गुरुवार, २ जानेवारी, २०२५

 मानस - पुण्यतिथी गुलालाचा दिवस ई.स.१९२४

श्रीराम समर्थ

तत्पूर्वी पुण्यतिथी उत्सवात सेवा  देणाऱ्या आणखी काही सेवेकऱ्यांची आठवण काढूया!
जालना मठाचे सेवेकरी श्रींच्या चांदीच्या पादुका आणि फोटो उचलण्याची सेवा करतात.
आटपाडी आणि पंढरपूर मठातील मंडळी भालदार, चोपदार ललकरण्याची सेवा घेतात. अब्दागिर्या धरण्याचे कामही त्यांचेच. मोरगिरी आणि सोलापूर मठातील मंडळींकडे श्रींच्या पालखीवर छत्र धरण्याची सेवा आहे. चामरे ढाळण्याचे काम विटेकर भंडारे करत आहेत. बेलधडीकर आणि  गिरवीकर मंडळी चवऱ्या म्हणजे हातपंखाने वारा घालण्याची सेवा आहे. तसेच म्हासूर्णे आणि कुरवलिकर मंडळी ही हे काम करतात. छत्र धरण्याची सेवा कऱ्हाड मठाचे मठपती करतात. हर्दा आणि शेंदूरजण आणि मांडवेकर मंडळी दिवट्या पाजळण्याची सेवा करतात. समाधी सजवण्याची सेवा भीमराव मोडक करत असतात. म्हासूर्णेकर शास्त्री पुराण वाचन आणि कीर्तन सेवा करतात तर हरिदास सांगलीकर लळीत वाचन करतात. फडणवीस सांगलीकर आरती धरतात , तर शाळिग्राम गुरुजी तबक, व्यंजन सेवा... श्रींच्या पालखीपुढे घोडा धरण्याची सेवा आटपाडीकर देशपांडे करतात. दहीवडीचे माळी हे भक्त पालखी खांद्यावर घेण्याची सेवा करतात. हुबळीचे मठपती गरुडाचे चित्र काढलेला ध्वज हाती धरतात.
प्रसाद झाल्यावर उष्टे काढून गोमयाने सारवण्याची सेवा गोंदवल्याचे बारसवडे करत असत. दत्तोपंत इंदोरकर ही गोशाळेकडे असत.
कीर्तनसमयी बुक्का लावण्याची आणि खिरापत वाटण्याची सेवा अंताजीपंत दाढे यांच्याकडे होती.
पुणेकर यांच्याकडे अत्तरगुलाब, तांबुलोपचार आणि पुष्पहारांची सेवा होती.
***


आज मार्गशीर्ष कृ दशमी! उत्सवाचा शेवटचा दिवस!
भल्या पहाटे समाधी परिसरात सर्वत्र सडा संमार्जन करून स्त्रियांनी रांगोळ्या काढल्या आहेत.
हळूहळू मंडळी उत्सव मंडपात जमा होऊ लागतात. प्रथम सनई वादनाने सुरुवात होते.
काकड आरतीचा कार्यक्रम नेहमीपेक्षा लवकर उरकला जातो. आज सर्वांची मने हळवी झालेली आहेत. एक अनामिक हुरहूर सर्वांच्याच मनात दाटून आली आहे.
नंतर साडेपाच वाजेपर्यंत सुरेल स्वरात संथपणे ' रघुपती राघव राजाराम | पतीत पावन सीताराम ' हे भजन एक चित्ताने सामुदायिकरित्या म्हंटले  जाते! त्या आवाजाला ही एक करुण ... आतून तुटल्याची धार आहे.
श्रींच्या पुण्यस्मरणाचा क्षण जवळ येतोय. सर्व मंडळी अधिकाधिक एकाग्रचित्त होत आहेत.
गुरुगृही अहोरात्र पडेल ती सेवा करून, नामाचे अनुसंधान टिकवल्याने प्रत्येकाचे मन श्रींच्या सानिध्यात स्थिर झालेले आहे.
गुलालापूर्वी , २०-२५ मिनिटे तेव्हाचे पंच श्री हरिपंत हरिदास यांचे श्रींच्या कार्याविषयी तळमळीने मार्गदर्शन होते आहे.
श्रीमहाराजांना जे म्हणायचे होते ते त्यांच्या मुखातून सांगतात अशी सर्वांची भावना असल्याने सर्व मंडळी जीवाचे कान करून ते ऐकत आहेत.
हरिपंत सांगू लागतात, ' माणगंगातीरावरील निर्झरांनी वेढलेले गोंदवले हे छोटेसे गाव. इथे मूर्तिमंत दारिद्र्याने उद्विग्न झालेल्या , प्रापंचिक काळजीने काळवंडलेल्या , व्याकूळ झालेल्या असंख्य भाबड्या जीवांना मायेच्या ममतेने धीर देणारा हा महात्मा अठराव्या शतकात जन्माला आला. जणू ब्रम्ह हेच चैतन्यमय होऊन भूतलावर अवतरले. अखंड नामस्मरण , आणि जोडीला सदाचार, नामस्मरण, सगुणोपासना, सर्वांबद्दल प्रेमभाव हे लोकांच्या मनात बिंबवले आणि स्वतः तसे वागूनही दाखवले. कित्येकांना सन्मार्गाला लावले, असंख्य जीवांचा उद्धार त्यांनी केला आणि अजूनही करत आहेत.
 अन्नदान ही गोंदवलेची संस्कृती आहे आणि रामनाम हा गोंदवल्याचा धर्म आहे.
खरे सुख आणि आनंद शाश्वतापाशीच आहे, भगवदप्राप्ती हेच जीवनाचे साध्य समजावे आणि त्याच्या अखंड स्मरणाने तद्रुप व्हावे हेच श्रीमहाराजांचे कळकळीने सांगणे. अखंड नामस्मरणात राहून समाधानाचा, त्या सत- चित- आनंदाचा म्हणजे ईश्वराचा लाभ करून घ्यावा ही गोष्ट पटवून देण्यासाठी त्यांनी आपला देह झिजवला, आपले सारे जीवन खर्च केले... प्रसंगी निंदा,अवहेलना, उपेक्षा, अपमान, छळ ही सोसला.
हे सांगताना हरिपंतांचां गळा भरून आला होता.
उपस्थित जनांना ही महाराजांनी सोसलेला त्रास आठवून गलबलून आले होते.
हरिपंत पुढे म्हणतात, "प्रत्येकाला भगवदनिष्ठेचे म्हणजे नामाचे महत्व कळले पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता. मग तो कट्टर सनातनी असो, की सुधारक! अट्टल गुन्हेगार असो की पापभिरू.. सर्वांशी महाराज प्रेमाने वागले. व्यसनी, अत्यंत पापी व्यक्तींचांही त्यांनी अव्हेर केला नाही. गोंदवल्यास कितीतरी गरीब कुटुंबे त्यांच्यावर अवलंबून होती.. तरी मी त्यांचा पोशिंदा आहे ही भावना त्यांना कधी शिवली नाही.
अखेरच्या काळात श्री महाराजांनी पू. भाऊसाहेबांपाशी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली, " भाऊसाहेब, माझ्याकडे येणाऱ्या सर्वांनाच देव हवाय पण प्रपंचासाठी देव हवाय हो, देवासाठी देव मागणारा कस्तुरीचा चाहता विरळाच. सर्व हिंग जिऱ्याचेच गिऱ्हाईक..." काय वेदना होत असतील महाराजांना हे शल्य बोलून दाखवताना!
शेवटी गदगदलेल्या स्वरात हरिपंत म्हणतात, श्रींनी शेवटच्या रामनवमीच्या उत्सवाला प्रत्येकाने गोंदवल्याला यावे यासाठी खलिते, पत्र, निरोप पाठवले होते. सर्वांना एकच वाक्य कळवले होते, की "  मी आता खूप काळासाठी नैमिष्यारण्यात जाणार आहे, तुम्हा सगळ्यांना जाण्याआधी मी एकदा डोळे भरून पाहू इच्छितो "
नीट बघा, आजही त्या समाधीमधून त्यांचे डोळे तुम्हा आम्हा प्रत्येकाला अगदी डोळे भरून पाहत आहेत. ज्याप्रमाणे एखादा बाप सासुरवाडीहून प्रथमच माहेरी आलेल्या आपल्या लेकीच्या डोळ्यात समाधान बघतो, तसे श्रीमहाराज नामाने आपल्या हृदयात फुललेले समाधान बघत आहेत.
"आपल्यामध्ये दडलेल्या श्री ब्रम्हानंद बुवांचा ते शोध घेत आहेत.. हा माझा बुवा होऊ शकेल का? तो होऊ शकेल का असे शोधत आहेत. "
हे सांगताना हरिपंतांचा आवाज कातर झाला.. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात.
श्रीमहाराज मागे म्हणाले ना, तुम्ही इतके कष्ट घेऊन इथे येता, ( तेव्हा गोंदवलेस दळणवळणाची साधने जास्त नव्हती) .. इथे मनापासून सेवा करता, इथून काहीतरी घेऊन जावं ही माझी इच्छा आहे."
" त्याप्रमाणे आजपासून आपण सर्वांनी निश्चय करावा की त्यांच्या " सदाचरण, पवित्र अंत:करण आणि नामस्मरण" या तत्त्वाचे मी मनापासून अनुसरण करीन.
श्रींच्या वचनाप्रमाणे नामाचे प्रेम आपण इथून सर्वांनी घेऊन जायचे आहे. "
उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांना धारा लागल्या आहेत.
"पाच वाजून बावन्न मिनिटे झालेली आहेत.
आता आपण तीन मिनिटे सद्गुरुंचे स्मरण करूया!"  असे बोलून हरिपंत खाली बसतात.  

संपूर्ण भक्तपरिवार अंतर्मुख होउन मौनात अन् गंभीर शांततेत श्रींचे स्मरण करतो. टाचणी पडली तरी आवाज जाईल इतकी शांतता पसरलेली असते. त्या तीन मिनिटात श्रींच्या समाधीजवळ गाभाऱ्यात पू पांडुरंग बुवा , पू प्रल्हाद बुवा ही मंडळी एका सुरात, "श्रीराम, श्रीराम श्रीराम!" असे संथपणे एका लयीत म्हणत असतात. तो आवाज बाहेरही ऐकू येत असतो.. आणि बाहेरील शांत वातावरणात समाधीच्या दिशेकडून वाऱ्यावरून लहरी याव्यात तसे श्रीराम श्रीराम.. ऐकू येत असते, त्यामुळे सर्वांना आपण समाधीजवळच आहोत असा प्रत्यय येतो आहे. समस्त देविदेवता आणि कालवश झालेले पुण्यात्मे आज हजर आहेत. हो हो , ब्रम्हानंदबुवा सुद्धा श्रींच्या समाधीच्या मागे असलेल्या फोटोजवळ उभे राहून  डबडबलेल्या डोळ्यांनी हा अनुपम सोहळा पाहत आहेत.
ते पवित्र क्षण येतात, आणि बरोबर ५ वाजून ५५ मिनिटांनी सर्व भक्तमंडळी एकत्रित  भावोत्कटतेने "श्रीराम... श्रीराम "म्हणत समाधीच्या दिशेने गुलाल म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या उधळतात.
|| जेथे नाम तेथे माझे प्राण | ही सांभाळावी खुण || असा धीरगंभीर आवाज समाधीमधून उर्ध्व दिशेला कळसाकडे आसमंतात विरत जातो.

आणि...  इकडे समाधीच्या मागे कोपऱ्यात उभे असलेले पू ब्रम्हानंद बुवा हळूच डोळे टिपतात!

**
||जानकी जीवन स्मरण जय जय राम ||
 इत्यलम🙏

~ महाराज कन्या
टीप: सदर लेखातील प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत.. फक्त संदर्भासाठी म्हणून चैतन्य स्मरण विशेषांक, सद्गुरूलीलामृत ग्रंथ आणि पू. बाबा बेलसरे लिखित श्रीमहाराज चरित्र यांचा आधार घेण्यात आला आहे.
काही वावगे/ चुकीचे वाटल्यास मनापासून माफी मागते! 🙏🙏
कर्ता करविता श्रीमहाराजच! प्रेरणा स्रोत तेच, लिहून घेणारे तेच आणि संदर्भ ग्रंथ समोर आणणारे तेच! 🙏

आजवर झालेली लेखनसेवा श्रीमहाराज चरणी अर्पण!🙏
श्रीमहाराजचरणाअर्पणमस्तू 🙏🙏

 मानस- कोठीपूजन गोंदवले - ई. स.१९२४

जय श्रीराम!  

उद्या कोठीपूजन ! आदल्या दिवशी अनेक जण मुक्कामी आलेले आहेत. मंदिराचे आवार गर्दीने फुलून गेलेले आहे. निरनिराळ्या गावांहून भजनी दिंड्या आधीच येऊन पोहचल्या आहेत. आधीच पत्रव्यवहार करून त्यांनी दिवस ठरवून घेतले आहे. विशेष म्हणजे काहीही मोबदला न घेता निव्वळ श्रींची सेवा या भावनेने हे लोक आलेले आहेत. 

कोठीघरात स्त्रियांनी हरिपाठ म्हणत भाज्या निवडणे, धान्य निवडणे, दळणे वैगेरे आधीच करून ठेवलेले आहे. (सांगायची गोष्ट म्हणजे, एका वर्षी उत्सवासाठी २० किलो विलायची दळली गेली होती. यावरून श्रींचा आवाका लक्षात येईल.)
रात्री कंदील, चिमण्या, पिवळे बल्ब लावून कोठिघरात सेवेकरी स्त्रियांनी भांड्याच्या आरास रचल्या आहेत.. फुलांच्या, धान्याच्याही रांगोळ्या काढल्या आहेत. बाहेर मांडवात, समाधी स्थळ, गोशाळा, वैगेरे सगळ्या ठिकाणी रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत. यात पुढाकार भाऊसाहेब केतकर, अण्णासाहेब मनोहर, सदाशिवराव धामणकर या मंडळींचा आहे. 

 

कोठीपुजनसाठी कोठीतील असेल नसेल त्या धान्याची पोती बांधली गेली आहेत. त्यांच्याभोवती रांगोळ्या काढून कोठी सजली आहे. ब्रम्हानंद बुवांच्या फोटोसमोर सुंदर फुलांची रांगोळी काढली गेली आहे. भोवती सगळ्या आरास रचल्या आहेत. भाज्या , फळे यांची आकर्षक सजावट केली गेली आहे. गोशाळेतही स्वच्छ सारवून प्रत्येक गायीपुढे रांगोळ्या काढत आहेत. गायींना पाठीवर रंगीबेरंगी झुल पांघरली गेली आहे.
श्री विश्वनाथ बुवा आणि श्री बसप्पा यांचा याबाबतीत पुढाकार आहे... गोमातांची कसून सेवा ते करत आहेत.
श्री मनोहर आंबेगावकरांनी श्रींच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुले आणण्याची जबाबदारी घेतली आहे. केळीच्या खांबानी समाधी मंदिर, गोशाळा, आईसाहेब मंदिर, कोठिघर, स्वयंपाकघर यांच्या प्रवेशद्वार सजवले गेले आहेत. आंब्याच्या पानांची तोरणे बांधली गेली आहेत.

प्रत्यक्ष कोठीपुजनचां दिवस उजाडला.
पहाटे साडेतीनला उठून सेवेकरी संपूर्ण उत्सव मंडप,  भोजनमंडप , मंदिराचे आवारात सडासंमार्जन , रांगोळ्या काढतात.
पहाटे ४ वाजता पहिली घंटा होते.  अतिशय मंगलमय वातावरणात सनईचे सुर कानी पडतात.  गरम पाण्याची व्यवस्था नुकतीच सुरु झाली आहे. श्री भवानरावांनी लाकडे फोडून पुरेसा साठा जमवलेला आहेच. बाहेर चुली मांडून मोठाली पितळेची पातेली , मोठी चिंचोळ्या तोंडाची तांब्याची  भांडी ठेऊन पाणी तापवणे सुरु आहे. गरम पाणी काढून घेण्यासाठी मोठी गडवी आहेत. आपापली लोखंडी/प्लास्टिक बादली गार पाणी भरून तिथे घेऊन जायची. जवळच असलेल्या हौदातून गार पाण्याची बादली आणून ठेवायची. तिथले सेवेकरी आपल्याला गरमागरम पाणी आपल्या बादलीत ओतून देतात. ते झाले की बादलीभर गार पाणी आपण पातेल्यात ओतुन त्यात भर घालायची, असा नियम. बळवंतराव आटपाडीकर, नानासाहेब देशपांडे [वाई], शंकरराव जोशी [सोलापूर], बापूराव गिरजे, ही मंडळी ही व्यवस्था पहात आहेत. . ते पहाटे तीन वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत सतत हे काम करीत असतात . बळवंतराव यांचा इतका धाक होता कीं, स्वतः पंचसुद्धां गरम पाणी घेतल्यावर स्वतः भर घालीत. पंच म्हणून अधिकार दाखविण्याची पद्धतच नसे. त्यांतच जें प्रेम होतें तें अवर्णनीय आहे.

जालनेकर, कुरवलीकर, आटपाडीकर, गिरवीकर, मांडवेकर , सांगलीकर सगळी भक्तमंडळी लगबगीने स्नान करून ठेवणीतले कपडे घालून उत्सव मंडपात काकड आरतीसाठी जमा होतात. मंदिरात श्रींच्या समाधीला अम्मांनी विणलेले अतिशय सुंदर वस्त्र घातले गेले आहे. ते बघून समाधी मंदिरात कोपऱ्यात उभ्या असलेल्या टी रंगमा बालसुब्रह्मण्यम शेट्टी उर्फ अम्मा हळूच डोळे टिपतात. समाधीवर आणि समाधीमागच्या श्रींच्या फोटोला सुंदर तुळशीचे हार घातले गेले आहेत.  मंदिरात श्रींचे स्तवनरूप गायनसेवा सुरु झालेली आहे. कार्यक्रमाचे अगोदर, पाच मिनिटे "रघुपति राघव राजाराम ... " असा जयघोष होतो. बरोबर पावणेपाच ला दुसरी घंटा होते. संथ आवाजात भूपाळ्या सुरु होतात. संपूर्ण वातावरण एकदम भारावल्यासारखे होते. मंडळी एकाग्रचित्ताने समरसून भूपाळ्या, काकड आरती म्हणत आहेत. भावपूर्ण स्वरात काकड आरती, पंचपदी पार पडते. लोणी साखर प्रसाद दिला जातो.  श्रीमहाराजांचे पंच म्हणून श्री बापूसाहेब साठ्ये यांच्याकडे सर्व धार्मिक कार्यक्रमांची जबाबदारी असायची, मग ती पूजा असो, कि पुण्याहवाचन असो कि, पंगतीत उदक सोडणे असो की लघुरुद्राभिषेक.यजमान म्हणून श्री बापूसाहेब ती जबाबदारी पार पाडायचे. पण पुण्यतिथी उत्सवात समाधीच्या पूजा श्री भीमराव मोडक [इंदुर] व श्री गोविंदराव गाडगीळ यांचेकडे आहे. नित्याची पूजा , पंचपदी पार पडल्यावर श्रींच्या समाधीपुढे संकल्पाचे श्रीफळ ठेवून अखंड माळ व भजनी पहाऱ्यास सुरुवात होते. हा पहारा अखंड दहा दिवस सुरु राहून दशमीच्या दिवशी दुपारी महानैवेद्य झाल्यावर पूर्ण होत असतो. भजनी पहाऱ्यासाठी श्रीकृष्णाच्या दोन्ही बाजूला दोन दोन पाट ठेवून दोन दोन भक्तमंडळी उभे रहातात. आणि टाळ वाजवत, एका बाजूकडच्या मंडळींनी 'रघुपती राघव... म्हणायचे. व दुसऱ्या वेळी दुसऱ्या बाजूकडच्या मंडळींनी हेच भजन म्हणायचे अशी पद्धत आहे. मंदिराचे संपूर्ण आवार या भजनांनी दुमदुमून जाते. भजनाचे प्रमुख म्हणून दामोदरबुवा कुरवलीकर, श्रीपांडुरंगबुवा जालनेकर, नानाचार्य, बाबा मेरेकर, प्रल्हादबुवा, हे आहेत. मंडपातील कीर्तनाची व्यवस्था अंताजीपंत दाढे, वासुदेवराव फडके व पुणेकर मंडळीकडे आहे.  

काकडआरती कार्यक्रम उत्सव मंडपात सुरु झाला की मंदिरातील सभामंडपात निरनिराळ्या ठिकाणाहून आमंत्रित अश्या वैदिक मंडळींकडून श्रींच्या पादुकांवर लघुरुद्राभिषेक सुरु होतो. तो झाला कि आरती होते.

इकडे पंचपदी झाल्यावर मंडळी कोठीघरात पु. ब्रम्हानंद महाराजांच्या फोटोसमोर जमतात. उत्सवात कोठीवर महादेवभटजी हरदेकर, गणूकाका साने हे प्रामुख्याने आहेत.  प्रथम सनईवादन अन नंतर मंत्रघोषात कोठीपूजनास सुरुवात होते. व्यवस्थापक श्री गणपतराव दामले सपत्नीक पूजेला बसलेले आहेत. पु. ब्रम्हानंद बुवा यांनी सांगितल्यानुसार त्यांनी दिलेल्या अक्षय पिशवीची व त्यातील तीन चांदीच्या प्रथम नाण्यांची पूजा होतेय . ब्रम्हानंद महाराज प्रत्यक्ष हजर असून, कितीही लोक आले तरी कोठीतील साहित्य कमी पडू देणार नाही अशी सर्वांची श्रद्धा आहे, नव्हे नव्हे... तसे आश्वासनच दिले आहे पु. बुवांनी! अक्षय पिशवीबरोबरच श्रीमहाराजांच्या पालखीतील चांदीच्या पादुकांची, पु. बुवांच्या फोटोची पण यथासांग पूजा होतेय.  नंतर कोठीघराची धान्य, स्वयंपाकघरातील भांडी, चुली यांची हळद कुंकू फुले वाहून पूजा होतेय. मंडळी आता अग्निपुजेसाठी तयार होतात. त्या काळातल्या मोठ्या चुलीची पूजा करून त्यात मंत्रोच्चारासहित अग्नी घालण्यात येतो. उत्सवास सुरुवात झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. आणि हे आता उत्सव संपेपर्यंत टिकणार आहे. कितीही कष्ट पडले तरी कोणी दमणार नाही, भूक तहान याचीही कोणाला जाणीव होणार नाहीये. नंतर मंडळी गोशाळेत जाऊन गायींची पूजा करतात. गायींना गोग्रास दिला जातोय. झाली! आता उत्सवाच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली.

इकडे एकीकडे श्रींच्या दर्शनासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या मंडळींची रांग लागली आहे. सकाळी साडेनऊ वाजता श्रींच्या पादुकांवर अभिषेक होतोय. त्याचबरोबर  नेण्याच्या पादुकांची ही पूजा होतेय. ही महापूजा यथासांग झाल्यावर श्रींच्या पादुका आणि फोटो मोठ्या सन्मानाने पाना-फुलांनी, तोरणांनी सजवलेल्या पालखीत ठेवली आहे. " श्रीराम जय राम , जय जय राम " म्हणत पालखी उचलली जाते आणि त्या गजरात नगरप्रदक्षिणेसाठी निघते. .,
रोज १० दिवस श्रीमहाराज असे सकाळ संध्याकाळ नगरप्रदक्षिणेसाठी निघतात. श्रीमहाराज देहात असतांना पु. ब्रम्हानंद बुवांनी कर्नाटकात श्रींची अशी भव्य मिरवणूक काढली होती. भर वैशाखात दिवसाढवळ्या मशाली लावल्या होत्या. याची आठवण होते. हेतू हा कि दिवसाढवळ्या मशाली का लावल्या आहेत हे पाहायला लोक बाहेर येतील आणि आपल्या सद्गुरूंची ... श्रीमहाराजांची एक नजर त्यांच्यावर पडावी ...कृपादृष्टी पडावी. आणि श्रींची एकदा एखाद्यावर नजर पडली कि ... घरातल्या एकाला महाराजांनी धरले कि अख्ख्या घराला धरतात हे माहित आहे ना?  अगदी याच हेतूने १० दिवस अशी मिरवणूक निघते. गावातल्या प्रत्येक मंदिरात दर्शन घेऊन आरती होते.  त्या काळचे गावाचे रस्ते कच्चे... धूळ फुफाटयाचे. परंतु सेवेकर्यांनी पालखी मार्ग आधीच दगडे, काटे उचलून साफसूफ करून ठेवला आहे. त्यावर सडे घातल्याने त्यासाठी  मार्ग अधिकाधिक सुकर करण्यात आला आहे. गावातीले तरुण मंडळी, पालखीचे सेवेकरी एकापाठोपाठ एकेक पाट ठेवत आहेत, त्यावरून पालखी खांद्यावर घेतलेले लोक संथपणे जयघोषात चालत आहेत. फार सुंदर दृश्य आहे हे!
 
पालखीच्या पुढे मागे चालणारे लोक भजने गात आहेत... कोणी वारकरी फुगडी खेळत आहेत. फार भारावलेले वातावरण. सगळीकडे एकच टाळ चिपळ्यांचा गजर, रघुपति राघव राजाराम, कधी जय जय श्रीराम चा गजर होतोय.   पालखीच्या अगदी पुढे  भालदार, चोपदार, श्रींना काही लोक पंख्याची हवा घालत आहेत... काही स्त्रिया पदराने श्रींना हवा घालत आहेत.  घरोघरी  स्त्रियांनी अंगणात सडे टाकून रांगोळ्या काढलेल्या आहेत.  सगळा साज शृंगार करून स्त्रिया औक्षणाचे ताट घेऊन, मुलाबाळांसहित अंगणात येऊन तयार आहेत. श्रींच्या पालखीच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच  आहे. प्रत्येकाच्या घरी श्रींचे औक्षण होते. दाणे गुळाचा प्रसाद सर्वाना मिळतो आहे. थोरले राम मंदिरात येऊन पालखी थोडी विसावते. 

 

 थोरले राम, लक्ष्मण, आणि सीतामाईना आज सुंदर पोशाख चढवला गेला आहे. नाजूक जिवणी, केशरी रंगाची जरतारी सोनेरी तारेने कलाकुसर केलेली नऊवारी पैठणी, नाकात मोत्याची नथ, सवाष्णीचा सगळा साज ल्यालेली अशी सीतामाई, आणि त्याच रंगाची वस्त्र नेसलेले, मोत्याचे दागिने घातलेले मंद मंद हास्य परिधान केलेले श्रीराम लक्ष्मण शोभून दिसत आहेत. आज श्रीरामाच्या चेहर्यावर वेगळेच तेज चढले आहे. भजने होऊन श्रींची आरती तिथे होते. पुन्हा पालखीचे मिरवणुकीने प्रस्थान होऊन सरते शेवटी पालखी पुनश्च समाधी मंदिरात येते. समाधी मंदिराला बाहेरून १३ प्रदक्षिणा घातल्या जात आहेत. प्रत्येक प्रदक्षिणेला वेगळी आरती होतेय. पालखी प्रदक्षिणा बरोबरच अनेक लोक, सेवेकरी पालखीच्या मागे प्रदक्षिणा म्हणत आरती म्हणत आहेत. फार सुंदर दृश्य आहे हे. हि पद्धत सज्जनगडावर जशी होते तशीच इथे होते आहे.
 नंतर पालखी समाधी मंदिरात येऊन पादुका समाधी मंदिरात आत समाधीजवळ नेण्यात येतात. एव्हाना १२ वाजलेले असतात. नैवेद्य तयार असतो. स्वयंपाकघरात सर्व देवांचे नैवेद्य तयार आहेत. श्रीसमाधी, श्रीगोपालकृष्ण, श्रीआईसाहेब, श्रीब्रम्हानंद (कोठी), थोरले राम, धाकटे राम, दत्तमंदिर, विठ्ठलमंदिर, गोमाता इत्यादी नैवेद्य वाढले जातात. गावातील देवांना नैवेद्य दाखवण्यास ते ते पुजारी घेऊन जातात. . " जेवी जेवी बा गुरुराया... " श्रींची नैवेद्यारती होते.
श्रींचे भोजन झाल्यावर तो प्रसाद मुख्य स्वयंपाकात कालवण्यासाठी पाठवला जातो.. एकीकडे प्रसादासाठी लोकांनी भोजनमंडपात रांगा लावलेल्या आहेत. 'जय जय श्रीराम, जय जय श्रीराम'च्या जयघोषात सोवळे नेसलेले वाढपी सेवेकरी उत्साहाने वाढत आहेत.
 

 

 

 आज काय काय आहे बरे प्रसादाला? साधा भात, मसालेभात, चटणी, कोशिंबीर, आमटी, गोड लापशी, जिलेबी. लोक तृप्त तृप्त होऊन बाहेर निघत आहेत. लोक सतत येत आहेत. पार महाराजांच्या मागच्या शेतापर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यादिवशी सायंकाळपर्यंत कित्येक पाने उठतात. हजारो लोक जेवून जातात. श्री नारायणराव कुंदापूर हे महाराजांचे निस्सीम भक्त स्वयंपाकावर लक्ष ठेवून आहेत. कितीही पान झाले तरी त्यांची स्वयंपाकाची तयारी आहे.  श्री मनोहर दुसे हे ही स्वयंपाकात मदत करत आहेत. पिण्याचे, स्वयंपाकाचे पाणी आणून देत आहेत. यशवंतबुवा हे एक निस्सीम साधक स्वयंपाकघरात स्वच्छतेचे काम करत आहेत. भल्या पहाटे उठून कंबरेला लुंगी आणि वरती उघडेच असे हे साधक खराटा घेऊन आवार साफ करत असतात. 

 

श्री विश्वनाथबुवा हे एक उच्च कोटीचे साधक तर उत्सवात १० दिवस झोपतच नाहीत दहा दिवस उपवास करीत. बुक लागली तर द्रोणात कच्चे ज्वारीचे पीठ खात किंवा बाजरीच्या पिठात पाणी कालवून  घेऊन उशिरा ४ वाजता जेवत. चोवीस तास त्यांचा आवारात जागता पहारा आहे.
इकडे उत्सवमंडपात तोवर दुपारचे कीर्तन सुरु होते. समाधी मंडपात सुंदराकांड पुराण वाचन श्री शंकरशास्त्री म्हासुर्णेकर, जोशीबुवा, हे करत आहेत. सायंकाळी चार वाजता श्री सखारामबुवा हैद्राबादकर यांचे आज कीर्तन आहे. रोजच्या कीर्तनकारांची यादी बनवण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्व कार्यक्रम होत आहेत. संध्याकाळी श्रींची पालखी मंदिराभोवती ३ प्रदक्षिणा घालून परत मंदिरात येते. सायंआरती होऊन प्रसाद सुरु होतो. उत्सवाचे १० दिवस शेजारती होत नाही.
अखंड माळ सुरू आहे. श्रीमहाराजांचे तत्व अखंड नामस्मरण आणि अन्नदान हे तंतोतंत पाळले जाणे यावर पंचांचा भर आहे. रोज हजारो लोक जेवून जात आहेत. ८ दिवस झपाटल्यासारखे निघून जातात. सेवेकरी अथक परिश्रम करत आहेत. हि सर्व मंडळी आत्मोद्धारासाठी अत्यंत सेवाभावाने हे कार्य पार पाडत आहेत. नवमीला असंख्य लोक येत आहेत .. पानावर पाने उठत आहेत. रात्री ११-११ वाजेपर्यंत प्रसाद सुरु आहे. वाढपी, स्वयंपाकी, पत्रावळ्या उचलणारे सेवेकरी, भांडी घासणारे सेवेकरी, नंतरची आवराआवर करणारे, परिसर स्वच्छ करणारे ...  अथकपणे सेवा करत आहेत.

...आणि आता तो दिवस उजाडतो. गुलालाचा दिवस. उत्सवाचा परमोच्च दिन. याजसाठी केला होता अट्टाहास!
क्रमशः
फोटो सौजन्य: चैतन्यस्मरण विशेषांक🙏
(टीप: लेख संपूर्णत: काल्पनिक आहे. फक्त जिथे हवे होते तिथे श्रीमहाराज चरित्रातून आणि चैतन्यस्मरण विशेषांकातून संदर्भासाठी नोंदी घेऊन त्यांची सांगड प्रसंगानुरूप घालण्यात आली आहे . काही चुकीचे वाटल्यास क्षमस्व! )
~ श्रीमहाराज कन्या


 जय श्रीराम!
गेले ३-४ दिवसांपासून श्रीमहाराज निर्वतल्यानंतरच्या ७-८ वर्षातल्या काळातला पुण्यतिथी उत्सव कसा असेल यावर चिंतन सुरू होते.. सुरवातीच्या दोन उत्सवांना पू ब्रम्हानंद बुवा होते. त्यानंतर फ्ल्यू आजाराची साथ भारतभर होती.. १९१८ ते १९२० पर्यंत!  सुरवातीच्या पुण्यतिथी उत्सवाच्या काही नोंदी वाचनात आल्या.चैतन्य स्मरणचे  जुने विशेषांक ही चाळले.
त्यांचा संदर्भ घेऊन काही प्रसंग मनात आकारास येऊ लागले. मग हे कुठेतरी लिहून ठेवावं असं वाटलं.. त्यावरून हा लेख आकारास आला अर्थात प्रेरणा श्रींचीच. 🙏🏻
तो इथे देते. लेख अर्थातच काल्पनिक आहे
. 🙏🏼🙏🏼
*************
मानस - पुण्यतिथी उत्सव १९२४
स्थळ: गोंदवले , समाधी मंदिर परिसर
काळ: साधारण १९२४च्या दिवाळीनंतरचा !

नुकतीच दिवाळी होऊन मंडळी आपापल्या गावी परत गेली आहेत. काही मोजके लोक आता गोंदवल्यामध्ये राहिले आहेत. कार्तिक महिना संपत आलाय. सर्वांना वेध लागलेत ते आता मार्गशीर्ष मध्ये  येणाऱ्या श्रीमहाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाचे. सर्वजण वाटच पाहत आहेत, पंच मंडळी कधी बैठक घेतात ते.
एका संध्याकाळी सर्व मंडळींना त्या वेळचे पंच श्री गणपतराव दामले , श्री हरिपंत हरिदास, श्री पागा फडणीस, ई मंडळी समाधी मंदिराच्या आवारात सगळ्यांना जमण्यासाठी बोलावणे पाठवतात. समस्त सेवेकरी, काही वरिष्ठ ग्रामस्थ, पंच मंडळी आवारात जमतात. श्री दामले प्रत्येकाच्या कामाची जातीने चौकशी करत आहेत.
तसेही कामाची वाटणी करण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक जण उत्साहाने सर्वच कामे करायला तत्पर आहेत.. उलट अहमहमिकेने कामे अंगावर घेत आहेत.  श्रींचा पुण्यतिथी उत्सव म्हणजे प्रत्यक्ष श्रींची सेवा ! सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलेले आहे.
 

 पंच मंडळी पंचांग घेऊन येतात आणि बोलायला सुरुवात करतात. "मंडळी, दिवाळी झाली ना, यावेळी  मार्गशीर्ष कृ. दशमी २० डिसेंबर १९२४ रोजी आपल्या श्रींची पुण्यतिथी येतेय.आपल्याला उत्सवासाठी तयारीला बरोबर एक महिना मिळतोय. सर्वात आधी गावोगावी निमंत्रणे जायला हवीत. .यावेळी बरीच माणसे येतील.  १०,००० तरी लोक येण्याचा अंदाज आहे. या दिवाळीत तुम्ही बघितले असेलच.
"श्रीयुत बळवंतराव (फाटक), आपण निमंत्रण पत्रिकेचा मसुदा बनवायला घ्यावा'!  दरवर्षीप्रमाणे, श्री.नागप्पा तुम्ही कर्नाटकात , श्री बसप्पा--श्री हिर्लेकर कोल्हापूरकडे, श्री वामनराव जोशी, आणि श्री डी.आर.जोशी मुंबईत, श्रीयुत बाबुराव गद्रे पुण्यात , श्री नानासाहेब देशपांडे वाईमध्ये ,  श्री जोशी व श्री उपाध्ये कडावकडे,  श्रीमहाराजांच्या अनुग्रहित व्यक्तींना  तसेच इतरांना घरोघर निमंत्रण पत्रिका देतील.
श्रींच्या निर्वाणानंतर, त्यांच्या आज्ञेने १२ वर्ष गोंदवल्यासारख्या ठिकाणी.. सगळी अडचण सोसून राहणारे ७७ वर्षांचे श्री भाऊसाहेब केतकर स्वतःहून म्हणतात की गोंदवले आणि आसपासची गावे गोंदवले खुर्द, बुद्रुक , पिंगळी, दहिवडी, आटपाडी मधे पत्रिका आम्ही वाटू. पंच त्यांना जशी आपली इच्छा म्हणत रुकार देतात.

 पंच पुढे समस्त सेवेकरी लोकांना म्हणतात, २० नोव्हेंबरला मार्गशीर्ष शु. प्रतिपदा आहे , तेव्हा आपण मुहूर्तमेढ करणार आहोत.  ५ डिसेंबरला वद्य प्रतिपदा. यादिवशी आपण कोठीपूजन करणार आहोत. ब्रम्हानंद बुवांनी घालून दिलेल्या शिस्तीप्रमाणे करायचे आहे.  नाहीतर त्यांचा तडाखा माहित आहे ना?

कोठीघर सांभाळणाऱ्या श्री येरळवाडीकर मास्तरांना पंच विचारतात, "मास्तर, कोठीघरात धान्य किती लागणार आहे? भांडी किती लागणार आहेत? पुरेशी आहेत ना? कर्नाटकातून ब्रम्हानंद बुवांनी पाठवलेली जाड जाड पितळेची मोठी भांडीकुंडी आहेत आपल्याकडे.  अजून काय काय भांडी लागतील. किराणा सामान वैगेरे सगळ्या याद्या करायला घ्या. तुम्ही अगदी काटकसरीने , निगुतीने सगळं सांभाळता म्हणून विश्वास आहे तुमच्यावर!
 आणि हो, मास्तर उत्सवात तुम्हाला कोठीबरोबरच नामसप्ताह आणि भजनी पहाऱ्याची पण व्यवस्था लावून द्यावी लागेल बरे का! नंतर एकदा तिकडे व्यवस्था लागली की श्री काशीनाथय्या हर्देकर, श्री हरिपंत हरीदास, श्री बाबा दांडेकर, श्री गंगाधरपंत आठवले, ही मंडळी पहाऱ्याकडे बघतील.
कीर्तनसेवेसाठी आपल्याकडे हरिपंत हरिदास आहेतच. श्री दामोदरबुवा रिसबुड, श्री दामोदरबुवा कुरवलीकर, श्री सखारामबुवा हैदराबादकर, श्री कराडकर,  श्री पिलोबा वडूजकर, श्री शंकरराव वडगावकर, श्री मणेराजुरीकर यांनाही निमंत्रणे पाठवून बोलवावे लागेल..

नंतर मद्रासी अम्माकडे वळून पंच म्हणतात,"अम्मा , तुम्ही आताच रामरायाची वस्त्रे आणि समाधीवरील वस्त्रे विणायला घ्यावी.
मुळगुंदच्या ठसकेबाज गंगुताई आठवले स्वयंपाकघर बघणाऱ्या! त्या पंचांनी काही सांगण्याच्या आधीच म्हणतात, "स्वयंपाकघराचे आम्ही बघतो. लक्ष्मीबाई, काशीबाई, आपण उद्यापासूनच  चटण्या, लोणची, पापड करायला घेऊ. सामानाची यादी उद्याच हरिपंतांकडे देतो. "

पंच समाधानाने मान डोलवत पुढे म्हणतात, 'इतके लोक येणार म्हणजे, सरपण खूप लागेल. त्यासाठी आताच सरकारकडे अर्ज करावे लागेल. वठलेल्या सरकारी झाडांचे सरपण पी. डब्लू डी खात्याकडून स्वस्त दरात मिळेल. भाऊसाहेब आपण सरकारी नोकरीत होता ना, हे सरकारी अर्जाचे काम मनावर घ्यावे!"

झालं, दुसऱ्याच दिवसापासून सगळी मंडळी उत्साहाने तयारीला लागतात.
चारच दिवसात, निमंत्रण पत्रिकेचा मसुदा तयार झालाय. तो पंचांनी मान्य करून छापण्यासाठी दिला गेलाय. अम्मांनी वस्त्रे विणायला घेतलीत. यावेळी अम्मा जरीकाठाची वस्त्रे आणि त्यावर मोत्याची नक्षी विणत आहेत. भाऊसाहेबांनी सरपणासाठी सरकारकडे अर्ज केला आहे. श्री बळवंतराव, श्री येरळवाडीकर मास्तर यांनी म्हसवडला बाजाराच्या दिवशी, जाऊन स्वयंपाकासाठी काही मोठी भांडी आणि सुमारे २५-३०००० पत्रावळ्या, द्रोण खरेदी केले आहेत. हे सगळे बैलगाडीने आणून समाधी मंदिराच्या आवारात एकूणएक मोजून दिले जात आहेत. पंच मंडळी सगळं व्यवहार काटेकोरपणे करत आहेत.
आता जसजसे दिवस जाऊ लागले सेवेकर्याच्या उत्साहाला उधाण आले आहे.
निवासी खोल्यांची डागडुजी , साफसफाई, स्वयंपाकघर भिंती, जमीन शेणाने सारवणे वैगेरे सगळी कामे रोजच्या रोज होत आहेत. गुळ दाणे तोंडात टाकत, मोठ्या नामगजरात काम सुरु आहे.  सगळीकडे नुसती धांदल उडालेली आहे. गंगुताईंनी चटण्या, लोणची पापडाचे डबे भरून ठेवलेत. अम्माचे काम पण आता होण्यात आले आहे.
आईसाहेब मंदिरासमोर मांडव घालायचे काम सुरु झाले आहे. प्रथम सारख्या अंतरावर चुन्याने आखून घेतले आणि खड्डे खोदून वासे पुरायचे काम सुरु झाले आहे. संस्थानकडे तेव्हा पगारी नोकर नसल्यामुळे सेवेकरीच हे काम मोठ्या नामगजरात करत आहेत. राजाभाऊ गोडबोले त्यांच्यावर लक्ष ठेवायला आहेतच. वासे पुरल्यावर त्यावर बांबू आडवे टाकून झाले. तेव्हा वर टाकायला कापड वैगेरे नव्हतेच. म्हणून राजाभाऊंनी आधीच विश्वनाथ कडून झाडाच्या मोठ्या फांद्या, डहाळे कापून ठेवल्या आहेत. ते वर टाकण्याचे काम सुरु होते. त्यामुळे मंडपात बसलेल्या लोकांना ऊन लागणार नाही. मधून मधून सेवेकर्यांनी गूळ, दाणे यांचे वाटप होत आहे. ते तोंडात टाकून सेवेकरी आनंदाने काम करत आहेत.अगदी हसत खेळत हि कामे सुरु आहेत. रात्रीच्या वेळी शेकोटीत शेंगा भाजून गप्पा मारत खाण्यात सेवेकर्यांना मजा येतेय.. स्वतः पंच मंडळी पण त्यांच्यात सामील होत आहेत. सेवेकरी परत दुप्पट उत्साहाने मांडव घालण्याच्या कामाला लागत आहेत.  रोज सकाळची न्याहरी नाही पण लहान मुले, त्यांच्या आया, वृद्ध मंडळींसाठी पिठले भात टाकला जात आहे. सेवेकरी आणि इतर मंडळींसाठी द्रोणामध्ये उसळ दिली जात आहे. श्री गोविंदराव गाडगीळ, श्री गोविंदराव कडवेकर, बनूताई आपटे, वगैरे मंडळी हे काम हौसेने करीत आहेत.
विशेष म्हणजे, ही सगळी कामे ' जय जय श्रीराम, जय जय श्रीराम'  च्या गजरात होत आहेत. मग ती मोठाली भांडी चुलीवरून उतरवायची असोत की वर चढून झाडाच्या फांद्या टाकायची कामे... 'जय श्रीराम' म्हटले कि मंडळींना अजून जोर चढे. सगळीकडे नुसता नामाचा गजर होत आहे.  वातावरणात नुसता उल्हास भरून राहिला आहे.
पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी पाणी विहिरीतून काढावे लागे, त्यासाठी नुकतेच रहाटगाडगे बसवून घेतले आहे. श्री मनोहर दुसे पाण्याची व्यवस्था बघत आहेत.
निमंत्रण पत्रिका घरोघर गेल्या आहेत.
श्री मनोहरपंत आंबेगावकरांनी आधीच सगळे दिवे, कंदील रोजच्या रोज घासून पुसून स्वच्छ केले आहेत. रोजच्या रोज त्यातल्या तेल, वाती तपासायचे काम निगुतीने करत आहेत.
भजनी पहाऱ्यासाठी गावोगावची नावे आली तशी यादी बनवून त्याची व्यवस्था श्री येरळवाडीकर मास्तरांनी आधीच लावून ठेवली आहे.
श्री विश्वनाथ बुवा तर सतत गोशाळा साफसफाई , गायींच्या सेवेमध्ये मग्न असतात, भूक लागली तर तिथेच बसून बाजरीचे पीठ पाण्यात कालवून खातात.
यशवंतबुवा रोज पहाटे उठून खराटा घेऊन आवार साफ करत आहेत.आवारात घाण दिसली तर स्वतः स्वच्छ करत आहेत.
 
२० नोव्हेंबर मार्गशीर्ष शु. प्रतिपदा: मोठ्या उत्साहात मुहूर्तमेढ होते. सकाळी काकड्यानंतर मंडळी आईसाहेबांच्या समाधी चौथर्याजवळ जमतात. ती जागा आधीच केळीचे खांब लावून ,रांगोळ्या काढून सुशोभित केली आहे.समोर श्रींचा मोठा फोटो ठेवला आहे त्यास सुंदर फुलांचा  हार!  पंच सपत्नीक पूजेस बसतात. पुण्याह वाचन, गणेशपूजा होऊन साग्रसंगीत मंत्रोच्चारासहित आंब्याची पाने बांधून पूजा होते आणि मुहूर्तमेढ रोवली जाते, श्रींची आरती होऊन प्रसाद वाटप होते.  मंडळी गोशाळेत येतात. तिथे गायींची पूजा होते, गायींना गोग्रास दिला जातो. अश्या रीतीने अत्यंत पवित्र वातावरणात मुहूर्तमेढ पार पडते. यानंतर मात्र जोमाने मंडळी कामाला लागतात.

१५ दिवसांनी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेला कोठीपुजन आहे.
कोठीपुजनच्या २ दिवस आधीच जालनेकर मंडळी श्री पांडुरंगबुवा जालनेकर, श्री नानाचार्य, श्री बाबा मेरेकर, पु. प्रल्हादबुवा, ही मंडळी ४० लोकांना घेऊन रेल्वेने कोरेगाव रेल्वेस्टेशनवर येऊन पोहचलेले  आहेत. त्यांना सन्मानपूर्वक घेऊन येण्यासाठी व्यवस्थापक श्री हरीपंतांनी बैलगाड्या पाठवल्या आहेत.

पडेल ती कामे सेवेकरी करत आहेत. कोल्हापूरचे श्री हिर्लेकर कोठीच्या सारवलेल्या भिंतीवर रोज सुवाच्य अक्षरात श्लोक लिहीत आहेत.
प्रसादासाठी भोजन मंडप आईसाहेब मंदिराच्या समोर घातले गेले आहेत. भाजी निवडण्यापासून ते पाणी भरताना, वाढतांना, भांडी घासताना , आवाराची साफसफाई करतांना... खोल्यांची पुताई करतांना सर्व वेळ ' जय जय श्रीराम, जय जय श्रीराम " नामघोष ऐकू येतोय. इतका की रात्री झोपेस्तोवर तोच आवाज कानात घुमतोय. सर्व मंडळींच्या चेहऱ्यावर अखंड हास्य विलसते आहे..... तेही कष्टाची , मेहनतीची, अडचणींची अजिबात जाणीव न होता !हाताने सेवा व मुखाने नामगजर अश्या वातावरणात जागेपणी पडणाऱ्या एखाद्या स्वप्नासारखे दिवस जात आहेत.

.. आणि आता जालनेकर मंडळी गोंदवल्याच्या वेशीपर्यंत आल्याची वर्दी येते.
सुवासिनी लगेच औक्षणाची ताटे  तयार करतात.. आल्यावर त्यांच्या स्नानाची तयारी म्हणून चुलाणे पेटवली जाऊन त्यावर जाड बुडाची मोठाली तांब्याची तपेली ठेवली जातात.
बैलगाड्या प्रवेशद्वारावर आल्यावर लगबगीने पंच मंडळी त्यांच्या स्वागतासाठी तिकडे ४ सेवेकरी बरोबर घेऊन जातात. दोन्हीकडची मंडळी एकमेकांना बघताच आनंदाने एकच जयघोष करतात..! एकेक करून  पू. पांडुरंग बुवा, पू प्रल्हाद बुवा सपत्नीक आणि इतर बरोबरची मंडळी पायउतार होतात. पंच मंडळी आणि जालनेकर एकमेकांना साश्रू नयनांनी क्षेमकुशल विचारत आलिंगन देतात!  आणि का नाही? हे वर्षातले १० दिवसच तर असतात गावोगावी विखुरलेल्या भक्त मंडळींनी  एकत्र येण्याचे, सामुहिक जप, एकत्र कीर्तन, प्रवचन, महाराजांच्या आठवणींची देवाण घेवाण करण्याचे!
पंच मंडळींच्या स्त्रिया आणि इतर सुवासिनी सर्वांचे औक्षण करतात, आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू देतात. भेटीगाठी होऊन, सर्वांना त्यांच्या खोल्यांकडे नेले जाते.. सामान नेले जाते. स्नानासाठी गरम  पाणी तयार असतेच. सर्व सुस्नात होऊन मंदिराच्या आवारात जमतात. स्नानोत्तर भोजनाची आधीच व्यवस्था झालेली असते.
परंतु आता सर्वांना श्रींच्या भेटीची आस असते. करवत काठी पांढरे शुभ्र सोवळ्याचे धोतर नेसलेले अन्  वर उपरणे घेतलेले ३८ वर्षांचे पू पांडुरंग बुवा , आणि पिवळ्या जर्द रंगाची जरीकाठाची नऊवारी साडी, कपाळी  ठसठशीत कुंकू, नाकात नथ, गळ्यात ठुशी,  अन् सौभाग्याचां दागिना, हातात हिरव्या बांगड्या घातलेल्या सौ कृष्णाबाई समाधीचे दर्शन घेतात. त्यांच्या मागेच साधारण पिवळसर नेहरू शर्ट अन् पांढरे शुभ्र धोतर, डोक्याला गुलाबी फेटा घातलेले ३२ वर्षांचे पू प्रल्हाद बुवा आणि त्यांच्या मागे त्यांच्या  हिरवीगार बारीक जरीकाठाची साडी, कपाळी लाल जर्द कुंकू ल्यालेल्या सौ मैनाबाई उर्फ जीजीमाय श्रींच्या समाधीची पूजा आरती करतात. सर्वांना श्रींच्या आठवणीने गदगदून येते. मनोभावे नमस्कार करून डोळेभरून दर्शन घेतात. आपण श्रींच्या सहवासात घालवलेले क्षण आठवून, त्यांच्या हृद्य आठवणींनी सर्वांचे मन भरून आलेले असते..
समाधीमधून बघत असलेल्या श्रींच्या डोळ्यातही पाणी तरळते... एवढा आपला भक्तपरीवार, आपण जोडलेली माणसे बघून त्यांच्याही डोळ्याच्या कडा ओलावतात.
आता श्रीमहाराजांना नैवेद्य दाखवला जातोय.
समाधी मंदिरातून पाय निघत नसतांना देखील, पंचांच्या भोजनाच्या आग्रहामुळे जड पावलांनी जालनेकर मंडळी प्रसाद मंडपाकडे वळतात. स्वच्छ सारवलेल्या जागेवर, सतरंज्या टाकण्यात आल्या आहेत. प्रत्येक पत्रावळीभोवती रांगोळी , उदबत्या लावण्यात आल्या आहेत... पत्रावळी मधे भात, बाजरीची भाकरी, लापशी द्रोणात आमटी, असा प्रसाद वाढण्यात आला आहे. वातावरणात पदार्थांचा घमघमाट पसरला आहे.
" सदा सर्वदा योग तुझा घडावा... "या श्लोकाने भोजनपूर्वीच्या श्लोकांना सुरुवात होते, मग " श्रीअनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज.."चां गजर होतो.  आणि वदनी कवळ घेता... होऊन पानाभोवती पाणी फिरवून भोजनप्रसादाला सुरुवात होते. वाढपी सेवेकरी पटापट येत आहेत... आग्रहाने जेवण वाढत आहेत.
हसत खेळत सगळ काही चालले आहे. इतक्या दिवसांनी महाराजांची भक्तमंडळी भेटल्यामुळे जालनेकर मंडळींच्या चेहऱ्यावर प्रवासाच्या थकव्याचा लवलेश ही दिसत नाहीये. सर्व जण भोजनाच्या शेवटी ' उपासनेला दृढ चालवावे   ' हा श्लोक म्हणतात आणि उठतात. मंडपाच्या बाहेर आल्यावर त्यांच्या हातांवर सेवेकरी पाणी घालतात. नंतर मंडळी विश्रांतीसाठी आपापल्या खोल्यात जातात. काही जण उत्सवाच्या सेवेकर्यांमध्ये जाऊन मिसळतात.. तर काही जपाला बसतात.
म्हणता म्हणता... कोठीपुजनचां दिवस उद्यावर आलाय!

क्रमशः

~ महाराज कन्या

मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

 

जय श्रीराम !


मानस - एकादशी (भाग २)

राजस पुरुषोत्तम रेगे

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जमीनीवर आपटला नाही. पडता पडता अलगद तो पायांवर उभा होता. जाणीवा शुद्धीवर येऊ लागल्या तसे त्याला जाणीव होत गेली.. कि त्याची उंची आता कमी झाली आहे. शरीर उभ्यापेक्षा आडवे होते आहे. तोंडाचा आकार पुढे निमुळता होत आहे.आणि आता त्याला प्रथमच जाणीव झाली की त्याला चार पाय आहेत. अरे बापरे.. त्याचे रूपांतर श्वानात झाले होते. आता हळूहळू आजूबाजूच्या परिस्थितीचे तो अवलोकन करू लागला.
पक्क्या सिमेंटच्या इमारतींचे कच्च्या मातीच्या कौलारू घरांमध्ये रूपांतर झाले होते. आजूबाजूला असंख्य गायी उभ्या होत्या.. म्हणजे तो गोशाळेत होता तर!
खूप मोठा परिसर.. एका बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये चारा साठवलेला होता. दुसरीकडे काही स्त्रिया गवऱ्या थापत होत्या. पुरुष गोठ्यातील शेण फावड्याने ओढून एका ठिकाणी ढीग लावत होते.  
एक सुगंधाचा जोरदार झोत त्याच्या अंगावरून गेला. "गंगी परत दावे सोडून पळाली होती, होय रे नागप्पा? "  कानावर आवाज पडला. त्याबरोबर दचकून त्याने धपापत्या उराने आवाजाच्या दिशेने पाहिले.  एक मध्यमवयीन, गौरवर्ण कांती, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर, दंडावर आणि पोटावर भस्माचे पट्टे,खांद्यावर उपरणे, कंबरेला पांढरे शुभ्र धोतर, पाणीदार डोळ्यात करुणा, असे एक प्रसन्नचित्त व्यक्तिमत्व गायींच्या गराड्यात उभे होते... जणू कोणी सत्पुरुषच. त्यांच्याकडूनच तो सुगंधाचा झोत त्याच्या अंगावर येत होता. "श्रीराम श्रीराम" असे म्हणत ते गंगीच्या पाठीवरून हात फिरवत उभे होते. आणि इतर गायी जणू या महात्म्याने आपल्याही पाठीवरून हात फिरवावा म्हणून पुढे येण्यास झटत होत्या. हम्माँ हम्मा करून त्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.  
"माय, असे आपल्या लेकरांना टाकून , दावे तोडून पळू नये.., मी येणारच होतो ना ईथे. ' असं तो संतमहात्मा त्या गायीला प्रेमाने म्हणत होता. ती गाय ही जणू तिला त्यांचे बोलणे समजते आहे अशा रीतीने मान डोलवत होती. मधेच झुकून त्यांच्या पायावर नाक घासत होती. तिच्या गळ्यापाशी खाजवत ते सत्पुरुष तिचे लाड करत होते.
 सगळ्या गायीच्या पाठीवरून हात फिरवून ते सत्पुरुष निघाले तसा तो ही त्यांच्या मागोमाग निघाला. आता ते सत्पुरुष गावातून फिरत होते. समस्त गावकरी त्यांना 'महाराज, महाराज'  म्हणत मान तुकवत होते . कोणी पांथस्थ त्या धूळमातीच्या रस्त्यावरच लोटांगण घालत होता. तर कोणी चरणस्पर्श करत होते. आता ते सत्पुरुष गावाबाहेरील एका शेतात आले. तिथे काही तरुण मंडळी विहीर खोदत होती. पण पाणी लागले नव्हते. महाराज दिसताच सगळे त्यांच्याभोवती जमा झाले आणि म्हणाले, " म्हाराज आपण एकडाव श्रीराम जय राम जय जय राम म्हना, आमी कुदळ मारतो. पानी लागेल बगा ". हो नाही करता करता. महाराजांनी स्वतःच कुदळ हातात घेतली आणि 'श्रीराम जय राम जय जय राम ' म्हणत एक दणका  मारला ..  कि पाण्याचा फवारा आकाशात दूरपर्यंत उडाला. सगळी मंडळी आनंदली.
महाराजांनी त्यांच्यासाठी आणलेले आमटी, भाकर, चुरमुऱ्याचा चिवडा त्यांना स्वहस्ते खाऊ घातला. एक तुकडा या श्वान झालेल्या राजसच्याही वाट्याला आला.
आता तो महाराजांच्या मागे मागे जाऊ लागला.
नंतर महाराज राम मंदिरामागच्या ओढ्यावर गेले. तिथे दोन स्त्रियांचे भांडण सुरु होते. दोघी स्त्रिया चांगल्याच पेटल्या होत्या.. एकमकींना अद्वातद्वा बोलत होत्या.
तिथे पोचल्यावर महाराजांनीही त्याच भाषेत दोघींना बोलायला सुरुवात केली. त्याबरोबर तिथे उभे असलेले एक गृहस्थ ... भाऊसाहेब त्यांचे नाव असावे, काहीतरी उदाहरण दाखवले, त्याबरोबर एकदम शांत होत महाराज त्यांच्याकडे वळून गळ्याकडे तर्जनी करत म्हणाले, 'भाऊसाहेब हा राग गळ्याच्या वर आहे हो. "
याला काही एक कळत नव्हतं. संतापाने लालबुंद झालेला माणूस अचानक शांत कसा काय होऊ शकतो, हे त्याच्या कल्पनेपलीकडे होते.

नंतर महाराज राममंदिरात त्यांच्या निवासस्थानी परतले. हा हि त्यांच्यामागोमाग परतला. राममंदिराच्या पायरीवर डोके टेकवून तो बसून राहिला.
महाराज रोज त्याला भाकर तुकडा टाकत. ते खाऊन तो निवांत रहात असे.
राममंदिरात श्रीमहाराजांचा सत्संग चाले, कीर्तन होई. भेटायला येणाऱ्या लोकांसोबत चर्चा होई. हे सगळं कानावर पडत असे, पण त्याच्या बुद्धीला आकलन होत नसे.
हा , महाराज ! सारखे 'श्रीराम जय राम जय जय राम' असे लोकांकडून म्हणवून घेतात, सतत 'जानकी जीवन स्मरण जय जय राम ' म्हणतात हे त्याला नित्य कानी पडून समजायला लागले होते. अगदी आता ते कोचावरून उठतांना केव्हा जानकी जीवन स्मरण म्हणतात आणि कोणत्या क्षणी श्रीराम जय राम... म्हणतील हे हि त्याला अंदाजावरून कळायला लागले होते. दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या एकादशीला श्रीमहाराजांचा उपास असतो आणि रामाला भगर- आमटीचा प्रसाद असतो हे ही त्याला कळू लागले होते. महाराजांना आवडते म्हणून तो ही त्या दिवशी इतरत्र काही खात नसे. फक्त रामाचा प्रसाद ग्रहण करी. आणि अश्या वेळी महाराज जास्त आनंदित होतात आपल्या अंगावरून हात फिरवतात हे त्याने अनुभवले होते. त्यांच्या प्रेमास पात्र व्हावे म्हणून तो आता शक्य ते त्यांच्या आवडीचे करत होता.
हळूहळू सगळ्या गावकऱ्यात हे पसरू लागले. लोकही कौतुकाने सकाळी त्याला खायला घालायचे. पुढे पुढे असे होऊ लागले कि तो ज्या दिवशी जेवला नाही तेव्हा लोक एकादशी असावी असे समजू लागले होते. त्यांचा सहवास त्याला हवाहवासा वाटू लागला होता.
आणि स्वतः श्रीमहाराजांनीही याविषयी सर्व लोकात त्याचे कौतुक केले होते. अशी अनेक वर्ष निघून गेली.
आणि ते १९१३ साल उजाडले. श्रीमहाराज आता थकलेले दिसू लागले होते. दम्याचा जोर येई, तेव्हा शेजघरातून येणारा त्यांचा खोकल्याचा आवाज त्याच्या कानावर पडत असे. आणि तो काळाकुट्ट दिवस उजाडला.
२२ डिसेंबर, १९१३
गोंदवल्याचा सूर्योदय होत असताना श्रीमहाराज निजधामास निघाले होते. सगळीकडे सुन्न वातावरण होते. लोकांनी आकांत मांडला होता. गोंदवले गाव दुःखात बुडून गेले होते. गावोगावी निरोप गेले होते. अंगणात उभे राहून त्याला परिस्थितीचा अंदाज आला होता. काहीतरी अघटित घडले आणि आपला त्राता, आपले लाडके महाराज आपल्याला सोडून गेले हे त्याला समजले, अन त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरु झाल्या. आतून खूप मोठ्याने ओरडून रडावे असे त्याला वाटू लागले होते पण लोक हाकलून देतील कि काय या भीतीने त्याने महत्प्रयासाने आपले रडू आवरून धरले होते. .

थोड्याच वेळात, श्रीमहाराजांचा निष्प्राण देह शेजघरातून आणून रामासमोर ठेवण्यात आला. याला काय वाटले कुणास ठाऊक! आजवर कधीही राममंदिरात त्याने पाऊल टाकले नव्हते. पण आज राहवले गेले नाही.. आत शिरून त्याने महाराजांच्या देहाभोवती एक प्रदक्षिणा घातली. आणि विषण्ण मानाने तो बाहेर आला. आता आपल्याला वाली कोणी उरला नाही हे त्याने ओळखले आणि वाट फुटेल तिकडे चालत राहिला.

पुढे काही दिवसांनी कित्येक मैलाचा प्रवास करून तो पंढरपुरात पोहचला. रस्त्यात मिळेल ते खात होता. कोणी खाऊ घालत होते, कोणी हाकलून लावत होते.
इंद्रायणी काठी आल्यावर त्याला अगदी उचंबळून आले. तहानलेला, भुकेला तो, अगदी चालण्याइतके हि त्राण नव्हते.  पाणी पिण्यासाठी नदीवर खाली वाकला आणि अचानक धडपडून पाण्याच्या धारेला लागला. तिथेच एका खोल खोल डोहात गिरक्या घेता घेता त्याला जलसमाधी मिळणार तेवढ्यात हातापायांच्या धडपडीने गळ्यातील  कालपांथस्थ यंत्राची कुठलीशी कळ अचानक दाबली गेली.. आणि..

आज एका अनोळखी भक्ताने, नाव गुप्त ठेवण्याच्या बोलीवर २० तांदुळाची पोती पाठवली होती. त्याचा टेम्पो प्रल्हाद इमारतीच्या खाली उभा होता.
राजस नेमका आपटला तो त्या पोत्यांवर. थोडेफार खरच्टण्यापलीकडे त्याला काही दुखापत झाली नव्हती.
अन् विशेष म्हणजे तो तिथे पडून अवघी वीस मिनिटे झाली होती. पण काळाच्या पलीकडे गेला होता तेव्हा त्यात कित्येक वर्ष उलटून गेली होती. कालगतीच न्यारी आहे. एव्हाना तो तिथे पडला हे सुदैवाने कोणाच्याही लक्षात आले नव्हते. वर पत्नी व मुलगा झोपेत होते. त्यांना पत्ताही नव्हता.. एवढ्या वेळात काय घडून गेले ते!

भानावर आल्यावर तो सगळं आठवू लागला. अरेच्चा... पूर्वजन्मात घडलेल्या या कारणांनी आपल्याला  एकादशीला उपास घडतोय तर!!  तसेच अंग झटकून तो पटापट पायऱ्या चढून रूम मध्ये आला. समोर भिंतीवरच्या  महाराजांच्या फोटोकडे लक्ष गेलं. अन तो भयानक दचकला.. मागच्या जन्मात गेल्यावर बघितलेले सत्पुरुष हेच याची खात्री पटल्यावर आता मात्र त्याचा हुंदका फुटला. डोळे भरून वाहायला लागले. याच सत्पुरुषांच्या सहवासाने आणि कृपेने  त्याला या जन्मात मानव देह मिळाला होता हे त्याला कळून चुकले होते. रेवतीला ना उठवता.. आता तो समाधी मंदिराच्या दिशेने धावत सुटला.  
 आज कोणालाही तो आवरता येणार नव्हता.
समाधी मंदिरात जाऊन त्याने अंग झोकून दिले. रडत लोटांगण घालू लागला.. " महाराज महाराज " असा टाहो फोडत मंदिराच्या उंबऱ्यावर वारंवार नमस्कार घालू लागला. आजवर जो काय अभिमान, मुजोरी अंगी होता तो सगळा अश्रुधारातून वाहून चालला होता.  

समाधी मंदिरात श्रीमहाराज मंद मंद स्मित करत होते. त्यांचा उद्देश सफल झाला होता. बाजूच्या ब्रम्हानंद मंडपात कीर्तनकारांनी निरूपणासाठी घेतलेल्या अभंगाच्या ओळी ऐकू येत होत्या,
" जरी नाही मशी घडली काही सेवा । जरी नाठविले तव नावा|
जरी संतांची केली नाही पर्वा । आचरीला मार्ग न बरवा ।।
.. ...
पांडुरंग सद्गुरुमाये, कळवळुनी झडकरी यावे, लेकरा उसंगी घ्यावे ।...

***
अश्विन शु पौर्णिमा.. अर्थात कोजागिरी पौर्णिमा!
स्थळ: आइन्स्टाइन हॉल, इस्रो  

राजसने ब्लेझरच्या वरच्या खिशात ठेवलेल्या श्रीमहाराजांच्या फोटोचे डबडबल्या डोळ्यांनी दर्शन घेत, छातीला हात लावीत, त्या भव्य हॉलमध्ये स्टेजवर प्रवेश केला. अन...  .... Welcome to our brilliant scientist Mr Rajas Rege for successfully launching of Time Machine-  Ipoch Voyager! Heartiest Congratulations to Rajas Rege and Team ISRO   ". हि वाक्य समोरच्या पडद्यावर झळकली आणि पाठोपाठ माइकवरून इस्रो चेअरमन एस. सोमनाथ यांचा जोशपूर्ण आवाज आला. पुढची वाक्ये Soon Mr Rege  will be receiving the Most prestigious "Hall of fame " award,  " संपूर्ण हॉलमधल्या  टाळ्यांच्या कडकडाटात बुडून गेली.  

(उत्तरार्ध )

जय श्रीराम
श्रीमहाराज कन्या नयना

 


जय श्रीराम !


मानस - एकादशी (भाग १)

राजस पुरुषोत्तम रेगे

एक तडफदार, बुद्धिवान, कर्तृत्ववान, बहुआयामी व्यक्तिमत्व! उच्चशिक्षित, कलासक्त, आणि खेळातही पुढे. लहानपण जरी कष्टात गेले होते तरी आता बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता होती, हातात पैसा खेळत होता. स्वकर्तृत्वावर सगळं मिळवल्याने परिणामी अंगात गर्विष्ठपणा ,माजोरडेपणा, अभिमान पुरेपूर भरलेला. सगळी सुखे पायाशी लोळत असूनही एकच खंत त्याच्या आयुष्यात होती. तो स्वतः एवढा बुद्धिमान असूनही, मुलगा मात्र मंदबुद्धी जन्माला आला होता. त्याच्या भविष्याची चिंता होतीच. या कारणाने बोलण्यात अरेरावी, हेकेखोरपणा, कडवटपणा हि होताच. जरुरीपेक्षा जास्त झालेल्या पैशाला अनेक वाटा फुटतात, तसा प्रकार झाला होता. लेट नाईट पार्ट्या, कॅसिनो, मद्यपान, हे मित्रांच्या संगतीमुळे त्याच्या आयुष्यात डोकावू लागले होते.  यावरून पत्नीशी फोनवर सतत वाद हि होत होते.

बंगलोर इथे एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत तो उच्च पदावर होता. मूळ पिंड क्वांटम फिजिक्सचा असल्याने तिकडे त्याचा ओढा जास्त. त्यातच भारतातील नावाजलेल्या इस्रो हेड्क्वाटर्सला एका सिक्रेट प्रोजेक्ट्साठी बोलावणे आल्याने चार महिन्यापूर्वीच तिथे जॉईन झाला होता. हा सिक्रेट प्रोजेक्ट म्हणजे भारतातले पहिले टाइम मशीन बनवणे. २०१७ मध्ये कॅनडा येथील, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ  Ben Tippet  यांनी मॅथ्स आणि फिजिक्स वापरून एक फॉर्मुला तयार केला होता आणि तेव्हापासून इस्रोचे शास्त्रज्ञ त्यावर काम करत होते. आता ते काम अंतिम टप्प्यात आले असले तरी काही महत्वाच्या कामासाठी त्यांना या क्षेत्रातल्या हुशार व्यक्तींची गरज लागणार होती.
राजसचे आवडते क्षेत्र असल्याने त्याने सगळं मागचे विसरून जीवतोड, दिवसरात्र मेहनत घेऊन ,  मूळ मशिनरी जरी अवाढव्य असली तरी ओंजळीत मावेल असे टाइम मशीन टूल कधीच बनवले होते. ज्याला हाता घेऊन मनुष्य भूतकाळात फिरून येऊ शकत असे. त्याच्या काही ट्रायल ही घेऊन झाल्या. उदा. १० वर्ष मागे भूतकाळात जाणे , २० वर्ष मग ४० वर्ष , मग ६० आणि आता सगळ्यात मोठं सक्सेस म्हणजे १२० वर्ष मागे भूतकाळात जाऊन येणे. हि शेवटची ट्रायल राहिली होती. आणि त्यावर त्याचे काम सुरु होते. ते मशीन तो सतत सोबत ठेवत असे. स्वतःपुरते त्याने त्या मशीनचे नाव Ipoch Voyager उर्फ ' ' काळपांथस्थ '  उर्फ त्रिकालजयी असेही ठेवले होते.
रेवती राजस रेगे.. त्याची पत्नी, मानसिकरित्या विकलांग रितिकला घेऊन साताऱ्यात आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. ती सातार्यात बँकेत ऑफिसर.
राजस रेगे मूळचा पंढरपूरचा. गरिबीत शिक्षण झाले. आई  गृहिणी, वडील प्राथमिक शिक्षक. पगार कमी. घरच्या दोन गाई. आई वडील दोघेही एकादशी व्रत करायचे. त्यामुळे अर्थातच लहानग्या राजसला दर एकादशीला नकळत उपास घडे. आई वरई भात, शेंगदाण्याची आमटी दुपारी करत असे. आणि रात्री सगळे दूध पिऊन झोपत असत. त्यामुळे राजस नाराज असे. जसजसा मोठा होत गेला तसतशी नाराजीची जागा चिडण्याने घेतली.
आता गोम अशी होती. काहीही असो. यथावकाश, शिक्षण ... लग्न झाले, तरीही त्याला या दर १५ दिवसांनी येणाऱ्या एकादशीला कळत नकळत उपास घडत असे. बंगलोर मध्ये होता तेव्हाही. कामाला वाहून घेतल्याने.. दुपारी जेवणाचे लक्षात राहत नसे. तेव्हाही उपास घडे. आणि संध्याकाळी रूमवर आल्यावर मानसिक थकव्याने कुठे बाहेर जाणे टाळत असे.. मग रात्री दूध, केळे , इतर फळे खाऊन झोपण्याचा प्रयत्न करी.  खूप प्रयत्न करूनही त्याला हे टाळता येत नव्हते अन त्यामुळे होणारी चिडचिड ही काही नवी नव्हती त्याला.

असो, तर रेवतीने तिची गाडी नेमकी गोंदवल्यात कशी बंद पडली आणि त्यानंतर काय काय घडले, मग तिने समाधी मंदिरात जाऊन अनुग्रह कसा घेतला. हे त्याला फोनवर रंगवून रंगवून सांगितले होतेच.
अर्थात त्याचा या गोष्टींवर विश्वास नव्हताच. आता सगळे स्वकर्तृत्वावर मिळवायचे .. परमार्थ ही वय झाल्यावर करण्याची गोष्ट आहे, यावर त्याचा दृढ विश्वास होता.  झाले असे कि अचानक चार दिवस सुट्टी मिळून तो आता बायको मुलाला भेटायला साताऱ्याला आला होता.... ते चार दिवस त्यांच्यासोबत कुठेतरी बाहेर रिझॉर्ट ला राहून एंजॉय करायचे हे मनसुबे घेऊनच! पण आल्या आल्या तिच्या हातात जपमाळ बघून त्याला ते खटकले होतेच.

इकडे रेवतीने वेगळाच प्लॅन केला होता. चार  दिवस नवर्याला घेऊन गोंदवले, शिखर शिंगणापूर दर्शन करवून घ्यावे असे तिच्या मनात होते. तिने हे त्याच्या कानावर घातल्यावर प्रथम तर त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. दोघांचे भरपूर वाद- प्रतिवाद झाल्यावर दोन दिवस गोंदवले आणि दोन दिवस नंतर पुण्याजवळील एक रिझॉर्ट या बोलीवर मांडवली झाली. रेवती आनंदली. रेवतीने वर्णन केल्यावरून छानशी सर्व सुखसोयींनी युक्त रूम घेऊन तो आराम करणार, समाधी मंदिरात दर्शनाला येणार नाही, तिथले कोणतेच कार्यक्रम अटेंड करणार नाही. चहा/ नाश्ता /भोजन प्रसादासाठीच फक्त बाहेर निघेल हे त्याने रेवतीकडून कबुल करवून घेतले होते.  त्याने गोंदवले जाण्यासाठी निवडलेला दिवस नेमका एकादशीचा होता. अन गम्मत म्हणजे हे त्याच्या गावीही नव्हते.
*
दुसर्याच दिवशी सकाळी ११च्या सुमारास त्याची गोल्डन कलरची Tata Harrier गोंदवले समाधी मंदिराच्या आवारात शिरत होती. सकाळी आठ वाजताच रेवतीने दोघांनाही भरपेट साबुदाणा खिचडी , दही खाऊ घातले होते. त्यामुळे नाश्त्याचा प्रश्न नव्हताच. रेवती साबुदाणा खिचडी अप्रतिम करत असे.  
गाडी व्यवस्थित पार्क करून , स्वागत कक्षातून रूमची चावी घेऊन तिघे निघाले. प्रल्हाद बिल्डिंग, चौथा मजला, ४२७ नंबरची रूम! जुनी बिल्डिंग बघताच, त्याच्या कपाळात आठी निर्माण झाली. स्वागत कक्षातच त्याला पहिला धडा मिळाला होता. तुम्ही कितीही श्रीमंत असा.. श्रीमहाराजांची सत्ता गोंदवल्यात चालते.
जिन्याने सामान वर नेता नेता त्याची फारच दमछाक झाली. आपले ओझे आपणच उचलायचे असते हा दुसरा धडा.

जुनी इमारत, रूम ही जुन्या. .. उद्या पहाटे गरम पाण्याची बादली बाहेरून भरून न्यावी लागणार हे त्याने ओळखले. गेल्या गेल्या रेवतीने पदर खोचून आधी रूम स्वच्छ झाडून घेतली.  तेवढ्यात दुपारच्या नैवेद्यआरतीची वेळ झाली. रेवती, रितिकला कसेबसे सावरत घेऊन दर्शनाला गेली अन आरती करूनच परत आली.
आज भाद्रपद शु. एकादशी, अर्थात परिवर्तिनी एकादशी ! महाराजांना उपवास. त्यामुळे आज प्रसादाला उपासाचेच पदार्थ मिळणार होते. तिघेही आता महाराजांच्या अन्नपूर्णेत गेले. मऊसूत वरईचा भात, सोबत दाण्याची आमटी, बटाटयाची उपासाची भाजी, सोबत लिंबाचे उपासाचे लोणचे आणि ताक असा भरगच्चं प्रसाद घेऊन तिघे परत रूमवर आले.

एव्हाना दुपारचे दोन वाजून गेले होते. रेवतीची इच्छा होती कि ब्रम्हानंद मंडपात थोडा जप करावा. पण रितिकने नवऱ्याला काही त्रास देऊ नये हा विचार करून तिघेही रूमवर परत आले. तिघेही आता आराम करत होते.
तेवढ्यात राजसच्या मोबाईलची रिंग विशिष्ट पद्धतीने वाजली. आणि आता रीतसर सुट्टी घेऊन आला तरीही आराम करू देत नाही, हे आठवून चिडून, पण मनातल्या शिव्या ओठावर येऊ न देता ,धडपडत उठला.
आधी टेबलवर ठेवलेल ते epoch voyager हे व्यवस्थित आहे ना हे त्याने चेक केला नंतर फोन. इस्रो चीफचा फोटो मोबाईल स्क्रीन वर झळकला आणि त्याची झोप कुठल्या कुठे पळाली. एका हातात टाइम मशीन घेऊन एका हाताने मोबाईल कानाला लावत तो झर्रकन दरवाजा उघडून बाहेर आला. काहीतरी तसेच महत्वाचे होते म्हणूनच चीफने त्याला फोन केला होता. यूएस मधील युनीव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट येथील आंतराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ रोनाल्ड मॅलेट आणि टीम येत्या महिनाभरात इस्रोला भेट देणार होती. यांचा time travel , quantum cosmology आणि सापेक्षता सिद्धांत यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. ही भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती, कि भारतातील बोटावर मोजण्यासारख्या लोकांनाच याबद्दल माहिती असणार होती. या लोकांच्या भेटीची तयारीच्या दृष्टीने केला गेलेला हा फोन होता.
कॉरिडॉर मध्ये फिरतांना बोलता बोलता राजसने हातातील मशीन कट्ट्यावर ठेवले होते. आणि ते अघटित घडले...  काहीतरी बोलताना हातवारे करण्याचे निमित्त झाले. आणि त्याचा हात त्या 'त्रिकालजयीला लागला... त्याबरोबर ते खाली पडू लागले.. एका हातात मोबाईल आणि एका हाताने त्रिकालजयी सावरता सावरता..  
त्याचा तोल गेला..  बाल्कनीतून खाली पडता पडता घाबरून त्याने डोळे घट्ट मिटून घेतले होते. .. आणि त्यात हातातल्या मशीनची ... 'त्रिकालजयी'ची कुठली तरी कळ दाबली गेली.
(पूर्वार्ध)


जय श्रीराम
श्रीमहाराज कन्या नयना

रविवार, १ सप्टेंबर, २०२४

 


जय श्रीराम!

मानस - योगायोग कि पूर्वनियोजित

वेगात असलेल्या तिच्या I-10 कारने एक झोकदार वळण घेतले आणि त्या गावात शिरली. आणि अचानक समोर आलेल्या कुत्र्याला वाचवताना तिची गडबड उडाली. ब्रेकवरचा पाय टिकत नाहीये अशी तिला जाणीव झाली. आणि स्पीड मध्ये असलेल्या कारला अचानक ब्रेक लावला तर जे व्ह्ययचे तेच झाले. एका पूजा साहित्याच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या  लोखंडी ड्रमला धडकून  ती कार मोठ्या मुश्किलीने कर्रर्रर्र कच आवाज करीत गर्र्र्कन फिरून पुन्हा उलट दिशेकडे तोंड करून उभी राहिली. पुन्हा दोन -तीनदा तिने गाडीला स्टार्ट मारण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. हे असं मोजून चवथ्यांदा  झाले होते बरे का.. मागच्या १-२ दोन महिन्यापासून.
ऍक्सल तुटला वाटतं असे मनाशी पुटपुटत , कपाळावरचा घाम पुसत ती खाली उतरली. फोनाफोनी करून मेकॅनिकला  बोलवेपर्यन्त अर्धा तास निघून गेला. मॅकेनिक बाजूच्या गावी गेला होता. त्याला यायला रात्र होणार होती. म्हणजे आजची रात्र तिला कुठेतरी काढणे भाग होते.  एव्हाना संध्याकाळचे चार वाजून गेले होते.  कडकडीत उन्हाळा असला तरी वळवाचे ढग दाटून आले होते. साताऱ्याच्या माण तालुक्यातील ते एक छोटेसे गाव.
ती एक उच्चशिक्षित बी कॉम , एम बी ए फायनान्स असलेली तरुणी, बँकेत नोकरीला. वय ३८च्या आसपास. राहायला सातारा शहरात. तिचे कुटुंब छोटेखानी. नवरा हि उच्चशिक्षित आय टी इंजिनियर.. सध्या बंगलोरमध्ये पोस्टिंग असल्याने ती सातार्यात तिच्या मुलासह रहात होती. २४व्या वर्षी शिक्षण आटोपून लग्न झाले. वर्षभरात मुलगा हि झाला. सगळ छान चालले होते. सुखवस्तू, मुबलक पैसा, सासू सासरे मनमिळावू, नवरा प्रेमळ, गोंडस बाळ.. प्रपंचातला गोडवा दोघांनीपण टिकून ठेवला होता. पण काही वर्षातच कळून चुकले कि तिचा मुलगा मानसिक दुर्धर आजाराने ग्रस्त आहे, ज्यावर अजून उपायच नाही निघाला. यात व्यक्ती आयुष्यभर अंथरुणाला खिळून असते. नुसता श्वास चालला आहे म्हणून जिवंत म्हणायचं. मेंदूचा सगळ्या अवयवांवरचां कंट्रोलच गेलेला. त्यामुळे मुलगा आज १३ वर्षाचा झाला तरी त्याचे सगळेच तिला आवरावे लागे. मदतनीस बाई कोणी टिकत नव्हत्या.
साताऱ्यातच नोकरी आणि मुलाकडे लक्ष द्यायला आईवडील त्याच भागात राहत असल्याने तिला तेवढा आधार होता.
आठवड्यातून एकदा तिला बँकेच्या कामासाठी म्हसवड गावी जावे लागे. आणि दर वेळी तिला त्या विशिष्ट गावात शिरताना शनिवार रविवार , पौर्णिमा असली की गर्दी लागत असे. त्यामुळे त्या गावाच्या सुरवातीलाच गर्दी पाहून तिच्या कपाळावरच्या आठ्या वाढू लागत. रोडवरच्या गर्दीतून गाडी काढणे मुश्किल होई. कुठल्या तरी संतांचे हे गाव आहे एवढंच तिला माहित होते. तशी ती अगदीच नास्तिक नसली तरी धार्मिक कर्मकांडांचा तिला प्रचंड तिटकारा होता. हा, एक दोनदा म्हसवडहून पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊन आली होती! पण ते भोज्याला शिवण्यासारख.

आज मात्र रोडवर शुकशुकाट दिसत होता. तिने त्या टीचभर गावात आजची रात्र काढण्यासाठी हॉटेल आहे का अशी विचारणा सुरु केली. अन माहिती मिळाली कि हॉटेल कुठेही उपलब्ध नाही. त्या मंदिरामध्ये वास्तव्य होऊ शकते. थोड्याश्या नाराजीनेच तिने प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश केला. समोरच स्वागतकक्ष होता. तिथे माहिती मिळाली की मुक्कामाची सोय होऊ शकते, त्याचबरोबर प्रसादाची ही सोय आहे.  आता तिला जरा दिलासा मिळाला. पावणे आठला आरती सुरु होणार होती आणि नंतर प्रसाद मिळेल असे समजताच.. तिने आता परिसरात फेरफटका मारण्याचे ठरवले.
रामानंद भक्तनिवास...दुसरा मजला, २१७ नंबरची रूम.. एक सेपरेट रूम मिळाल्यावर ती खुश झाली. रूम ताब्यात घेतल्या घेतल्या.. सामान नीट लावल्याची खात्री करून तिने मस्त वॉश घेतला. उन्हाची वाढलेली तलखी, दिवसभर आंबलेले शरीर, आणि आता भरून आलेले आभाळ...स्नान करताच तिलाही जरा तरतरी आली. रूमला लॉक करून, भराभर जिना उतरून खाली आली.
बाजूला गोशाळा, समोर फुलझाडांची ताटवा, त्याला वळसा घालून  जाताना मागच्या सांडव्यावरचा छोटासा पूल ओलांडून ती कधी साधना मंदिराजवळ पोहचली कळलेही नाही. ग्रंथालय उघडे असल्यास काही पुस्तके चाळावी हा विचार करून तिची पावले तिकडे वळाली खरी. पण पाहते तो ग्रंथालय बंद.
एव्हाना आकाशात काळ्या ढगांची गर्दी सुरु झाली होती. चार दोन मोठाले पावसाचे थेंब ही सुरु झाले होते. वारा सुटला होता. गारेगार वातावरण झाले होते.
घाईघाईने ती साधना मंदिरात घुसली खरी.. पण तिने पाऊल आत टाकायची आणि लाईट जायची एकच वेळ झाली. अंधारात खुर्चीवर बसलेले लोक अंधुकसे दिसत होते. कशीबशी चाचपडत डाव्या बाजूच्या खुर्च्यांमधून जातांना तरी एका मावशींना धक्का लागलाच. त्यांना सॉरी.. सॉरी असे पुटपुटत  साधना मंदिरात रिकाम्या दिसणाऱ्या एका खुर्चीवर तिने अक्षरश: अंग झोकून दिले. आजूबाजूला अंधारात मोजके काही स्त्रीपुरुष  खुर्चीवर तर काही खाली सतरंजीवर बसलेले तिला दिसत होते.
समोर अंधारात एक मोठा फोटो. त्याच्या दोन्ही बाजूला तिला छोट्या खोल्या.. त्यात तुळशी वृंदावनसारख्या आकाराचे काहीतरी तिला दिसले. त्या दोन्ही छोट्या खोल्यांमध्ये अंधुकश्या तेलाच्या समया लावलेल्या. तेवढाच काय तो मिणमिणता प्रकाश.
सर्वत्र निर्लेप, नितळ शांतता होती. नाही म्हणायला बाहेर पावसाच्या सरींचा बारीक एकसलग आवाज येत होता. झाडांवरील पक्षीही चिडीचूप होऊन घरट्यात बसले होते.
 एव्हाना बाहेर पावसाचा आणि तिच्या मनात भावनांचा धुमाकूळ सुरु झाला होता. नाही म्हटले तरी, नवरा दूर असल्याने एकटीने संसाराचा गाडा ओढायची तिला दगदग होत होतीच. त्यात मुलगा हा असा म्हंटल्यावर होणारी खंत. आणि हे सगळं मलाच का? मी काय कुणाचे वाकडे केले नाही. वै वै. प्रश्न मनात धुमाकूळ घालायचे. कधीकधी असह्य झाले कि बाथरुममधे ती रडून घ्यायची.
आताही असेच झाले.  या जीवघेण्या शांततेत मनात विचार उसळ्या मारत होते. बाहेर पावसाच्या संथपणे सरी कोसळत होत्या. आणि तिच्या डोळ्यातूनही. .. का माझ्याच वाटेला हा वनवास?  का मी एकटीनेच सगळ्या जगाशी लढायचे... ते ही हाताशी पुरेशी सामग्री नसतांना. मुलगा विकलांग.. नवरा इथे नाही. वर्षानुवर्षे हेच चालत राहणार का? लोकांची आयुष्य किती छान आनंदी असतात.. आटोपशीर संसार असतो. शनिवार रविवार फिरायला जातात, सिनेमाला जातात. एन्जॉय करतात. या मुलामुळे मी अडकून पडले. असे असंख्य विचार मनात घोटाळू लागले.असह्य होऊन दोन्ही हातांनी डोकं गच्चं दाबून ठेवत ती मनातल्या मनात ओरडली," का? माझ्याच वाट्याला हे सगळं का?"
आणि त्याच क्षणी समोरच्या अंधारात उजव्या कोपर्यात प्रचंड आगीचा लोळ कोसळावा असा आवाज निर्माण झाला. अन त्यात दशसहस्त्र सूर्य फिके पडतील एवढा प्रकाश दिसू लागला. . . "नाही बाळ.... " असा एक धीरगंभीर , खर्जातला आवाज तिला ऐकू आला. तिने डोळे किलकिले करून पाहिले तर डोळे दिपून जातील असे तेज:पुंज व्यक्तिमत्व त्यातून हळूहळू बाहेर येत होता. . डोळ्यांना तो प्रकाश सहन होईना.. म्हणून तिने उजव्या हाताचा पंजा डोळ्यांवर धरला होता. आणि एका हाताने डोळे चोळत ती बघत होती.
आता तिचे डोळे त्या प्रकाशाला सरावले. साधारण मध्यम उंचीची, पीतवर्ण, केशरी कफनी घातलेली, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर त्रिपुंड, डोळ्यांच्या दोन्ही बाजूंना मुद्रिका, तरतरीत नाक, तंतोतंत कारुण्य भाव भरलेले, समोरच्याच्या मनाचा ठाव घेतील असे डोळे, उजव्या काखेत कुबडी आणि हातात जपाची माळ घेतलेले एक तेजस्वी व्यक्तित्व तिला दिसले.

" बाळ.... " परत त्या कोपऱ्यातून आवाज आला. पुन्हा आवाजात तोच गोडवा.
"इथे पृथ्वीवर प्रत्येक जण आपल्या कर्माची फळे मग ती चांगली कि वाईट असोत, ती भोगण्यासाठीच येतो. त्यातून सुटका नाहीच."
" म्हणजे? " तिने हतबल होऊन विचारले.
आपल्या पूर्वकर्मानुसारच तुम्हाला जन्म मिळत असतो. पूर्वजन्मामध्ये केलेली कुठली तरी पाप- पुण्याची कर्मे या जन्मात फळाला येतात त्याला तुम्ही प्रारब्ध म्हणतात. संचित म्हणजे याच कर्मांचे गाठोडे. क्रियमाण कर्म म्हणजे आता या जन्मात तुम्ही जे बरे वाईट कर्मे करत आहात ते. हि सगळी संचितात जमा होत रहातात. आणि हि तुम्हाला भोगुनच संपवावी लागतात.. त्याला इलाज नाही. तुमचा कंट्रोल फक्त या जन्मातल्या कर्मांवर आहे. नवीन कर्म तयार होऊ न देणे हे फक्त तुमच्या हातात आहे.
"तुम्ही लोक माझ्यासमोर आले की तुमचे मागचे पुढचे सगळे जन्म दिसत असतात. उदा. हा तुझा मुलगा, मागच्या जन्मात एक गरीब श्वान होता. गल्लीत सगळे त्याला दगडे मारायचे . पण त्यातल्या त्यात तू त्याला जास्त सतावायचीस . कधी त्याच्या शेपटीला फटाके लावून उडवायचे, तर कधी दगडे मारून... त्याला गल्लीभर पळवून. इतके झाले कि अंगभर जखमा होऊन त्यात गोचीड, अळ्या पडल्यामुळे त्यामुळे तो पिसाळला. अन त्यातच त्याचा अंत झाला. अन आता तोच मुलगा होऊन तुझ्या पोटी आला.
ती आपादमस्तक हादरली. हमसून हमसून रडत तिच्या तोंडून एवढेच शब्द फुटले, " महाSSSराज! "  इतकी क्रूर होते मी महाराज?
ती व्यक्ती म्हणाली, " होय. परपीडेसारखे महाभयंकर पाप नाही."  

"या सर्वातून सुटका कशी महाराज?"  तिने अभावितपणे विचारले.
" सुटका नाहीच! " फक्त एक करू शकतो.. तुमचे जर सद्गुरू असतील तर ते तुमचा हा प्रपंचाचा दाह कमी करू शकतात.
'ते कसे काय?" तिने सावरून विचारले. तुमचा गुरु तुमच्या अनेक जन्मांपासून सोबत असतो. तुम्हाला तो दिसत नसला तरी पृथ्वीवर पहिली जीवयोनी निर्माण झाली तेव्हापासून तो तुमच्या सोबत असतो. हे जे. परमात्मस्वरूप झालेले... पोहचलेले जीव असतात त्यांना साक्षात परब्रम्हानेच हे कार्य वाटून दिलेले असते. प्रत्येक जीवाला मोक्षप्राप्तीपर्यंत न्यायचे त्यांचे ध्येय असते. मोठे कार्य आहे ते. त्या जीवाला जाणीव करून देऊन, त्याची साधना करणे, प्रसंगी त्याची प्रपंचातील कर्मे करून, त्याचे आजार स्वतःवर घेऊन त्यांना हे करावे लागते. खरे तर काहीच गरज नाही त्यांना हे विकतचे दुखणे हाती घेण्याची! पण प्रत्येक जीवाला पोचवण्याची त्यांची तळमळ, कारुण्य इतके असते कि हे सगळे अभावितपणे त्यांच्या हातून होत असते. प्रत्येकाचा गुरु ठरलेला असतो. तो वेळ आली कि प्रकट होतोच.
आणि तुला म्हणून सांगतो.. सद्गुरू तुमचे एकेक आधार सोडवत असतात.. तुम्हाला पैश्याचा आधार वाटतो, नवऱ्याचा वाटतो, मुलांचा वाटतो,.. ते सगळे तुमच्यापासून हळूहळू दूर केले जातात. अन् जेव्हा तुम्ही निराधार होता, जेव्हा तुम्हाला प्रपंचाचा उबग येतो...हे सगळ व्यर्थ वाटू लागते तेव्हा सद्गुरू तुमच्या आयुष्यात प्रकट होतात.
 
" जर गुरु जन्मोजन्मी सोबत असतो तर आमच्या कठीण काळात किंवा विकार अनावर होतात तेव्हा का नाही येत समोर, महाराज? आम्हाला का नाही पापकर्म करण्यापासून आवरत ते? " तिने डोळ्यात पाणी आणून विचारले.
गुरु दूर उभे राहून तुमची वाट पाहत असतात बाळ. ज्याची त्यालाच हि जाणीव व्हायला हवी असते. तुम्ही प्रपंचात इतके गुंतलेले असतात की आमची हाक तुम्हाला ऐकू येत नसते. तुमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा साक्षिदार गुरु असतो.. नव्हे नव्हे... तोच तुम्हाला शिकवण्यासाठी या घटना घडवून आणत असतो. पण तुमचा 'मी करते/करतो, माझ्यामुळे झाले हे'  हा सूक्ष्म अहंभाव इतका वाढलेला असतो कि आपसुक त्या कर्माची फळे तुमच्या संचितात जमा होत राहतात. अन् त्यानुसार तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेत राहता.
ती कर्मे जर रोजच्या रोज तुम्ही श्रीकृष्णार्पणमस्तु करून टाकली तर ती तुम्हाला बाधत नाहीत.

याही उपर, गुरु तुमचे भोग सुसह्य करू शकतात.. किंबहुना ते तुम्हाला त्या भोगांची जाणीव होऊ न देता.. अलगद सुखरूप त्यातून बाहेर काढतात. या कारणासाठीच सदैव तुमच्या सोबत असतात. तुमची शरणागती हवी मात्र. तुम्ही आमच्यावर सोपवायला हवे. परनिंदा, परपीडा टाळायला हवी. विकारांनी आपल्यावर स्वामित्व गाजवायला नको हे पाहावे.

"असं असेल तर आमच्या हातात काहीच नाही का महाराज?आम्ही असे हातावर हात धरून बसायचे? " ती कळवळून विचारते.
" नाहीच काही! तुमचा श्वाससुद्धा तुमचा नाहीये . अग हे झाडाचे पान देखील हलते ते आमच्या इच्छेने. तुमच्या हातात फक्त प्रयत्न आहेत. पण त्याचे फळ काय हे ठरवण्याचा अधिकार नियतीचा आहे.
 तुझ्याकडे रग्गड पैसा आहे.. तू परदेशात जाऊन मुलावर उपचार करू शकतेस. औषधे जरी मानवनिर्मित असली तरी त्या औषधात औषधी तत्व घालतो परमेश्वर. म्हणूनच डॉक्टर लोक म्हणतात, " आय ट्रीट, ही क्युअर्स."
" पण महाराज, आम्हा दोघांचा मुलगा आहे ना, मीच का भोगते आहे हे? माझा नवरा  तिकडे आरामात आहे! अन् मी एकटीच इकडे मुलाची उठबस करतेय" ती उसासून म्हणाली!

"नाही, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे , भोग वेगळे. त्याचे तिकडे दुसरे भोग आहेत. तुम्ही या आयुष्यात नवरा-बायको एकत्र असले तरी काही दुःख एकेकट्याने भोगायची असतात.. जसे काही शारीरिक, मानसिक दुःख! ती तुमची तुम्हालाच भोगावी लागतात. ही फक्त तुझ्या कर्माची फळे आहेत म्हणून तुझ्या नवऱ्याला तिकडे दूर पाठवण्यात आले."
तुला उदाहरण देतो बघ.
आता असं बघ, कि तुम्ही या जीवनाच्या आगगाडीत बसलेले आहात. त्या डब्यात तुमच्या सोबत येणारे लोक हे तुमच्या कर्माने आलेले असतात. त्यात तुझे आई वडील, नवरा, सासरचे नातेवाईक, मुले बाळे , अगदी मधल्या स्टेशनवर अधे मध्ये चढणारे विक्रेते, हे भिकारी, शेजारी बसलेले अनोळखी लोक.. हे सगळं पूर्वनियोजित असते. ज्याचे स्टेशन आले तो उतरला. सद्गुरू हे तुमचे रेल्वेचे ड्राइवर. मागे गार्ड म्हणजे तुमचे हे साधन. आणि अजून एक मुख्य स्टेशनवर तुमच्या गाडीची पटरी बदलणारी व्यक्ती बसलेली असते .. ती म्हणजे, नियती.
ती तुमच्या कर्मफळाप्रमाणे वेगवेगळ्या ट्रॅकवर तुमची गाडी टाकत असते. त्यात कधी तुमचे प्लॅन कधी सक्सेस होतात.. कधी फसतात.. आणि ती नियती तिकडे खदाखदा हसत असते. तीच माया.. तीच तुम्हाला खेळवत असते.
तुम्ही फक्त एकच करायचं. गाडी धरून ठेवायची. सद्गुरूंनी दिलेले साधन घट्ट धरून ठेवायचे. म्हणजे सतत नाम घ्यायचे. त्यांचा हात सोडायचा नाही. त्यांनी धरलेलाच असतो. आपण सोडून इकडे तिकडे पळतो, स्टेशनवरच्या क्षुद्र वस्तूंकडे आकर्षित होतो. ही अखंड सावधानता हवी मात्र!  डोळ्यात तेल घालून आपले कुठे चुकते का ते चेक करत राहायचे. मग चांगला जीव असेल तर सद्गुरू नियतीवर सुद्धा कंट्रोल करू शकतात. तसा त्यांना प्रारब्धामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसतो. पण त्याही पलीकडे जाऊन ते हा धोका पत्करतात.

"काय विलक्षण योगायोग आहे, आजच आपली गाडी इथे बंद पडावी आणि हे सगळ अनुभवायला मिळावे.. असे शब्द तिच्या मनात येऊन गेले!"
त्यावर स्मितहास्य करत समोरचा तेजस्वी पुरुष उत्तरला," या जगात योगायोग नसतोच बाळ, सगळ पूर्वनियोजित असतं!
तुला इथे आणणे हेही आधीच ठरलेलं आहे.
ती चमकली.. आता तिला उमगु लागले.. आज चवठ्यांदा तिची गाडी या गावात... या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर बंद पडली होती. हा योगायोग नाही, आपल्याला इथे आणण्यासाठी हे घडवून आणले गेले होते तर..!  
" महाराज, महाराज..मी शरण आहे! मला आपले म्हणून स्वीकारावे महाराज! .. अस म्हणत तीने त्या व्यक्तीच्या पायावर अश्रूंचा अभिषेक केला.
"आशीर्वाद" असे पुटपुटत त्या व्यक्तीने तिच्या डोक्यावर अलगद हात ठेवला. अन् ती अंतर्बाह्य शहारली. एक शिरशिरी तिच्या मस्तकापासून पायापर्यंत येऊन गेली.. अंग थरारले. भारावून जाऊन ती तिकडे पाहून वारंवार नमस्कार करू लागली! कानावर आवाज आला," भोजनप्रसाद तयार आहे बाळ, तो घेऊन जावे! "  
भानावर येऊन डोळे उघडुन पाहते तो कोपऱ्यातला प्रकाश हळूहळू लुप्त होत होता.

आता तो तेजस्वी सत्पुरुष कोण होता हे सुज्ञास सांगणे न लगे!
अहो आपली सर्वांची माऊली .. आपले महाराजच!
बरं महाराज यावेळी काय करत होते, माहितेय?
ते समाधानाने हसत आपल्या हातातल्या लिस्टवर टिक करत होते.
रेवती राजस रेगे ✔️
आज अजून एक शिष्य त्यांच्या लिस्टमध्ये add झाला होता. अजून एकाला ते पार लावणार होते.

तुम्हाला काय वाटतं, पुढचा नंबर कोण बरं?
राजस पुरुषोत्तम रेगे! (रेवतीचा नवरा)
(कारण महाराज एखाद्याला नामाला लावतात तर त्याचे संपूर्ण घरच नामाला लावतात :)  )
आता राजस रेगे हे प्रकरण जरा अवघड आहे खरं! (कारण तो कट्टर नास्तिक आहे)
पण आपल्या महाराजांना काय अवघड आहे? भिंतीतून ही बोलतात की ते.

~ जय श्रीराम
महाराज कन्या नयना



सोमवार, २९ जुलै, २०२४

 जय श्रीराम!

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

"हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर! आपण मारलेली हाक महाराजांपर्यंत पोहचली होती.
आता तिला एकेक आठवू लागले.
***
 ती एक ५५ वर्षीय स्त्री. तिला एक लग्नाला आलेली एक मुलगी आणि कॉलेजात जाणारा एक मुलगा. छान चौकोनी कुटुंब होते. करोना काळात नवरा गेला आणि हे तिघेच राहू लागले. तेव्हा तिची आईही तिला सोबत म्हणून येऊन राहू लागली होती. तसा तिचा गोंदवल्याचा अनुग्रह ४५ व्या वर्षी झाला होता. नवऱ्यानेही नंतर घेतला. राहता राहिले मुलगा मुलगी.. ते ही जरा मोठे झाल्यावर त्यांनाही महाराजांनी आपले म्हटले होते. घरात रोज संध्याकाळी दिवाबत्ती झाली की रामरक्षा, रामपाठ, रामहृदय, विष्णुसहस्त्रनाम, म्हणून नंतर कान्होबाला, रामरायाला , महाराजांना दूध देऊन आरती केली जायची. मुलांनाही ही सवय लागली होती. रोज एक तास सगळे आपापल्या वेळेनुसार जपाला बसायचे आणि रात्री एकत्रित नामसंकीर्तन करायचे. हा रोजचाच परिपाठ होता. पण नवरा गेल्यावर तिचे नाम जरा जास्तच उत्कटतेने होऊ लागले होते.

गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत झाल्याने तिला कालच ज्युपिटर हॉस्पिटलला ICU मध्ये  ऍडमिट करण्यात आले होते. नाका-तोंडात नळ्या घालण्यात आल्या होत्या. डॉक्टर मिनिटामिनिटाला पल्स चेक करत होते. एकीकडे मॉनिटर, इकेजी मशीन ची टिक टिक ऐकू येत होती. एकूणच भयावह वातावरण झाले होते.

"आई आई ग! डोक्यातली कळ सहन होत नाहीये". ती दोन्ही हातांनी डोके दाबून धरत कण्हत होती. सलाईनमधून पेन किलर देऊनही कळा थांबत नव्हत्या. आई तिला शांत करत होती. "बाळ, नाम घ्यायला सांगितले आहे ना महाराजांनी. मनातल्या मनात नाम चालू ठेव बरं ! काही होणार नाही तुला. महाराज आहेत पाठीशी, हे बघ तुला महाराजांचा अंगारा लावते. आणि तोंड उघड बघू जरा.. हे समाधीचे तीर्थ आणले आहे , ते देते. !

डायबेटीस असल्याने मेंदूतला रक्तस्त्राव थांबत नव्हता.अन त्यामुळे मेंदूला सूज आलेली होती.  दोन डॉक्टर, १ नर्स ची टीम तिच्याभोवती थांबली होती. त्यांनी तिच्या आईला बाहेर थांबायला सांगितले होते. तिची मुलगी, मुलगा ही बाहेर उभे होते.
"काय बरे आई म्हणत होती? "श्रीराम जयराम जय जय राम" , महाराज " .... आणि डोक्यात एकच जीवघेणी कळ उठली. भोवळ डोळ्यापुढे अंधार दाटला. मशीनवरची टिकटिक एकसलग येऊ लागली. आणि झालं.. डॉक्टरांची पळापळ सुरु झाली. "Sister, ward boy .. keep OT ready! Check BP First ! आपल्या रक्तपेढीतून बी पॉजिटीव्ह रक्ताच्या ६ बॉटल्स लगेच मागवून घ्या. स्ट्रेचर आणा ताबडतोब!  "त्यांनी लगोलग ऑपरेशनचा निर्णय घेतला. चार तास ऑपरेशन चालले.

ऑपरेशन थिएटर बाहेर तिची आई, मुलगा मुलगी तिघेही महाराजांचा धावा करत जप करत बसले होते. थोड्याच वेळात मुख्य डॉक्टर बाहेर आले.  ' हे बघा..आम्ही आमच्या लेव्हलला प्रयत्न केलेत पण  प्रमाणाबाहेर रक्तस्राव होऊन ब्लड क्लॉटिंग झाल्याने आणि ब्लड शुगर लेव्हल लो झाल्याने  she is now in deep unconsciousness state . थोडक्यात तिचा मेंदू झोपी गेला आहे. हा पिरियड म्हटले तर दोन दिवसाचा ही असू शकतो आणि म्हटले तर ३ महिनेही ... अन म्हटले तर अनेक वर्ष ही जाऊ शकतात.
दोघा मुलांवर जसे आभाळ कोसळले.. तिची आई मटकन खाली बसली. मुलगी आज्जीच्या कुशीत येऊन हुंदके देत रडू लागली. मुलगा सुन्न होऊन शून्यात नजर लावून बसला.   
*
डोळ्यापुढे अंधारी आल्याबरोबर तिला वेदनांची जाणीव नष्ट झाली. या स्थितीत खूप वेळ गेल्यावर तिला आपला देह पिसासारखा हलका झाल्याची जाणीव होऊ लागली. संवेदना नव्हत्याच.. हा पिसासारखा देह आता तरंगत अंतराळात विहरु लागला होता. इथून जाता जाता तिला तिची हतबल होऊन बसलेली आई दिसली, रडणारी गोजिरवाणी लेकरे दिसू लागली ... काडी काडी जमवून केलेला संसार, कित्येक वर्ष घराचे कर्ज घेऊन नुकतेच आता कर्ज फिटून पूर्णपणे तिच्या नावावर झालेला तिचा आटोपशीर फ्लॅट, हे सगळं सगळं दिसू लागले. इथून निघताना हे सगळे इथेच सोडून जायचे असते. बरोबर काहीही न्यायची मुभा नाही. हो ! नाही म्हणायला एक गाठोडे तिच्या पाठीला बांधून दिल्यासारखे वाटले. चाचपून पाहिले तर त्यात आजवर केलेले नाम आढळले. "  .... इथून फक्त नामच न्यायची परवानगी आहे तर,"ती मनाशी उद्गरली.
दोन आडदांड काळेकभिन्न दूत आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण अंधाऱ्या, खोल, अश्या अंत नसलेल्या भुयारातून जात आहोत.. या स्थितीत किती काळ गेला कुणास ठाऊक. अचानक गुहेच्या तोंडाशी डोळे दिपतील असा लख्ख प्रकाश दिसू लागलाय. खूप वेळ अंधारातून चालल्याने अचानक आलेला हा प्रकाश डोळ्यांना असह्य होतोय.. त्याची सवय व्हायला वेळ लागेल असे उगाचच तिला वाटून गेले. त्यामुळे बाजूचे दोन्ही अस्तित्वाच्या चेहर्यावर प्रखर प्रकाश आल्याने तेही दिसत नाहीयेत.
अचानक एक झटका लागावे तसे एका सिंहासनाच्या समोर आपल्याला उभे केलय. सिंहासनावर बसलेली व्यक्ती या दोघांपेक्षा क्रूर दिसत आहे. बाजूला मोठेच्या मोठे अवाढव्य बाड घेऊन बसलेली व्यक्ती, त्या बाडमध्ये डोके खुपसून बसली आहे. तेवढ्यात ती सिंहासनाधिष्टीत व्यक्ती अगम्य भाषेत बाडधारी व्यक्तीला काहीतरी विचारते. बाड धारी व्यक्ती सगळा हिशेब मांडते. आपल्याला कळेल अश्या भाषेत सगळा पाप- पुण्याचा हिशेब सांगितला जातोय. "महाराज, सुमारे १३५० वेळा दुसऱ्याचे मन दुखावणे, १७७५ वेळा परनिंदा,  २१० वेळा खोटेनाटे बोलून, लाच देऊन, दुसऱ्याचा गैरफायदा घेऊन  काही मिळवणे, ५७ वेळा प्राण्यांना इजा करणे, ८५ वेळा फुकटचे घेणे अश्या गोष्टी सदरहू महिलेच्या नावावर आहे.
आता तिच्या डोळ्यासमोर संपूर्ण आयुष्याचा भूतकाळ झळकू लागला. गतायुष्यातली कर्मे लख्खपणे समोर आली.
पुन्हा तो बाडधारी त्या क्रूर दिसणार्या व्यक्तीच्या कानाला लागला. आता पुण्यकर्म किती केली आहेत त्याची यादी. १५ वेळा भुकलेल्याला अन्नदान केले, २२ वेळा वृद्धास सहकार्य केले, दरवर्षी मन्दिरात दानधर्म, आणि नामजप केलेला आहे. वयाच्या ४५व्या वर्षी सद्गुरूंचा अनुग्रह ... रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार .  १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला.  नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे.
तेवढ्यात एक दूत सिंहासनाधिष्टित व्यक्तीशी बोलताना ऐकू येते," महाराज, वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे. सिंहासनाधिष्ठित व्यक्ती ताडकन उठून तिथेच नमस्कार करते. आणि विचारते, काय निरोप आहे?
आणि ते दोघे त्यांच्या कानाला लागतात. पुन्हा अगम्य भाषेत खूप वेळ बातचीत झाल्यावर, सगळ्या गोष्टीचा उहापोह झाल्यावर मग ते निर्णयावर येतात आणि तिला जवळ बोलावून म्हणतात, " हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर! आपण मारलेली हाक महाराजांपर्यंत पोहचली होती.

"जी महाराज ' एवढेच अस्पष्टसे तिच्या तोंडून उद्गार निघाले.
तरीही आम्ही तुला तुझ्या नामस्मरणाच्या पुण्यबळावर एक संधी देत आहोत. पृथ्वीवर जाण्यापूर्वी तुझी काही इच्छा आहे काय? त्यानुसार जन्म मिळेल. नसेल तर तुझ्या उर्वरित कर्तव्यपूर्तीची संधी म्हणून आहे त्याच देहात परत जावे लागेल. एका लोकांतून दुसऱ्या लोकात जाताना आत्म्याकडे इच्छा विचारतात आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.
" मला माझ्या सद्गुरूंना परमपूज्य ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांना भेटण्याची इच्छा आहे. " ती एवढेच बोलू शकली.
यावर पुन्हा त्यांची अगम्य भाषेत चर्चा झाली. तिला सिंहासनासमोर आणण्यात आले. 'हे बघ, तुझे सद्गुरू येथून अंतराळात खूप दूरवर आहेत. त्यांना भेटण्याइतकी पुण्याई तुझी नाही.  फक्त एक करू शकतो... त्यांनी पोह्चवलेले १३ जीव .. जे ज्येष्ठ शिष्योत्तम होते अश्या साधकांशी आम्ही तुझी भेट घडवू शकतो. फक्त ६० विपळे.
"विपळे म्हणजे?' तिने उत्सुकतेने विचारले.
"इथे काळाची परिमाणे वेगळी आहेत. तरीही सांगतो. भारतीय कालमापनानुसार एक पळ म्हणजे ६० विपळे. थोडक्यात एक पळ म्हणजे तुमचे २४ सेकंद. फक्त २४ सेकंद तुला त्यांना भेटायची परवानगी आहे, मंजूर आहे?." समोरून उत्तर आले. तिने होकारार्थी मान हलवली.
"ए, कोण आहे रे तिकडे? या बाईंना इथून ३३ अब्ज प्रकाशवर्ष दूर असलेल्या 'अँड्रोमीडा सुदर्शन 'आकाशगंगेवरील 'सिग्नेट बी ' ताऱ्यावर घेऊन जा.
आपले डोळे बांधण्यात आल्याची जाणीव तिला आज पहिल्यांदाच झाली. बरोबर पुन्हा तेच दोन काळेकभिन्न व्यक्तित्व. अंधारात किती काळ अवकाशात तरंगत होते कुणास ठाऊक. काही वेळातच ते एका मोठ्या दालनात उभे होते. दोन्हीही दूत दालनाच्या दारात हात मागे घेऊन जरा अदबीने झुकून उभ्या राहिले . तिच्या डोळ्यावरचा कपडा दूर झाला. सुरवातीला धुक्यासारखे काहीतरी दिसले.. ते धुके दूर झाल्यावर तिला एकेक सूक्ष्मदेह दिसू लागले.
सगळ्यांच्या हातात जपमाळ होत्या. सगळे गोलाकार बसलेले होते. आता पूर्वी कधीतरी फोटोत पाहिलेले एकेक चेहरे दिसू लागले.
अरे बापरे, हे तर पूज्य भाऊसाहेब, त्यांच्या बाजूला पूज्य तात्यासाहेब, ... पु. रामानंद महाराज, पलीकडे पूज्य आनंद सागर महाराज, आणि चक्क पु प्रल्हाद महाराज, पु. जिजामाय, आणि इतरही श्रीमहाराजांनी अनुग्रहाचा अधिकार दिलेले असे १३ सूक्ष्मदेह तिथे होते. विशेष म्हणजे सर्व जण ध्यानमग्न होते.
तिने भीत भीतच सर्वांना " जय श्रीराम " म्हणून साष्टांग नमस्कार घातला.
"बाळ... " धुक्यातुनच एक हाक कानावर आली. पु. तात्यासाहेब बोलत होते. ती नखशिखांत हादरली.
"बाळ, आज तुझे जन्मजन्मांतरीचे नामाची पुण्याई फळाला आली म्हणून इथे येण्याची संधी तुला मिळाली. पृथ्वीवरील गुरुपौर्णिमेचा आज दिवस आणि आज श्रीमहाराज इथे आता भेट देणार आहेत. तुला जी २४ सेकंद भेटण्याची संधी मिळाली ती त्यांच्यामुळेच."
"महाराज, महाराज...तिने आर्ततेने हाक मारली.
भानावर आल्यावर "इथे पू. बुवा दिसत नाहीत"!! तिने चाचरत विचारले.
"बाळ, महाराजांच्या जवळच्या ताऱ्यावर त्यांचे वास्तव्य आहे.
श्रीमहाराजांचे वास्तव्य इथून सुदूर लोकात आहे. इथून ४२८ लक्ष महापद्म अंतरावर असलेल्या "केनिस बटू- जी या चक्राकार आकाशगंगेतील केप्लर या सूर्यमालेतील 'एपसिलोन  विराट' या जीवसृष्टी असलेल्या ताऱ्यावर त्यांचे सध्या वास्तव्य आहे. आणि तिथे त्यांचा नामाचा प्रसार सुरु आहे. पृथ्वीवर जसे त्यांचे १११ वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतरचे तुमचे पृथ्वीवरचे आताचे २०२४ साल म्हणजे १११ वर्ष वास्तव्य विराट ताऱ्यावर झाले. लवकरच त्यांची तेथील अवतारासमाप्तीची तिथी आलेली आहे. त्यानंतरचे त्यांचे वास्तव्य कुठे असणार हे ते स्वतः ठरवणार आहेत. तत्पूर्वी इथे आज ते भेट देणार आहेत. तुला त्यांचे दर्शन होईलच.
 
आणि एकाएकी एक अत्यंत प्रखर, डोळे दिपून जातील असा  आगीचा लोळ तिथे येऊन कोसळतो. त्यातून सहस्ररश्मीला लाजवेल असे तेज:पुंज , तेजस्वी,सुवर्णकांती, प्रसन्न चेहऱ्याचे असे श्रीमहाराज  दिसू लागतात. कपाळावर त्रिपुंड, पीतवर्ण, उंचेपुरे, गळ्यात रुद्राक्ष माळ, पुष्पमाला, अंगात पांढरी शुभ्र कफनी , डोक्यावर गणेश टोपी असे  श्रीमहाराज दमदार पावले टाकीत पुढे होतात. . सर्वजण साश्रू नयनांनी साष्टांग दंडवत घालतात.

श्रीमहाराज प्रत्येकाची जातीने चौकशी करतात, ख्याली खुशाली विचारतात. अन सर्वात शेवटी तिच्याकडे वळून म्हणतात, "माय, श्रीरामरायाने तुझ्यावर कृपा करून तुझे आयुष्य आणखी १५ वर्षांनी वाढवले आहे बरं. तू आता जोमाने नामाला लाग. तुमच्या मनात काय चालले आहे ते तुम्हाला कळत नाही, तितके मला कळते. त्यामुळे दुश्चित्त होऊ नका. तुम्ही दुश्चित्त झालात की मी इकडे अस्वस्थ होतो. भगवंताच्या इच्छेने आपला प्रपंच चालला आहे असे समजा. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा, कशाचीही काळजी करू नका,मी तुमचा भार घेतला आहे, असे समजा. मनापासून मला हाक मारा, तळमळीने नाम घ्या की मी तुमच्या जवळच आहे याचा प्रत्यय तुम्हाला येईल. तुम्ही नाम घ्या की मी तुमच्या जवळच घुटमळत असतो. मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीला मीच प्रेरणा देत असतो, तुमच्या कानाने मीच ऐकतो असे समजा, बरे का बाळ! "
" जी " डोळ्यांतुन ओघळणारे अश्रू ती आता थोपवत ही नाहीये.
"महाराज....  एक विनंती! ती कसेबसे उच्चारते.
महाराज, आपल्या मुखातून 'श्रीराम जयराम, जय जय राम' हे ऐकण्याची इच्छा आहे.  एक माळ जप आपल्यासोबत.... !  
" हो हो "सगळे जण एकमुखाने मान्यता देतात.  "आम्ही तुमच्या मागून म्हणतो".
धीरगंभीर आवाजात श्रीमहाराज सुरु करतात, "श्रीराम जय राम, जय जय राम " ... श्रीराम जयराम जय जय राम.... श्रीराSSSSSम जयराSSSSSम  जय जय राSSSम!
सगळे जण श्रींचे हे रूप डोळ्यात साठवून ठेवत त्यांच्यामागोमाग म्हणत आहेत. आणि श्रीमहाराज स्वतःच्या हृदयावर हात ठेवून उपस्थित प्रत्येकाकडे दोन क्षण प्रेमाने कृपादृष्टी टाकत म्हणत आहेत,  "श्रीराSSSSSम जयराSSSSSम  जय जय राSSSम!" जणू काही म्हणत आहेत, माझ्या हृदयातले प्रेम मी तुम्हाला देतो आहे.
***
तब्बल तीन महिने १३ दिवस महिने उलटून गेलेत तिच्या कोमात जाण्याला. हॉस्पिटलमध्ये रोज येऊन तिच्याजवळ बसून त्रिकाळ जप करण्याचा परिपाठ आजही तिच्या आईने, मुलाने, मुलीने सुरु ठेवला आहे. सकाळ संध्याकाळ रात्र असे तिघांनी वाटून घेतलेत. आजही तिची आई तिच्या शेजारी बसून तिचा हात हातात घेऊन नाडीवर बोट ठेवून जप करतेय. आणि एकाएकी तिची बोटे हलू लागल्याचे तिच्या आईच्या ध्यानात येते.
"सिस्टर.....? डॉक्टर...? इकडे या! हे बघा... " अश्या हाका मारत लगबगीने आई बाहेर धाव घेते. . पुन्हा आत लेकीजवळ येते. तिची बोटे आता हातात माळ फिरवावी तशी हलू लागली आहेत. आणि तिच्या मुखातून अस्पष्टसे उद्गार बाहेर येऊ लागलेत. आई, तिच्या तोंडाजवळ आपला कान नेते तर "श्रीराम..." असा खोल खोल गेलेल्या आवाजात अस्पष्टसा उच्चार ऐकू येतो. जाणिवेच्या प्रांतात ती परत येत होती..! आई तर आनंदाने वेडीच होते.  डॉक्टर येऊन तपासतात, आणि तिथेच किंचाळतात, " Oho, Oho ...  Its a miracle ... तिच्या आईला खांद्याला धरून गदागदा हलवत म्हणत आहेत, "आई, तुमचा पेशंट आज कोमातून बाहेर येतोय! त्यांच्या मुलीला, मुलाला कळवा.. ! डॉक्टर स्वतः  आनंदाच्या  घाईघाईने हॉस्पिटलमध्ये सर्वांना कळवायला निघतात.
ती परत आली ... पण आता भरपूर नाम घ्यायचे आणि हे उर्वरित आयुष्य नामाला वाहून घ्यायचे हा निश्चय करूनच. श्रींनी दिलेले १५ वर्षाचे बोनस आयुष्य ती आता प्रपंचाच्या इतर भानगडी मध्ये वाया घालवणार नव्हती, कारण त्यातले  काहीही बरोबर येणार नव्हते, फक्त नामच बरोबर येते याची तिला खात्री पटली होती. !

एव्हाना ज्युपिटर हॉस्पिटलच्या आयसीयु मधील चार नंबर बेडवरचा कोमातला पेशंट साडेतीन महिन्यांनी शुद्धीवर येतोय ही बातमी अख्ख्या हॉस्पिटलभर वाऱ्यासारखी पसरली होती.

**

जय श्रीराम!
~महाराज कन्या नयना

जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...