मंगळवार, १४ जानेवारी, २०२५

 जय श्रीराम!
 

पाऊलखुणा :
श्रीमहाराज स्थापित मंदिरे या शृंखलेत पुढची मंदिरे आहेत.

७. तिळवणकर राममंदिर, वाराणसी (इ.स. १८९७-९८)
डी, १०/१५ विश्वनाथ गल्ली, वाराणसी - २२१००१, उत्तरप्रदेश

तिळवणकर राममंदिर, वाराणसी


तिळवणकर राममंदिर, वाराणसी

तिळवणकर राममंदिर, वाराणसी
श्री हरी नारायण तिळवणकर यांनी बांधलेले मंदिर. या मंदिराबद्दलची विशेष माहिती उपलब्ध नाही. कोणास काही माहित असल्यास जरूर कळवावी. श्रींच्या चरित्रात ही याचा उल्लेख नाही. तिळवणकर घराण्याशी संबंधित व्यक्तीला कॉल केला होता. त्यांनाही ही फार काही माहिती नाही. त्यांचे पुतणे , काकू ते मंदिर सांभाळतात असे कळले. परंतु ते ही तिथे जाऊन  येऊन असतात. त्यामुळे बहुतांशी मंदिर बंदच असते. या मंदिराचे फोटो गुगल वर मिळाले आहेत ते देत आहे.
*****
८. पट्टाभीराम राममंदिर, हरदा (इ.स. १९००)
गणेश चौक, पो. हरदा, जि. हरदा - ४६१३३१, मध्यप्रदेश
मध्यप्रदेश मधील नर्मदेकाठी हरदा या गावी श्री काशिनाथभैय्या सावकार यांनी श्रींच्या आज्ञेने राम मंदिर बांधले. नक्षीदार रंगीबेरंगी खांब, आणि एखाद्या वेड्यासारखी बांधणी असणारे हे मंदिर अल्पावधीत श्रींचे विश्रांतीस्थान झाले. इथल्या राम मूर्ती अतिशय सुंदर आहेत. श्रीरामाच्या डाव्या मांडीवर सीतामाई स्थानापन्न आहेत तर मागे तिघी भाऊ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, समोर हात जोडून खाली बसलेला मारुतीराया , आणि बाजूला वसिष्ठ मुनी असे हे दुर्मिळ रामपंचायतन अतिशय देखणे आहे.  श्रीमहाराज इथे रामाच्या स्थापनेसाठी स्वतः उपस्थित होते. श्रीमहाराज नैमिषारण्यात जायचे त्या वाटेवर हर्दा गाव असल्याने श्रींचा मुक्काम तिथे असे. प्लेगच्या काळातही ३-४ महिने महाराज इथे होते. एकदा तर दीड वर्ष महाराज इथे वास्तव्यास राहिले होते श्रीमहाराजांच्या अनेक लीला इथे घडल्या. त्या चरित्रात आहेतच. त्यापैकी काही इथं देते.
सध्याचे पुजारी श्री गोडबोले यांची तिसरी पिढी येथे सेवा करत आहे. सर्वप्रथम श्री गोडबोले यांचे आजोबा यांना श्री महाराजांनीच स्वतः हरदा येथे आणून पूजेच्या कामास ठेवले होते. गोडबोले यांचे आजोबा श्रीमहाराजांच्या मागे लागले की मला तुमच्या सोबत घेऊन चला असे असताना श्रीमहाराज त्यांना त्याला घेऊन आले आणि इथेच रामाची सेवा करा असे सांगितले. श्री गोडबोले यांची चौथी पिढी म्हणजे, त्यांचा मुलगा दुबई येथे काम करतो तो सुद्धा लवकरच राम मंदिरात आणि प्रभू रामरायाच्या सेवेमध्ये परत येण्यास उत्सुक आहे.

अगदी अलीकडे म्हणजे १९९४ साली मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना प्रभू रामरायाचे विग्रह जिथे ठेवलेले आहेत त्याच्या मागची भिंत खणत असताना जमिनीच्या पायांमध्ये श्री महाविष्णूची एक मूर्ती प्राप्त झाली त्या मूर्तीमध्ये महाविष्णु यांच्या पायावर लक्ष्मी विराजमान आहेत आणि ते दोघेही गरुडावर बसलेले आहेत अशी ही मूर्ती होती.मात्र खंडित असलेली मूर्ती प्रतिष्ठापना करता येत नाही म्हणून पुनश्च नर्मदेला अर्पण करण्यात आली,तथापि श्री महाराजांसारख्या द्रष्ट्या पुरुषाला या गोष्टीची जाणीव असावी म्हणूनच या मंदिराची निर्मिती करत असताना, साधारण सव्वाशे वर्षांपूर्वीच श्री महाराजांनी येथील मूर्ती किंवा विग्रह स्थापन करत असताना श्री महाविष्णूचा अवतार असलेल्या प्रभू रामराया यांच्या मांडीवर विराजित असलेल्या त्यांच्या पट्टराणीच्या मूर्ती स्थापन केल्या.

  १) हर्दा येथें एक सात्विक भटजी रहात होते. त्यांना महाराज म्हणाले, "जो साडेतीन कोटी जप करील, त्याला रामाच्या प्रेमाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही." भटजींनी जप सुरूं केला. पण देवदर्शन झालें नाहीं. महाराज दररोज, देवाचे दर्शन म्हणजे काय? प्रेमाचा अनुभव कसा असतो, जप किती, कसा करावा, वगैरेवर विवरण करीत. एक दिवस हे बुवा, हट्टाला पेटले. त्यांची झोप उडाली होती. उन्माद होऊं पहात होता. ते म्हणाले, "मला आज देव दाखवा. नाहींतर मी जेवणार नाहीं. विहिरीत जीव देईन." असें म्हणून ते विहिरीच्या काठावर जाऊन बसले. महाराज तेथें आले. त्यांना सांगून पाहिले. कांही परिणाम होईना. एकच हट्ट - 'देव दाखवा.' शेवटी महाराजांनी पायातील खडावा काढली आणि त्यांच्या डोक्यावर सटासट मारली. हें झाल्यावर भटजी ओरडू लागले, "रामा, धाव रे धाव." महाराज म्हणाले, "माझ्या रामाचे नांव कां घेतोस?" आणखी मारले. भटजींच्या डोळ्यांतून खूप अश्रू आले. आणि ते मोकळे झाले. त्यांना प्रेमाने पोटाशी धरून महाराज म्हणाले, "आज यांच्या डोळ्यातून पाणी आलें नसते, तर हा वेडा झाला असता. उन्माद वायू डोक्यात शिरत होता. माझा नाइलाज झाला." आणि पुढे म्हणाले, "भगवंत हा हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमानेच वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले, तर ते शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता, नुसताच त्यांचा हट्ट व कष्ट तेवढे पाहतो. परमार्थ आपोआप वाढावा. त्याला ताण देऊन वाढवू नये."

२) हर्दा गावामध्ये प्लेगची साथ फैलावली म्हणून तेथील मंदिराचे विश्वस्त काशिनाथ भैय्या यांच्या शेतामध्ये सर्वांनी झोपड्या बांधल्या आणि सर्व मंडळी व श्री ब्रम्हचैतन्य महाराज तेथे राहायला गेले. बाहेरगावच्या लोकांची श्रींच्या दर्शनास येत होते. रामभाऊ मोने हे ग्रहस्थ जयराम माळी आणि दामू अण्णा यांना घेऊन श्रींच्या दर्शनास आले. शेतामध्ये राहत असताना श्रींनी बरोबर असणाऱ्या उपवर वधू व वरांचे अशी पाच सहा लग्न ठरवली. यामुळे लग्नाचे जेवणे सुरू झाली. एके दिवशी सकाळी स्वयंपाकाची व्यवस्था करणाऱ्या महिला श्रीं पाशी आल्या व म्हणाल्या महाराज आज नैवेद्याला भाजी नाही. श्री खोटा आव आणुन म्हणाले "तुम्ही बायका असाच का संसार करता. आता आठ वाजले आणि यावेळी मी भाजी कुठून आणून देऊ." असे म्हणून त्यांनी मळ्यात जाऊन काम करणाऱ्या माळ्याला बोलावले. त्याला विचारता तो म्हणाला "जी महाराज मळ्यात कोणतीही भाजी नाही. वांगी लावली आहेत पण फक्त फुल धरले आहे. फळ लागले नाही. यावर श्री बोलले "असे कसे होईल? फुले आहेत तर तेथे फळे असलीच पाहिजेत. कारण फुलांचेच फळ होते ना." असे बोलून स्वतः मळ्याकडे जाण्यास निघाले व बरोबर जयराम मळी पोते घेऊन गेला. मळ्यात वांग्याच्या रोपा मध्ये येऊन श्री उभे राहिले. एकेका रोपाकडे पाहून श्री म्हणत "अरे ते पहा पानाखाली काय आहे?"जयरामने पाने बाजूला करून बघावे की तेथे त्याला चांगले मोठे वांगे दिसावे. अशा रीतीने अर्ध्या तासात पोते भरून वांगी जमा झाली.जयराम स्वतः माळीच असल्याने हा प्रकार पाहून तो थक्क झाला.

३) १९०७ च्या सुमारास एकदा हरद्यास श्रींचा मुक्काम होता. हर्दा मुक्काम सुमारे दीड वर्ष होता. एकदा एक वैदू तेथे आला, त्याचे जवळ बरीच झाडपाल्याची औषधे होती. श्रींनी काही औषधे घेतली व त्यात सापाचे आकाराची एक मुळी व काळा मणी घेऊन ते श्री भाऊसाहेबांकडे ठेवण्यास दिले. गावात प्लेगची साथ असल्यामुळे भाऊसाहेब सहकुटुंब गावाबाहेरील शेतात झोपडीत राहावयास गेल्यानंतर चि. सुंदराबाईस रात्री झोपल्यावर काहीतरी चावले. ती ऊठली, काय चावले ते कळेना. औषध पाणी चालू होते त्यात श्रीमहाराज गोंदवल्यास गेलेले. इतक्या श्रींनी दिलेल्या मुळीची व मण्याची आठवण झाली. मुळी उगाळून पोटात दिली व तो मणी जेथे चावले होते त्या जागेवर चिकटवला. दुसरे औषध पाणी करण्यासारखे काहीच नव्हते. सर्व मंडळी काळजीत होती थोड्यावेळाने तो मणी चिकटवलेला होता तो सुटला व दुधात टाकल्यावर दूध काळे झाले. हळूहळू तिच्या वेदना कमी होऊन ती चांगली झाली. अशा गोष्टी पावलागणिक होत होत्या पण श्रीनीं त्यांना मुळीच महत्त्व दिले नाही. असले चमत्कार घडल्यावर श्रीनीं त्याबद्दल कधीच काही बोलू नये व गोष्टी निघालीस तर ते राम कृपेने झाले असे म्हणत.

४)  हरदा येथे श्रींचा मुक्काम असताना अधिक मास आला. अधिक मासात एखादे दान संतांना केले तर सहस्र भोजन घालण्याचे पुण्य लागते असे एका भाविकांच्या वाचनात आले. त्यास अनुसरून एका भक्ताने चांदीची एक जाड बुडाची वाटी श्रीमहाराजांना अर्पण केली. श्रीमहाराज म्हणाले मला गोसावड्याला या वाटीचा काय उपयोग? पण त्या भक़्ताने फार आग्रह केला म्हणून त्यांचे मन दुखावले न जावे म्हणून त्यांनी ती स्वीकारली आणि तेथल्याच कोनाड्यात ठेवून दिली. योगायोग असा की दुसऱ्याच दिवशी श्मश्रु करण्यास नेहमीचा नापित आला. त्याने सवयीप्रमाणे घोंगडीतली पितळी वाटी पाण्यासाठी काढली.  श्रीमहाराज त्याला म्हणाले, 'अरे, आज ती वाटी नको, ती कोनाड्यात आहे ती वाटी घे.' नापिताने ती वाटी घेतली आणि ती आपल्या उजव्या म्हणजे समोर बसलेल्या श्रीमहाराजांच्या डाव्या हाताशी ठेवून आपले काम सुरू केले. त्या बिचाऱ्याला चांदीची वाटी ही एक अपुर्व अलभ्य अशीच गोष्ट होती आणि यांचे मन स्वाभाविकच त्या वस्तूवर गेले. ही गोष्ट सर्वज्ञानी श्रीमहाराजांच्या लक्षात आली. श्मश्रूकर्म आटोपल्यावर आपल्या डाव्याच हाताशी असलेली ती वाटी नापिताला डाव्या हाताने देत ते म्हणाले, 'अरे, घेऊन जा ही तुला.'
 तेथे एक पाठक शास्त्री होते त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि डाव्या हाताचे दिलेले दान अशास्त्रीय आहे ही गोष्ट त्यांनी श्रींच्या नजरेस आणून दिली तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, 'ही गोष्ट अशास्त्रीय असेल हे मी मान्य करतो, पण ती करण्याचे कारण असे की ती वाटी डाव्या हातातून उजव्या हातात घेण्याच्या अत्यल्प अवधीतसुद्धा देण्याची सुबुद्धी पालटून जाणे शक्य असते, तो संभव टाळण्यासाठी मी असे केले.'
               **
संदर्भ: श्री पट्टाभिराम मंदिर हरदा, स्मरणिका १९९४ मधील श्री ल.ग.मराठे, पुणे यांचा लेख, पान २०
संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन

५) श्रीमहाराज वडिलांचे श्राद्ध करीत. हरद्यास असतांना श्राद्धतिथी आल्याने श्रींनी तेथेच ते केले. त्यावेळी कोणी चांदीचे तांब्याभांडे त्यांना दिले. सर्व आटोपून मंडळी जेवायला बसली असताना एक बैरागी आला. श्रींनी प्रथम त्याला जेवायला घातले. जेवण झाल्यावर 'मला काहीतरी द्या' म्हणून तो श्रींच्या मागे लागला. वस्त्र किंवा पैसा काही तो घेईना. तेव्हा अडचण पडली. इतक्यात श्रीमहाराजांनी सकाळी त्यांना अर्पण केलेला चांदीचा तांब्या हळूच उचलला. तो आपल्या कफनीमध्ये लपविला. इकडे त्या बैराग्याला खुण करून झोपडीपासून जरा पलीकडे नेला. तेथे तो तांब्या त्यांच्या झोळीमध्ये टाकून त्याला लवकर निघून जाण्यास सांगितले. थोड्या वेळाने ही गोष्ट लोकांना कळली. तेव्हां श्री म्हणाले, 'मी तरी काय करू? आपल्याजवळ असलेली वस्तु आज आपल्याला नको असली तरी दुसरा मागत असताना त्याला न देणे हा खरा व्यवहार आहे. पण मला ते पाहावत नाही. हाच माझा दोष आहे. या दोषापायी एका लंगोटीशिवाय माझ्यापाशी काही राहिले नाही. तरी राम दाता असल्यामुळे काही कमी पडत नाही. म्हणून माझ्यापाशी काही नसल्याचे मला वाईट वाटत नाही.'  
संदर्भ: श्री पट्टाभिराम मंदिर हरदा स्मरणिका १९९४ मधील 'श्रीमहाराज हरद्यास असताना घडलेल्या घटना' या मधील राजाभाऊ मनोहर यांच्या लेखातून पान १०
संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन

६) हर्द्याला असताना श्रीमहाराजांनी  पु.श्रीभाऊसाहेब केतकरांचा मुलगा बापूकाका याचे मनूताईशी लग्न ठरवले आणि झाले. मनुताईचे वडील महारोगी होते. श्रीक्रुपेने ते बरे झाले होते. ह्या पार्श्वभुमीवर श्रीबेलसरे यांनी  भाऊसाहेबांना विचारलं "मुलीचे वडील महारोगी, तुमच्या मनात नाही का आलं ?".  पहिल्यांदा त्यांना कळलंच नाही . दोन तीन वेळा विचारल्यानंतर ते गांभीर्याने म्हणाले," पण श्रीमहाराज चुकतील कसे ?" ही निष्ठा. हे ज्ञान समर्पणातून येतं. ते कसं व्यक्त होतं. स: तु सर्वद्ऩ्य सर्वशक्तिसमन्वित: . ते चुकतील कसे. मनुताईंना रोगाचा लवलेश नाही. प्रपंचाचा खेळ हा. श्री भाऊसाहेबांच्या पत्नी सौ. बाई यांचं उदाहरण अप्रतिम.  हरदाला बापुकाकांच लग्न होतं. त्याचवेळी ग्वाल्हेरहुन तार आली की त्यांची मोठी मुलगी गेली. श्रीमहाराज म्हणाले, बाई, तुमच्या मनात येणार नसेल तर बसा". ग्रहमख, देवदेवक वगैरे सुरू होणार होतं. सौ. बाई क्षणभर थांबल्या व श्री. भाऊसाहेबांना म्हणाल्या," श्रीमहाराज काय म्हणतात?". माझ्या मनातला विचार श्रीमहाराजांना कळला.supreme value( सर्वोत्तम मूल्य) श्रीमहाराजांना, मुलीला नाही. अस होण्याकरता अंतःकरण शुद्ध पाहिजे. म्हणजे श्रीमहाराजांच्या मनाचं प्रतिबिंब त्यांत बरोबर पडेल.
संदर्भ: ~  सत्संग
******
९. सोरटी राममंदिर (उज्जैन) (इ.स. १९०१)
७, अमरसिंह मार्ग, फ्री गंज, उज्जैन, ४५६००१, मध्यप्रदेश
याबद्दलचीही फारशी माहिती उपलब्ध नाही. अमृतघुटीका हा ग्रंथ श्रीमहाराजांनी क्षिप्रा नदीकाठी रचला आहे. फोटो महत्प्रयासाने गुगलवर मिळाले आहेत.

****
जय श्रीराम! 
श्रीमहाराजकन्या

 जय श्रीराम!

पाऊलखुणा - ८

बहू मंदिरें स्थापिलीं धन्य कीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥

"बहुमंदिरे स्थापियेली" हि लिस्ट आपल्या श्रीमहाराजांच्या ऑफिशियल वेबसाईट वर उपलब्ध आहे. आता आपण पाहूया, या शृंखले अंतर्गत श्रीमहाराजांनी स्थापन केलेली/ त्यांच्या प्रेरणेने शिष्यांनी स्थापन केलेली मंदिरे. त्यांचे स्थापनावर्षा नुसार उपलब्ध माहिती बघूया. ज्यांचे फोटो फोटो गुगल किंवा इतरत्र वेबसाईट वरून मिळाले ते घेतले आहेत. तसेच त्या त्या मंदिराविषयी उपलब्ध कथा/ पार्श्वभूमी ही देत आहे. तब्बल ६६ मंदिरांची लिस्ट उपलब्ध आहे. . अजूनही श्रींच्या प्रेरणेने बांधलेली अजूनही मंदिरे असतील. लिस्ट अपडेट होत जाईल.

श्रीगोंदवलेकरमहाराजांनी स्वतः स्थापन केलेली राममंदिरे/मंदिरे

१. थोरले राममंदिर, गोंदवले (इ.स. १८९१-९२)-- गोंदवले, ता. माण, जिल्हा. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र
 

श्रीमहाराजांनी गोंदवले येथे स्थापन केलेले पहिले ‘थोरले राममंदिर.’ या मंदिरातच श्रीमहाराजांचे वास्तव्य झाले. या मंदिरात ‘काशी विश्वनाथ’ मंदिर आहे. श्रीमहाराजांचे शेजघर आहे. गोंदवले संस्थानने १९९२ साली या मंदिराचा जीर्णोद्धार आणि शताब्दी महोत्सव साजरा केला. या मंदिरातील मारुतीची मूर्ती श्रीमहाराजांनी स्वहस्ते बनवून स्थापन केली आहे. “माझ्या रामाला एकदा डोळे भरून पाहा” असे महाराज सांगत असत. तोच हा राम थोरले मंदिरातला.

थोरल्या राम मंदिर तसे सर्वश्रुत आहेच. या रामाच्या डोळ्यातून तीन वेळा अश्रुपात झाला. गोपाळराव मोकाशी हे थोरले महाराजांचे चुलत मावस भाऊ या रामाचे पुजारी होते व रामरायाचे डोळ्यातून ३वेळा अश्रू आले त्यावेळी गोपाळराव हजर होते.
अजून काही विशेष ठळक बाबी या राम मंदिराबद्दल आहेत त्या अश्या:
१)  श्रीमहाराजांचा दात थोरल्या रामरायाच्या पायाशी आठवण म्हणून पुरुन ठेवला आहे. श्री गोपाळ लक्ष्मण मोकाशी हे मूळ कलेढोणचे, श्रींचे चुलत मामेभाऊ . कलेढोण हे गीतामाईंचे माहेर. मॕट्रिक झाल्यावर गोपाळराव मामलेदार म्हणून नोकरीस लागले. गोपाळरावांची पूजा श्रीना खूप आवडायची म्हणून गीताबाईंनी त्यांना व दादोजींना गोंदवलेस बोलावून घेतले. गीतामाईंनी श्री गोपाळराव व श्री दादाजी मोकाशी यांना व श्रांना गोंदवलेस परत आणणेसाठी त्यांना इंदूरला पाठवले.  त्याप्रमाणे ते श्रींना घेऊन गोंदवलेस आले. नंतर श्रींनी गोपाळराव यांस नोकरी सोडण्यास सांगितले व आपले मिळकतीचे गोपाळराव यास कुलमुखत्यार नेमले. परिणामी श्रींचे जमिनीबाबत सर्व व्यवहार गोपाळराव पाहू लागले. त्यामुळे समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळाली.
गोपाळरावांकडे श्रींचा एक पडलेला दात होता.  तो त्यांनी नंतर रामरायाचे पायाचे अंगठ्याजवळ खोदून बसविला व त्यावर चुना सिमेंट लावले त्यामुळे श्रींचे वास्तव्य आजही दाताचे रुपाने थोरले राममंदिरात आहे.
संदर्भः चैतन्य स्मरण २००५ मधील ना बा अत्रे यांच्या लेखातून  
२) थोरल्या राम मंदिरात डावीकडे ठेवलेला कोच श्रींच्या वेळेपासून तिथेच आहे. त्यामुळे तिथे बसून जप केल्यास वेगळीच अनुभूती येते. त्या कोचाबद्दल कथा वाचनात आली ती अशी. श्रीब्रह्मचैतन्य महाराजांच्या पहिल्या पुण्यतिथी वेळेस श्री ब्रह्मानंदबुवा गोंदवल्यास आले होते. राम मंदिरात उत्सवाची तयारी सुरु होती. थोरल्या रामाच्या बाजूला श्रीमहाराजांचा कोच ठेवला आहे.[जो अजुनही तसाच ठेवला आहे.] तेथे अप्पासाहेब भडगावकर कुणाशी तरी बोलत उभे होते. बोलता बोलता ते त्या कोच्यावर किंचितसे बसले व टेकणार तेवढ्यात ब्रह्मानंदबुवांचे तिकडे लक्ष गेले. त्यांनी एक शिवी देऊन 'उठ तेथून उठ' म्हटले.अप्पासाहेब गडबडून उभे झाले.[ब्रह्मानंदबुवा आणि अप्पासाहेबांचा अपार स्नेह होता. त्यामुळे त्यांच्यात प्रेमाने शिव्या देणे वगैरे होत असे]  पण आता ब्रह्मानंदांनी चांगलेच खडसावल्याने ते गडबडून गेले. ब्रह्मानंदबुवा अप्पासाहेबांच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले 'अरे कुठे बसतो आहेस? जळून गेला असता त्यांच्या तेजाने.' सत्पुरुषाचे स्थान त्याच्या अस्तित्वाने एवढे भारलेले असते की तेथे सामान्य व्यक्ती अनवधनाने जरी बसला तरी त्यास ते तेज सहन होणार नाही.

३) थोरले रामाच्या समोरच उजवीकडे असलेल्या खांबाला टेकून महाराज प्रवचन करीत. त्यामुळे कित्येक भाविक त्या खांबाला कवेत घेतात किंवा पाठ लावतात, त्याने पाठदुखी बरी होते असा लोकांचा समज आहे.

४) थोरल्या राममंदिरातील मारुती बद्दल अशी कथा श्रींच्या चरित्रात आहे कि, एका एकादशीला श्रींना दम्याचा खूप त्रास होत असल्याने ते खोलीत बसले होते. रात्री नऊ वाजता रामापूढे कोणीतरी भजन करीत होते. त्याच्याकडे लक्ष जाऊन, "अरे हा भजन म्हणतो आहे का रडतो आहे?" असे म्हणून ते स्वतः उठले आणि भजनाला उभे राहिले. लगेच पुष्कळ मंडळी जमा झाली. भजनाला रंग चढू लागला आणि श्रीमहाराज एखादया तरूणाप्रमाणे रामापूढे नाचू लागले. पंधरा मिनिटांपूर्वी त्यांना दम लागला होता हे कोणास कसे खरे वाटणार? नाचत-नाचत ते मारूतीजवळ आले आणि मंडळीना म्हणाले, "भगवंताला भजनाची फार आवड आहे. त्याचप्रमाणे त्याच्या भक्तांनादेखील भजनाची फार आवड असते. आपण रामासमोर भजन करूं लागलो की, मारूतीरायाला स्फुरण चढून तो देखील नाचायला लागतो. बघा, आज तो पखवाज वाजवीत आहे!"
श्रींनी मंडळीना मारूतीच्या पायापाशीं कान लावण्यास सांगितले. बहूतेक सर्व स्त्री-पुरुषांनी तेथे कान लावून पाहिले. प्रत्येकाला मृदुंग वाजविण्याचा ध्वनी ऐकू आला.



५) पिशाच्च बाधित व्यक्तीला थोरले राममंदिरात जो मारुती आहे त्याच्या बाजूच्या खांबाला टेकून/ बांधत असत आणि समोर श्रीमहाराज कोचावर बसून त्याच्याशी बोलत असत. आणी त्या पिशाच्चस मुक्ती देत.

६) श्रीमहाराजांना भेटायला मध्यरात्री सूक्ष्मात्मे येत. याची एक गंमतीदार गोष्ट वाचनात आली ती अशी की, महाराजांच्या स्वयंपाकघरातील गंगुताई आठवले या थोरले राममंदिरात शेजघराच्या समोर असलेल्या रामाच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत झोपत असत. श्रीमहाराजांनी त्यांना अनेक वेळा सांगून पाहिले कि इथे झोपू नका. मला रात्री माणसे भेटायला येतात. गंगुताईंना वाटले, लोक जातील दुसऱ्या बाजूने. त्यांना रस्त्यात अडथळा येतो. त्यांनीही एक दोनदा ऐकले ना ऐकल्यासारखे केले. दुसरीकडे झोपून पाहिले. आणि परत नेहमीच्या जागेवर झोपल्या. दुसरे दिवशी जरा उशिरा जाग आल्यावर पाहतात तो त्या थोरले रामाच्या समोर त्यांचे अंथरूण. त्यांना मोठे नवल वाटले, असे कसे झाले? थोडे संभ्रमातच श्रींना विचारायला गेल्या तेव्हा श्री हसत म्हणाले, तुम्हाला सांगितले होते तिथे झोपू नका. रात्री त्या लोकांनी तुमचे अंथरूण तिकडे नेले असणार, अडथळा आल्यामुळे. कोण लोक हे विचारताच , श्री म्हणाले कि सूक्ष्मात्मे त्यांचा अडचणी विचारण्याकरता मध्यरात्री येत असतात. हे ऐकून घाबरून त्यांनी विचारले ," म्हणजे पिशाच्चाचा स्पर्श मला झाला? आता सचैल स्नान करावे लागणार. तेव्हा महाराज उत्तरले, " घाबरू नका, ते आत्मे असले तरी फार वरच्या स्तरावरचे आहेत.
तेव्हापासून गंगुताईंनी झोपण्याची जागा बदलली.
(संदर्भ: श्री चैतन्य सहस्रबुद्धे यांचे 'अन्नब्रम्ह ' हे पुस्तक )
*****
२. आटपाडी दत्तमंदिर, आटपाडी (इ.स. १८९२)
ब्राह्मणगल्ली, आटपाडी - जि. सांगली, ४१५३०१, महाराष्ट्र

आटपाडी हे गाव म्हणजे श्रीमहाराजांची सासुरवाडी. तेथील श्री बापूसाहेब देशपांडे हे श्रीमहाराजांचे श्वशुर. आटपाडी गावातील दत्तमंदिर श्री विष्णुपंत कात्रे यांनी बांधले. विष्णुपंत सरकारी नोकर असले तरी मोठे विरक्त गृहस्थ होते. त्यांना दत्ताच्या उपासनेची आवड होती म्हणून नोकरी सोडून देऊन ते माधुकरी मागू लागले व आपला काळ उपासनेमध्ये घालवू लागले. श्रीमहाराजांनी त्यांना दत्तोपासना दिली होती.
संदर्भ: के. व्ही. बेलसरे लिखित महाराजांचे चरित्र


 *****

३. धाकटे राममंदिर, गोंदवले (इ.स. १८९४-९५)
- गोंदवले, ता. माण, जिल्हा. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्

गोंदवले येथे महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्यांच्या संख्येत बरीच वाढ झाली होती. शिवाय बाहेर गावाहून येणाऱ्यांना श्रीमहाराज गोंदवल्यात ठेवून घेत असत. त्यामुळे थोरले राममंदिराची जागा अपुरी पडू लागली. सहकुटुंब येणाऱ्यांसाठी म्हणून मग त्यावेळी धाकटे राममंदिर बांधले. सोयीसाठी तेथे काही खोल्या बांधल्या.

धाकट्या राममंदिराविषयी एक अतिशय गोड आठवण उपलब्ध आहे. ती म्हणजे धाकट्या राममंदिरात पांडुरंगबुवांचा विवाह

श्रीमहाराजांचे निष्ठावान शिष्योत्तम पांडुरंगबुवा ऊर्फ रामानंद महाराज. अत्यंत कडकडीत वैराग्य, जटाधारी असणारे हे व्यक्तिमत्व की ज्यांना श्रीकृपेने मायेचा स्पर्श आला नाही. आनंदसागर महाराजांना आपली मुलगी कृष्णा हिचा विवाह पांडुरंगबुवांशी व्हावा ही इच्छा. पण पांडुरंगबुवा बैरागी.

 

तेंव्हा आनंदसागर यांनी आपल्या मातोश्रींना हा विचार थोरल्या महाराजांच्या [म्हणजेच गोंदवलेकर महाराजांच्या] कानावर घालण्यास सांगितले.

         साखरखेर्ड्याच्या प्रल्हादांचा विवाह मेहकरला होता. त्यासाठी पांडुरंगबुवा दमणीने चालले होते पण त्याच वेळी थोरल्या महाराजांचे पत्र आले की - 'पत्र पाहताच गोंदवल्यास निघून येणे.' प्रल्हादांच्या लग्नाच्या अक्षता टाकून मग गोंदवल्यास जावे हा विचार करुन पाडुरंगबुवा निघाले. पण वाटेत विजांचा कडकडाट होऊन धुवाधार पाऊस पडू लागला. एक विजेचा लोळ जमिनीवर जवळून पडताना त्याची झळ लागून बरोबरचा गडी बेशुद्ध पडला. तो पुढे सावध झाला. पण पांडुरंगबुवा मनाशी समजले, की श्रींची म्हणजे थोरल्या महाराजांची इच्छा मी लग्नास जावे अशी दिसत नाही. ते बरोबरच्या माणसांना लग्नास पाठवून स्वतः गोंदवल्यास आले.

       श्रीरामापुढे 'श्री' कोचावर बसले होते. पाडुरंगबुवांनी थोरल्या महाराजांना साष्टांग नमस्कारा केला. तेंव्हा 'श्री' उपरोधाने म्हणाले - 'तुम्हालाच आम्ही नमस्कार केला पाहिजे कारण आपण ब्रह्मचारी व आम्ही प्रापंचिक - ब्रह्मचारी तेवढे तरून जातात व गृहस्थाश्रमी नरकात जातात, त्यातून आम्ही दोन विवाह केले, आता काय होणार कोणाय ठाऊक?' तेंव्हा पांडूरंगबुवांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तेवढ्यात थोरले महाराज म्हणाले, 'लग्न करता काय?' तेंव्हा पांडुरंगबुवा म्हणाले,'गुरुपाशी खोटे बोलू नये, पण मनात इच्छा आहे, ब्रह्मचारी राहावे.'

        

'श्रीं' नी पाडुंरंगवांना एकांतात नेले व विवाह करावा अशी आज्ञा केली व त्यात कोणतेही अनहित नाही, असे आश्वासन दिले व पुनश्र्च मंडळीत आल्यानंतर हा निर्णय जाहीर केला. पांडुरंगबुवांना स्वतःचे हाताने हळद लावली.
         मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रतेक भक्ताला चार दिवस आधीपासूनच थोरले महाराज सांगत की -'आनंदसागरांच्या कन्येचा मार्गशीर्ष वद्य पंचमीस धाकटे राम मंदिरात विवाह आहे सर्वांनी अक्षता टाकण्यास यायचे बरं का ?' फक्त एवढेच, मात्र नवरदेव कोण आहे हा मात्र सर्वांना प्रश्न पडत असे. प्रत्यक्ष मार्गशीर्ष कृ.५ शके १८३२ [सन १९१०] रोजी धाकट्या रामासमोर पांडुरंगबुवांचे लग्न थोरल्या महाराजांनी चि.सौ. कां. कृष्णाबाईंशी मोठ्या थाटाने लावून दिले. ते स्वतः नवरदेवाच्या पाठीशी उभे राहिले. काही दिवस नवदांपत्यास प्रेमाने आपल्या जवळ ठेऊन घेतले. पुढे उपासना वाढविण्याचा आदेश देऊन जालना येथील राममंदिरात पाठविले. पांडुरंगबुवांना श्रींची तीव्रतेने आठवण व्हायची गोंदवल्यास जावे असे वाटे. मग त्यांनी गुरुपौर्णिमेस गोंदवल्यास जाण्याचा नियम केला. मात्र रामनवमीचा उत्सव जालन्यास व दासनवमीचा उत्सव मंगळूर येथे सुरु केला.
धाकट्या रामाच्या संदर्भात श्री गोंदवलेकर महाराज यांचे एक श्रेष्ठ शिष्य पांडुरंगबुवा [उर्फ रामानंद महाराज] यांच्या विवाहाची ही एक गोड आठवण.
               *
संदर्भःचैतन्य स्मरण २००२ मधील श्री विनायकराव धानोरकर यांचा लेख
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

आणखी एक आठवण 'जी महाराज' या पुस्तकात आलेली आहे. ती म्हणजे, श्रीमहाराजांनी देह ठेवण्यापूर्वी भाऊसाहेबांना आज्ञा केली होती कि ते गेल्यावर १२ वर्षे गोंदवले इथे वास्तव्य करावे.  श्रीमहाराजांनंतर लोकांचे तेथे येणे जाणे बरेच कमी झाले. धाकट्या राम मंदिराच्या मागच्या भागात खोल्या काढल्या होत्या. तेथे भाऊसाहेब कुटुंबासह राहात होते. नित्यनेमानुसार ते दररोज दुपारी बारा वाजता अनवाणी पायांनी श्रीमहाराजांना नैवेद्य घेऊन समाधी मंदिरात जात असे. उन्हात पायांना चटके फार बसत.

जय श्रीराम!

~ संकलन महाराज कन्या













रविवार, ५ जानेवारी, २०२५

 जय श्रीराम!
पाऊलखुणा - ७
आज पाहुया,  कर्नाटकातील कुर्तकोटी जिल्हा धारवाड येथील श्रींच्या पादूका, श्रींचे तैलचित्र आणि पंडित महाभागवत कुर्तकोटी यांच्याविषयी.
*
कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील गदग तालुक्यातील, गदग पासून ११ मैलावर असलेले कुर्तकोटी हे गाव. इथे मार्तंडगौड पाटील ( १८५८- १९०३) हे गावातील मोठे प्रस्थ होऊन गेले. त्यांच्याकडे जवळजवळ १६०० एकर जमिनीची वतनदारी होती. अतिशय सज्जन आणि धार्मिक व्यक्ती.
त्यांच्या पत्नी काशीबाई उर्फ कासक्कम्मा ( १८७६- १९६६). यांचे माहेर, हेब्बळी!  धारवाडपासून पूर्व दिशेला नवलगुंदच्या रस्त्यावर चौदा किमी अंतरावर असलेले हेब्बळी हे गाव. तेथे श्री. वेंकटगौडा नाडगीर हे श्री महाराजांचे शिष्य होते. ते कुर्तकोटी येथे पोलीस पाटील होते. त्यांची कन्या या काशीबाई.

 श्री नाडगीर यांची एक गोष्ट अशी की, १८९४ पासून श्रीमहाराज कर्नाटकात अनेक ठिकाणी जात होते. ते पुर्वी कुर्तकोटीला गेले असतांना एक प्रसंग घडला. तेथील बाजारात कसायाला गाई विकल्या जात होत्या हे श्रींच्या नजरेस पडताच त्यांनी श्री. नाडगीर यांना बोलविले. 'कसायाला गाई देऊ नका' असे श्रींनी नाडगीर यांना सांगितले. श्री. नाडगीर यांनी ते ऐकले. तेव्हापासून त्यांची श्रीमहाराजांचेवर श्रद्धा बसली. गोंदवल्यास श्रींच्या सहवासात ते बरेच दिवस होते.
तर या काशीबाई अतिशय धार्मिक आणि दानशूर.
त्या श्रीमहाराजांच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांना तीन मुले, एक मुलगी. काशीबाईंच्या वयाच्या अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांचे पती मार्तंडगौडा यांचे १९०३ मधे निधन झाले. पाठोपाठ ज्येष्ठ पुत्राचा ही अंत त्यांना पहावा लागला. तेव्हा रायनगौडा, मैलारगौडा, आणि मुलगी कृष्णव्वा यांचे शिक्षण मोठ्या हिमतीने केले. त्यांनी मदतीसाठी म्हणून हेब्बळीहून आपल्या भावाला.. एकनाथगौडा यांना बोलावून घेतले. त्यांच्या घराण्याचे गौरीशंकर मंदिराचां जीर्णोद्धार केला.
 

१९०८ मधे श्रीमहाभागवत यांच्या आमंत्रणनुसार श्री महाराज कुर्तकोटी येथे आले होते तेव्हा काशीबाईंच्या याच

गौरीशंकर मंदिरात चातुर्मासाचे चार महिने राहिले होते. त्यावेळी या मंदिरात श्रींनी स्वहस्ते राम लक्ष्मण सीतेच्या मूर्तीची स्थापना केली होती.तेव्हापासून हे राम मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. 




 

 

येथे काशीबाईंनी श्रीमहाराजांच्या पुढेच एस आर हरपनहल्ली यांच्याकडून महाराजांचे तैलचित्र काढून घेतले. ते भावचित्र पाहून श्रीमहाराज संतुष्ट झाले आणि त्या चित्राचे मुद्रण व वाटप ह्याचे हक्क रायन गौडा यांचेकडे सोपवले. त्यावेळी रायनगौडा लहान होते म्हणून काशीबाईंनी जर्मनीहून रंग मागवून त्या चित्राच्या त्या काळात लोणावळा येथून दहा हजार प्रती मुद्रित केल्या. या सर्व प्रती गोंदवले इथे आणि इतर भक्तांना विनामूल्य वाटल्या. १०० वर्षापर्यंत त्याच्या मूळ प्रती रायनगौडा यांचेकडून वितरीत होत होत्या. त्या चित्राच्या मूळ प्रतीवर एस. आर. हरपनहल्ली व ५-९-०८ अशी नोंद आहे. शिवाय प्रकाशकाचे नाव published by Raoji Martand Patil, Kurtakoti, Dist: Dharwar असे डाव्या बाजूला आणि All rights reserved, Ravivarma press,Karla, Lonavala असे उजवीकडे लिहिले आहे. ( संदर्भ: "कर्नाटकात श्री ब्रम्ह चैतन्य महाराज" , हे मूळ कन्नड  लेखक डॉ. बी. बी. राजपुरोहित, यांचे पुस्तक. मराठी अनुवाद सौ. सविता अलुर)
 

याचवेळी श्री मानप्पा कंप्लिने एक मारुतीची मूर्ती तयार करून महाराजांना अर्पण केली, तिचीही स्थापना त्या

गौरीशंकर मंदिरात करण्यात आली.
मानप्पा कंप्लीनेच महाराजांच्या तीन शिलापादुका तयार करून महाराजांना अर्पण केल्या.

पहिल्या पादुका: या शिळापादुकांवर उभे राहून श्रींची पाद्यपूजा करण्याचा मानस महाभागवत कुर्तकोटी यांनी व्यक्त केला होता. श्रीमहाराजांनी हर्षभराने परवानगी दिली.
१९०९ मधे श्रीमहाराज बिदरहळ्ळीला  नाम जप यज्ञाच्या सांगतेसाठी आले होते. तेथील कार्यक्रम संपवून ते रामनवमी उत्सवासाठी ते हुबळीला आले. हुबळी येथील रामनवमी व दशमीचा पारणा संपवून श्रीमहाराज एकादशीच्या दिवशी हेबळ्ळीला आले.
       कुसुगल स्टेशनवर उतरल्यावर हेब्बळ्ळीकरांनी श्रींचे अपूर्व स्वागत केले. श्रींच्या बरोबर खूप मोठा लवाजमा होता. त्यासाठी श्री. नाडगीर यांनी शंभरावर बैलगाड्या पाठविल्या होत्या. श्रींचा मुक्काम श्री. नाडगीर यांचे वाड्यात होता. त्यादिवशी एकादशी असल्याने श्री. नाडगीर यांचे वाड्यात अहोरात्र नामघोष झाला. दुसरे दिवशी द्वादशीस श्रीमहाराजांना उच्चासनावर बसवून श्री. वेंकनगौडा नाडगीर यांनी आधीच तयार करून आणलेल्या शिलापादुका त्यांच्या पायाखाली ठेवून श्रीमहाराजांची यथाविधी पाद्यपूजा केली. नंतर त्या शिलापादुका विधिपूर्वक वाड्याच्या परसात एका छोट्या राऊळात श्रींच्या उपस्थितीत स्थापन झाल्या. तारीख होती २-४-१९०९ . त्यावेळी श्री. एकनाथगौडा व त्यांच्या पत्नी सौ. कमलाबाई यांनी पुण्याहवाचन केले. त्या दिवशी खूप अन्नदानही झाले. हेब्बळ्ळीचा आनंदमय सोहळा संपवून श्रीमहाराज त्रयोदशीस बेलधडीकडे रवाना झाले.

वेंकनगौडाच्या निधनानंतर त्यांचा मुलगा एकनाथगौडा व नानू राघण्णा हे त्या मंदिराचे व्यवस्थापन बघत होते.
हेब्बळ्ळीचे हे स्थिरपादुकामंदिर श्री. नाडगीर यांचे खाजगी मंदिर होते. पुढे १९८४ साली एप्रिल महिन्यात या मंदिराला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमृतमहोत्सव झाला. हा महोत्सव चार दिवस चालू होता. या महोत्सवापासून या मंदिराचे विश्वस्त संस्थेत रूपांतर झाले. नाडगीर कुटुंबाने त्यासाठी आपली जागा मंदिरासकट दिली. या मंदिराची किर्ती, उत्कर्ष, व वाढ वेगाने होऊ लागली. या छोट्या राउळाचे रूपांतर एका भव्य व सुंदर वास्तूत झाले आहे. गाभारा, सभामंडप, स्वतंत्र मोठा हाॕल, कोठी, स्वयपाकघर, इतर खोल्या, चोवीस तास पाणी, अशा सुविधा झाल्या आहेत.

दुसऱ्या पादुका:
गोंदवले येथे समाधी मंदिरात स्थापन केलेल्या याच पादुका, पूर्वी १९०९ मधे कुर्तकोटी येथे महाराजांनी आपल्या चरण स्पर्शाने पुनीत केल्या होत्या आणि " प्रतिष्ठापनेचे पुढे पाहू तोपर्यंत पादुकांची पूजा करीत जावी ' असे सांगूनही ठेवले होते. त्याच पादुका नंतर श्रीमहाराजांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त पू ब्रम्हानंद बुवा यांनी शके १८३६ मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ( डिसेंबर १९१४) या शुभ दिवशी स्वहस्ते गोंदवले समाधी मंदिरात विधिवत प्रतिष्ठापना केली. त्यावेळी भक्तजनांना उद्देशून ते म्हणाले," या पादुकांच्या प्रतिष्ठापनेने श्रीब्रम्हचैतन्यांचा अजर, अमर, असा जन्म झाला आहे असे समजा. सद्गुरू आपल्याला सोडून गेले या भावनेने उदास होऊ नका.आता निर्गुण स्वरूपात राहून, संपूर्ण जग व्यापून, भक्तांच्या हृदयातच ते निरंतर वास करीत आहेत आणि पुढेही करणार आहेत."

तिसऱ्या पादुका : कुर्तकोटी राम मंदिरातच होत्या. त्या पादुका श्रींच्या आज्ञेनुसार नंतर स्थापाव्या असे काशी बाईंनी सांगितले होते. २०११ मधे डॉ. नीलकंठ पाटील यांनी त्याच मंदिरात छोटे देऊळ बांधून त्या पादुकांची स्थापना केली.

पंडित महाभागवत कुर्तकोटी:

श्री मार्तंडगौडा यांच्याच भाऊबंदकीतील एका सधन घराण्यातील श्री मेलगिरीगौडा यांचे अत्यंत बुद्धिमान पुत्र लिंगनगौडा, हेच पुढे 'श्रीमहाभागवत ' म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म २०-५- १८७९ साली झाला..
संस्कृत, मराठी, इंग्रजी व कन्नड भाषेवरील असामान्य प्रभुत्, उत्कृष्ट वक्तृत्व, सखोल चिंतन, यामुळे त्यांची किर्ती सार्वत्रिक पसरली. यांचे घर कुर्तकोटी मार्तंडगौडा यांचे शेजारीच आहे.
१९१७ सालीं त्यांनीं चतुर्थाश्रम घेतला. पुढे तें करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य झाले. श्रीमहाराजांचा विषय निघाला कीं त्यांना फार गहिंवरून यायचें. इतका तर्कप्रविण पुरूष खरा, पण श्रीमहाराजांच्या प्रेमांत अगदी विरघळून जाई. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी नाशिक येथे पंचवटीत मठ स्थापून तेथे वास्तव्य केले. दिनांक २९/१०/१९६७ ला [आश्विन कृष्ण एकादशी, शके १८८९] वयाच्या ८८ व्या वर्षी ते नाशिक येथे समाधिस्त झाले.

संदर्भ: चैतन्यहृदय ग्रंथ, "कर्नाटकात श्री  ब्रम्ह चैतन्य महाराज" हे कन्नड मूळ लेखक डॉ. बी बी. राजपुरोहित लिखित आणि सौ सविता सुरेश आलुर यांनी मराठी अनुवादित केलेले पुस्तक, आणि फेसबुकच्या काही पोस्ट यावरून साभार!
फोटो: २०१८ मधे स्वतः काढलेले आहेत. त्यात गौरीशंकर मंदिर, आतील राममूर्ती, मारुती, पादुका मंदिर, जवळच असलेले पं.महाभागवत कुर्तकोटी यांचे कुर्तकोटी येथील जन्मस्थान, त्यावर त्यांच्या एका खोलीचे बांधकाम त्यावेळी सुरू होते त्याचे फोटो.
जय श्रीराम!
~ श्रीमहाराजकन्या





         
 


           

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

 जय श्रीराम!
पाऊलखुणा - ६ या लेखात आपण पाहूया, श्रीमहाराजांनी हुबळी मुक्कामात केलेली लीला आणि त्यांचे दयासिंधुत्व.  
**

बिदरहल्ली जपयज्ञाच्या सांगतेला बोलावण्यासाठी ब्रम्हानंद बुवांनी हुबळीचे एक भक्त श्री दत्तोपंत तबीब यांना पाठवले होते. त्याप्रमाणे त्यांनी श्रीमहाराजांना आमंत्रण दिले. श्रींनी सहर्ष संमती दिली खरी पण दर वेळी काही ना काही कारणाने महाराजांचे प्रयाण लांबत गेले. शेवटी एकदाचे श्रीमहाराज निघाले.
या खेपेस त्यांचेबरोबर सुमारें ३०० लोक होते. याखेपेस श्रीमहाराजांची प्रकृति असावी तशी चांगली नव्हती. ते दम्याच्या विकाराने फार अशक्त झाले होते. त्यावेळीं त्यांनी बापूसाहेब साठे नांवाच्या आपल्या एका शिष्यास लिहिलेल्या पत्रांतील उल्लेखावरून वरील विधानाची सत्यता पटतें. पत्रांतील संबंधित मजकूर खालीं लिहिल्याप्रमाणें : ----
     "विशेष लिहिण्याचे कारण कीं, मी ब्रह्मानंदबुवांकडे प्राणाच्या कराराबरोबर आलों आहें. दररोज ताप चार डिग्री येतो. श्वास फार झाला आहे. अन्न खाववत नाहीं. जिना चढून जाण्याची शक्ति उरली नाही, असें झाले आहे. परंतु भागवतांनी व ब्रह्मानंदबुवानी तेरा कोटी जप केला आहे. या शिवाय दोन ठिकाणीं श्रीरामाच्या स्थापना होणार आहेत. एवढ्याकरिता देह गेला तरी हरकत नाही, असें समजून मी आलों आहें. माझ्याबरोबर सुमारें तीनशे लोक आहेत."
                

एवढ्या मोठ्या परिवारासह श्रीमहाराज प्रथम हुबळीस आले. हुबळीत दत्तोपंत तबीब व चिदंबर नायक करी हे भाविक रहात होते. ते ब्रह्मानंद गुरूंचे विशेष भक्त असल्यानें त्यांच्यावर श्रीमहाराजांचा अनुग्रह होऊन, ते त्यांच्या कृपेस पात्र व्हावे, या इच्छेने त्यांनी त्यांना पूर्वीच आपल्याबरोबर गोंदवल्यास नेऊन श्रीमहाराजांच्या पायावर घालून, त्यांच्याकडून त्यांस अनुग्रह देवविला होता. त्याचवेळीं श्रीमहाराजांनी त्यांस हुबळीमध्ये श्रीराम स्थापना करण्याची आज्ञा केली होती.
    अनुग्रह घेऊन परत हुबळीस आल्यानंतर श्रीमहाराजांच्या आज्ञेप्रमाणे दत्तोपंत तबीबानी, आपल्या घराजवळ मंदीर बांधावे, असा विचार करून तो श्रीब्रम्हानंदांना बोलून दाखविला. तें ऐकून श्रीब्रम्हानंदांनी त्यांना, "दुसरें मंदीर बांधण्याच्या भानगडीत पडू नकोस, तुझ्या घराजवळ असलेल्या ईश्वरमंदिराच्या एका भागांत श्रीरामप्रभूंसाठी एक सिंहासन तयार करवून मूर्ति आणून ठेव. आमचे महाराज हरिहरात भेद मानीत नाहींत, हें पटण्यासाठी बहुशः सगळीकडे त्यांनी श्रीरामाचे देवळांत शिवलिंगाची व शिवमंदिरात श्रीरामाची स्थापना केली आहे. त्याकरिता तूहि तसेंच करावे" असें सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार त्या भाविकाने त्याप्रमाणें सर्व सिद्धता केली. अमृतशीलेच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता व श्रीमारुती यांच्या सुंदर मूर्ति आणवून ठेवल्या व श्रीबुवांना कळविले.

याच ठिकाणी श्रीमहाराजांनी एक गंमत केली होती. हि आम्ही तिथे गेलो तेव्हा ऐकलेली माहिती आहे. महाराज हुबळीमध्ये तीन दिवस श्री तबीब यांच्याकडे मुक्कामी राहिले. (श्री तबीब हे २३-१०- १९३५ ते १२-९- १९३९ पर्यंत गोंदवल्याचे पंच होते.) हुबळीमध्ये त्यांचा मोठा वाडा आहे. आधीच उल्लेख आल्याप्रमाणे, श्रीमहाराजांना अंगात खूप ताप होता. भेटायला येणारी माणसे खूप. रात्री ११- साडे अकरापर्यंत भेटीगाठी व्हायच्या. महाराजांना प्रत्येकाशी बोलतांना खूप त्रास होत असे. श्री तबीब यांना ते पाहवले गेले नाही . एकदा रात्री ११ वाजता श्री तबीब यांनी महाराजांना काहीतरी बहाण्याने गुपचूप वरच्या मजल्यावर जिथे त्यांना रूम दिली होती तिथे आराम करण्यासाठी पाठवले. बरोबर सेवेला एक माणूस दिला होता. खाली लोक ताटकळत होते. महाराज वर खोलीत जाऊन जरा पडले खरे, पण त्यांना काही राहवेना. रॉकेलची चिमणी जवळ लावलेली होती. सेवेकऱ्याचे लक्ष नसतांना श्रींनी हळूच तिला फुंकर मारून विझवले आणि सेवेकऱ्याला ती पेटवण्यासाठी काडेपेटी आण म्हणून खाली पिटाळले. 


तो खाली गेल्याबरोबर तिथे जवळ असलेल्या दुसऱ्या चोर जिन्याने खाली येऊन लोकांच्या समस्या निराकरण करू लागले. असे हे श्रींचे दयासिंधुत्व. आपल्याला होणाऱ्या त्रासाची पर्वा न करता सर्वांमध्ये 'राम ' पाहणारे महाराज लोकांसाठी धावून गेले.


महाराज ज्या खोलीत राहिले होते त्या खोलीचे फोटो . त्या जिन्याचेही फोटो आहेत.
जिथे श्रींचा कॉट होता त्या ठिकाणी आता श्रींचा, श्रीरामाचा फोटो ठेवला आहे, ज्याची नित्य पूजा होते. 


 ज्या ईश्वरमंदिरात/ शंकराच्या मंदिरात  पु. बुवांनी त्यांना श्रीरामप्रभूसाठी एक सिंहासन तयार करून मूर्ती स्थापण्याची आज्ञा केली होती. त्या मंदिराचा फोटो

 जय श्रीराम!

पाऊलखुणा - ५

आज वर्षारंभी आपण बघूया, श्रीमहाराजांचे लाडके, परमशिष्य पु. ब्रम्हानंद बुवा यांच्याविषयी.. त्यांच्या कार्याविषयी!
पु. ब्रम्हानंद बुवांच्या कार्याचा झपाट्याविषयी पाहिले तर अचंभित व्हायला होईल. अर्थात श्रीमहाराजांची पूर्ण कृपादृष्टी आपल्या या लाडक्या शिष्यावर होतीच.

श्रीक्षेत्र बिद्रहळ्ळी येथील नामजप यज्ञ!

पु. बुवांच्या चरित्रात या विषयी उल्लेख आलेला आहेच. त्यातले खाली काही संदर्भ देते.
*
श्रींची नाम जप यज्ञ करणे विषयी आज्ञा होतांच श्रीब्रह्मानंदगुरुंना अत्यानंद झाला.व त्यासाठी योग्यस्थळ ठरविण्याकरता त्यांनी संचार सुरु केला.मागील जपयज्ञाच्या वेळी श्रींनी केलेली नदीतटाकाची केलेली सूचना त्यांचे डोळ्यापुढे होतीच.त्यामुळे तुंगभद्रेच्या कांठी वसलेले पुराणप्रसिध्द बिद्रहळ्ळी गांव त्यांनी पसंत केले.जरी हे गांव लहान असले तरी ते सर्व तर्हेने अनुकूल आहे असे बुवांना वाटले.कारण त्याच्याजवळच विठ्ठलपूर,रंगापूर,आदि क्षेत्रे आहेत.तेथे पूर्वी बिष्टाय्या नावाचे महापुरुष होऊन गेले.त्यांना कैलासपतीचा अवतारच मानीत असत व त्यांनी तेथे अनुष्ठानही केले होते.
मुरलीधर/ वेणुगोपाल मंदिर! याचा जीर्णोद्धार पु. ब्रम्हानंद बुवांनी केला होता. आणि जपानुष्ठानासाठी इथेच लोक बसले होते.

🔸 भविष्योत्तर पुराणात बिद्रहळ्ळी हे काशी क्षेत्रासमान असल्याचे वर्णन केलेले आहे.या गावी बिदरहळ्ययव्वा नावाच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे.यावरुनच गावास बिदरहल्ली नांव पडले असावेसे दिसते.या गावाबाहेर नदीकांठी श्रीमुरलीधराचे देऊळ आहे.या देवळांतील मूर्ति काळ्या दगडाची असली तरी नयनमनोहर आहे.मात्र त्या गावात त्यास मुरलीधराचे देऊळ न म्हणतां श्रीवेणूगीपालमंदिर म्हणण्याचा प्रघात आहे. ते देवालय त्यावेळी जीर्ण झाले असल्याने श्रीब्रह्मानंदांनी त्याचा प्रथम जीर्णोध्दार केला. जीर्णोध्दार करतांना तेथे पुढील होणाऱ्या नामजपयज्ञाचेवेळी स्वयंपाक करणेस व अन्न संतर्पणास सुकर होईल ही दृष्टी ठेवून बांधकाम करवून घेतले.
🔸 लहान गावाच्या मानाने तेथे अवघी १५/२० ब्राह्मणांची घरे त्यावेळी होती. जीर्णोध्दाराचे वेळी या गांवचे लोकांचा व ब्रम्हानंद बुवांचा परिचय चांगला झाला असल्याने बुवांवर त्यांचा दृढ विश्वासही बसला होता.म्हणून त्यांनी या गावीच नामजपयज्ञ करण्याचा आपला मानस जेव्हा त्या लोकांस कळविला,तेव्हा त्या गांवच्या सर्व लोकांनी मोठ्या उत्साहाने त्या कार्यास आपली संमती दर्शविली व श्री ब्रम्हानंदांच्या आज्ञेप्रमाणे वागूं असे आश्वासनही दिले.
🔸 श्रीब्रम्हानंदगुरुनी जपानुष्ठानास लागणाऱ्या सर्व साहित्याची सिध्दता केली.या खेपेस जपानुष्ठानाचा प्रारंभ श्रींचे हस्ते करवावा या इच्छेने त्यांस विज्ञापना करुन बोलावून आणण्यासाठी श्रीब्रम्हानंदगुरुनी गोंदवल्यास शिष्यांची रवानगी केली.श्रींना इतर कार्यामुळे तिकडे जातां येणे शक्य नव्हते.म्हणून त्यांनी जपानुष्ठानास प्रारंभ करण्याचें आज्ञापत्र आपले विश्वासू शिष्य अप्पासाहेब भडगांवकर,भाऊसाहेब केतकर  आप्पासाहेब घाणेकर यांच्या हाती देऊन त्यांस तिकडे रवाना केले.ते पत्र पुढील प्रमाणे.
!! श्रीरामसमर्थ !!
"सर्व उपमायोग्य रा.रा.रामभक्त परायण ब्रह्मानंदबुवा यांस आशीर्वाद"
वि.लिहिणेचे कारण तेरा कोटी श्रीराममंत्राचा जप करणारे भक्तराज व ब्रह्मानंद महाराज तुम्ही; महाभागवत,जप करणारे मंडळी यांनी या कलियुगांत थोर केले अनुष्ठान त्याने प्रसन्न माझे अंतकरण. "मी सदा सर्वदा तुमचे आधीन ! तुम्ही सर्वत्रांनी एक करावे काम ! लौकिकी वासनेचा करुनि त्याग ! माझे सांगणे मानावे प्रमाण ! संतोषानें सुप्रसन्न चित्त करुन,तुम्ही ब्राम्हण भोजन,उत्सव,पुरश्चरण,जे कांही तुम्हास दिसेल,जे योग्य असेल ते सत्कर्म करावे.इकडून अप्पासाहेब,घाणेकर, भाऊ साहेब पाठविले आहेत.तर अप्पासाहेब भडगांवकर यांस मी समजून करावे.मीच समजून करावे आरंभ ! त्यांचे म्हणण्याप्रमाणे करावे वर्तन ! मी तुम्हांस सर्वांस येऊन दर्शन देईन यांत शंका नाही.आता हे ऐकावे वचन ! प्रारंभास विलंब न करावा क्षणभर ! जप करणारे मंडळीस, भागवतास,ब्रह्मानंदास हेच मागणे आहे एक. मीआल्यापूर्वी अप्पासाहेब,घाणेकर पोंचल्याबरोबर करावा प्रारंभ.सामान वाया जाऊं देऊं नये.यांत फार अर्थ आहे.समक्ष समजल्यानंतर वाटेल खरे ! लौकिकी भावार्थ सोडूनि द्यावा ! आरामाचा राम जोडावा ! सत्कर्मास हजारो विध्ने असतात.परंतु सर्व एका बाजूला ठेऊन शेवटाला नेण्याचा यत्न करावा.प्रारंभ करण्यात उशिर न लावावा.हा आशिर्वाद. बाकी मजकूर भाऊसाहेब,घाणेकर,सांगताना कळेल.आशीर्वाद .
ता.क. तुम्हास सांगितल्याप्रमाणे मी येऊन घटकाभर तुम्हास भेटेन यांत संशय नाही.पत्राप्रमाणे सर्वत्र मंडळींनी वागावे यांत फार खरे आहे.उगीच हाट करु नका.माझे आज्ञामोडू नका.हा आशीर्वाद .
~  ब्रह्मचैतन्य गोंदावले.
वर उद्घृत केलेले श्रींचे आज्ञापत्र घेऊन आलेल्या भाऊसाहेब व अप्पासाहेब द्वय यांच्या तोंडून सर्व सूचनावजा हकीगत ऐकून घेऊन ती शिरोधार्य मानून शके १८२९ प्लवनाम संवत्सरांतील दासनवमी दिवशी समाप्ति होईल अशा बेताने माघ वद्य द्वितीयेस गुरवारी सुर्योदयाच्या आंत श्रींच्या पादूकांना व मुरलीधराला पंचामृताचा अभिषेक करुन,आरति करुन तेरा कोटी श्रीरामनामजपाचा संकल्प करुन श्रीफल ठेवून नामजपाला प्रारंभ केला.
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आसपासच्या चोहोबाजूच्या लोकांना कळविण्याची आगाऊच व्यवस्था करण्यांत आल्यानें व त्यांतच श्रीमहाराजही येणार आहेत, अशी दाट वदंता पसरल्याने हजारोंच्या संख्येने लोक सप्ताहासाठी जमले होते. श्रीमहाभागवतांचा मुक्कामही तेथेंच होता. सप्ताहाचा थाट काय वर्णावा ! श्रीदासनवमीच्या दिवशीं दुपारी स्वतः श्रीब्रह्मानंदगुरूंनी श्रीसमर्थांच्या निर्वाणाचे अनेक अभंग म्हणून, कीर्तिरूप दासकथन करून, मोठ्या थाटाने नवमी उत्सवाचा समारोप केला. श्रीमुरलीधराची, श्रीसमर्थांची, श्रीमन्महाराजांची आरती करून, नैवेद्य दाखवून, ब्राह्मण, सुवासिनींना भोजन घातलें. सर्व गांवास आमंत्रण होतें.
     जपानुष्ठानाची व्यवस्था श्रीमुरलीधराचे देवळांत केल्यानें, लोक दररोज तेथेंच जपास बसत असत. श्रीबेलधडी भजनीपद्धतीप्रमाणे कांकड आरती, माध्यान्ह नैवेद्यआरती, सायं भजनी आरती वगैरें नित्यनेम व उपासनाक्रम येथें श्रीगुरूंनी आरंभ केला व न चुकता तो चालावा म्हणून, श्रीगुरू फार करून तेथेंच राहूं लागले.
     सुरुवातीस जपास बसलेल्या लोकांची संख्या साठ ते सत्तर इतकीच होती. पण श्रीब्रम्हानंद बुवांनी पुष्कळ गांवचे लोकांस पत्रें पाठवून बोलावून घेतल्यानें ती संख्या उत्तरोत्तर वाढत वाढत २५० पर्यंत गेली. अर्थांत या सर्व लोकांची उतरण्याची, फलाहाराची, भोजनाची उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती. श्रीब्रह्मानंद गुरू मधून मधून जातीनें त्यांच्या योगक्षेमाची चौकशी करीत असल्यानें, ते सर्व श्रीरामनाम जपात आनंदाने मग्न होत असत. जपयज्ञासाठीं लोकांनीं तेथें गर्दी करण्याचें दुसरें कारण म्हणजे पवित्र पुण्यक्षेत्री वास, पावन करणाऱ्या तुंगेच्या स्नानाचा लाभ व श्रीगुरूंचा प्रेमळ सहवास हें होय. अशा त्रिवेणी संगमाचा सुयोग सुखासुखी कोण बरें दवडील ! अशा धूमधडाक्यात पूर्वी नरगुंदांत झाल्याप्रमाणें येथेंही तेरा कोटी जपसंख्या अवघ्या ७, ८ महिन्यांत पूर्ण झाली.
हातासरशी सांगतामहोत्सवही लवकर करावा म्हणून, श्रीब्रह्मानंद गुरूंनी श्रीमन्महाराजांस आमंत्रण करण्यास व बोलावून आणण्यास एका विश्वासू शिष्याची योजनाबद्ध नियुक्ति करून त्यास गोंदवलेस रवाना केले व सामुग्रीच्या जय्यत तयारीस त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली सुरुवात केली.
 श्रीबुवांनी पाठविलेला भाविक गोंदवलेस पोंचताच, त्यानें श्रीमहाराजांचे दर्शन घेऊन नम्रपणें त्यांस श्रीगुरूंच्या विनंतीचे व तेथील हकीगतीचे कथन केले. सर्व वृत्तांत ऐकून हर्षभरित अंतःकरणाने बिदरहळळीस जाणेस निघण्यास आपली संमती दर्शविली. पण दरखेपेसच कारणाकारणानें  प्रत्यक्ष निघण्यास श्रीमहाराजांस दिनावधि होत असे. तसेंच या खेपेसहि झालें. आज उद्या करीत करीत, त्यांनी चार महिने घालविले. शेवटीं श्रींनी एकदाचे प्रयाण केले. या खेपेस त्यांचेबरोबर सुमारें ३०० लोक होते. याखेपेस श्रींची प्रकृति असावी तशी चांगली नव्हती. ते दम्याच्या विकाराने फार अशक्त झाले होते. त्यावेळीं त्यांनी बापूसाहेब साठे नांवाच्या आपल्या एका शिष्यास लिहिलेल्या पत्रांतील उल्लेखावरून वरील विधानाची सत्यता पटतें. पत्रांतील संबंधित मजकूर खालीं लिहिल्याप्रमाणें : ----
     "विशेष लिहिण्याचे कारण कीं, मी ब्रह्मानंदबुवांकडे प्राणाच्या कराराबरोबर आलों आहें. दररोज ताप चार डिग्री येतो. श्वास फार झाला आहे. अन्न खाववत नाहीं. जिना चढून जाण्याची शक्ति उरली नाही, असें झाले आहे. परंतु भागवतांनी व ब्रह्मानंदबुवानी तेरा कोटी जप केला आहे. या शिवाय दोन ठिकाणीं श्रीरामाच्या स्थापना होणार आहेत. एवढ्याकरिता देह गेला तरी हरकत नाही, असें समजून मी आलों आहें. माझ्याबरोबर सुमारें तीनशे लोक आहेत."
जपाच्या सांगतेच्या वेळी श्रींना बोलावून आणण्यासाठी बुवांनी श्री दत्तोपंत तबीब यांची निवड केल्याने श्रीमहाराज प्रथम हुबळी येथे आले. तिथे ३ दिवस मुक्काम करून श्री सिद्धारूढ स्वामींची भेट घेऊन श्रीमहाराज गदग येथे गेले. गदग येथून श्री महाभागवत यांच्या आमंत्रणावरून महाराज कूर्तकोटीस गेले. नंतर महाराज मुळगुंद येथे आले. तेथून निघून शिरहट्टी येथे आले.
शिरहट्टीहून बिदरहल्ली हें खेडेगाव सुमारें २५ मैल अंतरावर आहें. वाटही त्यावेळीं बेताचीच होती. प्रवास बैलगाडीचा, तेंव्हा त्रास हा होणारच हें गृहीत धरून शक्यतोवर कोणालाही कोणत्याहि प्रकारचा त्रास होऊ नये, विशेषतः श्रीमहाराजांना तो होऊं नये म्हणून ब्रम्हानंद बुवांनी विशेष  खबरदारी घेतली होती. एका गाडीत लाडू, पोहे, करंज्या, चकल्या असें फराळाचे सामान ठेवलें होतें. तसेंच दुसऱ्या एका गाडीत पिण्याच्या पाण्याचे दोन मोठे हांडे उत्तम पाण्याने भरून ठेवले होते. या दोन गाड्या व श्रीमहाराजांची गाडी बत्तीस गाड्यांच्यामध्ये ठेवण्यांत आली होती. शिवाय गाड्यांच्याबरोबर पायीं प्रवास करणारांची संख्या अगणित होती. दर दोन तासांनी एखादी झाडांची गर्द छाया आल्यावर, गाड्या थांबवून, थोडी विश्रांती घेण्याची सूचनाही देऊन ठेवलेली असल्यानें त्याप्रमाणें गाड्या थांबत असत. विश्रांतीचेवेळी फलाहाराची व्यवस्था चोख ठेवण्यांत येत असें. शिरहट्टीहून प्रवास सुरूं करतांना "रघुपति राघव राजाराम । पतीत पावन सिताराम" असा जो नामघोष सुरूं झाला, तो प्रवास संपेपर्यंत अव्याहतपणे, मुक्तकंठाने चालला होता.
     बेळहट्टी हें गांव शिरहट्टीपासून १२ मैलांवर बिदरहळळीच्या वाटेवर आहें. तेथें गाड्या पोंचण्यास सायंकाळ झाली. त्या गांवच्या भाविक लोकांनीं श्रीमहाराजांस आपलें गांवी त्यारात्रीं वस्ती करून गांव पावन करावा अशी विनंति केल्यानें, श्रीमन्महाराजांनीं ती मान्य केली व त्या रात्रीं तेथेंच वास केला. दुसरें दिवशीं म्हणजे शके १८३० फाल्गुन वद्य १४ या दिवशीं सुर्योदयापूर्वीच तेथून प्रयाण केले व दुपारी सुमारें १ वाजणेचे सुमारास हा सर्व लवाजमा बिदरहळ्ळीस येऊन पोंचला.
     श्रीमन्महाराजांच्या दर्शनासाठी त्यावेळेपर्यंत पंधरा ते वीस हजारपर्यंत जनसमूह जमला होता. दर्शनासाठी अधीर झालेले लोक दोन कोसापर्यंत पसरले होते. रस्त्यावर तर इतकी गर्दी झाली होती कीं, वाटच दिसत नव्हती. लोकांना श्रीमन्महाराजांचें दर्शन सुलभपणे व्हावे, कोणाचीही निराशा होऊं नये म्हणून, श्रीब्रह्मानंदगुरूंनी मखमलीच्या गादीने मढविलेली एक खुर्ची गाडीवर बांधून श्रीमन्महाराजांच्यासाठी सिंहासन तयार केले होते. श्रीमहाराजांस ऊन लागूं नये म्हणून, श्रीरामसंस्थान बेलधडीहून जरतारी मोठी छत्री आणविली होती. लोकांच्या उत्साहाला इतकी भरती आली होती कीं, श्रीमन्महाराज सिंहासनावर विराजमान होतांच लोकांनीच ती गाडी ओढून बिदरहळ्ळीला नेली.
  
तुंगभद्रा नदीकिनारी दगडी मंडपात जेथे स्वयंपाकाच्या चुली मांडल्या होत्या तिथे एका दगडी खांबावर ब्रम्हानंद महाराजांनी स्वहस्ते कोरलेली ही श्रीमहाराजांची मूर्ती  
त्यावेळीं श्रीमन्महाराजांचा पोशाख म्हणजे, अंगांत एक पायघोळ निळा फरगोल, डोकीस तांबडी जरीची लांब गणेश टोपी व पायांत पादुका असा होता. भालप्रदेशावर कोरीव उभें केशरी गंध होतें व त्यामध्यें काळा टिळा शोभून दिसत होता. ती भव्य मनोहर मूर्ति सर्वांनी डोळेभरून पाहून हृदयसंपुटात साठवून ठेवली. मिरवणुकीपुढें ४, ५ भजनी मेळे, चारसहा ढोलवादक होते. वाजंत्र्यांच्या ताफ्याच्या थाटात, प्रचंड जनसमूहाने वेष्ठित अशा त्या मिरवणुकीस दोन कोस अंतर कापून गांवी येऊन पोंचण्यास जवळ जवळ चार तास लागले. सर्व बिदरहळळीगांव तोरणांनी शृंगारलेले होतें. जनसमूह इतका अपरिमित होता कीं, त्या गांवातील सर्व घरें, मठ वगैरें इमारती लोकांनीं गच्च भरल्या होत्या. जिकडे दृष्टिक्षेप टाकावा तिकडे, मुंग्यांप्रमाणे हालचाल करणाऱ्या लोकांच्या खेरीज, दुसरें कांहींच दिसत नव्हतें.
आचाऱ्यांनी वापरलेल्या चुली
 खुद्द बिदरहळ्ळी येथे नदीजवळच मोठा मांडव घातलेला असून स्वयंपाक-पाण्यासाठी अश्वत्थपूरची दोड्डारामय्या,सण्णरामय्या वगैरे प्रमुख मंडळी आपआपल्या शे-दोनशे हस्तकांसह तेथे उपस्थित झाली होती.तीन महिने अन्नदान चालू असल्यामुळे त्या भागातील गरीब जनता तृप्त झाली,एका मोठ्या खोलीत लाडवाचे ढीग भरून ठेवले होते,श्री महाराज तेथे चार दिवस राहिले,पूर्वायुष्यामध्ये त्यांनी केलेल्या 'हरिहाटाची' आठवण होण्यासारखे भजन व अन्नदान बिदरहळ्ळी ला झाले,त्यानंतर इतका मोठा समारंभ त्या भागामध्ये झाला नाही. त्या समारंभात स्वयंपाक करणाऱ्यांची मजुरीच, तशा स्वस्ताईच्या काळांत साडेदहा हजार रुपये झाली, असा त्यांनी उल्लेख केला आहे. यावरून साहित्य संग्रहाचे अनुमानाचा व जेवण करणाऱ्यांच्या संख्येचा अंदाज करतां येईल.

 

श्री ब्रम्हानंद महाराज शतसांवत्सरिक पुण्यतिथी विशेषांक 'चैतन्यहृदय ' यातील एका लेखात आलेला हा फोटो. बिदरहल्ली जपयज्ञा साठी पुरातन दगडी मंडपातील पुरुषभर उंचीची भोजन करण्याची हि कढई. 

 

 

 

 

*
जय श्रीराम!
आम्ही या ठिकाणी २०१८ मधे पू बुवांच्या पुण्यतिथी शताब्दी निमित्त दौऱ्यावर गेलो होतो तेव्हाचे हे फोटो. रात्री पोहचल्याने फोटो रात्री काढले आहेत. अस्पष्ट आहेत.
जय श्रीराम!
*
महाराज कन्या

जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...