गुरुवार, २ जानेवारी, २०२५

 जय श्रीराम!

पाऊलखुणा - ४

१)श्री कृष्णशास्त्री उप्पिनबेटगिरी


कृष्णानंद स्वामी उर्फ कृष्णशास्त्री हे सुप्रसिद्ध संस्कृत पंडित होते. ते उप्पीनबेटगिरीचे होते. काशीमधील संस्कृत विद्वान सभेचे अध्यक्षपदसुद्धा त्यांना प्राप्त झाले होते.. त्यांच्या विद्वत्तेवर पंडित मदनमोहन मालवीय हे प्रभावित झाले होते. त्यांच्यावर ब्रह्मचैतन्य महाराजांचा प्रभाव होता. त्यांचे स्मरण करीत त्यांनी संन्यास घेतल्यावर कृष्णानंद स्वामी झाले. १९२२ मध्ये ते समाधिस्त झाले. त्यांची धारवाड येथे संस्कृत पाठशाळेत समाधी आहे.
श्रीब्रह्मानंदांच्या परिचयाने यांना श्रीमहाराजांचा अनुग्रह झाला. यांनाही श्रींनी दोन रुपये प्रसाद म्हणून दिलेले त्यांच्या देवांमध्ये असत.  एकदा त्यांनी दारावर नेहमी येणाऱ्या एका बाईकडून दोन रुपयांचे धान्य घेतले, व त्यावेळी जवळ पैसे नसल्याने दुसऱ्या दिवाशीचा वायदा केला. दुसऱ्या दिवशी ती बाई येईपर्यंत रकमेची व्यवस्था होऊ शकली नाही. वायदा पुरा न केला तर आपली अब्रू जाणार अशी वेळ येऊन ठेपली. तेव्हा निरुपाय होऊन पूजेतले रुपये देण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून शास्त्रीबुवांनी ते उचलले. एवाढ्यात पोस्टमन येऊन त्याने पुण्याच्या वेदाशास्त्रोत्तेजक सभेतर्फे परीक्षक म्हणून केलेल्या कामाचे मानधनाची पावती दिली ती नेमकी दोन रुपयांची! श्रीगुरुमाउलीची ही कृपा पाहून शास्त्रीबुवांच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले! आजही ते दोन रुपये त्यांचे चिरंजीव भालचंद्रशास्त्री यांच्या पुजेत आहेत.

कृष्णशास्त्रींच्या हस्ते धारवाडात दोन राममंदिरांची स्थापना झाली. एक लाईनबझारमध्ये, त्यांच्या नात्यातल्या गंगाबाई यांनी बांधलेले; आणि दुसरे माळमड्डीवर, जोगळेकर न्यायाधीश यांनी बांधलेले. या मंदिरात वनवासी रामाच्या मूर्ती आहेत.
संदर्भ: चैतन्य स्मरण १९८८ ही स्मरणिका, पान १९०
संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन
***
२)विष्णुबुवा कुंभारे

   


   विष्णुबुवा कुंभारे हे मूळचे राहणारे वऱ्हाडातले. यात्रेच्या निमित्ताने ते मोगलाईत गेले असता अंबड येथे त्यांची व आनंदसागर यांची गाठ पडली. आनंदसागर यांनी त्यांना श्रीमहाराजांच्याबद्दल गोष्टी सांगून गोंदवल्यास पाठवले. श्रीमहाराजांना पाहून विष्णुबुवांना आनंदाची उर्मी आली आणि त्यांच्या मनाला विलक्षण समाधान झाले. श्रीमहाराजांनी त्यांना ठेवून घेतले. चार-आठ दिवस राहिल्यावर नित्याच्या व्यवहारांमध्ये देखील सहज प्रकट होणारे श्रीमहाराजांचे ज्ञान व वैराग्य पाहून विष्णुबुवा चकित होऊन गेले आणि आपण त्यांचा अनुग्रह घ्यावा असे त्यांच्या मनाने घेतले. एकदा श्रीमहाराज एकटे आहेत अशी संधी साधून, आपल्याला अनुग्रह द्यावा म्हणून त्यांनी श्रीमहाराजांना विनंती केली. तेव्हा श्रीमहाराज हसले आणि त्यांना म्हणाले, "बुवा, तुम्हाला अनुग्रह झाला आहे ! ना वारे वा ! मागच्या गुरूंना जसे तुम्ही विसरला तसेच मला पण विसराल !  अहो, गुरू म्हणजे थट्टा का आहे ?  एखाद्या पतिव्रतेसारखे गुरूशी वागावे लागते.  आपला देह त्याला अर्पावा लागतो. एकदा एक गुरु केला म्हणजे दुसरा करू नये." श्रीमहाराजांचे शब्द ऐकून विष्णुबुवांना लहानपणची आठवण झाली. ते सहा-सात वर्षांची असताना एका सत्पुरूषाने त्यांना शिवमंत्र दिला होता. परंतु त्याचवेळी त्याने हे सांगून ठेवले की, "तुला माझे आणि ह्या मंत्राचे लवकरच विस्मरण होईल, नंतर पुष्कळ वर्षांनी श्रीब्रह्मचैतन्य नावाच्या थोर महात्म्याचे दर्शन तुला घडेल.  तू त्यांचेपाशी अनुग्रह मागशील तेव्हा तेच तुला माझे स्मरण करून देतील, पण तू त्यांनाच गुरु मान आणि त्यांच्या चरणी चित्त अर्पून त्यांची आज्ञा वेदवाक्य समज. त्याने खात्रीने तुझे कल्याण होईल."  विष्णूबुवांनी ही सर्व कथा श्रीमहाराजांना सांगितल्यावर त्यांनी अनुग्रह देण्याचे कबूल केले.  श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रह दिला तेव्हा त्यांना शिवमंत्रच दिला. राम आणि शिव या दोघांमध्ये भेद मानू नये असे सांगून रोज स्नान झाल्यावर आसनावर बसून शिवमंत्र जपावा आणि इतर वेळी रामनामाचा जप करावा अशी श्रीमहाराजांची त्यांना आज्ञा झाली. हा अनुग्रह झाल्यावर विष्णुबुवांनी मोठ्या चिकाटीने जप केला. तसेच ते द्वादश ज्योतिर्लिंगे आणि इतर मोठी क्षेत्रे पाहून आले.
 त्यांचे नामाचे प्रेम पाहून श्रीमहाराजांनी त्यांना दीक्षाधिकार दिला होता. नंतर वऱ्हाड प्रांतात शेंदूरजन घाट येथे मठ बांधून ते राहिले.
पुढे श्रीमहाराजांनी बांधलेली मंदिरे या पोस्टमध्ये त्यांचा उल्लेख येईलच.
**
३)श्री नारायण अप्पा कुलकर्णी, कुंदगोळ :  


मूळचे रहाणारे कुंदगोळचे , पण पुढे ते श्रीमहाराजांच्याजवळ रहात असत. एकदा श्रीमहाराज त्यांना म्हणाले , ' अरे नारायण , तू गोंदवल्याला पुष्कळ नामस्मरण कर. राम तुझ्या हाताने नामाचा खूप प्रसार करणार आहे .' दक्षिण कर्नाटकामध्ये यांनी नामाचा फार प्रसार केला. हे अत्यंत निरभिमानी वृत्तीने वागत.
यांना सर्वजण कुंदगोळ नारायणप्पा म्हणत. त्यांचा जन्म १८८४ मध्ये झाला होता. ते महाराजांचे आणि ब्रम्हानंद बुवांचे परमभक्त होते. त्यांचे एस एन कुलकर्णी, एल एन कुलकर्णी, पी एन कुलकर्णी असे तीन पुत्र होते. त्यांच्या घरात प्रवेश करताच महाराजांच्या पादुका आणि भावचित्र समोर आहे. पु तात्यासाहेब केतकर त्यांच्या घरी येत असत. १९४९ मध्ये चिंतामणी येथे राम मंदिरात राम, सीता , लक्ष्मणाच्या मूर्ती त्यांच्या बरोबर महाराजांची अमृत शिला मूर्ती त्यांनी स्थापित केली. १९५२मध्ये त्यांनी देह ठेवला.

 

 

जय श्रीराम

~ श्रीमहाराज कन्या 




 जय श्रीराम!

पाऊलखुणा - ३

१) भीमराव गाडगोळी : 

पु. ब्रम्हानंद बुवांचे वडील बंधू श्री गुरुनाथ यांचे हे पुत्र. त्यांचा जन्म १८८० झाला, ते गदग येथे वकिली करत. त्यांना आपले चुलते श्री ब्रम्हानंदाबद्दल अतीव आपुलकी होती आणि ब्रह्मचैतन्य महाराजांवर अपार श्रद्धा होती. ब्रम्हानंदाच्या आज्ञेनुसार बेलधडी व वेंकटापुर येथील कारभार ते पाहत होते.
ते नावाजलेले वकील होते.  भीमरावांना श्रीमहाराजांनी पत्र लिहिले ' आता तीन तपे वकिली झाली आहे तेंव्हा ती बंद करून उरलेले जीवन भगवंतासाठी आहे हे समजून रहावे. ' ज्या दिवशी हे पत्र श्री भीमरावांना मिळाले त्याच दिवशी त्यानी वकिली बंद केली .  विशेष म्हणजे त्या दिवशीच्या तारखेसाठी देखील कोर्टात गेले नाहीत !
एकदा श्री.भीमराव गाडगुळी महाराजांना ( पेटीवर ) म्हणाले, *"आपण जे काकांना (श्री.ब्रह्मानंदांना)  दिले ते मला द्या."*त्यावर श्रीमहाराज म्हणाले, " एका माणसाला त्याचा मित्र स्टेशनवर पोचवायला गेला होता.तो माणूस डब्याच्या दारात उभे राहून मित्राला डब्यात बोलावीत होता,तेव्हा मित्र म्हणाला, *"अरे तु बाजुला हो की,तू बाजूला झाल्या खेरीज मी आत कसा येणार ?तसे तुम्ही आपला 'मी' बाजूला केल्या खेरीज मला आंत कसे येता येईल.?"*हा ' मी 'नाहीसा करुन मला आत जागा करुन द्या मी त्याचीच वाट पाहतो. 

 

२) श्री दामोदरबुवा कुरवलीकर 


वैशाख शु.अष्टमी. श्रीगोंदावलेकर महाराजांचे जेष्ठ शिष्य श्रीदामोदरबुवा कुरवलीकर [ कुरोली, सिद्धेश्वर, तालुका खटाव]  यांची पुण्यतिथी. त्यांनी श्रीमहाराजांची २४ वर्षे निकट राहून सेवा केली. श्रीमहाराजांनी त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता. श्रीमहाराज म्हणायचें कीं जो  नियमित नामस्मरण करील त्यांची अंगलट गुरुसारखी होईल. श्री दामोदरबुवा कुरवलीकर हे सुद्धा अगदी श्रीमहाराजांसारखेच दिसायचें. महाराजांनी त्यांना अनुग्रहाचा अधिकार दिला होता. बेळगांव निवासी पू काणेमहाराज यांना अनुग्रह दामोदरबुआंनीच दिला होता.  
महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात काकड आरती नंतरच्या भजनाचे प्रमुख कुरवलीकर बुवा असायचे.




श्रीमहाराजांसारखे दिसणारे पु. कुरोलीकर बुवा




 

 

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

 

जय श्रीराम!
~ श्रीमहाराजकन्या

 जय श्रीराम

श्रीमहाराज चरित्रात उल्लेख आलेल्या काही व्यक्तींविषयी आपण पाहत आहोत.

पाऊलखुणा - २

१) श्री काळबोवा - (सुमारे इ.स.१८२० ते १९१८)


 मूळचे पंढरपूरचे असणारे श्री विष्णुबुवा नारायण शेंबेकर- मूळ नाव असलेले हे सत्पुरुष. उदासीन वृत्तीचे. सदासर्वकाळ  मुखाने, काळ सर्वांचा बाप आहे असे म्हणत. म्हणूनच कदाचित नाव 'काळबुवा ' असे पडले. यांच्याविषयी एक कथा अशी सांगतात की एका ब्राह्मणाच्या मुलाचे पायावर त्यांनी दगड मारला तेव्हा त्यांचेवर फिर्याद होऊन सोलापूरात विष्णू परशुराम रानडे डिस्ट्रिक्ट डेप्युटी यांचेमार्फत खटला दाखल झाला चौकशीअंती ते वेडे ठरले व त्यांना पुण्याच्या येरवडा येथील वेड्यांच्या इस्पितळात दाखल केले ते सदैव "काळ आला रक्त खातो काळाची.....काळ आला आला" असे म्हणत सर्वत्र एखाद्या वेड्यासारखे फिरत असत या आधी पण ते सदैव काळ सर्वांचा बाप आहे असे म्हणत असत म्हणून त्यांना लोक काळबुवा म्हणून ओळखत त्यांनी त्यांच्या चौकशीतही न्यायमूर्तीपुढे "काळ बाप सर्वांना ग्रासतो रांडेचा रक्त पितो दगड खातो ओकतो काळ ! काळ !" अशी बडबड त्यांनी केली म्हणून ते वेडे ठरवून त्यांना पुण्यास येरवडा येथील वेड्यांच्या इस्पितळात ठेवले एके दिवशी काळबुवा श्री.सदाशिव गोवंडे ह्या त्यांच्या शिष्याच्या स्वप्नात आले "मी येरवड्याच्या वेड्यांच्या इस्पितळात आहे" असे सांगितले यावरून काळबुवा हे महान साक्षात्कारी पुरूष होते याची साक्ष पटते पण ते पिशाच्चवृत्तीने सदासर्वदा राहत कारण त्यांना जनउपद्रव टाळायचा होता ते वेड्यांच्या इस्पितळात असताना स्वप्नदृष्टांनानुसार श्री सदाशिव गोवंडे व वामनबुवा (बडोदेकर) वैद्य श्री (गुरूलीलामृत ग्रंथ रचियते) फिरत फिरत या दवाखान्यापाशी आले त्यांनी बुवांचे वरील शब्द काळ आला....काळ आला ऐकले त्यांचे हे बोल वामनरावांना कळले कारण वामनबुवा त्यांची योग्यता जाणून होते हे श्री स्वामी समर्थांचे शिष्य आहेत ते वेडे नाहीत याची त्यांना खात्री पटली उलट हे आध्यात्मातील अधिकारी असावेत असा त्यांचा ग्रह झाला वामनबुवांनी त्यांना "तुमचे गुरू कोण ही अशी पिशाच्चवृत्ती का धारण केली" असे विचारताच काळबुवा म्हणाले तुम्हाकडे ब्राह्मण पाठविला होता पण तुम्ही त्याची थट्टा केली त्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे आम्ही सेवक आहोत लोकांची उपाधी न व्हावी म्हणून आम्ही अशी पिशाच्चवृत्ती धारण केली आहे."
*
श्रीमहाराजांच्या चरित्रात श्री काळ बोवांचा उल्लेख येतो तो असा:
" हा तर रामदास हनुमान " !  :
           
   श्री काळबोवा नांवाचे एक मोठे सत्पुरुष पुण्यात ओंकारेश्वरला रहात असत. देशपांडे नांवाचे श्रीमहाराजांचे एक शिष्य नुकतेच गोंदवल्याहून पुण्यास परत आले होते. ते श्री  काळबोवांच्या दर्शनास गेले असता श्री काळबोवा गोंदवल्याचे तपशीलवार सर्व वर्णन करून म्हणाले , " श्रीरामरायाच्या डाव्या बाजूच्या खोलीतील पलंगावर केवढे माकड बसले आहे ! " असे बोलून त्यांनी नमस्कार केला व पुढे बोलण्याचे थांबले. श्री काळबोवांचे एक शिष्य पुण्यामध्ये होते. त्यांना देशपांडे यांनी फोटो दाखवला असता ते एकदम म्हणाले , " हा तर रामदास हनुमान ! त्यांना सोडू नका. त्यांत तुमचे कल्याण आहे ! "
श्री काळ बोवांची समाधी ओंकारेश्वर पुणे येथे नदीकाठी आहे.


 

२) हनुमंतराव लंकूडी : हणमंतराव कुलकर्णी  :  


श्रीब्रह्मचैतन्यांचे एक अधिकारी शिष्य : लकुंडी हणमंतराव यांना महाराजांनी अनुग्रहाचा अधिकार दिला होता.
 ते ब्रह्मचारी होते.  लकुंडी गाव आहे. तिकडे त्यांची समाधी वगैरे आहे. त्यांनी नामाला योगाची जोड दिली. महाराज म्हणाले गुरुच्या प्रेमाची जोड द्यावी. एकसारख्या संथ वेगाने 'श्रीराम जयराम जृयजयराम' असा त्यांचा जप चालू असे. अखंड व एका तालबद्ध लयीत हणमंतरावांचा जप सतत तीनतीन चारचार तासपर्यंत चालायचा. त्यावेळी ते अगदी शांत आणि प्रसन्न मुखानें बसलेले असत. नामाचें साधन माणसाला सिद्ध कसे बनवतें याबद्दल ते सांगत की 'आपण झोपलो तरी आपला श्वास चालतो. प्राणवायु तो चालवतो. नाभीच्या ठिकाणी असणाऱ्या परावाणीशी या वायूचा संबंध असतो. म्हणून श्वासाबरोबर शरीरामधें एक अव्याहत शब्द देखील उत्पन्न होत असतो. या शब्दाला अजपा अथवा सोSहं म्हणतात. या अजपाजपाशी समरस झाले,तादात्म्य पावलें की ध्यानयोग साधतो. गुरुनें दिलेल्या नामाचा अखंड जप केला म्हणजे त्याचें अजपाशी एकरूपत्व होतें. या एकरूप होण्यास मोठी चिकाटी लागते. पण असें नाम चाललें म्हणजे त्यास श्वासांतील नामस्मरण असे म्हणतात.'

श्रीहणमंतराव अंथरुणावर पडले तरी सतत मौनजप चालू असे. ते फक्त डोळे मिटून पडून राहात. त्यांना एकदां एकानें विचारले, 'आपला अनुभव सांगाल कां ?' त्यावर ते म्हणाले,' हल्ली मी ध्यानात शीघ्र व गाढ एकाग्र होत असतो. झोप ही अवस्था जवळ जवळ मला नसतेच. अखंड नामस्मरण मला साधलें आहे. मला श्रीरामदर्शन झाले आहे. एकदां असें दिसून आलें की सर्वत्र आकाशभर मागें पुढें व हृदयांत सर्वत्र तेजोमय अशी सीतारामाची जोडी भरून राहिली आहे. स्वत;चा देहसुद्धा स्वतंत्र अस्थित्वात राहिलेला नसून सर्वत्र आंत व बाहेरही आकाशभरही जिकडे पहावें तिकडे सर्वत्र सीताराम सीताराम या जोडीनें वातावरण भरून गेलें आहे.'

तर ते संध्याकाळी फिरायला जायचे. बी. ए. झाले होते मॕथेमॕटिक्सचे डेक्कन काॕलेज मधून, आणि सरकारी नोकरीत होते. टेक्सस्टाईल इंजीनीयर वैगरे काही होते, तेंव्हा फिरायला जातांना ते काय म्हणाले' अरे मला अखंड नाम साधलाय!' नामाचा विषय निघाला असतांना त्यांनी ते सांगितले. तर ते कसे काय साधले? तर 'तुम्ही रात्री या' म्हणाले. हे रात्री गेले. '  मच्छरदाणी लावलेली आणि त्यांनी साडेआठला मोठ्याने नाम घ्यायला सुरवात केली. तर ते पहाटे चार वाजे पर्यंत नामस्मरण करीत होते. बाकीचे झोपले. तेंव्हा ते काय म्हणाले 'अरे तुम्हाला हे बाहेरचे नाम सहन होत नाही- आंत तर अखंड नाम चालू आहे, ते कसे सहन कराल?' श्रीमहाराजांचे एक जेष्ठ भक्त
वैद्य कासेगावकर यांना अनुग्रह हणमंतराव यांनी दिला होता.

🌿 संदर्भः ती बाबा बेलसरे यांचे  ६-१-१९९४ चे प्रवचन व त्यांचेच साधकांसाठी संतकथा हे पुस्तक
*
हे एक मोठे ज्ञानी व योगी पुरुष होऊन गेले. सन १८७५ च्या सुमारास कर्नाटकांतील लकुंडी या गांवीं यांचा जन्म झाला. हे वयाच्या सातव्या वर्षीं एकदां आपल्या मामाच्या गांवीं गेले असतां, श्रीमहाराज तेथें होते. त्यांनीं याला पाहून हांक मारली व विचारलें, 'बाळ, स्नान झालें का ?' तो म्हणाला, 'नाहीं.' श्रीमहाराजांनीं सांगितलें, 'बरें, मग घरीं जा, स्नान कर, आणि आईजवळून एक नारळ घेऊन माझ्याकडे ये.'
थोड्या वेळानें हा मुलगा आपल्या आईला घेऊन आला. श्रीमहाराजांनीं दोघांनाहि अनुग्रह दिला, आणि आईला सांगितले, 'माय ! हा मुलगा पुढें मोठा योगी होईल.' त्या वेळेला श्रीमहाराजांनीं हणमंताला श्वासावर नाम घेण्यास सांगितलें, आणि त्या वयांत तें त्याला कळलें हें विशेष आहे.

संदर्भ: श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङमय: पृष्ठ क्रमांक ३८२ व ३८३

जय श्रीराम!
~ श्रीमहाराजकन्या


 जय श्रीराम!

पाऊलखुणा - १

श्रीमहाराजांच्या १११ व्या पुण्यतिथीनिमित्त आपण श्रींच्या चरित्रातील काही प्रसंग, त्या संबंधित व्यक्ती आणि ठिकाणे यांचा मागोवा या लेखात घेऊया.
या  म्हणून श्रीमहाराजांचे पु. बाबा बेलसरे लिखित चरित्र, तसेच श्री गोपाळराव फडके लिखित सद्गुरुलीलामृत ग्रंथ, चैतन्यस्मरण विशेषांक, काही पुस्तके, वेबसाईट आणि गुगल सर्च चा वापर करण्यात आला आहे.

१) श्रीमहाराजांचे आई वडील श्री रावजी  व गीतामाई श्रींच्या जन्मापूर्वी गोंदवल्याच्या जवळ असलेल्या ज्या सत्पुरुषाच्या दर्शनाला जात असत त्यांचा उल्लेख पु बाबा बेलसरे लिखित महाराजांच्या चरित्रात तसेच पु ब्रम्हानंद महाराजांच्या अनुज्ञेने कै गोपाळराव फडके लिखित सद्गुरुलीलामृत ग्रंथात आला आहे.
(लेखन काल १९१८ ते १९२१- अध्याय २, ओव्या २ ओव्या ४३ ते ४७)
संभाजी साधु दर्यांत । तेथें उभयतां दर्शना जात ।
चरणीं मस्तक ठेवित । करद्वय जोडोनि ॥ ४३ ॥
त्या साधूंची ऐशी स्थिति । कोणासी स्पर्श करूं न देती ।
लोकीं केली विनंती । यांसीच स्पर्श किंनिमित्त ॥ ४४ ॥
साधु बोलती तयांसी । धन्य असे यांची कुशी ।
उदरीं अवतार देवासी । येणें असे । ४५ ॥
यांचे भाग्य असे थोर । पूर्वसंचित अपरंपार ।
उदरीं होईल अवतार । सगुण ब्रह्म ॥ ४६ ॥

यात हा प्रसंग वर्णन केला आहे की श्री रावजी आणि गीतामाई यांना संभाजीमहाराज विशेष अगत्याने आणि आदराने वागवत असत. या संभाजी रावांविषयी काही माहिती उपलब्ध झाली ती चैतन्यस्मरण च्या २००७च्या विशेषांकात डॉ. ना. कृ भिडे यांनी संकलित केलेली आहे.
त्यानुसार संभाजी महाराज शहाण्णव कुळीतले जाधव आडनावाचे, मूळ गाव उते किंवा उतवे (उतवेश्वर महादेवाचे गाव) घराण्यात पाटीलकीचे अधिकार त्यामुळे उतेकर, उतवेकर , पाटील असाही उल्लेख आहे. त्यांच्या अनेक पिढ्यात थोर अध्यात्मिक योग्यतेचे पुरुष होऊन गेले त्यांच्या पूर्वजांचा समर्थ रामदास स्वामी यांच्याशी घनिष्ट संबंध होता. त्यांच्या घराण्यात शिवभक्तीची परंपरा. वाडवडील साताराजवळ माहुली रोडवर पीरवाडी येथे स्थायिक झाले. जालीमसिंग नावाच्या राजपूत योग्याकडून त्यांना नाथपंथाची दीक्षा मिळाली होती. संभाजी महाराज दीर्घायुषी होते. इ स  १८७३ मध्ये त्यांनी देहत्याग केला तेव्हा त्यांचे वय १०० पेक्षा जास्त असावे असे म्हणतात. रावजी आणि गीतामाई त्यांना साधारण १८४२च्या सुमारास दर्शनास गेले तेव्हा संभाजी नाथ महाराजांचे वय ७० होते.
२)  श्रीस्वामी शांताश्रम 


  श्रीशांताश्रमस्वामी हे सांगलीजवळच्या कवठे या गावच्या जोशी कुटुंबातले. त्यांनी अगदी लहानपणीच घर सोडले, आणि काशीस जाऊन संन्यास घेतला. पुढे ते तेथील तारकमठाचे अधिपति होते. तेथे असतानाच श्रीगोंदवलेकर महाराजांचा व त्यांचा परिचय झाला. त्या काळातच श्रींनी त्यांना सांगून ठेवले होते की,  'मी पुढे कराड येथे श्रीराममंदिर स्थापन करणार आहे. मी देहत्याग केल्यानंतर आपण तेथे वास्तव्य करावे.'

         इकडे कराड येथे इ.स. १९११, रंगपंचमी या दिवशी श्रीमहाराजांनी श्रीराममंदिराची स्थापना केली, व त्यातील व्यवस्थापकाचे काम बापूराव चिवटे, श्री. रामचंद्र धोंडो देव, व काशीनाथबुवा राजमाने यांच्याकडे सोपविले. तसेंच या मंडळींना सांगून ठेवले होते की पुढे काशीतील तारकमठाचे अधिपति वास्तव्यास येथे येतील, त्यांची व्यवस्था नीट होईल असे तुम्ही पहावे.  

  


       श्रीमहाराजांनी इ.स. १९१३ मधें समाधी घेतल्यावर श्रीस्वामी शांताश्रम हे या मंदिरात बारा वर्षे, स्वतःच्या देहविसर्जनापर्यंत, वास्तव्य करून राहिले होते. त्यानंतर त्यांनीच सांगून ठेवल्यानूसार त्यांचा देह कृष्णामाईत विसर्जित केला. स्वामींना श्रीमद़्भागवत ग्रंथ मुखोद़्गत होता. भगवान् गोपालकृष्ण हे त्यांचे आराध्यदैवत होते.

संदर्भः चैतन्यराम १९९२ ही स्मरणिका पान १२२
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

या शांताश्रम स्वामीबद्दल अजून एक गोष्ट श्रीमहाराजांच्या चरित्रात आली आहे ती अशी  कि श्रीमहाराज आपल्या मातोश्रींना घेऊन काशीयात्रेस गेले होते तेव्हाचा प्रसंग:

एकदा काशीमधील मोठे तपस्वी शांताश्रमस्वामी यांचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याशी पुढील संभाषण झाले.

स्वामी : महाराज, इतके लोक काशीत गंगास्नान करूनही पावन का होत नाहीत ?

गोंदवलेकर महाराज : कारण त्यांच्यामध्ये खरा भाव नाही !

स्वामी (उत्तर न पटल्याने) : त्यांच्यात खरा भाव असल्याविना ते कसे येतील ?

गोंदवलेकर महाराज : ते लवकरच दाखवीन. नंतर चार दिवसांनी गोंदवलेकर महाराजांनी शांताश्रमस्वामींच्या हातापायांना चिंध्या गुंडाळून त्यांना महारोग्याचे रूप दिले आणि जेथे पुष्कळ लोक गंगास्नानासाठी उतरत, तेथे त्यांना नेऊन बसवले. महाराज स्वतः बैराग्याचा वेश धारण करून त्यांच्या शेजारी उभे राहिले. काही वेळाने बरीच मंडळी जमली. बैरागी उपस्थितांना म्हणाला, लोकहो, ऐका ! हा महारोगी माझा भाऊ आहे. गेल्या वर्षी आम्ही दोघांनी विश्‍वेश्‍वराची अत्यंत मनापासून सेवा केली. तेव्हा त्याने प्रसन्न होऊन भावाला वर दिला, या गंगेमध्ये स्नान केल्यावर आपले पाप नाहीसे होऊन आपण शुद्ध झालो, असा भाव असलेल्या यात्रेकरूने तुला एकदा आलिंगन दिले, तर तुझा रोग नाहीसा होईल. येथे आपण इतके जण आहात, कोणीतरी माझ्या भावावर एवढा उपकार करावा ! बैराग्याचे बोलणे ऐकून गर्दीतील ८-१० लोक पुढे सरसावले. त्या क्षणी बैरागी त्या लोकांना थांबवून म्हणाला, क्षणभर थांबा ! विश्‍वेश्‍वराने पुढे असेही सांगितले आहे, जो यात्रेकरू याला आलिंगन देईल, त्याला तो रोग लागेल; पण त्याने पुन्हा गंगेत स्नान केल्यावर त्याचा भाव शुद्ध असल्यामुळे तो रोगमुक्त होईल. असे सांगितल्यावर सर्व जण निघून गेले; मात्र तेथील एका तरुण शेतकर्‍याने अधिक विचार न करता मोठ्या निष्ठेने शांताश्रमस्वामींना आलिंगन दिले. त्यानंतर लगेच गोंदवलेकर महाराजांनी स्वतःहून शेतकर्‍याला आलिंगन दिले आणि ते उद्गारले, बाळ, तुझी काशीयात्रा खरी फळाला आली. तुझ्या जन्माचे कल्याण झाले, असे निश्‍चित समज ! शांताश्रमस्वामींना या सगळ्या प्रसंगाचा अर्थ आपोआपच कळला !

संदर्भ : पू. बेलसरेलिखित श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाड्मय

३) श्री स्वामी समर्थ - आपले महाराज गुरुशोधार्थ ८व्या वर्षी गृहत्याग करून बाहेर पडले. तेव्हा अण्णाबुवा मिरज, सटाणा येथील देव मामलेदार, नंतर अक्कलकोटी स्वामी समर्थांकडे आले. स्वामींनी त्यांना प्रेमाने मांडीवर बसवले आणि पुढ्यातील ताटात ठेवलेले डाळिंबाचे दाणे प्रसाद म्हणून देऊन, तुझे काम माझ्याकडे नाही असे सांगीतले. हे आपण चरित्रात वाचले आहेच. पण या गोष्टीचा ओझरता उल्लेख एका वेबसाईटवर सापडला तो असा. त्यावरून आपल्या महाराजांची आणि स्वामींची भेट १८५८- ५९ मध्ये झाली असावी.  

मोरेश्वर रघुनाथ जोशी तथा
श्री मयुरानंद सरस्वती

सुमारे दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट. अक्कलकोट येथे साक्षात्‍ परब्रह्म श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी, गणपती आणि मोरेश्वर या नावाचे दोन जिद्दीचे जिज्ञासू तरुण एकाच वेळी परंतु दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होते. पैकी गणपती होता. सातारा जिल्ह्यातील गोंदवल्याचा आणि मोरेश्वर होता ठाणे जिल्ह्यातील नालासोपारा उमराळ्याचा. श्री स्वामी समर्थांनी दोघांवरही कृपामृताचा वर्षाव केला. पुढे गणपती झाला. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज झाला तर मोरेश्वर ब्रह्मस्वरुप श्री मयुरानंद सरस्वती ! त्यांचीच ही चरित्रगाथा...

मोरेश्वर जोशी आणि गणपती घुगरदरे
श्री स्वामी समर्थ म्हणाले, `तुला घरी दर्शन दिल्यावर, इतका त्रास घेऊन पुन्हा इथे कशाला आलास ? ताबडतोब निघ, तुझी पत्नी देवाजवळ अन्नपाणी वर्ज्य करुन बसली आहे. तू गेल्याशिवाय ती काही खाणार नाही... तू लवकर निघ...'
हे ऐकल्यावर मोरेश्वरांची स्थिती शिल्प कोसळल्यासारखी झाली. ज्या परब्रह्माचे दर्शन झाले, त्याची सेवा करण्याचे भाग्य आपल्या नशीबी नाही. इतका खडतर प्रवास करुन आल्यावर स्वामींच्या सहवासात काही काळ घालवावा अशी त्यांची इच्छा होती. परंतू स्वामींच्या वक्तव्याने ते व्यथित झाले. मोरेश्वरांच्या मनीची अवस्था स्वामींनी ओळखली आणि एक स्वानंदेश मयुरेशाची एक मूर्ती मोरेश्वरांच्या हातात प्रसाद म्हणून ठेवून, `याची सेवा कर' असे त्यांना सांगितले. लगेच एक पितळी पादुकाही त्यांना दिल्या आणि मोठया दगडावर कोरलेल्या पादुका देऊन सांगितले. `तू मेल्यावर, या तुझ्या डोक्यावर ठेवण्यास सांग. राम मंदिराची स्थापना कर. तुझ्या वंशांत सात पिढ्या कीर्तन परंपरा चालेल. आमची ध्वजा उभी कर. जा सोपार्‍याला पुन्हा. माझे दर्शन तुला निर्मळच्या यात्रेत होईल.'
तेवढ्यात समोर आलेल्या एका १२-१३ वर्षाच्या मुलास श्री स्वामी मांडीवर घेऊन बसले. त्या मुलाचे नांव `गणपती.' ही गोष्ट १८५८-५९ सालची असावी. हाच मुलगा पुढे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणून प्रसिध्द झाला. म्हणजे गोंदवलेकर महाराज आणि मोरे-श्वर तथा मयुरानंद सरस्वती यांची भेट एकाच दिवशी अक्कलकोट येथे झाली होती, हे यावरुन सिध्द होते.
याच मयुरेश्वर स्वामींच्या ओवीबद्ध चरित्रात ही असा उल्लेख आढळतो.

याच वेळी स्वामींचे मांडीवर । होता एक युवक । जाणे येहेळ गांवास । गुरु तुझे तुकामाई ॥५०॥
गणपती नामक युवक । तेच पुढे जाहले ख्यात । श्रीरामकृपेने युक्त । श्री महाराज गोंदवलेकर ॥५१॥।
मोरेश्वर झाले मयुरानंद । स्वामी प्रसाद मयुरेश । गणपती, मोरेश्वर मयुरेश । कृपेश स्वामी समर्थ ॥५२॥
इसवीसन अठराशे अठ्ठावनांत । हे घडले प्रत्यक्ष । तेव्हा गोंदवलेकर महाराज । होते बारा तेरा वर्षांचे ॥५३॥
संदर्भ : वेबसाईट

जय श्रीराम!
~ श्रीमहाराजकन्या

 मानस - पुण्यतिथी गुलालाचा दिवस ई.स.१९२४

श्रीराम समर्थ

तत्पूर्वी पुण्यतिथी उत्सवात सेवा  देणाऱ्या आणखी काही सेवेकऱ्यांची आठवण काढूया!
जालना मठाचे सेवेकरी श्रींच्या चांदीच्या पादुका आणि फोटो उचलण्याची सेवा करतात.
आटपाडी आणि पंढरपूर मठातील मंडळी भालदार, चोपदार ललकरण्याची सेवा घेतात. अब्दागिर्या धरण्याचे कामही त्यांचेच. मोरगिरी आणि सोलापूर मठातील मंडळींकडे श्रींच्या पालखीवर छत्र धरण्याची सेवा आहे. चामरे ढाळण्याचे काम विटेकर भंडारे करत आहेत. बेलधडीकर आणि  गिरवीकर मंडळी चवऱ्या म्हणजे हातपंखाने वारा घालण्याची सेवा आहे. तसेच म्हासूर्णे आणि कुरवलिकर मंडळी ही हे काम करतात. छत्र धरण्याची सेवा कऱ्हाड मठाचे मठपती करतात. हर्दा आणि शेंदूरजण आणि मांडवेकर मंडळी दिवट्या पाजळण्याची सेवा करतात. समाधी सजवण्याची सेवा भीमराव मोडक करत असतात. म्हासूर्णेकर शास्त्री पुराण वाचन आणि कीर्तन सेवा करतात तर हरिदास सांगलीकर लळीत वाचन करतात. फडणवीस सांगलीकर आरती धरतात , तर शाळिग्राम गुरुजी तबक, व्यंजन सेवा... श्रींच्या पालखीपुढे घोडा धरण्याची सेवा आटपाडीकर देशपांडे करतात. दहीवडीचे माळी हे भक्त पालखी खांद्यावर घेण्याची सेवा करतात. हुबळीचे मठपती गरुडाचे चित्र काढलेला ध्वज हाती धरतात.
प्रसाद झाल्यावर उष्टे काढून गोमयाने सारवण्याची सेवा गोंदवल्याचे बारसवडे करत असत. दत्तोपंत इंदोरकर ही गोशाळेकडे असत.
कीर्तनसमयी बुक्का लावण्याची आणि खिरापत वाटण्याची सेवा अंताजीपंत दाढे यांच्याकडे होती.
पुणेकर यांच्याकडे अत्तरगुलाब, तांबुलोपचार आणि पुष्पहारांची सेवा होती.
***


आज मार्गशीर्ष कृ दशमी! उत्सवाचा शेवटचा दिवस!
भल्या पहाटे समाधी परिसरात सर्वत्र सडा संमार्जन करून स्त्रियांनी रांगोळ्या काढल्या आहेत.
हळूहळू मंडळी उत्सव मंडपात जमा होऊ लागतात. प्रथम सनई वादनाने सुरुवात होते.
काकड आरतीचा कार्यक्रम नेहमीपेक्षा लवकर उरकला जातो. आज सर्वांची मने हळवी झालेली आहेत. एक अनामिक हुरहूर सर्वांच्याच मनात दाटून आली आहे.
नंतर साडेपाच वाजेपर्यंत सुरेल स्वरात संथपणे ' रघुपती राघव राजाराम | पतीत पावन सीताराम ' हे भजन एक चित्ताने सामुदायिकरित्या म्हंटले  जाते! त्या आवाजाला ही एक करुण ... आतून तुटल्याची धार आहे.
श्रींच्या पुण्यस्मरणाचा क्षण जवळ येतोय. सर्व मंडळी अधिकाधिक एकाग्रचित्त होत आहेत.
गुरुगृही अहोरात्र पडेल ती सेवा करून, नामाचे अनुसंधान टिकवल्याने प्रत्येकाचे मन श्रींच्या सानिध्यात स्थिर झालेले आहे.
गुलालापूर्वी , २०-२५ मिनिटे तेव्हाचे पंच श्री हरिपंत हरिदास यांचे श्रींच्या कार्याविषयी तळमळीने मार्गदर्शन होते आहे.
श्रीमहाराजांना जे म्हणायचे होते ते त्यांच्या मुखातून सांगतात अशी सर्वांची भावना असल्याने सर्व मंडळी जीवाचे कान करून ते ऐकत आहेत.
हरिपंत सांगू लागतात, ' माणगंगातीरावरील निर्झरांनी वेढलेले गोंदवले हे छोटेसे गाव. इथे मूर्तिमंत दारिद्र्याने उद्विग्न झालेल्या , प्रापंचिक काळजीने काळवंडलेल्या , व्याकूळ झालेल्या असंख्य भाबड्या जीवांना मायेच्या ममतेने धीर देणारा हा महात्मा अठराव्या शतकात जन्माला आला. जणू ब्रम्ह हेच चैतन्यमय होऊन भूतलावर अवतरले. अखंड नामस्मरण , आणि जोडीला सदाचार, नामस्मरण, सगुणोपासना, सर्वांबद्दल प्रेमभाव हे लोकांच्या मनात बिंबवले आणि स्वतः तसे वागूनही दाखवले. कित्येकांना सन्मार्गाला लावले, असंख्य जीवांचा उद्धार त्यांनी केला आणि अजूनही करत आहेत.
 अन्नदान ही गोंदवलेची संस्कृती आहे आणि रामनाम हा गोंदवल्याचा धर्म आहे.
खरे सुख आणि आनंद शाश्वतापाशीच आहे, भगवदप्राप्ती हेच जीवनाचे साध्य समजावे आणि त्याच्या अखंड स्मरणाने तद्रुप व्हावे हेच श्रीमहाराजांचे कळकळीने सांगणे. अखंड नामस्मरणात राहून समाधानाचा, त्या सत- चित- आनंदाचा म्हणजे ईश्वराचा लाभ करून घ्यावा ही गोष्ट पटवून देण्यासाठी त्यांनी आपला देह झिजवला, आपले सारे जीवन खर्च केले... प्रसंगी निंदा,अवहेलना, उपेक्षा, अपमान, छळ ही सोसला.
हे सांगताना हरिपंतांचां गळा भरून आला होता.
उपस्थित जनांना ही महाराजांनी सोसलेला त्रास आठवून गलबलून आले होते.
हरिपंत पुढे म्हणतात, "प्रत्येकाला भगवदनिष्ठेचे म्हणजे नामाचे महत्व कळले पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता. मग तो कट्टर सनातनी असो, की सुधारक! अट्टल गुन्हेगार असो की पापभिरू.. सर्वांशी महाराज प्रेमाने वागले. व्यसनी, अत्यंत पापी व्यक्तींचांही त्यांनी अव्हेर केला नाही. गोंदवल्यास कितीतरी गरीब कुटुंबे त्यांच्यावर अवलंबून होती.. तरी मी त्यांचा पोशिंदा आहे ही भावना त्यांना कधी शिवली नाही.
अखेरच्या काळात श्री महाराजांनी पू. भाऊसाहेबांपाशी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली, " भाऊसाहेब, माझ्याकडे येणाऱ्या सर्वांनाच देव हवाय पण प्रपंचासाठी देव हवाय हो, देवासाठी देव मागणारा कस्तुरीचा चाहता विरळाच. सर्व हिंग जिऱ्याचेच गिऱ्हाईक..." काय वेदना होत असतील महाराजांना हे शल्य बोलून दाखवताना!
शेवटी गदगदलेल्या स्वरात हरिपंत म्हणतात, श्रींनी शेवटच्या रामनवमीच्या उत्सवाला प्रत्येकाने गोंदवल्याला यावे यासाठी खलिते, पत्र, निरोप पाठवले होते. सर्वांना एकच वाक्य कळवले होते, की "  मी आता खूप काळासाठी नैमिष्यारण्यात जाणार आहे, तुम्हा सगळ्यांना जाण्याआधी मी एकदा डोळे भरून पाहू इच्छितो "
नीट बघा, आजही त्या समाधीमधून त्यांचे डोळे तुम्हा आम्हा प्रत्येकाला अगदी डोळे भरून पाहत आहेत. ज्याप्रमाणे एखादा बाप सासुरवाडीहून प्रथमच माहेरी आलेल्या आपल्या लेकीच्या डोळ्यात समाधान बघतो, तसे श्रीमहाराज नामाने आपल्या हृदयात फुललेले समाधान बघत आहेत.
"आपल्यामध्ये दडलेल्या श्री ब्रम्हानंद बुवांचा ते शोध घेत आहेत.. हा माझा बुवा होऊ शकेल का? तो होऊ शकेल का असे शोधत आहेत. "
हे सांगताना हरिपंतांचा आवाज कातर झाला.. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात.
श्रीमहाराज मागे म्हणाले ना, तुम्ही इतके कष्ट घेऊन इथे येता, ( तेव्हा गोंदवलेस दळणवळणाची साधने जास्त नव्हती) .. इथे मनापासून सेवा करता, इथून काहीतरी घेऊन जावं ही माझी इच्छा आहे."
" त्याप्रमाणे आजपासून आपण सर्वांनी निश्चय करावा की त्यांच्या " सदाचरण, पवित्र अंत:करण आणि नामस्मरण" या तत्त्वाचे मी मनापासून अनुसरण करीन.
श्रींच्या वचनाप्रमाणे नामाचे प्रेम आपण इथून सर्वांनी घेऊन जायचे आहे. "
उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांना धारा लागल्या आहेत.
"पाच वाजून बावन्न मिनिटे झालेली आहेत.
आता आपण तीन मिनिटे सद्गुरुंचे स्मरण करूया!"  असे बोलून हरिपंत खाली बसतात.  

संपूर्ण भक्तपरिवार अंतर्मुख होउन मौनात अन् गंभीर शांततेत श्रींचे स्मरण करतो. टाचणी पडली तरी आवाज जाईल इतकी शांतता पसरलेली असते. त्या तीन मिनिटात श्रींच्या समाधीजवळ गाभाऱ्यात पू पांडुरंग बुवा , पू प्रल्हाद बुवा ही मंडळी एका सुरात, "श्रीराम, श्रीराम श्रीराम!" असे संथपणे एका लयीत म्हणत असतात. तो आवाज बाहेरही ऐकू येत असतो.. आणि बाहेरील शांत वातावरणात समाधीच्या दिशेकडून वाऱ्यावरून लहरी याव्यात तसे श्रीराम श्रीराम.. ऐकू येत असते, त्यामुळे सर्वांना आपण समाधीजवळच आहोत असा प्रत्यय येतो आहे. समस्त देविदेवता आणि कालवश झालेले पुण्यात्मे आज हजर आहेत. हो हो , ब्रम्हानंदबुवा सुद्धा श्रींच्या समाधीच्या मागे असलेल्या फोटोजवळ उभे राहून  डबडबलेल्या डोळ्यांनी हा अनुपम सोहळा पाहत आहेत.
ते पवित्र क्षण येतात, आणि बरोबर ५ वाजून ५५ मिनिटांनी सर्व भक्तमंडळी एकत्रित  भावोत्कटतेने "श्रीराम... श्रीराम "म्हणत समाधीच्या दिशेने गुलाल म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या उधळतात.
|| जेथे नाम तेथे माझे प्राण | ही सांभाळावी खुण || असा धीरगंभीर आवाज समाधीमधून उर्ध्व दिशेला कळसाकडे आसमंतात विरत जातो.

आणि...  इकडे समाधीच्या मागे कोपऱ्यात उभे असलेले पू ब्रम्हानंद बुवा हळूच डोळे टिपतात!

**
||जानकी जीवन स्मरण जय जय राम ||
 इत्यलम🙏

~ महाराज कन्या
टीप: सदर लेखातील प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत.. फक्त संदर्भासाठी म्हणून चैतन्य स्मरण विशेषांक, सद्गुरूलीलामृत ग्रंथ आणि पू. बाबा बेलसरे लिखित श्रीमहाराज चरित्र यांचा आधार घेण्यात आला आहे.
काही वावगे/ चुकीचे वाटल्यास मनापासून माफी मागते! 🙏🙏
कर्ता करविता श्रीमहाराजच! प्रेरणा स्रोत तेच, लिहून घेणारे तेच आणि संदर्भ ग्रंथ समोर आणणारे तेच! 🙏

आजवर झालेली लेखनसेवा श्रीमहाराज चरणी अर्पण!🙏
श्रीमहाराजचरणाअर्पणमस्तू 🙏🙏

 मानस- कोठीपूजन गोंदवले - ई. स.१९२४

जय श्रीराम!  

उद्या कोठीपूजन ! आदल्या दिवशी अनेक जण मुक्कामी आलेले आहेत. मंदिराचे आवार गर्दीने फुलून गेलेले आहे. निरनिराळ्या गावांहून भजनी दिंड्या आधीच येऊन पोहचल्या आहेत. आधीच पत्रव्यवहार करून त्यांनी दिवस ठरवून घेतले आहे. विशेष म्हणजे काहीही मोबदला न घेता निव्वळ श्रींची सेवा या भावनेने हे लोक आलेले आहेत. 

कोठीघरात स्त्रियांनी हरिपाठ म्हणत भाज्या निवडणे, धान्य निवडणे, दळणे वैगेरे आधीच करून ठेवलेले आहे. (सांगायची गोष्ट म्हणजे, एका वर्षी उत्सवासाठी २० किलो विलायची दळली गेली होती. यावरून श्रींचा आवाका लक्षात येईल.)
रात्री कंदील, चिमण्या, पिवळे बल्ब लावून कोठिघरात सेवेकरी स्त्रियांनी भांड्याच्या आरास रचल्या आहेत.. फुलांच्या, धान्याच्याही रांगोळ्या काढल्या आहेत. बाहेर मांडवात, समाधी स्थळ, गोशाळा, वैगेरे सगळ्या ठिकाणी रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत. यात पुढाकार भाऊसाहेब केतकर, अण्णासाहेब मनोहर, सदाशिवराव धामणकर या मंडळींचा आहे. 

 

कोठीपुजनसाठी कोठीतील असेल नसेल त्या धान्याची पोती बांधली गेली आहेत. त्यांच्याभोवती रांगोळ्या काढून कोठी सजली आहे. ब्रम्हानंद बुवांच्या फोटोसमोर सुंदर फुलांची रांगोळी काढली गेली आहे. भोवती सगळ्या आरास रचल्या आहेत. भाज्या , फळे यांची आकर्षक सजावट केली गेली आहे. गोशाळेतही स्वच्छ सारवून प्रत्येक गायीपुढे रांगोळ्या काढत आहेत. गायींना पाठीवर रंगीबेरंगी झुल पांघरली गेली आहे.
श्री विश्वनाथ बुवा आणि श्री बसप्पा यांचा याबाबतीत पुढाकार आहे... गोमातांची कसून सेवा ते करत आहेत.
श्री मनोहर आंबेगावकरांनी श्रींच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुले आणण्याची जबाबदारी घेतली आहे. केळीच्या खांबानी समाधी मंदिर, गोशाळा, आईसाहेब मंदिर, कोठिघर, स्वयंपाकघर यांच्या प्रवेशद्वार सजवले गेले आहेत. आंब्याच्या पानांची तोरणे बांधली गेली आहेत.

प्रत्यक्ष कोठीपुजनचां दिवस उजाडला.
पहाटे साडेतीनला उठून सेवेकरी संपूर्ण उत्सव मंडप,  भोजनमंडप , मंदिराचे आवारात सडासंमार्जन , रांगोळ्या काढतात.
पहाटे ४ वाजता पहिली घंटा होते.  अतिशय मंगलमय वातावरणात सनईचे सुर कानी पडतात.  गरम पाण्याची व्यवस्था नुकतीच सुरु झाली आहे. श्री भवानरावांनी लाकडे फोडून पुरेसा साठा जमवलेला आहेच. बाहेर चुली मांडून मोठाली पितळेची पातेली , मोठी चिंचोळ्या तोंडाची तांब्याची  भांडी ठेऊन पाणी तापवणे सुरु आहे. गरम पाणी काढून घेण्यासाठी मोठी गडवी आहेत. आपापली लोखंडी/प्लास्टिक बादली गार पाणी भरून तिथे घेऊन जायची. जवळच असलेल्या हौदातून गार पाण्याची बादली आणून ठेवायची. तिथले सेवेकरी आपल्याला गरमागरम पाणी आपल्या बादलीत ओतून देतात. ते झाले की बादलीभर गार पाणी आपण पातेल्यात ओतुन त्यात भर घालायची, असा नियम. बळवंतराव आटपाडीकर, नानासाहेब देशपांडे [वाई], शंकरराव जोशी [सोलापूर], बापूराव गिरजे, ही मंडळी ही व्यवस्था पहात आहेत. . ते पहाटे तीन वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत सतत हे काम करीत असतात . बळवंतराव यांचा इतका धाक होता कीं, स्वतः पंचसुद्धां गरम पाणी घेतल्यावर स्वतः भर घालीत. पंच म्हणून अधिकार दाखविण्याची पद्धतच नसे. त्यांतच जें प्रेम होतें तें अवर्णनीय आहे.

जालनेकर, कुरवलीकर, आटपाडीकर, गिरवीकर, मांडवेकर , सांगलीकर सगळी भक्तमंडळी लगबगीने स्नान करून ठेवणीतले कपडे घालून उत्सव मंडपात काकड आरतीसाठी जमा होतात. मंदिरात श्रींच्या समाधीला अम्मांनी विणलेले अतिशय सुंदर वस्त्र घातले गेले आहे. ते बघून समाधी मंदिरात कोपऱ्यात उभ्या असलेल्या टी रंगमा बालसुब्रह्मण्यम शेट्टी उर्फ अम्मा हळूच डोळे टिपतात. समाधीवर आणि समाधीमागच्या श्रींच्या फोटोला सुंदर तुळशीचे हार घातले गेले आहेत.  मंदिरात श्रींचे स्तवनरूप गायनसेवा सुरु झालेली आहे. कार्यक्रमाचे अगोदर, पाच मिनिटे "रघुपति राघव राजाराम ... " असा जयघोष होतो. बरोबर पावणेपाच ला दुसरी घंटा होते. संथ आवाजात भूपाळ्या सुरु होतात. संपूर्ण वातावरण एकदम भारावल्यासारखे होते. मंडळी एकाग्रचित्ताने समरसून भूपाळ्या, काकड आरती म्हणत आहेत. भावपूर्ण स्वरात काकड आरती, पंचपदी पार पडते. लोणी साखर प्रसाद दिला जातो.  श्रीमहाराजांचे पंच म्हणून श्री बापूसाहेब साठ्ये यांच्याकडे सर्व धार्मिक कार्यक्रमांची जबाबदारी असायची, मग ती पूजा असो, कि पुण्याहवाचन असो कि, पंगतीत उदक सोडणे असो की लघुरुद्राभिषेक.यजमान म्हणून श्री बापूसाहेब ती जबाबदारी पार पाडायचे. पण पुण्यतिथी उत्सवात समाधीच्या पूजा श्री भीमराव मोडक [इंदुर] व श्री गोविंदराव गाडगीळ यांचेकडे आहे. नित्याची पूजा , पंचपदी पार पडल्यावर श्रींच्या समाधीपुढे संकल्पाचे श्रीफळ ठेवून अखंड माळ व भजनी पहाऱ्यास सुरुवात होते. हा पहारा अखंड दहा दिवस सुरु राहून दशमीच्या दिवशी दुपारी महानैवेद्य झाल्यावर पूर्ण होत असतो. भजनी पहाऱ्यासाठी श्रीकृष्णाच्या दोन्ही बाजूला दोन दोन पाट ठेवून दोन दोन भक्तमंडळी उभे रहातात. आणि टाळ वाजवत, एका बाजूकडच्या मंडळींनी 'रघुपती राघव... म्हणायचे. व दुसऱ्या वेळी दुसऱ्या बाजूकडच्या मंडळींनी हेच भजन म्हणायचे अशी पद्धत आहे. मंदिराचे संपूर्ण आवार या भजनांनी दुमदुमून जाते. भजनाचे प्रमुख म्हणून दामोदरबुवा कुरवलीकर, श्रीपांडुरंगबुवा जालनेकर, नानाचार्य, बाबा मेरेकर, प्रल्हादबुवा, हे आहेत. मंडपातील कीर्तनाची व्यवस्था अंताजीपंत दाढे, वासुदेवराव फडके व पुणेकर मंडळीकडे आहे.  

काकडआरती कार्यक्रम उत्सव मंडपात सुरु झाला की मंदिरातील सभामंडपात निरनिराळ्या ठिकाणाहून आमंत्रित अश्या वैदिक मंडळींकडून श्रींच्या पादुकांवर लघुरुद्राभिषेक सुरु होतो. तो झाला कि आरती होते.

इकडे पंचपदी झाल्यावर मंडळी कोठीघरात पु. ब्रम्हानंद महाराजांच्या फोटोसमोर जमतात. उत्सवात कोठीवर महादेवभटजी हरदेकर, गणूकाका साने हे प्रामुख्याने आहेत.  प्रथम सनईवादन अन नंतर मंत्रघोषात कोठीपूजनास सुरुवात होते. व्यवस्थापक श्री गणपतराव दामले सपत्नीक पूजेला बसलेले आहेत. पु. ब्रम्हानंद बुवा यांनी सांगितल्यानुसार त्यांनी दिलेल्या अक्षय पिशवीची व त्यातील तीन चांदीच्या प्रथम नाण्यांची पूजा होतेय . ब्रम्हानंद महाराज प्रत्यक्ष हजर असून, कितीही लोक आले तरी कोठीतील साहित्य कमी पडू देणार नाही अशी सर्वांची श्रद्धा आहे, नव्हे नव्हे... तसे आश्वासनच दिले आहे पु. बुवांनी! अक्षय पिशवीबरोबरच श्रीमहाराजांच्या पालखीतील चांदीच्या पादुकांची, पु. बुवांच्या फोटोची पण यथासांग पूजा होतेय.  नंतर कोठीघराची धान्य, स्वयंपाकघरातील भांडी, चुली यांची हळद कुंकू फुले वाहून पूजा होतेय. मंडळी आता अग्निपुजेसाठी तयार होतात. त्या काळातल्या मोठ्या चुलीची पूजा करून त्यात मंत्रोच्चारासहित अग्नी घालण्यात येतो. उत्सवास सुरुवात झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. आणि हे आता उत्सव संपेपर्यंत टिकणार आहे. कितीही कष्ट पडले तरी कोणी दमणार नाही, भूक तहान याचीही कोणाला जाणीव होणार नाहीये. नंतर मंडळी गोशाळेत जाऊन गायींची पूजा करतात. गायींना गोग्रास दिला जातोय. झाली! आता उत्सवाच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली.

इकडे एकीकडे श्रींच्या दर्शनासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या मंडळींची रांग लागली आहे. सकाळी साडेनऊ वाजता श्रींच्या पादुकांवर अभिषेक होतोय. त्याचबरोबर  नेण्याच्या पादुकांची ही पूजा होतेय. ही महापूजा यथासांग झाल्यावर श्रींच्या पादुका आणि फोटो मोठ्या सन्मानाने पाना-फुलांनी, तोरणांनी सजवलेल्या पालखीत ठेवली आहे. " श्रीराम जय राम , जय जय राम " म्हणत पालखी उचलली जाते आणि त्या गजरात नगरप्रदक्षिणेसाठी निघते. .,
रोज १० दिवस श्रीमहाराज असे सकाळ संध्याकाळ नगरप्रदक्षिणेसाठी निघतात. श्रीमहाराज देहात असतांना पु. ब्रम्हानंद बुवांनी कर्नाटकात श्रींची अशी भव्य मिरवणूक काढली होती. भर वैशाखात दिवसाढवळ्या मशाली लावल्या होत्या. याची आठवण होते. हेतू हा कि दिवसाढवळ्या मशाली का लावल्या आहेत हे पाहायला लोक बाहेर येतील आणि आपल्या सद्गुरूंची ... श्रीमहाराजांची एक नजर त्यांच्यावर पडावी ...कृपादृष्टी पडावी. आणि श्रींची एकदा एखाद्यावर नजर पडली कि ... घरातल्या एकाला महाराजांनी धरले कि अख्ख्या घराला धरतात हे माहित आहे ना?  अगदी याच हेतूने १० दिवस अशी मिरवणूक निघते. गावातल्या प्रत्येक मंदिरात दर्शन घेऊन आरती होते.  त्या काळचे गावाचे रस्ते कच्चे... धूळ फुफाटयाचे. परंतु सेवेकर्यांनी पालखी मार्ग आधीच दगडे, काटे उचलून साफसूफ करून ठेवला आहे. त्यावर सडे घातल्याने त्यासाठी  मार्ग अधिकाधिक सुकर करण्यात आला आहे. गावातीले तरुण मंडळी, पालखीचे सेवेकरी एकापाठोपाठ एकेक पाट ठेवत आहेत, त्यावरून पालखी खांद्यावर घेतलेले लोक संथपणे जयघोषात चालत आहेत. फार सुंदर दृश्य आहे हे!
 
पालखीच्या पुढे मागे चालणारे लोक भजने गात आहेत... कोणी वारकरी फुगडी खेळत आहेत. फार भारावलेले वातावरण. सगळीकडे एकच टाळ चिपळ्यांचा गजर, रघुपति राघव राजाराम, कधी जय जय श्रीराम चा गजर होतोय.   पालखीच्या अगदी पुढे  भालदार, चोपदार, श्रींना काही लोक पंख्याची हवा घालत आहेत... काही स्त्रिया पदराने श्रींना हवा घालत आहेत.  घरोघरी  स्त्रियांनी अंगणात सडे टाकून रांगोळ्या काढलेल्या आहेत.  सगळा साज शृंगार करून स्त्रिया औक्षणाचे ताट घेऊन, मुलाबाळांसहित अंगणात येऊन तयार आहेत. श्रींच्या पालखीच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच  आहे. प्रत्येकाच्या घरी श्रींचे औक्षण होते. दाणे गुळाचा प्रसाद सर्वाना मिळतो आहे. थोरले राम मंदिरात येऊन पालखी थोडी विसावते. 

 

 थोरले राम, लक्ष्मण, आणि सीतामाईना आज सुंदर पोशाख चढवला गेला आहे. नाजूक जिवणी, केशरी रंगाची जरतारी सोनेरी तारेने कलाकुसर केलेली नऊवारी पैठणी, नाकात मोत्याची नथ, सवाष्णीचा सगळा साज ल्यालेली अशी सीतामाई, आणि त्याच रंगाची वस्त्र नेसलेले, मोत्याचे दागिने घातलेले मंद मंद हास्य परिधान केलेले श्रीराम लक्ष्मण शोभून दिसत आहेत. आज श्रीरामाच्या चेहर्यावर वेगळेच तेज चढले आहे. भजने होऊन श्रींची आरती तिथे होते. पुन्हा पालखीचे मिरवणुकीने प्रस्थान होऊन सरते शेवटी पालखी पुनश्च समाधी मंदिरात येते. समाधी मंदिराला बाहेरून १३ प्रदक्षिणा घातल्या जात आहेत. प्रत्येक प्रदक्षिणेला वेगळी आरती होतेय. पालखी प्रदक्षिणा बरोबरच अनेक लोक, सेवेकरी पालखीच्या मागे प्रदक्षिणा म्हणत आरती म्हणत आहेत. फार सुंदर दृश्य आहे हे. हि पद्धत सज्जनगडावर जशी होते तशीच इथे होते आहे.
 नंतर पालखी समाधी मंदिरात येऊन पादुका समाधी मंदिरात आत समाधीजवळ नेण्यात येतात. एव्हाना १२ वाजलेले असतात. नैवेद्य तयार असतो. स्वयंपाकघरात सर्व देवांचे नैवेद्य तयार आहेत. श्रीसमाधी, श्रीगोपालकृष्ण, श्रीआईसाहेब, श्रीब्रम्हानंद (कोठी), थोरले राम, धाकटे राम, दत्तमंदिर, विठ्ठलमंदिर, गोमाता इत्यादी नैवेद्य वाढले जातात. गावातील देवांना नैवेद्य दाखवण्यास ते ते पुजारी घेऊन जातात. . " जेवी जेवी बा गुरुराया... " श्रींची नैवेद्यारती होते.
श्रींचे भोजन झाल्यावर तो प्रसाद मुख्य स्वयंपाकात कालवण्यासाठी पाठवला जातो.. एकीकडे प्रसादासाठी लोकांनी भोजनमंडपात रांगा लावलेल्या आहेत. 'जय जय श्रीराम, जय जय श्रीराम'च्या जयघोषात सोवळे नेसलेले वाढपी सेवेकरी उत्साहाने वाढत आहेत.
 

 

 

 आज काय काय आहे बरे प्रसादाला? साधा भात, मसालेभात, चटणी, कोशिंबीर, आमटी, गोड लापशी, जिलेबी. लोक तृप्त तृप्त होऊन बाहेर निघत आहेत. लोक सतत येत आहेत. पार महाराजांच्या मागच्या शेतापर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यादिवशी सायंकाळपर्यंत कित्येक पाने उठतात. हजारो लोक जेवून जातात. श्री नारायणराव कुंदापूर हे महाराजांचे निस्सीम भक्त स्वयंपाकावर लक्ष ठेवून आहेत. कितीही पान झाले तरी त्यांची स्वयंपाकाची तयारी आहे.  श्री मनोहर दुसे हे ही स्वयंपाकात मदत करत आहेत. पिण्याचे, स्वयंपाकाचे पाणी आणून देत आहेत. यशवंतबुवा हे एक निस्सीम साधक स्वयंपाकघरात स्वच्छतेचे काम करत आहेत. भल्या पहाटे उठून कंबरेला लुंगी आणि वरती उघडेच असे हे साधक खराटा घेऊन आवार साफ करत असतात. 

 

श्री विश्वनाथबुवा हे एक उच्च कोटीचे साधक तर उत्सवात १० दिवस झोपतच नाहीत दहा दिवस उपवास करीत. बुक लागली तर द्रोणात कच्चे ज्वारीचे पीठ खात किंवा बाजरीच्या पिठात पाणी कालवून  घेऊन उशिरा ४ वाजता जेवत. चोवीस तास त्यांचा आवारात जागता पहारा आहे.
इकडे उत्सवमंडपात तोवर दुपारचे कीर्तन सुरु होते. समाधी मंडपात सुंदराकांड पुराण वाचन श्री शंकरशास्त्री म्हासुर्णेकर, जोशीबुवा, हे करत आहेत. सायंकाळी चार वाजता श्री सखारामबुवा हैद्राबादकर यांचे आज कीर्तन आहे. रोजच्या कीर्तनकारांची यादी बनवण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्व कार्यक्रम होत आहेत. संध्याकाळी श्रींची पालखी मंदिराभोवती ३ प्रदक्षिणा घालून परत मंदिरात येते. सायंआरती होऊन प्रसाद सुरु होतो. उत्सवाचे १० दिवस शेजारती होत नाही.
अखंड माळ सुरू आहे. श्रीमहाराजांचे तत्व अखंड नामस्मरण आणि अन्नदान हे तंतोतंत पाळले जाणे यावर पंचांचा भर आहे. रोज हजारो लोक जेवून जात आहेत. ८ दिवस झपाटल्यासारखे निघून जातात. सेवेकरी अथक परिश्रम करत आहेत. हि सर्व मंडळी आत्मोद्धारासाठी अत्यंत सेवाभावाने हे कार्य पार पाडत आहेत. नवमीला असंख्य लोक येत आहेत .. पानावर पाने उठत आहेत. रात्री ११-११ वाजेपर्यंत प्रसाद सुरु आहे. वाढपी, स्वयंपाकी, पत्रावळ्या उचलणारे सेवेकरी, भांडी घासणारे सेवेकरी, नंतरची आवराआवर करणारे, परिसर स्वच्छ करणारे ...  अथकपणे सेवा करत आहेत.

...आणि आता तो दिवस उजाडतो. गुलालाचा दिवस. उत्सवाचा परमोच्च दिन. याजसाठी केला होता अट्टाहास!
क्रमशः
फोटो सौजन्य: चैतन्यस्मरण विशेषांक🙏
(टीप: लेख संपूर्णत: काल्पनिक आहे. फक्त जिथे हवे होते तिथे श्रीमहाराज चरित्रातून आणि चैतन्यस्मरण विशेषांकातून संदर्भासाठी नोंदी घेऊन त्यांची सांगड प्रसंगानुरूप घालण्यात आली आहे . काही चुकीचे वाटल्यास क्षमस्व! )
~ श्रीमहाराज कन्या


 जय श्रीराम!
गेले ३-४ दिवसांपासून श्रीमहाराज निर्वतल्यानंतरच्या ७-८ वर्षातल्या काळातला पुण्यतिथी उत्सव कसा असेल यावर चिंतन सुरू होते.. सुरवातीच्या दोन उत्सवांना पू ब्रम्हानंद बुवा होते. त्यानंतर फ्ल्यू आजाराची साथ भारतभर होती.. १९१८ ते १९२० पर्यंत!  सुरवातीच्या पुण्यतिथी उत्सवाच्या काही नोंदी वाचनात आल्या.चैतन्य स्मरणचे  जुने विशेषांक ही चाळले.
त्यांचा संदर्भ घेऊन काही प्रसंग मनात आकारास येऊ लागले. मग हे कुठेतरी लिहून ठेवावं असं वाटलं.. त्यावरून हा लेख आकारास आला अर्थात प्रेरणा श्रींचीच. 🙏🏻
तो इथे देते. लेख अर्थातच काल्पनिक आहे
. 🙏🏼🙏🏼
*************
मानस - पुण्यतिथी उत्सव १९२४
स्थळ: गोंदवले , समाधी मंदिर परिसर
काळ: साधारण १९२४च्या दिवाळीनंतरचा !

नुकतीच दिवाळी होऊन मंडळी आपापल्या गावी परत गेली आहेत. काही मोजके लोक आता गोंदवल्यामध्ये राहिले आहेत. कार्तिक महिना संपत आलाय. सर्वांना वेध लागलेत ते आता मार्गशीर्ष मध्ये  येणाऱ्या श्रीमहाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाचे. सर्वजण वाटच पाहत आहेत, पंच मंडळी कधी बैठक घेतात ते.
एका संध्याकाळी सर्व मंडळींना त्या वेळचे पंच श्री गणपतराव दामले , श्री हरिपंत हरिदास, श्री पागा फडणीस, ई मंडळी समाधी मंदिराच्या आवारात सगळ्यांना जमण्यासाठी बोलावणे पाठवतात. समस्त सेवेकरी, काही वरिष्ठ ग्रामस्थ, पंच मंडळी आवारात जमतात. श्री दामले प्रत्येकाच्या कामाची जातीने चौकशी करत आहेत.
तसेही कामाची वाटणी करण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक जण उत्साहाने सर्वच कामे करायला तत्पर आहेत.. उलट अहमहमिकेने कामे अंगावर घेत आहेत.  श्रींचा पुण्यतिथी उत्सव म्हणजे प्रत्यक्ष श्रींची सेवा ! सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलेले आहे.
 

 पंच मंडळी पंचांग घेऊन येतात आणि बोलायला सुरुवात करतात. "मंडळी, दिवाळी झाली ना, यावेळी  मार्गशीर्ष कृ. दशमी २० डिसेंबर १९२४ रोजी आपल्या श्रींची पुण्यतिथी येतेय.आपल्याला उत्सवासाठी तयारीला बरोबर एक महिना मिळतोय. सर्वात आधी गावोगावी निमंत्रणे जायला हवीत. .यावेळी बरीच माणसे येतील.  १०,००० तरी लोक येण्याचा अंदाज आहे. या दिवाळीत तुम्ही बघितले असेलच.
"श्रीयुत बळवंतराव (फाटक), आपण निमंत्रण पत्रिकेचा मसुदा बनवायला घ्यावा'!  दरवर्षीप्रमाणे, श्री.नागप्पा तुम्ही कर्नाटकात , श्री बसप्पा--श्री हिर्लेकर कोल्हापूरकडे, श्री वामनराव जोशी, आणि श्री डी.आर.जोशी मुंबईत, श्रीयुत बाबुराव गद्रे पुण्यात , श्री नानासाहेब देशपांडे वाईमध्ये ,  श्री जोशी व श्री उपाध्ये कडावकडे,  श्रीमहाराजांच्या अनुग्रहित व्यक्तींना  तसेच इतरांना घरोघर निमंत्रण पत्रिका देतील.
श्रींच्या निर्वाणानंतर, त्यांच्या आज्ञेने १२ वर्ष गोंदवल्यासारख्या ठिकाणी.. सगळी अडचण सोसून राहणारे ७७ वर्षांचे श्री भाऊसाहेब केतकर स्वतःहून म्हणतात की गोंदवले आणि आसपासची गावे गोंदवले खुर्द, बुद्रुक , पिंगळी, दहिवडी, आटपाडी मधे पत्रिका आम्ही वाटू. पंच त्यांना जशी आपली इच्छा म्हणत रुकार देतात.

 पंच पुढे समस्त सेवेकरी लोकांना म्हणतात, २० नोव्हेंबरला मार्गशीर्ष शु. प्रतिपदा आहे , तेव्हा आपण मुहूर्तमेढ करणार आहोत.  ५ डिसेंबरला वद्य प्रतिपदा. यादिवशी आपण कोठीपूजन करणार आहोत. ब्रम्हानंद बुवांनी घालून दिलेल्या शिस्तीप्रमाणे करायचे आहे.  नाहीतर त्यांचा तडाखा माहित आहे ना?

कोठीघर सांभाळणाऱ्या श्री येरळवाडीकर मास्तरांना पंच विचारतात, "मास्तर, कोठीघरात धान्य किती लागणार आहे? भांडी किती लागणार आहेत? पुरेशी आहेत ना? कर्नाटकातून ब्रम्हानंद बुवांनी पाठवलेली जाड जाड पितळेची मोठी भांडीकुंडी आहेत आपल्याकडे.  अजून काय काय भांडी लागतील. किराणा सामान वैगेरे सगळ्या याद्या करायला घ्या. तुम्ही अगदी काटकसरीने , निगुतीने सगळं सांभाळता म्हणून विश्वास आहे तुमच्यावर!
 आणि हो, मास्तर उत्सवात तुम्हाला कोठीबरोबरच नामसप्ताह आणि भजनी पहाऱ्याची पण व्यवस्था लावून द्यावी लागेल बरे का! नंतर एकदा तिकडे व्यवस्था लागली की श्री काशीनाथय्या हर्देकर, श्री हरिपंत हरीदास, श्री बाबा दांडेकर, श्री गंगाधरपंत आठवले, ही मंडळी पहाऱ्याकडे बघतील.
कीर्तनसेवेसाठी आपल्याकडे हरिपंत हरिदास आहेतच. श्री दामोदरबुवा रिसबुड, श्री दामोदरबुवा कुरवलीकर, श्री सखारामबुवा हैदराबादकर, श्री कराडकर,  श्री पिलोबा वडूजकर, श्री शंकरराव वडगावकर, श्री मणेराजुरीकर यांनाही निमंत्रणे पाठवून बोलवावे लागेल..

नंतर मद्रासी अम्माकडे वळून पंच म्हणतात,"अम्मा , तुम्ही आताच रामरायाची वस्त्रे आणि समाधीवरील वस्त्रे विणायला घ्यावी.
मुळगुंदच्या ठसकेबाज गंगुताई आठवले स्वयंपाकघर बघणाऱ्या! त्या पंचांनी काही सांगण्याच्या आधीच म्हणतात, "स्वयंपाकघराचे आम्ही बघतो. लक्ष्मीबाई, काशीबाई, आपण उद्यापासूनच  चटण्या, लोणची, पापड करायला घेऊ. सामानाची यादी उद्याच हरिपंतांकडे देतो. "

पंच समाधानाने मान डोलवत पुढे म्हणतात, 'इतके लोक येणार म्हणजे, सरपण खूप लागेल. त्यासाठी आताच सरकारकडे अर्ज करावे लागेल. वठलेल्या सरकारी झाडांचे सरपण पी. डब्लू डी खात्याकडून स्वस्त दरात मिळेल. भाऊसाहेब आपण सरकारी नोकरीत होता ना, हे सरकारी अर्जाचे काम मनावर घ्यावे!"

झालं, दुसऱ्याच दिवसापासून सगळी मंडळी उत्साहाने तयारीला लागतात.
चारच दिवसात, निमंत्रण पत्रिकेचा मसुदा तयार झालाय. तो पंचांनी मान्य करून छापण्यासाठी दिला गेलाय. अम्मांनी वस्त्रे विणायला घेतलीत. यावेळी अम्मा जरीकाठाची वस्त्रे आणि त्यावर मोत्याची नक्षी विणत आहेत. भाऊसाहेबांनी सरपणासाठी सरकारकडे अर्ज केला आहे. श्री बळवंतराव, श्री येरळवाडीकर मास्तर यांनी म्हसवडला बाजाराच्या दिवशी, जाऊन स्वयंपाकासाठी काही मोठी भांडी आणि सुमारे २५-३०००० पत्रावळ्या, द्रोण खरेदी केले आहेत. हे सगळे बैलगाडीने आणून समाधी मंदिराच्या आवारात एकूणएक मोजून दिले जात आहेत. पंच मंडळी सगळं व्यवहार काटेकोरपणे करत आहेत.
आता जसजसे दिवस जाऊ लागले सेवेकर्याच्या उत्साहाला उधाण आले आहे.
निवासी खोल्यांची डागडुजी , साफसफाई, स्वयंपाकघर भिंती, जमीन शेणाने सारवणे वैगेरे सगळी कामे रोजच्या रोज होत आहेत. गुळ दाणे तोंडात टाकत, मोठ्या नामगजरात काम सुरु आहे.  सगळीकडे नुसती धांदल उडालेली आहे. गंगुताईंनी चटण्या, लोणची पापडाचे डबे भरून ठेवलेत. अम्माचे काम पण आता होण्यात आले आहे.
आईसाहेब मंदिरासमोर मांडव घालायचे काम सुरु झाले आहे. प्रथम सारख्या अंतरावर चुन्याने आखून घेतले आणि खड्डे खोदून वासे पुरायचे काम सुरु झाले आहे. संस्थानकडे तेव्हा पगारी नोकर नसल्यामुळे सेवेकरीच हे काम मोठ्या नामगजरात करत आहेत. राजाभाऊ गोडबोले त्यांच्यावर लक्ष ठेवायला आहेतच. वासे पुरल्यावर त्यावर बांबू आडवे टाकून झाले. तेव्हा वर टाकायला कापड वैगेरे नव्हतेच. म्हणून राजाभाऊंनी आधीच विश्वनाथ कडून झाडाच्या मोठ्या फांद्या, डहाळे कापून ठेवल्या आहेत. ते वर टाकण्याचे काम सुरु होते. त्यामुळे मंडपात बसलेल्या लोकांना ऊन लागणार नाही. मधून मधून सेवेकर्यांनी गूळ, दाणे यांचे वाटप होत आहे. ते तोंडात टाकून सेवेकरी आनंदाने काम करत आहेत.अगदी हसत खेळत हि कामे सुरु आहेत. रात्रीच्या वेळी शेकोटीत शेंगा भाजून गप्पा मारत खाण्यात सेवेकर्यांना मजा येतेय.. स्वतः पंच मंडळी पण त्यांच्यात सामील होत आहेत. सेवेकरी परत दुप्पट उत्साहाने मांडव घालण्याच्या कामाला लागत आहेत.  रोज सकाळची न्याहरी नाही पण लहान मुले, त्यांच्या आया, वृद्ध मंडळींसाठी पिठले भात टाकला जात आहे. सेवेकरी आणि इतर मंडळींसाठी द्रोणामध्ये उसळ दिली जात आहे. श्री गोविंदराव गाडगीळ, श्री गोविंदराव कडवेकर, बनूताई आपटे, वगैरे मंडळी हे काम हौसेने करीत आहेत.
विशेष म्हणजे, ही सगळी कामे ' जय जय श्रीराम, जय जय श्रीराम'  च्या गजरात होत आहेत. मग ती मोठाली भांडी चुलीवरून उतरवायची असोत की वर चढून झाडाच्या फांद्या टाकायची कामे... 'जय श्रीराम' म्हटले कि मंडळींना अजून जोर चढे. सगळीकडे नुसता नामाचा गजर होत आहे.  वातावरणात नुसता उल्हास भरून राहिला आहे.
पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी पाणी विहिरीतून काढावे लागे, त्यासाठी नुकतेच रहाटगाडगे बसवून घेतले आहे. श्री मनोहर दुसे पाण्याची व्यवस्था बघत आहेत.
निमंत्रण पत्रिका घरोघर गेल्या आहेत.
श्री मनोहरपंत आंबेगावकरांनी आधीच सगळे दिवे, कंदील रोजच्या रोज घासून पुसून स्वच्छ केले आहेत. रोजच्या रोज त्यातल्या तेल, वाती तपासायचे काम निगुतीने करत आहेत.
भजनी पहाऱ्यासाठी गावोगावची नावे आली तशी यादी बनवून त्याची व्यवस्था श्री येरळवाडीकर मास्तरांनी आधीच लावून ठेवली आहे.
श्री विश्वनाथ बुवा तर सतत गोशाळा साफसफाई , गायींच्या सेवेमध्ये मग्न असतात, भूक लागली तर तिथेच बसून बाजरीचे पीठ पाण्यात कालवून खातात.
यशवंतबुवा रोज पहाटे उठून खराटा घेऊन आवार साफ करत आहेत.आवारात घाण दिसली तर स्वतः स्वच्छ करत आहेत.
 
२० नोव्हेंबर मार्गशीर्ष शु. प्रतिपदा: मोठ्या उत्साहात मुहूर्तमेढ होते. सकाळी काकड्यानंतर मंडळी आईसाहेबांच्या समाधी चौथर्याजवळ जमतात. ती जागा आधीच केळीचे खांब लावून ,रांगोळ्या काढून सुशोभित केली आहे.समोर श्रींचा मोठा फोटो ठेवला आहे त्यास सुंदर फुलांचा  हार!  पंच सपत्नीक पूजेस बसतात. पुण्याह वाचन, गणेशपूजा होऊन साग्रसंगीत मंत्रोच्चारासहित आंब्याची पाने बांधून पूजा होते आणि मुहूर्तमेढ रोवली जाते, श्रींची आरती होऊन प्रसाद वाटप होते.  मंडळी गोशाळेत येतात. तिथे गायींची पूजा होते, गायींना गोग्रास दिला जातो. अश्या रीतीने अत्यंत पवित्र वातावरणात मुहूर्तमेढ पार पडते. यानंतर मात्र जोमाने मंडळी कामाला लागतात.

१५ दिवसांनी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेला कोठीपुजन आहे.
कोठीपुजनच्या २ दिवस आधीच जालनेकर मंडळी श्री पांडुरंगबुवा जालनेकर, श्री नानाचार्य, श्री बाबा मेरेकर, पु. प्रल्हादबुवा, ही मंडळी ४० लोकांना घेऊन रेल्वेने कोरेगाव रेल्वेस्टेशनवर येऊन पोहचलेले  आहेत. त्यांना सन्मानपूर्वक घेऊन येण्यासाठी व्यवस्थापक श्री हरीपंतांनी बैलगाड्या पाठवल्या आहेत.

पडेल ती कामे सेवेकरी करत आहेत. कोल्हापूरचे श्री हिर्लेकर कोठीच्या सारवलेल्या भिंतीवर रोज सुवाच्य अक्षरात श्लोक लिहीत आहेत.
प्रसादासाठी भोजन मंडप आईसाहेब मंदिराच्या समोर घातले गेले आहेत. भाजी निवडण्यापासून ते पाणी भरताना, वाढतांना, भांडी घासताना , आवाराची साफसफाई करतांना... खोल्यांची पुताई करतांना सर्व वेळ ' जय जय श्रीराम, जय जय श्रीराम " नामघोष ऐकू येतोय. इतका की रात्री झोपेस्तोवर तोच आवाज कानात घुमतोय. सर्व मंडळींच्या चेहऱ्यावर अखंड हास्य विलसते आहे..... तेही कष्टाची , मेहनतीची, अडचणींची अजिबात जाणीव न होता !हाताने सेवा व मुखाने नामगजर अश्या वातावरणात जागेपणी पडणाऱ्या एखाद्या स्वप्नासारखे दिवस जात आहेत.

.. आणि आता जालनेकर मंडळी गोंदवल्याच्या वेशीपर्यंत आल्याची वर्दी येते.
सुवासिनी लगेच औक्षणाची ताटे  तयार करतात.. आल्यावर त्यांच्या स्नानाची तयारी म्हणून चुलाणे पेटवली जाऊन त्यावर जाड बुडाची मोठाली तांब्याची तपेली ठेवली जातात.
बैलगाड्या प्रवेशद्वारावर आल्यावर लगबगीने पंच मंडळी त्यांच्या स्वागतासाठी तिकडे ४ सेवेकरी बरोबर घेऊन जातात. दोन्हीकडची मंडळी एकमेकांना बघताच आनंदाने एकच जयघोष करतात..! एकेक करून  पू. पांडुरंग बुवा, पू प्रल्हाद बुवा सपत्नीक आणि इतर बरोबरची मंडळी पायउतार होतात. पंच मंडळी आणि जालनेकर एकमेकांना साश्रू नयनांनी क्षेमकुशल विचारत आलिंगन देतात!  आणि का नाही? हे वर्षातले १० दिवसच तर असतात गावोगावी विखुरलेल्या भक्त मंडळींनी  एकत्र येण्याचे, सामुहिक जप, एकत्र कीर्तन, प्रवचन, महाराजांच्या आठवणींची देवाण घेवाण करण्याचे!
पंच मंडळींच्या स्त्रिया आणि इतर सुवासिनी सर्वांचे औक्षण करतात, आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकू देतात. भेटीगाठी होऊन, सर्वांना त्यांच्या खोल्यांकडे नेले जाते.. सामान नेले जाते. स्नानासाठी गरम  पाणी तयार असतेच. सर्व सुस्नात होऊन मंदिराच्या आवारात जमतात. स्नानोत्तर भोजनाची आधीच व्यवस्था झालेली असते.
परंतु आता सर्वांना श्रींच्या भेटीची आस असते. करवत काठी पांढरे शुभ्र सोवळ्याचे धोतर नेसलेले अन्  वर उपरणे घेतलेले ३८ वर्षांचे पू पांडुरंग बुवा , आणि पिवळ्या जर्द रंगाची जरीकाठाची नऊवारी साडी, कपाळी  ठसठशीत कुंकू, नाकात नथ, गळ्यात ठुशी,  अन् सौभाग्याचां दागिना, हातात हिरव्या बांगड्या घातलेल्या सौ कृष्णाबाई समाधीचे दर्शन घेतात. त्यांच्या मागेच साधारण पिवळसर नेहरू शर्ट अन् पांढरे शुभ्र धोतर, डोक्याला गुलाबी फेटा घातलेले ३२ वर्षांचे पू प्रल्हाद बुवा आणि त्यांच्या मागे त्यांच्या  हिरवीगार बारीक जरीकाठाची साडी, कपाळी लाल जर्द कुंकू ल्यालेल्या सौ मैनाबाई उर्फ जीजीमाय श्रींच्या समाधीची पूजा आरती करतात. सर्वांना श्रींच्या आठवणीने गदगदून येते. मनोभावे नमस्कार करून डोळेभरून दर्शन घेतात. आपण श्रींच्या सहवासात घालवलेले क्षण आठवून, त्यांच्या हृद्य आठवणींनी सर्वांचे मन भरून आलेले असते..
समाधीमधून बघत असलेल्या श्रींच्या डोळ्यातही पाणी तरळते... एवढा आपला भक्तपरीवार, आपण जोडलेली माणसे बघून त्यांच्याही डोळ्याच्या कडा ओलावतात.
आता श्रीमहाराजांना नैवेद्य दाखवला जातोय.
समाधी मंदिरातून पाय निघत नसतांना देखील, पंचांच्या भोजनाच्या आग्रहामुळे जड पावलांनी जालनेकर मंडळी प्रसाद मंडपाकडे वळतात. स्वच्छ सारवलेल्या जागेवर, सतरंज्या टाकण्यात आल्या आहेत. प्रत्येक पत्रावळीभोवती रांगोळी , उदबत्या लावण्यात आल्या आहेत... पत्रावळी मधे भात, बाजरीची भाकरी, लापशी द्रोणात आमटी, असा प्रसाद वाढण्यात आला आहे. वातावरणात पदार्थांचा घमघमाट पसरला आहे.
" सदा सर्वदा योग तुझा घडावा... "या श्लोकाने भोजनपूर्वीच्या श्लोकांना सुरुवात होते, मग " श्रीअनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज.."चां गजर होतो.  आणि वदनी कवळ घेता... होऊन पानाभोवती पाणी फिरवून भोजनप्रसादाला सुरुवात होते. वाढपी सेवेकरी पटापट येत आहेत... आग्रहाने जेवण वाढत आहेत.
हसत खेळत सगळ काही चालले आहे. इतक्या दिवसांनी महाराजांची भक्तमंडळी भेटल्यामुळे जालनेकर मंडळींच्या चेहऱ्यावर प्रवासाच्या थकव्याचा लवलेश ही दिसत नाहीये. सर्व जण भोजनाच्या शेवटी ' उपासनेला दृढ चालवावे   ' हा श्लोक म्हणतात आणि उठतात. मंडपाच्या बाहेर आल्यावर त्यांच्या हातांवर सेवेकरी पाणी घालतात. नंतर मंडळी विश्रांतीसाठी आपापल्या खोल्यात जातात. काही जण उत्सवाच्या सेवेकर्यांमध्ये जाऊन मिसळतात.. तर काही जपाला बसतात.
म्हणता म्हणता... कोठीपुजनचां दिवस उद्यावर आलाय!

क्रमशः

~ महाराज कन्या

जय श्रीराम! . आपण पाहत आहोत, #श्रीमहाराजांच्यानिर्याणानंतरस्थापिलेलीकाहीमंदिरे या शृंखलेतील पुढचे मंदिर आहे. १३. मंडलेश्वर राममंदिर, १९३२ ह...