बुधवार, २६ मार्च, २०२५

 जय श्रीराम! 

आजपासून आपण अभ्यासुया 

#श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे

१. विठ्ठलमंदिर, नरगुंद १९०९

दंडापूर मेन रोड, नरगुंद, जि. गदग - ५८२२०७, कर्नाटक


जय श्रीराम! 

श्रीब्रम्हानंद बुवांनी अद्भूत प्रमाणावर एकंदर तीन नामजपयज्ञ केले.त्यांतील नरगुंदचा जपयज्ञ पहिला. 

श्रीब्रम्हानंद बुवां नेहमी खेडोपाडीं देखील संचार करीत असतं.असेच हिंडत हिंडत ते एकदां नरगुंद गावी गेले.या गावी श्रीब्रम्हानंद बुवांचा भक्तपरिवार मोठा होता.त्यामुळे नरगुंद गांवी त्यांची फेरी वरचेवर होत असे.नरगुंद हे तालुक्यांतील पेट्याचे गांव.संस्थानी अमदानींत हे राजधानीचे गांव होते.तेथील राजे ब्राम्हण होते.त्यांची धर्मावर श्रध्दा होती.जेथील राजा ब्राह्मणा तेथिल राजधानीचे गांवी बहुसंख्य ब्राह्मणवस्ति असावयाचीच.त्या नियमाने येथेही ब्राह्मणवस्ति भरपूर होती.आणि या सर्वाची श्रीब्रम्हानंद बुवांवर फार भक्ति होती.

आपले गांवी श्रीब्रम्हानंद बुवां आल्याची बातमी पसरतांच तेथील सर्व भाविक भक्त त्यांच्या दर्शनास जमले.एके दिवशी दुपारचे जेवण चालले असतां श्रीब्रम्हानंद बुवांनी सहज बोलता बोलता,  "तेरा कोटी जप सुरु करावा म्हणतो.त्यासाठी तुम्ही सर्वजण बेलधडीला येणार ना ?"असे म्हटले. तें ऐकून सर्वांनी एकजुटीने " घरदार सोडून ४/६ महिने बेलधडीस येण्यास आम्हाला कसे शक्य आहे,यासाठी जप येथेच केल्यास ठीक होईल. आम्ही सर्वजण आपल्या आज्ञेप्रमाणे त्यांत भाग घेण्यास व इतर कामे करण्यास तयार आहो." असे विनयपूर्वक सुचविले.

ते ऐकून,श्रीब्रम्हानंद बुवां हसले व "पाहू या.श्रीसद्गुरु नाथांना विचारु या.त्यांची परवानगी मिळाल्यास तुमच्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे येथेंच करु या " असे म्हटले.

त्यावेळी तात्काळ श्रींच्या अनुज्ञैसाठी येथून पत्र लिहावे असा आग्रह धरला. श्रीरामाविषयींच्या त्या ग्रामस्थांच्या मनांतील आस्तिकभाव पाहून पु. बुवा संतुष्ट झाले व त्याच दिवशी तेरा कोटी जपयज्ञास श्रीमहाराजांची अनुज्ञा मिळविण्याविषयी आपल्या नेहमीच्या शिरस्त्यास अनुसरुन श्रीब्रम्हानंद बुवांनी पंढरपुरचे श्रींचे परमभक्त अप्पासाहेब भडगांवकर यांस पत्र लिहिले.

श्रीमहाराजांकडून ब्रह्मानंद बुवांना आलेले आज्ञापत्र अत्यंत मार्मिक,हृदयंगम व बोधप्रद आहे.

ते पु. बुवांच्या कानडी चरित्रकारांना उपलब्ध झाले असल्यानें व त्यांनी ते छापले असल्याने त्यांच्या अनुज्ञेने ते जसेंच्या तसेंच वाचकवृंदांस सादर करीत आहे.

"श्रीरामचंद्रपरायण ब्रह्मानंद योगी यांस.

ब्रह्मचैतन्यबुवा मु.!! इंदूर यांचा अनेक आशीर्वाद.पत्र लिहिणेचे कारण आपला तेरा कोटी जपाबद्दलचा मजकूर अप्पासाहेब यांचे मार्फत कळला.तरी लिहिल्याप्रमाणे हरीपूर येथे करण्यास सुरवात करावी.जरुर जरुर मी काशीहून परत हर्दे मुक्कामी येऊन येथे रामनवमीला श्रीरामाची स्थापना केली व आतां नैमीष्यारण्यांत जाण्याचा विचार आहे. आपल्यास कळवावे.आणि ज्या ठिकाणी तेरा कोटीची सोय असेल त्या ठिकाणी करावां. कृष्णातीर बरे आहे.परंतु आतांचे दिवस घोर कलीचे असल्यामुळे चांगले सत्कर्म कोणतेही शेवटास जाऊं न देण्याबद्दल कलीचा दुराग्रह आहे.तरी त्याचा प्रयत्न न चालण्याचा उपाय तपोबल पाहिजे. शब्दज्ञान,व जगाचे महत्व व निंदा ही दोन्ही उपयोगाची नाहीत.तर तशाचा सहवास करु नये.नास्तिक कुतर्काशीं वाद न करता अहंभाव रहित व्यवहाराचा संबंध न ठेवता,अक्रोध,निर्लोभ,चित्तांत वृत्ति लीन करुन, उपासनारुप जग पहावे.अखंड नाम स्वतः घ्यावे हे आपले कर्तव्य आहे.मी आपणास सांगावे असे नाही.पण सुचनार्थ लिहिले आहे.दुसरे असे.मन चित्तवृत्ति बाह्य नामस्मरण झाल्यावाचून साधनात आळस करुं नये तसेच स्त्रियांचे मुखावलोकन,त्यांचे शब्द,स्पर्श, भाषण,ममत्व,अगत्य,इ.कधी सत्य मानू नये व त्याचे वारे कधी लागूं देऊ नये.असे १३ कोटी होईतोपर्यंत करावे.माझी विनंति आहे.कारण काळ फार भयंकर आहे.तर माझ्या चालीने चालू नका.माझे वेळ काळ कारण वेगळे आहे.तथापि मी अन्य अवस्थीच राहणार अथवा देह सोडणार.कारण आता पुढे धर्म,दया,शांति,भक्ति,नीति कोठे आढळत नाही.सबब सांगून वागा.राम राम अखंड जागा.हा आशिर्वाद."

या प्रमाणे आलेले सद्गुरुनाथाचे आज्ञापत्र पाहून ब्रह्मानंद गुरुंचा आनंद ओसडू लागला.सद्गुरुनाथांच्या आज्ञापत्राप्रमाणे नदी तटाकीं जपयज्ञ करावयाचे श्रीगुरुंच्या मनांत येऊ लागले.नरगुंदला नदी तटाक नसल्याने दुसरे कार्यस्थळ पाहण्याची त्यांस पाळी आली.परंतु नरगुंद येथील भक्त जनांचा नामयज्ञाबाबतचा परम भाव उत्साह पाहून व श्रीमहाराजांच्या "ज्या ठिकाणी १३ कोटीची सोय असेल त्या ठिकाणी करावा " या आदेशाचा आधार घेऊन श्रीगुरुंनी नरगुंदांतच जपयज्ञ करणेचा निश्चय केला.

नरगुंदगावी एक भव्य असे श्री विठ्ठल मंदिर आहे. या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार ब्रम्हानंद बुवांनी केला. तेथेच सगळ्या भाविकांच्या मनांतून जपयज्ञ व्हावा असे असल्याने श्रीशालिवाहन शके १९२३ प्लवनाम संवत्सराच्या आषाढ शुध्द अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत श्रीरामनाम सप्ताहाचा आरंभ करण्यांत आला.आसपासच्या चहूंकडील भाविकांना आमंत्रणे गेली. भाविकांच्या मेळ्यांत सप्ताह थाटाने चालूं राहिला.श्रीगुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रींच्या पादुकांना पंचामृताभिषेक करुन पूजा थाटाने करुन आरती करण्यांत आली.त्या नंतर तेरा कोटी जपाचा संकल्प करण्यांत येऊन सद्गुरु नाथांपुढे श्रीफल ठेवण्यांत आले व त्याच शुभमुहूर्तावर श्रींच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मानंद गुरुंनी स्वतः प्रथम जपास प्रारंभ केला.

जपास बसणाऱ्या अनुग्रहित लोकांना जपाचा नियम समजावून सांगण्यासाठी व परगांवहून जपासाठी येऊन राहणाऱ्या लोकांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणून सुरवातीस एकदोन महिने श्रीगुरुंनी आपला मुक्काम तेथेंच ठेवला. त्यामुळे श्रीक्षेत्र बेलधडी येथील राममंदिरात दररोज काकड आरती,माध्यान्ह नैवेद्य, आरती,सायंभजन आरति अष्टावधान वगैरे प्रकारांनी भगवंताची उपासना ज्या क्रमाने चालते त्याच प्रमाणे चांगल्या रीतीने सुरवात झाली.

या विठ्ठलमंदिरांत रोज शेकड्याने स्त्री,पुरुष,मुले जपाला बसत असत.त्या सगळ्या ंच्या जेवणाची व्यवस्था श्रीगुरुच करीत होते.उत्तरोत्तर जपासाठी येणाऱ्यां लोकांची संख्या वाढू लागली.त्यामुळे अवघ्या ६/७ महिन्यांतच तेरा कोटीची जपसंख्या पुरी होत आली. जपसंख्या आटोक्यांत येताच ब्रह्मानंद गुरुंनीजपयज्ञाच्या सांगता महोत्सवासाठी श्रींना विनंतीपूर्वक बोलावून आणण्यासाठी नरगुंदच्या दोघा भाविकांची रवानगी केली व आपण महोत्सवाच्या तयारीस प्रारंभ केला.


श्रीमहाराजांस आमंत्रण देण्यास गेलेले भाविक ज्यावेळी गोंदवल्यास गेले त्यावेळी श्रीमहाराज भाविकांच्या मेळाव्यांत विराजमान झालेले त्यांस दिसले. श्रीमहाराजांच्या चरणकमलाला भक्तिभावपूर्वक साष्टांग नमस्कार करुन त्यांनी श्रीगुरुंची विज्ञापना त्यांस कळविली . ते ऐकून श्रीमहाराजांनी आपल्यास झालेला संतोष व्यक्त केला व निघण्यासंबधीची आपली संमती दर्शविली. आज निघूं या,उद्या निघूं अशी चाल ढकल करीत पुढे सुमारे दोन महिन्यांनी श्रींनी शेकडो शिष्य परिवारा समवेत तेथून प्रयाण केले.

जपयज्ञाच्या सांगतामहोत्सवास श्रीं येणार असल्याची वार्ता यावेळपावेंतों कर्नाटका च्या कानाकोपऱ्यात पसरली होती.त्यामुळे महिनाभर आधीपासून सुमारे हजार एक लोक जमून राहिले होते.श्री आल्यावर तर जनसमूह ८/१० हजारपर्यंत फुगला असावा.

श्रीमहाराज गोंदवल्याहून निघाले ते पंढरपूर, सोलापूर,विजापूर यामार्गे मल्लापूर स्टेशनवर उतरले. तेथे आगाऊ तयार ठेवण्यात बैलगाडींतुन यावगलला गेले

नंतर बैलगाडीतूनच प्रवास करीत नरगुंदला जाऊन पोचलें.भाविक भक्तांनी उत्साहपूर्वक सर्व गांव तोरणांनी आधींच सजविले होते.रस्त्यावरील धुरळा उडूं नये म्हणून गावांतील रस्त्यावर पाणी शिंपडून ठेवले होते.व त्यावर रांगोळी घालून रस्ते सुशोभित केले होते, श्रींना समारंभांने वाजत गाजत आणण्यासाठी भाविक भक्त भजनीमेळ्यासह गांवाबाहेर एक मैलावर सामोर जाऊन मार्गप्रतिक्षा करत थांबले होते.व इतर लोक गांवापासून तेथपर्यंत दुतर्फा पसरले होते.

 श्रींचे लांबून दर्शन होतांच सर्वांनी एककंठाने जयघोष करण्यास सुरवात केली व त्यांस मिरवीत गावांत उभारलेल्या भाव्य मंडपात आणले.मंडपात मध्यभागी उंच सिंहासन तयार करण्यांत आले होते.त्यावर श्री विराजमान झाले. दर्शनोत्सुक जनसमुहाने अहमहमिकेने श्रींचे दर्शन घेतले.त्या दिवसापिसून श्रीरामरायाच्या घोषाला ना अंत ना पार अशी स्थिती झाली.भोजनाच्या पंक्तीवर पंक्ती उठूं लागल्या.सर्व ज्ञातीच्या लोकांना देखील मुक्तद्वार अन्नसंतर्पण चालू होते.श्रींच्या कडून अनुग्रह घेण्यासाठी तसेच प्रापंचिक दुःखे सांगून त्यावर इलाज विचारण्याची नुसती रीघ लागून राहिली.

 अशा प्रकारे त्या महोत्सवानंदात दोन दिवस गेले नाही तोच गावातील पाण्याच्या तलावांतील पिण्याच्या पाण्याचा सांठा कोठेच नव्हता.अशा स्थितीत ८/१० हजार लोकांना पाणी पुरवठा कसा करावयाचा. अखेर श्रीगुरुंपुढे त्यांनी आपली चिंता व्यक्त करताच ,"  मूर्तिमंत श्री हजर असतांना व श्रीरामनाम अहर्निश चालू असतांना, खुळ्यांनो कसली चिंता करता.पाण्याची कमतरता कशी भासेल". या शब्दांत त्यांचे समाधान श्रीगुरुंनी केले.आकाशाकडे कृपाकटाक्षाने पाहिले.व रोजच्या प्रमाणे अतिउत्साहाने श्रींची पूजा आरती करुन भोजनाची पंगत बसवली.संपूर्ण जेवणावळ आटोपली.आणि चमत्कार असा झाला की,आकाशांत इतके काळे ढग जमले की आकाशच दिसेना.अकस्मात भयंकर पावसास सुरवात झाली.क्षणार्घात पहावे तिकडे पाणीच पाणी दिसू लागले.तळे विहरी भरुन वाहू लागल्या.

 वास्तविक तो माघ महिना होता.पावसाचा यत्किंचित् संभव नव्हता आणि पावसाचे चिन्ह दिसत नसतांना श्रीगुरुंच्या महिम्याने पाण्याची समृद्धि झाली.हे केवळ श्रींचे ठायी असलेल्या ब्रह्मानंद गुरुंच्या दृढ विश्वासाचे फळ.या अद्भूत घटनेने तेथील लोकांचा उत्साह शतगुणित झाला असल्यास नवल ते काय ?

श्रींचा तेथे ८ दिवस मुक्काम होता.सर्वांची जेवणाची व्यवस्था होती.तेथे न जेवणाऱ्यांसाठी तांदूळ,डाळ वगैरे सामान देणाऱ्याचीही व्यवस्था असल्याने सर्वजण संतृप्त झाले होते.समारंभाच्या समाप्तीचे दिवशी ब्रह्मानंद गुरुंनी श्रींचे हस्ते जमलेल्या शेकडो विद्वानांना एकेक महावस्त्र व एकेक मोहोर दक्षिणा देववून त्यांची संभावना केली.व हजारो गोरगरीबांना अन्न,वस्त्र व द्रव्य देववून त्यांना आनंदित केले.अनेक लोकांना बीजमंत्राचा उपदेश श्रींचेकडून देवविला.


जय श्रीराम! 

फोटो स्रोत: गुगल

 जय श्रीराम! 

#श्रीमहाराजांचेज्येष्ठशिष्य

गोंदवल्याचे भूतपूर्व पंच मंडळी!

श्री गोपाळराव कर्वे 

श्री कर्वे १९५६ साली पंच झाले. हे कर्तृत्ववान आणि हुशार होते. शेतीची , बांधकामाची पूर्ण माहिती ते वाचन करून मिळवित आणि त्याचा उपयोग करून घेत. संस्थानाचे हिताविरुद्ध एखादी गोष्ट असल्यास ते तसे स्पष्ट सांगत. 

श्री रामकृष्ण दामले यांच्या अंत्यसमयी श्री गोपाळराव कर्वे हजर होते.

त्यांचेविषयी खालील दोन गोष्टी वाचनात आल्या. 

         सन १९६१ साली जुलै मध्ये पुण्याला पानशेतचा पूर आला. त्यामध्ये पुष्कळ कुटूंबे निराधार झाली. त्यात काही श्रीमहाराजांची अनुग्रहीत मंडळी होती. त्यांचा समाचार घेण्यासाठी श्रीमहाराज मुद्दाम पुण्यास आले होते. [वाणी अवतारात] त्यावेळी श्रीगोंदवले देवस्थानचे ट्रस्टी श्री कर्वे श्रीमहाराजांना भेटले. श्रीमहाराज त्यांना म्हणालेः

         गोपाळराव, ही जी पुण्यावर आपत्ती आली आहे ती दैवी आपत्ती आहे. त्यात कोठल्याही मानवाचा दोष अगर अपराध नाही. अशा दैवी आपत्तीने जी कुटूंबे निराधार व निराश्रित झाली असतील त्यांना टाहो फोडून सांगा की त्या सर्वांनी गोंदवल्यास येऊन राहावे. त्या सर्वांची आश्रयाची वा अन्नवस्त्रांची सोय जरुर करण्यात येईल. श्रीगोंदवल्यास जाण्यास द्रव्य सहाय्यही देण्यात येईल. त्यांनी फक्त श्रीगोंदवल्यास काय जाडेभरडे अन्न मिळेल त्यावर उपजिवीका करुन घ्यावी. व गोंदवल्यास राहिलेल्या काळात त्यांनी होईल तितके नामस्मरण करावे. हे सर्व तूम्ही अगदी माझा निरोप म्हणून टाहो फोडून सांगा. अशा आपत्ती मध्ये आपल्या मंदिराचा जर उपयोग झाला नाही तर त्या मंदिराचे कामच काय?*

         जेवढे लोक जातील ती माहिती मला कळवावी म्हणजे त्यांची व्यवस्था नीट लागते की नाही याची जिम्मेदारी माझ्यावर राहील. 

               *********

संदर्भः श्री बापूसाहेब मराठे यांचे हस्तलिखित

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

       १९६३ हें श्रीमहाराजांच्या पुण्यतिथीच्या सुवर्णमहोत्सवाचे वर्ष. त्यानिमित्तानें श्रीमहाराजांच्या समाधीमंदिरावरील शिखरावर सुवर्णकलशाची स्थापना करावी व त्याच्या पडझड झालेल्या भागांची दुरुस्ती करावी अशा विचारानें श्री. तात्यासाहेबांनीं व देवस्थानच्या पंचमंडळींनीं श्री. हुच्चराव व श्री. अंतरकर यांचेवर तें काम सोपविलें. त्यांनी तें श्री. अण्णासाहेब गाडगीळ यांचे सल्ल्यानें व मदतीनें कारागीर आणून प्रथम नादुरुस्त असलेलें शिखर दुरुस्त करून घेतलें. 

       ता. ४-११-१९६३ रोंजीं शिखरावर [मूळ तांब्याच्या कलशाला सोन्याचें पाणी दिलेल्या] सुवर्णकलशाची स्थापना केली. आदले रात्रीं तो प्रथम थोरले श्रीरामासमोर सभामंडपांत ठेवून मग तो समारंभपूर्वक समाधिमंदिरात आणला गेला. तेथें त्यावर दुधाचा रुद्राभिषेक केला गेला व दुसरे दिवशीं संस्थानाचे दुसरे ट्रस्टी  श्री. रा. गोपाळराव कर्वे यांचे हस्तें [ते शेवटपर्यंत पहाडावर चढून गेले होते.] त्याची प्रत्यक्ष स्थापना झाली. आदले दिवसापासून स्थापनेचें वृत्त गांवांत पसरलें असल्यामुळें हा स्थापनेचा सोहळा पाहण्यास जवळ जवळ सबंध गाव लोटलें होतें. *श्री. रा. तात्यासाहेबांना कार्यक्रमाकरता मुद्दाम बोलाविले होतें. प्रथम ते नाही म्हणत होते. पण नंतर कबुल झाले व आले.*

          मंदिराभोवती ब्रह्मवृंदांचा आणि भाविकांचा मेळा मोठ्या प्रमाणात होता. मंत्र घोष, वाद्ये, तुतारी वगैरेंच्या नादाने असमंत दुमदुमून गेले होते. त्याचवेळी श्रीमहाराजांचा सुखसंवाद [वाणीरुप अवतारात] सुरु होता. येथे असलेले स्त्री पुरुष तल्लीनतेने ती अमृतवाणी ऐकत होते. *बाहेरील आवाज वाढल्यामुळे महाराज थोडे थांबले. त्यांनी विचारले, 'बाहेर काय चालू आहे?' कोणीतरी सांगितले 'सुवर्ण कलश स्थापनेचा सोहळा सुरू आहे'. ते ऐकल्यावर महाराज शांतपणे म्हणाले, 'मंदिराला सोन्याच्या कळसापेक्षा उपासनेचा कळस असावा.'*

               *******

संदर्भः १] *मालाडचे थोर सत्पुरुष श्री रामचंद्र चिंतामणि तथा तात्यासाहेब केतकर यांचे जीवनचरित्र* हे डा वा रा अंतरकर यांनी लिहिलेले पुस्तक. २] धन्य ही गोंदवले नगरी ! हे वासुदेव पुंडलीक कुळकर्णी यांचे पुस्तक.

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

 जय श्रीराम! 

#बहुमंदिरेस्थापियेली 

आपण पाहत आहोत श्रीमहाराजस्थपित मंदिरे. 

३४.  कुक्कुडवाड राममंदिर १९१२-१३

मु.पो. कुक्कुडवाड, ता. माण, जि. सातारा, महाराष्ट्र

कुक्कुडवाड हे गोंदवल्यापासून २४ किमी वर असलेले श्रीमहाराजांच्या आज्जी राधाबाई यांचे गाव. तिथे श्रीमहाराज स्थापित राम मंदिर आहे.या मंदिराचा बहुधा १०० वर्षांनी जीर्णोद्धार झाला असावा.. या संदर्भात इथे फेसबुकवरच एक वेगळी कथा/ पोस्ट वाचनात आली. 

https://www.facebook.com/share/p/163m9CuBv8/

फोटो सोर्स - गुगल


 





 

 

 

 

 

 

 

 ३५.  शनिमंदिर, गोंदवले १९१३

गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र

श्रीमहाराजांनी १९११ साली धाकटे राम मंदिराजवळ श्रीदत्तात्रेयाची स्थापना केली. त्यानंतर श्री शनिदेवाची स्थापना झाली..

एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून श्रींनी अतिशय सुबक, दरारा दाखवणारी, डोळ्यात तेज असणारी, काळयाकभिन्न रंगाची, वज्रासनात बसलेली श्री शनिदेवाची मूर्ती स्थापन केली.

श्रींच्या हृदयात सतत रामरायाचे चिंतन चालू असल्याने सर्व काळ व वेळ शुभच होता. त्यांच्या जीवनात ग्रहांना स्थान नव्हते. श्रीमहाराज नेहमी म्हणायचे की ग्रहांचा अधिकार फक्त शरीरापुरताच असतो. 

एकदा पंढरपूरचा एक ज्योतिषी श्रींच्या दर्शनाला गोंदवल्यास आला. श्रींची कुंडली पाहून त्यांनी श्रींना सांगितले, " महाराज आपल्याला साडेसाती आहे, काहीतरी करायला पाहिजे." त्यावर श्री म्हणाले," असेना का ती बिचारी, ती आपल्या मार्गाने जाईल!" त्यावर ज्योतिषी म्हणाला," महाराज, या भागात शनिदेवाचे कुठेही मंदिर नाही, आपण जर बांधले तर इतर अनेक लोकांची सोय होईल." 

तेव्हा श्री म्हणाले," तुम्ही म्हणता ते खरे आहे, मंदिर बांधायला माझी काहीच हरकत नाही, शनी हा देवांचा फौजदार आहे. शनीच्या दर्शनास इतर कोठे जाण्यापेक्षा आपण इथेच शनीचे मंदिर बांधावे." ग्रामस्थांना खूप आनंद झाला. दत्तमंदिराला लागून असलेली जागा श्रींनी शनिच्या मंदिराकरता ठरवली. अशा रीतीने श्रींची साडेसाती चालू असताना १९१३ साली शनीचे मंदिर बांधण्यात आले. त्यानंतर जवळजवळ ९० वर्षांनी म्हणजे २००२ मध्ये शनी मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले.

संदर्भ: चैतन्य स्मरण विशेषांक २००२


जय श्रीराम!

रविवार, ९ मार्च, २०२५

 जय श्रीराम!
#बहुमंदिरेस्थापियेली

आपण बघत आहोत श्री महाराज स्थापित मंदिरे 


३१. अंबामातामंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र


श्रीदत्तांच्या एका बाजूस नृसिंहाची मूर्ती व एका बाजूस देवीची मूर्ती आहे. १९५९ च्या पुण्यतिथी उत्सवाच्या वेळी शतचंडी महायाग करण्यात आला व दत्तमंदिरात देवीची स्थापना करण्यात आली.

 

 

 

 

 

 

 

 ३२. कुरवली (सिद्धेश्वर) राममंदिर १९१२  कुरोली
मु.पो. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव, जि. सातारा - ४१५५२७, महाराष्ट्र

प. पू. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या शिष्यनामावलीतील महत्वाचे पण तसे अपरीचित नाव म्हणजे श्री संत दामोदर महाराज.आज त्यांची पुण्यतिथी. श्री दामोदर महाराजांनी  २४ वर्ष गोंदवल्यात प. पू. श्री. महाराजांची सेवा केली. श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता. श्रीमहाराज म्हणायचें कीं जो  नियमित नामस्मरण करील त्यांची अंगलट गुरुसारखी होईल. श्री दामोदरबुवा कुरवलीकर हे सुद्धा अगदी श्रीमहाराजांसारखेच दिसायचें. बेळगांव निवासी पू काणेमहाराज यांना अनुग्रह दामोदरबुआंनीच दिला होता.  श्री महाराजांच्याच आज्ञेवरून त्यांनी गोमेवाडी आणि सिद्धेश्वर कुरोली येथे प्रभू श्री रामरायांची स्थापना केली.  पू. श्री गोंदावलेकर महाराजांसोबत काशी अयोध्या यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य त्यांना लाभले. महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात काकडआरती नंतरच्या भजनाचे प्रमुख कुरवलीकर बुवाच असायचे.
















३३. दहिवडी राममंदिर १९१२
मु.पो. दहिवडी, ता. माण, जि. सातारा, ४१५५०३, महाराष्ट्र









 

 

 

 

 

 

 

 

 

जय श्रीराम

 जय श्रीराम!
#श्रीमहाराजांचेज्येष्ठशिष्य

गोंदवले संस्थानाचे पंच!

श्री दत्तात्रय विनायक खाडिलकर
यांचा पंच पदाचा कार्यकाळ ३०/६/१९३७ ते २८/१२/१९५४)

दत्तात्रय उर्फ दादासाहेब खाडिलकर हे उत्साही पंच होते. ते हसतमुख, उंच व गौरवर्ण होते. व्यक्तिमत्व प्रसन्न होते. ते उत्सवाची पंगतीची व्यवस्था बघत. वाढण्याकरता मंडळी कमी वाटल्यास खोल्यांतून बोलावून आणायचे. त्यांचे काळात रेशनमुळे धान्य मिळण्यास अडचणी, प्लेगमुळे उत्सवास बंदी, कलेक्टरच्या परवानग्या अश्या अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले.
**
 

 

 

 

 

 

*****

काशिनाथ नरहर (सरदार) कुलकर्णी, गिरवीकर
हे सुद्धा गोंदवल्याचे पंच होते. त्यांचा कार्यकाळ २१/१२/१९३९ ते १/४/१९६०


श्री. यशवंत नरहर कुलकर्णी उर्फ येसुकाका यांनी आपल्या बारा वर्षाच्या नातवाला पंढरपूरला शिक्षणासाठी ठेवले होते. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीचा परिणाम मुलाच्या मनावर झाला आणि तो परागंदा झाला. येसूकाका श्रीमहाराजांचेकडे गेले व त्यांनी सर्व हकिकत त्यांना सांगितली. श्रीमहाराज म्हणाले, 'काळजी करण्याचे काही कारण नाही, तुमचा नातू लवकरच सापडेल.' नातू माहुली येथे सापडला. येसुकाकांनी नातवाला लगेच श्रीमहाराजांकडे आणले. मुलाला पाहताच श्रीमहाराज म्हणाले, 'माझा नातू आला; पुरण पोळी करा.'

श्रीमहाराजांना नमस्कार करताच त्यांनी त्याला आपल्या जवळ बसवून त्याला उपदेशपर चार गोष्टी सांगितल्या व अनुग्रह दिला, आणि येसुकाकांकडे वळून ते म्हणाले, 'त्याचेकडे तुमचे घरातील कारभाराची किल्ली द्या; आता तो कोठे जाणार नाही.'
हा पळून जाणारा नातू म्हणजे कै. काशीनाथ नरहर कुलकर्णी उर्फ सरदार गिरवीकर. हे पुढे गोंदवले संस्थानचे पंच होते.
🌿 ~ चैतन्य - स्मरण १९८८ मधील  पंढरीनाथ काशिनाथ कुलकर्णी यांच्या लेखातून.
**

  जय श्रीराम!

 

 जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...