जय श्रीराम!
' बहू मंदिरे स्थापियेली ' या शृंखलेत पुढची मंदिरे आहेत.
२८. कऱ्हाड राममंदिर १९११
सोमवार पेठ, कऱ्हाड, जि. सातारा, ४१५११०, महाराष्ट्र
पुजारी : वासुनाना देव
कऱ्हाड येथील श्रींच्या चरित्रात अजून एक आलेला उल्लेख म्हणजे,
कऱ्हाडला आबाजीपंत नावाचे एक गृहस्थ होते.रजिस्ट्रेशन खात्यामध्ये त्यांनी बरीच वर्षे नोकरी केली,.त्यांना मुलगा नव्हता, फक्त मुलीचं होत्या,सर्व मुलींची लग्न झाली,फक्त धाकटी विठाबाई फारच लहान असल्यामुळे तीचे लग्न होऊ शकले नाही.पण आबांनी लवकर पेंशन घेतले, उरलेला काळ भगवंताच्या उपासनेत घालवण्याचा निश्चय केला,त्यांनी हा निश्चय केला खरा पण उपासना म्हणजे काय,ती कशी करायची असते,भगवंताचा व आपला संबन्ध कशा प्रकारचा आहे,आत्मनिवेदन कसे करावे,इ प्रश्न त्यांना गोंधळात टाकीत,व त्यांची चित्तवृत्ती द्विधा होऊन जाई,म्हणून खरा परमार्थ सांगणारा कोणी योग्य मार्गदर्शक आपल्याला मिळेल काय या विवंचनेमध्ये आबा होते.मनाच्या अशा अवस्थेमध्ये ते श्री समर्थांची प्रार्थना करीत, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याची त्यांना विनंती करीत,असे दिवस चालले असता एके दिवशी एक वृद्ध रामदासी भिक्षेसाठी त्यांच्याकडे आले,त्यांना घरात बोलावून आबांनी त्यांचा सत्कार केला आणि" परमार्थ कसा करावा हे आपण मला सांगाल काय?" असा प्रश्न विचारला,रामदासी बुवांनी लगेच उत्तर दिले,"ते सांगण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो,गोंदवल्यास श्री महाराजांकडे तुम्ही जा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सुटून तुमचे खरे समाधान होईल " असे सांगून ते लगेच निघून गेले.आबांनी श्री महाराजांचे नाव ऐकलेलं होतच,एक दोन दिवसांनी ते सहकुटुंब गोंदवल्यास आले,ते आले तेव्हा महाराज शेतातून काम करून येऊन,हात पाय मातीने भरलेले असे, स्नानाची वाट पहात उभे होते.श्री महाराजाना पाहिल्याबरोबर आबांच्या मनाचे एकदम अतोनात समाधान झाले आणि प्रेमाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
दुसऱ्या दिवसा पासून श्री महाराज निरूपण सांगण्यासाठी बसू लागले.मंदिरातील बहुतेक सर्व स्त्री पुरुष निरूपण ऐकण्यासाठी बसत,त्यांच्यामध्ये आबा देखील मुकाट्याने एका बाजूला बसून मनापासून ऐकत,पहिल्या दिवशी*भगवंत म्हणजे कायआपला आणि त्याचा संबंध काय आहे,या विषयावर निरूपण झाले,आबांना वाटले आपल्याला जो विषय हवा होता तो सहजच निघाला असेल,श्री महाराजांनी निरुपणात जे विवेचन केले त्याच्यावर त्यांच्या मनामध्ये अनेक शंका उत्पन्न झाल्या,परंतु गोंदवल्यास ते अगदी नवीन असल्यामुळे त्यांना आपल्या मनातले विचार कोणाजवळ बोलून दाखवता येईनात.श्री महाराजांना सांगणे तर दुरच राहीले,दुसरे दिवशी निरुपणाला प्रारंभ करतानाच श्री महाराज बोलले" काल जो विषय झाला त्याच्यावर माझ्या मनामध्ये नंतर काही शंका आल्या त्यांचीच आज उत्तरे देऊ." असे बोलून त्यांनी आबांची एकेक शंका मांडली.आणि त्याची उत्तरे दिली. लागोपाठ चार दिवस हा प्रकार चालला,आबांच्या मनामध्ये ज्या ज्या शंका होत्या,त्या सर्व समाधानकारक रीतीने सुटल्या.पाचवे दिवशी ,भक्तीमध्ये भगवंताच्या प्रेमाचा परिपोष कसा होतो,आणि ती भक्ती नामाने कशी साधते,याचे वर्णन श्री महाराजांनी सुरू केले.सर्व मंडळी अगदी रंगून गेली होती,इतक्यात आबांना आपला भाव अनावर होऊन ते मध्येच उठले,आणि सद्गगतीत होऊन त्यांनी श्री महाराजाना साष्टांग नमस्कार घातला.श्री महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरले,आणि शांत केले,तेव्हा आबा म्हणाले"महाराज!मी आज धन्य झालो.माझ्या सर्व शंका फिटल्या.पण माझी एक इच्छा आहे.माझ्या अंतकाळी असेच आपले दर्शन होईल काय? "श्री महाराजांनी तात्काळ उत्तर दिले"आबा,तुम्हाला दर्शन होईल इतकेच न्हवे ,तर त्याची साक्ष इतरांना देखील पटेल!"
काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी श्री महाराजांनी त्यांना विचारले,"आबा,भगवंताच्या नामात आहात ना? "आबा बोलले," होय महाराज पण माझ्या विठाबाईची मला काळजी वाटते ती अजून लहान आहे,.ती अजून लहान आहे,तिचे लग्न कसे होईल असे वाटते"यावर श्री महाराज म्हणाले" मी तिला दत्तक घेतो आजपासून ती माझी मुलगी आहे असं समजा,आणि तुम्ही अगदी निर्विकल्प मनाने नाम घ्या."त्या प्रमाणे विठाबाईला श्री महाराजांच्या पदरात घालून आबा प्रपंचाच्या काळजीतून मुक्त झाले.इतपर त्यांचा सर्व काळ नामस्मरणा मध्ये जाऊ लागला.आणखी थोडे दिवस गेल्यावर आबांनी कऱ्हाड ला परत जाण्याबद्दल विचारले तेव्हा श्री महाराज म्हणाले," आताच काय घाई आहे?पुढे बघू."त्यावर त्यांनी "जाऊ का?" म्हणून पुन्हा विचारल्यावर श्री महाराजांनी संमती दिली आणि आबा कऱ्हाडला गेले.
श्री महाराजांचे लक्षात ठेवण्या सारखे एक मोठे वैशिष्ट्य असे होते की कोणी त्याना प्रश्न विचारल्यानंतर प्रथम चटकन जे उत्तर त्यांच्या तोंडून येई तेच त्यांचे खरे सांगणे,किंवा खरे मत किंवा खरी आज्ञा असे.त्यावर शंका काढून किंवा अडचणी दाखउन पुन्हा विचारले म्हणजे ते विचारणाऱ्याच्या मनाप्रमाणे सांगत.आबांनी त्यावेळी कऱ्हाड ला परत जाणे श्री महाराजांच्या मनात नव्हते .परंतु एकदा नको म्हणून सांगितले असता पुन्हा विचारल्यावर मात्र त्यांनी होकार दिला.आबा कऱ्हाडला परत गेले,आणि सहा दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडण्यास आरंभ झाला.औषध पाणी व्यवस्थित चालू होते तरी पंधरा दिवसाच्या अवधीत ते इतके थकले कि त्यांना अंथरुणावरुन उठवेना,पण त्यांचे नामस्मरण सारखे चाललेले असून ते मनाने अगदी शांत होते,'श्री महाराजाना पत्र लिहून कळवावे का? 'असे विचारता ते नको म्हणाले,म्हणून गोंदवल्यास त्यांच्या आजाराची कोणास वार्ता न्हवती, एके दिवशी सकाळी त्यांची अवस्था फारच कठीण झाली, आणि त्यांचा अंतकाळ जवळ आला आहे हे सर्वांना समजले,स्वतः त्यांनाही तसे वाटले. श्री महाराज त्यावेळी गोंदवल्यास होते,सकाळी नऊ साडे नऊ ची वेळ,काही कारण नसताना ते रामासमोर भजनाला उभे राहिले .सर्व मंडळी" जय जय श्रीराम जय जय श्रीराम"असा घोष करून नाचत होती,इकडे कंठी प्राण आणून आबा श्री महाराजांची वाट पहात होते,इतक्यात ते ज्या खोलीमधे निजले होते,तिच्या पाठी मागच्या बाजूस*"जय जय श्रीराम"*असा श्री महाराजांचा स्पष्ट आवाज आणि त्याबरोबर मंडळींचाही आवाज सर्वाना ऐकू येऊ लागला,तेव्हा श्री महाराज
खरोखरच आले असे वाटून खोलीमधली इतर मंडळी त्यांचे स्वागत करण्यास एकदम उभी राहिली,आबांना बाह्यशुद्धी फारशी नव्हती ,परंतु तेवढ्यात ते चांगले शुद्धीवर आले,खाडदिशी उठून उभे राहिले,आणि"अरे,बघा! श्री महाराज स्वतः आले आहेत , सर्वानी त्यांचे दर्शन घ्या,! " असे बोलून व नमस्कार करून पुन्हा निजले,पाच मिनिटांनी डोळे उघडून पुन्हा ते बोलले"महाराज!आपण मला दर्शन दिले, माझ्या सर्व इच्छा पुरवल्या,मी आनंदाने निरोप घेतो" हे शब्द बोलून त्रयोदक्षाक्षरी मंत्राचा जप करीत शांतपणे त्यांनी प्राण सोडला
श्री महाराजांच्या कानावर हा सगळा प्रकार गेला तेव्हा ते अत्यन्त कौतुकाने म्हणाले,"आबा चांगले अधिकारी! रामाने त्यांना उत्तम गती दिली,भगवंताच्या नामाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते,असे लोक फार थोडे, त्यांनी आपला प्रपंच रामाला अर्पण केल्यावर त्याची कधी काळजी केली नाही, सर्वानी त्याचे अनुकरण करावे"
आबांच्याकडुन दत्तक घेतलेली मुलगी जी विठाबाई तिचे लग्न श्री महाराजांनी वासुदेव मार्डीकर नावाच्या गृहस्थाशी सालंकृत कन्यादान करून स्वतः करून दिले
**
२९. दत्तमंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र
धाकट्या राममंदिराजवळच श्री दत्त मंदिर आहे.या एकमुखी दत्तमंदिराची स्थापना वैशाख शुद्ध पंचमी शके १८३३ (१७ मे १९११) रोजी झाली. दत्तात्रेयाची मूर्ती लहान असली तरी रेखीव आहे.श्रीदत्तांच्या एका बाजूस नृसिंहाची मूर्ती व एका बाजूस देवीची मूर्ती आहे. #१९५९च्या_पुण्यतिथी_उत्सवाच्या वेळी शतचंडी महायाग करण्यात आला व दत्तमंदिरात देवीची स्थापना करण्यात आली. १९९३ मध्ये या देवळाचा जीर्णोद्धार करताना समोर मोठा सभामंडप बांधण्यात आला.**
३०. नृसिंहमंदिर, गोंदवले १९११
गोंदवले, ता. माण, जि. सातारा - ४१५५४०, महाराष्ट्र
श्रीमहाराजांचे कुलदैवत नृसिंह. त्यामुळे नृसिंह दैवताची स्थापना ही साधारण त्याच वर्षी म्हणजे १९११ मध्ये झाली.
**
जय श्रीराम










.jpeg)
































