जय श्रीराम! .
मानस - गोंदवले ( Manas- Gondavale)
जय श्रीराम! असं म्हणतात की "तना- मनावर 'नाम ' गोंदवले की देहाचे 'गोंदवले ' होते. " श्रीमहाराजांच्या कृपेने आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेनेच मनात आलेल्या काही कहाण्यांचे संकलन म्हणजे हा ब्लॉग! जय श्रीराम!
बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६
जय श्रीराम!
आपण पाहत आहोत श्रीमहाराजांच्या निर्याणानंतर स्थापिलेली काही मंदिरे
१२. इंदूर राममंदिर १९३१
१४, शनी गल्ली, इंदूर - ४५२००४, मध्य प्रदेश
श्रीमहाराजांनी आयुष्यातला बराच काळ इंदोरमध्ये घालवला. त्यावेळी त्यांचे वय तिशीच्या आसपास होते. यातला काही काळ ते दिवाण पळशीकर , नंतर जीजीबाई इनामदार, आणि नंतर त्यांचे ज्येष्ठ शिष्य भैय्यासाहेब मोडक यांच्याकड़े ते राहत असत. त्यांच्याकडे राहत असताना एक मूर्तिकार आला होता. तेव्हा त्याच्याकडून श्रींनी श्रीरामाच्या मूर्ती स्वतः विकत घेऊन भैयासाहेबांना एक रुपया देऊन मंदिर बांधण्यास सांगितले होते. पण ते हे काम करू शकले नाहीत. भय्यासाहेबांनी १९२० मधे देह ठेवला. तत्पूर्वी त्यांनी श्री विष्णुबुवा कुंभोजकर यांना तो रुपया देऊन राम मूर्ती स्थापन करण्यास सांगितले.
मूर्ती कापडात गुंडाळून इंदूरमध्ये श्री जोशी यांच्याकडे देण्यात आल्या. विष्णुबुवांनी भिक्षा वर्गणी स्वरूपात पैसे जमवायला सुरुवात केली . दरम्यान त्यांची भेट इंदूरचे जुने इनामदार राजा छत्रकर्ण यांच्याशी होऊन इनामदारांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ १०,००० रु देऊन मंदिर बांधण्याचे कबूल केले. आणि रावजी बाजार भागात एक घर होते तिथे रामाच्या मूर्तीची स्थापन केली. पुजारी म्हणून भय्यासाहेब मोडक यांचे चिरंजीव बाळू भैया यांना नेमण्यात आले.
विष्णुबुवा परत सांगलीस गेले. पण काही कारणाने राजे छत्रकर्ण यांना जागा परत देऊन मूर्ती परत घेण्यात आल्या.
या घटनेनंतर पुन्हा वर्गणी काढून शनी गल्ली , इंदोर येथे जागा घेण्यात आली. आणि १९३५ मधे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
असे येथील पुजारी श्री प्रकाश जोशींनी सांगितले. बाकी माहिती तेथील फलकाच्या फोटोवर आली आहे.
इथल्या राम सीतेच्या मूर्ती अतिशय देखण्या आहेत.
जय श्रीराम!
संकलन - महाराज कन्या
जय श्रीराम!
आपण पाहत आहोत श्रीमहाराजांच्या निर्याणानंतर स्थापिलेली काही मंदिरे
११. विदूर अश्वत्थ राममंदिर, १९३०
दत्तात्रेय आश्रम, दोड्डाबेल्लापूर, जि. कोलार - ५१५३३१, कर्नाटक
कर्नाटकात कोलार जिल्हा , गौरी तालुक्यात असलेले हे मंदिर. याची फारशी माहिती कळू शकली नाही. श्री व्यंकटरमण दास यांना महाराजांनी इ.स. १८८५ मध्ये महाराजांनी त्यांना अनुग्रह आणि पादुका दिल्या होत्या. नंतर १९१२ मध्ये महाराज त्यांना पिनाकीनी नदीकाठी भेटले तेव्हा एक चांदीचे नाणे देऊन मंदिर स्थापन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी आश्रम बांधला. हे नाणे अजूनही बघायला मिळते. सुरवातीला झाडाच्या पारावरच लहानसे राम मंदिर होते असे डॉ. सौ आशाताई परांजपे यांच्या 'आनंदघनराम" या पुस्तकात दिलेल्या माहितीवरून समजते. वाणीरुप महाराज पु तात्यासाहेब केतकर यांनी तिथे भेट दिली होती, तेव्हा त्यांना सिंहासनावर बसवण्यात आले होते. त्या खुर्चीचाही फोटो आहे. मंदिरात काळ्या पाषाणाची राम सीता मूर्ती असून, श्रींची हि मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. त्यामागे श्रीमहाराजांचे हाताने काढलेले मोठे चित्र आहे. मंदिराच्या आवारात असंख्य नागाच्या मूर्ती आहेत.
![]() |
| आवारातील नाग देवता मंदिर |
![]() |
| पु. तात्यासाहेब केतकर यांनी या मंदिराला भेट दिल्यावर त्यांना ज्या सिंहासनावर बसवण्यात आले होते ते हे सिंहासन |
![]() |
| श्रीमहाराजांनी १८८५ मध्ये दिलेल्या पादुका |
![]() |
| श्रीमहाराजांनी व्यंकटरमणदास यांना दिलेले चांदीचे नाणे |
जय श्रीराम
आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे!या शृंखलेतील पुढची मंदिरे आहेत.
१०. शिवराममंदिर, कुरुंदवाड १९२९
लक्ष्मीविष्णुमंदिराशेजारी, मु.पो. कुरुंदवाड, जि. कोल्हापूर - ४१६१०६, महाराष्ट्र
या मंदिराच्या उभारणीमागची कथा श्रीमहाराज चरित्रात 'नायट्यावर तोडगा' या शीर्षकाअंतर्गत आली आहे. ती अशी की,
बागलकोटला सुखवस्तू कुटुंब होते. त्यात मुलगी एकच पण सुरेख व सुस्वभावी असल्याने सर्वांची लाडकी होती. तिला बारावे वर्ष लागल्यावर तिच्या सर्व अंगावर नायटे येऊ लागले. त्यांना भारी खाज असायची. पोर्णिमेला ते चिघळायचे. हा त्रास नाहीसा करण्यासाठी पुष्कळ डॉक्टर, वैद्य झाले. तसेच आईने व मुलीने व्रते करून देहाला पुष्कळ कष्टही दिले. पण कशाचाही उपयोग झाला नाही. आईबाप कंटाळून स्वस्थ बसले असता कोणीतरी श्रीमहाराजांचे नाव त्यांना सुचवले. बापाला रजा नसल्यामुळे मुलीला घेऊन आई गोंदवल्यास आली. नायट्यांचा इतिहास सांगून आई श्रीमहाराजांना म्हणाली, "महाराज, मुलीला पंधरावे वर्ष लागले आहे. हिचे लग्न कसे होईल याची फार काळजी वाटते." यावर श्री महाराज म्हणाले, "माय, काळजी करू नका. रामराय तुमचे संकट निवारील. ही मुलगी जर एखाद्या गरिबाला दिली तर ताबडतोब बरी होईल. यजमानांना विचारून मला सांगा." बाईने नवऱ्याला पत्र लिहिले. चार-आठ दिवसात त्यांचे होकारार्थी उत्तर आले. तिने ते पत्र श्रीमहाराजांना दाखवले. श्रीमहाराजांनी पुन्हा पुन्हा तिला विचारले. प्रत्येक वेळी तिने होकार दिला. तेव्हा तिच्या हातात पाणी देऊन "रामाला साक्ष ठेवून मी असे कबूल करते की माझी मुलगी मी गरिबाला देईल" हे शब्द तिला बोलायला लावून सर्वासमक्ष पाणी सोडवले. लगेच मुलगी कोणास द्यायची असे तिने विचारले.
हा सर्व प्रकार चालू असता कुरुंदवाडचा तरुण भटजी निळकंठ जोशी येऊन श्री महाराजांच्या पाया पडला. ते म्हणाले, "बाई, याला तुमची मुलगी द्या." नंतर एकमेकांनी एकमेकांची नावे, गावे व पत्ते विचारून घेतले. बाई मुलीला घेऊन बागलकोटला गेली. निळकंठ कुरुंदवाडला गेला. मुलीच्या अंगावर नायटे उठण्याचे बंद झाले व ती चांगली सुधारली. काही दिवस गेल्यावर आईबापांच्या मनात विकल्प आला. श्रीमहाराजांना दिलेल्या वचनाचा विसर पडला आणि ते दुसऱ्या मुलाचा शोध करू लागले. परंतु लगेच मुलीच्या अंगावर पुन्हा नायटे येण्यास आरंभ झाला. मग मात्र आईबाप घाबरले. निलकंठास पत्र लिहून लग्न ठरवले आणि पंधरा दिवसात उरकून टाकले. पुढ निळकंठाची परिस्थिती सुधारली आणि त्यांचा संसार चांगला झाला.
बागलकोटचे ते सुखवस्तू कुटुंब म्हणजे श्री मोडक यांचे. त्यांच्या मुलीचे नाव कृष्णाबाई.
निळकंठ जोशी यांची गोष्ट अशी की गोवा प्रांताकडील मूळचे रहिवासी असेलेले नीलकंठ जोशी यांची श्रीमहाराजांशी प्रथम भेट कागवाड येथे झाली होती. पोर्तुगीज सरकारच्या काळात नीलकंठ यांची जमीन, मालमत्ता, त्या सरकारने काही कारणाने सरकारजमा केल्याने जोशीं यांना गोव्यातून परागंदा व्हावे लागले. ते गोंदवले येथे एकदा आले असतांना श्रीमहाराजांनी त्यांची विचारपूस केली त्यावर जोशी यांनी मी झोळी फिरवतो असे उत्तर दिले.
या विवाहाच्या संमतीची वेळ आली तेव्हा श्रीमहाराज हर्दा येथे होते. मोडक यांनी नीलकंठ व कृष्णाबाईचा विवाह करावा असे पत्राने त्यांना कळवले. श्रीमहाराजांनी संमती दिली आणि हा विवाह १९१२ साली झाला.
श्रीमहाराजांची आणि नीलकंठ यांची नंतर भेट झाली. तेव्हा त्यास त्यांनी राममंदिर बांधून श्रीरामनामाचा प्रचार करण्यास सांगितले. तसेच काशी ते रामेश्वर यात्रा करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे नीलकंठ मातोश्रीस घेऊन सपत्नीक काशीस गेला. तेथील मुक्कामात १९१४-१५च्या सुमारास जयपूर येथे जाऊन श्रीराम-सीता-लक्ष्मण यांच्या मूर्ती पाहिल्या .
विवाहानंतर हे दाम्पत्य कुरुंदवाड येथे राहत होते. तेथून त्याने मूर्ती खरेदीसाठी ६०० रुपये मागवले. आणि मूर्ती खरेदी करून कुरुंदवाडला घरी आणून ठेवल्या.
पुढे मंदिर बांधविले व याच मंदिरात १९२९ मध्ये श्रीरामाची स्थापना झाली.या मंदिरात पती-पत्नी दोन वेळा तेरा कोटी रामनाम जप पूर्ण केला. १९४८ साली पु. तात्यासाहेब केतकर या मंदिरात दर्शनासाठी आले होते.
या कृष्णाबाईचा गोंदवल्यातील एक अनुभव असा कि कृष्णाबाई आईसह श्रीमहाराजांच्या दर्शनासाठी गोंदवले येथे गेली होती. कृष्णाबाई स्वयंपाक घरात होती.
तेथे भांडी-कुंडी, इतर सामान पडले होते. श्रीमहाराज अचानक स्वयंपाक घरात आले. कृष्णाबाईस त्यांनी त्या भांड्यामधील एक वस्तू उचलण्यास सांगितले. या मुलीने छोटे उलथणे उचलले.
ते पाहून श्रीमहाराज म्हणाले," तुझ्या मनासारखे होईल. "
पुढे त्यांच्या हातून भरपूर अन्नदान झाले.
सध्या नीलकंठ जोशी यांचे धाकटे चिरंजीव मंदिरात पूजा अर्चा करतात.
**
जय श्रीराम!
संदर्भ: श्रीमहाराज चरित्र, आणि चैतन्य स्मरण विशेषांक
फोटो संदर्भ : गुगल
जय श्रीराम
आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे!या शृंखलेतील पुढची मंदिरे आहेत.
९. शेंदुरजणेघाट राममंदिर १९२३
मु.पो. शेंदुरजणेघाट, ता. वरूड, जि. अमरावती, महाराष्ट्र
जय श्रीराम!
त्यांचे नामाचे प्रेम पाहून श्रीमहाराजांनी त्यांना दीक्षाधिकार दिला होता. नंतर वऱ्हाड प्रांतात शेंदूरजन घाट येथे मठ बांधून ते राहिले.

श्री विष्णुबुवांनी स्वतःचा सांगली विभागातील सर्वसंग परित्याग करून रामनामाचा वर्हाडांत प्रसार करण्यासाठी शेंदूरजनघाट येथे आले व १९१० मध्ये मठ स्थापन केला आणि रामनामाची उपासना वाढविली. पुढे गावकऱयांच्या मदतीने १९२३ मध्ये राम मंदिर स्थापन केले.
पुढे विष्णुबुवांनी रामभाऊ नावाचे बहिणीचे पुत्रास दत्तक घेतले व त्या नंतर श्री तरार यांचेकडे ते कार्य आले. श्री तरार यांचे नंतर त्यांची सून गं भा. शोभाताई तरार अध्यक्षा म्हणून कार्य पाहत आहे. मुख्य ट्रस्टी श्री उल्हास आष्टीकर मो. न. ९०९६८३४८७० हे आणि श्री अरुण मोघे मंदिराचे बांधकाम, रंगरंगोटी देखभाल इद्यादी पहातात. रामजन्म आणि श्रीकृष्ण जन्म हे उत्सव या मंदिरात होतात.
श्रीमहाराजांच्या त्या काळातील पादुका येथे आपल्याला नतमस्तक होण्यासाठी ठेवलेल्या आहेत.
जय श्रीराम!
#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे - या शृंखलेत आज आपण बघणार आहोत.
८. कांची समुद्रम् राममंदिर १९२३
पो. कांची समुद्रम, ता. हिंदूपूर, जि. अनंतपूर - ५१५३३१, आंध्र प्रदेश
कांचिसमुद्रम
येथे श्री सीताराम राव या नावाचे गृहस्थ होते. त्यांचे मामा हणमंतराव
बल्लारी तेथे सन १९०८ साली शाळामास्तराचे काम करत होते. एकदां गदगला आले
असतां श्रीमहाराजांचें त्यांना दर्शन झालें. त्या दर्शनाने ते इतके
प्रभावित झाले की कांचीसमुद्रमला परतल्यावर त्यांनी आपल्या सर्व
नातेवाईकांना श्रींच्या दर्शनासाठी गोंदवलेस जा असा आग्रह केला.
त्याप्रमाणे कांचीसमुद्रम् येथील दासा लक्ष्मय्या शेट्टी, श्री कृष्णराव,
आप्पाजी शास्त्री, चीनप्पा रेड्डी यांनी गोंदवल्याला जाऊन सहकुटुंब
श्रीमहाराजांचा अनुग्रह घेतला.
त्यातील दासा लछमय्या - हे श्रीमहाराजांचे निस्सीम भक्त झाले.
महाराजांशी
ते इतके एकरूप झाले की महाराजांनीही त्यांना ' आपला ' म्हणाले असाव. कारण
१९१३ मधे श्रीमहाराजांनी गोंदवले येथे जेव्हा देह ठेवला नेमक्या त्या वेळी
इकडे कांचीसमुद्रमला लछमय्या अर्ध्य देत असता त्यांना श्रीमहाराजांचे
साक्षात दर्शन झाले.
लछमय्या यांना संतती नव्हती. श्रींचे दर्शन
झाल्यापासून ते उपासनेत मग्न असायचे. दर गुरुवारी मंडळी कुठेतरी भजन उपासना
करीत असत. उपासकांना एक ठिकाण असावे म्हणून लछमय्या यांनी स्वतःची जमीन
श्रीरामाचे मंदिर बांधण्यासाठी १९२३ साली दान केली. श्रींनी त्यांना पादुका दिलेल्या होत्या. त्या पादुका त्यांनी प्रारंभी छोटसे मंदिर बांधून तेथे पूजेसाठी ठेवल्या, राम मंदिरही बांधले.
त्याला 'ब्रह्मचैतन्य मंदिर' असें नांव दिलें.या मंदिराच्या व्यवस्थेसाठी ट्रस्ट निर्माण करण्यात आला. जी. होनप्पा यांनी ट्रस्टिपद स्वीकारल्यावर मंदिरालगतची आणखी काही जागा खरेदी करून ट्रस्ट ला दिली आहे.
हणमंतराव फार नामनिष्ठ होते. श्रीमहाराजांनी देह ठेवल्यानंतरहि त्यांचें सदेह सगुण दर्शन लछमय्यांना आणि हणमंतरावांना होत असे. पेन्शन घेतल्यावर हणमंतरावांनीं आपला सर्व काळ नामस्मरणांत घालविला.
श्रीमहाराजांच्या चरित्रात आलेली त्यांची एक गोष्ट अशी की , हणमंत मास्तर दरवर्षी गोंदवल्यास येत. एकेवर्षी त्यांचा शेजारी लछमय्या त्यांच्याबरोबर गोंदवल्यास आला.,तो श्री महाराजांना म्हणाला,'मला मारुतीचे दर्शन घडवा.मारुतीराया आपल्या हातामध्ये आहे.'श्री महाराज म्हणाले,'असे वेड्यासारखे काय मागतोस?मारुती म्हणजे कोणी साधा मनुष्य आहे का?त्यांचे दर्शन तुला सहन होणार नाही".काही केल्या लछमय्या ऐकेना.पाच सहा दिवस रोज तो सारखे हेच मागे,एके दिवशी सकाळी तो स्नान करून आला आणि श्री महाराजांच्या पायावर डोके ठेऊन म्हणाला,'हनुमंताचे दर्शन झाल्याशिवाय मी डोके उचलणार नाही.हे ऐकून श्रीमहाराजांनी त्याला आपल्यासमोर डोळे झाकून बसण्यास सांगितले,आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला.एका क्षणात एक प्रचंड तेजाचा लोळ त्याने पाहिला व त्याची शुद्ध गेली.जवळ जवळ एक तासाने तो शुद्धीवर आला तेव्हा 'काय पाहिले'?असे त्याला श्री महाराजांनी विचारले. तेव्हा तो म्हणाला'महाराज काय सांगावे!आपला हात डोक्यावर टेकल्याबरोबर मी एक मोठे तेज पाहिले.त्याच्यात मी बुडून गेलो,आणि पुढे काय झाले मला ठाऊक नाही .श्री महाराज म्हणाले,'भगवंताचे खरे स्वरूप आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे,आपल्या देहबुद्धीला ते सहन होत नाही.आपल्याला इंद्रियांनी ज्ञान घेण्याची सवय असते.म्हणून नाद किंवा प्रकाश रूपाने भगवंताचे दर्शन होते.'परंतु त्या दिवसापासून लछमय्या च्या वृत्तीमध्ये मोठा फरक झाला.त्याचे लक्ष धंद्यावरून उडून नामाकडे गुंतले आणि श्री महाराज हेच देव आहेत या भावनेने तो वागू लागला.
जय श्रीराम
फोटो स्रोत - गुगल
जय श्रीराम!
#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे - या शृंखलेत आज आपण बघणार आहोत.
७. गजेन्द्रगड राममंदिर, १९१६
पत्तार गल्ली, पो. गजेंद्रगड, ता. रोण, जि. गदग ५८२११४, कर्नाटक
गजेंद्रगड येथे गोविंद दीक्षित या नांवाचे एक अग्निहोत्री ब्राह्मण रहात असत. श्रीब्रम्हानंद महाराजांवर त्यांची अत्यंत भक्ति व विश्वास असल्याने ते त्यांच्या दर्शनाकरिता वरचेवर बेलधडीस व वेंकटपुरास जात असत. ब्रम्हानंद बुवांचही त्यांच्यावर तसेंच प्रेम असल्याने, त्यांनी त्यांस गोंदवलेस नेऊन श्रीमहाराजांच्याकडून अनुग्रह देवविला होता.
शके १८३५ मध्यें ब्रम्हानंदांच्या आज्ञेप्रमाणें श्री दीक्षित अग्निहोत्री श्रीमहाराजांच्या दर्शनास गोंदवलेस गेले असतां त्यांस श्रीमहाराजांनीं आदरपूर्वक चार दिवस ठेऊन घेतले होते. एकेदिवशी श्रीमहाराजांनीं "इतक्या लांबवर कां येणें केलें होते ?" असा त्यांस प्रश्न विचारला. त्यांनी अत्यंत नम्रतेने "केवळ आपल्या दर्शनासाठी" असें उत्तर दिले. तेंव्हा श्रीमहाराजांनीं मंदहास्य करीत "ब्रह्मानंद हा माझा केवळ प्राण आहे. तुम्हां लोकांकरिताच मी त्यांस तिकडे पाठविले आहे" असें सांगितले व "तुमच्या घरांत अग्निहोत्र आहें. आपल्या वयस्कर मातापित्यांची शुश्रूषा पण तुम्ही चालविता. यावरून तुम्हीं कृतार्थ आहांतच. तरीपण घरीं श्रीरामाची स्थापना करून खऱ्या अर्थाने कृतार्थ व्हा" असें म्हटले. त्यावर आपल्या आज्ञेप्रमाणें सिद्धता करतो. आपल्या अमृतहस्तानेच प्रतिष्ठापना करणेची कृपा व्हावी" अशी त्यांनी प्रार्थना केली.
श्रीमहाराजांनीं आपल्या हातानें एक पत्र लिहून तें ब्रह्मानंदबुवांसाठी दिलें व त्यांना "समक्षांत मी येण्याचा योग दिसत नाहीं. थोड्याच दिवसांत मी नैमिषारण्याला जाणार आहे. ब्रह्मानंदबुवांकडून तुमच्या मनासारखे काम होईल" म्हणून सांगून आशीर्वाद देऊन पाठविलें. पुढें थोड्याच काळांत श्रीमहाराज समाधिस्थ झाले.
गोविंद दीक्षितांनी गांवी जाऊन श्रीब्रह्मनंदबुवांची भेट घेऊन, पत्र देऊन निरोप कळविला. आणि श्रींच्या आज्ञेप्रमाणें घरांतच मंदीर बांधण्यास त्यांनी सुरुवात केली. मंदीर तयार होतांच त्यांनी मूर्तीहि आणविल्या. शके १८३८ च्या रामनवमी उत्सवास जाऊन, दीक्षितांनी मंदिराची सर्व हकीगत निवेदन करून "माझा उद्धार करावा" अशी पु. बुवांना प्रार्थना केली.
ब्रम्हानंद बुवांनी "वैशाख वद्य सप्तमी हा मुहूर्त बरा आहे. श्रीराम सिंहासनावर बसण्यास शुभ दिन आहे. त्याच दिवशी प्रतिष्ठापना करा" असें त्यांस सांगून पाठविलें.
गोविंद दीक्षित नाराज झाले. वेंकटपुरास जाऊन, त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून "तेथवर येऊन मला कृतार्थ करा" असें त्यांनी मागून घेतलें. त्यावेळीं ब्रम्हानंदबुवांना थंडीताप आला होता. घोंगडे पांघरून थडथडत ते अंथरुणावर झोपले होते. दीक्षितांची विनंति ऐकून, "थंडीने मी मरायला लागलो आहें, तापाने फणफत आहे. असल्यात मला ये म्हणतोस. दररोज येणाऱ्या थंडीने मी अशक्त झालों आहें. मला येतां येणार नाहीं. एखादेवेळी वाटेतच आटोपेन. माझ्यावर विसंबून राहूं नकोस. तूंच उरकून घे." असें सांगताच," तुमच्याशिवाय तें होणार नाहीं, तसेंच राहून जाईल." असें दीक्षितांनी सांगितले. त्यावर "हट्ट धरूं नकोस. थंडी कमी झाल्यास मी येतोच. नच आल्यास, अशा प्रकारे उरक" असें म्हणून त्यांनी त्यांस सर्व विधि समजावून सांगितला.
गोविंद दीक्षित ब्रम्हानंदांची आज्ञा प्रमाण मानून, पण खिन्न अंतःकरणाने गांवी गेले. दयानिधी ब्रम्हानंदांनी प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी वेंकटापूर सोडले व ते गदगला आले व दोन शिष्यांना बरोबर घेऊन भाड्याचा झटका करून गजेंद्रगडला जाण्यास रात्रीं निघाले. श्री बुवांची जाण्यासारखी परिस्थिति नसतांना देखील, श्रीमहाराजांचें आज्ञापत्र असल्याने, ते देहाची पर्वा न करता निघाले. ब्रम्हानंद बुवांना श्रीसद्गुरू आज्ञेपेक्षा या जगांत जास्त श्रेष्ठ कांहीं दिसत नव्हते हें जसें खरें, तसेंच श्रीमहाराजांच्या आज्ञेशिवाय ते कोणतीहि गोष्ट करीत नसत हेंहि तितकेच खरें !( याचे प्रत्यंतर म्हणजे, तोपीनकट्टीच्या भक्ताने श्रीरामरायाच्या मूर्ति आणवून त्यानें श्रीगुरूंस प्रतिष्ठापनेसाठी असंख्य वेळां पाचारण करूनही श्रीमहाराजांची आज्ञा नसल्याने, श्रीगुरू प्रतिष्ठापनेस बिलकूल गेले नाहींत हें होय. श्रीब्रह्मानंदगुरूंच्या समाधि कालानंतर मग ती प्रतिष्ठापना उरकली गेली.)
गदगहून निघून ब्रम्हानंद बुवांनी नरेगलला मुक्काम केला व तेथून पहाटे निघून अरुणोदयापूर्वी दीक्षितांच्या दरवाज्यांत येऊन उभे राहिले. आदले रात्रीं १० वाजेपर्यंत दीक्षितांनी बुवांची वाट पाहिली. ते न आल्यानें खिन्न होऊन, दीक्षित अंथरुणावर पडले. पण त्यांस झोप आली नाहीं. अकस्मात बुवांचे आगमन झालेलें पाहून दीक्षित आश्चर्यचकित झाले. तसेंच त्यांच्या आनंदास पारावार राहिला नाहीं. फक्त वाद्यघोषांत श्रीब्रम्हानंदाना गांवात मिरवत आणण्याची इच्छा फलद्रूप झाली नाहीं म्हणून त्यांस विषाद मात्र वाटल्याखेरीज राहिला नाहीं.
प्रिय सज्जन हो ! श्रीगुरूंनी दीक्षितांस चाळविण्या कां दाखविल्या ? खरोखर त्यांच्या मनांतून जावयाचे नव्हतें कां? तें कसें शक्य आहें ? मग अकस्मात दत्त म्हणून उभें राहण्यातील हेतू काय असावा, असें तुम्हांस वाटतें ? असें करण्यांत श्रीगुरूंचा एकमेव हेतू जर कोणता असेल तर तो हाच कीं, त्यांना स्वतःचे अवडंबर माजविलेले खपत नव्हतें व कोणत्याहि गोष्टीचा अवास्तव गाजावाजा करण्याच्या ते विरुद्ध होते.
प्रतिष्ठापनेबाबतचे होमहवन संपवून श्रीब्रम्हानंदांनी स्वतः श्रीरामरायाला अलंकारांनी सजविले. राजोपचारांनी पूजा करून, महानैवेद्य, मंगलारती केली. त्यादिवशीं त्यांच्या आज्ञेप्रमाणें मुक्तद्वार अन्नसंतर्पण झालें.
दुसरे दिवशी सकाळीं स्नानसंध्या उरकून, श्रीरामरायाच्या पायावर तुळशी चढवून, अग्निहोत्र्यांच्या होमशालेतील अग्निनारायणासमोर श्रीबुवांनी १०० रुपये दक्षिणा ठेवली, तीन प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. दीक्षितांच्या मुलांना "दरवर्षी रामनवमी उत्सव भिक्षा मागून कां होईना, पण न चुकतां करा. वर्षातून एकदा तुलसीदलानी व बिल्वदलानी पूजा झालीच पाहिजे. कसल्याही प्रसंगीं धर्म, नीति, श्रीराम यांवरील विश्वास ढळू देऊं नका. यथाशक्ति अन्नदान करा. सदा नामस्मरण करीत जा. म्हणजे श्रीरामराय तुमचें कल्याण करील", असा उपदेश करून ते जाण्यास सिद्ध झाले. तेंव्हा गांवातील अनेकांनी श्रीबुवांना आपापल्या घरीं बोलावून नेवून, पूजा करून त्यांचा अनुग्रह घेतला. यांतच दिवस गेल्यामुळे बुवांचा त्यादिवशी तेथें मुक्काम झाल्यानें लोकांना फार आनंद झाला. दुसरें दिवशीं सर्व भाविकांना आशीर्वाद देऊन, श्रीरामरायाचा उत्सव तुम्हीं सर्वांनी मिळून न चुकतां केला पाहिजे, असें सर्वांस बजावून श्रीब्रम्हानंद बुवा वेंकटपुरास आले.
फोटो स्रोत: फेसबुक
**
जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...
-
जय श्रीराम! आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे २. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९ वेंकटापूर, पो...
-
जय श्रीराम! आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे ४. अश्वत्थपूर राममंदिर १९१५ पो. अश्वत्थपूर, जि. मंगळूर, ५७४२६६...
-
जय श्रीराम! मानस - प्रभातफेरी श्रीमहाराजांची स्थळ: गोंदवले वेळ- रात्रीच्या तिसऱ्या प्रहाराची सुरुवात! आदल्या रात्री गोंदवले इथे मुक्कामी आप...





















