बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

 

 जय श्रीराम!

#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे - या शृंखलेत आज आपण बघणार आहोत.

 ८.  कांची समुद्रम् राममंदिर १९२३
पो. कांची समुद्रम, ता. हिंदूपूर, जि. अनंतपूर - ५१५३३१, आंध्र प्रदेश

Photo

कांचिसमुद्रम येथे श्री सीताराम राव या नावाचे गृहस्थ होते. त्यांचे मामा हणमंतराव बल्लारी तेथे सन १९०८ साली शाळामास्तराचे काम करत होते. एकदां गदगला आले असतां श्रीमहाराजांचें त्यांना दर्शन झालें. त्या दर्शनाने ते इतके प्रभावित झाले की कांचीसमुद्रमला परतल्यावर त्यांनी आपल्या सर्व नातेवाईकांना श्रींच्या दर्शनासाठी गोंदवलेस जा असा आग्रह केला. त्याप्रमाणे कांचीसमुद्रम् येथील दासा लक्ष्मय्या शेट्टी, श्री कृष्णराव, आप्पाजी शास्त्री, चीनप्पा रेड्डी यांनी गोंदवल्याला जाऊन सहकुटुंब श्रीमहाराजांचा अनुग्रह घेतला.
त्यातील दासा लछमय्या - हे श्रीमहाराजांचे निस्सीम भक्त झाले. 


 Photo

महाराजांशी ते इतके एकरूप झाले की महाराजांनीही त्यांना ' आपला ' म्हणाले असाव. कारण १९१३ मधे श्रीमहाराजांनी गोंदवले येथे जेव्हा देह ठेवला नेमक्या त्या वेळी इकडे कांचीसमुद्रमला लछमय्या अर्ध्य देत असता त्यांना श्रीमहाराजांचे साक्षात दर्शन झाले.
 Photo

लछमय्या यांना संतती नव्हती. श्रींचे दर्शन झाल्यापासून ते उपासनेत मग्न असायचे. दर गुरुवारी मंडळी कुठेतरी भजन उपासना करीत असत. उपासकांना एक ठिकाण असावे म्हणून लछमय्या यांनी स्वतःची जमीन श्रीरामाचे मंदिर बांधण्यासाठी १९२३ साली दान केली. श्रींनी त्यांना पादुका दिलेल्या होत्या. त्या पादुका त्यांनी प्रारंभी छोटसे मंदिर बांधून तेथे पूजेसाठी ठेवल्या, राम मंदिरही बांधले.
 त्याला 'ब्रह्मचैतन्य मंदिर' असें नांव दिलें.या मंदिराच्या व्यवस्थेसाठी ट्रस्ट निर्माण करण्यात आला. जी. होनप्पा यांनी ट्रस्टिपद स्वीकारल्यावर मंदिरालगतची आणखी काही जागा खरेदी करून ट्रस्ट ला दिली आहे.
हणमंतराव फार नामनिष्ठ होते. श्रीमहाराजांनी देह ठेवल्यानंतरहि त्यांचें सदेह सगुण दर्शन लछमय्यांना आणि हणमंतरावांना होत असे. पेन्शन घेतल्यावर हणमंतरावांनीं आपला सर्व काळ नामस्मरणांत घालविला.
श्रीमहाराजांच्या  चरित्रात आलेली त्यांची एक गोष्ट अशी की , हणमंत मास्तर दरवर्षी गोंदवल्यास येत. एकेवर्षी त्यांचा शेजारी लछमय्या त्यांच्याबरोबर गोंदवल्यास आला.,तो श्री महाराजांना म्हणाला,'मला मारुतीचे दर्शन घडवा.मारुतीराया आपल्या हातामध्ये आहे.'श्री महाराज म्हणाले,'असे वेड्यासारखे काय मागतोस?मारुती म्हणजे कोणी साधा मनुष्य आहे का?त्यांचे दर्शन तुला सहन होणार नाही".काही केल्या लछमय्या ऐकेना.पाच सहा दिवस रोज तो सारखे हेच मागे,एके दिवशी सकाळी तो स्नान करून आला आणि श्री महाराजांच्या पायावर डोके ठेऊन म्हणाला,'हनुमंताचे दर्शन झाल्याशिवाय मी डोके उचलणार नाही.हे ऐकून श्रीमहाराजांनी त्याला आपल्यासमोर डोळे झाकून बसण्यास सांगितले,आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला.एका क्षणात एक प्रचंड तेजाचा लोळ त्याने पाहिला व त्याची शुद्ध गेली.जवळ जवळ एक तासाने तो शुद्धीवर आला तेव्हा 'काय पाहिले'?असे त्याला श्री महाराजांनी विचारले. तेव्हा तो म्हणाला'महाराज काय सांगावे!आपला हात डोक्यावर टेकल्याबरोबर मी एक मोठे तेज पाहिले.त्याच्यात मी बुडून गेलो,आणि पुढे काय झाले मला ठाऊक नाही .श्री महाराज म्हणाले,'भगवंताचे खरे स्वरूप आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे,आपल्या देहबुद्धीला ते सहन होत नाही.आपल्याला इंद्रियांनी ज्ञान घेण्याची सवय असते.म्हणून नाद किंवा प्रकाश रूपाने भगवंताचे दर्शन होते.'परंतु त्या दिवसापासून लछमय्या च्या वृत्तीमध्ये मोठा फरक झाला.त्याचे लक्ष धंद्यावरून उडून  नामाकडे गुंतले आणि श्री महाराज हेच देव आहेत या भावनेने तो वागू लागला.

Photo
जय श्रीराम
फोटो स्रोत - गुगल

 जय श्रीराम!

#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे - या शृंखलेत आज आपण बघणार आहोत.

७.  गजेन्द्रगड राममंदिर, १९१६
पत्तार गल्ली, पो. गजेंद्रगड, ता. रोण, जि. गदग ५८२११४, कर्नाटक

 या मंदिरासंदर्भात श्री ब्रम्हानंद बुवांच्या चरित्रात उल्लेख आलेला तो असा कि,
गजेंद्रगड येथे गोविंद दीक्षित या नांवाचे एक अग्निहोत्री ब्राह्मण रहात असत. श्रीब्रम्हानंद महाराजांवर त्यांची अत्यंत भक्ति व विश्वास असल्याने ते त्यांच्या दर्शनाकरिता वरचेवर बेलधडीस व वेंकटपुरास जात असत. ब्रम्हानंद बुवांचही त्यांच्यावर तसेंच प्रेम असल्याने, त्यांनी त्यांस गोंदवलेस नेऊन श्रीमहाराजांच्याकडून अनुग्रह देवविला होता.
     शके १८३५ मध्यें ब्रम्हानंदांच्या आज्ञेप्रमाणें श्री दीक्षित अग्निहोत्री श्रीमहाराजांच्या दर्शनास गोंदवलेस गेले असतां त्यांस श्रीमहाराजांनीं आदरपूर्वक चार दिवस ठेऊन घेतले होते. एकेदिवशी श्रीमहाराजांनीं "इतक्या लांबवर कां येणें केलें होते ?" असा त्यांस प्रश्न विचारला. त्यांनी अत्यंत नम्रतेने "केवळ आपल्या दर्शनासाठी" असें उत्तर दिले. तेंव्हा श्रीमहाराजांनीं मंदहास्य करीत "ब्रह्मानंद हा माझा केवळ प्राण आहे. तुम्हां लोकांकरिताच मी त्यांस तिकडे पाठविले आहे" असें सांगितले व "तुमच्या घरांत अग्निहोत्र आहें. आपल्या वयस्कर मातापित्यांची शुश्रूषा पण तुम्ही चालविता. यावरून तुम्हीं कृतार्थ आहांतच. तरीपण घरीं श्रीरामाची स्थापना करून खऱ्या अर्थाने कृतार्थ व्हा" असें म्हटले. त्यावर आपल्या आज्ञेप्रमाणें सिद्धता करतो. आपल्या अमृतहस्तानेच प्रतिष्ठापना करणेची कृपा व्हावी" अशी त्यांनी प्रार्थना केली.
     श्रीमहाराजांनीं आपल्या हातानें एक पत्र लिहून तें ब्रह्मानंदबुवांसाठी दिलें व त्यांना "समक्षांत मी येण्याचा योग दिसत नाहीं. थोड्याच दिवसांत मी नैमिषारण्याला जाणार आहे. ब्रह्मानंदबुवांकडून तुमच्या मनासारखे काम होईल" म्हणून सांगून आशीर्वाद देऊन पाठविलें. पुढें थोड्याच काळांत श्रीमहाराज समाधिस्थ झाले.
 गोविंद दीक्षितांनी गांवी जाऊन श्रीब्रह्मनंदबुवांची भेट घेऊन, पत्र देऊन निरोप कळविला. आणि श्रींच्या आज्ञेप्रमाणें घरांतच मंदीर बांधण्यास त्यांनी सुरुवात केली. मंदीर तयार होतांच त्यांनी मूर्तीहि आणविल्या. शके १८३८ च्या रामनवमी उत्सवास जाऊन, दीक्षितांनी मंदिराची सर्व हकीगत निवेदन करून "माझा उद्धार करावा" अशी पु. बुवांना प्रार्थना केली.
     ब्रम्हानंद बुवांनी "वैशाख वद्य सप्तमी हा मुहूर्त बरा आहे. श्रीराम सिंहासनावर बसण्यास शुभ दिन आहे. त्याच दिवशी प्रतिष्ठापना करा" असें त्यांस सांगून पाठविलें.
     गोविंद दीक्षित नाराज झाले. वेंकटपुरास जाऊन, त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून "तेथवर येऊन मला कृतार्थ करा" असें त्यांनी मागून घेतलें. त्यावेळीं ब्रम्हानंदबुवांना थंडीताप आला होता. घोंगडे पांघरून थडथडत ते अंथरुणावर झोपले होते. दीक्षितांची विनंति ऐकून, "थंडीने मी मरायला लागलो आहें, तापाने फणफत आहे. असल्यात मला ये म्हणतोस. दररोज येणाऱ्या थंडीने मी अशक्त झालों आहें. मला येतां येणार नाहीं. एखादेवेळी वाटेतच आटोपेन. माझ्यावर विसंबून राहूं नकोस. तूंच उरकून घे." असें सांगताच," तुमच्याशिवाय तें होणार नाहीं, तसेंच राहून जाईल." असें दीक्षितांनी सांगितले. त्यावर "हट्ट धरूं नकोस. थंडी कमी झाल्यास मी येतोच. नच आल्यास, अशा प्रकारे उरक" असें म्हणून त्यांनी त्यांस सर्व विधि समजावून सांगितला.
     गोविंद दीक्षित ब्रम्हानंदांची आज्ञा प्रमाण मानून, पण खिन्न अंतःकरणाने गांवी गेले. दयानिधी ब्रम्हानंदांनी प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी वेंकटापूर सोडले व ते गदगला आले व दोन शिष्यांना बरोबर घेऊन भाड्याचा झटका करून गजेंद्रगडला जाण्यास रात्रीं निघाले. श्री बुवांची जाण्यासारखी परिस्थिति नसतांना देखील, श्रीमहाराजांचें आज्ञापत्र असल्याने, ते देहाची पर्वा न करता निघाले.  ब्रम्हानंद बुवांना श्रीसद्गुरू आज्ञेपेक्षा या जगांत जास्त श्रेष्ठ कांहीं दिसत नव्हते हें जसें खरें, तसेंच श्रीमहाराजांच्या आज्ञेशिवाय ते कोणतीहि गोष्ट करीत नसत हेंहि तितकेच खरें !( याचे प्रत्यंतर म्हणजे, तोपीनकट्टीच्या भक्ताने श्रीरामरायाच्या मूर्ति आणवून त्यानें श्रीगुरूंस प्रतिष्ठापनेसाठी असंख्य वेळां पाचारण करूनही श्रीमहाराजांची आज्ञा नसल्याने, श्रीगुरू प्रतिष्ठापनेस बिलकूल गेले नाहींत हें होय. श्रीब्रह्मानंदगुरूंच्या समाधि कालानंतर मग ती प्रतिष्ठापना उरकली गेली.)
     गदगहून निघून ब्रम्हानंद बुवांनी नरेगलला मुक्काम केला व तेथून पहाटे निघून अरुणोदयापूर्वी दीक्षितांच्या दरवाज्यांत येऊन उभे राहिले. आदले रात्रीं १० वाजेपर्यंत दीक्षितांनी बुवांची वाट पाहिली. ते न आल्यानें खिन्न होऊन, दीक्षित अंथरुणावर पडले. पण त्यांस झोप आली नाहीं. अकस्मात बुवांचे आगमन झालेलें पाहून दीक्षित आश्चर्यचकित झाले. तसेंच त्यांच्या आनंदास पारावार राहिला नाहीं. फक्त वाद्यघोषांत श्रीब्रम्हानंदाना गांवात मिरवत आणण्याची इच्छा फलद्रूप झाली नाहीं म्हणून त्यांस विषाद मात्र वाटल्याखेरीज राहिला नाहीं.
     प्रिय सज्जन हो ! श्रीगुरूंनी दीक्षितांस चाळविण्या कां दाखविल्या ? खरोखर त्यांच्या मनांतून जावयाचे नव्हतें कां?  तें कसें शक्य आहें ? मग अकस्मात दत्त म्हणून उभें राहण्यातील हेतू काय असावा, असें तुम्हांस वाटतें ? असें करण्यांत श्रीगुरूंचा एकमेव हेतू जर कोणता असेल तर तो हाच कीं, त्यांना स्वतःचे अवडंबर माजविलेले खपत नव्हतें व कोणत्याहि गोष्टीचा अवास्तव गाजावाजा करण्याच्या ते विरुद्ध होते.
     प्रतिष्ठापनेबाबतचे होमहवन संपवून श्रीब्रम्हानंदांनी स्वतः श्रीरामरायाला अलंकारांनी सजविले. राजोपचारांनी पूजा करून, महानैवेद्य, मंगलारती केली. त्यादिवशीं त्यांच्या आज्ञेप्रमाणें मुक्तद्वार अन्नसंतर्पण झालें.
     दुसरे दिवशी सकाळीं स्नानसंध्या उरकून, श्रीरामरायाच्या पायावर तुळशी चढवून, अग्निहोत्र्यांच्या होमशालेतील अग्निनारायणासमोर श्रीबुवांनी १०० रुपये दक्षिणा ठेवली, तीन प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. दीक्षितांच्या मुलांना "दरवर्षी रामनवमी उत्सव भिक्षा मागून कां होईना, पण न चुकतां करा. वर्षातून एकदा तुलसीदलानी व बिल्वदलानी पूजा झालीच पाहिजे. कसल्याही प्रसंगीं धर्म, नीति, श्रीराम यांवरील विश्वास ढळू देऊं नका. यथाशक्ति अन्नदान करा. सदा नामस्मरण करीत जा. म्हणजे श्रीरामराय तुमचें कल्याण करील", असा उपदेश करून ते जाण्यास सिद्ध झाले. तेंव्हा गांवातील अनेकांनी श्रीबुवांना आपापल्या घरीं बोलावून नेवून, पूजा करून त्यांचा अनुग्रह घेतला. यांतच दिवस गेल्यामुळे बुवांचा त्यादिवशी तेथें मुक्काम झाल्यानें लोकांना फार आनंद झाला. दुसरें दिवशीं सर्व भाविकांना आशीर्वाद देऊन, श्रीरामरायाचा उत्सव तुम्हीं सर्वांनी मिळून न चुकतां केला पाहिजे, असें सर्वांस बजावून श्रीब्रम्हानंद बुवा वेंकटपुरास आले. 


फोटो स्रोत: फेसबुक
**

जय श्रीराम!

आपण पाहत आहोत,
#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे

५.  जोगळेकर राममंदिर, धारवाड १९१५
माळमड्डी, एम्मीकेरी, स्टेशनरोड, धारवाड, जि. हुबळी - ५८०००१, कर्नाटक

वनवासी राम मंदिर ( जोगळेकर राम मंदिर)
कृष्णशास्त्री उप्पिनबेटिगिरी नावाचे कर्नाटकातील अतिशय विद्वान संस्कृत पंडित, श्रीमहाराजांचे शिष्य होते . मैसूर दरबारनें त्यांना 'विद्वानन्मुकुटमणि' ही पदवी दिली होती. 'वेदान्तावर संस्कृत भाषेत लिहिलेला कोणतहि ग्रंथ मी अभ्यासलेला नाही असे नाही.'असे ते सांगत.
वनवासी राम

श्रीब्रम्हानंद महाराज दक्षिणेंत गेल्या नंतर त्यांनी शक्य तितके श्रीमहाराजांचे नांव सांगून लोकांना त्यांचे अनुयायी केले. त्याच्यामुळेंच श्री.कृष्णशास्त्री श्रीमहाराजांकडे गेले व त्यांनी त्यांचेकडून उपदेश ग्रहण केला श्रीमहाराजांची व त्यांची पहिली भेट बेलधडी येथे झाली तेव्हां त्या दोघांचा सुमारे ३ तास संवाद झाला संवादाचे शेवटी शास्त्रीबोवांनी श्रीमहाराजांना साष्टांग नमस्कार घातला व पुनः त्यांचेबरोबर कधीही वाद घातला नाहीं. त्यानंतर 'श्रीमहाराज बोलूं लागले म्हणजे साक्षात वेद बोलत आहेत असे वाटतें' असे ते म्हणत असत. श्रीमहाराजांचे त्यांचेवर अतिशय प्रेम होते व ते त्यांना फार सन्मानपूर्वक वागवीत.
 श्रींनी दोन रुपये प्रसाद म्हणून देऊन धारवाडमध्ये दोन राम मंदिरे बांधायला सांगितली होती. त्यानुसार त्यांच्या हस्ते  दोन राममंदिराची स्थापना झाली. एक लाईनबझारमध्ये, त्यांच्या नात्यातल्या गंगाबाई यांनी बांधलेले; आणि दुसरे माळमड्डीवर, त्यांचे स्नेही निवृत्त न्यायाधीश श्री वासुदेवराव जोगळेकर यांच्या जागेवर बांधलेले. या मंदिरात वनवासी रामाच्या मूर्ती आहेत.

या कृष्णशास्त्रींची गोष्ट अशी की हे श्रींनी दिलेले दोन रुपये त्यांच्या पूजेत असत. एकदा त्यांनी दारावर नेहमी येणाऱ्या एका बाईकडून दोन रुपयांचे धान्य घेतले, व त्यावेळी जवळ पैसे नसल्याने दुसऱ्या दिवशीचा वायदा केला. दुसऱ्या दिवशी ती बाई येईपर्यंत रकमेची व्यवस्था होऊ शकली नाही. वायदा पुरा न केला तर आपली अब्रू जाणार अशी वेळ येऊन ठेपली, तेव्हा निरुपाय होऊन पूजेतले रुपये देण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून शास्त्रीबुवांनी ते उचलले. एवढ्यात पोस्टमन येऊन त्याने पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभेतर्फे परीक्षक म्हणून केलेल्या कामाचे मानधनाची मनीऑर्डर दिली ती नेमकी दोन रुपयांची! श्रीगुरुमाउलीची ही कृपा पाहून शास्त्रीबुवांच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले! आजही ते दोन रुपये त्यांचे चिरंजीव भालचंद्रशास्त्री यांच्या पूजेत आहेत.

                गोंदवल्यास असतांना श्रीमहाराज एका शेतकर्याला परमात्मा सर्व कर्ता कसा आहे हे समजावून सांगत होते. जवळच कृष्णशास्त्री होते. ते विवेचन चालू असतां शास्त्रीबुवांच्या मनात काही शंका आली की बोलण्याच्या ओघात श्रीमहाराज तीच शंका काढून तिचे उत्तर देत. असे बराच वेळ चालले. शेवटी श्रीमहाराज म्हणाले, ' हे बघ ! शंकांना अंत नाही. तेंव्हा विद्वानासारख्या शंका न घेतां तू नाम घेत जा .' हे शब्द ऐकून शास्त्रीबुवा उमजले आणि , ' त्वमेव शरणं मम् ' असे म्हणून त्यांनी श्रीमहाराजांना साष्टांग नमस्कार घातला.

                 श्रीमहाराज काशीमध्यें असतांना शास्त्रीबुवा बरोबर होते. त्यांचा व पं. मदनमोहन मालवीय यांचा फार स्नेह होता. पं मालवीय एक मोठे संस्कृत कौलेज काढण्याच्या खटपटीत होते. कृष्णशास्त्रींनी तेथे प्रधानाध्यापकाची जागा स्वीकारावी अशी त्यांची इच्छा होती., परंतु श्रीमहाराजांची अनुज्ञा त्यांना मिळाली नाही.

                काशीमध्यें संस्कृत पंडितांची सभा होती. शास्त्रीबुवा अध्यक्ष होते. चार वाजतां उघडे , खांद्यावर पंचा टाकलेले व लांडे धोतर नेसलेले शास्त्रीबुवा सभेला पायीं निघाले. श्रीमहाराज म्हणाले, ' छे , आपण अध्यक्ष शोभलों पाहिजे ना ! ' श्रीमहाराजांनी भरजरी शाल शास्त्रीबुवांना  पांघरली, दोन चतुर माणसें बरोबर दिली , आणि बग्गीत बसवून त्यांना सभेला पाठविले. स्वतः पं मालवीय त्यांना घेण्यास सामोरे आले.
केडगांवच्या साधूंनी एकदा शास्त्रीबुवांना एक भारी शाल दिली. ती त्यांनी तेथेच एका गरीबाला देवून टाकली , व ही गोष्ट श्रीमहाराजांच्या कानावर घातली. तेंव्हा श्रीमहाराज म्हणाले , ' आपले चुकले शास्त्रीबुवा ! प्रारब्धाने आलेले नको म्हणणे हे सुद्धा वैराग्याला बाधक असते ! ' शास्त्रीबुवा म्हणाले , ' हे सत्पुरुष कुठे आणि कसे बरोबर पकडतील याचा नेम नाही. '
काशीहून धारवाडला आल्यावर एकदोन वर्षांतच कृष्णशास्त्रींना अर्धांगाचा झटका आला. पुढे ते गोंदवल्यास आले. श्रीमहाराज रोज त्यांच्या समाचारास जात. शास्त्रीबुवा श्रीमहाराजांच्या दर्शनास आले म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवीत आणि त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घेत. पंडितांच्या सभेत गर्जना करणारे कृष्णशास्त्री श्रीमहाराजांशी बोलतांना मात्र , ' जी महाराज, होय महाराज ' , असे लीनतेने बोलत. या महापुरुषाचा अंत १९२० साली झाला.
वरील ( आजाराचे ) प्रसंगी श्रीमहाराजांनी एकदां भागवतपुराण काढून बोलायला सुरवात केली.त्यांत धर्मस्थापनेचा प्रश्न आला.शास्त्रीबुवा फार धर्माभिमानी होते.त्यांनी त्या वेळच्या कांही धटनांचा उल्लेख करुन अधर्म फार वाढत असल्याचें म्हटले.त्यावर श्रीमहाराज एकदम उठून उभे राहिले व समोरच्या भिंतीवर पडलेले सुर्याचे किरण दाखवून म्हणाले ," आपण काळजी करुं नये पुनः धर्मस्थापना होऊन धर्माची घडी बसेलच बसेल." शास्त्रीबुवांनी ती केव्हा बसणार हे एक दोन वेळा खाजगी भेट घेऊन विचारुन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येकवेळी दुसरा मुद्दा काढून व त्यांना त्यांत गुंतवून त्यांना त्यांचा मुद्दा काढण्यास वेळच दिला नाही.
     एकदा श्रीमहाराज त्यांची नेहमी हजामत करणाऱ्या चिलया नावाच्या नापिताच्या घरी गेले. शास्त्रीबुवा त्यांचे बरोबर होते. त्यांच्या घरांत एक चिमणी लावलेली होती. ती चिमणी दाखवून श्रीमहाराज शास्त्रीबुवांना म्हणाले, " हे काय आहे? " त्यावर ते म्हणाले ,"महाराज ती चिमणी जळते आहे." श्रीमहाराजांनी " ती कशी काय जळते हो ?" असे विचारले तेव्हा या विचारण्यांत कांहीतरी हेतु आहे असे वाटून शास्त्रीबुवा म्हणाले," महाराज ते मला कळत नाही.
तेव्हा महाराज म्हणाले," हे मला फार आवडते ". सदगुरु हा ज्ञानी पुरुष असतो. त्याचे जवळ कसे बोलावे व वागावे हे या वरुन शिकण्यासारखे आहे.
     एकदा गोंदावले येथे शास्त्रीबुवा, श्रीब्रम्हानंद व डाॕ.कूर्तकोटि असे हजर होते. तेव्हा कांहीतरी उद्योग पाहिजे म्हणून श्रीमहाराजांनी पोथी काढावयास सांगितली व सर्वांना थोडा थोडा वेळ कांहीतरी सांगावयास सांगितले. श्रीब्रम्हानंद तेथून निघून गेले. डाॕ.कूर्तकोटिंनी तास भर सांगितले. दरम्यान श्रीमहाराज बाहेर गेले होते ते परत आल्यावर काय सांगितले असे विचारले मग शास्त्रीबुवांना " तुम्ही कांहीतरी सांगा " असे श्रीमहाराज म्हणाले . तेव्हा शास्त्रीबुवा उगेच राहिले तोंडातूंन शब्द फूटे ना आणि रडूच लागले. तेव्हा " काय झाले शास्त्रीबुवा ?" असें श्रींनी विचारल्यावर म्हणाले ' आपल्या समोर मी काय सांगू ?'
     डाॕ.अॕनी बेझंट बाईंनी बनारसला सुरु केलेल्या संस्कृत पाठशाळेंत मुख्याध्यापक म्हणून मदनमोहन मालवीयांनी शास्त्रीबुवांना बोलाविलें होते. त्यांनी श्रीमहाराजांना विचारल्यावर "जाऊ नका " असे सांगितले . ते फार मोठे पंडित होते परंतु त्यांना व्यवस्थापनाचे काम (Administration ) जमले नसते.
एकदां शास्त्रीबुवा श्रीमहाराजांबरोबर अयोघ्येला गेले होते. तेथील जंगलांत 'हनुमानगढी' म्हणून एक स्थान आहे. तेथे गेलें असतां साक्षात मारुतिरायांचे दर्शन होतें असे त्यांनी ऐकले होते. म्हणून एक दिवस नित्याप्रमाणे संघ्यावंदनादि आन्हिक उरकून एकटेच ते त्या स्थानाच्या दिशेनें निघाले. कांहीं अंतर गेल्यावर एकाड भाग लागला. इतक्यांत समोरुन श्रीमहाराज येतांना त्यांना दिसले. नमस्कार वगैरे झाल्यावर श्रींनी 'फिरायला निघालां का ? 'असे विचारले. तेव्हा शास्त्रीबुवांनी आपला बाहेर पडण्याचा उद्देश सांगितला. त्यावर श्रीमहाराज म्हणाले," चांगलें आहे. जाऊन आल्यावर पुनः भेटूं, परंतु एक गोष्ट सांगतो कीं मनांत जरा सुध्दा शंका असेल तर मारुतिराय समोर येऊनही उमगणार नाहींत" त्यावर 'माझे मनांत कांहीहि शंका नाही" असे शास्त्रीबुवा म्हणाले. तेव्हां श्रीमहाराजांनीं पुनः तेंच सांगितले व 'जाऊन यावे मग भेटूं" असे म्हटले. मग शास्त्रीबोवा बरेच पुढे जंगलाजवळ गेले तेव्हा त्यांना समोरुन एक काळाकभिन्न,धिप्पाड असा एक कातकऱ्यासारखा मनुष्य येतांना दिसला. त्याच्या दृष्टीनें तो अर्थातच स्पर्शयोग्य नसल्यामुळें तो येत असलेल्या रस्त्याच्या विरुध्द बाजूनें ते जाऊं लागले. तरीहि तो मनुष्य आपली बाजू सोडून त्यांचेजवळ आला व त्यांना एक जरासा घक्का देऊन पुढे गेला. मारुतीरायाच्या दर्शनाऐवजीं हे वाट्याला आल्यामुळें त्यांना वाईट वाटले व स्पर्शदोषाचा परिहार करण्याकरतां जवळच असलेल्या शरयूनदीच्या तीरावर आले. तेथे हातपाय घुऊन मार्जन वगैरे करतात इतक्यांतच त्यांना श्रीमहाराज तेथे दिसले. "दर्शन झाले का ?" असें त्यांनी विचारले तेव्हा शास्त्रीबुवांनी झालेली हकिकत सांगितली . तेव्हां श्रीमहाराज म्हणाले ," मी आपणास अगोदरच सांगितले होते की कणभरही शंका असेल तर मारुतीराय समोर येऊनही उमगणार नाहींत.ते साक्षात मारुतीरायच होते." सामान्य मनुष्य आपल्या सारख्याला स्पर्श होऊं नये याबद्दल काळजी घेतो.हा मनुष्य वाट सोडून आपल्याला स्पर्श करतो यावरुनच आपल्याला लक्षांत यावयास पाहिजे होते " हे ऐकून शास्त्रीबुवांना फार वाईट वाटले.तेव्हा श्रीमहाराज स्वतः त्यांना घेऊन त्या स्थानांत गेले.शास्त्रीबुवांना उभे राहण्यास सांगितले व स्वतः क्षणभर डोळे मिटून उभे राहिले. तत्काळ शास्त्रीबुवांना आपल्या समोर मारुतिराय तेजोरुपांत उभे असलेले दिसले. पण ते तेज सहन न होऊन ते भोवळ येऊंन पडले.तरी पण त्या वेळी " आपले हें रुप त्यांना सहन होणार नाही तरी आपण सौम्य रुप घारण करावे." असे श्रींचे शब्द त्यांना ऐकू आले.मग श्रीमहाराजांनी त्यांना उठवले तेव्हां मारुतिराय त्यांना सौम्यरुपांत दिसले. मुक्कामी आल्यावर शास्त्रीबुवांनी ही हकिकत (कै) गं.भा.गंगूताई आठवले यांना सांगितली .
शास्त्रीबुवांचे चिरंजीव पंडित नागेश शास्त्री वडिलांनप्रमाणे प्रकांड पंडित होते.एकदां त्यांना प्लेग झाला काही केल्या उतार पडेना.डोळे मिटण्याची किंवा तोंडात कांही घातले तर गिळण्याची शक्ति राहिली नव्हती.श्री.कृष्णाशास्त्री त्यावेळी गोंदवल्यास होते तेथे त्यांना पत्र गेले.पत्र पाहून श्रीमहाराज म्हणाले , " आपण गेले पाहिजे ना ?" शास्त्रीबुवा त्यांना म्हणाले , ' मी सर्व आपले स्वाधीन केले आहे.आपणास योग्य वाटेल ते करावे.' श्रींम्हणाले "ठीक आहे रामकृपेने त्यांना बरे वाटेल." आणि त्याच वेळेपासुन नागेश शास्त्र्यांना धारवाड येथे बरें वाटू लागले.आणि ते पूर्ण बरे झाले.

पु. बाबा बेलसरेंनी एका प्रवचनात पंडित भालचंद्रशास्त्री उप्पीनबेटीगिरी  ( कृष्णशास्त्रीचें नातू ) यांच्याबद्दल उल्लेख केला होता.
(श्री भालचंद्रशास्त्री उप्पीनबेटगिरी पूज्य बाबा बेलसरे यांच्यासमवेत )

धारवाडला भालचंद्रशास्त्री म्हणून आहेत. कृष्णशास्त्रींचे हे नातू आहेत. दोन-तीन वर्षापूर्वी मी वेंकटापूरला गेलो होतो. तेंव्हा ते बंगलोरहून आले तर कृश झालेले दिसले, म्हणून म्हटले, 'शास्त्री बुवा, आपण अशक्त दिसता!' तर ते म्हणाले 'मी कृश झालेलो आहे-अशक्त नाही'.  कारण काय? तर म्हणाले 'आठ दिवस बनारसला conference होती. त्यात राजेशशास्री प्रमूख होते. राजेशशास्री म्हणजे प्रचड विद्वता. तेंव्हा भालचंद्रशास्त्री म्हणाले 'आठ दिवस राजेशशास्त्री दूधाशिवाय कांही पीत नव्हते. मी ही तसाच राहिलो. कारण काय? तर म्हणाले, बूद्धि तीक्ष्ण रहाते'. बुद्धीला सूक्ष्मता यायला खाणे असे बेताचेच पाहिजे. एकादशीला पोट हलके ठेऊन जर नामस्मरण केले तर नामाची तार अशी लागते की बोलायची सोय नाही.
***
६.  लाईन बझार राममंदिर, धारवाड १९१५
उप्पीनबेटीगिरी, लाईनबझार, धारवाड - ५८०००१, कर्नाटक


श्री कृष्णशास्त्री उप्पिनबेटगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड लाइन बाजार भागात दुसरे राम मंदिर स्थापन करण्यात आले आहे.
श्रीमती गंगाबाई उप्पिनबेटगिरी यांच्या जागेत हे मंदिर असून मंदिराचा बांधकामाचा खर्च गंगाबाईंनीच केला. मंदिराच्या स्थापनेसाठी श्री नारायण महाराज केडगावकर आले होते. पूर्वी रामभट्ट पुरोहित पूजा करीत असत. सध्या गंगाधरपंत कुलकर्णी पूजा करतात. दर मंगळवारी महिला भजन करतात. श्रींची स्वतंत्र उपासना येथे चालत नाही.

संदर्भ: चैतन्य स्मरण विशेषांक २०००
जय श्रीराम




गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६

 जय श्रीराम!

आपण पाहत आहोत,
#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे
४. अश्वत्थपूर राममंदिर १९१५
पो. अश्वत्थपूर, जि. मंगळूर, ५७४२६६, कर्नाटक

दक्षिण कन्नड प्रांतात कारकळ नांवाच जिल्हा आहे.त्यांत मंगळूर नावाचा तालूका आहे.तेथील देशस्थ ब्राम्हण पहिल्या पासूनच अत्यंत गरीब स्थितीत होते.साहजिकच त्यांस अत्यंत कष्टाळू जीवन जगावें लागत असे.त्यांचा तेथे चरितार्थ चालत नसल्याने गदग,हुबळी,धारवाढसारख्या शहरांत पोटासाठी स्वयंपाक पाण्यासारखे जीवनाचे साधन पत्करुन ते रहात असत.कर्नाटक प्रांतात श्रीब्रह्मानंदगुरुंचे नाव सर्वतोमुखी झाले असल्याने स्वयंपाकी,पाणके,या नात्याने त्यांना श्रीब्रह्मानंदांच्या दर्शनाचा लाभ झाला.श्री ब्रह्मानंदगुरुंचे अगाध ज्ञान,उच्च प्रतिचे वैराग्य,दया,शांति,वगैरे पाहून ते त्यांचेकडे आकर्षिले गेले व ते श्रीगुरुंच्या सेवेत निरत झाले.श्रीगुरुंना उत्सवप्रसंगी, यज्ञप्रसंगी, सप्ताह प्रसंगी,हरघडी भोजनाचे कामी या लोकांचे अपरंपार साह्य होत असल्याने श्रीगुरुंच्या ते विशेषतं नजरेंत भरले.पर्यायाने श्रीगुरु त्यांचेवर फार प्रेम करुं लागले.

बिदरहळ्ळी येथील तेरा कोटि नामजप यज्ञाचे प्रसंगी श्रीब्रह्मचैतन्य महाराज तेथे आल्यावेळी स्वयंपाक-पाण्यासाठी दोड्डारामय्या,सण्णरामय्या वगैरे प्रमुख मंडळी आपआपल्या शे-दोनशे हस्तकांसह तेथे उपस्थित झाली होती. त्यापैकी गुत्ती रामय्याने आपल्या समाजाचे उध्दारार्थ आपण श्रींच्या पुढे हट्ट धरला पाहिजे. श्रीब्रह्मानंद मनावर घेत नाहीत श्रींकडे बोट दाखवितात. ही संधि गमावतां कामा नये असा विचार सर्वांपुढे मांडला व तो सर्वांस पटला.
एके दिवशी श्रींना सुगंधी तेलाने अभ्यंगस्नान घालून श्रीब्रह्मानंद परत येत असता तुंगभद्रेच्या वाळवंटात ही मंडळी ब्रम्हानंद महाराजांच्या पायावर लोळूं लागली. *काय पाहिजे,काय झाले ?" असे विचारता आमचा उध्दार करा. आम्ही गरीब, मागासलेले, उध्दाराचा मार्ग आम्हास मुळीच माहित नाही. आमच्या गावी आपल्या हस्ते श्रीरामाची स्थापना करा.*अशी विनंती केली " बरे आहे करु या " असे श्रीबुवांकडून आश्वासन मिळवले.

सांगतामहोत्सव संपताच अश्वत्थपूरची मंडळी जरी आपआपल्या गांवी गेली तरी गुत्तीरामय्या श्रीब्रम्हानंद बुवांच्या सेवेस तेथेच राहिला, श्रीबुवांच्या आज्ञेप्रमाणे एक दोन वेळा गुत्ती रामय्याने गांवी गेल्यावेळी आपण प्रत्यक्षांत अनुभविलेल्या श्रीमहाराजांच्या व ब्रम्हानंद बुवांच्या अगाध महिम्याचे इतके रसाळ वर्णन केले की त्या मुळे त्या सर्व लोकांच्या मनांत भक्ति व प्रेम निर्माण होऊन ते श्रीरामनाम घेऊ लागले.
 त्यावेळी अश्वत्थपूर एक डोंगराळ वस्तीचा जवळजवळ निर्जन प्रदेश होता.त्यांत नुई महादेवभट्टाचे एकमेव दुकान होते. शेकडो गगनचुंबी अश्वत्थ वृक्ष पसरले होते,एक मोठा पिंपळकट्टाही होता.या गांवास पूर्वीचे नांव पिंपळ होते. वृक्षांनी गजबजलेले हे स्थानच देऊळ बांधण्यास योग्य असे ठरवून पी. नारायण अप्पांच्या आईचे वडील सुब्बरायभट्ट यांच्या अंगणातील कट्यावर गुत्तीरामय्यांनी श्रींचा फोटो व बिदरहळ्ळीस त्यांचे हस्ते मिळालेले आशीर्वाद फळ ठेवून व मंत्राक्षता ठेवून नामसप्ताह सुरु केला व त्याचे पाठोपाठ आपल्या स्वतःच्या खर्चांने हल्लीच्या देवळाचा गाभारा त्याने बांधला. त्यास सुमारे २०० रुपये खर्च आला. 

मग मात्र गावचे पुढारी लोकांस या कृत्याने चालना मिळून त्यांने देऊळ बांधण्याचा निर्धार केला. कार्यास प्रारंभही केला. देवस्थानाचे बांधकाम १९१० मध्ये संपले. गावच्या इतर विध्नसंतोषी लोकांनी नाना प्रकारे विध्ने उपस्थित करुन विरोध केला.ते रात्री लाकडे चोरण्यास गेल्यावेळी दोन वाघांनी त्यांस पळवून लावले. त्यांनी दिवसा प्रयत्न केले,ज्या लाकडाखाली हात घालावा तेथे नाग निघू लागला. अखेर त्यांना तो नाद सोडावा लागला. श्रीमहाराजच्या व बुवांच्या पाठबळानेच विध्नांचे  परस्पर निराकरण होत असे, पुढे १-२ वर्षांत गाभाऱ्यावरील व भोवतालच्या पवळीचे बांधकाम संपले. काळ्या शिलेच्या श्रीराम,लक्ष्मण,सीता व मारुति यांच्या प्रतिमा तयार करण्याबद्दल सुचनाही गेली. शिलेचे काम उत्तम सिंहासन तयार झाले. देवालयाच्या इमारतीसाठी कायमची जागाही दान म्हणून मिळविली.

या प्रमाणे सिध्दता करुन गुत्तीरामय्याने प्रतिष्ठापनेबाबत ब्रम्हानंद बुवांजवळ आग्रह धरिला, त्यांनी गडबड करु नकोस श्रींनाच बोलावू या असे त्यांस सांगून गप्प बसविले. शके १८३५ च्या वैशाख महिन्यांत श्रीमहाराज पंढरपूरास आल्यावर त्यांचा मुक्काम तेथे ३-४ महिने होणार होता.म्हणून त्यांनी ब्रम्हानंद बुवांस तिकडे बोलावून घेतले होते.

ब्रम्हानंद बुवांनी जातांना आपल्या बरोबर १०० लोक नेले होते. त्यात गुत्ती रामय्या वगैरे अश्वत्थपूरची मंडळीही होती. बुवांनी तेथे गेल्यावर गुत्तीरामय्यास श्रींना विनंती कर व मागून घे म्हणून भर दिला, "सगळ्या लोकांना घेऊन आलेच पाहिजे असा हट्ट धरुन पाय धर. तुझे काम होईल असे सांगितले. त्याप्रमाणे वेळ साधून गुत्ती रामय्याने श्रींनी ब्रह्मानंदबुवांस बोलावून घेऊन गुत्तीरामय्यास उद्देशून "मी तेथपर्यंत येण्याचा काही योग दिसत नाही. म्हणून हा ब्रह्मानंदबुवा तुमच्या येथे येऊन तुमचे कार्यकरुन देईल. तुम्ही काळजी करु नका.बुवा आला म्हणजे मीच आलो असे समजा." असे सांगितले.  पण हे कधी घडणार हे त्यांनी सांगितले नाही. या नंतर थोड्याच महिन्यानी श्रीमहाराज समाधीस्थ झाले. ब्रम्हानंद बुवांकडे बघुन त्यांच्या आधारावर वरील मंडळींनी आपले दुःख दडपले. श्रींच्या निर्वाणा नंतर एक वर्षाने आराधना व पादुका स्थापन करुन पु. बुवा वेंकटापूरला येवून राहीले. गुत्ती रामय्या त्यांच्या बरोबर कांही दिवस तेथेच होता.

गुत्ती रामय्या अजून आपल्या गांवी श्रीरामप्रतिष्ठा झाली नाही या दुःखाने मनांत झुरत होता,कारण मंदिर तयार होऊन दोन वर्षे होऊन गेली होती. मुर्तिही तयार होवून पडल्या होत्या. पु. बुवा तर " तेथील लोक दुष्ट आहेत.त्यांना भक्ती मार्ग नको, मलाही ती प्रतिष्ठा नको!  तूंच गावी न जाता येथेच राहून टाक,,"  असे सांगत.  त्यामुळे गुत्ती रामय्या मनांतून ब्रम्हानंद  बुवांवर थोडा रुष्ठ झाला होता. म्हणून की काय एकदा पु बुवा वेंकटापुराहून पायी बेलधडीस चालले असता त्यांनी गुत्ती रामय्यास आपल्या बरोबर चलण्यास आज्ञापिले असता देखील त्याने साफ येत नाही म्हणून सांगितले व तो तेथेच राहिला, श्रीगुरु आपली प्रार्थना मनावर घेत नाही. आतां गावांतील लोकांस तोंड तरी कसे दाखवू असा त्यास खेद होऊन डोंगरांतील गुहेंत उडी मारुन प्राणत्याग करण्याचा त्याने निश्चय केला. सर्वान्तर्यामी वास करणाऱ्या श्रीगुरुंना हा संकल्प ज्ञात झाला. लागलीच एक रोजगारी गड्याबरोबर त्यांनी रामय्यास उद्या सकाळपासून तीन दिवस नामस्मरणाला आरंभ करणार आहे. स्वयंपाक करावा लागेल. तरी आलेल्या गड्या बरोबर असशील तसा निघून ये."असा निरोप पाठवला.

निरुपायाने,रामय्या गड्याबरोबर बेलधडीस गेला. त्यांने श्रीगुरुंस नमस्कार करताच "वेड्या तुझ्यासाठी तीन दिवस नामस्मरण करावे लागत आहे". असे म्हटले. त्यांचे उद्गार ऐकून रामय्यास समाधान वाटले. तीन दिवसाचा नामस्मरणाचा कार्यक्रम थाटाने पार पडला, शेवटच्या दिवशी मंगलारतीनंतर रामय्याला घेऊन ते श्रीराम मंदिराकडे गेले. तेथे श्रीरामाच्या पायावर मंत्राक्षतांसह नारळ ठेवुन,तो पुन्हा हाती घेऊन प्रसाद घे असे म्हणून मंत्राक्षता,नारळ व ५ मोहरा श्रीगुरुंना त्याच्या पदरांत बांधल्या, रामय्याने आनंदाश्रू पूर्ण नयनांनी त्याचा स्विकार करुन श्रीगुरुंच्या पायावर मस्तक ठेवले. ही आनंदाची वार्ता त्याने आपल्या गांवी कळविल्याने तेथील भक्तांनी अपूर्व उत्साह वाटला.

 तेथून श्रीगुरुंनी वेंकटापूरी रामय्यासह प्रयाण केले व एके दिवशी "तुम्ही तयार केलेल्या मूर्तीना अलंकार पोषाख कांहीच घालता येत नाही तरी त्या रद्द करुन मुंबईहून दुसऱ्या आणवू या " असे श्रीगुरुंनी त्यांस सांगितले. मुंबईस दुसऱ्या मूर्ति तयार करुन घेऊन पाठविण्यास सांगितले. थोड्याच दिवसांत सीता,राम,लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती पिंपळास आल्याचे समजताच रामय्याने श्रीगुरुंशी प्रतिष्ठापनेविषयी बोलणे काढले, तेव्हा श्रीगुरुंनी "वैशाख शुध्द पंचमी अभिजित् मुहूर्त फार चांगला आहे. किंवा वैशाख शुध्द दशमी चांगला आहे. या दोन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर प्रतिष्ठा करु यां , गाजावाजा फार नको." असे त्यांस सांगितले.

रामय्याने तात्कालही वार्ता गांवी कळवली सगळ्या भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने सिध्दता सुरु केली. अभक्तांनी आपल्या कारवाया सुरुं केल्या.त्यांनी प्रथम वाजंत्री व दिवटी धरण्याऱ्या लोकांस नविन स्थापना होणाऱ्या देवालयांत वाजंत्री वाजविल्यास व दिवटी पाजळल्यास तुम्हास गांवातून हाकलून देऊ अशी तंबी दिली. ते सर्वजण भ्याले.
 
अश्वत्थपुरास (पिंपळास) वैशाख शुध्द तृतीयेस पोचण्याचे संकल्प करुन श्रीगुरु मुळगुंद व शिरहट्टी येथील वैदिकांस,गुत्ती रामय्या वगैरे अश्वत्थपुरचे लोकांस बरोबर घेऊन अधिक वैशाख वद्य त्रयोदशीचे दिवशी वेंकटापुराहून निघाले. शिरहट्टीस मुक्काम करुन दुसरे दिवशी लक्ष्मेश्वरावरुन निघाले. गुडगेरीस पोंचले व रेल्वे गाडीत चढले. दावणगिरीचे अलीकडे कनकराव अण्णेगिरी या भक्तांच्या आग्रहावरुन त्यांच्या घरी गेलें. व दुसऱ्या गाडीने निघून बिदरभद्रावतीला आले.तेथील स्टेशन मास्तर अत्यंत भाविक असल्याने त्याचे घरी श्रीगुरुंनी पूजा आरती,नैवेद्य संपवून भोजन केले.


 बिदरभद्रावतीहून निघुन श्रीगुरुं कारकळ पर्यंत बैलगाडीने गेले.दुसरे दिवशी सकाळी ते तीर्थहळ्ळी जवळील मंडगद्देला आले.पूजा नैवेद्य आटोपून भोजनोत्तर थोडी विश्रांती घेऊन तेथील नदी ओलांडून पलिकडच्या तीराला गेले.वेलीतून व काटेरी झुडपांमधून ३-४ फर्लांग अंतरापर्यत वाट काढीत गेले.तेथील सपाट प्रदेशांत एका वृक्षाखाली एक मोठी फरशी होती.त्यांस श्रीगुरुंनी नमस्कार केला व सर्वांकडून करविला,हा मांडव्यऋषींचा आश्रम. अति पवित्र स्थान आहे.अशी त्यांनी माहिती दिली. त्या फरशीची पूजा करून,नारळ फोडून, नैवेद्य दाखवून,घटकाभर "जयराम सिताराम " असे भजन करुन ते परत मुक्कामास आले.

रात्री मुळबागला जाऊन ते द्वारकापीठाच्या श्रीशंकरमठात उतरले.दुसऱ्या दिवशी रात्री वैशाख शुध्द द्वितीयेचे रात्री नालूरला आले.तेथून सोमेश्वरला येऊन पोंचले.रात्री फार पाऊस पडला. श्रीगुरु रामय्याला "विपरीत पाऊस पडत आहे.पंचमी साधते की नाही.दशमी केली तरी चालेल." म्हणाले व पाऊस थांबताच गाडीत चढले. तृतीयेस कारकळला आले. मिजारचे पाटलांनी तेथे गाडी पाठविली होती.  त्यांतुन दुपारी नाकूटला आले. तेथे शानबाग यांच्याकडे मध्यान्हस्नान,पूजा,नैवेद्य, आरती व भोजन झाले. सायंकाळी निधून संपिगे गांवाला त्यांनी मुक्काम केला.

 पिंपळहुन रामण्णामास्तर,शानभाग वगैरे शेकडो लोक वाजंत्र्यांच्या ताफ्यासह श्रीगुरुंना सामोरे जाण्यास निघाले होते.चार मैल गेल्यावर संपिगेहून येणाऱ्या एका व्यक्तीकडून "श्रीगुरुं निघाले आहेत.अद्याप तीन चार फर्लांग मागे आहेत." अशी बातमी त्यांना कळली. हर्षोत्फुल्ल अंतःकरणाने तेथेच सर्वानी श्रीगुरुंचा व श्रीरामाचा जयघोष केला. थोड्याच वेळांत श्रीगुरुंची मूर्ति दिसू लागतांच सर्वांनी त्यांस साष्टांग वंदन केले. व रघुपति राघव भजन करीत वाद्यघोषांत त्यांस पिंपळास आणले. श्रीगुरुंची राहण्याची व्यवस्था महादेवभट्टाचे दुकानांत करण्यांत आली होती.

 दुसरे दिवशी म्हणजे वैशाख शुध्द चतुर्थीस प्रतिष्ठाकार्याच्या होमहवनास प्रारंभ झाला.सकाळी सर्वांनी श्रीगुरुंच्या दर्शनाचा लाभ घेतला.शृंगेरी संस्थानाहून वे.सिताराम शास्त्री यांस बोलावून घेण्यांत आले. वे.सितारामशास्त्र्यांनी येऊन श्रीगुरुंचे दर्शन घेतले. नमस्कार करीत असता श्रीगुरुंनी त्यांना "जगद्गुरु क्षेम आहेत ना ?" असे विचारले. मी चौकशी केली म्हणून त्यांस  सांगा. प्रतिष्ठापनेचे सर्व कार्य जगद्गुरु संस्थानाच्या गौरवासाठी वे.सितारामशास्त्र्यांस पुढारीपण देऊन करा ," असे बरोबरीच्या वैदिक ब्राह्मणास श्रीगुरुंनी बजावले व सर्वांनी आज्ञेप्रमाणे विधिपूर्वक सर्व कार्यक्रम पार पाडला.

 मुंबईहून आणविलेल्या मूर्ति बाहेर काढण्यांत आल्या धान्याधिवास, जलाधिवास, शय्याधिवास तसेच होमहवनादि सर्व कार्यक्रम विधिपूर्वक पण थाटाने उरकल्या नंतर राक्षसनाम संवत्सर निज वैशाख शुध्द पंचमी या दिवशी दुपारी बरोबर १२ वाजता,अभिजित् मुहूर्तावर अतिशय थाटाने श्रीगुरुंच्या अमृतहस्तांनी मूर्तिंचे चिरप्रतिष्ठापनेचें कार्य पार पडले. पिंपळच्या आसपास त्यावेळी सगळीकडे आनंदच आनंद भरला होता व सर्व आबालवृध्द,परमानंदभरित होऊन सारखा जयघोष करीत होते. दुपारचे कडक ऊन असून देखील हजारो लोक समारंभास उपस्थित झाले होते. ऊन्हाच्या तिरपेने सर्वांचाच घसा तहानेने कोरडा पडला होता. त्यांची असमर्थता पाहून श्रीगुरुंनी सर्वांस गूळ व पाणी देण्याची आज्ञा केली.लगेच आज्ञेची अमंलबजावणी झाली.त्याप्रसंगी तीन ढेपा गुळ लागला म्हणतात...

श्रीगुरुंनी अश्वत्थपूर व तेथील लोकांसंबधी ५० वर्षापूर्वी काढलेले उद्गार तंतोतःत फलद्रुप झाले असल्याचे पटत आहे.तेथीलसमाज उन्नतीच्या शिखरावरपोंचला आहे.देवालयाचा विस्तार झाला असुन ते बंदिस्त आहे.श्रीशृंगेरीजगद् गुरु,अनेक यति-मुनी, केडगांवचे श्रीनारायण महाराजां सारखे अनेकभगवद् भक्त थोर पंडितांनी अश्वत्थपुरास भेटी दिल्या आहेत.


जय श्रीराम




 जय श्रीराम!

#श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे

३) श्रीब्रह्मानंद महाराजांच्या हस्ते स्थापन झालेले खेर्डी येथील श्रीराम मंदिर - सन १९१४

   खेर्डी हे चिपळुण तालूक्यात तळकोकणात वसलेले गाव आहे. तेथील श्री. वासुदेवराव शेंबेकर हे  श्रीमहाराजांचे अनुग्रहित होते. दहा-बारा वर्षे ते श्रीमहाराजांच्या सहवासात होते. वासुदेव महादेव शेंबेकर हे निस्सीम श्रीरामभक्त होते. गोंदवले येथील श्रीरामनवमीच्या उत्सवकाळातील मिरवणुकीत धनुष्यबाण पकडण्याची सेवा श्रीमहाराजांनी त्यांना दिली होती. दरवर्षी उत्सवासाठी चिपळूणहून गोंदवल्यास पायी चालत यावे लागू नये म्हणून श्रीमहाराजांनी त्यांना तू तुझ्याच गावी श्रीराम मंदिर बांध अशी आज्ञा दिली व मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसाठी मी स्वतः येईन असे अभिवचन दिले. या कार्यासाठी श्रीमहाराजांनी आपल्या प्रतीकात्मक पादुका व चांदीचा बंदा रुपया आशीर्वच रूपाने दिला.

अशी ह्या श्रीराम मंदिराची स्थापना फाल्गुन वद्य एकादशी शके १८३५ (रविवार, २२ मार्च १९१४) रोजी स्थापना झाली.

 श्रीमहाराजांच्या आज्ञेनुसार श्री शेंबेकरांनी शके १८३४ मध्ये मंदिरासाठी श्रीरामरायाच्या मुर्ती आणल्या आणि मंदिराचे बांधकाम सुरू केले. परंतू नंतर १९१३ च्या डिसेंबर मध्ये ( शके १८३५) श्रीमहाराजांनी देह ठेवला. त्यामुळे या मंदिरातील श्रीरामरायाची स्थापना श्रीब्रह्मानंदांच्या हस्ते फाल्गून वद्य ११, १९१४ यादिवशी करण्यात आली.त्यावेळी वासुदेवराव शेंबेकर, रामचंद्र परशुराम हळबे आदि मंडळी उपासना करीत असत. हे मंदिर खाजगी आहे. शेंबेकर कुटंबीय मंदिराची व्यवस्था पाहतात.




 















जय श्रीराम
माहिती / फोटो स्रोत : गुगल, फेसबुक

 

जय श्रीराम!

आजपासून आपण अभ्यासणार  आहोत,
श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे

१.     हरदासी राममंदिर, सांगली १९१२-१३
गावभाव, मारुतीमंदिराजवळ, सांगली, ४१६४१६, महाराष्ट्र

श्री हरिपंत हरिदासी यांनी हे मंदिर बांधले असावे असे म्हणतात. हरिपंत पंच होते. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात त्यांचे गुलालांपूर्वी श्रींच्या गोष्टी सांगून श्रींच्या कार्याविषयी तळमळीने मार्गदर्शन करीत. उत्सवात हरिपंत कीर्तन करत आणि लळीत वाचनाचा कार्यक्रम हि करत असत. यांना श्रीब्रंम्हानंद महाराज व गणपतराव दामले यांनी गोंदवल्यास राहून दैनंदिन व्यवहार, कोठी, वगैरे पाहाण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी काही वर्षे सेवा केली. त्याकाळात समाधीची पुजा, गोरक्षण, आल्यागेल्याची व्यवस्था, वगैरे सर्व प्रकारची कामे त्यांना करावी लागली. ते कमींतकमी विश्रांती घेऊन वीस-वीस तास जप करीत. शेवटी जप करुन त्यांची बोटे सुजली होती.

या हरिपंत मास्तरांच्या काही गोष्टी श्रींच्या चरित्रात आल्या आहेत. त्या एकेक करून पाहुयात.

  सन १९४७ साली श्रीमहाराजांची काही जुनी मंडळी मालाड येथे जपासाठी येऊन राहिली होती. त्यांच्यामध्ये सांगलीचे श्री हरिपंत हरदास उर्फ हरिपंत मास्तर होते. ते स्वतः कीर्तन करीत. त्यांच्यापाशी एक जुनी जीर्ण झालेली वही होती. त्या वहीमध्ये किर्तनाला उपयोगी अशी मराठी व हिंदी पदे आणि मराठी व संस्कृत श्लोक लिहिलेले होते. मी ती वाचायला आणली. तिच्यात लिहिलेल्या पदांचे व श्लोकांचे मला महत्त्व वाटले नाही. पण सन १९०५ साली गोंदवल्यास गुरुपौर्णिमा झाली.  त्यादिवशी श्रीमहाराजांचे जे प्रवचन झाले त्याचा सविस्तर सारांश आढळला. तो तेवढा मी लिहून ठेवला होता. माझे आता वय झाले म्हणून तो हातावेगळा करावा या हेतूने चरित्राच्या नव्या आवृत्तीमध्ये घातला आहे. - प.पु. बाबासाहेब बेलसरे.
             ( हरिपंत मास्तर म्हणाले - "महाराज जे बोलले ते बहुतेक जसेच्या तसेच मी उतरून घेतले. काही शब्द व वाक्ये सुटली. कूर्तकोटी यांना विचारून ते शब्द व ती वाक्ये लिहून घेतली")

एकदा कर्नाटकांतील आठदहा माणसे श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्यास आली होती.पंधरा दिवस त्यांना ठेऊन घेतल्यावर एक दिवस सकाळी लवकर ती मंडळी परत जाण्यास निघाली.म्हणून श्री महाराज पहाटे उठले व त्यांच्यासाठी पिठले भात करायला  त्यांनी सांगितलं.
इकडे हरिपंत मास्तरांनी श्री महाराजांचे अंथरूण झाडण्यासाठी काढले.चादर काढून त्यांनी धुण्यास टाकली.गादी झाडून गुंडाळून ठेवली.नंतर सतरंजी काढली व स्वच्छ झाडली.पलंग पुसून काढला.आणि पुन्हा सर्व अंथरूण घालून त्यावर स्वच्छ चादर घालून ठेवली.दरम्यान श्री महाराज आले,हातपाय धुऊन श्री रामाच्या पाया पडले.आणि सिंहासनावर येऊन बसले.जाणाऱ्या मंडळींचे जेवण उरकल्यावर त्यांनी आपले सामान गाड्यांमध्ये भरले.व श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते लोक आले.त्यावेळी श्री महाराजांनी हरिपंत मास्तरांना सांगितले,"मास्तर,माझ्या गादीखाली मघाशी मी रुपये ठेवले आहेत तेवढे घेऊन या बरे!.यावर मास्तर म्हणाले,"महाराज,गादीखाली काही नाही.आता इतक्यातच मी सर्व अंथरूण झाडून घातले आहे".तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले,"मास्तर आपली विद्या शाळेतल्या मुलांपुरती खरी आहे.ती सर्व ठिकाणी कशी लागू पडेल?मी सांगतो त्यावर तर्क काढू नये.जा आणि गादीखाली सापडेल ते आणा.हरिपंत मुकाट्याने गेले.आणि त्यांनी गादीखाली हात घालून पाहिले.तो त्या ठिकाणी चार खण आणि सहा रुपये सापडले.ते चकितच झाले.श्री महाराजांनी प्रत्येक पुरुषाला एकेक रुपया, आणि प्रत्येक बाईला एकेक खण देऊन सर्वाना निरोप दिला.

हरिपंत मास्तर गोंदवल्यास एकटेच राहात. एकदा ते जवळच्या गावी काही कामानिमित्त गेले होते. तिथे उशीर झाला. परिचितांच्या घरी संध्याकाळी खाणं झालं मग ते जायला निघाले. बाहेर काळोख पडला होता सर्वांनी आग्रह केला की आज इथंच राहा. मास्तर म्हणाले, "नाही मला जायलाच हवं." त्यावर एकजण म्हणाला," जाऊन करणार काय? नाहीतरी कोण आहे तिथं तुमची वाट पाहणारं?" तरीही मास्तर निघाले. सगळा पायीच प्रवास! चालताना त्यांना मित्राचं बोलणं आठवलं आणि मन हेलावलं. वाटलं... खरंच कोण आहे जो आपली चिंता करीत असेल... आपली वाट पाहात असेल?... गोंदवल्याची वेस जवळ आली आणि त्यांनी पाहिलं श्रीमहाराज तिथं बसून आहेत! मास्तरांना पाहाताच महाराज म्हणाले,"किती उशीर केलात मास्तर, मी कधीपासून तुमची वाट पाहात इथं बसून आहे!" मास्तरांना काय बोलावं सुचेना... त्यांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या..

श्रीमहाराजांनी देह ठेवल्यावर हरिपंत मास्तरांनीं श्रीमहाराज व श्रीआनंदसागर या गुरुशिष्यांच्या अस्थि बरोबरच नेऊन प्रयागच्या त्रिवेणीसंगमांत विसर्जन केल्या होत्या.
॥श्रीराम जय राम जय जय राम॥


२.     लिक्ते राममंदिर, पुणे १९१४
७१५, लक्ष्मी रोड, पुणे, ४११००२, महाराष्ट्र

पुण्याच्या पार्वतीबाई लिकते (माहेरच्या तिळवणकर) श्रीमहाराजांच्या भक्त होत्या. त्यांना पुत्रसंतान नसल्याने श्रींनी त्यांना श्रीरामालाच पुत्र मानून त्याची सेवा करायला सांगितले होते. श्रीमहाराजांनी असा बरेच जणांना सल्ला देऊन राम मंदिर बांधून घेतले आहे. भर लक्ष्मी रोडवरील या मंदिराची जागा स्वतः श्रीमहाराजांनी ठरवून, भूमिपूजन केले आहे. महाराजांनी प्रतिष्ठापनेची तिथीसुद्धा काढून दिली होती. आणि त्यावेळी महाराज लाल रंगाची कफनी घालून आले होते असे समजते. त्यावेळी महाराजांनी त्यांच्या पादुका पार्वतीबाईंना दिल्या होत्या. परंतु या मंदिराचे बांधकाम श्रींच्या हयातीत पूर्ण झाले नाही. श्रींच्या निर्याणानंतर पूर्ण झाले. आणि इ.स. १९९४ मध्ये महाराजांनी सांगितलेल्या मुहूर्तावर राम स्थापनेसाठी स्वतः श्री ब्रम्हानंद बुवा इथे आले होते.
या मंदिराबद्दल एक गोष्ट अशी सांगण्यात येते की, महाराजांनी दूरदृष्टीने आता आहे ती जागा ठरवली होती. पण काही कारणाने इतर लोक थोडी पुढची जागा ठरवत होते, जी रोडच्या अगदी कडेला येत होती. शेवटी श्रींच्या म्हणण्याला आधार मानून आता आहे ती जागा ठरवण्यात आली. आणि ते हिताचेच झाले. पुढे लक्ष्मी रोडच्या रुंदीकरणात काही जागा गेली. आणि मंदिर सुखरूप राहिले












 जय श्रीराम!

आपण पहात आहोत #श्रीमहाराजांच्याआज्ञेनेश्रीब्रह्मानंदांनीजीर्णोद्धारकेलेलीमंदिरे
तिसरे आणि शेवटचं मंदिर आहे.
३. वेणूगोपाळमंदिर, बिदरहळ्ळी १९०९
पो. बिदरहळ्ळी, ता. मुंदरगी, जि. गदग - ५८२११८, कर्नाटक

या मंदिराबद्दल मागे पोस्ट टाकली होती.

https://www.facebook.com/share/p/1B4NiZ469n/

भविष्योत्तर पुराणात बिद्रहळ्ळी हे काशी क्षेत्रासमान असल्याचे वर्णन केलेले आहे.या गावी बिदरहळ्ययव्वा नावाच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे.यावरुनच गावास बिदरहल्ली नांव पडले असावेसे दिसते.या गावाबाहेर नदीकांठी श्रीमुरलीधराचे देऊळ आहे.या देवळांतील मूर्ति काळ्या दगडाची असली तरी नयनमनोहर आहे.मात्र त्या गावात त्यास मुरलीधराचे देऊळ न म्हणतां श्रीवेणूगीपालमंदिर म्हणण्याचा प्रघात आहे. ते देवालय त्यावेळी जीर्ण झाले असल्याने श्रीब्रह्मानंदांनी त्याचा प्रथम जीर्णोध्दार केला. जीर्णोध्दार करतांना तेथे पुढील होणाऱ्या नामजपयज्ञाचेवेळी स्वयंपाक करणेस व अन्न संतर्पणास सुकर होईल ही दृष्टी ठेवून बांधकाम करवून घेतले.

जय श्रीराम



 

जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...