जय श्रीराम!
आपण पहात आहोत, #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे
२. व्यंकटेशमंदिर, वेंकटापूर १९०९
वेंकटापूर, पो. सोरटूर, ता. शिरहट्टी, जि. गदग - ५८२१०१, कर्नाटक
🍁वेंकटापूर, एक विशेष स्थान🌹
सोरटूर या छोट्या गांवचे देसाई हे श्री वेंकटेशाचे परमभक्त होते. ते प्रतिवर्षी नेमाने श्रीतिरुपति बालाजीची वारी करीत. त्यांच्या वृद्धापकाळांत त्यांना स्वप्नांत देवाने दर्शन देऊन सांगितले की मी तुझ्याजवळच आलो आहे, तू यापुढे तिरुपतीऐवजी येथेच येत जा. त्याप्रमाणे शोध घेता एका टेकडीचे पायथ्याशी हे स्थान सापडले. देसाई यानी तेथे एक देवळी बांधून पूजे-अर्चेची व्यवस्था केली. पुढे शिरहट्टीच्या सखूबाई जोगळेकर यांनी तेथे एक खोली बांधली, आणि केवळ आपल्या मुलीसह त्या निर्जन ठिकाणी त्या राहिल्या. त्यांनी भव्य महाद्वार बांधले.
श्री अनंतशास्त्री (श्रीब्रह्मानंदमहाराज) तेथे गेले त्या वेळी ती देवळी व खोलीही जीर्ण झालेली होती. भोवताली रान माजले होते. त्यांनी ती जागा साफ करून तपश्चर्येला प्रारंभ केला. कालांतराने श्रीवेंकटेशाच्या आदेशानुसार ते उत्तरेकडे गुरुशोधार्थ गेले, व श्री गोंदवलेकर महाराजांचे चरणीं स्थिर झाले. इ.स. १९०९ साली श्री गोंदवलेकर महाराज कर्नाटकात गेले असतां , सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी गेले, त्यात कै.पू.श्री.तात्यासाहेब केतकर हेही होते. त्यांनी पुढीलप्रमाणे लिहिले आहे :
"त्यावेळी देऊळ अगदी लहान, म्हणजे एक घुमटीच होती. वाकून आत जावे लागे. अंधार होता. श्री देवळात बसले. हातात मेणबत्ती होती, तिचे उजेडाने श्री व्यंकोबाची मूर्ति दाखवीत होते. त्यावेळी मूर्तीवर डोळे, नाक, तोंड वगैरे नुसत्या रेषा होत्या. आज पाहिले तर पूर्वी पाहिलेली हीच मूर्ति होती काय अशी शंका येईल. आज सर्व मूर्ति ठळकपणे दिसत आहे. श्रींचे आज्ञेवरून श्रीब्रह्मानंदमहाराजांनी काही लाख रुपये खर्च करून आजचे टोलेजंग मंदिर बांधले आहे."
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार वर सांगितल्याप्रमाणे सखूबाई जोगळेकर यांनी बांधलेले आहे. आत शिरल्याबरोबर दोन्ही बाजूस उंच देवड्या आहेत. उजव्या बाजूच्या कट्ट्यावर श्रीवराहाची मूर्ति आहे. डाव्या बाजूच्या कट्ट्यावर शिवलिंग असून त्याचे खाली तळघर आहे. त्यास प्रवेशद्वार अगदी लहान आहे. आत भिंतीतल्या मोठ्याशा कोनाड्यात श्रीब्रह्मानंद महाराज साधनेला बसत. वरच्या शिवलिंगरूपाने सद्गुरूच तेथे आहेत असे ते म्हणत. तळघराचे फरशीवर तुळशीवृंदावनासारखा चौकोनी कट्टा असून तो बांधण्यापूर्वी त्याचेखाली त्यांनी आपली कुबडी, भागवताची पोथी, वगैरे वस्तु ठेवल्या आहेत असे समजते. या देवड्यांपलीकडील जागेत दोन्ही बाजूस व्हरांडेवजा दालनें आहेत. तेथील दरवाज्यातून मंदिराच्या पटांगणात प्रवेश होतो. समोर थोड्याच अंतरावर सभामंडप, तीर्थमंडप व गाभारा आहे. सभोवार दगडी फरशी केलेली असून तीन बाजूंनी उंच कट्ट्याच्या दगडी ओवऱ्या आहेत.
श्रीवेंकटेशाची मूर्ति एका काहीशा ओबडधोबड शिळेवर रेघांनी कोरल्यासारखी आहे. मूर्ति चतुर्भुज असून लहानमोठे अलंकार, आयुधे, वगैरे स्पष्ट दिसून येतात. ही शिळा जमिनीतून उभी वर आलेली, सुमारे १२५ सें.मी. उंच व २०-२५ सें.मी. जाड आहे. तिच्या डाव्या बाजूस एक लहान शिलाखंड अशाच तऱ्हेचा आहे, तीवर श्रीलक्ष्मी मातेची मूर्ति अर्ध्या उंचीपर्यंत व्यक्त दिसते. हीही हळूहळू दृग्गोचर होत आहे. अशा तऱ्हेने या दोन्ही मूर्ति स्वयंभू आहेत.*
संग्राहक :- डॉ. डी.डी.देशमुख कामठेकर , पुणे .
***
वेंकटापुर देवालयाचा जीर्णोद्धार - पु. ब्रम्हानंद बुवा चरित्रात आलेले काही भाग खाली देत आहे.
विजयादशमीच्या सुमुहूर्तावर श्री ब्रम्हानंद बुवांनी श्रीवेंकटपतीचे गर्भालयाचे बांधकामास सुरुवात केली होती. श्रीबुवांनी येथेंच घोर तप करून श्रीवेंकटेशास प्रसन्न करून घेतले. त्याच्याच कृपाप्रसादाने ब्रम्हानंद बुवांस सद्गुरूंचा लाभ झाला. त्यांस सद्गतीचा मार्ग सापडला. अर्थांत श्रीवेंकटेशाच्या ऋणातून अल्प स्वल्प कां होईना मुक्त व्हावे, या इच्छेने श्रीवेंकटपतीच्या जीर्णोद्धाराकडे त्यांनी स्वतःला संपूर्णपणे वाहून घेतले. शिवाय सदरहू जीर्णोद्धारासंबंधी श्रीमहाराजांची श्रीबुवांस आज्ञा झाली असल्यानें तें महत्कार्य लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे, अशा आंतरिक ओढीने पूज्य बुवांनी त्याकामीं जोरकस खटपट सुरूं केली.
या पवित्र क्षेत्राच्या उपपत्तीचा पूर्वेतिहास पूर्वीच येऊन गेला आहे. तसेंच पूर्वी शिरहट्टीची जोगळेकर सखूबाई येथें सेवेस राहिली होती. तिचे मनांत या देवस्थानचा जीर्णोद्धार करण्याचें फार होते. तिनें सुरुवातही केली होती. तिच्या प्रयत्नाने फक्त महाद्वार तयार झाले व काम थांबले. कदाचित पैशांची कमतरता, कदाचित बाईमाणूस असल्याने तिची असहाय्यता, कदाचित पुढे तिचे निर्वाण यांपैकीं कुठल्यातरी कारणानें तें काम थांबले असावे. 'भगवदिच्छा बलीयसी' या न्यायानें श्रीपतीच्या मनांतून ती कामगिरी श्रीब्रह्मानंदगुरूंच्या हातूनच पुरी करून घ्यावयाची असेल.
ब्रम्हानंद बुवांच्या मनांतून साध्वी सखूबाईचें महाद्वार उखडून टाकून त्याहिपेक्षा भव्य व सुंदर महाद्वार बांधावे असें होतें. पण भगवंताच्या संकेताने, त्यांनी तो विचार रद्द केला असा एक प्रवाद क्वचित ऐकूं येतो. परंतु एका भक्ताने भक्तिभावाने बांधलेले महाद्वार उखडून टाकण्याचा दुष्ट विचार, सुष्ट श्रीबुवांच्या मनांत कालत्रयीही येणें शक्य नाहीं. श्रीबुवांनी आपण होऊनच पूर्ण विचारांती तें राखले असलें पाहिजे.
प्रथम श्रीब्रम्हानंद बुवांनी श्रीवेंकटपतीचें गर्भालय व त्याच्यापुढील तीर्थमंडप याची दगडी सुंदर इमारत तसल्या डोंगराळ प्रदेशांत महत्प्रयासपूर्वक मजबूत अशी बांधविली. त्यानंतर त्याच्याभोवती पोवळी बांधणेस सुरुवात केली. श्रीवेंकटेशाच्या गाभाऱ्याच्या मागें असलेल्या कमानीच्या दगडी ओवऱ्याप्रमाणें सभोंवार तसल्याच नमुन्याची पोवळी बांधणेचा विचार कायम करून, प्रथम उजव्या अंगाची पोवळी बांधणेस त्यांनी सुरुवात केली. अर्धे अधिक बांधकाम झाले आणि जोराच्या पावसाने सर्व बांधकाम जमीनदोस्त झाले. वित्तहानी झाली असती तर पूज्य बुवा डगमगले नसते, पण प्राणहानी झाल्यानें त्यांचे मन कच खाऊं लागले. वास्तविक कितीही अडीअडचणी आल्या तरी, हातीं घेतलेले काम हर प्रयत्नाने शेवटास न्यावयाचे हा मोठ्या व्यक्तींचा विशेष असतो. 'न निश्चितार्थाद्विरमन्ति धीरा : ll' असें वचन आहें. ब्रम्हानंद बुवा कच खात आहेत, हें महाराजांच्या कानांवर जातांच त्यांनी बुवांस "श्रेयांसि बहु विघ्नानि - चांगल्या कामास हजारों विघ्ने येणें साहजिक आहे. तरीं आरंभिलेले जीर्णोद्धाराचे काम अर्धवट सोडणें बरें नव्हे. पुन्हां पोवळी बांधा." असें सांगून पाठविल्यानें बुवा तें कार्य अधिक तत्परतेने करूं लागले.
ब्रम्हानंद बुवांच्या मनाने पोवळीचे काम बदामीहून तांबडा दगड आणून पुरें करण्याचें होतें. पण तें त्रासाचे आहें या भीतीने, कपत डोंगरांत सांपडणाऱ्या काळ्या दगडांनी ओवऱ्या बांधण्याचा विचार केला. परंतु तो विचार श्रीवेकटपतीस न रुचल्याने बांधकाम ढासळले. एकदां नव्हेतर, दोनदा असें झालें. मग मात्र श्री बुवांनी स्वतः बदामीस जाऊन मोठमोठे दगडी खांब, तुळ्या, माळ्यावरील फरशी सर्व तेथेंच तयार करवून घेऊन ते पाठवू लागले. ते पाठविणे तसें सोपें नव्हते. महिना महिना वाट पाहूनदेखील वाघिणी मिळत नव्हत्या. तशातून हरप्रयत्नाने वाघिणी मिळवून, ते दगड रवाना करीत असत. ते दगड गदगला येत असत. पण तेथून १५ मैलांवर श्रीवेंकटपुरास नेणें, हें फार कष्टाचे काम होते. ते दगडी खांब काय किंवा तुळया काय, सर्वसाधारण चौकोनी असत. ६, ७ हात लांबीचे, एक हात रुंदीचे व एक हात जाडीचे ते दगड असत. त्यांची वाहतूक करून नेणें, अतिशय दुर्धर कार्य होते.
आसपासच्या कोणत्याही बाजूने वेंकटपुरास जाण्यास वाट नाहीं, अशा डोंगराळ भागात तें असल्याने प्रथम ब्रम्हानंद बुवांना त्यासाठी गदग-कळसापूर-नागावी-बेलधडी ते कबलायतकट्टी असा गाडीमार्ग तयार करावा लागला. त्यालाच हजारों रुपये खर्च आला. वडारी लोक बैल व रेडे जुंपून आपल्या गाड्यातून युक्ति प्रयुक्तीने सावकाशपणे दगड आणीत असत. १५ मैल अंतर तोडून मालाची एक खेप करणेस त्यांना दोन दिवस, तर क्वचितप्रसंगी तीन दिवसही लागत. अशा तऱ्हेने अतिप्रयासाने त्यांनी ती कामगिरी पुरी केली. त्याकडे नजर टाकली असता असल्या अरण्यांत एवढ्या प्रचंड शिला, बुवांनी कशा आणविल्या असतील, या विचारांनी कल्पनातीत आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाहीं.
श्रीवेंकटापूरचें देवालय फार भव्य आहें. तें निसर्ग सौन्दर्याने नटलेले आहें. शिखर फार मनोहर आहें. पवळीचा प्रकार फार सुंदर आहे. देवस्थानच्या समोर ज्या कांही पवळ्या आहेत, त्या वेगवेगळ्या भक्त लोकांनी बांधलेल्या आहेंत. उत्तर भागाची पवळी मलीकवाडच्या देशपांड्यांनी बांधविली असून, दक्षिण भागाची पवळी होम्बळचे बसनगौडा यांनी बांधलेली होती. येथें देवस्थानचे पटांगणात एक मोठा अश्वत्थवृक्ष होता. इमारतीचे कामास जेंव्हा सुरुवात झाली तेंव्हा, त्या वृक्षापासून होऊं लागल्यामुळे श्रीब्रह्मानंद गुरूंनी तो तोडविला. त्या अश्वत्थवृक्षाच्या बुंध्यात एक गणपतीची मूर्ति सांपडली होती. ती देवालयात ठेवण्यांत आली असून, अद्यापही ती तेथें आहे. पुढच्या बाजूला गोविंदराजाचे देऊळ आहे. तें पुर्वाभिमुखी आहे. या देवळाजवळच गोशाला व सूपशाला आहे. त्यालगतच उत्सवकाळांत गरज भासल्यास ब्राह्मण भोजनासाठी विस्तृत पटांगण आहें. तेथें मांडव उभारण्याची सोय आहे. श्रीवेंकटेशाचें स्थान खरोखरच इतकें रमणीय आहें कीं, पाहतांक्षणीच प्रत्येक भाविक माणसाचे मनांत भक्तिभाव उचंबळून आल्याशिवाय रहात. तसेंच येथें राहून साधन करावें असेंहि वाटल्याशिवाय राहवत नाहीं ; कारण साधन करणेस हें स्थान रम्य, अतिशय शांत आणि जगाच्या गजबजाटापसून दूर असल्याने अत्यंत पोषक असें आहें.
देवास पृथक् असें मनोहर शय्यागृह, पुष्करणीचे वाटेवर दीपमाळ असून देवाच्या मागील पोवळीत श्रीदत्तगुरूंच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. वास्तविक जीर्णोद्धाराचे वर्णन येथें संपलें असलें तरीं, त्या देवस्थानांतील स्वयंभू मूर्तीबद्दल यथासांग वर्णन येथें करणें अनुचित होणार नाहीं, या आत्मविश्वासाने तें येथें करीत आहे.
पूर्वी शेणाच्या व कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली श्रीवेंकटरमणाची ताज्या फुलांचा हार घातलेली, रेखांकित मूर्ति खणतांना मिळाल्याचे वर्णन येऊन गेलेच आहें. त्यावेळीं श्रीलक्ष्मीदेवीची स्वयंभुमूर्ति जवळ नव्हती. गाभाऱ्याचे बांधकामाचेवेळी वेंकटपतीच्या डावेबाजूस जमिनीच्या थोडा वर आलेला एक काळा दगड वाईट दिसतो म्हणून तो फोडून जमीन सारखी करण्याचें ठरविलें होतें. हें श्रीबुवांस समजताच, त्याच दगडातून पुढे श्रीलक्ष्मीदेवीचा उद्भव होणार आहे, हें अंतर्ज्ञानाने ओळखून, श्रीबुवांनी तो दगड फोडू नका, असें निक्षून सांगून तहकूब करविलें होतें. अजाणतेपणाने कितीतरी दिवस, येथील पुजारी भाविक भक्तांचा नारळ त्या दगडावर वाढवून प्रसाद देत असत. ही सांगोवांगी गोष्ट नसून, लेखकाने स्वतः पाहिलेली 'चक्षुर्वैसत्यम ' हकीकत आहे. एकदिवस जेंव्हा हें श्रीबुवांच्या दृष्टोत्पत्तीस आलें, तेंव्हा त्यांनी "लक्ष्मीदेवीच्या डोक्यावर नारळ फोडतां कीं रे ! किती धड्ड तुम्हीं ! यापुढें तसें करूं नका" असें सांगून टाकल्यापासून ती प्रथा बंद पडली. तेंव्हापासून श्रीवेंकटरमणाबरोबर दगडाची-श्रीलक्ष्मीदेवीचीहिपूजा त्यांनी सुरूं करविली. सर्वांस श्रीबुवांच्या उक्तीचे आश्चर्य वाटून जेंव्हा त्यांनी त्या दगडाचे सूक्ष्म निरीक्षण केले तेंव्हा, श्रीलक्ष्मीदेवीची रेखांकित रूपरेषा त्यांच्या नजरेस पडली. तो दगड आतां जमिनीतून बराच वर आला असून, त्यावर श्रीलक्ष्मीदेवीचे सर्व अवयव सुस्पष्ट दिसत आहेत. श्रीवेकटपतीच्या मूर्तीचे सर्व अवयव, त्याचे पाय जे पूर्वी जमिनीलगत होते, ते आतां चांगलें चार बोटें वर आले असल्याने, आतां पायांवर डोकें ठेवून उत्तम प्रकारे दर्शन घेतां येतें. कले-कलेने दररोज वाढणाऱ्या या श्रीवेंकटपतीच्या व लक्ष्मीदेवीच्या मूर्ति कुशल कारागिराने मेहनतपूर्वक तयार केलेल्या मूर्तीपेक्षा नयनमनोहर व सुबक दिसत आहेंत.
श्रीवेंकटापूरचे बांधकाम भव्य असें आहें. भोवतालची पवळी व ब्रम्हानंद बुवांचे मंदीर अत्यंत प्रेक्षणीय आहें. देवालयाला लागून सभामंडप तयार झालेला आहे. तें सर्व कार्य भक्त मंडळींच्या उदार आश्रयावर पार पडले आहे. श्रीब्रह्मानंद महाराजांच्या हयातीत देवालयाचें व पोवळीचे काम संपूर्णपणे संपलेले होतें. शंकर व वराह या देवळांच्या लगतचा महाद्वाराजवळील सभामंडप, श्रीगुरूंच्या समाधीचे बांधकाम, श्रीमारुतीचे, श्रीदेवीचे व श्रीगोविंदराजाचे अशीं देवळें श्रीबुवांच्या हयातीतच झाली होती. दक्षिणेकडील बाजूस असलेला पांथस्थ लोकांना उतरण्यासाठी बांधलेला मंगलोरी कौलांचा बांगला, पत्र्याचे स्वयंपाकघर, जनावरें बांधण्याचा गोठा वगैरें इमारती जवळजवळ श्रीबुवांचे हयातीतच तयार झाल्या होत्या असें म्हटले तरी चालेल. देवळाचे शिखर मात्र त्यांनी बांधलेले नव्हते. ज्यांनी देऊळ बांधले, त्यांनी शिखर चढवू नये असें श्रीबुवां वरचेवर बोलून दाखवीत असत. मात्र त्यासाठी त्यांनी ६,०००/- रुपयांचा निधी जमवून व्यवस्था करून ठेवली होती. ती रक्कम त्यांनी आपले पुतणे श्री. भीमराव गाडगोळी वकील यांच्या हवाली केली होती. त्याप्रमाणें शिखराचे काम आतां पूर्ण झाले आहे.
श्रीवेंकटापूर संस्थेच्या व्यवस्थेकरिता श्रीब्रह्मानंदगुरूंनी पंचांची नेमणूक केली होती. त्यांत १) श्रीपादभट्ट गुडगेरी २) शिरहट्टीचे श्री. आडवेप्पा मंगसुळी सावकार व ३) सोरटूरचे श्री. बंडेप्पा कुलकर्णी यांचा समावेश होता. श्रीपादभट्ट हे बालब्रह्मचारी होते. सुमारें ३० वर्षांहून अधिक काळ ते श्रीबुवांचे शिष्य होते. तेच वेंकटापूरचा सर्व कारभार जबाबदारीनें पहात असत. सध्यां ते हयात नाहींत. श्री आडवेप्पा हे ब्रह्मानंदगुरूंविषयी तसेंच श्रीवेंकटापूर क्षेत्रांविषयी अत्यंत श्रद्धा बाळगणारे व तन, मन, धनानें मदत करणारे सद्गृहस्थ होते. तेहि हयात नाहींत. या तिघांच्या संमतीने वेंकटापूर संस्थेचे नित्यनैमित्तिक कार्य व ने आण व्यवस्थित तऱ्हेने चालून हिशोबाचे कामही चोख ठेवले जात असे.
श्रीवेंकटेश देवलयाकरिता डंबळच्या देसायांनी २०० रु. उत्पन्नाच्या जमिनी कुडलगी मठपतीच्या स्वाधीन केल्या असल्याचा वृत्तांत वाचकांच्या लक्षांत असेलच. श्रीबुवांच्या हयातीतच त्या त्यांचेकडून देवस्थानच्या नांवे परत करून घेण्यांत आल्या. या देवस्थानचे जुन्या मानाने, वार्षिक कायम उत्पन्न सरासरीने ५०० ते ६०० रुपयांपर्यंत होतें. आतां तें वाढलेलेच असेल. श्रीवेंकटपुरास येणाऱ्या भक्तांच्या निमित्ताने होणाऱ्या दैनंदिन अन्नसंतर्पण खर्चासाठी मुळगुंद, शिरहट्टी, सोरतटूर वगैरें गांवचे प्रमुख लोकांनीं तांदूळ, डाळ, वगैरें कच्ची शिधासामुग्री पुरविण्याचा तोंडीं करार केला होता. त्याचें पालन आजतागायत त्या ग्रामस्थांनी चालविले आहे, हें खरोखरच अभिनंदनीय व भूषणावह आहें. नित्य नैमित्तिक उत्सवाकरिता वर्षासनाचीपद्धत आखून दिल्यानें येथील सेवा कार्यास, ती फार अनुकूल आहे. हल्ली पंचमंडळी बदलली आहेत. ती पुढील प्रमाणें :-- १)विरुपाक्ष धोंडे मंगसुळी वकील, मॅनेजिंग ट्रस्टी शिरहट्टी २)रामचंद्र चिदंबर कुलकर्णी, चिकहंदिगोळ ३)तिरको लक्ष्मण वैद्य, सोरटूर.
येथें दररोज पहाटे काकड आरती होते. दुपारी महाभिषेक, महापूजा, नैवेद्य, आरती असा कार्यक्रम असतो. नैवेद्याच्या वेळी केलेला सर्व स्वयंपाक, भांड्यासह श्रींपुढे मांडण्यात येतो. त्यानंतर भक्त, सेवेकरी, अतिथी अभ्यागतासह भोजनाप्रसादाचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी भजन, आरती वगैरें नित्य उपासना चालते. प्रत्येक शुक्रवारी पालखी सेवेचा सोहळा असतो. येथील सोवळे कडक असतें. सायंकाळी भोजन नसतें. श्रीबुवांनी जीर्णोद्धाराचे निमित्ताने विशेष वास्तव्य वेंकटपुरातच ठेवल्याने बेलधडी भजनी पद्धतीप्रमाणे तेथेंही त्यांनी नित्यनेमास सुरुवात करून दिली आहे
पुण्यक्षेत्र वेंकटापूर येथील पूजा आदि सेवेकरिता श्रीबुवांनी कांही भाविक लोकांस तेथें कायम ठेवले. तेथील सेवेकऱ्यांनी विशिष्ट प्रकाराने वागावे म्हणून, त्यांनी त्यांस कांहीं नियम घालून दिले. एवढ्यावरच न थांबता स्वतः तेथें राहून, त्या नियमांबरहुकूम त्यांनी आचरण करून दाखविले. त्या नियमांचा तपशील पाहूंया.
रोज अरुणोदयापूर्वी उठून प्रातः स्मरण व मुखमार्जनादि संपवून शय्यागृहाजवळ यावे. सुस्वर कंठाने 'उठि उठि' हें पद चौघडा आदि वाद्यांच्या गजरांत म्हणून देवाला जागें करून मग गाभाऱ्याचे दार उघडावे. त्यानंतर देऊळ स्वच्छ झाडून, सारवून, रंगावलीने सुशोभित करावे. नंतर देवाला काकडारती करावी. काकडारती संपताच सगळ्यांनी मिळून 'जयराम सीताराम' म्हणत देवळाभोवती ५ प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर क्रमानें श्रीमारुती, श्रीदेवी, श्रीगोविंदराज, श्रीवराह, श्रीशंकर, श्रीसद्गुरू, श्रीदत्तात्रेय, श्रीगणपती अशा सर्व देवांचे दर्शनास जावें. मुखाने अखंड श्रीराम नामस्मरण करीत जावे. या कार्यक्रमाचेवेळी एकाने पुढें जाऊन प्रत्येक ठिकाणी लोटून, सारवून रांगोळी घालावी व बाकीच्यांनी क्रमानें सर्व देवांची काकडारती करावी.
इतका कार्यक्रम पार पडल्यानंतर 'राम राम' म्हणत मळ्यांत जाऊन फुलें, तुळशी काढून आणाव्यात. देवाचे सकल पूजासाहित्याची यथासांग सिद्धता करून, अंघोळ करावी. संध्यादि नित्यकर्म पुरें करून देवावरील निर्माल्य, वस्त्रालंकार वगैरें काढून पंचामृतानें व सुगंधी तेलाने स्नपन करून अभिषेक करावा. शुद्ध व स्वच्छ अशा वस्त्राने देव पुसून कोरडा करावा. गंधलेपन करून, वस्त्रालंकार घालून, पुष्पमालानी देवास सजवावे. हा कार्यक्रम माध्यान्ही १२ वाजणेचे आंत संपला पाहिजे. त्यानंतर धूपदीप ओवाळून, शिजविलेले सर्व अन्न हें, अगोदरच देवापुढे सारवून रांगोळी घातलेल्या जागीं ठेवावे आणि महानैवेद्य दाखवावा. त्यानंतर क्रमानें श्रीगणपती, श्रीमारुती, श्रीसद्गुरू यांची आरती करावी. दरम्यानच्या काळांत भोवताली असलेल्या श्रीमारुती, श्रीदेवी वगैरें सर्व देवळांत जाऊन पूजा उरकून यावे. सर्व देवांची पूजा झाल्यानंतर तीर्थप्राशन करावे व आलेल्या अतिथी, अभ्यागतांचे बरोबर भगवंताचे स्मरण करीत, भोजन करावे.
भोजनोत्तर थोडी विश्रांति घेऊन संध्याकाळी ४ वाजता नित्यनेम आटोपून ५ ते ६ वाजेपर्यंत देवापुढे बसून "राम, राम"म्हणावें. संध्यासमय होतांच हातपाय धुवून भोवतालच्या देवळांत जाऊन आरती करून यावे. त्यानंतर सायंसंध्या करून सगळ्यांनी मिळून देवापुढे बसून भजनीपद्धतीने भजन करावें. भजन सुमारें दोनतासपर्यंत करावें. नंतर देवाला धूप, दीप, नैवेद्य करून मागें सांगितल्याप्रमाणे क्रमानें आरती करावी. पद्धतीप्रमाणे सर्व सेवा, स्तोत्रपाठ म्हणून देवाला शेजारती करून झोपवावे. हें झाल्यानंतर तीर्थप्रसाद घेऊन सगळ्यांनी मिळून जेवण करावे. भोजनोत्तर परमार्थासंबंधी चर्चा करून १० वाजलेनंतर भगवंतांचे ध्यान करतां करतां विश्रांति घ्यावी.
ब्रम्हानंद बुवांच्या अखेरच्या वास्तव्यात तर, बहुशः दररोज १५, २० येणारे जाणारे लोक असत. शिवाय नामस्मरणाचे निमित्ताने, ब्रम्हानंद बुवां लोकांना वरचेवर पाचारण करून जमवीत असत ते वेगळेच. धनुर्मासात तर श्रीबुवांच्या हौसेला पारच रहात नसें. एक महिनाभर दररोज, गिरीयेथील श्रीवेंकटपतीला अरुणोदयापूर्वी अभिषेक, महापूजा, महानैवेद्य होत असे. नैवेद्यास दररोज खिचडी, चिंचेचे सर, बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत तसेंच ताजे लोणी असा नेम होता. त्याप्रमाणें तो आजवर चालत आला आहे.
श्रीशृंगेरी कूडलीमठाचे जगद्गुरू श्रीशंकर भारती स्वामी यांनी या रम्य स्थळीं एका चातुर्मासात चार महिने मुक्काम ठेविला होता. श्रीबुवांनी त्यांची व्यवस्थाहि चोख ठेविली होती. संतोषित होऊन त्यांनी पूज्य बुवांची प्रशंसा केली व नित्यपूजा, नैवेद्य, नंदादीपासाठी कांहीं जमिनी व संस्थानकडून दरसाल कांहीं रोख रक्कम श्रीबुवांना दान दिली.
**
वेंकटापूर येथे घडलेली गमतीची गोष्ट:
श्रीब्रह्मचैतन्यमहाराज यांचा मुक्काम श्रीक्षेत्र वेंकटापूर येथें होता. पू. बुवाही त्यांचेबरोबर होते. एकेदिवशी सायंकाळी दिवेलागणीनंतर मद्रासकडील बाजूचे शंभर असामी वेंकटपुरास आले. त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांचे दर्शन घेतले, व थोडावेळ वाट पाहिली व श्रीब्रह्मानंदांस "आम्हांस जेवावयास वाढा" म्हणूं लागले. तो दिवस एकादशीचा असल्यानें श्रीबुवांच्या पद्धतीप्रमाणे जेवावायची कांहींच कांहींच व्यवस्था नव्हती. ब्रम्हानंद बुवांनी त्यांस तेथील नियम सांगितला व 'पहाटे ५ वाजता पाहिजे तर पानें मांडतो', म्हणून सांगितले. पण ते लोक कांही ऐकेनात. अखेर त्यांनी ती तक्रार श्रीब्रह्मचैतन्यांकडे नेली. श्रीब्रह्मचैतन्यमहाराजांस, कांही झालें तरीं, ब्रह्मानंदबुवा त्यावेळीं जेऊं घालणें शक्य नाही, याची खात्री असूनदेखील श्रीमहाराजांनी त्या लोकांस, "तुम्हीं जेऊं न घातल्यास आम्हांस तुमचेपुढे बोंबलण्यास सांगितले आहे", असा निरोप ब्रह्मानंदबुवास सांगा म्हणून परत पाठविलें. त्याप्रमाणें त्या लोकांनी बुवांना सांगितले. पूज्य बुवांनी निरोप ऐकला. त्यांतील आशय समजून घेतला व त्या लोकांस, "बरें आहें. अन्नाची सिद्धता होइपर्यंत आपण जरा भजन करूं या", असें म्हणून त्यांना मारूतीचे देवळासमोरील पटांगणांत नेऊन वर्तुळाकर बसविलें. आपण स्वतः मध्यभागीं बसून भजन सांगूं लागले. भजन इतकें रंगले कीं, ती मंडळी देहभान विसरून गेली. रात्रींचे २-२।। वाजून गेले असतील. श्री ब्रम्हानंद बुवांनी भजन थांबविले व "तुम्हांस भूक लागली आहे ना ? चला तर मग, हणमप्पाचे पाठीमागे काय सांपडते तें पहा", असें म्हणाले. मारुतीरायच्या पाठीमागे जाऊन पाहतां, एक लहानसे भाताचे तपेले व एक लहानसे झुणक्याचे पातेले झाकून ठेवलेले आढळले. भजन चालूं असतांना कोणी आलें गेलें नव्हतें. मग हीं दोन भांडी येथें आली कशी ?, याचे त्या मंडळींस आश्चर्य वाटलें. त्याचबरोबर एवढेंसे अन्न इतक्या मंडळीस पोटभर कसें होणार याची धास्तीहि त्या मंडळींस वाटली. पण तसें कोणी बोलून मात्र, दाखविलें नाहीं. श्रीबुवांनी पत्रावळी मांडावयास लावल्या व सर्वांस भोजन घातलें.
सर्वांची आकंठतृप्ती होऊन, शिवाय अन्न शिल्लक राहिलेले जेंव्हा त्या मंडळींनी पाहिले तेंव्हा तर ते सर्वजण अवाक् झाले. ब्रम्हानंद बुवांनी त्यांस विश्रांति घेण्यास सांगितले आणि वर "द्वादशीचा प्रसाद सकाळीं बरोबर ७ वाजता आहे.
तत्पूर्वी स्नान करून हजर रहा", असें बुवांनी बजावण्यास कमी केलें नाहीं.
***
पू. बाबा बेलसरे म्हणतात वेंकटापुर येथील वेंकटेशाची मूर्ती म्हणजे ही मूर्ती म्हणजे श्रीब्रह्मानंद महाराजांच्या तपश्चर्येचे फळ आहे. तेथे परमात्मा जागृत आहे. तो मागितलेले लवकर देतो. श्रीमहाराजांनी वेंकटापूरबद्दल असे सांगितले आहे की एकवेळ काशीला जायचे राहिले तरी चालेल पण एकदा तरी वेंकटापूरला जाऊन यावे.
जय श्रीराम!
फोटो स्रोत - गुगल


.jpg)









































.jpeg)