रतिष्ठापना करावी", अशीं तळमळीने विनंति केली. तेंव्हा श्रीमहाराजांनीं, "आधीं देऊळ तयार करा, पुढें मला तिकडे यावयाचे आहे. तेंव्हा तुमच्या इच्छेप्रमाणें करूं", असें म्हणून अभय दिले. शिवदीक्षित संतुष्ट झाले व श्रीमहाराजांची आज्ञा घेऊन गांवी गेले.
     

 

 

 

 

यावंगल महाराजांच्या पादुका

शिवदीक्षितांनी आपल्या घराजवळच्या स्वतःच्या जागेतच श्रीब्रम्हानंदांच्या सल्ल्याप्रमाणे सुंदर मंदीर बांधले. श्रीदत्तदिगंबराची मूर्ति व श्रीपट्टाभिरामाची मूर्ति अशा दोन्हीं मूर्ति आणवून ठेवल्या. याच शिवदीक्षितांस पु बुवांनी श्रीमहाराजांस बोलावण्यास पाठविल्यानें जातांना मूर्तींच्या प्रतिष्ठापनेची सर्व सिद्धता करूनच ते गेले होते.
     म्हणूनच तर, श्रीमहाराज यावगलला येतांच शिवदीक्षितांच्या घरीं गेले. तेथें दोन दिवस मुक्काम करून, प्रतिष्ठापना कार्य संपवून त्यांनी त्यांचे मनोरथ पूर्ण केले.

संदर्भ: पू ब्रम्हानंद बुवांचे चरित्र

यावंगल महाराजांच्या पादुका

यावंगल पट्टाभिराम मूर्ती


यावंगल दत्त मूर्ती 



जय श्रीराम!
संकलन - श्रीमहाराज कन्या




 

 

 

 

 

 

 

 

 

 








शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

श्रीराम समर्थ

         एकात्वाची भावना

       


श्रीराम समर्थ

         एकत्वाची भावना

         एकदां एक सरकारी अंमलदार समाधीच्या आवारांत आला. त्या वेळीं उत्सव नव्हता. त्यांनी त्यावेळचे कारभारी रा. येरळवाडीकर-मास्तर यांना बोलावून घेतले. आणि कांहीं किरकोळ स्वच्छतेच्या बाबीवरून ते मास्तरांना अद्वातद्वा बोलून दम देऊं लागले व रागाच्या भरांत, बोलतां बोलतां त्यांनी छडी उगारली. मास्तर स्वभावानें गरीब असल्यामुळें घाबरले; पण त्यावेळीं हा सर्व प्रकार पाहात असलेल्या रा. नारायणराव कुंदापूर यांनीं त्या अधिकाऱ्याला तितक्याच मोठ्या आवाजांत खाजगी आवारांत येऊन तशी भाषा न वापरण्यबद्दल बजावलें.  शेवटी त्या धिकाऱ्याला आपली चूक कबूल करावी लागली.

        मास्तरांनीं त्याचें फार कौतुक केलें. कारण मास्तर व नारायणराव कांहीं वैयक्तिक कारणावरून एकमेकांशीं बोलत नसत. अशा रीतीनें आपआपसांत कितीहि मतभेद असले तरी ति़ऱ्हाइतांशीं वागतांना सर्व एकत्वाची भावना असे.

संदर्भः श्रीसमर्थ सद़्गुरू संस्थान गोंदावले प्रकाशीत श्रीब्रह्मचैतन्य सुवर्ण महोत्सव ग्रंथ १९६३ यातील डा वा रा अन्तरकर यांचा लेख पान १०
श्रीप्रसाद वामन महाजन
******
श्री नारायण कुंदापूर यांची आणखी एक माहिती म्हणजे
श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या अभंगावर आधारित ' श्रीचैतन्यगाथा '  हा अभंगसंग्रह मालाडचे जेष्ठ साधक डा वा रा अंतरकर यांनी संपादित करुन १ जुलै १९७७ रोजी प्रसिद्ध केला.  ह्या पुस्तकाला प्रा के वि बेलसरे यांची प्रस्थावना लाभली आहे. ह्या पुस्तकाच्या सम्पादकाचें निवेदन ह्या सदरात श्री अंतरकर लिहीतातः

         'हा अभंगसंग्रह मुख्यत्वेंकरुन श्रीक्षेत्र गोंदवलें येथील श्रीमहाराजांच्या समाधीचे एका वेळचे पुजारी कै.अंनत कृष्णाजी कुळकर्णी ऊर्फ अण्णा पुजारी यांचे जवळ असलेल्या संग्रहावर आधारलेला आहे. त्यांनी तो संग्रह श्रींचे एक भक्त कै.वामनराव ज्ञानेश्वरी यांनी लिहून ठेवलेल्या अभंगावरून तयार केलेला होता. त्याचे वर्गीकरण श्रींचे दुसरे एक भक्त कै. नारायण कुंदापुर यांनीं केलेलें होते. त्याशिवाय, कै. ल रा पांगारकरांनी ' मुमुक्षू' त श्रींचे म्हणून छापलेले अभंग तसेच भैयासाहेब मोडक [इंदूर], भीमराव गाडगोळी[गदग], तसेच हरिपतमास्तर [सांगली], गोंदवले देवस्थानांतील ग्रंथसंग्रहात असलेली वही, साठेबाई[गोंदवले], व बापुसाहेब साठये [पुणे], यांचे खाजगी संग्रहात जे श्रींचे अभंग म्हणून सांपडले त्या सर्वांचा आम्हीं हा संग्रह तयार करताना उपयोग केला आहे.'

               ***
संदर्भ : श्रीप्रसाद वामन महाजन यांची पोस्ट

 जय श्रीराम! 


मथुताई मोडक :
यांच्याबद्दलची ती कथा आपण ऐकलेली आहेच.

श्रीमहाराज गोंदवल्यास असताना तिथे मथुताई मोडक नावाची एक ७-८ वर्षाची मुलगी होती. ती श्रीमहाराजांना "मला नाम द्या" असा हट्ट धरून बसली . तेव्हा श्रीमहाराज म्हणाले "बाळ तू अजून लहान आहेस, तू मोठी झालीस कि मी तुला नक्की नाम देईन". पुढे श्रीमहाराजांनी देह ठेवला. ती मुलगीही मोठी झाली तिचे लग्न झाले .तिचे सासरचे नाव शारदाबाई भागवत असे होते.

एक दिवस श्री तात्यासाहेब पेटी घेऊन मंडलेश्वरला गेले होते तिथे त्या शारदाबाई आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय साधारण २५ ते २६ होते . श्रींचे प्रवचन संपले व त्यांनी हाक मारली "मथुताई इकडे या" .त्या बाईंना आश्चर्याचा धक्का बसला.  इतक्या वर्षानंतर आपल्याला माहेरच्या नावाने कोण हाक मारत आहे ? तिने पाहिले तर श्रीमहाराज (वाणीरूप ) तिला बोलावीत होते.

ती जवळ आली . तेव्हा श्री म्हणाले " बाळ तुला नाम द्यायचे राहिले होते ना ? ते मी तुला आता देतो . " मथुताई उर्फ शारदाबाई आनंदाने गहिवरून गेल्या. हे सर्व खरोखरीच विलक्षण होते !
***
याची गोष्ट अशी कि या मथुताई म्हणजे महाराजांचे इंदोर येथील परम शिष्य श्री भैय्यासाहेब मोडक यांच्या धाकट्या वहिनी कै. सीताबाई मोडक सेवा करण्यासाठी इंदूरहून गोंदवले इथे येऊन राहात असत.  त्यांची कन्या मथुताई म्हणजे विवाहोत्तर श्रीमती शारदाबाई भागवत.
श्रीमहाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली जी काही थोडीफार मंडळी होती त्यांच्यातील त्या एक.
डॉ मुकुंद गोडबोले यांना आणि त्यांच्या पत्नीला १७/०८/ २००२ रोजी लिहिलेल्या एका पत्रात मथुताई (त्यांचे वय त्यावेळी ९७ होते) म्हणतात, कि  ,"  आपण सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करतो. तेव्हा देवाला प्रार्थना करावी कि,-" देवा मी आता या देहाचे विकार आपल्याला अर्पण करतो त्याचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हा देह मी नाही, मी चैतन्य ब्रह्मपरमात्मा आहे. स्वयंप्रकाश आहे. सर्व शरीराचा साक्षी आहे."
पुढे आपल्या शरीरात जे सर्व गुण आहेत ते मी आपल्याला अर्पण करतो. जशी श्रीसृष्टीत पंचमहाभूते आहेत तशीच या शरीराच्या आत पण आहेत, जे भयंकर असतात , ते या मनाला अडकवतात. हे सर्व गुण देवाला देऊन अर्पण करावे. मी सतचित आनंदरूप आहे. आता हे ब्रम्हाचे गुण आहेत. आता देहाचे गुण तन, मन, धन, काया ,वाचा, मन बुद्धी, अहंकार, काम, क्रोध, मद , मत्सर, द्वेष, बुद्धी, सुख, दुःख तर हे सर्व गुण आपल्याला पुढे सरकू देत नाहीत. म्हणून हे सर्व गुण रोज देवाला अर्पण करावे.
संदर्भ: चैतन्य स्मरण विशेषांक २००२
***
श्री राम बाई, खेडीघाट

महान रामभक्त रामबाई यांची समाधी नर्मदाकाठी खेडीघाट येथे आहे. समाधीपासून थोड्या अंतरावर एक पुरातन मंदिर आहे. तिथे राम, लक्ष्मण, सीताजी यांच्या मूर्ती आहेत.
राम बाई यांच्या जीवनाबद्दल फारशी माहिती नसली तरी त्यांच्या चरित्र पुस्तिकेत दिले आहे त्याप्रमाणे, त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात इ.स. १८३१ मध्ये यजुर्वेदी ब्राम्हणाच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव रेवाबाई. ८ व्या वर्षी विवाह झाल्यावर २ महिन्यातच पतीचे निधन होऊन त्या विधवा झाल्या. त्यांचा संपूर्ण परिवार दुःखात होता त्याच वेळी एक सत्पुरुष फिरत फिरत  त्यांच्या गावी आले. त्यांचे नाव   कामळे बुवा असे लिहिले आहे. रेवाबाईच्या आईवडिलांनी या सत्पुरुषाला घरी आमंत्रित केले आणि रेवाबाईची करुण कहाणी त्यांना विदित केली. त्या सत्पुरुषाने रेवाबाईंना अनुग्रहित केले. त्यांची नजर रेवाबाईंवर पडल्याबरोबर त्यांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली. त्या अवस्थेत त्या कधी रडायच्या तर कधी हसत बसायच्या.

काही वर्षांनी रेवाबाई बऱ्हाणपूर येथील एका राम मंदिरात राहून रामनामाची साधना करू लागल्या. त्या मंदिरातच त्यांना प्रत्यक्ष रामाने दृष्टांत देऊन सांगितले की मी तुझ्या जिभेवर सतत वास करेन. त्या फक्त 'राम' एवढाच उच्चार करून जप करायच्या. निष्काम भावाने त्यांनी अखंड रामनाम साधना केली.
नंतर त्या नर्मदाकाठी मोरटक्का येथे गेल्या. मोरटक्क्याला एका छोट्या शिवमंदिरात राम बाई पूजा करायच्या. काही वर्षांनी नर्मदेचे पाण्याचा स्तर वाढू लागलातसे रामबाईंनी जवळच असेलल्या शाम साई सदन इथे एका घरात राम मंदिराची स्थापना केली. श्री राम बाईंची एक शिष्या होती. तिलाही राम बाई असेच म्हणायचे. मोरटक्क्याला आल्यावर राम बाईंनी रामनामाचे अखंड अनुष्ठान केले. आणि ९५ वर्षाच्या असताना देह ठेवला. त्यांचे निर्वाण १६ नोव्हेंबर १९२९ मध्ये कार्तिक पौर्णिमेला झाले. एका अनामिक शिष्याने त्यांची तेथे समाधी बांधली.
तेव्हापासून आजवर कित्येक वेळा , नर्मदेला पूर येऊन समाधी जलमय झाली असेल पण अजूनही समाधी शाबूत आहे.
संदर्भ: इतरत्र फेसबुकवरून


 

**
पू बाबा बेलसरे आपल्या एका प्रवचनात निरूपणासाठी घेतलेल्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाबद्दल सांगताना  म्हणतात,
"बघा कसे. महाराज जस म्हणाले माझ्या हाताला कान लावा, नाम ऐकू येत. तसे ते आहे. आणि महाराज एक सांगत. त्या रामबाई म्हणून इंदोरकडे होऊन गेल्या. त्या बाईला काही लिहिता वाचता येत नव्हतं. तर त्या मंदिरात बसायच्या. नामात इतक्या राहिलेल्या. एक गोष्ट विसरलो बघा. कि त्या महाराजांच्या अनुग्रहित होत्या कि काय हे महाराजांना विचारायचं राहिले. बहुतेक महाराजांच्या अनुग्रहित असाव्यात. रामाच्या उपासक . तर त्यांना मनीऑर्डरी यायच्या त्या मंदिराकरता. तर त्या अंगठा करायच्या. सही करता येत नव्हती. अंगठा करायच्या. तर ' श्रीराम ' हा शब्द यायचा त्या अंगठ्याच्या छापामध्ये. काय शरीर भरले असेल बघा. बाई, विधवा बाई. पण काय अभ्यास असला पाहिजे नामाचा. शरीर भरून गेलं त्याने.
म्हणून म्हणाले, ।।विठ्ठल हे काया, विठठल हे छाया माझी मज।। . हि कल्पना फार रम्य आहे बघा. माणूस म्हटलं  कि छाया असणारच. तर छाया याचा अर्थ मूळ आहे तशी छाया. तर म्हणाले माझी छाया विठ्ठल. म्हणजे मी अन विठ्ठल भेदच नाही.  काय अनुभव आहे तुकाराम महाराजांचा. काय चित्तामध्ये भगवंताला साठवलं असेल, कमाल आहे बुवा.  गंमत म्हणजे जिथे देह जाईल तेथे छाया जाणारच. छाया नाही असे शक्यच नाही. तसे मी आणि विठ्ठल वेगळे राहूच शकत नाही.
बैसला विठ्ठल जिव्हेचीया माथा. हे मर्म आहे त्याच. जिव्हेचीया म्हणजे जिभेच्या शेंड्यावर विठ्ठल बसला आहे. म्हणजे विठ्ठलशीवाय मी बोलत नाही काही. दुसरे बोलणेच नाही काही.".
****
जय श्रीराम!
संकलन - महाराजकन्या






मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

जय श्रीराम

मानस- साधनामंदिर परिसर 


यावेळी पुण्यतिथी उत्सवाच्या २ दिवसानंतर गोंदवले इथे गेलो होतो. १ तारखेला नवीन वर्षाचे श्रीमहाराजांचे दर्शन घेऊनच परत आलो. या चार दिवसात २-३ दिवस अखंड साधनामंदिरातच घालवले. तेव्हा आलेले अनुभव गोष्टीरूपात मांडले आहेत. संध्याकाळ झाली, उन्हे उतरणीला आली कि बाजूच्या बंधाऱ्याला लागून असलेल्या असंख्य चिमण्यांचा चिवचिवाट सुरु होतो ते थेट अंधार पडेपर्यंत. त्यावर सुचलेले हे काही:
**


"  चिव चिव चिव चिव... " ए, शुक शुक .. तिकडे पाहिलंस का? ते लोक बघितले का आतमध्ये? असे का शांत बसले असतील ग? " एक चिमणी नामसाधना मंदिराच्या खिडकीत बसून मान तिरकी करून आत पाहात उद्गारली.
"काय कि बाई, रोजच बसतात हे लोक आणि विशेष म्हणजे तास न तास बसतात. नाहीतर मनुष्यप्राणी असा स्वस्थ बसलेला पाहिलंय का कधी? " दुसरी चोचीतली बारीक काडी खिडकीच्या काठावर ठेवून म्हणाली.
"आणि बघितलेस का? त्यांच्या हातात माळा असतात... आणि सारखे काहीतरी पुटपुटत असतात. मला तर नवलच वाटते बाई हे" - इति पहिली चिमणी.
"हो ग! पण या मोठ्याच मोठ्या खोलीच्या मध्यभागी असलेला तो मोठा फोटो... त्यातील ते सत्पुरुष पाहिलेस का? काय समाधान लाभते त्यांच्याकडे पाहिले कि! " - दुसरी चिमणी .
" खरंच कि ! आणि कुठल्याही खिडकीतून बघ... आपल्याकडेच लक्ष आहे त्यांचे असे वाटते. असं वाटत त्यांच्याकडे बघतच बसावं. किती प्रेमळ भाव आहेत चेहऱ्यावर , काय करुणा आहे ग त्यांच्या नेत्रांमध्ये." - पहिली चिमणी.

हा संवाद चालू होता, साधनामंदिराच्या खिडक्यांच्या बाहेर कट्ट्यावर बसलेल्या दोन चिमण्यांमध्ये.
***

नामसाधना मंदिराच्या परिसरात असणारा बंधारा.. बंधाऱ्याच्या पाण्यात पाय टाकून उभी असलेली औदुंबर, करंज, बोर, आपटा, बांबू... बाजूला कडुलिंब, गुलमोहर, बुच अशी उंचच उंच झाडे आणि या तरुवेलींवर असलेली अनेकविध पक्ष्यांची वस्ती. पाण्यात सूर मारणारा खंड्या, हळद्या, कावळे, कोकीळ, चिमण्या, पोपट, मैना, बुलबुल, कबुतरे, कलकलाट करणाऱ्या साळुंक्या,  पाण्यात पोहणारी  काळी पांढरी बदके, असा जैववैविध्याने नटलेला हा रमणीय परिसर.. आणि या सर्वात कहर म्हणजे इथे पौर्णिमेव्यतिरिक्त मनुष्याचा कमी असलेला वावर.. तिथली विलक्षण शांतता! उगाच कुठे एखाद्या खंड्याने पाण्यात सूर मारला तर होणारा चुबुक डुबुक आवाज.. अन पाण्यावर उठणारे सूक्ष्म तरंग एवढ्यानेच इथल्या शांततेवर उठणारा किंचितसा ओरखडा उठावा अशी शांतता.  
हि पाण्याच्या आसपासची झाडे म्हणजे त्या पक्षांच्या पिल्लांचे आवडते ठिकाण. पुरेसे पंखात बळ नसलेली अश्या  चिमण्या पिल्लांचा आवडता खेळ म्हणजे त्या पाण्यावर अगदी स्पर्श होईल इतपत वाकलेल्या बांबूच्या झाडावर उड्या मारणे.  पाण्यातल्या त्या आपल्याच मस्तीत पोहणाऱ्या बदकांचे लक्ष नसेल ना तर ती चिमणी पिल्ले पार त्या बांबूच्या टोकापर्यंत येत. मग ती बदके क्वॅक क्वॅक करून त्यांचे लक्ष वेधून घेत आणि रागावून त्यांना मागे जायला सांगत. त्या चिमण्या सकाळी घर सोडतेवेळी पाण्यात पोहणाऱ्या ४-५ काळ्या पांढऱ्या बदकांना पिल्लांवर लक्ष ठेवायला सांगून जात. आपापले पालक आले कि पिल्ले घरट्यात येत  दुपारी जरा चिवचिवाट कमी होई.
उन्हाची काहिली वाढली तर बाजूला असलेल्या मऊसर मातीमध्ये लोळून मृत्तिका स्नान करायचं म्हणजे पिसांवर चढलेले बारीक किडे वैगेरे मातीत पडतात. अन नंतर त्या तळ्यातल्या पाण्यात अंघोळ करायचं प्रशिक्षण आया चिमण्यांनी पिल्लांना आधीच दिले होते. त्यामुळे दुपारचा प्रश्न नव्हता. प्रश्न होता संध्याकाळचा. उन्ह उतरणीला लागली कि पक्षी घरट्याकडे परतू लागत आणि त्या झाडांवरचा किलबिलाट पण वाढायचा.  त्याच वेळी हि पक्षांची सभा भरली होती.


"चिव चिव चिव... मला काय वाटतं माहितीये का?' एक प्रौढ चिमणा पंख उभारून , अंग फुलवून .. पुन्हा पंख मिटून ... घसा खाकरून गंभिरतेने म्हणाला.  तो प्रौढ चिमणा अध्यक्ष होता. त्याने विशेष काही सांगण्यासाठी सभा बोलवली होती.  

"तर आता आपल्या बहुतेकांची पिल्लं १४-१५ दिवसांची होण्यात आली आहेत. डोळे पण उघडले आहेत सगळ्यांनी . तर आपण त्यांना आतापासूनच काही सवयी लावायला पाहिजेत. जसे आमच्या आज्याने लावल्या होत्या या वयात आम्हाला.

" कसल्या सवयी म्हणता ? "एक चिमणी पिल्लाच्या चोचीत दाण्याचा बारीकसा तुकडा भरवता भरवता म्हणाली. " हि पिल्ले दिवसभर घरट्यात उच्छाद मांडतात.. सतत आपलं भूक भूक... ! आम्ही दोघे सूर्योदयास जे घरटे सोडतो ते पन्नास चकरा मारून यांना दाणे भरवायला येतो.  यातच आम्ही थकतो. त्यात घरट्यात परत आल्यावर दिवसभर या पिल्लांची गळून पडलेली पिसे, त्यांनी केलेली घाण, अन्नाचे कण साफ करायचे हि कामे असतातच.  आणि आता काय शिकवायचे राहिले यांना. 

"पहिली गोष्ट म्हणजे नाम घेण्याचे शिकवायचे आहे आपल्या मुलांना. आपल्या सर्वांना माहित आहेच. आपले कान हे आपले विशेष अवयव आहे. त्यामुळे आपल्याला आवाजाच्या सूक्ष्म लहरी , अति सूक्ष्म स्पंदने हि ऐकू येतात. तुम्हाला इथे जाणवले असेलच. या गावाच्या कणाकणात 'श्रीराम जय राम जय जय राम ' हे नाम भरले आहे. बारकाईने ऐकल्यास तुम्हालाही ऐकू येईल. हि बाजूला इमारत दिसते ना तिथे तुम्हाला ती स्पंदने जास्त जाणवतील. तर आपण पक्षांनीही आतापासून " जय श्रीराम, जय श्रीराम" असेच म्हणायचे आहे.

"दुसरे प्रशिक्षण द्यायचे आहे ते प्रदक्षिणेचे . सगळ्या पिल्लांचे पंख आता बऱ्यापैकी मोठे झाले आहेत.. थोडे थोडं उडायला, भिंतीवरून पाण्यात सूर मारायला तुम्ही शिकवले आहेच. त्यांच्या पंखात बळ येण्यासाठी आता त्यापुढचा टप्पा म्हणजे उंचावरून म्हणजे या इमारतींच्याही वरून उडायचे. आज ना उद्या हि पिल्ले आपली सर्वांची घरटी सोडतील आणि स्वतंत्र होतील. त्या आधी हे व्हायला हवं.   तर मी काय म्हणतो.. ते मंदिर दिसते ना... समाधी मंदिर म्हणतात हे लोक त्याला. त्याच्या कळसाला प्रदक्षिणा घालायचे प्रशिक्षण आपण आतापासून पिल्लांना देऊया. .... " इति प्रौढ चिमणा

एक चिमणी तेवढ्यात बांबूच्या टोकाशी गेलेल्या एका पिल्लाला दटावून परत आणत म्हणाली," नाही मी काय म्हणते, खरच आपल्या पिल्लांना काहीतरी शिस्त लावायला पाहिजे आता. ते समाधी मंदिराच्या समोरच्या झाडावरचे कस्तुर पक्षी बघा , कसे नियमाने प्रदक्षिणा घालतात. "

दुसरी चिमणी तिच्या पिल्लाची पिसे साफ करता करता म्हणते, " तुमचे बरोबर आहे. पण त्यामुळे काय होणार हे सांगा आधी. उगाच थकवायचे का पिल्लांना. किती उंचावरून उडावे लागेल माहिती आहे का? इथे आजूबाजूला उंचच उंच असलेलया इमारती, झाडे, मंदिराचा कळस... त्या वायरी, मोबाईल टॉवर या सगळ्यातून वाचवून पिल्लांना उडायला न्यायचे म्हणजे अवघड काम.

प्रौढ चिमणा: याने काय होणार म्हणता? अहो यानेच तर थोडेफार पुण्य आपल्या पदरात पडेल. असं बघा.. आपले आयुष्य इन मिन ४-५ वर्षांचे. त्यात इथे आपण किती सुरक्षित आहोत माहित आहे का? नाहीतर इतर ठिकाणी गेलेल्या चिमण्यांचे किस्से ऐका. मांजरी, बोके, कुत्री, ससाणे, घारी हि मंडळी टपूनच बसलेली असतात आपल्या पिल्लांना खायला.आणि अजून सांगू का? रात्री झोपेत तुमची पिल्ले फांदीवरून , घरट्यातून पडतात का कधी? त्यांची काळजी कोण घेतं? त्यांना खाली पडण्यापासून कोण वाचवते माहित आहे? इथे ज्या सत्पुरुषाची सत्ता आहे ना, ते वाचवतात. हे गाव म्हणजे एका सत्पुरुषाचे गाव आहे. त्यासाठी  कृतज्ञता म्हणून त्यांच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालायची. आणि प्रदक्षिणा झाली कि त्या समोरच्या फांदीवर बसून सगळ्यांनी महाराजांची संध्याकाळची आरती श्रवण करायची आहे.  ती संपली कि मगच आपापल्या घरट्यात परतायचे आहे.

तेवढ्यात एक प्रौढ चिमणी मधेच म्हणते," अगदी बरोबर आहे अध्यक्षांचे. त्या उंच  कळस असलेल्या मंदिराकडे गेला आहात का कधी ?  तिथे आरती झाली कि "श्री अनंतकोटीब्रह्मांडनायक... असा मोठ्याने उद्घोष करतात. त्या गोशाळेतल्या गायी म्हणत होत्या, कि इथे हे जे पूर्वी सत्पुरुष होऊन गेले ना, ते आपल्या या आणि अश्या अनंत ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांचीच अखंड सत्ता इथे आहे. आपल्याला या त्यांच्या पवित्र भूमीत जन्म मिळाला तो सुद्धा त्यांच्या कृपेमुळेच. आपल्याला हे जे इथे अन्न, दाणा पाणी मिळते ते त्यांच्या कृपेने. कारण ते सर्व प्राणिमात्रांची काळजी वहातात. रोज प्रत्येकाच्या मुखात अन्नाचा कण गेला आहे कि नाही हे ते आतासुद्धा पाहतात. म्हणूनच तर इथे कोणी उपाशी झोपत नाही. इथे जे गेल्या शतकापासून अन्नदान सुरु आहे ना ते त्यांच्यामुळेच. या सत्पुरुषाच्या कृपेनेच आपणही त्यांच्या घरचे अन्न खातोय. त्याबद्दल थोडीतरी कृतज्ञता म्हणून या प्रदक्षिणा.

" मंडळी... आता असं बघा ! तो चिमणा पुढे बोलू लागला. " आपल्याला पुढचा जन्म उत्तम जीवयोनीमध्ये हवा असेल तर आपणही या सत्पुरुषाने ज्या रामनामाचा आयुष्यभर प्रसार केला ते घ्यायला पाहिजे. आता आपण चिव चिव शिवाय दुसरे काही बोलू शकत नाही पण मनुष्ययोनी ही सर्वात उत्तम योनी कारण वाणीची देणगी या योनीतच दिली असते. आणि मी त्या मंदिरात चाललेल्या प्रवचनात ऐकले आहे कि त्या वाणीने नाम घेऊनच आपण या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटू शकतो.  तो जन्म मिळण्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करायला हवी. म्ह्णून म्हणतो..

तुम्ही समाधी मंदिराच्या समोरच्या झाडावर राहत असलेल्या कस्तुर, साळुंक्या पक्ष्यांना बघितले असेल. ते नित्यनियमाने सायंकाळी कळसाला प्रदक्षिणा घालतात. मंदिराच्या खिडक्यांमध्ये बसून त्या महापुरुषाची आरती ऐकतात,  प्रवचन ऐकतात. एकूण काय तर श्रवण भक्ती सुरु आहे त्यांची. त्यांना पुढचा जन्म निश्चितच मानवाचा आहे. आपण निदान प्रदक्षिणा घालायचे तरी आपल्या मुलाबाळांना शिकवूया. सुरवात थोड्या अंतरापासून , कमी उंचीपासून करू. बोला करायचा असा नियम?

आणि झाडांवरचा किलबिलाट एकदम वाढला. " हो हो, मान्य आहे, जय श्रीराम!.....  जय जय श्रीराम! . " - सगळे पक्षी एका सुरात ओरडले. 


चला तर मग... शुभस्य शीघ्रम! आनंदाने म्होरक्याने एक जोरात शीळ घातली. "आता उन्हे बरोबर या इमारतीच्या तळमजल्याच्या  खिडकीवर आली आहेत. ती लवकरच वरच्या मजल्याच्या खिडकीपर्यंत येतील.  इथून जी समोर दिसते त्या मध्यवर्ती भांडार इमारतीवर एकत्रित जायच. . तिथूनच आपल्याला प्रदक्षिणा सुरु करायची आहे. आणि हो पिल्लांना सांगून ठेवा.. जास्त कलकलाट करायचा नाही.
आणखी ऐका , ३०-३० चिमण्यांच्या थव्यानेच जायचे आहे. पिल्लांच्या क्षमतेप्रमाणे १,३,५,७,९,११ प्रदक्षिणा असतील. सुरवातीला टप्प्याटप्प्याने करणार आहोत. मध्यवर्ती भांडार इमारतीवरून कुर्तकोटी निवास. कुर्तकोटी इमारतीवरून चिंतामणी निवास , मग रामानंद निवास इमारतीवरून प्रल्हाद निवास, प्रल्हाद निवास वरून दोन नंबरचे प्रवेशद्वार. इथवर येईपर्यंत थकल्यास मंदिराला वळसा घालून ब्रम्हानंद मंडपावर येऊन बसायच. नाही तर प्रवेशद्वारावरून पुढे, चैतन्य रुग्णालय असे करून परत तिसऱ्या प्रवेशद्वारावरून तुकामाई निवास या इमारतीवर, तिथून इकडे पाण्याच्या टाक्यांवर असा मार्ग राहील.   
थव्याने जातांना आजूबाजूने ज्येष्ठ, अनुभवी चिमण्या असतील. मध्ये पिल्लांना ठेवायचे आहे. जेणेकरून हवेचा दाब सौम्य होईल.
दमल्यास, थकवा वाटल्यास दक्षिणेला आनंदसागर इमारतीवर नाहीतर पश्चिमेला प्रसादालयच्या बाजूला ज्या दोन उंच पाण्याच्या टाक्या आहेत त्यावर विश्रांती घ्यायची आहे.
समाधी मंदिरात आरतीची घंटा झाली कि समाधी मंदिराच्या समोर असलेल्या झाडावरील एक पक्षी शीळ घालेल आणि आपल्याला आवाज देईल. त्यावेळी सगळ्यांनी ज्या दिशेला असाल तिथून इकडे यायचे आहे. आणि प्रल्हाद इमारतीवर चिडीचूप बसायचे आहे.

 

बरोब्बर उन्हे उतरली सगळे पक्षी पिल्लांना घेऊन कुर्तकोटी इमारतीवर जमतात. आणि " जय श्रीराम " एकच घोष होतो. सगळे एकसाथ मंदिराच्या कळसाला प्रदक्षिणेला सुरुवात करतात.
**


खाली ब्रम्हानंद मंडपात कीर्तनकार बुवांनी निरूपणासाठी नाथांच्या अभंगातल्या ओळी घेतलेल्या असतात.

सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही ।।
आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।।


जय श्रीराम!
महाराज कन्या

 
 

 

 

टीप: वरील कथा संपूर्णपणे काल्पनिक असून.. मनात आलेले विचार कागदावर उतरवले आहेत. कथेचा कोणत्याही जीवित वा मृत व्यक्तीशी संबंध नसून श्रीमहाराजांच्या चरित्रातील प्रसंग/ व्यक्तिविशेष/ ठिकाणे ही प्रसंगानुसार संदर्भासाठी घेतली आहेत.
काही चुकीचे वाटल्यास क्षमस्व!

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...